Wednesday, March 30, 2011

एका प्रतिभावंताचा भारत



विल ड्युरांट हे जगातील सर्वश्रेष्ठ इतिहासकार. त्यांचा ‘स्टोरी ऑफ सिव्हिलायजेशन’ अकरा खंडातल्या बहुमोल ग्रंथाने त्यांचे नाव जगाच्या इतिहासात अढळ झाले आहे. त्यांनी 1930 साली ‘द केस फॉर इंडिया’ हे छोटेसे पुस्तक लिहिले आहे. त्या काळात कॅथरीन मेयोचे ‘मदर इंडिया’ हे वादग्रस्त पुस्तक प्रकाशित झाले होते. त्याला उत्तर देणारे ‘सिस्टर इंडिया’ पुस्तक प्रकाशित झाले. 1928-29 मध्ये कॅथरीनच्या पुस्तकाला उत्तरे देणारी बरीच पुस्तके प्रकाशित झाली. त्यात अभारतीयांचाही समावेश होता. इंडिया इन बाँडेज, अन इंग्लिशमन डिफेंडस, लिव्हिंग इंडिया, अनहपी इंडिया ही त्यापैकी काही. सांगायचा मुद्दा असा की, भारताविषयी अल्पकाळाच्या वास्तव्यात गैरसमज करून घेऊन पुस्तके लिहिली जात होती, त्याच काळात विल ड्युरांट हे जागतिक कीर्तीचे विचारवंत भारतात आले. पण ते काही निव्वळ प्रवासाला वा भारत पहायला आले नव्हते. समाजाच्या सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास करताना त्यांना भारतात यावे लागले. त्यांच्या संवेदनशील मनाने ब्रिटिश अमलाखालील भारताची जी दशा पाहिली त्याने ते चक्रावून गेले. मग त्यांनी हातातली कामे बाजूला ठेवून ‘द केस फॉर इंडिया’ हे पुस्तक लिहिले. पुस्तक अतिशय छोटेसे असले तरी ते अतिशय अभ्यास करून लिहिले आहे, हे त्याच्या प्रस्तावनेवरून आणि शेवटच्या संदर्भसूचीवरून सहज लक्षात येते. पण हे पुस्तक प्रकाशित होताच त्यावर अमेरिकेमध्ये बंदी घालण्यात आली. पण भारतात या पुस्तकावर बंदी घालण्यात आल्याची माहिती मात्र मिळू शकली नाही. 11 फेब्रुवारी 1931 रोजी कविवर्य रवीन्द्रनाथ टागोर यांनी या पुस्तकावर लेख लिहिला आहे. त्यावरून असे समजायला हरकत नाही की, यावर निदान सुरुवातीच्या काळात तरी बंदी नव्हती. या लेखात टागोरांनी लिहिले आहे, Will Durant has treated us with the respect due to human beings, acknowledging our right to serious consideration. This has come to me as a surprise, for such courtesy is extremely rare to-day to those people who have not the power to make them selves obnoxious.


इंटरनेटवरही या पुस्तकाविषयी फारशी काही मिळत नाही. त्यामुळे त्याचा पूर्वइतिहास जाणून घ्यायला मर्यादा पडतात. पण तीन वर्षापूर्वी स्ट्रँड बुक स्टॉलने या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित केली आणि नुकताच मराठी अनुवादही प्रकाशित केला आहे. 80 वर्षापूर्वी एका प्रतिभावंताने पाहिलेला भारत या पुस्तकातून आपल्याला भेटतो. भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडलेल्या या इतिहासकाराचे हे पुस्तक प्रत्यक्ष वाचणे हा त्याला समजून घेण्यासाठीही उत्तम पर्याय आहे.

बाल, किशोर, युवक आणि ‘कलाभारती’


नुकतेच दिल्लीच्या ‘ललित कला अकादमी’ने 567 आणि 580 पानांचे दोन चित्रकलाविषयक लेखनाचे दोन खंड ‘कलाभारती’ या नावाने प्रकाशित केले आहेत. या दोन्ही खंडांमध्ये नवं लेखन फारसं नाही, तर इंग्रजी, हिंदी, मराठी या भाषांमधील पूर्वप्रकाशित लेखनाचाच समावेश आहे. या लेखनाचा आवाका तसा बराच मोठा आहे असं संपादक पीयूष दईया यांचं म्हणणं आहे.




अमूर्त चित्रकलेची भारतीय परंपरा, प्रवास, समज-गैरसमज यापासून भरताचा रससिद्धांत, गांधीजींची सौंदर्यदृष्टी, भारतीय कलेचा प्रवास, भारतीय चित्रकलेतील प्रवाह इथपर्यंत अनेकविध विषयांचा यात समावेश आहे. भारतातले आघाडीचे चित्रकार व्ही. एस. गायतोंडे, एम. एफ. हुसेन, एस. वासुदेव, अंबादास, जे. स्वामीनाथन, कृष्ण खन्ना, मनजीत बावा, गुलमा मोहम्मद शेख, गणेश हलोई, रविशंकर रावल, भूपेन खक्कर, ए. रामचंद्रन, तय्यब मेहता यांच्याविषयी लेख आहेत.


‘कलाभारती’च्या पहिल्या खंडात एकंदर 64 लेख आहेत. त्यातले सर्वात जास्त म्हणजे तब्बल बारा लेख व्ही. एस. गायतोंडे यांच्याबद्दल आहेत. त्यात गायतोंडे यांचा स्वत:चा एक लेख, त्यांच्या अव्यक्ता दास, ए. आय. क्लार्क व एस. व्ही. वासुदेव यांनी घेतलेल्या तीन मुलाखती आणि नितीन दादरावाला, ज्ञानेश्वर नाडकर्णी, सुधाकर यादव, नरेंद्र डेंगळे, किशोरी दास, विश्वास यंदे, मनोहर म्हात्रे, प्रफुल्ला डहाणुकर यांचे लेख अशी तब्बल 166 पाने गायतोंडे यांच्यावर खर्च केली आहेत. त्यानंतर तय्यब मेहता यांच्याविषयी पाच लेख, भास्कर कुलकर्णी यांच्याविषयी पाच लेख, गांधीजींच्या सौंदर्यदृष्टीविषयी पाच लेख, भूपेन खक्कर यांच्याविषयी चार लेख आणि गणेश हलोइ यांच्याबद्दल तीन लेख असा उतरता क्रम आहे. याशिवाय वसंत सरवटे, भगवान रामपुरे, विजय कुलकर्णी, एम. एफ. हुसेन, मोहन सामंत, नसरीन मोहमदी, मनजीत बावा, प्रभाकर कोलते यांच्याविषयी प्रत्येकी एका लेखाचा समावेश आहे. या खंडातली थोडी सखेद आश्चर्याची बाब म्हणजे चित्रकार अखिलेश यांच्याबद्दलही पाच लेख आहेत. आधीच्या नामवंतांच्या यादीत संपादक पीयूष दईया यांनी अखिलेश यांचाही समावेश केला आहे. तो तेही या प्रतिभावंतांच्याच मांदियाळीतले आहेत म्हणून की केवळ संपादकांचे मित्र आहेत म्हणून हे कळायला मार्ग नाही.


दुस-या खंडामध्ये सुधीर पटवर्धन यांच्याविषयी सात लेख आहेत. त्यातील पहिला लेख पटवर्धन यांनी स्वत: लिहिलेला आहे. निशिकांत ठकार यांनी पटवर्धनांची घेतलेली मुलाखत आहे तर पद्माकर कुलकर्णी, के. बिक्रमसिंह, वसंत आबाजी हडाके, जितिश कल्लाट आणि रणजित होस्काटे यांच्या लेखांचा समावेश आहे. 580 पानांच्या या खंडातील 82 पाने सुधीर पटवर्धन यांच्यासाठी दिलेली आहेत तर ‘इन्स्टॉलेशन’ या कलाप्रकारासाठी तब्बल 102 पाने दिली आहेत. त्यात एकंदर सत्तावीस लेखांचा समावेश आहे. दिलीप रानडे, विवान सुंदरम, अतुल भल्ला, शमशाद हुसेन, शिवजी पणिक्कर, आतिया अमजद, अनिरुद्ध चारी या मान्यवरांनी इन्स्टॉलेशनविषयी लिहिले आहे. याशिवाय या खंडात प्रभाकर बर्वे, माधव आचवल, द. ग. गोडसे, संभाजी कदम, बाबूराव सडवेलकर, सुहास बहुळकर, अमृता शेरगिल, व्यामेश शुक्ल, शमशेर बहादुर सिंह, जामिनी रॉय, जोगेन चौधरी, रवीन्द्रनाथ टागोर यांचेही कला-कलासमीक्षेविषयी लेख आहेत.


‘कलाभारती’चा दुसरा खंड इन्स्टॉलेशनविषयी असल्याने या पुढच्या काळात या कलेला महत्त्व येणार आहे वा ही कला महत्त्वाची ठरू शकते असे संपादकांना यातून सुचवायचे आहे का? पण मग अमूर्त चित्रकलेचे काय? तिचा प्रवास कसा होईल? एकंदर भारतीय चित्रकला सध्या ज्या टप्प्यावर आहे, तिचा या पुढचा प्रवास कसा राहील याविषयी या दोन्ही खंडांमध्ये लेखन नाही. काही महत्त्वाचे चित्रकार, त्यांचा चित्रकलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि कलासमीक्षकांच्या नजरेतून या चित्रकारांची चित्रे असे या दोन्ही खंडांचे स्थूलस्वरूप आहे.


‘ललित कला अकादमी’चा हा दोन खंडी दस्तावेज महत्त्वाची यासाठी आहे की, यामुळे इंग्रजी, हिंदी, मराठी अशा भाषेतील वेगवेगळी पुस्तकं, मोनोग्राफ, नियतकालिकं, कॅटलॉग यामध्ये विखुरलेले हे लेखन इथं एकत्रितपणे वाचायला मिळते. त्यामुळे भारतीय चित्रकलेचा इतिहास समजून घ्यायला मदत होऊ शकते. भारतीय चित्रकलेतील कळीच्या ते समकालीन चित्रकलेच्या निकडीच्या प्रश्नांपर्यंतची चर्चा या दोन खंडांमधून वाचायला मिळते. आणखी एक म्हणजे कलेविषयी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये कुठल्या प्रकारचे आणि काय प्रतीचे लेखन झाले आहे, होत आहे, हेही या खंडांमधून जाणून घ्यायला मदत होते.


मराठीमध्ये चित्रकला वा कलासमीक्षेविषयी गंभीरच काय पण प्राथमिक पातळीवरच्या पुस्तकांचीही वाणवा आहे. इंग्रजीमध्ये मात्र या दोन्हींवरच्या पुस्तकांची भरमार आहे, तर हिंदीमध्ये भाषिक उलटापलटीच्या कसरतीमध्ये केवळ गंभीरपणाचा देखावा करणारे लेखन जोरावर आहे. या दिखावेगिरीचा नमुना म्हणूनही ‘कलाभारती’च्या या दोन खंडांकडे पाहता येईल.


मराठीमध्ये शालेय अभ्यासक्रमात मराठीच्या पाठय़पुस्तकांची ‘बालभारती’, ‘किशोरभारती’ आणि ‘युवकभारती’ अशी चढती श्रेणी असते. कलाविषयक लेखनातला ‘ललित कला अकादमी’चा हा प्रयत्न या तिन्हींचा एकत्रित अवतार आहे. याचा अर्थ असा की, भारतीय चित्रकलेची आस्वादक समीक्षा आणि कलामीमांसा अजून पुरेशी प्रौढ व्हायला तयार नाही. पण कुठल्याही पुस्तकाचा हेतू इतका सामान्य कधीच नसतो. निदान नसावा. पुस्तक वाचताना लेखकाशी असलेले मतभेद शोधले पाहिजेत, असे एका पाश्चात्य लेखकाने म्हटले आहे. ‘कलाभारती’च्या दोन्ही खंडांतले लेखन त्या प्रतवारीचे नसल्याने तो प्रकार इथे संभवत नाही. यात कला म्हणजे काय, कलेकडे कसे पाहावे, कलाआस्वाद, आणि कलासमीक्षकांची मते यांचाच परिचय घडतो. त्यापलीकडे जाऊन गंभीरपणे कलेची चर्चा यात आढळत नाही. किंवा सामान्य वाचकांची अभिरूची समृद्ध होईल अशी मांडणीही फारशी नाही. पण तरीही ‘कलाभारती’मध्ये बाल, किशोर आणि युवक या तीन अवस्थांमधल्या भारतीय कलेची चर्चा आपापल्या मगदुरानुसार चित्रकार आणि कलासमीक्षकांनी केली आहे. ती निदान समजून घेणे महत्त्वाचे आहे. कलाभारती : खंड 1 व 2, संपादक : पीयूष दईया ललित कला अकादमी, दिल्ली किंमत : प्रत्येकी 750 रुपये , पाने : खंड पहिला 567, खंड दुसरा 580 (पुस्तके मिळण्याचे ठिकाण-पिपल्स बुक हाऊस, मुंबई. दूर. 022-22873768)

अपप्रवृत्तीः माध्यमातल्या आणि समाजातल्या


मराठी पत्रकारितेतल्या ज्या काही मोजक्या संपादकांकडे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उत्तमप्रकारे लेखन करण्याची हातोटी आहे, त्यात डॉ. अरुण टिकेकर आणि कुमार केतकर यांचा प्राधान्याने समावेश करावा लागेल. खरे तर या दोन संपादकांची मराठी वर्तमानपत्रातली कारकीर्द आणि त्यांची पत्रकारिता हा स्वतंत्र अभ्यासाचा आणि एका स्वतंत्र पुस्तकाचाही विषय आहे.


डॉ. अरुण टिकेकरांनी जवळपास दीड दशक मराठी वर्तमानपत्रांत संपादक म्हणून काम केले असले तरी त्यांचा मूळ पिंड हा अभ्यासक-संशोधकाचाच राहिला आहे. पत्रकारितेत येण्याआधी त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया, मुंबई’ आणि ‘अमेरिकन लायब्ररी ऑफ काँग्रेस, दिल्ली’ या दोन संस्थांमध्ये जवळजवळ दीड दशक काम केले होते. त्याही आधी त्यांनी इंग्रजी विषयाचे पाच वर्षे अध्यापनही केले. तर मागील पाच वर्षापासून टिकेकर ‘एशियाटिक लायब्ररी’ या तब्बल दोनशे वर्षाचा इतिहास असलेल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. टिकेकरांची आजवर मराठीमध्ये ‘जन-मन’, ‘स्थलकाल’, ‘कालमीमांसा’, ‘सारांश’, ‘अस्वस्थ महाराष्ट्र’, ‘ऐसा ज्ञानसागरू : बखर मुंबई विद्यापीठाची’ अशी बारा-तेरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत; तर इंग्रजीमध्ये ‘द किंकेड-टू जनरेशन्स ऑफ अ ब्रिटन फॅमिली इन द इंडियन सिव्हिल सव्‍‌र्हिस’, ‘द क्लोस्टर्स पेल-अ बायोग्रफी ऑफ द यूनिव्हर्सिटी ऑफ मुंबई’, ‘रानडे : द रेनेसांस मॅन’ आणि ‘मुंबई डी-इंटेलेक्च्युलाईज्ड : राइज अँड डीक्लाईन ऑफ अ कल्चर ऑफ थिंकिंग’ ही चार इंग्रजी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. नुकतेच त्यांचे पुण्याच्या रोहन प्रकाशनाने ‘पॉवर, पेन अँड पॅट्रोनेज : मीडिया, कल्चर अँड मराठी सोसायटी’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे.


गेल्या वीस वर्षात टिकेकरांनी केलेली भाषणे आणि इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये लिहिलेल्या लेखांचा या संग्रहात समावेश केला आहे. या पुस्तकाचे विषया- नुसार टिकेकरांनी चार विभाग केले आहेत. पहिल्या, ‘मीडिया’ या विभागात प्रसारमाध्यमांविषयीच्या दहा लेख-भाषणांचा समावेश आहे. आणि हा या पुस्तकातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे असेही म्हणायला हरकत नाही. अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमांविषयी बरीच उलटसुलट चर्चा होत आहे. वर्तमानपत्रांच्या विश्वासार्हतेला गालबोट लागावे, अशा घटना अलीकडच्या काळात वाढत चालल्या आहेत. पत्रकारितेची तत्त्वे आणि नीतिमूल्ये जपली जाणे लोकशाही असलेल्या देशात नितांत गरजेचे असते. कारण प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जातात. पण अलीकडच्या काळात वृत्तवाहिन्यांचा उच्छाद आणि काही पत्रकार-संपादकांची न्यायाधीश होण्याची महत्त्वाकांक्षा, पत्रकारितेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. या पार्श्वभूमीवर टिकेकरांनी आपल्या लेखनातून राज्यकर्ते, पत्रकार, पत्रकारिता, समाज-संस्कृती अणि नीतिमूल्ये यांविषयी उपस्थित केलेले प्रश्न मूलभूत आणि विचारणीय आहेत.


दुस-या ‘कल्चर’ या विभागात महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयीचे सोळा लेख आहेत. त्यातील शेवटचे सहा लेख मुंबई विद्यापीठ आणि त्याविषयीच्या वादांचा समाचार घेणारे आहेत. 1857 साली स्थापन झालेले, भारतातले दुसरे विद्यापीठ असा मान असणाऱ्या आणि न्या. तेलंग यांच्यापासून न्या. पी. बी. गजेंद्रगडकर अशी वैभवशाली परंपरा असलेल्या मुंबई विद्यापीठामधला राजकारण्यांचा वाढता हस्तक्षेप, कुलगुरू निवडीचा घोळ, रोहिंग्टन मेस्त्रीच्या पुस्तकावरून सेनेने केले आकांडतांडव या घटनांचा टिकेकरांनी संयत पण परखडपणे समाचार घेतला आहे. ‘द डेथ ऑफ मुंबई यूनिव्हर्सिटी’ हा लेख तर आवर्जून वाचावा असा आहे. मुंबई विद्यापीठाचा अलीकडच्या काळात चाललेला खेळखंडोबा टिकेकरांनी अतिशय नेमकेपणाने या लेखांमधून टिपला आहे.


तिस-या विभागाचे नाव आहे, ‘द मराठी सोसायटी’. यात एकंदर बारा लेख आहेत. त्यातून राज ठाकरे, मराठी अस्मितेचे राजकारण, मुंबईची मिलकडून मॉलकडे झालेली वाटचाल आणि मराठा आरक्षणाची मागणी व त्यावरून केले जाणारे राजकारण यांचा आढावा घेतला आहे.




चौथ्या ‘फादर फीगर्स’ या विभागात जमशेटजी जीजीभाय, श्री. पु. भागवत, य. दि. फडके, बाबा आमटे, ग. प्र. प्रधान, गंगाधर गाडगीळ, विंदा करंदीकर, विजय तेंडुलकर, सुधीर फडके आणि टी. एन. शानभाग यांना आदरांजली वाहणारे लेख आहेत. हे लेख बहुधा आयत्यावेळची गरज म्हणून लिहिलेले असल्याने ते तीन ते पाच पानांचेच आहेत. पण त्यातूनही टिकेकरांनी संबंधित व्यक्तीच्या योगदानाविषयी अतिशय नेमकेपणाने लिहिले आहे. 29 मे 2010 रोजी ग. प्र. प्रधान यांचे निधन झाले. त्यानंतर पाच जूनच्या साधना साप्ताहिकात टिकेकरांनी प्रधान मास्तरांविषयी ‘साधुमुखे समाधान’ हा छोटासा लेख लिहिला होता. पण नंतर त्यांना मीनू मसानी यांच्या ‘फ्रीडम फर्स्ट’ या मासिकाच्या जुलैच्या अंकात प्रधान मास्तरांविषयी ‘द डेमॉक्रॅटिक सोशॅलिस्ट’ हा लेख लिहिला. तोच इथे पुनर्मुद्रित केला आहे. या लेखात ते म्हणतात, He was every inch a professor and loved his vocation till the end. Whether in the profession of teaching or in politics or as a public speaker or a social critic, he loved to educate.श्री. पु. भागवत, य. दि. फडके, विंदा करंदीकर यांच्याबद्दलचे लेखही असेच उत्तम झाले आहेत. तेंडुलकरांकडे कुठलीही फिलॉसफी नसली तरी ते उदारमतवादी होते आणि वेगवेगळ्या वेळी त्यांनी वेगवेगळ्या वैचारिक भूमिका घेतल्या म्हणून ते विचारवंत होते, हे टिकेकरांनी त्यांच्यावरच्या लेखात मांडले आहे, पण त्याचा अधिक विस्तार करायला हवा होता. कारण टिकेकरांचा मुद्दा बरोबर असला तरी त्याचे स्पष्टीकरण त्यांच्या लेखात मिळत नाही. पण ते स्पष्टीकरण त्यांनी तेंडुलकरांवर ‘सकाळ’मध्ये लिहिलेल्या ‘विचार-कलहांचा अग्रनायक’ या लेखात मिळते. असा थोडाफार फरक या विभागातील लेखांत झाला आहे.


थोडक्यात या पुस्तकात टिकेकरांनी प्रसारमाध्यमे आणि मराठी समाजातल्या अपप्रवृतींवर बोट ठेवले आहे. काही राजकीय आणि सांस्कृतिक शक्तींनी मराठी समाजाला जो संकुचित आणि प्रतिगामी बनवण्याचा विडा उचलला आहे, त्यातले धोके टिकेकरांनी दाखवून दिले आहेत. त्याचबरोबर हा संग्रह आदर्श पत्रकारिता कशी करावी याचेही उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे हे पुस्तक तरुण पत्रकारांनी आणि इतरांनी आवर्जून वाचावे असे आहे. जाता जाता एक मुद्दा आवर्जून नोंदवायला हवा. तो म्हणजे टिकेकरांच्या पत्रकारितेचा गाभाच मुळी तारतम्यपूर्ण विचार कसा करावा आणि तो कसा मांडावा हा राहिला आहे. संयत भाषेतही आपले म्हणणे किती ठामपणे आणि बिनतोडपणे मांडता येते याचे अलीकडच्या काळातले उत्तम उदाहरण म्हणून टिकेकरांच्या लेखनाचा दाखला देता येईल. यादृष्टीने त्यांची ‘सारांश’, ‘तारतम्य-खंड 1 ते 5’ आणि ‘अस्वस्थ महाराष्ट्र-खंड 1 व 2’ ही पुस्तकेही अभ्यासण्यासारखी आहेत. विशेषत: समकालीन समाजाविषयीचे सात निबंध असलेले ‘सारांश’ आणि ‘अस्वस्थ महाराष्ट्र-खंड 1 व 2’ ही दोन पुस्तके बारकाईने समजून घेतल्याशिवाय टिकेकरांच्या विचारशैलीशी समरस होता येणार नाही.

Monday, March 7, 2011

नाटय़धर्मी परफॉर्मर




गंमत अशी असते की, बहुतांश गुणवान कलाकारांची जडणघडण प्रायोगिक रंगभूमीवर होते, पण नंतर ते पैसा आणि यशासाठी व्यावसायिकतेकडे वळतात। त्यामुळे प्रायोगिक रंगभूमीचं नुकसान होतं, पण ही प्रक्रिया आहे. त्याला इलाज नाही. मात्र सुलभाताईंविषयी असं म्हणता येत नाही. त्यांनी चित्रपट, मालिकांमध्येही कामं केली, तिथल्या भूमिकाही त्यांनी जीव तोडून, मेहनत घेऊन साकारल्या. पण तिथे त्या कधीच रमल्या नाहीत. हे त्यांनी केलं ते तडजोड म्हणून.
त्यांची प्रकृती जशी अभिनेत्रीची आहे, तशीच त्यांची वृत्ती रंगभूमीची आहे। त्या नाटय़धर्मी परफॉर्मर आहेत. प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार देताना निवड समितीनं त्यांच्या नाटय़क्षेत्रातल्या याच योगदानाचा प्राधान्यानं विचार केला असावा!
सुलभाताई मूळच्या कामेरकर। घरी आजोबांपासून नाटकांचा वारसा. ते नाटकात स्त्रीपार्ट करायचे. वडील एचएमव्हीमध्ये रेकॉर्डिस्ट होते. त्यामुळे घरी सतत कलावंतांचं, लेखकांचं येणं-जाणं असे. वडिलांना मुलांसाठी संस्कार केंद्र चालवायची खूप इच्छा होती. गदिमांनी त्याचं नाव सुचवलं होतं, ‘चंद्रशाला.’ पण ते त्यांना शक्य झालं नाही. सुलभाताईंनी वडिलांचं ते स्वप्न ‘आविष्कार’मध्ये पूर्ण केलं.
सुलभाताई वयाच्या पाचव्या वर्षापासूनच नाटकात काम करू लागल्या होत्या। त्यांच्या बहिणीही नाटकात काम करत. नाटकांमुळे अरविंद देशपांडे यांच्याशी त्यांची ओळख झाली. पुढे ते त्यांचे जीवनसाथी झाले. ही साथसोबत दोन कलावंतांची होती, आणि एका प्रगल्भ दांपत्याचीही. देशपांडे ‘रंगायन’मध्ये काम करायचे. त्यामुळे सुलभाताईंनीही ‘रंगायन’च्या नाटकांमध्ये, एकांकिकांमध्ये कामं केली.
‘अंधायुगमध्ये गांधारीची भूमिका सुलभा करेल का?’ असं सत्यदेव दुबेंनी अरविंद देशपांडेंना चार दिवसांवर कलकत्त्याचा महोत्सव असताना विचारलं होतं। तेव्हा सुलभाताईंचा निनाद तीन-चार वर्षाचा होता आणि त्याला गोवर झाला होता. पण तशाही अवस्थेत अरविंद देशपांडे, सासू-सासरे सुलभाताईंच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी गांधारी वठवली.
पुढे श्रेयवादाच्या मुद्दय़ावरून ‘रंगायन’ फुटली। ‘आविष्कार’ ही नवी संस्था अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, अरुण काकडे आणि त्यांच्या सहका-यांनी सुरू केली, चालवली, आणि वाढवलीसुद्धा!
‘आविष्कार’मार्फत छबिलदासला प्रायोगिक रंगभूमीचं महत्त्वाचं केंद्र, चळवळ म्हणण्याइतपत स्वरूप मिळवून देण्यात सुलभाताईंचा मोठा वाटा आहे। ‘छबिलदास स्कूल’ म्हणून पुढे ओळखल्या जाणा-या या इतिहासाच्या उभारणीत सुलभाताईंचाही मोठा वाटा होता. ‘आविष्कार’ हे नावही त्यांनीच सुचवलेलं आहे. त्या आधी छबिलदासमध्ये शिक्षिकेची नोकरी करायच्या. आणि याच छबिलदासमध्ये पुढे ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या ऐतिहासिक नाटकाच्या तालमी झाल्या. त्यातलं बेणारेबाईचं शेवटचं स्वगत इथल्याच एका खोलीत तेंडुलकरांना कोंडून लिहून घेण्यात आलं. हे नाटक लिहितानाही तेंडुलकरांसमोर बेणारेबाई म्हणून सुलभाताईच होत्या!
सुलभाताईंच्या अभिनय प्रवासातील ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ हा मैलाचा दगड आहे. या नाटकाचे त्यांनी 150 हून अधिक प्रयोग केले. नाटककार विजय तेंडुलकर, पती अरविंद देशपांडे आणि सुलभाताईंची बेणारेबाई ही अजोड त्रयी या नाटकानं भारतभर लोकप्रिय केली. पुढे ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ यावर पं. सत्यदेव दुबे यांनी त्याच नवाने चित्रपट केला. त्यातही बेणारेबाईची भूमिका त्यांनी सुलभाताईंनाच दिली. या नाटकाचे नंतरही वेगळ्या कलाकारांनी प्रयोग केले. त्याविषयी शंभु मित्रा हे थोर बंगाली नाटककार-दिग्दर्शक एकदा म्हणाले होते, ‘सुलभाताई बेणारेला जो न्याय देतात तो अजून इतर कुणी दिलेला नाही.’ सुलभाताई बेणारेबाईच्या भूमिकेशी पूर्णपणे एकरूप झाल्या होत्या!


‘आविष्कार’च्या मुलांसाठीच्या नाटकांचा ‘चंद्रशाला’ हा विभाग सुलभाताईंनी 1989 साली मोठय़ा आवडीनं चालवला। त्यात त्यांनी 21 बालनाटय़ आणि तीन कठपुतली नाटय़ केली. ‘दुर्गा झाली गौरी’ हे नाटक तर बालरंगभूमीवरचं लिजंड बनलं. ‘वृक्षवल्ली आम्हां॥’, ‘राजाराणीला घाम हवा’, ‘बाबा हरवले आहेत’, ‘पंडित पंडित तुझी अक्कल शेंडीत’, ‘आला अडाण्याचा गाडा’ अशी अनेक दर्जेदार बालनाटय़ं केली. ‘दुर्गा..’चे तर 300 हून अधिक प्रयोग झाले आहेत. नृत्य, कळसूत्री बाहुल्या, चित्रकथा, कीर्तन, सामुदायिक चित्रकला, नाटक असे अनेक उपक्रम राबवले. जपान, अमेरिका, युगोस्लाव्हिया, स्वीडन, नॉर्वे, मॉस्को अशा देशांना भेटी देऊन तिथली बालरंगभूमी त्यांनी मोठय़ा आस्थेवाइकपणे पाहिली. जपानमध्ये तर महिनाभर राहून तिथल्या बालरंगभूमीचा त्यांनी अभ्यास केला.


बालरंगभूमीविषयीची सुलभाताईंची समज वाखाणण्यासारखी आहे। मुलांच्या व्यक्तिमत्त्व-विकासाला पैलू पाडण्याचे शक्य तेवढे सर्व प्रयत्न त्यांनी ‘चंद्रशाला’च्या माध्यमातून केले हे कुणालाही नाकारता येणार नाही.


सुलभाताईंवर सुरुवातीला विजया मेहता यांच्यासारखं बोलतात, काम करतात अशी टीका झाली। तेव्हा सुलभाताईंनी त्यातून जाणीवपूर्वक बाहेर पडायचा प्रयत्न केला. स्वत:ची स्वतंत्र शैली निर्माण केली. सुलभा आपली भूमिका मनापासून करतात. ‘अभिनयाबाबत दत्ता भटांची ऊर्मी आणि डॉ. लागूंची मेथॅडिक या दोन्हींचा समन्वय घालण्याची गरज आहे’, असं एकदा त्या म्हणाल्या होत्या. पण खरी गोष्ट आहे की, या दोन्हींचा उत्तम समन्वय म्हणजे खुद्द सुलभाताईंचाच अभिनय आहे. तो त्या अगदी सहजरित्या करतात, कारण तीच त्यांची जीवननिष्ठेचा आहे!


म्हणूनच हिंदी ‘सखाराम बाइंडर’च्या वेळी पं। सत्यदेव दुबेंनी ‘चंपा तुझ्या प्रकृतीला मानवणार नाही’ असं म्हटलं तेव्हा सुलभाताईंनी त्यांना अतिशय सार्थ आत्मविश्वासानं उत्तर दिलं, ‘माझी प्रकृती अभिनेत्रीची आहे, सुलभा देशपांडेची नाही.’


खानोलकरांचं ‘प्रतिमा’ , देवाशिष मुजुमदारांचं ‘ताम्रपट’ आणि अशोक शहाणे अनुवादित रवींद्रनाथ टागोरांच ‘डाकघर’ अशी तीन नाटकं सुलभाताईंनी ‘आविष्कार’साठी दिग्दर्शित केली. पं. सत्यदेव दुबे, विजया मेहता आणि अरविंद देशपांडे अशा नाटकातल्या तीन महत्त्वाच्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं. सत्यदेव दुबेंबरोबर ‘अंधायुग’, ‘नो एक्झिट’, ‘एवम इंद्रजित’, ‘घोस्ट’ या नाटकांमध्ये काम केलं. ‘नटसम्राट’मध्ये कावेरी केली.


तीनेक वर्षापूर्वीची गोष्ट. त्या वर्षीच्या अरविंद देशपांडे महोत्सवाला विजया मेहता, महेश एलकुंचवार आणि नाना पाटेकर आले होते. सुलभाताई थोडय़ा उशिरा आल्या. त्यांना पाहताच विजयाबाई काही तरी म्हणाल्या. त्यावर सुलभाताई तत्परतेने म्हणाल्या, ‘हल्ली गुडघे थोडे दुखतात, पण कणा मात्र ताठ आहे माझा!’
‘रङ्गनायक’ या अरविंद देशपांडे स्मृतीग्रंथात सुलभाताईंनी आपल्या दिग्दर्शक पतीविषयी म्हटले आहे, ‘मी त्याची समीक्षक होते, पण तो माझा फॅन होता’. पण सुलभाताईंबद्दल असं म्हणावं लागेल की, त्या आधी स्वत:च्या समीक्षक आहेत आणि मग इतरांच्या. म्हणूनच कदाचित नाटय़-सिनेमा क्षेत्रातले अनेक लोक त्यांचे फॅन आहेत.