Saturday, April 2, 2011

तू माझी बायको हवी होतास, मर्दा!


गोष्ट पंधरा-वीस वर्षापूर्वीची आहे. मराठवाडय़ातल्या एका दुर्गम म्हणाव्या अशा खेडय़ातली. आमच्या घराशेजारी पारुबाई, त्यांचे पती धोंडिबा आणि त्यांची दोन गोजिरवाणी मुलं असं एक चौकोनी कुटुंब राहत होतं. त्यांची दहा-बारा एकर शेती होती. बागायती नव्हती, पण पैठणच्या डाव्या कालव्याचं पाणी होतं. त्यामुळे थोडीशी बागायत व्हायची, भाजीपाला व्हायचा. त्यात त्यांचं चालायचं. शिवाय दोन्ही मुलं, पांडू आणि पिंटू तसे लहान होते. चार आणि पाच वर्षाचे. पारुताई कष्टाळू होत्या. पाहावं तेव्हा त्या कामातच असायच्या. मग ते घरी असो नाही तर शेतात. आमचं आणि त्यांचं शेतही शेजारी शेजारी होतं. त्यामुळे पारुबाई काम करून थकत कशा नाहीत असा मला प्रश्न पडायचा. मी त्यांना कधी कधी विचारी, ‘पारुबाई, तुम्हाला कामाचा कंटाळा येत नाही का हो? बघावं तेव्हा तुम्ही आपलं कामात असता.’ त्यावर त्या म्हणत, ‘राजाभाऊ, आपण गरीब माणसं. काम केलं नाही तर खाणार काय? शेंदूर फासलेले देव तुमच्या पोटाला घालत नाहीत, ते आपलं आपल्यालाच बघावं लागतं.’




पारुबाई देवाबद्दल असं कडवट बोलत असल्या तरी त्या फार धार्मिक होत्या. पहाटे साडेचारला देवपूजा करूनच त्यांचा दिवस सुरू होई. शिवाय दिवसभर सतत तोंडात ‘बा पांडुरंगा, इठ्ठला’ असा जप चाललेला असे. याच्या उलट धोंडिबा. तो बघावं तेव्हा गावात कुठेतरी दारू पिऊन पडलेला असे किंवा दारूसाठी कुणाला तरी पैसे मागत असे. त्याची गयावया आणि पारुबाईचा कामाचा रामरगाडा पाहून लोक म्हणत, ‘हा गडय़ासारखा गडी पण दारू पिऊन गटारात लोळत पडतो आणि आमची पारुबाई घरी-शेतात राब राब राबते.’ सारं गाव धोंडिबाल्ली दोष देई, पण त्याला त्याचं काही वाटत नसे. शेजारीपाजारी, जुनेजाणते त्याला समजावण्याचा प्रयत्न करत. धोंडिबा तेवढय़ापुरतं ‘हो हो’ म्हणे. त्यांना आपल्या दोन्ही मुलांची शपथ घेऊन सांगे, पण ती संध्याकाळ संपली की, धोंडिबा सकाळीच भिल्लांच्या दारू- भट्टीची वाट उतरताना दिसे. पिऊन तर्र असे.


आमचे दादा धोंडिबाचे लहानपणापासूनचे मित्र. ते सांगत, ‘पूर्वी धोंडिबा असा नव्हता. कामाला वाघ होता. पण व्यसनापुढे माणसाचं काही चालत नाही. शेतीतल्या कामानं आंबून कधी तरी थोडीशी घेणारा धोडिंबा या थराला जाईल असं वाटलं नव्हतं..’ पण मी कधीच धोंडिबाला शेतात काम करताना पाहिलं नव्हतं. तो शेतात आला तरी दुपारचा, जेवायलाच. भाजी त्याच्या आवडीची नसली तर तिथंच पारुबाईला शिव्यांची लाखोली वाही. त्यांना धड जेवूही देत नसे. त्या तशाच रागारागात पंगतीतून उठत आणि डोळे पुसत कामाला लागत. मग रोजंदारीवर आलेल्या बायाबापडय़ा त्यांना काम करता करता चार घास खायला लावत. पण पारुबाई खमक्या होत्या. शेताली सगळी कामं त्या एकटय़ा करत. अगदी नांगरणी, कोळपणी, औत हाकणं, पेरणी. बैलगाडीत धान्याची पाच-पन्नास पोती गडय़ांच्या मदतीनं रचून त्या घरी आणत. शेतातली कष्टाची पुरुषांची सगळी कामं करत. त्यामुळे सगळ्या गावाला त्यांचं कौतुक होतं. खेडय़ातल्या बलुतेदारी आणि पुरुषप्रधान कृषीसंस्कृतीत पारुबाईंच्या धाडसाचं कौतुक जुन्याजाणत्यापासून तरुणांपर्यंत सर्वाना होतं. लोक म्हणत, ‘पारुबाईच्या हिमतीला मानलं पाहिजे राव. बाई चार पुरषांच्या तोंडात मारते गडय़ा!’


धोंडिबा गावातल्या सगळ्यांच्या निंदेचा, कुचेष्टेचा आणि हेटाळणीचा विषय झाला असला तरी पारुबाई मात्र त्याच्याबद्दल फारसं वाईट बोलत नसे. उलट त्याला कोणी शिव्याशाप दिलेले तिला चालत नसत. ती चूक कुणाची आहे हे ऐकून न घेता त्या माणसाचा उद्धार करत असे. त्याच्या नावानं बोटं मोडत, भयानक शिव्याशाप देई. पण धोिडबा रोज काहीतरी कुरापत करीच. मग लोक येऊन पारुबाईकडे गा-हाणं करत. पण संध्याकाळी शेतातून आल्या आल्या पारुबाईचा पहिला उद्योग असे, तो धोंडिबाला शोधून घरी आणण्याचा. अशा वेळी आई आम्हाला पारुबाईला मदत करण्यासाठी पिटाळत असे. मग आम्ही धोंिडबाला शोधून घरी आणत असू. पारुबाई त्याला विचारी, ‘सकाळपासून काही खाल्लं का नाही? का नुसती दारूच ढोसली? शिंक्यावर भाकरी-कोरडय़ास काय माझ्या सासऱ्यासाठी ठेवलं होतं? तुम्ही काऊन माझ्या आयुष्याचा पंचनामा मांडलाय? आत्ताच्या आत्ता या भाकऱ्या संपवा नाहीतर घरात घेणार नाही उद्यापासून.’ धोंडिबानं सकाळ न्याहारी केलेली असे. दुपारी तो घरीच येत नसे तर जेवणार केव्हा? मग तो अधाश्यासारखा आमच्यासमोर भाक-या खाई. पारुबाई त्याच्याकडे प्रेमानं पाहत म्हणे, ‘आता कसं शहाण्यासारखं वागलात. रोज असंच वागायला काय होतं?’


अशी पाच-सहा वर्षे तरी गेली असतील. पारुबाईची दोन्ही मुलं मोठी होऊन शाळेत जाऊ लागली. दोघेही अतिशय हुशार. पण त्यांच्या शिक्षणाचा खर्च, शेतीचा लहरीपणा वाढतच चालला होता. धोंडिबाची स्थिती ‘जैसे थे’च होती. गावातल्या लोकांनी पुढाकार घेऊन त्याला औरंगाबाद, पुणे, मुंबई इथल्या दवाखान्यात दाखवून आणलं, स्वत:बरोबर त्याला दोन-चार वेळा पंढरपूरच्या वारीला घेऊन गेले. पारुबाईही त्याची दारू सुटावी म्हणून वेगवेगळ्या देव्यांना नवस बोली. पण पालथ्या घडय़ावर पाणी. दहा-पंधरा दिवसानंतर धोंडिबा पुन्हा दारू प्यायला लागे. वय वाढत चाललं तशी पारुबाई चिडचिडय़ा होऊ लागल्या. शेतातून घरी आल्या आणि धोंडिबा घरी नसला की, त्या त्याला असेल तिथून पराफरा ओढत आणत. शिव्याशाप देत आरडाओरडा करत. एकदा दारातच धोंडिबाला म्हणाल्या, ‘तुम्ही पुरषासारखे पुरुष पण काय उपेग तुमचा? नुसतं ढोसायला पाह्यजे, कामाला नगं. तू माझी बायको हवी होतास, मर्दा! आणि मी तुझा नवरा.’ पारुबाईचा हा अवतार नवा होता. आजवर त्या असं कधीच बोलल्या नव्हत्या. आम्ही गंमत म्हणून रात्री आजीला सांगितलं. आमच्या आजीबाईही थोरच! त्यांनी सकाळी सकाळी पारुबाईला बोलावून घेतलं आणि दम दिला की, ‘पारे, तुला काही कळतं का? नवऱ्याला असं बोलतात? काही झालं तरी तो तुझ्या कुंकवाचा धनी हाय. भवाने, तूच त्याचा असा कचरा केलास तर त्या पुरषाची काय इज्जत राहिल गावात?’ पारुबाईच्या डोळ्यात टपाटपा पाणी आलं. आजीच्या गळ्यात पडून त्या म्हणाल्या, ‘गंगूबाई, रागाच्या भरात बोलले. चुकी झाली. असं परत बोलणार नाय.’


पण गावातले लोक म्हणाले, ‘पारुबाई, बोलली ते बरोबरच आहे. धोडिंबा मेंगळटच आहे. पारूबाई एवढं राबराबती आणि हा शहाणा तिच्या जीवावर दारू ढोसत राहतो नुसता.’


पण काही दिवसांनी पारुबाईंनी परत ‘तू माझी बायको हवी होतास, मर्दा! आणि मी तुझा नवरा.’ असे खडे बोल धोंडिबाला सुनावलेच. हळूहळू ते रोजचंच झालं. एक आमची आजी सोडली तर इतर कुणालाच त्याचं काही वाटेनासं झालं. कारण पारुबाईंच्या म्हणण्यात खोटं तर काहीच नव्हतं. उलट ‘चार पुरषांच्या तोंडात मारणारं काम करते राव पारुबाई!’ असंच सगळं गाव म्हणत होतं.. आणि आम्हा मुलांसाठी तर पारुबाईचा हा डायलॉग ‘शोले’तल्या ‘कितने आदमी थे रे कालिया’सारखा खेळण्याचा विषय झाला. कुणाला नीट काम करता आलं नाही किंवा जमलं नाही की आम्ही पोरं म्हणत असू ‘तू माझी बायको हवी होतास, मर्दा! आणि मी तुझा नवरा.’


आता पारुबाईंच्या पांडू आणि पिंटू या दोन्ही मुलांची लग्नं झालीत. दोन्ही गुणी आणि कष्टाळू आहेत आणि सुनाही. धोंडिबाही मुलांच्या धाकानं आपोआपच सुधारला. पण पारुबाईला अजूनही मुलांनी त्याला उलटं बोललेलं चालत नाही. ती मुलांवर रागावते, ‘मेल्यांनो, तो माझा नवरा हाय. त्याला शबद बोलायचा काम नाही तुमचं. त्याच्या जोरावरच तुम्हाला एवढं लहानचं मोठं केलं.’




पारुबाईच्या या अजब तर्कशास्त्राचं आणि धोंडिबावरच्या अजोड प्रेमाचं कोडं मला अजूनही उलगडत नाही.

6 comments: