Sunday, February 27, 2011

‘काय लाड करू तुझे?’


दिलीप भंडारे हा पुण्यातला भणंग पण प्रतिभावान चित्रकार. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, कवी दिलीप चित्रे, डॉ. कुमार सप्तर्षी अशा अनेक दिग्गजांशी त्यांची मैत्री होती, घरोब्याचे संबंध होते. भंडारे देवासला कुमार गंधर्वाकडे कित्येक दिवस राहायचे. ‘आनंदवना’तही जाऊन राहायचे. बाबांनी त्यांना ‘आनंदवना’तच कायम स्वरूपी राहायला सांगितलं होतं, पण ते राहिले नाहीत. खरं म्हणजे कुठेही स्थिर होणं, एका जागी फार दिवस राहणं हा त्यांचा स्वभाव नव्हता. त्याचा त्यांना भयंकर कंटाळा यायचा. त्यांनी लग्नही केलं नव्हतं. ते एकटेच सिंहगड रोडवरच्या साने गुरुजी शाळेत राहायचे. तिथल्या लोकांनी झोपण्यापुरती त्यांना परवानगी दिली होती।


इंदूरला चिंचाळकर गुरुजी म्हणून एक अवलिया चित्रकार होते. त्यांच्या निधनानंतर भंडारेंनी त्यांच्यावर ‘साप्ताहिक सकाळ’च्या दिवाळी अंकात खूप मोठा लेख लिहिला होता. अप्रतिम म्हणावं असं ते व्यक्तिचित्र होतं. भंडारेंशी पहिली ओळख झाली ती या लेखातून. पुढे त्यांच्याशी प्रत्यक्ष ओळख झाली. अगदी थोडा काळ एकत्र काम करण्याची संधीही मिळाली, पण तेवढय़ात त्यांच्याशी चांगली मैत्री झाली।


हळूहळू त्यांच्या भेटीतून त्यांच्याबद्दल माहिती होत गेली. ते 1980च्या दशकात महाराष्ट्रात गाजलेल्या ‘युक्रांद’ या चळवळीचे संस्थापक सदस्य होते. ‘युक्रांद’चं अतिशय समर्पक बोधचिन्हही त्यांनीच तयार केलं।


एका युक्रांदच्या अधिवेशनला मी गेलो होतो. तिथं भेटले. चारच्या सुमाराला म्हणाले, ‘चल, जाऊ या घरी. तू येणार असशील तर मी तुला दिलीप चित्र्यांची ओळख करून देतो.’ हे आमिष माझ्यासाठी पुरेसं होतं. मी त्यांच्याबरोबर निघालो. येरवडय़ाजवळ आल्यावर त्यांनी चित्र्यांना फोन करून आम्ही येत असल्याची त्यांना कल्पना दिली. चित्रे एरवडय़ाच्या हर्मिस हेरिटेजमध्ये राहत होते. आम्ही चित्र्यांच्या घरी पोचलो. विजू चित्रे यांनी दार उघडलं. पण भंडारेंना पाहताच त्या बाहेर आल्या आणि त्यांनी घाईगडबडीनं दार बंद केलं. आणि भंडारेंचे खिसे चाचपून पाहिले. मला कळेना. मग माझ्याकडे पाहत म्हणाल्या, ‘दिलीप, तू खरं सांग बाटली आणली नाहीस ना?’ भंडारे म्हणाले, ‘नाही.’ मग त्यांनी आम्हाला आत यायला सांगितलं. त्यानंतरचे दोन तास भंडारे आणि चित्रे बोलत होते आणि मी ऐकत होतो. मी पहिल्यांदाच चित्र्यांना पाहात, प्रत्यक्ष भेटत होतो. पं. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, सवाई गंधर्व महोत्सव, भाऊ पाध्ये, अरुण कोलटकर, चित्र्यांच्या कविता अशा कितीतरी विषयांमध्ये ते रंगून गेले होते. मी त्यांच्याबरोबर आहे, याचं त्यांना भानही नव्हतं. चित्रे मधेच विजूताईंना ‘एक सिगरेट दे गं’ असं सांगत आणि त्यांनी दिलेली सिगारेट सुलगावत गप्पा पुढे चालू राहत. त्या भेटीचा शेवट मला वाटतं, चित्र्यांनी ‘माझंही महाराष्ट्र गीत’ ही स्वत:ची कविता म्हणून केला. नंतर माझीही आस्थेनं चौकशी केली. त्यानंतरचा संबंध आठवडा माझ्या मनात भंडारे-चित्रे यांच्या गप्पा आणि त्यातले शब्द एवढंच तरळत होतं।


यानंतर तर मी भंडारेंच्या प्रेमातच पडलो. तोपर्यंत ते सांगत त्यावर माझा फारसा विश्वास बसत नसे. दरम्यान त्याच आठवडय़ात दै. लोकमतचे संपादक महावीर जोंधळे भेटले. त्यांनीही भंडारे सांगतात ते सर्व खरं आहे असं सांगितलं. म्हणाले, ‘दिलीपच्या अवतारावर जाऊ नकोस. तो शास्त्रीय संगीतातला दर्दी माणूस आहे. उत्तम चित्रकार आहे. पण मूडी आहे. म्हणून त्याचं नुकसान होतं.’ भंडारे मधेच अचानक गायब व्हायचे. दोन-दोन, तीन-तीन महिने कुणालाच भेटायचे नाहीत.. आणि अचानक एक दिवस अवचित उगवत. ती भेट नेहमीप्रमाणे रस्त्यातच कुठंतरी व्हायची. मग मला ‘काही नाही रे जरा बाहेरगावी गेलो होतो’ असं सांगून जवळच्या अमृततुल्यमध्ये घेऊन जायचे. म्हणायचे, ‘काय लाड करू तुझे?’ अमृततुल्यमध्ये काय लाड करून घेणार? त्यात भंडारेंकडून? अंगावर सदा मळलेले कपडे, दाढी-मिशा अस्ताव्यस्त वाढलेल्या. गेल्या कित्येक वर्षात त्यांच्यावरून तेलपाणी फिरलेलं नसेल अशी त्यांची दशा. जवळच्या बोचक्यात छोटी छोटी गाठोडी. आम्ही चहा घ्यायचो. लाड म्हणून ते मला क्रिमरोल घ्यायला लावायचे. आणि कितीही आग्रह केला तरी पैसे देऊ द्यायचे नाहीत. म्हणायचे, ‘मोठा कोण आहे? मी. मग पैसे मीच देणार. तू मोठा झालास की तू पैसे दे.’ दिलीप भंडारे तसे खूप मूडी होते. बोलता बोलता कधी कधी बिनसायचं त्यांचं. मग ते मला शिव्याशाप देत तरातरा निघून जायचे. पण राहतात कुठं, जेवतात कुठं काही माहीत नव्हतं. त्यांना फोन करायचा कुठे त्याचीही पंचाइतच होती. माझी ते चार-दोन दिवस मोठी घालमेल व्हायची. पण चार-आठ दिवसांनी पुन्हा भेटायला यायचे. पहिलं वाक्य असायचं, ‘चल, चहा घेऊ.’ चहावाल्याकडे पोचताच विचारायचे, ‘काय लाड करू तुझे?’ मग मी एक क्रिमरोल मागायचो।


भंडारेंना एका विषयात मात्र प्रमाण मानलं जायचं- त्यात सदा डुंबरे, महावीर जोंधळे, सुभाष नाईक असे पुण्यातले अनेक लोक होते- तो विषय होता शास्त्रीय संगीत. त्यांची साक्षात कुमार गंधर्व आणि पं. भीमसेन जोशी यांच्याशी मैत्री होती. त्यांच्याविषयीचे अनेक किस्से त्यांच्याकडे होते. त्याविषयी ते एक लेखही लिहिणार होते. एक-दोन भेटीत त्याचे खर्डे त्यांनी मला दाखवले होते. पण तो लेख काही त्यांच्याकडून लिहून झाला नाही. अनेक लोकांनी भंडारेंना फसवलं, कामापुरतं वापरून घेतलं असंही मला एक-दोघांकडून ऐकायला मिळालं. पण भंडारेंच्या बोलण्यात कधी कुणाबद्दल द्वेष तर सोडाच साधा नाराजीचा शब्दही ऐकायला मिळाला नाही. अप्पा बळवंत चौकात त्यांचं घरही होतं म्हणतात. पण भावाबरोबर पटत नसल्यामुळे ते कधी घरी जात नसत. कुणाकुणाकडे पैसे मागत, म्हणून काही लोक त्यांना टाळत असत. पण एवढय़ा दिवसांत त्यांनी कधी मला पैसे मागितले नाहीत. उलट माझे लाडच केले।


एके दिवशी दिलीप भंडारे अचानक गायब झाले. मी चार-आठ दिवस वाट पाहिली. तरीही भेटले नाहीत. मग विचार केला हे नेहमीप्रमाणे अज्ञातवासात गेलेले दिसतात, भेटतील महिना-दोन महिन्याने. पण तीन-चार महिने झाले तरी ते भेटले नाहीत. सहा महिने झाले, वर्ष झालं. आणि एके दिवशी समजलं की ते ससून रुग्णालयात अ‍ॅडमिट आहेत. त्यांना कुठला तरी दुर्धर आजार झालाय. पण मला कामाच्या गडबडीत त्यांना भेटायला जाता आलं नाही. सारखं आज जाऊ-उद्या जाऊ असं करत होतो. महिना- भरानं पुन्हा तेच ‘सत्याग्रही विचारधारा’च्या ऑफिसजवळ भेटले. मी काळजीनं विचारलं, ‘अहो, कशी आहे तब्येत? मला येता आलं नाही तुम्हाला भेटायला. माफ करा..’ म्हणाले, ‘असू दे रे. मी काही रागावलो नाही तुझ्यावर. मला रिजेक्शनची सवय आहे. मी आलोय ना आता तुला भेटायला. चल, तुझे लाड करतो.’ आम्ही चहा पीत गप्पा मारत होतो. त्यांचा चेहरा थोडा काळवंडला होता. शरीर आक्रसून गेल्यासारखं वाटत होतं. पण त्याबद्दल त्यांनी काहीही बोलायला नकार दिला. मी आलटूनपालटून विचारत राहिलो, तेव्हा म्हणाले, ‘आता एक्स-रे काढून आलोय. पुन्हा डॉक्टरकडे जायचंय. त्यासाठी सप्तर्षीकडे आलोय. बरा होऊन आलो की आपण मजा करू।’


त्यानंतर बरेच दिवस झाले तरी भेटले नाहीत. त्यांची तब्येत कशी आहे हे कळण्याचा एकमेव मार्ग, ससूनमध्ये जाऊन भेट घेणे हाच होता. पण पुन्हा माझ्याकडून पहिलीच चूक झाली. मला जाता आलंच नाही।


माझे लाड करणारा हा माणूस! इतक्या मायेनं क्रिमरोल खाऊ घालण्याचं काम माझ्या आई-वडिलांनीही कधी केल्याचं मला आठवत नाही. आता तर तेही माझ्याजवळ नव्हते. त्यामुळे वडिलकीच्या नात्यानं भंडारे माझे लाड करायचे. ते मला खूप सुखावून जायचं. पण मी ससूनमध्ये गेलो नाही तो नाहीच.


त्यानंतर महिनाभरानंच समजलं की, दिलीप भंडारे यांचं ससूनमध्ये निधन झालं. पंधरा दिवस त्यांचं प्रेत बेवारस म्हणून पडून होतं. रुग्णालयानं कुणी नातेवाईक येतील म्हणून ठेवलं होतं, पण शेवटपर्यंत कुणीच आलं नाही. म्हणून शेवटी त्याचं पोस्टमार्टेम करून ते विद्युतदाहिनीत पाठवून दिलं. हे समजल्यावर मला पहिल्यांदा काय आठवलं असेल तर त्यांचे शब्द, ‘काय लाड करू तुझे ?’ रडू आलं नाही, पण रात्रभर झोप आली नाही. आतून कुठेतरी, काहीतरी तुटल्यासारखं वाटत होतं. राहून राहून तेच चार शब्द आठवत होते, ‘काय लाड करू तुझे ?’
भंडारे जाऊन आता दोन-तीन वर्षे होत आली. एवढ्या दिवसांत ‘काय लाड करू तुझे?’ असं विचारणारं मला कुण्णीकुण्णी भेटलं नाही. अर्थात भंडारे भेटण्याआधीही कुणी नव्हतंच.