Sunday, May 22, 2011

बंडखोरीचा `सविनय' उद्गार



ओसामा बिन लादेनची हत्या झाल्यापासून मुस्लिम समाजाविषयी, विशेषत: त्यातल्या कडव्या, धर्माध आणि दहशतवादी गटांविषयी पुन्हा काही एक प्रमाणीत चर्चा सुरू झाली आहे. पण ओसामाने 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेतले वर्ल्ड ट्रेड सेंटरचे दोन टॉवर्स पाडले, त्याच्या जेमतेम आठवभर आधीच याच देशात राहणा-या इरशाद मंजी या मुस्लिम महिला पत्रकाराने आजच्या इस्लामचं नेमकं काय बिघडलं आहे, याची चाचपणी करायला सुरुवात केली होती. त्यासाठी तिने टीव्ही, व्याख्यानं, चर्चासत्रं यांच्या माध्यमातून आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. http://www.muslim-refusenik.com/ ही वेबसाइटही चालवली आहे.






मंजी मूळची आफ्रिकेतली, पण ती चार वर्षाची असताना तिचं कुटुंब युगांडातून कॅनडातल्या ब्रिटिश कोलंबियामध्ये स्थायिक झालं. वडील अतिशय कट्टर परंपरावादी आणि आई सश्रद्ध. पण उत्तर अमेरिकी वातावरणात मंजीमधली बंडखोर मुलगी घडत गेली. आपल्याला पडणारे प्रश्न इतरांना विचारायची मुभा तिला मिळत गेली. त्याला तिनं वयाच्या सातव्या-आठव्या वर्षापासूनच वाचनाची, अभ्यासाची जोड दिली.
मंजीने इस्लामविषयी नेमकं कोणत्या प्रकारचं बंड पुकारलं आहे, याचंच हे पुस्तक आहे. ती स्वत:ला ‘मुस्लिम रिफ्युजनिक’ आणि आपल्या बंडखोरीला ‘सविनय बंडखोरी’ म्हणते. ‘मुस्लिम रिफ्युजनिक’ याचा खुलासा करताना मंजीनं लिहिलं आहे, धार्मिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा उद्घोष करणा-या सोविएत ज्यूंसाठी ‘रिफ्युजनिक’ हा शब्द वापरला गेला. कम्युनिस्टांनी त्यांना इस्त्रायलमध्ये स्थलांतर करायला विरोध केला व त्यांची रवानगी श्रमछावण्यात करून छळ केला. मंजी पुढे म्हणतात, वेस्ट बँक आणि गाझा पट्टी गिळंकृत करणा-या इस्त्रायली लष्कराला विरोध करणारे नवे इस्त्रायली हेही ‘रिफ्युजनिक’च. यातून मंजीची भूमिका समजून घ्यायला मदत होते आणि तिचा कल नेमका कोणत्या दिशेला आहे हेही स्पष्ट होतं.




या पुस्तकात एकंदर दहा लेख आहेत. ते सर्वच एका परीने स्वानुभवपर आहेत. पण त्यांचा घाट मात्र पत्रासारखा, व्याख्यानासारखा आहे. पहिला लेख म्हणजे मंजीने मुस्लिम बांधवांना लिहिलेलं अनावृत पत्र आहे. त्याच्या सुरुवातीलाच तिने ‘‘हे श्रद्धावंतांनो, न्यायापासून कदापि ढळू नका आणि अल्लाहला स्मरून साक्ष द्या, मग ती स्वत:च्या, माता-पित्यांच्या, सगे-सोय-यांच्या विरोधात गेली तरीही..’’ हे कुराणातलं अवतरण दिलं आहे. आणि हाच या पुस्तकाचा लसावीमसावी आहे. इस्लाममध्ये धर्मचिकित्सा मान्य नाही आणि त्याविरोधातच मंजीचं हे पत्र आहे. ख्रिस्ती आणि ज्यू धर्मातल्या त्रुटींची चर्चा करणारी असंख्य पुस्तके आहेत मग ती मुस्लिम धर्मासंबंधी का नसावीत, हा तिचा सवाल आहे. पण याचं उत्तरही तिनं पुढच्या काही लेखांत देऊन टाकलं आहे. कुराणातल्या विसंगतीची आणि परस्परविरोधाची चर्चा केली आहे.




‘मी बंडखोर मुस्लिम कशी झाले?’ यात मंजीने आपली जडणघडण कशी होत गेली याची सविस्तर मांडणी केली आहे. इस्लामचं पालन करायचं की नाही, हे ठरवण्यासाठी त्याच्या गुणवत्तेची पारख करण्याची गरज मंजीला वयाच्या तेराव्या वर्षीच वाटू लागली. त्या दृष्टीने तिने शोधही घ्यायला सुरुवात केली. ते करताना ती प्रसिद्ध विचारवंत एडवर्ड सैद यांच्यावरही टीका करते. याचबरोबर सैद यांच्या ‘ओरिएण्टॅलिझम’ या पुस्तकाने पौवार्त्यांकडे बघण्याच्या पाश्चात्यांच्या दृष्टिकोनाची उत्तम मांडणी केली आहे. मंजी म्हणते की, सलमान रश्दी यांच्या ‘द सतानिक व्हर्सेस’ नंतर मुस्लिमांच्या श्रद्धांना आव्हान देणारं साहित्य पाश्चात्य देशात राहणाऱ्या मुस्लिमांकडून आणि पाश्चात्यांकडूनही लिहिलं गेलं. पण त्याची सैद यांच्या अनुयायांनी ‘ओरिएण्टॅलिस्ट’ (वंशवादी) म्हणून वासलात लावली. ‘सत्तर कोवळ्या कुमारिका’ या लेखात पाश्चिमात्य देशातही मुस्लिमांना बायलबलपेक्षा कुराणच श्रेष्ठ आहे, हे कसं सांगितलं जातं, इस्लाम हा ज्यू-ख्रिस्ती परंपरातून उदयाला आलेला असूनही इस्लाम हाच ‘खरा धर्म’ असं कुराण कसं सांगतं, कुराणातली स्त्रियांबद्दलची प्रतिकूल मतं यांची चर्चा आहे. ‘आपण विचार करायचं कधी थांबवलं?’ या लेखात ‘इज्तिहाद’ या मुस्लिम परंपरेचा मागोवा घेतला आहे. ‘कवाडे आणि कमरपट्टे’ हा लेख मात्र मंजीच्या इस्त्रायल भेटीचा वृतांत आहे.




‘फसवणूक कोण कुणाची करतंय?’ या लेखात पॅलेस्टाइन-इस्त्रायल यांच्यातल्या संघर्षाची चर्चा आहे. पॅलेस्टिनी लोक अरब जगतात शरणार्थी, नकोसे का झाले याची आणि झायोनिस्ट म्हणजे इस्त्रायलचं स्वतंत्र राष्ट्र स्थापन व्हावं, यासाठी युरोपात सुरू झालेली चळवळ यांचा आढावा आहे. इस्त्रायलचं अस्तित्व ज्यांना अमान्य होतं अशा अरब राष्ट्रांनी संघर्ष सुरू केला तेव्हापासून पॅलेस्टिनींची अवस्था बिकट झाली. म्हणून पॅलेस्टिनी हे अरब जगतातले ज्यू होत असे मंजी एके ठिकाणी म्हणते. ‘इस्लामचं छुपं अंग’ या लेखात इस्लमाच्या वंशवादाची काहीशी कठोर चिकित्सा आहे. कुराण हे अथपासून इतिपर्यंत खरोखरच ईश्वरलिखित आहे का, असा प्रश्न मंजीने उपस्थित केला आहे. इथे आणि अशाच इतर काही प्रश्नांच्या बाबतीत मंजी काहीशी गाफील राहिल्यामुळे तिच्याकडून अस्वीकृत प्रश्नांना स्वीकृत उत्तरं देण्याचा अनाहूतपणा घडला आहे.




इस्लामची कडवी आणि कट्टर वृत्ती ही त्याच्या टोळी प्रवृत्तीची खूण आहे, असा मंजी दावा करते. तिच्या मतानुसार इस्लामपुढे सध्या तीन प्रमुख आव्हानं आहेत आणि त्यांचा तातडीने सामना करायची गरज आहे. पहिलं, स्त्रियांच्या क्षमतेचा वापर करून मुस्लिम अर्थकारण पुन्हा सक्षम केलं पाहिजे. दुसरं, इस्लाममधल्या विविध विचारप्रवाहांना वाव देत, पैशाच्या जोरावर रुबाब करणा-या अरबांना धडा शिकवला पाहिजे. तिसरं, पाश्चात्यांच्या विरोधात नव्हे तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे. याच मार्गाने टोळी प्रवृत्तीला छेद देता येईल.




‘ऑपरेशन इज्तिहाद’ आणि ‘प्रामाणिकपणाला स्मरून’ हे दोन्ही प्रकरणं जरा सल्लेवजा झाली आहेत. पहिल्यामध्ये इस्लामी महिला उद्योजकांना साहाय्य करणं हाच इस्लाममध्ये बदल घडवून आणण्याचा मार्ग असून त्यासाठी काय करता येईल याचे सल्ले आहेत, तर ‘प्रामाणिकपणाला स्मरून’मध्ये युरोपिय देशांनी आणि गैर मुस्लिमांनी इस्लामी देशांशी व मुस्लिमांशी कसं वागावं याच्या सूचना आहेत.




‘थँक गॉड फॉर द बेस्ट’ हा शेवटच्या लेखात मंजीने स्वत:चे वेगवेगळे अनुभव आणि काही लोकांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. थोडक्यात मंजी मध्यममार्गी आहे. तिचा कुराणातल्या विसंगतींवर आक्षेप आहे, पण म्हणून तिला तस्लिमा नासरीनसारखा इस्लाम धर्मच संपवून टाकावा, असं काही वाटत नाही. धर्म हा मानवताविरोधीच असतो, हेही तिला मान्य नाही. मात्र याचं समर्थन करण्यासाठी मंजी जे युक्तिवाद वापरते ते मात्र फार निर्णायक मानले जाण्याची शक्यता नाही. ती म्हणते, ‘महात्मा गांधींनी अहिंसेची-सत्याग्रहाची कल्पना हिंदू आणि जैन मूल्यांच्या आधारेच घेतली. दलाई लामांनी धर्माची बाजू घेतल्याबद्दल कुणी त्यांची निंदा केली नाही.’




ईश्वराच्या नावावर दहशतवाद आणि मानवाधिकारांचं उल्लंघन करणं इस्लामने थांबवलं पाहिजे, हे मंजीने या पुस्तकात ठासून सांगितलं आहे. मुस्लिमांमध्ये टोळी वृत्तीची हुकूमशाही आहे. तिचा अधिक्षेप करायचा असेल तर कुराणाबाबतच शंका उपस्थित केल्या पाहिजेत. स्त्रियांबाबतचे कुराणातले अन्यायकारक तपशील, परस्परविरोधी विधानं आणि ज्यू द्वेष या शंकाही मंजीने काही प्रमाणात उपस्थित केल्या आहेत. पण कुराणाबाबत अशा शंका उपस्थित करणारी मंजी काही पहिलीच मुस्लिम नव्हे. याआधीही अनेकांनी हे काम केलं थोडय़ा प्रमाणात, दबक्या आवाजात केलं आहे. गैर मुस्लिमांच्या पुस्तकांची यादी तर मंजीनेच संदर्भसूचीमध्ये दिली आहे. पण त्यांच्या पुस्तकांना ‘वंशवादी’ म्हणणा-यांना मंजीच्या पुस्तकाबाबत मात्र तो आक्षेप घेता येणार नाही.




तिढा आजच्या इस्लामचा! : इरशाद मंजी
अनुवाद : रेखा देशपांडे, अक्षर प्रकाशन, मुंबई
पाने : 191, किंमत : 220 रुपये

No comments:

Post a Comment