Saturday, January 15, 2011

...हे तर श्रीपुंचे अवमूल्यनच!


‘‘ग्रंथप्रकाशक आणि ग्रंथविक्रेते यांच्याकडे आपल्या सांस्कृतिक आणि ज्ञानात्मक गरजा भागवणा-या संस्था म्हणून समाज बघतो. मराठी प्रकाशन संस्थांचा इतिहास पाहिला, तर त्यांतील कित्येक संस्था आपापल्या क्षेत्रात आणि काळात वाङ्मयीन आणि सांस्कृतिक जीवनाची केंद्रे बनल्या होत्या असे आढळेल.’’
-श्री. पु. भागवत (साहित्याची भूमी, पृष्ठ २१६)





अलीकडच्या दोनेक आठवडय़ात महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक खात्यानं तीन महत्त्वाचे पुरस्कार जाहीर केले आहेत. पहिला विंदा पुरस्कार विजया राजाध्यक्ष यांना, नाटय़क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कार मधुकर तोरडमल यांना आणि श्री. पु. भागवत पुरस्कार संजय भागवत यांना. यातल्या तिस-या पुरस्काराकडे मात्र प्रसारमाध्यमांचं नीट लक्ष गेलं नाही. त्याच्या बातम्याही व्यवस्थित आल्या नाहीत. त्याकडे जरा बारकाईने पाहिलं तर काय दिसतं? श्रीपुंचं २००७ साली निधन झालं, त्यानंतर सरकारने त्यांच्या स्मृत्यर्थ हा पुरस्कार सुरू केला. 2008 साली पहिल्या पुरस्कारासाठी पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ यांची न्यायोचित आणि योग्य निवड केली। पण त्यानंतरच्या दुस-या पुरस्कारासाठी औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाचे बाबा भांड आणि नुकत्याच जाहीर झालेल्या तिस-या पुरस्कारासाठी तर मौज प्रकाशन गृहाचेच प्रकाशक संजय भागवत यांची निवड जाहीर झाली आहे. प्रकाशन क्षेत्रातल्या ‘प्रदीर्घ आणि उत्तम कामगिरी’साठी हा पुरस्कार दिला जातो, असे पुरस्कार निवड समितीचे एक सदस्य मधू मंगेश कर्णिक यांनी सांगितले. असे असेल तर संजय भागवत यांची निवड या पुरस्कारासाठी करणे, हे सरकारच्या या निवड समितीचे खरोखरच धाडस म्हणायला हवे!




दुसरी गोष्ट, हा पुरस्कार व्यक्तीला आहे, संस्थेला नाही। पण प्रकाशन व्यवहारात व्यक्ती आणि त्याची संस्था वेगळी काढता येत नाही. ज्यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो, ते श्रीपु मौज प्रकाशन गृहाचे प्रदीर्घ काळ प्रकाशक-संपादक होते. पण आता मौजचे प्रकाशक संजय भागवत आहेत आणि श्रीपु भागवतांचे पुतणेही. म्हणजे एका अर्थाने हा पुरस्कार श्रीपुंनाच देण्यासारखे नाही का? (हे सुदैवच म्हणायला हवे की, सरकारने श्रीपुंच्या नावाचा हा पुरस्कार त्यांनाच मरणोत्तर जाहीर केला नाही.) त्यामुळे इथे प्रश्न निर्माण होतो तो औचित्याचा. संजय भागवतांची कारकीर्द खरोखरच ‘प्रदीर्घ’ आणि ‘उत्तम’ म्हणावी अशी आहे काय?




तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजय भागवतांच्या काळात प्रकाशित झालेली मौज प्रकाशन गृहाची पुस्तके या पुरस्कार निवड समितीने बहुधा पाहिली नसावीत। कारण ती पाहिल्यावर कुणाच्याही लक्षात येईल की, श्रीपुंनी प्रकाशन व्यवहारात संपादकीय दृष्टिकोन, प्रयोगशीलता, साहित्याविषयीची मर्मज्ञ दृष्टी आणि व्यावसायिक नीतिमत्ता हे मानदंड ‘मौज’च्या पुस्तकांतून उभे केले, त्याला तडे लावण्याचे काम संजय भागवतांच्या अल्प कारकीर्दीतच चालू झालेले आहे. नुकतेच संजय भागवतांनी निळू दामले यांचे ‘लवासा’ हे पुस्तक काढले. सध्या महाराष्ट्रात या प्रकल्पावर उलटसुलट चर्चा चालू आहे. त्यामुळे या विषयावर एवढय़ा तत्परतेने पुस्तक निघावे हे स्तुत्यच आहे. पण या प्रकल्पाच्या दोन्ही बाजू या पुस्तकात आल्या आहेत काय? हा प्रकल्प कसा उत्तम आणि चांगला आहे अशी एकच (आणि एकांगी) बाजू सांगणारं हे पुस्तक आहे. राज्य सरकारची बाजू ‘लवासा’ जमीन प्रकरणी योग्यच होती, असा सूर पुस्तकात आहे. या पुस्तकाच्या प्रकाशकांना सरकारच्या सांस्कृतिक खात्याचा पुरस्कार मिळतो, हा योगायोग मानायचा का?




याआधीही असे योगायोग घडले आहेतच। साकेत प्रकाशनाच्या बाबा भांड यांना हा पुरस्कार मिळाला होता. या भांड यांच्यावर राज्य सरकारच्याच ‘ऑपरेशन ब्लॅक बोर्ड’ या पुस्तक योजनेमध्ये गैर व्यवहार केल्याचा आरोप झाला होता. आणखीही काही गैर व्यवहाराचे आरोप त्यांच्यावर झालेले आहेत. अशा वादग्रस्त आणि संशयास्पद माणसांना श्रीपुंच्या नावाचा पुरस्कार दिला जात असेल तर मग या पुरस्काराची प्रतिष्ठा ती काय राहिली? हे तर राज्य सरकारने श्रीपुंचे चालवलेले अवमूल्यनच आहे.




सरकारच्या या पुरस्कार निवड समितीत कोण लोक आहेत? महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालकपद ही दोन्ही सध्या मधू मंगेश कर्णिक यांच्याकडेच आहेत। त्यामुळे या दोन्ही संस्थांचे प्रतिनिधी म्हणून कर्णिक, अ. भा. साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे, सांस्कृतिक मंत्री, सांस्कृतिक खात्याचे प्रधान सचिव आणि सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक. म्हणजे थेट सरकार आणि सरकारी संस्थांवर काम करणा-या लोकांचाच या समितीत भरणा आहे. उषा तांबे आणि उत्तम कांबळे ही तेवढी दोन नावे बाहेरची. त्यात कांबळे निवड समितीच्या कुठल्याच बैठकीला नव्हते. समितीतल्या या सदस्यांना मराठी प्रकाशन व्यवहाराची नीट माहिती आहे, असे कुणीही म्हणू शकणार नाही. या समितीत एकही ज्येष्ठ प्रकाशक वा प्रकाशक संघटनांचे प्रतिनिधी का नाहीत?




सध्या ज्योत्स्ना प्रकाशन, राजहंस प्रकाशन, कॉण्टिनेण्टल प्रकाशन, श्रीविद्या प्रकाशन, लोकवाङ्मय गृह, मॅजेस्टिक प्रकाशन, पद्मगंधा प्रकाशन, वरदा प्रकाशन, प्रास प्रकाशन, मेहता पब्लिशिंग हाऊस, रोहन प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्था चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत। यातल्या काही प्रकाशकांची तर दुसरी पिढी निष्ठेने हा व्यवसाय करत आहे. तेव्हा श्रीपुंच्या नावाचा पुरस्कार देताना त्यांनी मराठी प्रकाशन व्यवसायाला नेमके काय योगदान दिले याचा प्राधान्याने विचार नको का करायला? प्रकाशनांची संख्या, विषय वैविध्य, विक्री व्यवस्था आणि व्यावसायिक नीतिमत्ता हाही एक निकष असायला काय हरकत आहे? पण त्याची दखल घ्यायची नाही आणि ज्यांच्याकडे या सगळ्याच गोष्टींबाबत वानवा आहे, त्यांचा उदोउदो करायचा असा हा सारा उफराटा कारभार आहे.




सर्वात चिंताजनक आणि गंभीर मुद्दा असा की, या सर्व प्रकारात श्री.पु. भागवतांचे अवमूल्यन होत आहे. त्याचा मराठी प्रकाशन व्यवहारातल्या प्रत्येक घटकाने, व्यक्तीने आणि संस्थेनेही तीव्र शब्दांत निषेध करायला हवा. श्रीपुंनी म्हटल्याप्रमाणे ‘सांस्कृतिक जीवनाच्या केंद्रां’मधून समाजाचे सांस्कृतिक अभिसरण, भरणपोषण होत असते. ते काम आजवर अनेक मराठी प्रकाशन संस्थांनी केले आहे, काही आजही करत आहेत. तेव्हा या प्रकाशन संस्थांची आणि त्यांच्या प्रकाशकांची यथायोग्य दखल घेण्यातूनच श्रीपु भागवतांच्या नावाच्या या पुरस्काराची बूज राखली जाऊ शकते, राखायला हवी. तरच या पुरस्काराला काहीएक प्रतिष्ठा राहील. अन्यथा त्याची गतही सुमारांच्या सद्दीतच होईल.

No comments:

Post a Comment