Wednesday, July 28, 2010

‘हिंदू’च्या निमित्ताने...


समर्थक आणि विरोधक
सध्या सगळीकडे डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू’ची जोरदार चर्चा होते आहे. नेमाडपंथी आणि नेमाडेंचे चाहते ही कादंबरी झपाटल्यासारखी वाचत आहेत, तिचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे नेमाडेंचे विरोधक या कादंबरीच्या माध्यमातून नेमाडेंवर शरसंधान करण्याची संधी शोधत आहेत. त्यामुळे ते अगदी सुक्ष्मदर्शकातून पाहावे तसे कादंबरीचे वाचन करत आहेत. मात्र त्यातल्या काहींच्या पदरी निराशा पडत आहे, कारण कादंबरी वाचून संपल्यावर तिला वाईट म्हणणे त्यांना शक्य होत नाहीये. तर तिसरीकडे ज्या वाचकांनी उत्सूकतेपोटी या कादंबरीची आगावू नोंदणी केली होती, ते मात्र आपली प्रत नेमाडय़ांच्या स्वाक्षरीसह मिळण्याची वाट पाहात आहेत. ‘हिंदू’विषयीची उत्सूकता मात्र सर्व थरांपर्यंत पोहचते आहे, ही फार चांगली आणि सुखद घटना म्हणावी लागेल.
पॉप्युलर प्रकाशनाने ‘हिंदू’ची पहिली आवृत्ती २५ हजार प्रतींची छापायची ठरवली होती, असं म्हणतात. पण त्यांच्या अपेक्षेनुसार तर ‘हिंदू’ची नोंदणी झाली नाहीच पण ती पाच हजाराचाही आकडा गाठू शकली नाही अशीही चर्चा आहे. मात्र मराठी साहित्याचा आजवरचा लौकिक आणि परिघ पाहता ही संख्याही काही कमी म्हणता येणार नाही.


नेमाडे आणि भैरप्पा
नेमाडे यांच्या ‘हिंदू’चे प्रकाशनाआधीच एकदा पुनर्मुद्रण करण्यात आले. १८ जुलैला ‘हिंदू’चे प्रकाशन झाले, त्याआधी किमान दोन महिने तिची आगावू नोंदणी चालू होती. प्रकाशनाच्या दिवशीही अनेक जण उत्साहाने ५०० रुपये खर्चून ‘हिंदू’ची प्रत विकत घेत होते. याच सुमारास म्हणजे २८ जुनला कर्नाटकात एस. एल. भैरप्पा यांच्या ‘कवलू’ या नव्या कादंबरीचे प्रकाशन झाले. तिचे प्रकाशनाआधीच दोनदा पुनर्मुद्रण करण्यात आले तर पुढच्या दहा दिवसात पाच वेळा पुनर्मुद्रण करण्यात आले. आतापर्यंत हा आकडा दुप्पट झाला नसला तरी दीडपट नक्कीच झाला असणार. भैरप्पा गेली चाळीस वर्षे कन्नडमधील सर्वाधिक खपाचे कादंबरीकार मानले जातात. गेल्या चाळीस वर्षात त्यांनी वीसपेक्षा अधिक कादंब-या लिहिल्या आहेत. म्हणजे दोन वर्षाला एक कादंबरी. इथे नेमाडे आणि भैरप्पा अशी तुलना करायची नाही तर कन्नड वाचक आणि मराटी वाचक अशी तुलना अपेक्षित आहे.


नेमाडेंचे आयकॉनिक छायाचित्र
डॉ. भालचंद्र नेमाडे यांची मी ‘दै. प्रहार’साठी २२ जुनला मुलाखत घेतली. कांदिवलीच्या नेमाडे यांच्या घरी ही मुलाखत झाली. त्यासाठी आमचा दै. ‘प्रहार’चा सिनिअर फोटोग्राफर संदेश घोसाळकरला घेऊन गेलो होतो. नेमाडे यांच्या अभ्यासिकेत मुलाखत सुरू झाली आणि तसा संदेशचा कॅमेराही. मुलाखत जवळपास तासभर झाली. तोवर संदेशचा कॅमेरा चालूच होता. मुलाखत संपल्यावरही तो नेमाडे यांना हात वर करा, इकडे पाहा, तिकडे पाहा, असे उभे राहा, तसे उभे राहा अशा सुचनांबरहुकूम वागायला लावत होता. त्याचा तो बिनधास्त उद्योग पाहून मलाच मनातल्या मनात भीती वाटत होती, याच्या या सुचनांनी नेमाडे वैतागणार तर नाहीत ना. पण नेमाडे सर त्यांच्या झुपकेदार मिशांमुळे (आणि त्यांच्या तिखट बोलण्यामुळेही) उग्र आणि रागीट वाटत असले तरी प्रत्यक्षात ते फारच साधे आणि प्रेमळ असल्याचा प्रत्यय आला.
असो. मुलाखत सुरू असताना नेमाडे यांचा बोलण्याचा ओघात संदेशने टिपलेला आणि आम्हा सर्वाना आवडलेला फोटो दै. ‘प्रहार’च्या ‘कोलाज’ (२७ जुन) पुरवणीच्या पहिल्या पानावर मुलाखतीसह छापला. या मुलाखतीची बरीच चर्चा झाली. अनेकांना आवडली. तसे फोन, एसएमएसही मला आले. विशेष म्हणजे नेमाडेंनाही आवडली.


पुढे १८ जुलैला ‘हिंदू’च्या प्रकाशनासाठी साडेचार वाजता मी रवीन्द्र नाटय़ मंदिरात गेलो, तर व्यासपीठावर संदेशने काढलेला आणि आम्ही ‘प्रहार’मध्ये छापलेला फोटो मोठय़ा आकारात बॅनरवर झळकत होता. दुस-या दिवशी या कार्यक्रमाची बातमी दै. ‘लोकमत’ने पहिल्या पानावर छापली. त्यासोबत जो फोटो छापला त्यात खुर्चीत बसलेले नेमाडे आणि त्यांच्या पाठीमागे हाच फोटो बॅनरवर झळकत होता. त्यानंतर समीक्षक शांता गोखले यांनी २२ जुलै रोजी ‘मुंबई मिरर’मध्ये ‘हिंदूज अँड हराप्पा’ हा लेख लिहिला. त्यातही हाच फोटो छापण्यात आला. संदेशच्या नावात थोडीशी चूक झाली पण त्याला क्रेडिट दिले गेले, पण त्यासाठीची पूर्वकल्पना मात्र संदेश आणि ‘प्रहार’ला देण्यात आली नव्हती. हे समजल्यावर स्वत: शांताबाईंनी दिलगिरी व्यक्त केली. प्रश्न तसा छोटाच होता. पण त्यातही शांताबरईनी स्वत: लक्ष घातले, हा त्यांचा मोठेपणा. असो.
तर सांगायचं असं की, नेमाडे यांचा संदेशने काढलेला हा फोटो असा आयकॉनिक होत चालला आहे.


सध्या मीही ‘हिंदू’ वाचतोय. आतापर्यंत शंभरेक पानं वाचली आहेत. लवकरच स्पीड वाढवून ती संपवण्याचा विचार आहे. तेव्हा तिच्यावर सविस्तर लिहिनच. तुर्तास एवढेच.

Monday, July 12, 2010

‘आवरणा’खालचे भैरप्पा समजून घेण्यासाठी


एस. एल. भैरप्पा हे गेली पंचवीस-तीस वर्षे कन्नडमधील सर्वाधिक खपाचे कादंबरीकार मानले जातात. गेल्या चाळीस वर्षात भैरप्पा यांनी वीस कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांतील बऱ्याच कादंबऱ्यांचे हिंदी, मराठीसह इतरही भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. या कादंबऱ्यांचे सामान्य वाचकांनी मोठय़ा प्रमाणावर स्वागत केले तर जाणकारांनी त्यांच्यावर जोरदार टीका-टिप्पणीही केली. लेखन हाच धर्म मानणारे भैरप्पा मूलत: तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि प्राध्यापक आहेत. त्या विषयातील त्यांची चार पुस्तकेही प्रकाशित आहेत. तत्त्वज्ञान, इतिहास आणि समाजशास्त्र हे त्यांच्या आवडीचे विषय. ‘केवळ गंभीर प्रकृतीची पुस्तकंच आपण विकत घ्यायला हवीत. हलकीफुलकी पुस्तकं कुणी फुकट दिली तरी ती वाचायला आपल्या आयुष्यात वेळ नाही’ अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे भैरप्पा कुठल्याही विषयावर कादंबरी लिहिताना त्या विषयाचा सांगोपांग अभ्यास-वाचन करतात. ‘पर्व’ ही बहुचर्चित कादंबरी लिहिण्याआधी ते तब्बल साडेसहा वर्षे केवळ महाभारतकालीन जीवनाविषयीच्या पुस्तकांचेच वाचन करत होते.
तर अशा या नामवंत कादंबरीकाराची ‘आवरण’ ही एकविसावी कादंबरी फेब्रुवारी २००७ मध्ये प्रकाशित झाल्यापासून चर्चेत आहे. कन्नडमध्ये तर तिने पुस्तकाच्या खपाचे आजवरचे सर्व विक्रम मोडून काढले आहेत. (त्यात भैरप्पांच्या आधीच्या विक्रमाचाही समावेश आहे.) कन्नडमध्ये ही कादंबरी ५ फेब्रुवारी २००७ रोजी प्रकाशित झाली, १० फेब्रुवारी रोजी तिची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली; तर पुढच्या पाच महिन्यांत तिच्या एकंदर दहा आवृत्त्या प्रकाशित झाल्या. २००९ पर्यंत या कादंबरीच्या एकंदर बावीस आवृत्त्या प्रकाशित झाल्या. या कादंबरीचे कन्नड वाचकांनी उत्स्फूर्त स्वागत केले तर दुस-या बाजूला यू. आर. अनतंमूर्ती, गिरीश कार्नाड, चंद्रशेखर कंबार, जी. के. गोविंद राव अशा नामवंत कन्नड साहित्यिकांनी तिच्यावर भरपूर टीकाही केली. या कादंबरीवर कर्नाटकामध्ये एकंदर दहा चर्चासत्रे झाली. त्यांत वाचल्या गेलेल्या निबंधांची तेवढीच पुस्तकेही प्रकाशित झाली. त्यांतील सहा या कादंबरीच्या बाजूने आहेत, तर चार विरुद्ध.
‘आवरण’ म्हणजे विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणारी माया! ‘सार्थ’नंतरची भैरप्पांची ऐतिहासिक विषयावरची ही दुसरी कादंबरी. ‘सार्थ’मध्ये भैरप्पांनी आठव्या शतकातील संधिकाळाचे वर्णन केले आहे तर ‘आवरण’मध्ये नंतरच्या म्हणजे मध्ययुगीन काळाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचा संबंध त्यांनी थेट वर्तमानकाळापर्यंत आणून भिडवला आहे. सुरुवातीच्या प्रास्ताविकपर निवेदनात भैरप्पांनी म्हटले आहे, ‘या कादंबरीतल्या विषयात माझं स्वत:चं असं काहीही नाही. यातला प्रत्येक तपशील आणि चलन यांचा आधार कादंबरी या साहित्य-प्रकाराला पेलवेल एवढय़ाच प्रमाणात देण्यात आला आहे.’
कादंबरीत त्यांनी काही ठिकाणी संदर्भग्रंथांची नावे दिली आहेत, आणि शेवटीही तब्बल १३६ संदर्भग्रथांची सूची दिली आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक विषयावरची कादंबरी असली तरी ती पूर्णपणे ऐतिहासिक कादंबरी नाही अन् चरित्रात्मकही नाही. किंबहुना भैरप्पांच्या आजवरच्या कादंबऱ्यांपेक्षा ही कादंबरी अतिशय वेगळ्या आणि अभिनव स्वरूपाची आहे. ही कादंबरी एकाच वेळी वर्तमान आणि ऐतिहासिक अशा दोन पातळ्यांवर घडत जाते.
हम्पा, काशी येथील हिंदू देव-देवतांच्या मंदिरांचा विध्वंस मुस्लीम राज्यकर्त्यांनी केला, पण हे ऐतिहासिकसत्य निधर्मीवादी आणि डाव्या विचारसरणीच्या मंडळींनी कायम दडपून टाकण्याचा प्रयत्न केला असून, हम्पीतील मंदिरांचा विध्वंस शैव-वैष्णवांनी केला असल्याचा निधर्मीवादी मंडळींचा दावा खोटा आहे आणि मुस्लीम राज्यकर्त्यांचा विशेषत: औरंगजेब बादशहाचा एकूण कारभार कसा रगेल आणि रंगेल होता, हे या कादंबरीचे मध्यवर्ती सूत्र आहे.
‘आवरण’ची नायिका लक्ष्मी उर्फ रझिया आपला नवरा अमीरसह हम्पीवर लघुपट निर्माण करण्याच्या निमित्ताने त्या ठिकाणाला भेट देते. तिथल्या मंदिरांचा विध्वंस पाहून लक्ष्मी निराश होते. मग लघुपटाचे काम सोडून ती हम्पीचा नाश नेमका कोणी केला याचा शोध घ्यायला लागते. त्याविषयी मान्यवर अभ्यासकांशी चर्चा करते, स्वत: पुस्तके मिळवून वाचते. सत्याच्या शोधाच्या या प्रवासात तिला तिच्या गांधीवादी वडिलांनी करून ठेवलेल्या टिपणांचा आणि जमवलेल्या संदर्भग्रंथांचा मोठा उपयोग होतो. त्या टिपणांच्या आधारे ती औरंगजेबाच्या काळातील सरदार-मनसबदार-जहागीरदार यांच्या जनानखान्यांविषयी एक छोटी कादंबरी लिहिते. लक्ष्मीची ती कादंबरी आणि सत्याच्या मार्गात काटे पेरणाऱ्यांविरुद्ध तिने दिलेला संघर्ष, असे ‘आवरण’चे थोडक्यात कथानक आहे. त्यामुळे भैरप्पांनी कुणा एका व्यक्तीला नाही तर निधर्मीवादाच्या नावाखाली सत्य दडपून ठेवणाऱ्या बुद्धिजीवी वर्गाला खलनायक केले आहे. त्याचे प्रतीक म्हणून प्रा. शास्त्रींसारख्या निधर्मी,मार्क्‍सवादी विचारवंतांची त्यांनी निवड केली आहे. त्यात हे सर्व कादंबरीच्या माध्यमातून मांडायचे असल्याने भैरप्पा यांनी तशाच पद्धतीची पात्ररचना केली आहे. त्यामुळे त्यातल्या व्यक्तिरेखांचा विचार आणि व्यवहार यात टोकाचा अंतर्विरोध जाणवतो.
हा विरोधाभास प्रा. शास्त्री यांच्याबाबत तर फारच जाणवतो. इंटरनेटवर प्रकाशित झालेल्या काही प्रतिक्रियांमध्ये ही व्यक्तिरेखा यू. आर. अनंतमूर्ती यांच्यावर बेतलेली आहे आणि त्यामुळे अनंतमूर्ती यांनी भैरप्पांवर सडकून टीका केली आहे, असा उल्लेख आहे. अर्थात, या आधीही भैरप्पांच्या दोन पुस्तकांवर अनंतमूर्तीनी टीका केली होती. ‘आवरण’विषयी अनंतमूर्ती म्हणतात,‘‘Bhyrappa does not know either Hindu religion or the art of story-telling. He is only a debater. He does not go beyond his opinions. He constructs opinions and end up as a bedater, rather than a creative writer.’’ ज्येष्ठ नाटककार गिरीश कार्नाड यांनी टिपू सुलतानला ‘राष्ट्रीय हिरो’ केले असले तरी तो प्रत्यक्षात तसा नव्हता, तर मुस्लीम राज्यकर्त्यांप्रमाणेच हिंसक आणि क्रूर होता, अशी मांडणी भैरप्पांनी केल्याने गिरीश कार्नाड यांनीही भैरप्पांच्या हेतूंविषयी शंका उपस्थित केली आहे. काही मान्यवरांनी मात्र या कादंबरीचे जोरदार समर्थन केले आहे. ‘हिडन टॉरिझन्स-१००० इअर्स ऑफ इंडियन सिव्हिलायजेशन’ या ग्रंथाचे सहलेखक एन. एस. राजाराम यांनी तर या कादंबरीची तुलना थेट डॅन ब्राऊनच्या ‘दा-विंची कोड’शी केली आहे. ‘स्वार्थी, पण प्रभावी शक्तींनी खरा इतिहास दडपून ठेवून खोटय़ा इतिहासाचा प्रचार करणं, हे या दोन्ही कलाकृतींमधलं समान सूत्र’ असे राजाराम म्हणतात!
याशिवाय आणखी एक मतप्रवाह आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार एस. एल. भैरप्पा हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहेत. त्यामुळे त्यांनी कितीही आटोकाट प्रयत्न केला तरी त्यांचा मनोदय या कादंबरीतून आपोआप उघड होतो. भैरप्पांच्या या विचारसरणीमुळे ‘आवरण’ला मिळालेल्या प्रसिद्धीचा फायदा भाजपाने कर्नाटकातील विदानसभेच्या निवडणुकीत करून घेतला आणि त्यामुळे येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली, असा या तिसऱ्या मतप्रवाहाचा कौल आहे.
भैरप्पा हे चलाख कादंबरीकार आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागते. कारण आपल्या कादंबरीवर निधर्मीवादी मंडळी कोणते आक्षेप घेऊ शकतात, याची त्यांना चांगली जाणीव आहे. त्या आरोपांचा समाचार त्यांनी आधीच कादंबरीतून घेतला आणि तिच्या बचावाची सोय करून ठेवली. त्यामुळे कादंबरीवर कन्नडमधील नामवंत साहित्यिकांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली, तेव्हा भैरप्पांनी त्यांची नायिका रझियाप्रमाणे कादंबरीच्या शेवटी दिलेल्या पुस्तकांच्या यादीकडे बोट दाखवले. ‘माझ्या कादंबरीवर बंदी आणायची असेल तर आधी या प्रत्येक पुस्तकावर बंदी आणावी लागेल. कारण मी सर्व या पुस्तकांतूनच घेतले आहे’ असा युक्तिवाद भैरप्पा यांनी केला. परंतु भैरप्पांची कादंबरी मात्र रझियाच्या कादंबरीप्रमाणे सरकारने जप्त केली नाही, त्यामुळे भैरप्पांची एका परीने सरशीच झाली. पण जरा बारकाईने पाहिले तर भैरप्पांनी कादंबरीच्या शेवटी दिलेल्या १३६ संदभग्रंथांपैकी किती पुस्तके खरोखरच वस्तुनिष्ठ पद्धतीने लिहिलेली आहेत आणि त्यांचे लेखक कोण आहेत?
प्रस्तुत लेखकाला माहीत असलेल्या नऊ-दहा हिंदुत्ववादी आणि अ‍ॅण्टी मुस्लीम लेखकांच्या ४०-५० पुस्तकांचा त्यात समावेश आहे. एन. एस. राजाराम यांची आठ, अरुण शौरी यांची दहा, सीताराम गोयल यांची सतरा, अन्वर शेख यांची दोन, स्वामी विवेवाकानंद यांचे समग्र वाडम्म््मय आणि इब्न बाराख, डेव्हिड फ्रॉले, व्ही. एस. नायपॉल, अरुण जेटली यांचे प्रत्येकी एक अशी या लेखकांच्या पुस्तकांची संख्या आहे. यातल्या काहींची विश्वासार्हता आधीच जगजाहीर असल्याने त्याबाबत वेगळे भाष्य करण्याची गरज नाही. त्यामुळे भैरप्पांच्या यादीत वरवर देशी-विदेशी, हिंदू-मुस्लीम, प्राचीन-अर्वाचीन लेखकांच्या पुस्तकांचा समावेश दिसत असला तरी तिचे वर्गीकरण करणे गरजेचे आहे. अ. का. प्रियोळकर, जदुनाथ सरकार, अल्बेरूनी, विल डय़ूरांट यांच्या पुस्तकांचा केवळ माहितीसाठी उपयोग आणि हिंदुत्ववादी लेखकांची पुस्तके सत्य म्हणून ग्राह्य धरण्याची क्लृप्ती भैरप्पांचा मनसुबा उघड करते.
‘सत्याकडून सोयीनुसार उचलेगिरी करून मी केवळ कला-निर्माता आहे, असे म्हणून जबाबदारी झटकणे साहित्यिकाच्या दृष्टीने योग्य नाही’ असे खुद्द भैरप्पांनीच प्रास्ताविकात म्हटले आहे. पण सोयीचे पुरावे निवडणे आणि मागचे-पुढचे संदर्भ वगळून तपशील देण्याचा प्रकार कुद्द भैरप्पांनीच केल्याने त्यांच्यासद्हेतूविषयी शंका आल्याशिवाय राहत नाही. प्रकाशनाआधी भैरप्पांनी ही कादंबरी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश एम. रामाजोईस, कट्टर गांधीवादी, थोर वकील हारनहळ्ळी रामस्वामी आणि प्रख्यात वकील अशोक हारनहळ्ळी यांना अभिप्रायार्थ वाचायला दिली, हा निव्वळ योगायोग मानता येत नाही.
मराठीतील ऐतिहासिक आणि चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखकांनी अवास्तव कल्पनारंजन आणि सत्यापलाप करण्याचे अपराध खूपच केले आहेत. त्यामुळे ‘ऐतिहासिक आणि चरित्रात्मक कादंबरी’ हा भ्रष्ट साहित्यप्रकार आहे अशी त्यांच्यावर अनेकदा टीकाही झाली, ती उचितही आहे. पण तरीही या कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या. सामान्य वाचकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले, पण स्वत:ला विचारवंत म्हणवून घेणाऱ्या मराठी साहित्यिकांनी त्यांच्या विरोधात (यू. आर. अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, चंद्रशेखर कंबार, जी. के. गोविंद राव यांच्यासारखी) स्पष्ट आणि सडेतोड भूमिका घेतल्याची फारसी उदाहरणे नाहीत. भैरप्पांची ‘आवरण’ याही अर्थाने एक वेगळी कादंबरी ठरते. तिच्यावर भरपूर टीका झाली पण बंदी घातली गेली नाही आणि त्यावरून सामाजिक वातावरणही कलुषित करण्याचा प्रयत्न झाला नाही, हे त्या समाजाच्या प्रगल्भतेचे लक्षण मानले पाहिजे. आणि पर्यायाने लोकशाहीच्याही! पण भैरप्पांसारख्या कादंबरीकारालाही आपल्या विचारसरणीच्या मायेने कसे वेढून घेतले आहे, हे समजून घेण्यासाठी तरी ‘आवरण’ वाचायलाच हवी! आता ती मराठीतही उपलब्ध झाली आहे. उमा कुलकर्णी यांनी तिचा नेहमीप्रमाणे चांगला अनुवाद केला आहे।
आवरण : एस. एल. भैरप्पा / अनु. उमा कुलकर्णी
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे 
किंमत : २५० रुपये