Monday, August 30, 2010

इथे चमत्कार नव्हे, माणसं घडतात!



‘व्यसनमुक्त समाजनिर्मिती हे आमचे ‘स्वप्न’ आहे,’ या ध्येयातून 29 ऑगस्ट 1986 रोजी पुण्यातील येरवडा भागात सुरू झालेलं ‘मुक्तांगण’हे व्यसन मुक्ती केंद्र आज रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. व्यसनमुक्तीच्या कामाची निराळी पद्धत राबवणा-या, पेशंटला केंद्रस्थानी मानणा-या या केंद्राच्या आजवरच्या वाटचालीचा हा आढावा..

‘मुक्तांगण’ हे राज्यातलं पहिलंच व्यसन मुक्ती केंद्र. ते सुरू कसं झालं याची कहाणीही थोडीशी गंमतीशीर आहे. अनिल अवचट त्या वेळी सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत होते, सामाजिक प्रश्नावर लिहीत होते; तर डॉ. सुनंदा (अनिता) अवचट येरवडा मेंटल हॉस्पीटलमध्ये सायकॅट्रिस्ट म्हणून काम करत होत्या. त्या वेळी व्यसनी व्यक्तीवर उपचार करण्याची खास अशी काही पद्धत नव्हती. उपचार म्हणजे त्याला सरळ मेंटल हॉस्पिटलला पाठवणे. तिथे काही उपचार नव्हते. ते फक्त झोपेच्या गोळ्या द्यायचे. थेरपी वगैरे काही नव्हती. तसे पेशंट येरवड्याच्या रुग्णालयात भरती व्हायचे. पण यांच्यावर वेगळ्या पद्धतीने उपचार केले पाहिजेत, यांना इथं ठेवणं बरोबर नाही असं सुनंदा अवचटांना वाटत असे. दरम्यान त्यांच्या मैत्रिणीचा मुलगाच गर्दच्या विळख्यात सापडला. मग सुनंदाताईंनी त्याच्यावर घरीच उपचार सुरू केले. तो ब-यापैकी बाहेर आल्यावर अनिल अवचट त्याला फिरायला नेऊ लागले. त्यातून त्यांना या व्यसनाबाबत माहिती झाली.
तोवर त्यांना वाटायचं की, हे श्रीमंतांचं व्यसन आहे, आपल्याला काही देणंघेणं नाही. सामाजिक प्रश्न असेल तर आपण त्याकडे लिहिण्यासाठी बघू. पण गरीब लोकांमध्येच- कामगार, रिक्षा ड्रायव्हर, कचरा वेचणारे-यांच्यामध्येच हे व्यसन जास्त आहे हे समजल्यावर अवचटांनी त्यावर लिहायचं ठरवलं. आधी‘गर्द’लेखमाला प्रसिद्ध झाली. ती वाचून लोक त्यांच्याकडे जायला लागले. मग अवचट पती-पत्नी खात्री करून त्या पेशंटना ससूनकडे पाठवायचे. पण ससूनच्या लोकांनी एक-दोन दिवसांतच‘आमच्याकडे पाठवू नका’असं सांगितलं. मग करायचं काय? दरम्यान ‘गर्द’ पु. लं. नी वाचलं होतं. त्यानं ते खूप अस्वस्थही झाले होते. त्यांना ही हकिकत समजली. मग त्यांनी अवचट पती-पत्नीला बोलावून घेतलं. ते म्हणाले, ‘यांच्यासाठी तुम्ही काहीतरी सुरू करा. पैशाला आम्ही कमी पडू देणार नाही.’
येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये डॉ. सुनंदा अवचटांकडे अल्कोहोलिक पेशंट यायचे. तेव्हा सुनंदाताईंना वाटायचं की, या लोकांना इथं ट्रीटमेंट देणं काही बरोबर नाही. कारण एक दारूचं व्यसन सोडलं तर ते तसे नॉर्मल असायचे. परंतु त्यांच्यासाठी दुसरी कुठलीच सोय उपलब्ध नव्हती.
पु. लं. च्या आश्वासनानं सुनंदाताईंना हुरूप आला. मेंटल हॉस्पिटलच्या आवारात एक वापरात नसलेली इमारत होती. तिथे ‘मुक्तांगण’ सुरू करायचं ठरलं. मग सरकारी परवानग्या वगैरे सुरू झाल्या. सरकारने ब-याच अटी लादल्या, पण एकदाची परवानगी दिली अन् ‘मुक्तांगण’ सुरू झालं.
सुनंदाताई सायकॅट्रिस्ट असल्या तरी व्यसन मुक्ती केंद्र चालवण्याचा त्यांच्याकडे कुठलाच अनुभव नव्हता आणि अशा प्रकारच्या कामाची त्यांना माहितीही नव्हती. त्यावर त्या म्हणायच्या, ‘गरज आहे, करायचं. आपल्याला जे ज्ञान नाही ते पेशंटकडून शिकायचं.’आणि खरोखरच पेशंटकडून त्या प्रत्येक गोष्ट शिकत गेल्या. त्या येणा-या पेशंटला विचारात, ‘तुझ्यासाठी काय झालं असता तुझं व्यसन सुटेल?’ त्यांचं हे शिकणं कधी थांबलं नाही. आपल्या पेशंटविषयी कमालीची आत्मीयता आणि त्याला विश्वासात घेणं हा त्यांचा मूलमंत्र होता. त्याविषयी अनिल अवचटांनी एका लेखात म्हटले आहे, ‘‘एक उद्योगपती त्यांच्या अ‍ॅडिक्ट मुलाला अ‍ॅडमिट करायला आले. ते सुनंदाला सांगू लागले, ‘याला हे सांगा, ते सांगा.’ सुनंदा त्यांना म्हणाली,‘त्याला काय सांगायचं ते मला कळतं, मी जेव्हा तुम्हाला काही विचारेन, तेव्हा तुम्ही सांगा.’ ते चमकलेच. त्यांच्या आक्रमकतेला असं कुणी अडवलं नव्हतं; पण हे ऐकणारा तिचा पेशंट मात्र खूश झाला, की तो सुनंदाचा भक्तच झाला. सुनंदाला कुठल्याही उच्च पदस्थाचं कधी दडपण येत नसे. एकदा एक खासदार बाई त्यांच्या मुलाला दाखल करायला आल्या. बरोबर इथल्या अ‍ॅडिशनल कमिशनरना घेऊन आल्या. त्या बोलत सुटल्या. सुनंदानं त्यांना थांबवले. म्हणाली, ‘हे तुम्ही आधी सांगितलं आहे. काही नवीन असलं तर सांगा.’ त्या एकदम थांबल्याच. नंतर सावरून शेजारच्या कमिशनरना म्हणाल्या, ‘बघा, आमचं राजकारणी लोकांचं असंच असतं. बोलतच राहतो; पण कोणी अडवत नाही. या बाईंनी हे केलं नसतं, तर समजलं नसतं.’ तिच्यामध्ये गरीब-श्रीमंत असाही कधी वागण्यात फरक पडत नसे. ज्याला कोणी नाही त्याला तर ती अधिक जवळ करीत असे.’’
एक पेशंट दहा-बारा वेळा अ‍ॅडमिट झाले. नंतरनंतर त्याला ‘मुक्तांगण’मध्ये अ‍ॅडमिट करायला घरचे वैतागायचे. पण सुनंदाताई मात्र शांत असायच्या. त्या म्हणायच्या, ‘तो दमतोय का मी दमतेय ते मी बघणार. तोपर्यंत मी त्याला उपचार देणार.’ शेवटी त्या पेशंटने हार मानली. नंतर तो अतिशय चांगला राहिला. या उलट एखादा पेशंट परत पिऊन यायचा, तेव्हा त्या त्याला म्हणायच्या, ‘हरकत नाही. आपलं मागच्या वेळेला काय चर्चा करायचं राहिलंय. आपण परत चर्चा करू. ही तुझी पहिलीच अ‍ॅडमिशन आहे, असं समजू.’ हे लोक चुकताहेत, वाईट वागताहेत या दृष्टीनं त्यांनी कधी पेशंटकडे पाहिलं नाही.
सुनंदाताईंनी एक उपचाराची पद्धत शोधून काढली, ती फॉलो करणारा स्टाफ तयार केला. तोही नव्वद टक्के ‘मुक्तांगण’मध्ये व्यसनमुक्त झालेल्या लोकांमधूनच. शिक्षण कमी असलं तरी ती इथं आडकाठी ठरत नाही. कामावर निष्ठा आणि निष्ठेनं काम हाच प्राधान्यक्रम मानला जातो. आता सुनंदाताई नाहीत, तरीही ‘मुक्तांगण’चे काम याच पद्धतीने चालले आहे. त्याविषयी अनिल अवचट म्हणतात, ‘‘आम्हाला फक्त ‘मुक्तांगण’ चालवायचं होतं. लोक म्हणत होते, तुमचं सेंटर बंद पडणार. कारण डॉक्टरच्या नावावर दवाखाने चालतात. हासुद्धा सुनंदाचा एक प्रकारे दवाखाना होता. पण तसं काही झालं नाही. तिच्या काळात पेशंटला जी आत्मीयता मिळायची, जो अनुभव मिळायचा तसाच आताही मिळेल अशा जिद्दीनं आम्ही ‘मुक्तांगण’ चालवलं. त्यामुळे अनेक पेशंट सांगतात, ‘आम्हाला जावंसं वाटत नाही.’ ते येतात तेव्हा त्यांना इथं थांबायचं नसतं. ते पळून जायचे प्रयत्न करतात. खूप आरडाओरडा करतात. ते एका आठवड्यानंतर शांत होताना आम्ही पाहतो. जाताना त्यांचा पाय निघत नाही, याचा अर्थ सुनंदानं घालून दिलेला रस्ता नीट आहे.’’
1997 साली डॉ. सुनंदा अवचटांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्यानंतर ‘मुक्तांगण’च्या ट्रस्टींनी मुक्ता पुणतांबेकर यांच्यावर उपसंचालक म्हणून जबाबदारी सोपवली. मुक्ताताई सांगतात, ‘आईबरोबर मला चार वर्षे काम करायला मिळालं. सुरुवातीचे एक-दोन महिने तर मी फक्त तिच्या रूममध्ये बसून ती रुग्णांशी कसं बोलते, कसं वागतं हे शिकू लागले. मला तिचा काम करतानाचा उत्साह बघायला खूप आवडायचं, ती आजारी असली तरी. आमच्याकडे जे रुग्ण मित्र येतात. त्या प्रत्येकाला एकच गोष्ट खूप वेळा सांगायला लागते. आई पहिल्या पेशंटशी ज्या उत्साहाने बोलायची त्याच उत्साहाने ती शेवटच्या पेशंटशीही बोलायची. ती याबाबतीत दमायची नाही. मी तिला एकदा विचारलं, ‘तुला कसा एवढा उत्साह?’ तेव्हा ती म्हणाली, ‘तो माणूस हे पहिल्यांदाच ऐकतोय याचं भान मला ठेवावं लागतं.’ आईच्या अशा छोट्या छोट्या गोष्टींतून मी खूप शिकत गेले.’’
‘मी कधीच लीडर नव्हते. आय वाज ऑलवेज फॉलोअर. पण ती लीडरशिप माझ्यावर पडली.’ असं मुक्ताताई म्हणत असल्या तरी ही लीडरशिप त्या उत्तम प्रकारे निभावत आहेत.
2000 साली ‘मुक्तांगण’ येरवडय़ाच्या जागेतून प्रतीकनगरातल्या स्वत:च्या स्वतंत्र वास्तूत गेलं. सध्या ‘मुक्तांगण’मध्ये एका वेळी 120च्या आसपास रुग्ण असतात. त्यातील सत्तर टक्के दारूचे असतात. पूर्वी ब्राऊन शुगरचे 80 टक्के आणि दारूचे 20 टक्के असायचे. आता ते उलट झालं आहे. सध्या मेडिसिनल अ‍ॅब्यूजचं प्रमाण खूप वाढतंय. औषधांचा दुरुपयोग केला जातो. हे प्रमाण बायकांमध्येही वाढतंय. व्हाइटनर आणि इंटरनेटचेही ‘व्यसनी’ असतात. या वर्षात मुक्ताताईंनी इंटरनेटचे व्यसन असलेल्या तिघांवर उपचार केले. फक्त जुगाराचे व्यसन असलेले पेशंट येतात; पण यातल्या 90 टक्के लोकांना निकोटीनचंही व्यसन असतं.
ज्याचा त्या लोकांना अजिबात सिरिअसनेस वाटत नाही.
आतापर्यंत ‘मुक्तांगण’ने 18,500 पेशंटवर उपचार केले आहेत. ‘मुक्तांगण’कडून प्रेरणा घेऊन दुसरीकडे सुरू झालेलीही काही व्यसनमुक्ती केंद्रे आहेत. नागपूरला ‘मुक्तांगण’चा पूर्वीचा एक पेशंटच केंद्र चालवतो आहे, महेश फडणीस हेही ठाण्यानजीक, कळवा इथं केंद्र चालवत आहेत. शिवाय अशा प्रकारचे काम जे करू इच्छितात, त्यांना प्रशिक्षण देण्याचंही काम ‘मुक्तांगण’मध्ये केलं जातं. महाराष्ट्राखेरीज छत्तीसगड, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात या राज्यांतल्या 92 केंद्रांना असं प्रशिक्षण देणारी संस्था, म्हणूनही ‘मुक्तांगण’ कार्यरत आहे.
‘मुक्तांगण’चा 18,500 हा आकडा महाराष्ट्राच्या तुलनेत लहान असला तरी एका संस्थेसाठी तो खूप मोठा आणि आश्वासक आहे. आजकाल व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे. अ‍ॅडिक्ट असणा-यांची मोठी फौज तयार होते आहे.‘मुक्तांगण’त्यातल्या काहींनाच दुरुस्त करू शकते. अनिल अवचटांच्या भाषेत सांगायचं तर ‘हे गणित कायमच विसंगत दिसणार. या परिस्थितीत आम्ही काय करू शकतो? जो माणूस अडकला आहे, त्याला मदत करणं हे आमचं काम आहे.’ नुसतं कामच नाही तर स्वप्न आणि ध्येयही. ‘मुक्तांगण’ सुरू झाले तेच मुळी ‘व्यसन मुक्त समाज निर्मिती हे आमचे ‘स्वप्न’ आहे’ या ध्येयातून. गेल्या पंचवीस वर्षातली ‘मुक्तांगण’ची त्या वाटेवरील कामगिरी कौतुकास्पद म्हणावी अशीच आहे।
.........................................................................................................................................
महिलांसाठी ‘निशिगंध’
अलीकडच्या काळात महिलांमध्येही व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढले आहे. हे लक्षात घेऊन ‘मुक्तांगण’ने जानेवारी 2009मध्ये खास अशा महिलांसाठी ‘निशिगंध’ हा वेगळा विभाग सुरू केला. या विभागात एका वेळी आठ-नऊ महिला उपचारासाठी अ‍ॅडमिट होतात. त्याविषयी मुक्ताताई सांगतात, ‘‘एक गोष्ट चांगली की, बायकांचा रिकव्हरी रेट जास्त चांगला आहे. तो जवळपास 85 टक्के दिसतो.’ मात्र बायका सुरुवातीला जास्त त्रास देतात, खूप आरडाओरडा करतात, सारखं रडत राहतात.. असाही अनुभव आहे. पण आठवडा झाला, त्या नीट सेट झाल्या की अगदी भरभरून प्रतिसाद देतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपला असा समज असतो की, व्यसनाधीनतेमध्ये एकतर झोपडपट्टीतल्या किंवा श्रीमंतच बायका असतात. ‘मुक्तांगण’मध्ये मात्र अगदी टिपिकल मध्यमवर्गीय गृहिणीही पाहायला मिळतात. त्याखालोखाल कॉल सेंटर, आयटी क्षेत्रातल्या महिलांचं प्रमाण वाढतं आहे. विशेष म्हणजे ज्या स्त्रिया ‘निशिगंध’मध्ये काऊन्सिलर म्हणून काम करतात, त्यांचे नवरे आधी व्यसनाधीन होते. त्यांचा ‘मुक्तांगण’मध्ये ‘सहचरी’ नावाचा ग्रूप होता. त्यातल्याच काही महिला ट्रेनिंग घेऊन आता ‘निशिगंध’मध्ये काम करतात

Monday, August 23, 2010

जगण्या-लढण्यातली शहाणीव



नारायण सुर्वे यांनी राजकीय विचारांशी बांधिलकी कधी नाकारली नाही। पण त्या विचारधारेशी निव्वळ बांधलेली त्यांची कविता कधीच राहिली नाही. सुर्व्यांनी युटोपियावर विश्वास न ठेवता, त्या प्रेरणेसाठी लढणा-यांवर विश्वास ठेवला. स्वत:च्या मर्यादा ओलांडून विश्वमानवाला पाहणारी शहाणीव बहिणाबाई चौधरींप्रमाणे सुर्वेच्याही कवितेत होती. माणसांना समपातळीवरून पाहणा-या या कवीनं पुढारपणाच्या ऊर्मी नेहमी नाकारल्या, त्याही बहुधा याच शहाणिवेतून.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जॉर्ज ऑर्वेल या जगप्रसिद्ध लेखकानं ‘व्हाय आय राइट’ असा लेख 1946 साली लिहिला आहे. त्यात लेखक का लिहितो त्याची आर्वेल यांनी चार कारणे सांगितली आहेत. ती अशी Sheer egoism, Aesthetic enthusiasm, Historical impulse and Political purpose.राजकीय दृष्टिकोन म्हटलं की बहुतेक मराठी लेखकांच्या कपाळावर आठय़ा पडतात. लेखकाला राजकीय भूमिका/निष्ठा नसते, नसावी असा युक्तिवाद ते करत असतात. अशा लोकांसाठी आर्वेल यांनी ‘राजकीय दृष्टिकोना’ची फोड करताना म्हटले आहे, ''Using the word ‘political’ in the widest possible sense. Desire to push the world in a certain direction, to alter other peoples’ idea of the kind of society that they should strive after. Once again, no book is genuinely free from political bias. The opinion that art should have nothing to do with politics is itself a political attitude.''
नारायण सुर्वे या बाबतीत मात्र जॉर्ज आर्वेलच्या वंशाचे म्हटले पाहिजेत. कारण त्यांचे लेखनही ‘राजकीय दृष्टिकोन’ व्यक्त करणारे आहे. त्यांनी लिहिले आहे,‘‘सर्व माणसांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी लेखन करतो. व्यक्तिगत जीवनापासून तो सर्व समष्टीपर्यंतचा आलेख मला काढायचा आहे. माणसातले सौंदर्य व त्याच्या बावन्न कला मला चित्रित करायच्या असतात. मी चित्रित केलेला माणूस पराभूत किंवा क्षणभर निराश जरी वाटला तरी तो पुन्हा नव्या संघर्षातही उभा राहणारा, ताठ पोलादी मानेचा आहे. पराभव हा मानवी इतिहासाचा एक भाग असला तरी प्रगतीचाही तो मोठा वाटेकरी आहे हे विसरता येत नाही. माणसातले केवळ हरलेपण दाखवण्यापेक्षा त्याचे लढलेपण दाखवणे मला मोलाचे वाटते ते याचसाठी. माझे लेखनसुद्धा याचसाठी असते.’’
सुर्वे यांच्या कवितेने मराठी कवितेत एक नवे युग सुरू केले ते या अर्थाने. लढणा-या सामान्य माणसाचा पराक्रम त्यांनी महत्त्वाचा मानला. कारण प्रत्यक्षात हीच माणसं इतिहास घडवणारी असतात. त्यांचं योगदान सुव्र्याच्या कवितेचा आत्मा झाला. कुणाही लेखकाचा जगण्याचा अनुभव, त्याचं थिंकिंग एखाद-दुस-या पुस्तकात येऊन जातं, त्यामुळे त्याची तेवढीच पुस्तकं चांगली होतात. अगदी जागतिक लेखकांनाही हा नियम लावता येईल. नारायण सुर्वे यांना यापैकी कुठल्याच मर्यादा पडल्या नाहीत. कारण त्यांनी आयुष्यभर आपल्या जगण्याच्या, अनुभवांच्या पलीकडे फारसं काही लिहिलं नाही. त्यांनी मुळात लिहिलंच फार कमी. गेल्या दहा-पंधरा वर्षात तर एकही कविता लिहिली नाही. त्यांच्या म्हातारपणाचा फायदा घेऊन काहींनी त्यांच्याकडून लेख लिहून घेतले, तर काहींनी त्यांच्या एरवी पुस्तकरूपात आले नसते अशा लेखनाची पुस्तकं करायचा प्रयत्न केला. तरीही, खूप कमी लिहून साहित्यिक म्हणून किती मानाचा धनी होता येतं, याचं सुर्वे हे उत्तम उदाहरण आहे.

खरा प्रतिभावंत
सुर्व्यांना ख-या अर्थानं आणि पुरेशा गांभीर्यानं ‘प्रतिभावंत’ म्हणता येईल। मराठीत ‘विचारवंत’ या शब्दाची अलीकडच्या काळात जी फरफट झाली आहे, तीच ‘प्रतिभावंत’ या शब्दाचीही झाली आहे. आणि ती ज्यांना हे दोन्ही शब्द नीट समजलेले नाहीत त्यांनी केली आहे. इतरांच्या विचारांची पुनर्माडणी करणा-यांना विचारवंत आणि कल्पनांच्या बेगडी महिरपी रंगवणा-यांना प्रतिभावंत म्हटले जाते! सुर्वे विचारवंत नव्हते पण ते अस्सल प्रतिभावंत होते. एका अभागी आईनं रस्त्यावर टाकून दिलेलं पोर गंगाराम नावाच्या गिरणीकामगारानं काही काळ सांभाळलं खरं, पण त्यांनाही मर्यादा असल्यानं सुर्वे पुन्हा अनाथ झाले, अनाथ म्हणून मोठे झाले. शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत, शाळेत शिपाई ते शिक्षक असा प्रवास. पण कविता मात्र त्या वेळच्या साहित्याला सुभेदारी मानणा-यांना इशारा देणारी. अवघ्या मानवी विश्वाला कवेत घेऊ पाहणारी, कष्टक-यांसाठी पसायदान मागणारी. अशी शहाणीव असायला प्रतिभाच लागते. जगण्याच्या बाबतीत एका मर्यादेपर्यंत सुर्व्यांचं कबीराशी नातं होतं, तर कवितेच्या बाबतीत बहिणाबाई चौधरींशी. जगण्याचा सच्चा अनुभव गाठीला असेल, मनगटात बळ असेल आणि सोबतीला प्रतिभा असेल तर काय करता येऊ शकतं, याची बहिणाबाई आणि सुर्वे ही दोन उत्कृष्ट उदाहरणं आहेत.
बाजारीकरणापासून दूर
सुव्र्याना आपली कविता नेमकी कशी आहे याचं पुरेपूर भान होतं। चांगल्या जगण्याचा युटोपिया करत राहणं ही जगण्याची प्रेरणा असते. सुव्र्यानी या युटोपियावर विश्वास न ठेवता, त्या प्रेरणेसाठी लढणाऱ्यांवर विश्वास ठेवला. माणसांवर थेट समपातळीवरला विश्वास ठेवणारी ही कविता असल्यामुळे त्यांनी या ‘लोकां’चं पुढारपण केलं नाही॥ तसल्या पुढारपणासाठी कवितेतून क्रांतीच्याही फाजील अपेक्षा बाळगल्या नाहीतच; पण लोकरंजन हाही उद्देश मानला नाही. थोडक्यात त्यांनी कवितेचं बाजारीकरण होऊ दिलं नाही. ‘कविता बरी आहे; पण कवीला छंदशास्त्राचं ज्ञान नाही,’ असं वसंत दावतरांनी सुर्वेबद्दल तीन दशकांपूर्वी म्हटलं होतं. मानवी जगणं प्रत्यक्षात छंदोमय नसतं, याची जाणीव त्या काळीही कविताव्यवहाराशी जोडलेल्या फार थोडय़ा मंडळींना होती. आपल्या कवितांना कुणाही संगीतकाराला चांगल्या चाली लावता आल्या नाही तरी उत्तम पण त्यासाठी मी शब्द मोडून देणार नाही, असे ठणकावून सांगणारे सुर्वे हे बहुधा मराठीतले एकमेव कवी असावेत. (हृदयनाथ मंगेशकरांना तर त्यांनी पुन्हा पुन्हा मागूनही कविता दिल्या नाहीत ही तर फारच थोर गोष्ट म्हटली पाहिजे!)
कवितासंग्रहांचं वेगळेपण
सुर्व्यांचे चारही संग्रह व्यवस्थेवर भाष्य करणारे आहेत. त्यांची भाषा अतिशय साधी, सोपी आणि सरळ आहे. सुव्र्याचा ‘ऐसा गा मी ब्रम्ह’ हा पहिला कवितासंग्रह 1962 साली प्रकाशित झाला. इथल्या प्रस्थापितांविरुद्ध दिलेला तो एल्गार होता. स्वत:च्या आगमनाची अतिशय रास्त आणि निर्धोक आत्मविश्वासानं ललकारी देणारी सुर्व्यांची कविता वेगळी ठरली ती इथेच. त्यानंतरच्या ‘माझे विद्यापीठ’चं शीर्षक मॅक्सिम गॉर्कीच्या ‘माय युनिव्‍‌र्हसिटीज’शी साधर्म्य सांगणारं आहे. सुर्व्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी तोवर गॉर्की वाचला नव्हता हे खरे असले तरी सुव्र्याच्या विद्यापीठाची जातकुळी नेमकी कोणती आहे हे यातून स्पष्ट होते. तर ‘जाहीरनामा’ हा सरळसरळ मार्क्‍स-एंजल्स यांच्या ‘कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा’ याच्याशी नातं सांगणारा होता. ‘सनद’चे शीर्षक सुर्वे यांच्या अजेंडय़ाला मान्यता मिळाल्याचे द्योतक आहे. ‘नव्या माणसाचे आगमन’ हा शेवटचा संग्रह लेनिनच्या तत्त्वज्ञानाशी, आम्हाला कुठल्या प्रकारचा नवा माणूस घडवायचा आहे, याच्याशी जुळणारा आहे.
या तुलनेमुळे त्यांच्या कवितेला कमीपणा येण्याचे काहीच कारण नाही. उलट सुव्र्याचे हे मोठेपण की, त्यांनी आपली बांधिलकी कधी दडवली नाही. बांधिलकी हा अनेक लेखक-कवींसाठी अडथळा ठरतो, पण सुव्र्याची कविता त्यापल्याड जाणारी आहे. म्हणूनच तर ती सर्व थरांतल्या, सर्व वयोगटांतल्या, सर्व समाजगटातल्यांपर्यंत पोहोचू शकली, त्यांची मान्यता मिळवू शकली. अशी सर्वमान्यता मिळवणारे बहुधा सुर्वे शेवटचेच ठरावेत.
सुर्व्यांचं लिहिणं हीच त्यांची जगण्याविषयी बोलण्याची भाषा होती. लिहिणं हे जगण्याशी किती सम साधून असतं, याचं उदाहरण म्हणूनही सुर्व्यांचं नाव घ्यावं लागेल. त्यामुळेच सुर्व्यांच्या प्रत्येक कवितेत त्यांचं थोडं थोडं आत्मचरित्र आलं आहे. सुर्व्यांनी आत्मचरित्र लिहिलं नाही कारण ते त्यांच्या कवितेत आलं होतं. आणि ते लिहिलं असतं तर ‘बाळगलेला’ हे त्याचं नाव त्यांनी ठरवलं होतं. कोल्हापूरच्या रिमांड होममधल्या मुलांशी बोलतना सुर्वे म्हणाले होते,‘मी बाळगलेला पोर होतो, तुम्ही सांभाळलेली मुलं आहात.’ सुर्व्यांनी आपल्या अनाथपणाचं कधी भांडवल केलं नाही. लेखन ही अतिशय गंभीरपणे करायची गोष्ट आहे असे मानणारे, जाणणारे आणि जगणारे सुर्वे होते. म्हणूनच त्यांच्या कवितेत जगण्याची उमेद आणि ऊर्जा दिसते. साहित्याच्या श्रेष्ठतेची मानकं अशा गोष्टींमुळेच तयार होत असतात. समूहाची भाषा बोलणारे लेखन नेहमीच क्लासिक सदरात मोडत आले आहे. सुर्व्यांच्या लेखनाचाही तोच दर्जा आहे.

Wednesday, August 4, 2010

‘हिंदू’ -चर्चा,गप्पा आणि मतमतांतरे


सध्या मराठी वाचकांमध्ये एकच चर्चा चालू आहे आणि ती म्हणजे नेमाडय़ांच्या ‘हिंदू’ची। जो तो ‘हिंदू’ वाचतोय आणि रोज आपल्या मित्राला ‘माझी अमूक पानं आता वाचून झाली, तुझी किती पानं वाचून झालीत?’ मराठी वाचकांना चार भागातली कादंबरी वाचण्याचा सराव नाही. त्यात ‘हिंदू’चा पहिलाच भाग प्रकाशित झालाय. त्यामुळे या कादंबरीबद्दल जाम उत्सूकता आहे. ती अशीच चवथ्या भागापर्यंत टिकून राहिली तर मग ‘कोसला’, चांगदेव चतुष्टय आणि ‘हिंदू’ची तुलनात्मक चर्चा रंगणार असं विचारतोय.
पण सध्या मात्र पहिल्या भागाचीच चर्चा रंगतेय। काही हार्ड कोअर वाचकांनी मात्र सलग दोन-तीन दिवसांत कादंबरी वाचून संपवली आहे, तर काही मात्र थांबून थांबून वाचताहेत. ‘पुरवून पुरवून वाचन’ असा हा काहीसा प्रकार आहे. नेमाडय़ांचे हार्ड कोअर चाहते मात्र रोजची पानं वाचून झाल्यावर आपल्या मित्रांशी फार भारावून जाऊंन चर्चा करताहेत. आणि आपल्याला म्हणण्याला आता नेमाडय़ांच्या मांडणीचा आधार मिळालाय, या संतोषानं समाधान पावताहेत.
तर दुसरीकडे नेमाडय़ांनी ‘हिंदू’ ‘ज्ञानपीठ’ समोर ठेवून लिहिली आहे, ‘कोसला’ला साहित्य अकादेमी देता आले नाही म्हणून यू. आर. अनंतमूर्तीनी ‘टीकास्वयंवर’ला दिले. आता नेमाडय़ांचीही दिल्लीत वट वाढली असून ‘ज्ञानपीठ’ मिळवणं त्यांच्यासाठी काही कठीण काम नाही. ‘हिंदू’ लिहून त्यांनी त्याची सोय करून ठेवली आहे, असंही बोललं जात आहे.
तिसरीकडे ‘हिंदू’ची रचना एवढी मोठी करून नेमाडय़ांनी मराठी वाचकांची मोठी गोची करून ठेवली आहे. कारण या कादंबरीचे चारही भाग प्रकाशित होईपर्यंत त्याविषयी ठोसपणे भाष्य करता येणार नाही, विश्लेषणही करता येत नाही. त्यामुळे चवथा भाग येईपर्यंत थांबणं भाग आहे. आणि नेमाडय़ांच्या अलीकडच्या मुलाखती पाहता ते ही कादंबरी पूर्ण करतील असं वाटत नाही. चौथा भाग लिहायला त्यांनी आणखी २०-२५ वर्षे घेतली तर काय घ्या? आपण त्यांच्यावर दबावही आणू शकत नाही. एकंदर नेमाडय़ांनी त्यांच्या चाहत्यांना टांगणीवर ठेवलं आहे आणि त्यांच्या विरोधकांची सॉलिड गोची करून ठेवली आहे, अशीही चर्चा रंगत आहे.
चौथा जो वर्ग आहे, त्याचं म्हणणं आहे की, नेमाडय़ांनी ‘हिंदू’च्या पहिल्या भागात जी ऐतिहासिक दृष्टीने अनेक विधाने केली आहेत, त्यांचे पुरावे कादंबरीत कुठे दिले नाहीत. कादंबरीत पुरावे, संदर्भ देणं शक्य नसतं हे खरं पण त्यांचा आधार तर त्यांना स्पष्ट करता आला असता. तेही त्यांनी कुठं केलं नाही, तेव्हा त्यावर विश्वास कसा ठेवायचा? नेमाडे सतत काहीतरी तिरपागडं बघत संभ्रमात टाकणारी विधानं करत असतात. तसाच प्रयत्न त्यांनी या कादंबरीतही केला आहे. शिवाय पुरावे मागणाऱ्यांना ‘माझ्या वर्गात तासाला येऊन बसा म्हणजे स्पष्टीकरण देतो’, असं तिरपागडं उत्तर देतात. आता त्यांचा हा वर्ग भरतो कुठं आणि त्यात ते शिकवतात काय, हे पाहत बसण्याएवढा वेळ कुणाकडे आहे?
पाचवा वर्ग मात्र ‘हिंदू’चं वाचन झपाटय़ाने संपवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी मोठी आशा आहे की, ‘हिंदू’त अनेक गडबडी असणार आणि आपल्याला त्या आधारे नेमाडय़ांवर शरसंधान करता येईल. त्यामुळे ते अगदी बाह्या सावरून कादंबरी वाचताहेत.
तर एकंदर मराठी साहित्यातलं वातावरण असं ‘हिंदू’मय झालेलं आहे.

Monday, August 2, 2010

राम पटवर्धन उवाच....


‘सत्यकथा’ हे मासिक बंद पडून आता जवळपास तीस वर्षे होत आलीत. पण अजूनही चांगल्या मासिकांचा विषय निघाला की, ‘सत्यकथा’चा हमखास उल्लेख केला जातो. आणि ‘सत्यकथे’चा उल्लेख आला की, श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धनांचीच नावं आठवतात. ‘सत्यकथे’ला या दोघा संपादकांनी लौकिक मिळवून दिला, तो मर्मज्ञ दृष्टी आणि साहित्यावरच्या अपार प्रेमाच्या बळावर. त्या आठवणी पुन्हा जागवण्याचा हा प्रयत्न, राम पटवर्धन यांच्याबरोबर...

‘‘क-हाडच्या कृष्णाकाठाविषयीची कथा दीपा गोवारीकरनं लिहिली होती. ती वाचल्यावर मी दीपाबाईंना म्हणालो, ‘‘हे कुठल्या ऋतूत चाललं आहे?’ त्या म्हणाल्या, ‘नवरात्र.’ मी म्हटलं, ‘अच्छा. बघू या.’ मग सरळ पंचांग काढलं. ते पाहिल्यावर मी त्यांना म्हटलं, ‘हे अतिशय गारव्याचे दिवस आहेत. तुमच्या कथेत तर हा गारवा कुठे आलेलाच नाही!’
‘‘आशा बगे यांनी एकदा ‘सत्यकथे’कडं कथा पाठवली. त्या कथेला त्यांनी ‘गादी’ हे नाव दिलं होतं. कथा वाचल्यावर मला वाटलं की, या नावातून अर्थबोधच होत नाही. कथेतला काळ मध्ययुगीन होता. त्यातल्या कीर्तनांचं, त्यातल्या रागाचं फार सुंदर वर्णन त्यांनी केलं होतं. म्हणून मी त्यांना म्हटलं की, हा संध्याकाळचा राग आहे. आपण या कथेला ‘मारवा’ असं नाव देऊ. कथा प्रकाशित झाल्यावर हे नाव खूप क्लिक झालं.
‘‘थोडक्यात मी कलाकृती घेऊन बसतो. त्यात कुठलाही अहंकार नसतो. ते सगळं लेखक आणि माझ्या एक्सचेंजमधून होत असतं. या लेखकाचा कोअर अनुभव काय? त्या अनुभवाला या लिखाणातून बळ मिळतंय का? की पुरेसं मिळत नाहीये? त्या दृष्टीनं मी संबंध कथा वा लेख वाचत असे. संपादन म्हटलं की, थोडासा मास्तरकीचा वास येतो. चुका काढणं वगैरे. पण संपादन म्हणजे संगोपन.’’
मराठी साहित्याचं अशा प्रकारे संगोपन करण्याचं काम श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांनी ‘सत्यकथे’च्या माध्यमातून एकेकाळी केलं. त्यामुळं त्यांच्या नावांचा महाराष्ट्रात खूप दबदबा होता. नवकथा आणि नवकाव्याच्या परंपरेतील साहित्यिकांच्या लेखनाला पैलू पाडून ते अधिकाधिक फुलवण्याचं, शैलीदार बनवण्याचं काम श्री. पु. भागवत-राम पटवर्धन यांनी ‘सत्यकथे’च्या माध्यमातून केलं. ‘तुमच्या कथेला टोक नाही, तिला टोक आणलं पाहिजे’ या त्यांच्या विधानाची तेव्हा खूप टवाळीही केली जायची. श्री. पु.-राम पटवर्धन कथा वा लेख पुन्हा पुन्हा लिहायला सांगत. त्यांच्या मनासारखं लेखन होईपर्यंत ते ‘सत्यकथे’त छापलं जात नसे. मराठी लेखकांनाही आपलं लेखन या दोन चिकित्सक संपादकांच्या पसंतीला उतरणं आणि ‘सत्यकथे’त छापून येणं हा मोठा गौरव वाटत असे. पण काही लेखक त्यांच्या या संपादनाची टवाळीही करत.
श्री. पु.- राम पटवर्धन हे मराठी साहित्यात कडक शिस्तीचे हेडमास्तर म्हणून ओळखले जातात. श्री. पु. आता नाहीत. राम पटवर्धनांचं वयही 83 आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली तीच मुळी या प्रवादापासूनच. आमच्याबद्दलच्या सगळ्या समजुती या निव्वळ प्रवाद आहेत, असं सांगून पटवर्धन म्हणाले,‘‘आम्ही प्रत्येक कथेला भरपूर वेळ देत असू. अन् तोही लेखकावर बळजबरी न करता. हे काढा, ते काढा, असं आम्ही कधी केलं नाही. संपादन असं नसतं. ते फुलवणं असतं. आतमध्ये गुदमरलेली थीम फुलून आली पाहिजे.’’
राम पटवर्धनांनी अनेक नव्या आणि तरुण लेखकांना प्रोत्साहन दिलं, लिहितं केलं. आशा बगे, दीपा गोवारीकर, आनंद विनायक जातेगावकर, सानिया, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ अशा वेगवेगळ्या शैलीच्या आणि प्रकृतीच्या लेखकांना त्यांनी ‘सत्यकथे’त आणलं. ढसाळ ‘सत्यकथे’कडे कसे आले त्याचा किस्साही मोठा मजेशीर आहे. पटवर्धन सांगतात, ‘‘अनंत काणेकरांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन चालू होतं. तेव्हा नामदेव ढसाळ पुढे आला आणि म्हणाला, मला कविता वाचायची आहे. काणेकर म्हणाले, काय करता तुम्ही? तो म्हणाला, मी टॅक्सी ड्रायव्हर आहे. मी काही मोठं विशेष लिहिलेलं नाही, पण ही कविता मला श्रोत्यांना ऐकवायची आहे. त्या वेळी नामदेवनं जे वाचून दाखवलं, त्यानं अंगावर काटा आला. तो एका वेगळ्या जगाचा अनुभव होता. मी मनात म्हटलं, अरेच्चा हे पात्र जरा लक्षात ठेवलं पाहिजे. कार्यक्रम संपल्यावर तो जायला निघाला तेव्हा मी त्याला थांबवून म्हटलं, उद्या मौजेत या. ढसाळ त्याप्रमाणे आला. त्यामुळं नामदेवच्या सुरुवातीच्या कविता सत्यकथेत आल्या.’’ चांगलं साहित्य कुठं दिसलं की, त्या लेखकाला आणि पर्यायानं त्याच्या साहित्याला उचलायचं हा पटवर्धनांचा कार्यक्रम होता. या धोरणामुळे ‘सत्यकथा’ पटवर्धनांच्या काळात वेगळ्या वळणानं जायला लागली. दलित, कामगार या वर्गातील लोकांबद्दल त्यांना अतिशय आदर होता. या लेखकांनी पटवर्धनांना पुष्कळ सहकार्य केलं आणि प्रेमही दिलं.
मौजेमध्ये फक्त लेखकांचाच राबता असायचा असं नाही. तर चित्रकला, शास्त्रीय संगीत, नाटक, चित्रपट या क्षेत्रातले लोकही तिथं येत असत. त्यात जे बंडखोर लोक होते, त्यांचे नेहमी इतरांशी वाद-संवाद चालायचे. ‘ये भडव्या’ अशा भाषेत ते बोलायचे. राम पटवर्धनांची त्यावर प्रतिक्रिया असायची, ‘ठीक चाललंय. चालू द्या.’ त्यांना खेचायचं काम कधी त्यांनी केलं नाही. त्यांना ते त्यांच्या पद्धतीनं जाऊ द्यायचे. त्यावर ते गंमतीनं म्हणतात, ‘‘अशा पद्धतीनं बघू शकलो तर आपण रिलॅक्स राहतो. कुठल्याही साहित्यिक वादामध्ये हिरिरीनं पडत नाही. हळूहळू नामदेव ढसाळचे वीकपॉइंट दिसायला लागले. पुढे तर तो शिवसेनेत गेला. मग राहिलं काय? मला वाटतं, ठीक आहे. असंच चालायचं.’’
राम पटवर्धन ‘सत्यकथे’चे संपादक असताना त्यांची सतत श्री. पु. भागवतांशी तुलना केली जात असे. अर्थात दोघांच्या कामाची पद्धत वेगळी असली तरी ध्येय मात्र एकच असल्यानं त्यांना एकमेकांना कधी काही सांगावं लागलं नाही. मात्र काही वादाचे, गैरसमजाचे प्रसंग आलेच. पण त्या वेळी श्री. पु. पटवर्धनांना एवढंच म्हणाले की, ‘पटवर्धन, तुम्ही उत्साहाच्या भरात काही लोकांवर अन्याय केलाय.’ तेवढंच. बाकी त्यांनी पटवर्धनांना असं करा, तसं करा असं कधीही सांगितलं नाही. पटवर्धनांनी ‘सत्यकथे’त दिलीप चित्रे यांचा एक लेख छापला होता. त्यात त्यांनी ग. दि. माडगूळकर हे कवी नसून गीतकार आहेत, असं म्हटलं होतं. त्यामुळे माडगूळकर नाराज झाले. असे आणखी एक-दोन प्रसंग घडले.
साहित्याच्या एवढय़ा सान्निध्यात राहूनही पटवर्धनांनी स्वत: मात्र फारसं लेखन केलं नाही. नाही म्हणायला त्यांनी केलेला मार्जोरी किनन रॉलिंग्जच्या ‘यार्लिग’चा ‘पाडस’ हा अनुवाद मात्र अप्रतिम म्हणावा असा आहे. ‘नाइन फिफ्टी टू फ्रिडम’चा ‘अखेरचा रामराम’ आणि बी. के. अय्यंगार यांच्या पुस्तकाचा ‘योगदीपिका’ या नावाने असे दोन मराठी अनुवाद केले खरे, पण ‘पाडस’चे अनुवादक अशीच त्यांची ओळख आहे. (पुष्कळ लोक अय्यंगारांच्या त्यांच्या अनुवादाला ‘तुमची योगायोगदीपिका’असं म्हणतात.) त्यांच्या वकील आणि ऑडिटर असणाऱ्या दोन्ही मुलांना ‘पाडस’ जवळपास तोंडपाठ आहे. अर्थात हे पुस्तक पटवर्धनांकडे अनुवादासाठी आलं ते अगदी योगायोगानं. जयवंत दळवी यांना ‘युसिस’साठी या पुस्तकाचा अनुवाद करून हवा होता आणि तो मौजेकडून प्रकाशित व्हावा अशी त्यांची इच्छा होती. ती त्यांनी विष्णुपंत भागवतांना बोलून दाखवली. त्यांनी हा अनुवाद आमचे राम पटवर्धन करतील आणि श्री. पु. तपासतील असं त्यांना सांगून टाकलं. या पुस्तकाच्या रूपानं पटवर्धनांच्या हाती घबाडच लागलं. म्हणून पटवर्धन म्हणतात, ‘‘अनुवादाची एक प्रक्रिया असते. मूळ इंग्रजी पुस्तक आपण वाचतो, ते आपल्याला आवडतं. मग आपण त्याचा अनुवाद करतो. ‘पाडस’च्या बाबतीत असं काहीही झालेलं नाही. तो एक अपघात आहे.’’
पटवर्धन यांनी कुठल्याही गोष्टीसाठी कधी धडपड केली नाही. सर्व गोष्टी त्यांना विनासायास मिळत गेल्या. पण त्याचा त्यांनी कधी अहंकार बाळगला नाही. ते याचं वर्णन ‘केवळ योगायोग’ अशाच शब्दात करतात. ‘‘मी ‘सत्यकथे’त गेलो ते योगायोगानंच! त्याआधी मी रुइया कॉलेजमध्ये शिकवत होतो. एके दिवशी श्री. पु. आले आणि म्हणाले,‘ग. रा. कामत फिल्मलाइनमध्ये चालले होते. मी तुमचे निबंध वाचलेले आहेत. मला असं वाटतं की, तुम्ही ‘सत्यकथे’चं काम चांगलं कराल. येता का मौजेत?’ आम्ही काय तयारच. मौजेसारख्या संस्थेत काम करायला मिळणं ही मोठी गोष्ट होती.’’
एकेकाळी महाराष्ट्राचं सांस्कृतिक वातावरण धगधगतं ठेवणारी ‘अभिरुची’, ‘हंस’, ‘सत्यकथा’ ही मासिकं काय किंवा लघुअनियतकालिकांची चळवळ काय, या शेवटी अल्पजीवीच ठरल्या. आधी ‘अभिरूची’ मग ‘हंस’ बंद झालं. आणि ऑगस्ट 1982 मध्ये ‘सत्यकथा’ही बंद झालं. त्यानंतर काही काळ लघुअनियतकालिके निघाली, पण त्यांचा वकुब खूपच मर्यादित राहिला. आणि त्यातल्या कुणालाच संपादक म्हणून श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांच्यासारखी मोहोर उठवता आली नाही. सगळ्याच चांगल्या गोष्टी शेवटी अल्पजीवीच ठरतात काय? पण पटवर्धनांना मात्र तसं वाटत नाही. ते म्हणतात,‘‘त्याला अल्प वगैरे आपण म्हणतो. त्यांचा जो जीव असतो, तेवढी ती टिकतात. आपले कम्युनिस्ट घ्या. पूर्वेला लालरंग वगैरे देण्याचे त्यांचे मनसुबे होते. चीनमध्ये झाली तशी क्रांती आपल्याकडे व्हायला पाहिजे अशी ते स्वप्नं पाहायचे. क्रांतीची अशी कलमं लावता येतात काय? त्याचं एक गणित असतं त्यानुसार ते चाललेलं असतं. त्यात आपण बदल करायचा प्रयत्न करायचा म्हणजे फक्त शिव्याच द्यायच्या, कुणाला काही कदर नाही वगैरे. कशाला पाहिजे हे? जगामध्ये इतक्या गोष्टी आहेत, त्यांचा तुम्ही धांडोळा घेऊ शकता. ते सोडून आहे त्या गोष्टीला चिकटून बसणं हे चूक आहे. सध्या आपल्या आजूबाजूला जे काय चाललं आहे, त्याला सामावून घेणं मराठी साहित्यिकांच्या आणि मासिकांच्याही हातात नाही. सगळाच काळ आता बदलला आहे हे आपण लक्षात ठेवावं. आता कुठलीही सांस्कृतिक चळवळ निर्माण होणार नाही. तशा अपेक्षाही बाळगूही नयेत. आपण शांत बसावं. धडपड करू नये. यात साहित्याचं काही नुकसान वगैरे होत नाही. साहित्य नावाच्या गोष्टीला पूर्वी जे महत्त्व होतं ते आता उरलं नाही. वेगवेगळ्या गोष्टी पुढे आल्या. मला वाटतं, हे उत्तम आहे. सगळं स्वीकारावं लागतं! अट्टाहास कशाला करायचा? हे बदल सगळ्याच जगात होत आहेत. तिथे कुठल्याच एकटय़ादुकटय़ा माणसाचा पाड लागणार नाही.’’
राम पटवर्धन असं बोलू शकतात यावर विश्वास बसणं जरा कठीण जातं. पण त्यामागचा त्यांचा विचार समजून घेतला की, त्यांच्या काळाच्या बरोबर राहण्याचं आणि भूतकाळाच्या समंधाला मानगुटीवर बसू न देण्याचं कौतुकही वाटतं. सध्या वयोमानानं पटवर्धनांना वाचन करणं शक्य होत नाही. तरीही पुस्तकांबद्दलची उत्सूकता त्यांना शांत बसू देत नाही. वाचता येत नसलं तरी ते पुस्तकांबद्दल जाणून घेतात. वर्तमानपत्रं वाचतात. त्यामुळे नेमाडय़ांची ‘हिंदू’ एवढे दोन शब्द उच्चारताच ते म्हणाले, ‘‘आता ‘हिंदू’ची बरीच चर्चा चालली आहे. मी त्याकडे वेगळ्या त-हेने बघतो. आपली संस्कृती केवढय़ा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. त्याला नाव देण्यासाठी ‘हिंदू ’हा शब्द कशाला वापरायचा? ते ‘प्राचीन भारतीय संस्कृती’ असं म्हणू शकले असते. मुळात भारतीय संस्कृती हे अजब मिश्रण आहे. नेमाडय़ांनाही शेवटी म्हणावं लागलं, ‘ही अडगळ आहे पण ती समृद्ध आहे. आणि समृद्ध असली तरी ती अडगळच आहे.’ मला हा खुळेपणा वाटतो. नेमाडय़ांनी ही मांडणी त्यांच्यापुरतीच ठेवावी.’’
भविष्यात साहित्याला काही स्थान असेल का? की नसेलच? असे प्रश्न हल्ली निर्माण होत असतात. त्याचं कुठल्याच प्रकारे चित्रं रंगवता येत नसल्याने काळजीत आणखीनच भर पडते. असेच प्रश्न पटवर्धनांना पडतात का, म्हणून विचारल्यावर त्यांनी दिलेलं उत्तर मोठं मजेशीर होतं. ते म्हणाले,‘‘या प्रश्नांची उत्तरं शोधायची गरज काय? साहित्याला माणसाच्या आयुष्यात स्थान असलं पाहिजे आणि नसलंही पाहिजे. साहित्याबद्दल कसलाही विचार न करता अतिशय समृद्ध जीवन जगलेली पुष्कळ मंडळी आहेत. त्यामुळे साहित्यवादी मंडळींनी यांच्याकडे तुच्छतेने बघू नये आणि यांनीही त्यांच्याकडे तुच्छेतेने बघू नये. या जगामध्ये सगळ्यांना जागा आहे आणि सगळ्यांनी राहावं.’’ ही एवढी स्वागतशील वृत्ती पटवर्धनांमध्ये कुठून आली असावी? अगदी त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘माझा डावा डोळा सुरुवातीपासूनच दुबळा आहे. तो इतका की, मला कधी चष्माही लावता आला नाही. पण ते एका अर्थानं बरंच झालं. त्यामुळं जगाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन ओपन राहिला.’