Sunday, January 30, 2011

बंडभूषण


बंडखोरपणा आणि भांडखोरपणा करण्याचं वय तरुण असतं, असं म्हटलं जातं, गृहीत धरलं जातं आणि तसं सर्वत्र पाहायलाही मिळतं। पण पंडित सत्यदेव दुबे हा प्रायोगिक दिग्दर्शक या गोष्टीला सणसणीत अपवाद आहे. उलट एखादा तरुण करणार नाही इतकी बंडखोरी त्याच्यामध्ये या वयातही आहे. पण ‘हे सर्व कोठून येते?’ असा तेंडुलकरी प्रश्न दुबेंना विचारण्यात अर्थ नाही. कारण ते भडकून म्हणणार, ‘हा प्रश्न मूर्खासारखा आहे. मी जे काही करतो ते नाटकाच्या भल्यासाठी करतो॥’ नुकत्याच मिळालेल्या पद्मभूषणबद्दल दुबेंना ‘कैसा लगा’ छाप प्रतिक्रिया विचारण्याची मीडियाची टाप नाही, ती याचमुळे!
...तर नाटकाच्या भल्यासाठी आपल्या ‘दुबे स्टाइल’नं हा माणूस गेली 38 वर्षे इंग्रजी, हिंदी आणि मराठी रंगभूमीवर नाटकांशी खेळतो आहे. दुबेंची नाटकं प्रायोगिक म्हणून ओळखली जातात; पण मुळात दुबेच प्रायोगिक आहेत. व्यावसायिकता त्यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच नाही. स्थिर होण्याचं नाव सुरुवातीपासूनच नाही.




दुबेंचा जन्म मध्यप्रदेशातल्या विलासूपरचा। तिथल्या म्युनिसिपल शाळेत त्यांचं शिक्षण झालं. पण ते पाच वर्षाचे असतानाच त्यांची आई वारली. मग वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी नागपूरला पाठवलं. तिथं ते अँग्लो-इंडियन कुटुंबात राहिले. पण काही दिवसांनी परत विलासपूरला गेले. तिथे शाळेत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला. त्यांच्याशी ते जोडले गेले. इंटर झालं आणि दुबेंनी मुंबईला प्रस्थान ठेवलं. त्यांना क्रिकेटमध्ये करिअर करायचं होतं! झेविअर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजच्या क्रिकेट टीममध्ये त्यांची निवडही झाली. याच कॉलेजात दुबेंना देव आनंदचा भाऊ विजय आनंद भेटला आणि दुबे नावाच्या स्कूलची नाटकाच्या दिशेनं पावलं पडायला लागली. विजय आनंदनं त्यांना स्वत:बरोबर न्यायला सुरुवात केली. बदली नट म्हणून कामंही मिळू लागली.




त्यावेळी मुंबईत भांगवाडीमध्ये गुजराती नाटकांची मोठी चळवळ जोमात होती। तिथेही दुबे जायला लागले। तिथेच त्यांना पार्श्वनाथ आळतेकर भेटले. ते दुबेंचे नाटय़क्षेत्रातले पहिले गुरू. दुबेंचा तोतरेपणा आळतेकरांनी घालवला. विजय आनंदनं एक दिवस दुबेंना ‘थिएटर युनिट’मध्ये नेलं. तिथे तेव्हा इब्राहीम अल्काझी आणि पी. डी. शेणॉय हे दोन स्टॉलवर्ट होते. दुबेंनी अल्काझींकडून नाटकाच्या कोरिओग्राफीचे धडे गिरवले. नाटकाच्या अक्षांश-रेखांशामध्ये जे जे काही करता येणं शक्य आहे, आणि त्याच्या जेवढय़ा म्हणून शक्यता आहेत, त्या पणाला लावून पाहणारा दुबे हा दिग्दर्शक आहे. मग ते सात्र्चं ‘नो एक्झिट’ असेल, धर्मवीर भारतींचं ‘अंधायुग’ असेल, बादल सरकारांचं ‘वल्लभपूरची दंतकथा’, महेश एलकुंचवारांचं ‘गार्बो’, ज्याँ अनुईचं ‘अँटिगनी’, मोहन राकेश यांचं ‘आधे अधुरे’ असेल किंवा विजय तेंडुलकरांचं ‘खामोश! अदालत जारी है।' दुबेंनी केलेल्या प्रत्येक नाटकात हे दिसेल.




श्याम मनोहर हे मराठीतले कादंबरीचे अक्षांश-रेखांश पणाला लावू पाहणारे लेखक। पण त्यांची नाटककार अशी ओळख दुबेंमुळेच झाली. दुबे ‘साहित्य सहवास’मध्ये राहतात. एकदा त्यांची कवी दिलीप चित्रे यांच्याशी ओळख झाली. चित्रेंनी त्यांना मनोहरांचं नाटक सुचवलं. पण ते वाचल्यावर दुबे म्हणाले, ‘कशासाठी करायचं मी हे?’ चित्रेही तेवढेच खटनट. ते दुबेंना म्हणाले, ‘यू स्टार्ट फ्रॉम एंड.’ चित्र्यांच्या नावावर एवढा एकच विध्वंस जमा असला तरी दुबेंच्या नावे मात्र असे कैक विध्वंस जमा आहेत. नाटककाराच्या नाटकाची वासलात कशी लावायची हे दुबे पूरेपूर जाणून असतात, आणि आपल्या पद्धतीने ते त्याची ‘स्टार्ट फ्रॉम दि एंड’ किंवा ‘स्टार्ट फ्रॉम इन बिट्वीन’ अशी कशीही मांडणी करू शकतात, नव्हे करतात. त्यासाठी नाटककाराशी भांडतात. वर सांगतात, ‘नाटककाराचं नाटक त्याच्यापेक्षा मला जास्त समजतं.’ आणि दुबेंचं हे म्हणणं खरंच आहे. नाटकाचा प्रयोगाच्या दृष्टीने विचार दुबे ज्या शक्यतांनिशी करतात, तो तेच करू जाणो! याबाबतीत (तेंडुलकरांनंतर) त्यांचाच हातखंडा आहे.




पण दुबेंनी दिग्दर्शित केलेली नाटकं समजायला तशी कठीण। सर्वसामान्यांच्या तर ती डोक्यावरूनच जात असणार. दुबेंना सांगायचं असतं ते लखलखीत अणि सरळसोट असतं खरं पण ते त्यांच्या बाजूने. प्रेक्षकांच्या बाजूने तो समजून घेतानाच दमवणारा भाग असतो! पण आपला प्रेक्षक नाटक मध्येच सोडून पळून जाऊन नये याचीही दुबे काळजी घेतात. चारेक वर्षापूर्वी पुण्याच्या भरत नाटय़ मंदिरात त्यांच्या ‘आडम चौताल’चा प्रयोग होता. दुबेंनी आधी त्यांच्या आवडीच्या दोन हिंदी कविता ऐकवल्या आणि सांगितलं की, ‘या नाटकाला मध्यंतर नाही, कारण मध्यंतरात लोक निघून जातात. तसं होऊ नये म्हणून ही सोय केली आहे.’




काही वर्षापूर्वी दुबेंनी पुण्यातच कुसुमाग्रजांच्या कवितांवर ‘आयुष्यात पहिल्यांदाच’ हा कार्यक्रम केला होता आणि जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या एका प्रस्तावनेचं सादरीकरणही केलं होतं। कधी तरी प्लेटोच्या डायलॉग्जचंही सादरीकरण करण्याचं दुबेंच्या मनात आहे. मनात आहे ते सादर करायचं हा तर दुबेंचा खाक्याच आहे. म्हणजे ‘वद जाऊ कुणाला शरण॥’ हे नाटय़पद त्यांना आवडलं, ते त्यांनी गो. पु. देशपांडे यांच्या ‘अंधारयात्रा’ या नाटकात वापरून टाकलं. ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’ हे दुबेंचं नाव मराठी असलेलं नाटक हिंदी आहे! चित्रपटातली गाणी, ‘ये मकरंद देशपांडे जैसा नाटक नहीं है’ अशा कमेंट्स ..अशा अनेक गोष्टी दुबेंच्या नाटकात असतात. काहींना तो दुबेंचा चक्रमपणा वाटतो. दुबेंना मात्र अवतीभवतीच्या जित्याजागत्या गोष्टींचा तो योग्य आणि समर्पक वापर वाटतो. तो त्यांच्या प्रेक्षकांना आवडतोही.




दुबे हा माणूस स्टॉलवर्ट आहे। त्यामुळे ते नाटकंही स्टॉलवर्ड लोकांचीच करतात. धर्मवीर भारती, विजय तेंडुलकर, गो. पु. देशपांडे, बादल सरकार, मोहन राकेश, गिरीश कार्नाड, महेश एलकुंचवार हे त्यांचे नाटककार. तर डॉ. श्रीराम लागू, अमरिश पुरी, नसिरुद्दीन शाह, रत्ना पाठक, भक्ती बर्वे, सुलभा देशपांडे, विहंग नायक, किशोर कदम हे त्यांचे नट. पण दुबे विशी-पंचविशीतल्या मुला-मुलींबरोबरही तेवढय़ाच तन्मयेतनं नाटक करतात. तरुणांचा त्यांच्या भोवती कायम गराडा असतो.




‘गिधाडे’ या विजय तेंडुलकरांच्या नाटकानं एकेकाळी महाराष्ट्रात मोठी खळबळ माजवली होती। सेन्सॉर बोर्डाने या नाटकातल्या गर्भपाताच्या लाल डागावर आणि अन्यकाही गोष्टींवर आक्षेप घेतल्यावर डॉ. लागूंपासून नाटय़क्षेत्रातल्या संबंधितांनी सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात आघाडी उघडली होती. तेव्हा दुबेंनी डॉ. लागूंना सुचवले की, नाटकाच्या सुरुवातीला प्रेक्षकांना सूचना करायची - ‘आम्ही निळा डाग दाखवतो आहोत. तो लाल आहे असं प्रेक्षकांनी समजावं.’ त्यानुसार डॉ. लागूंनी ती सूचना देऊन नाटकाचे प्रयोग केले. कायद्याची लढाई कायद्यानेच लढली पाहिजे, पण ती लढतानाही आपल्या विरोधकांना सभ्यपणानं कसं हास्यास्पद ठरवता येतं, याचं इतकं उत्तम उदाहरण दुसरं कुठलं असणार!




दुबे क्रिकेटमध्येच रमले असते तर क्रिकेटचा काय फायदा झाला असता माहीत नाही; पण भारतीय प्रायोगिक नाटकांच्या चळवळीचं मात्र मोठं नुकसान झालं असतं. ते घडून आलं नाही हे बरंच झालं. बाकी ‘दुबे हे तीन अंकी गुरुकुल आहे’, ‘दुबे हा स्कूल ऑफ थॉट आहे’, ‘दुबे इज अ‍ॅन इन्स्टिटय़ूशन’ असं काहीही म्हणण्यात अर्थ नाही, दुबे मास्तर आपल्याला मूर्खात काढणार. कारण संस्था वा संस्थान म्हटलं की, फॅसिझमला सुरुवात होते असं त्यांचं म्हणणं आहे. दुबे आक्रमकपणे, चढेलपणे आणि कधी कधी विक्षिप्तपणे वागत असले तरी हा माणूस लोकशाहीवादी आहे, हे मात्र निर्विवाद सत्य आहे. आणि यावर त्यांच्या मित्रांचं, शिष्यांचं, समकालीनांचं .. शत्रूंचंही एकमत होईल.

1 comment: