Sunday, August 21, 2011

सत्तर वर्षाचा तरुण


साधारणपणे 18 ते 35 हा वयोगट तरुण मानला जातो. अठराव्या वर्षी प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळतो तर पस्तीशी हा तारुण्याचा महत्त्वाचा टप्पा असतो. या अर्थाने 1960 ते 80 हा डॉ. कुमार सप्तर्षी यांचा बहराचा काळ मानता येईल तर 65 ते 80 या काळाला ख-या अर्थाने ‘सप्तर्षी पर्व’ म्हणता येईल. वयाच्या 18 ते 25 या काळात प्रत्येकाची वैचारिक जडणघडण होते. या काळात आपल्यावर परिणाम करणारे घटक आपली आयुष्याबद्दलची एकंदर भूमिका ठरवत असतात.
 
सप्तर्षी अहमदनगर जिल्ह्यातील राशीन या दुष्काळी खेडेगावातून साठच्या सुमारास पुण्यात आले, तेव्हा 21 वर्षाचे होते. नगरच्या वास्तव्यात त्यांना राजकीय पक्ष, पुढाऱ्यांच्या सभा, मोर्चे, आंदोलने यांचा चस्का लागला होता. तो पुण्यात आल्यावरही कायम राहिला.
 
याच वेळी देशपातळीवर बरेच काही घडत होते. डॉ. श्रीराम लागू यांनी स्वत:च्या पिढीचे वर्णन ‘गाफिल पिढी’ असे केले आहे, तर सप्तर्षी स्वत:च्या पिढीचे वर्णन ‘आयडेंटीटी क्रायसिसमध्ये वाढलेली पिढी’ असे करतात. कारण 1962 साली भारताचे चीनबरोबर युद्ध झाले. या पराभवाने त्या वेळच्या तरुण पिढीमध्ये मोठे नैराश्य निर्माण झाले. त्यानंतर दोनच वर्षानी नेहरूंचा मृत्यू झाला. नंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. लगेच पाकबरोबर युद्ध झाले. ताश्कंदला असताना शास्त्रींचे आकस्मिक निधन झाले. 1967 निवडणुकांमध्ये काँग्रेसची एकाधिकारशाही उद्ध्वस्त झाली. राम मनोहर लोहिया यांनी ‘अँटी काँग्रेस’ची चळवळ सुरू केली. 67-68 या काळामध्ये उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये प्रचंड मोठे दुष्काळ पडले. ही झाली त्यावेळची भारतातली परिस्थिती. साधारपणे याच काळात अमेरिकेत हिप्पी संस्कृतीचा उदय झाला होता. क्रुश्चेव्ह, चे गव्हेरा हे तरुणाइचे हिरो म्हणून पुढे येत होते. शेजाराच्या पाकिस्तानमध्ये आर्मीचे वर्चस्व वाढत होते तर बांगलादेशामध्ये बरेच अराजक माजले होते. म्हणजे भारतात आणि भारताच्या शेजारी देशांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अस्वस्थता होती. या परिस्थितीचा त्या वेळच्या तरुणाईवर मोठा परिणाम झाला. या साऱ्या घुसळणीतून ती तावूनसुलाखून निघाली. सप्तर्षी या काळाचंच अपत्य आहेत, हे नीट ध्यानात घेतल्याशिवाय त्यांचे योगदान नीटपणे समजून घेता येत नाही आणि त्यांचे विश्लेषणही करता येत नाही.
 
त्यातही सप्तर्षीचे वेगळेपण असे की, ते एका सामान्य खेडय़ातून आलेले होते. त्यांचे वडील त्या भागातले पहिले सरकारी डॉक्टर होते. अशा सुखवस्तू घरातला लाडका पण अभ्यासू मुलगा पुण्यात आल्यावर त्याला पंख फुटणे स्वाभाविक होते. एस. पी. कॉलजेनंतर ते वैद्यकीय शिक्षणासाठी बी. जे. मेडिकलला गेले. तिथे असताना सप्तर्षीनी तत्त्वज्ञानावरची पुस्तके आणि टॉलस्टॉय, गांधी, लेनिन, माओ यांच्या पुस्तकांची पारायणे केली. त्या वेळी बी. जे.तले डॉक्टर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे चांगल्या प्रकारे समाजजीवनाशी निगडीत होते. डॉ. अनिल अवचट,   डॉ. अनिल लिमये, डॉ. जब्बार पटेल, डॉ. सतीश आळेकर ही काही नावे वानगीदाखल सांगता येतील. तर पुण्यात राजकीय-समाजिक-सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नवनव्या घडामोडी घडत होत्या. एसेम जोशी, भाई वैद्य, डॉ. बाबा आढाव, ग. प्र. प्रधान, नानासाहेब गोरे या समाजवादी नेत्यांकडे ही तरुण मंडळी आकर्षित होऊ लागली. समाजवादी, संघपरिवार यांच्या संस्था-संघटनांनी चांगली घुसळण चालवली होती. त्यामुळे त्या वेळच्या तरुण पिढीला आपण काहीतरी करावे असे वाटत होते.
 
‘युक्रांद’ची स्थापना म्हणजे पुण्यातले बौद्धिक वातावरण, राष्ट्रीय अस्वस्थता आणि घरचे टिपिकल ब्राम्हणी वातावरण यातून सप्तर्षीमधल्या तरुणाची जडणघडण झाली आहे. 1965 साली सप्तर्षीनी ‘यूथ ऑर्गनायझेशन’ची स्थापना केली. त्या वेळी ते 26 वर्षाचे होते. या त्यांच्या संघटनेने विद्यार्थ्यांची अनेक आंदोलने केली. पूनम हॉटेलमध्ये वेटरची कामे करून, बूटपॉलिश करून बिहारमधील दुष्काळग्रस्तांसाठी 26,000 रुपयांचा निधी पाठवला. शिवाय 67च्या मे महिन्यात गया जिल्ह्यातील रजौली गावी (आता नवादा जिल्हा) अनिल अवचट आणि सप्तर्षीनी दोन महिने दवाखाना, कार्यकर्त्यांसाठी खाणावळ चालवली. बिहारहून आल्यावर, काहीतरी करून दाखवण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या या तरुणांनी ‘युक्रांद’ची स्थापना केली. या दलाचे मार्गदर्शक होते, प्रा. राम बापट, गं. बा. सरदार आणि दि. के. बेडेकर. या मान्यवरांना तरुण पिढीकडून चांगल्या अपेक्षा होत्या. भारत स्वतंत्र झाला असला तरी सामाजिक-राजकीय पातळीवर आमूलाग्र बदलाची गरज त्यांनी जाणवत होती, त्यामुळे ते तरुणाईवर भिस्त ठेवून होते. 

 ‘युक्रांद’ची स्थापना सिंहगडावरील लोकमान्य टिळकांच्या बंगल्यात झाली. त्या वेळी 40 तरुणी आणि 60 तरुण, असा 100 युवकांचा गट सप्तर्षि-अवचट यांनी तयार केला होता. क्रांती झाल्याशिवाय भारत सामर्थ्यशाली होणार नाही, म्हणून क्रांती करायची. पण कशी, तर आधी वैचारिक क्रांती, नंतर सामाजिक सुधारणा आणि मग सर्वागीण क्रांती असे त्यांचे तीन टप्पे होते. त्यावर सप्तर्षीचा आजही विश्वास आहे. या त्रिसूत्रीपासून ते आजही ढळलेले नाहीत. ‘आम्ही विद्यार्थी आणि आमच्या दंगली’ ही त्यांची पुस्तिका तेव्हा प्रकाशित झाली. ती वाचून पु. ल. देशपांडे, एसेम जोशी यांनी त्यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ‘माणूस’च्या माजगावकरांनी ती आपल्या अंकात छापली. ‘आम्ही विद्यार्थी दंगली करणार. का करू नयेत?’ अशी भूमिका सप्तर्षीनी या पुस्तिकेमध्ये मांडली होती.
 
‘युक्रांद’ची चार सूत्रे होती- 1) स्त्री-पुरुष समानता, 2) जातीपातीला विरोध, 3) धर्मनिरपेक्षता आणि 4) ग्रामीण-शहरी भागातली दरी मिटवणे. या चारही संस्कारांनी त्या वेळचा प्रत्येक युक्रांदी आणि युक्रांदच्या संपर्कातला तरुण झपाटून गेला होता. या चार संस्कारांनी त्या वेळच्या अनेक तरुणांना घडवले. नंतर काही कारणांनी युक्रांदमधून बाहेर पडलेल्यांनीही स्त्री-पुरुष समानतेबाबत आपल्यापरीने प्रयत्न केले. त्याची सुरुवात स्वत:पासून केली. जातीपातीला विरोध करण्यासाठी जाणीवपूर्वक आंतरजातीय लग्ने केली. धर्मनिरपेक्षतेचा लढा हा संघाच्या जातीयवादी प्रचाराला टक्कर देण्यासाठी उभारलेला लढा होता. त्या वेळची तरुण पिढी ही आता साठी-सत्तरीची आहे. आणि ती सर्व आजही ‘युक्रांद’चे योगदान मान्य करते. त्यात मुकुंद टाकसाळे, नरेंद्र दाभोळकर, नीलम गोऱ्हे, आनंद करंदीकर, प्रभाकर करंदीकर, सुरेश खोपडे, बबनराव पाचपुते, शांताराम पंदेरे, विलास भोंगाडे अशा अनेकांचा समावेश आहे. 77 साली युक्रांदमध्ये मतभेद झाल्यावर सप्तर्षी बाहेर पडले, तेव्हा ते पस्तीशीचे होते. मात्र 67 ते 77 या दहा वर्षाच्या काळात तत्कालीन तरुण पिढीला सुसंस्कारित करण्यात सप्तर्षी यांचा फार मोठा वाटा आहे.
 
आणीबाणी 1975 ला आली, त्याआधीच जेपींचे भ्रष्टाचारविरोधी देशव्यापी आंदोलन सुरू झाले होते. त्यामुळे इंदिरा गांधींच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना झाली. ते सत्तेवर आले, पण त्यांचे सरकार जेमतेम अडीच वर्षेही टिकले नाही. या काळात सप्तर्षी महाराष्ट्रात होते. 80 नंतर तर जनता पक्ष पूर्णपणे भरकटला. भाजपने वेगळा मार्ग आखला, समाजवाद्यांचे पूर्ण विघटन होऊन अनेक समाजवादी राजकीय परिघाबाहेर- एनजीओंमध्ये गेले. क्रांतीची स्वप्ने पाहणा-या सप्तर्षीसारख्यांना या उलथापालथीने काहीसे निराश केले.
 
1967 ते 83 या काळात आजवर सप्तर्षीना एकंदर पस्तीस वेळा तुरुंगवास झाला आहे. 1973 साली सप्तर्षीनी पुण्यात पुरीच्या शंकराचार्याबरोबर जाहीर वादविवाद केला. 1967 मध्ये पुण्यातील महाविद्यालयांनी केलेल्या फीवाढ विरोधी आंदोलनापासून ते 83 मध्ये राहुरीच्या कृषी विद्यापीठाच्या ‘कुलगुरू हटाव’ मोहिमेपर्यंतची सप्तर्षीची सर्व आंदोलने ही विद्यार्थ्यांसाठीची आहेत. त्यांचा परीघ पुण्यापुरता मर्यादित नाही तर तो महाराष्ट्रभर विखुरलेला आहे. ऐंशीच्या दशकात सप्तर्षी महाराष्ट्रातल्या तरुणांचे हिरो होते, ते यामुळेच.
 
80-90 या दशकात सप्तर्षीनी वेगवेगळे प्रयोग केले. राशीनला शाळा-कॉलेज काढले, आसपासच्या गावांमध्ये शेतीचे प्रयोग केले. जनता दलाच्या तिकिटावर नगरमधून दोन वेळा खासदारकीची निवडणूक लढवली. पण त्यात त्यांना यश आले नाही.
 
दुसरे पर्व
 
1991 साली सप्तर्षीचे दुसरे पर्व सुरू झाले. त्यांनी ‘सत्याग्रही विचारधारा’ हे वैचारिक मासिक सुरू केले. त्या वेळी माध्यमांचे आजच्या इतके वैपुल्य नव्हते. त्यामुळे ‘सत्याग्रही विचारधारा’ वैचारिक मासिक म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांपर्यंत पोहचले. 2001 पर्यंतचा काळ सप्तर्षीचा संपादक म्हणून बहराचा काळ होता. 2001ला त्यांनी ‘युक्रांद’चे पुनरुज्जीवन केले.
 
संपादक म्हणून सप्तर्षीनी जातीयवादी, धर्माध शक्ती आणि काँग्रेसची सरंजामशाही यांच्याबाबतची आपली भूमिका सातत्याने मांडली आहे. विश्व हिंदू परिषद, भाजप आणि महाराष्ट्रातल्या प्रांतीय संघटना या धर्माध शक्ती; शिवसेना, मराठा महासंघ, ब्राम्हणांच्या संघटना, दलितांच्या अस्मितेवर आधारित संस्था-संघटना हे जातीयवादी प्रवाह आणि काँग्रेसची संरजमाशाही या सर्वावर सप्तर्षीनी सडेतोड आणि अतिशय मुद्देसूद टीका केली आहे. याचबरोबर समाजवाद्यांमधील गट-तट आणि त्यांच्या भोंगळपणावरही ते टीका करत आले आहेत. हा त्यांचा पोलिटिकल करेक्टनेस हेच त्यांचे 90 नंतरचे महत्त्वाचे योगदान आहे, वैचारिक बलस्थान आहे. करेक्टिव्ह फॅक्टर म्हणून भूमिका बजावताना ते कुणाच्याही आहारी गेले नाहीत, त्यांनी कुणाचाही अनुनय केला नाही, हे त्यांचे वैचारिक मोठेपण.
 
व्यसन हेच टॉनिक
 
खाणे आणि गप्पा हे सप्तर्षीचे दोन महत्त्वाचे वीकपॉइंट्स आहेत. आजही त्यांच्याभोवती सतत तरुणांचा गराडा असतो. कुठल्याही तरुणाशी त्यांची पहिल्या पाच मिनिटांत मैत्री होते. कुठल्याही तरुणाला त्यांचे बोलणे दोन-तीन तास ऐकत राहावेसे वाटते. असे महाराष्ट्रात किती लोक आहेत? आजच्या तरुणाईबद्दल फारसे काही बरे बोलले जात नाही. पण सप्तर्षीना विचारले तर ते या तरुण पिढीचे गुणगानच करतील. ते तरुणाईबद्दल अजिबात निराश नाहीत आणि स्वत:च्या आजवरच्या यशापयशानेही त्यांना नैराश्य आलेले नाही. एवढा मोठा काळ पाहिलेल्या, त्यातही उमेदीच्या काळात सक्रिय राहिलेल्या माणसांना उतारवयात नैराश्य येते. ती फार नकारात्मक बोलतात, असा सार्वजनिक अनुभव आहे. पण सप्तर्षी तिथेही आपली विकेट काढतात. त्यांनी स्वत:ला भयंकर भयग्रस्ततेतून वाचवलेले आहे आणि आजच्या तरुणाईलाही आपल्या परीने वाचवायचा ते प्रयत्न करत आहेत.
 
तरुण मुले त्यांचे का ऐकतात? कारण ते तरुणाईच्या भाषेत बोलतात, त्यांना अपील होईल असे बोलतात. पोलिटिकली-सोशली-कल्चरली करेक्ट काय आहे, हे नेमकेपणाने सांगतात. त्यासाठी या माणसाकडे प्रचंड उत्साह आहे. तो सतत उत्साहाने फसफसलेला असतो. त्यामुळे तुम्ही कितीही प्रश्नांचे जंजाळ त्यांच्याकडे घेऊन गेलात तरी ते ऐकणाऱ्याचे समाधान होईपर्यंत खुलासेवार बोलतील, प्रश्नांशी भिडण्याची खिलाडूवृत्ती समजावून सांगतील. गप्पा मारायला ते सदैव तयार असतात. ते त्यांचे व्यसन इतके दांडगे आहे की, त्यालाच त्यांनी आपले टॉनिक बनवले आहे. त्यांच्या या गप्पांमध्ये कधीच म्हातारेकोतारे नसतात, तर लातूर-बीड-उस्मानाबाद-सोलापूर-कोल्हापूर या जिल्ह्यांमधून आलेली तरुण मुले असतात. सतत तरुणांच्या गराडय़ात असलेल्या सप्तर्षीना चिरतरुणही म्हणवत नाही. ते तरुणच आहेत!
 त्यामुळे आज त्यांना त्यांच्या सत्तराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणा-याला ते म्हणतील, ‘तू माझा शत्रू आहेस का? की माझ्या शत्रूने तुला पाठवलेय?’

No comments:

Post a Comment