Sunday, October 17, 2010

मध्यममार्गी 'आऊटलुक'



‘आऊटलुक’ या इंग्रजीतल्या आघाडीच्या न्यूज मॅगझिनला याच आठवड्यात पंधरा वर्षे पूर्ण होताहेत. ‘आऊटलुक’ मध्यममार्गी आहे. मधममार्गी भूमिकाच मोठ्या प्रमाणावर ग्राह्य मानल्या जातात आणि त्यांचाच प्रभाव जास्त असतो. त्या न्यायानं ‘आऊटलुक’चाही प्रभाव जास्त आहे. आणि तेच त्याच्या यशाचं रहस्यही.


..............................................................................................


अडचण अशी आहे की, ‘आऊटलुक’बद्दल लिहिण्याआधी विनोद मेहतांबद्दल सांगावं लागेल. इतकं हे समीकरण एकजीव झालेलं आहे. विनोद मेहतांचा आधीचा प्रवास पाहता ते गेली सलग पंधरा वर्षे एका जागी राहिले, हे मोठं आश्चर्यच म्हणावं लागेल.
विनोद मेहतांचा जन्म रावळपिंडीत झाला पण त्यांचं बालपण लखनऊत गेलं. विसाव्या वर्षी ते लंडनला गेले. तिथं आठ वर्षे त्यांनी ‘पेंग्विन’ या जगप्रसिद्ध प्रकाशन संस्थेत काम केलं. बी. ए. तिस-या वर्गात पास होऊन मेहता 1970 साली मुंबईत परतले. काही दिवसांनी त्यांनी ‘बॉम्बे : अ प्रायव्हेट व्ह्यू’ हे पुस्तक लिहिलं. नंतर 1972मध्ये मीनाकुमारीचं चरित्र लिहिलं. विनोद मेहता मीनाकुमारीला एकदाही भेटले नव्हते. पण तिचे काही चित्रपट मेहतांनी दूरदर्शनवर पाहिले होते. मग तिच्याबद्दल माहिती मिळवून आणि ‘फिल्मफेअर’, ‘फिल्म इंडिया’चे अंक वाचून चरित्र लिहिलं. त्याची त्या काळात बरीच चर्चाही झाली. नंतर मेहतांनी संजय गांधीचंही चरित्र लिहिलं. पण ती बरीच पुढची गोष्ट. विनोद मेहता 1974 साली India’s first real girlie magazine असणा-या ‘डेबोनिअर’ या मासिकाचे पहिले संपादक झाले. ‘डेबोनिअर’मध्ये अर्धनग्न-नग्न बायकांची चित्रं छापली जात आणि दर्जेदार मजकूरही, निदान मेहतांच्या काळात तरी. त्यात करंट अफेअरबद्दलही एक विभाग असायचा. सेक्स या विषयाची खुल्या मनानं आणि कलात्मक मांडणी करणारं मासिक म्हणून मेहतांनी त्याला लौकिक मिळवून दिला. मेहता जॉईन झाले तेव्हा ‘डेबोनिअर’ सुरू होऊन सात-आठ महिनेच झाले होते, पण त्याची अवस्था तितकीशी चांगली नसल्यानं ते बंद पडण्याच्या मार्गावर होतं. मेहता मालकाला म्हणाले, ‘मला थोडी संधी द्या. पुढच्या सहा महिन्यात त्याचा खप वाढवून दाखवतो.’ ते मेहतांनी करून दाखवलं. सलग सात वर्षे म्हणजे 1981 पर्यंत मेहता ‘डेबोनिअर’च्या संपादकपदी होते.
त्यानंतर ते ‘संडे आब्झर्वर’चे संस्थापक संपादक झाले. या वृत्तपत्राला मेहतांनी पुढच्या सहा वर्षाच्या काळात ‘आशियातील सर्वात जास्त खप असलेलं रविवार-वृत्तपत्र’ असा लौकिक मिळवून दिला. 1987मध्ये विनोद मेहता ‘दि इंडियन पोस्ट’चे संपादक झाले. पण थोड्याच दिवसात तिथंही राजीनामा दिला. मग अनुक्रमे ‘बॉम्बे’ आणि ‘इंडिपेडेंट’चे संपादक झाले. तीही वृत्तपत्रं गाजली. त्यानंतर मेहतांनी मुंबईलाच रामराम ठोकला आणि थेट दिल्ली गाठली. तिथं ते ‘पायोनिअर’चे संस्थापक संपादक झाले. पण तेही 1994 साली सोडलं. मग त्यांनी ‘आऊटलुक’ या न्यूज मॅगझिनची घोषणा केली. तेव्हा सा-यांनी गृहीतच धरलं होतं की, विनोद आहे तोवर ते चालेल आणि तो सोडून गेला की, त्याचेही बारा वाजणार. कारण मेहता होते तोपर्यंत आधीची सारी वृत्तपत्रं गाजली होती आणि ते सोडून गेल्यावर ती वाजलीही होती. पण विनोद मेहतांनी आपल्या आधीच्या प्रतिमेला छेद दिला. अन् तोही एक नव्हे, दोन नव्हे तब्बल पंधरा वर्षे. 18 ऑक्टोबर 1995 रोजी ‘आऊटलुक’चा पहिला अंक प्रकाशित झाला. ‘आऊटलूक’च्या पहिल्याच अंकातली कव्हर स्टोरी काश्मीरातल्या ओपिनियन पोलबाबत होती, “77 per cent say no solution within Indian Constitution”. या अंकाची शिवसेनेनं देशभर होळी केली आणि ‘आऊटलुक’ रातोरात प्रसिद्धीला आलं. भारतातल्या सर्व वृत्तपत्रांच्या हेडलाईनचा विषय झालं.
‘इंडिया टुडे’ हे तेव्हा पाक्षिक होतं. त्यामुळे आपण साप्ताहिक न्यूज मॅगझिन सुरू करायचं असं मेहतांनी ठरवलं. त्याच्या पहिल्या अंकाची तयारी तब्बल सहा महिने चालली होती. आणि त्या अंकाचं स्वागत हे असं झालं! त्याविषयी मेहता म्हणतात, opinion poll in the Kashmir valley. (Organising the poll was a nightmare; insurgency was at its height. Most Kashmiri Muslims took the surveyors for IB men!) The headline on the cover was authentic and revealing: 77 per cent say no solution within Indian Constitution.
Open, Debate-provoking and Liberal journal अशी ‘आऊटलुक’ची सुरुवातीपासून ओळख आहे. याशिवाय विविधता, लेखांचा आवाका, मजकुराची अचूकता, बोलकी छायाचित्रं-ग्राफिक्स, सुबक व उत्तम मांडणी, चांगलं मुद्रण आणि विनोद मेहतांचा अंकावरील खास ठसा ही वैशिष्टयंही. एखाद दुसरा चांगला अंक काढणं ही सोपी गोष्ट असते, पण सातत्यानं चांगले अंक काढणं, आपल्या वाचकांच्या विश्वासाला तडा न जाऊ देणं हे शिवधनुष्य पेलणं सोपं नसतं. ‘आऊटलुक’ त्याबाबतीत द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण होतो. ‘आऊटलुक’ची भाषा अतिशय सुबोध असते. ललित-वैचारिक असं त्यातल्या लेखांचं स्वरूप असतं. ब-याचदा लोकांच्या मनातल्या विषयांवर लेख असतात. एकच विषय घेऊन त्याच्या वेगवेगळ्या बाजू समोर आणण्याचं कामही ‘आऊटलुक’ करतं आणि एकाच विषयाचा ब-यापैकी पाठपुरावाही. ‘डेबोनिअर’पासून विनोद मेहता शेवटच्या पानावर डायरी लिहितात. तो क्रम ‘आऊटलुक’मध्येही चालू आहे. ही डायरी खुशखुशीत आणि वाचनीय असते. खळबळजनक बातम्या, इंग्रजीत ज्याला ‘स्कूप्स’ म्हणतात, ‘आऊटलुक’ तेही ‘इंडिया टुडे’च्या चालीवर करतंच.
‘आऊटलुक’मध्ये 800-1000 शब्दांपेक्षा मोठा नसतो, ‘इंडिया टुडे’मध्ये कोणताही लेख साधारणपणे 1000-1200 शब्दांपेक्षा मोठा नसतो आणि ‘फ्रण्टलाईन’मध्ये तो 1500 पेक्षा मोठा नसतो. हे या तिन्ही नियतकालिकांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे, तो त्यांच्या धोरणाचा एक भाग आहे, हे लक्षात घ्यायला हवं.
17 ऑक्टोबर 2005 साली ‘आऊटलुक’ला दहा वर्षे झाली. तेव्हा त्यांनी A Decade like no other या नावाने विशेषांक काढला. त्याचं उपशीर्षक होतं, Looking Back, Looking Ahead, Looking in. अकराव्या वर्धापनदिन विशेषांकात सोनिया गांधी, अमिताभ बच्चन, बुद्धदेव भट्टाचार्य, कॅप्टन गोपीनाथ, अरुणा रॉय, सुनील मित्तल, अमिताव घोष, अशा अकरा व्यक्ती आणि अणू बॉम्ब, न्यूज चॅनेल्स, इंटरनेट, फास्ट फूड, पेज थ्री, मॉल्स, एक्सप्रेस वे, कॉल सेंटर्स, सेलफोन्स, स्टिंग पत्रकारिता यांचा 1995 ते 2006 काळातला आढावा घेतला होता. ‘आऊटलुक’च्या विशेषांकांत ‘सेक्स’पासून ‘बी स्कूल’पर्यंत सर्व विषय असतात. पण एकाचाच उल्लेख करायचा तर तो 23 ऑगस्ट 2004चा ‘व्हाट इफ’चा करता येईल. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं लोकांच्या मनातल्या अनेक प्रश्नांचा धांडोळा या अंकात घेतला आहे. भारताची फाळणी झाली नसती तर, नेताजी परत आले तर, सरदार पटेल पहिले पंतप्रधान झाले असते तर, म. गांधी जिवंत असते तर, भारतानं 1962चं युद्ध जिंकलं असतं तर, इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या नसत्या तर, त्यांनी आणीबाणी घोषित केली नसती तर, अशा जवळपास चौतीस मिथ घेऊन त्यावर नामवंताकडून लेख लिहून घेतले. ‘जर-तर’ला इतिहासात स्थान नसतं, तो केवळ स्मरणरंजनाचा भाग असतो आणि त्याचा वर्तमानात काहीच उपयोग नसतो हे या अंकातून कुठलाही स्टँड न घेता ‘आऊटलुक’नं दाखवून दिलं.
आजघडीला इंग्रजीत ‘इंडिया टुडे’, ‘आऊटलुक’ आणि ‘फ्रण्टलाईन’ ही तीन आघाडीची नियतकालिकं आहेत. ‘इंडिया टुडे’ हे इंग्रजी नवसाक्षर लोकांचं, ‘फ्रण्टलाईन’ इंटेलेक्च्युअल लोकांचं तर ‘आऊटलुक’ या दोन्हींच्या मधल्या लोकांचं नियतकालिक आहे. जसा कथा-कादंब-या-कविता वाचणारा पहिला वर्ग असतो, चरित्र-आत्मचरित्रं वाचणारा दुसरा वर्ग असतो आणि वैचारिक लेखन वाचणारा तिसरा वर्ग असतो. तसंच हे आहे. आणखी नेमकेपणानं सांगायचं तर ‘इंडिया टुडे’ हे जास्त लोकानुनय करणारं आहे, ‘फ्रण्टलाईन’ आयडियॉलॉजिस्ट आहे तर ‘आऊटलुक’मध्ये दोन्हीचं मिश्रण पाहायला मिळतं.
एकंदर ‘आऊटलुक’ मध्यममार्गी आहे. जगात कुठेही मध्यममार्गीच सरकारच सत्तेवर येऊ शकतं. मध्यममार्गी भूमिकाच मोठ्या प्रमाणावर ग्राह्य मानल्या जातात आणि त्यांचाच प्रभाव जास्त असतो. त्या अर्थानं आणि न्यायानंही ‘आऊटलुक’चाही प्रभाव जास्त आहे. आणि हेच त्यांच्या यशाचं रहस्य आहे.
अलीकडच्या काळात मात्र ‘आऊटलुक’नं काही न पटणा-या भूमिका घेतल्या आहेत. त्या विनोद मेहतांच्या लिबरल आणि समन्वयवादी भूमिकेला छेद देणा-या आहेत. काश्मीर प्रश्नाबाबतची टोकदार भूमिका आणि अरुंधती रॉयला अवास्तव महत्त्व देऊन तिचं प्रस्थ वाढवणं ही त्याची दोन महत्त्वाची उदाहरणं. अरुंधतीचे मोठमोठे आणि प्रचंड एकांगी लेख ‘आऊटलुक’ सातत्यानं छापत असतं. (आणि दुस-या बाजूला रामचंद्र गुहा यांचे विचारप्रवर्तक लेखही.) अरुंधतीची भूमिका ही विनोद मेहता यांची वा त्यांच्या ‘आऊटलुक’ची असेलच असं नाही. कदाचित त्यांनी मार्केटमध्ये चलती आहे म्हणून या प्रकारचं लेखन छापलं असेल. पण या संवेदनशील विषयांवर ओपिनिअन मेकरची भूमिका घेण्यात ‘आऊटलुक’ कमी पडलं असं खेदानं म्हणावं लागतं. अशा प्रश्नांना स्थान देणं हे जरा घातक आहे. ते निदान ‘आऊटलुक’कडून होऊ नये. ‘आऊटलुक’ यापुढेही मध्यममार्गी राहील अशी अपेक्षा काही वावगी नाही.

Sunday, October 3, 2010

उत्तम मध्यम

‘‘मानवी स्वातंत्र्याच्या तत्त्वाचा स्पष्ट जाणिवेनें निष्ठापूर्वक अंगीकार करणारीं माणसें सांस्कृतिक प्रयत्न जितके अधिक करीत जातील तितका तितका सांस्कृतिक संघर्ष लोपत जाईल व प्रादेशिक संस्कृति संवादी बनतील. संवादित्व जसें समानाकार घडवितें तसे वैशिष्टय़हि टिकवितें.’’ - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी  
(अध्यक्षीय भाषण, 1954, दिल्ली, अभामसासं)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कुठलीही गोष्ट ज्या हेतुपुरस्सरतेने सुरू केली जाते, ते हेतू सुरुवातीच्या काळात कसोशीने पाळलेही जातात. पण त्याला 25-50-100 अशी वर्षे उलटली की, त्याचा प्रवास काहीशा उलट्या दिशेने सुरू होतो. ‘अखिल भारतीय’ म्हणवल्या जाणा-या मराठी साहित्य संमेलनाबाबतीतही हे खरे ठरले आहे. ग्रंथकार संमेलन म्हणून सुरू झालेल्या या उत्सवाने आता स्वत:चा मोठा विस्तार करून घेतला आहे. त्याबद्दलचे आकर्षण जसे वाढते आहे, तशीच त्याबद्दलची आत्मीयताही दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे 83 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तुलनेने उत्तम कांबळे यांच्यासारख्या तरुण पत्रकार-संपादकाची निवड झाली, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
कुणाच्याही कारकीर्दीचा आढावा घ्यायचा असेल तर ती एका विशिष्ट टप्प्यावर असावी लागते किंवा पूर्ण व्हावी लागते. उत्तम कांबळे यांच्याबाबत आता ते शक्य आहे. कारण ते गेली तीसेक वर्षे पत्रकारितेत आहेत. आता एका माध्यम समूहाचे मुख्य संपादक आहेत. बालपण आणि तारुण्याचा काळ फार खडतर गेला की, माणूस कार्यकर्ता होता असे म्हटले जाते. कांबळे यांच्याबाबतही ते खरे आहे. आधी कार्यकर्ता, मग पत्रकार-लेखक आणि आता साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा त्यांचा आलेख चढता आहे. कविवर्य नारायण सुर्वे आणि कथाकार बाबुराव बागुल यांच्याशी त्यांची सगळ्याच अर्थाने नाळ जुळते. सुव्र्याचे तर ते मानसपुत्रच होते. ‘वाट तुडवताना’ आणि ‘आई समजून घेताना’ ही दोन कांबळे यांची महत्त्वाची पुस्तके. तसे त्यांनी कथा, कविता, कादंबरी आणि सामाजिक प्रश्नांवरही लेखन केले आहे, करत आहेत. पत्रकाराला सामाजिक प्रश्नांविषयी नेहमीच भूमिका घ्यावी लागते, ती कांबळेही घेत आले आहेत. त्यामुळेच ते ख-या अर्थाने कार्यकर्ता-पत्रकार आहेत.
कालपर्यंत आपल्या लेखनातून कांबळे ज्या समाजघटकांच्या बाजूने भूमिका घेत होते आणि यापुढेही घेतील, तो काही प्रस्थापित समाज नाही. तो सुव्र्याच्या आणि बागुलांच्या साहित्यातला समाज आहे. या समाजाची कड घेणा-यांना साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पुरेसे प्रतिनिधित्व दिले जात नाही, त्यांची दखल घेतली जात नाही अशी काही प्रमाणात रास्त असलेली तक्रार आहे. पण त्यातल्या ज्यांनी आपले श्रेष्ठत्व निर्विवाद सिद्ध केले त्यांना अध्यक्षपदाचा गौरव बहुमानाने दिला गेला हेही सत्य आहे.
याच समाजातून पुढे आलेले कांबळे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभे राहिले आणि 741 पैकी 411 इतक्या मतांनी निवडूनही आले. पण सुव्र्याच्या या मानसपुत्राने ही निवडणूक मतदारांच्या सदसद्विवेक बुद्धीवर विश्वास ठेवून जिंकली असा निर्वाळा त्यांना स्वत:लाही देता येणार नाही. या निवडणुकीसाठी आजवर जी जी राजकीय समीकरणे जुळवली जातात, तीच दुर्दैवाने कांबळे यांच्याबाबतही जुळवली गेली. म्हणजे कालपर्यंत ज्या गोष्टींविषयी कांबळेंना आक्षेप होता, त्याच गोष्टी त्यांनी स्वत: अध्यक्षपदाचा उमेदवार असताना केल्या किंवा त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या नावाखाली केल्या. तिथे कांबळे यांचा प्रामाणिक निस्पृहपणा, चारित्र्यसंपन्नता कामी आली नाही हेही विदारक सत्य आहे. कांबळे यांचा महाराष्ट्रभर मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे त्यांना समर्थन देणाऱ्यांनी त्यांच्यासाठी पूरक वातावरण तयार करण्यासाठी मोठी आघाडी उघडली होती.
पण कांबळेही मोहात पडले आणि गडबड झाली. आपली आजवरची पुस्तके कुठल्या प्रकाशकांनी छापली, अर्पणपत्रिका कुणाच्या नावे लिहिल्या आहेत, त्यांच्या किती आवृत्त्या आल्या, त्यांचा आशय काय आहे, मृखपृष्ठे व रेखाटने कोणी केली आहेत आणि त्यावर कुठे कुठे किती परीक्षणे छापून आली, दिवाळी अंकांचे संपादन, पुस्तकांचे संपादन, भाषणांच्या पुस्तिका, अन्य ठिकाणी आलेले लेख, रेडिओवरील कार्यक्रम, शालेय पाठय़पुस्तकात समाविष्ट झालेले साहित्य, इतरांच्या पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावना, एम. फिल, पीएच. डी किती जणांनी केल्या, पुस्तकांना मिळालेल्या पुरस्कारांच्या याद्या, कार्यक्रमातले सहभाग, आजवर केलेला प्रवास, कुठल्या कुठल्या कार्यक्रमांना हजेरी लावली याची डेमी आकारातील तब्बल 48 पानी पुस्तिका कांबळेंनी छापवून घेतली. ती सर्व मतदारांना पाठवली. या त्यांच्या ‘कारकीर्दी’चा अन्वयार्थ कसा लावायचा?
सांगलीला झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष उत्तम कांबळे होते. तेव्हा त्यांनी आर. आर. पाटील यांची एका धर्मसंकटातून सुटका केली होती, तेव्हा कांबळे यांचा मध्यममार्गीपणा दिसला होता. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला प्रत्यक्षात कुठलेच अधिकार नसतात. पण तो त्या वर्षाचा महाराष्ट्राचा सांस्कृतिक प्रवक्ता असतो. मात्र अलीकडच्या काळात सरकार/प्रशासनावर नैतिक दबाव येईल असे प्रतिभावान महाराष्ट्रात उरले नाहीत आणि जे उरले आहेत त्यांच्याकडे तसा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे हे सांस्कृतिक प्रवक्तेपण कुणीच नीट निभावत नाही. सगळीकडे शाली आणि श्रीफळे स्वीकारत मानसन्मान करून घ्यायचा आणि कृतकृत्य व्हायचे असा एकंदर अध्यक्षाचा खाक्या असतो. अर्थात अलीकडचे अध्यक्षही ‘नयन लागले पैलतिरी’ याच पंथातले असल्याने त्यांच्याकडून कुठल्या अपेक्षा करताही करता येत नव्हत्या.
ते दुष्टचक्र पहिल्यांदा भेदायची संधी आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रवक्तेपण निभावायचे मोठे आव्हान उत्तम कांबळे यांच्यापुढे आहे. कार्यकर्ता असणारा माणूस लेखक झाला की, जे तोटे होतात, तेच तो लेखकाचा सांस्कृतिक प्रवक्ता झाल्यावरही होतात. ते टाळण्याचा प्रयत्न कांबळे करतीलच, अशी सदिच्छापूर्वक अपेक्षा आहे!