Monday, August 2, 2010

राम पटवर्धन उवाच....


‘सत्यकथा’ हे मासिक बंद पडून आता जवळपास तीस वर्षे होत आलीत. पण अजूनही चांगल्या मासिकांचा विषय निघाला की, ‘सत्यकथा’चा हमखास उल्लेख केला जातो. आणि ‘सत्यकथे’चा उल्लेख आला की, श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धनांचीच नावं आठवतात. ‘सत्यकथे’ला या दोघा संपादकांनी लौकिक मिळवून दिला, तो मर्मज्ञ दृष्टी आणि साहित्यावरच्या अपार प्रेमाच्या बळावर. त्या आठवणी पुन्हा जागवण्याचा हा प्रयत्न, राम पटवर्धन यांच्याबरोबर...

‘‘क-हाडच्या कृष्णाकाठाविषयीची कथा दीपा गोवारीकरनं लिहिली होती. ती वाचल्यावर मी दीपाबाईंना म्हणालो, ‘‘हे कुठल्या ऋतूत चाललं आहे?’ त्या म्हणाल्या, ‘नवरात्र.’ मी म्हटलं, ‘अच्छा. बघू या.’ मग सरळ पंचांग काढलं. ते पाहिल्यावर मी त्यांना म्हटलं, ‘हे अतिशय गारव्याचे दिवस आहेत. तुमच्या कथेत तर हा गारवा कुठे आलेलाच नाही!’
‘‘आशा बगे यांनी एकदा ‘सत्यकथे’कडं कथा पाठवली. त्या कथेला त्यांनी ‘गादी’ हे नाव दिलं होतं. कथा वाचल्यावर मला वाटलं की, या नावातून अर्थबोधच होत नाही. कथेतला काळ मध्ययुगीन होता. त्यातल्या कीर्तनांचं, त्यातल्या रागाचं फार सुंदर वर्णन त्यांनी केलं होतं. म्हणून मी त्यांना म्हटलं की, हा संध्याकाळचा राग आहे. आपण या कथेला ‘मारवा’ असं नाव देऊ. कथा प्रकाशित झाल्यावर हे नाव खूप क्लिक झालं.
‘‘थोडक्यात मी कलाकृती घेऊन बसतो. त्यात कुठलाही अहंकार नसतो. ते सगळं लेखक आणि माझ्या एक्सचेंजमधून होत असतं. या लेखकाचा कोअर अनुभव काय? त्या अनुभवाला या लिखाणातून बळ मिळतंय का? की पुरेसं मिळत नाहीये? त्या दृष्टीनं मी संबंध कथा वा लेख वाचत असे. संपादन म्हटलं की, थोडासा मास्तरकीचा वास येतो. चुका काढणं वगैरे. पण संपादन म्हणजे संगोपन.’’
मराठी साहित्याचं अशा प्रकारे संगोपन करण्याचं काम श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांनी ‘सत्यकथे’च्या माध्यमातून एकेकाळी केलं. त्यामुळं त्यांच्या नावांचा महाराष्ट्रात खूप दबदबा होता. नवकथा आणि नवकाव्याच्या परंपरेतील साहित्यिकांच्या लेखनाला पैलू पाडून ते अधिकाधिक फुलवण्याचं, शैलीदार बनवण्याचं काम श्री. पु. भागवत-राम पटवर्धन यांनी ‘सत्यकथे’च्या माध्यमातून केलं. ‘तुमच्या कथेला टोक नाही, तिला टोक आणलं पाहिजे’ या त्यांच्या विधानाची तेव्हा खूप टवाळीही केली जायची. श्री. पु.-राम पटवर्धन कथा वा लेख पुन्हा पुन्हा लिहायला सांगत. त्यांच्या मनासारखं लेखन होईपर्यंत ते ‘सत्यकथे’त छापलं जात नसे. मराठी लेखकांनाही आपलं लेखन या दोन चिकित्सक संपादकांच्या पसंतीला उतरणं आणि ‘सत्यकथे’त छापून येणं हा मोठा गौरव वाटत असे. पण काही लेखक त्यांच्या या संपादनाची टवाळीही करत.
श्री. पु.- राम पटवर्धन हे मराठी साहित्यात कडक शिस्तीचे हेडमास्तर म्हणून ओळखले जातात. श्री. पु. आता नाहीत. राम पटवर्धनांचं वयही 83 आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली तीच मुळी या प्रवादापासूनच. आमच्याबद्दलच्या सगळ्या समजुती या निव्वळ प्रवाद आहेत, असं सांगून पटवर्धन म्हणाले,‘‘आम्ही प्रत्येक कथेला भरपूर वेळ देत असू. अन् तोही लेखकावर बळजबरी न करता. हे काढा, ते काढा, असं आम्ही कधी केलं नाही. संपादन असं नसतं. ते फुलवणं असतं. आतमध्ये गुदमरलेली थीम फुलून आली पाहिजे.’’
राम पटवर्धनांनी अनेक नव्या आणि तरुण लेखकांना प्रोत्साहन दिलं, लिहितं केलं. आशा बगे, दीपा गोवारीकर, आनंद विनायक जातेगावकर, सानिया, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ अशा वेगवेगळ्या शैलीच्या आणि प्रकृतीच्या लेखकांना त्यांनी ‘सत्यकथे’त आणलं. ढसाळ ‘सत्यकथे’कडे कसे आले त्याचा किस्साही मोठा मजेशीर आहे. पटवर्धन सांगतात, ‘‘अनंत काणेकरांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन चालू होतं. तेव्हा नामदेव ढसाळ पुढे आला आणि म्हणाला, मला कविता वाचायची आहे. काणेकर म्हणाले, काय करता तुम्ही? तो म्हणाला, मी टॅक्सी ड्रायव्हर आहे. मी काही मोठं विशेष लिहिलेलं नाही, पण ही कविता मला श्रोत्यांना ऐकवायची आहे. त्या वेळी नामदेवनं जे वाचून दाखवलं, त्यानं अंगावर काटा आला. तो एका वेगळ्या जगाचा अनुभव होता. मी मनात म्हटलं, अरेच्चा हे पात्र जरा लक्षात ठेवलं पाहिजे. कार्यक्रम संपल्यावर तो जायला निघाला तेव्हा मी त्याला थांबवून म्हटलं, उद्या मौजेत या. ढसाळ त्याप्रमाणे आला. त्यामुळं नामदेवच्या सुरुवातीच्या कविता सत्यकथेत आल्या.’’ चांगलं साहित्य कुठं दिसलं की, त्या लेखकाला आणि पर्यायानं त्याच्या साहित्याला उचलायचं हा पटवर्धनांचा कार्यक्रम होता. या धोरणामुळे ‘सत्यकथा’ पटवर्धनांच्या काळात वेगळ्या वळणानं जायला लागली. दलित, कामगार या वर्गातील लोकांबद्दल त्यांना अतिशय आदर होता. या लेखकांनी पटवर्धनांना पुष्कळ सहकार्य केलं आणि प्रेमही दिलं.
मौजेमध्ये फक्त लेखकांचाच राबता असायचा असं नाही. तर चित्रकला, शास्त्रीय संगीत, नाटक, चित्रपट या क्षेत्रातले लोकही तिथं येत असत. त्यात जे बंडखोर लोक होते, त्यांचे नेहमी इतरांशी वाद-संवाद चालायचे. ‘ये भडव्या’ अशा भाषेत ते बोलायचे. राम पटवर्धनांची त्यावर प्रतिक्रिया असायची, ‘ठीक चाललंय. चालू द्या.’ त्यांना खेचायचं काम कधी त्यांनी केलं नाही. त्यांना ते त्यांच्या पद्धतीनं जाऊ द्यायचे. त्यावर ते गंमतीनं म्हणतात, ‘‘अशा पद्धतीनं बघू शकलो तर आपण रिलॅक्स राहतो. कुठल्याही साहित्यिक वादामध्ये हिरिरीनं पडत नाही. हळूहळू नामदेव ढसाळचे वीकपॉइंट दिसायला लागले. पुढे तर तो शिवसेनेत गेला. मग राहिलं काय? मला वाटतं, ठीक आहे. असंच चालायचं.’’
राम पटवर्धन ‘सत्यकथे’चे संपादक असताना त्यांची सतत श्री. पु. भागवतांशी तुलना केली जात असे. अर्थात दोघांच्या कामाची पद्धत वेगळी असली तरी ध्येय मात्र एकच असल्यानं त्यांना एकमेकांना कधी काही सांगावं लागलं नाही. मात्र काही वादाचे, गैरसमजाचे प्रसंग आलेच. पण त्या वेळी श्री. पु. पटवर्धनांना एवढंच म्हणाले की, ‘पटवर्धन, तुम्ही उत्साहाच्या भरात काही लोकांवर अन्याय केलाय.’ तेवढंच. बाकी त्यांनी पटवर्धनांना असं करा, तसं करा असं कधीही सांगितलं नाही. पटवर्धनांनी ‘सत्यकथे’त दिलीप चित्रे यांचा एक लेख छापला होता. त्यात त्यांनी ग. दि. माडगूळकर हे कवी नसून गीतकार आहेत, असं म्हटलं होतं. त्यामुळे माडगूळकर नाराज झाले. असे आणखी एक-दोन प्रसंग घडले.
साहित्याच्या एवढय़ा सान्निध्यात राहूनही पटवर्धनांनी स्वत: मात्र फारसं लेखन केलं नाही. नाही म्हणायला त्यांनी केलेला मार्जोरी किनन रॉलिंग्जच्या ‘यार्लिग’चा ‘पाडस’ हा अनुवाद मात्र अप्रतिम म्हणावा असा आहे. ‘नाइन फिफ्टी टू फ्रिडम’चा ‘अखेरचा रामराम’ आणि बी. के. अय्यंगार यांच्या पुस्तकाचा ‘योगदीपिका’ या नावाने असे दोन मराठी अनुवाद केले खरे, पण ‘पाडस’चे अनुवादक अशीच त्यांची ओळख आहे. (पुष्कळ लोक अय्यंगारांच्या त्यांच्या अनुवादाला ‘तुमची योगायोगदीपिका’असं म्हणतात.) त्यांच्या वकील आणि ऑडिटर असणाऱ्या दोन्ही मुलांना ‘पाडस’ जवळपास तोंडपाठ आहे. अर्थात हे पुस्तक पटवर्धनांकडे अनुवादासाठी आलं ते अगदी योगायोगानं. जयवंत दळवी यांना ‘युसिस’साठी या पुस्तकाचा अनुवाद करून हवा होता आणि तो मौजेकडून प्रकाशित व्हावा अशी त्यांची इच्छा होती. ती त्यांनी विष्णुपंत भागवतांना बोलून दाखवली. त्यांनी हा अनुवाद आमचे राम पटवर्धन करतील आणि श्री. पु. तपासतील असं त्यांना सांगून टाकलं. या पुस्तकाच्या रूपानं पटवर्धनांच्या हाती घबाडच लागलं. म्हणून पटवर्धन म्हणतात, ‘‘अनुवादाची एक प्रक्रिया असते. मूळ इंग्रजी पुस्तक आपण वाचतो, ते आपल्याला आवडतं. मग आपण त्याचा अनुवाद करतो. ‘पाडस’च्या बाबतीत असं काहीही झालेलं नाही. तो एक अपघात आहे.’’
पटवर्धन यांनी कुठल्याही गोष्टीसाठी कधी धडपड केली नाही. सर्व गोष्टी त्यांना विनासायास मिळत गेल्या. पण त्याचा त्यांनी कधी अहंकार बाळगला नाही. ते याचं वर्णन ‘केवळ योगायोग’ अशाच शब्दात करतात. ‘‘मी ‘सत्यकथे’त गेलो ते योगायोगानंच! त्याआधी मी रुइया कॉलेजमध्ये शिकवत होतो. एके दिवशी श्री. पु. आले आणि म्हणाले,‘ग. रा. कामत फिल्मलाइनमध्ये चालले होते. मी तुमचे निबंध वाचलेले आहेत. मला असं वाटतं की, तुम्ही ‘सत्यकथे’चं काम चांगलं कराल. येता का मौजेत?’ आम्ही काय तयारच. मौजेसारख्या संस्थेत काम करायला मिळणं ही मोठी गोष्ट होती.’’
एकेकाळी महाराष्ट्राचं सांस्कृतिक वातावरण धगधगतं ठेवणारी ‘अभिरुची’, ‘हंस’, ‘सत्यकथा’ ही मासिकं काय किंवा लघुअनियतकालिकांची चळवळ काय, या शेवटी अल्पजीवीच ठरल्या. आधी ‘अभिरूची’ मग ‘हंस’ बंद झालं. आणि ऑगस्ट 1982 मध्ये ‘सत्यकथा’ही बंद झालं. त्यानंतर काही काळ लघुअनियतकालिके निघाली, पण त्यांचा वकुब खूपच मर्यादित राहिला. आणि त्यातल्या कुणालाच संपादक म्हणून श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांच्यासारखी मोहोर उठवता आली नाही. सगळ्याच चांगल्या गोष्टी शेवटी अल्पजीवीच ठरतात काय? पण पटवर्धनांना मात्र तसं वाटत नाही. ते म्हणतात,‘‘त्याला अल्प वगैरे आपण म्हणतो. त्यांचा जो जीव असतो, तेवढी ती टिकतात. आपले कम्युनिस्ट घ्या. पूर्वेला लालरंग वगैरे देण्याचे त्यांचे मनसुबे होते. चीनमध्ये झाली तशी क्रांती आपल्याकडे व्हायला पाहिजे अशी ते स्वप्नं पाहायचे. क्रांतीची अशी कलमं लावता येतात काय? त्याचं एक गणित असतं त्यानुसार ते चाललेलं असतं. त्यात आपण बदल करायचा प्रयत्न करायचा म्हणजे फक्त शिव्याच द्यायच्या, कुणाला काही कदर नाही वगैरे. कशाला पाहिजे हे? जगामध्ये इतक्या गोष्टी आहेत, त्यांचा तुम्ही धांडोळा घेऊ शकता. ते सोडून आहे त्या गोष्टीला चिकटून बसणं हे चूक आहे. सध्या आपल्या आजूबाजूला जे काय चाललं आहे, त्याला सामावून घेणं मराठी साहित्यिकांच्या आणि मासिकांच्याही हातात नाही. सगळाच काळ आता बदलला आहे हे आपण लक्षात ठेवावं. आता कुठलीही सांस्कृतिक चळवळ निर्माण होणार नाही. तशा अपेक्षाही बाळगूही नयेत. आपण शांत बसावं. धडपड करू नये. यात साहित्याचं काही नुकसान वगैरे होत नाही. साहित्य नावाच्या गोष्टीला पूर्वी जे महत्त्व होतं ते आता उरलं नाही. वेगवेगळ्या गोष्टी पुढे आल्या. मला वाटतं, हे उत्तम आहे. सगळं स्वीकारावं लागतं! अट्टाहास कशाला करायचा? हे बदल सगळ्याच जगात होत आहेत. तिथे कुठल्याच एकटय़ादुकटय़ा माणसाचा पाड लागणार नाही.’’
राम पटवर्धन असं बोलू शकतात यावर विश्वास बसणं जरा कठीण जातं. पण त्यामागचा त्यांचा विचार समजून घेतला की, त्यांच्या काळाच्या बरोबर राहण्याचं आणि भूतकाळाच्या समंधाला मानगुटीवर बसू न देण्याचं कौतुकही वाटतं. सध्या वयोमानानं पटवर्धनांना वाचन करणं शक्य होत नाही. तरीही पुस्तकांबद्दलची उत्सूकता त्यांना शांत बसू देत नाही. वाचता येत नसलं तरी ते पुस्तकांबद्दल जाणून घेतात. वर्तमानपत्रं वाचतात. त्यामुळे नेमाडय़ांची ‘हिंदू’ एवढे दोन शब्द उच्चारताच ते म्हणाले, ‘‘आता ‘हिंदू’ची बरीच चर्चा चालली आहे. मी त्याकडे वेगळ्या त-हेने बघतो. आपली संस्कृती केवढय़ा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. त्याला नाव देण्यासाठी ‘हिंदू ’हा शब्द कशाला वापरायचा? ते ‘प्राचीन भारतीय संस्कृती’ असं म्हणू शकले असते. मुळात भारतीय संस्कृती हे अजब मिश्रण आहे. नेमाडय़ांनाही शेवटी म्हणावं लागलं, ‘ही अडगळ आहे पण ती समृद्ध आहे. आणि समृद्ध असली तरी ती अडगळच आहे.’ मला हा खुळेपणा वाटतो. नेमाडय़ांनी ही मांडणी त्यांच्यापुरतीच ठेवावी.’’
भविष्यात साहित्याला काही स्थान असेल का? की नसेलच? असे प्रश्न हल्ली निर्माण होत असतात. त्याचं कुठल्याच प्रकारे चित्रं रंगवता येत नसल्याने काळजीत आणखीनच भर पडते. असेच प्रश्न पटवर्धनांना पडतात का, म्हणून विचारल्यावर त्यांनी दिलेलं उत्तर मोठं मजेशीर होतं. ते म्हणाले,‘‘या प्रश्नांची उत्तरं शोधायची गरज काय? साहित्याला माणसाच्या आयुष्यात स्थान असलं पाहिजे आणि नसलंही पाहिजे. साहित्याबद्दल कसलाही विचार न करता अतिशय समृद्ध जीवन जगलेली पुष्कळ मंडळी आहेत. त्यामुळे साहित्यवादी मंडळींनी यांच्याकडे तुच्छतेने बघू नये आणि यांनीही त्यांच्याकडे तुच्छेतेने बघू नये. या जगामध्ये सगळ्यांना जागा आहे आणि सगळ्यांनी राहावं.’’ ही एवढी स्वागतशील वृत्ती पटवर्धनांमध्ये कुठून आली असावी? अगदी त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘माझा डावा डोळा सुरुवातीपासूनच दुबळा आहे. तो इतका की, मला कधी चष्माही लावता आला नाही. पण ते एका अर्थानं बरंच झालं. त्यामुळं जगाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन ओपन राहिला.’

1 comment:

  1. "मौजेमध्ये फक्त लेखकांचाच राबता असायचा असं नाही. तर चित्रकला, शास्त्रीय संगीत, नाटक, चित्रपट या क्षेत्रातले लोकही तिथं येत असत. " I have got something to add to this....चित्रकला also included cartooning!...This is based on my cartoonist brother Abhimanyu's experience of working with him...He often went and met him at his Girgaum office and was 'guided' by Mr. Patwardhan...For instance he told him to AVOID the subject of death in cartoons....I don't quite agree with that specific advice (in Marathi see for instance Shyam Joshi's wonderful, moving cartoon on funeral) but largely my brother benefited from those exchanges...He was frank, honest but above all warm

    ReplyDelete