Saturday, October 15, 2011

एका जिद्दी प्रकाशकाला स्मरताना...

मराठीमधील ज्या काही मोजक्या प्रकाशनसंस्थांना पन्नासहून अधिक वर्षे झाली आहेत, त्यात पुण्याच्या व्हीनस बुक स्टॉल या प्रकाशन संस्थेचे नाव घ्यावे लागते. एक जून 1939 साली ही प्रकाशनसंस्था सुरू झाली. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे ‘महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण’, दत्तो वामन पोतदार यांचे ‘मराठी गद्याचा इंग्रजी अवतार’, अ. ना. देशपांडे यांचे ‘मराठी वाङ्मयाच्या इतिहासा’चे खंड, गं. दे. खानोलकर यांचे ‘वाङ्मयसेवक’चे सात खंड अशी अनेक दर्जेदार आणि ऐतिहासिक पुस्तके या संस्थेने प्रकाशित केली आहेत. व्हीनसचे सुरुवातीच्या काळातले एक भागीदार, कल्पक प्रकाशक आणि मराठी ग्रंथप्रकाशनांचा इतिहास लिहिणारे पहिले प्रकाशक-लेखक अ. ह. लिमये यांचे चालू वर्षे हे जन्मशताब्दी वर्षे आहे. त्यानिमित्ताने नुकताच ‘जिद्दी अनंतराव’ हा त्यांच्याविषयीचा छोटेखानी स्मृतिग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे.
  
लिमये यांचे निधन 1974 साली झाले. त्यामुळे त्यांचा गौरवग्रंथ वा स्मृतिग्रंथ त्यानंतरच्या एक-दोन वर्षातच निघावयास हवा होता. तर तो अधिक चांगला आणि कदाचित दर्जेदारही होऊ शकला असता. मात्र तसे घडून आले नाही. दुसरे असे की लिमये यांनी आत्मचरित्रही लिहिले नाही. या सर्व कारणांमुळे ज्येष्ठ प्रकाशक शरद गोगटे, सुरेश नवरे आणि के. मो. भिडे या लिमये यांच्या सहका-यांनी-मित्रांनी पुढाकार घेऊन हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ते उशिरा का होईना उचित झाले खरे, पण इतक्या उशिराची कामे परिपूर्ण तर सोडाच पण किमान संग्राह्यही होत नाहीत, हा धडा या पुस्तकावरूनच शिकायला मिळतो.
 
लिमये यांचा प्रवास तसा पाहण्यासारखा आहे. बी.ए. झाल्यानंतर एक वर्षे त्यांनी ‘सकाळ’मध्ये उपसंपादक म्हणून काम केले. त्यानंतर ते 1939 ते 43 या काळात पुण्याच्या रमणबागेतल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक होते. दरम्यानच्या काळात त्यांनी बी.टी. केले. 1940 मध्ये त्यांनी व्हीनस बुक स्टॉलच्या स. कृ. पाध्ये यांच्याशी भागीदारीत ग्रंथ प्रकाशन व विक्री व्यवसायाला सुरुवात केली होती. 1939 मध्येच दुस-या महायुद्धाला सुरू झाली होती. लिमये यांना काय वाटले कुणास ठाऊक, पण ते सैन्यात भरती झाले. 1943 ते 46 या काळात त्यांनी लष्करात काम केले. अल्पावधीतच ते अगदी कॅप्टनच्या हुद्दय़ापर्यंत गेले. लिमये यांची नेमणूक दुस-या महायुद्धासाठी झाल्यावर त्यांना इजिप्त, इटली, इग्लंड, ग्रीस, फ्रान्स या देशांत जायला मिळाले. तेथून त्यांनी आपल्या पत्नीला अनेक पत्रे लिहिली. लिमये परतताच त्या पत्रांचा संग्रह देशमुख आणि कंपनीच्या रा. ज. देशमुखांनी काढायची तयारी दाखवली. त्यानुसार तो पत्रसंग्रह ‘दर्यापार’ या नावाने 1947 साली, म्हणजे ज्या वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्याच वर्षी प्रकाशित झाला. हे लिमये यांचे पहिलेच पुस्तक. पुढे त्यांनी 1972 पर्यंत जवळपास 25 पुस्तकांचे लेखन, संपादन आणि अनुवाद केले.
 
पं. भीमसेन जोशी यांच्यावर लिमये यांचा खूप लोभ होता. त्यांचे स्नेहाचे संबंध होते. पंडितजींनी सवाई गंधर्व महोत्सव सुरू करायचा ठरवला, तेव्हा त्याच्या आयोजनासाठी लिमये यांनी बराच पुढाकार घेतला होता. अप्पा बळवंत चौकातल्या आपल्या पुस्तक विक्रीच्या दुकानात त्यांनी कार्यक्रमाच्या तिकीटविक्रीची व्यवस्था केली होती.
 
‘‘चांगली प्रस्तावना मर्यादित अर्थानं चांगल्या पुस्तकाचा उंबरठा असतो. चांगला वाचक त्यात भरलेलं मजकुराचं माप ओलांडून पुस्तकाच्या अंतरंगात पाऊल टाकतो.’’ असे श्री. बा. जोशी यांनी या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत म्हटले आहे. पण ते नेमके याच पुस्तकाला फारसे लागू होत नाही. कारण ही प्रस्तावना सामान्य म्हणावी अशी आहे. त्यात आवर्जून वाचावेच असे काहीही नाही. त्यामुळे हे माप न ओलांडता पुस्तकाच्या अंतरंगात पाऊल टाकायला हरकत नाही.
 
या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचा आणि चांगला म्हणावा असा लेख आहे तो शरद गोगटे यांचा. ‘मराठी ग्रंथ व्यवसायातील शापित गंधर्व’ असे त्याचे शीर्षक आहे. ते अतिशय सार्थ आणि नेमके आहे. लिमये यांनी ग्रंथप्रकाशक म्हणून फार पुस्तके प्रकाशित केली नाहीत. युद्धावरून परतल्यावर काही काळाने तर त्यांची आणि व्हीनसची भागीदारी संपुष्टात आली. त्यामुळे त्यांनी पुस्तकाचे दुकान स्वत:कडे घेऊन ते चालवले. पण लिमये यांची प्रकाशन व्यवसायावरील निष्ठा वादातीत होती. त्यासाठी त्यांनी स्वत: कष्ट केलेच पण तसे प्रयत्न करणा-या इतरांनाही सतत मदत केली.
 
ग्रंथव्यवसाय हे केवळ त्यांच्या अर्थाजनाचे साधन नव्हते, तो त्यांच्या जगण्याचा ध्यास होता. 1946 नंतरच्या सात-आठ वर्षात त्यांनी केलेल्या तीन असाधारण उपक्रमावरून त्याची प्रचिती येते. 1954 साली त्यांनी दिल्लीच्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात मराठी ग्रंथांचं प्रदर्शन भरवलं. मराठी ग्रंथनिर्मितीची वाटचाल, त्यातील वैविध्य व वैशिष्टय़ांसह इतर भाषिकांनाही जाणवेल अशा पद्धतीने त्याची मांडणी लिमये यांनी केली होती. 1730 मधील हस्तलिखित पोथीपासून 1954 पर्यंतच्या प्रकाशित पुस्तकांपर्यंत 6000 पुस्तके या प्रदर्शनात त्यांनी मांडली होती. या प्रदर्शनाला तत्कालिन पंतप्रधान पं. नेहरू यांनी भेट देऊन लिमये यांचे कौतुक केले होते. दुसरे दोन उपक्रम म्हणजे ‘ग्रंथव्यवहार ’आणि ‘मराठी ग्रंथप्रकाशनाचे स्वरूप: प्रेरणा आणि परंपरा’ या दोन पुस्तकांचे लेखन. या तिन्हींचा गोगटे यांनी व्यवस्थित आढावा घेऊन लिमये यांचे योगदान नेमकेपणाने मांडले आहे.
 
वा. गो. आपटे यांचे ‘लेखनकला आणि लेखन व्यवसाय’ हे पुस्तक 1926 साली प्रकाशित झाले. विविध साहित्यप्रकारातील निमिर्तीविषयक मार्गदर्शन त्यांनी या पुस्तकामध्ये केले आहे. त्याच वर्षी योगायोगाने मूक चित्रपट सुरू झाले. त्यामुळे भविष्यातील या क्षेत्रातील संधींचा विचार करून आपटे यांनी पटकथा लेखनाच्या तंत्राची माहितीही या पुस्तकामध्ये दिली आहे. परंतु प्राधान्याने मराठी ग्रंथलेखनाचा विचार केला आहे. या पुस्तकामध्ये आपटे यांनी दोन महत्त्वाची भाकितं केली आहेत. पहिले, ‘मराठीत लेखन व्यवसाय द्रव्यसाधनेचे साधन होऊ शकत नाही.’ आणि दुसरे, ‘ग्रंथलेखन व त्याचे प्रकाशन ही परस्परांहून भिन्न आहेत. त्या कामांची वाटणी होणेच रास्त.’ ही भाकितं दुर्दैवाने नंतरच्या काळात खरी ठरली आणि नजीकच्या काळात ती खोटी ठरण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे आपटे यांच्या या दोन्ही विधानांना ग्रंथव्यवसायापुरते तरी सिद्धान्ताचे स्वरूप आले आहे. आपटे यांच्यानंतर तब्बल 26 वर्षानी अ. ह. लिमये यांनी ‘ग्रंथव्यवहार’ (1952) हे पुस्तक लिहिले. मराठी ग्रंथप्रकाशनाचा वाढता धंदा, नव्या प्रकाशकांचा उदय आणि जुन्या सिद्धान्तांचे कोसळणे अशा संक्रमणकाळात नव्या प्रकाशकांना मार्गदर्शन व्हावे, आधीच्या लोकांनी केलेल्या चुका टाळता याव्यात म्हणून लिमये यांनी हे पुस्तक लिहिले. मुख्य म्हणजे पहिल्यांदाच मराठी प्रकाशनाचा एक पद्धतीशास्त्र आणि व्यवहारशास्त्र म्हणून विचार केला. पण आपण कोणत्या प्रकारचे पुस्तक लिहीत आहोत आणि त्याचे कशाप्रकारे स्वागत होईल याची कल्पना लिमये यांना असावी. त्यामुळे त्यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत वा. गो. आपटे यांच्या पुस्तकाची महाराष्ट्रातल्या जाणकारांनी, प्रकाशकांनी आणि इतर संबंधित घटकांनी पुरेशी दखल घेतली नाही याबद्दल खंत व्यक्त केली. पण ‘पोएटिक जस्टीस’ म्हणावा असा प्रकार घडला. लिमये यांच्या पुस्तकाची तर त्याहून उपेक्षा झाली. हे पुस्तक केवळ मराठी प्रकाशन व्यवसायाशी संबंधित असणा-या घटकांना समोर ठेवून लिमये यांनी लिहिले होते. पण त्यांनी तर ते वाचायचेच नाकारले. शिवाय प्रकाशनव्यवसायाकडे पाहण्याचा आपल्या समाजाचा दृष्टिकोनच मुळी बरा नसल्याने हे पुस्तक इतर वाचकांनीही वाचले नाही, असे म्हणायला बराच वाव आहे. कारण हे पुस्तक गेली 58 वर्षे बाजारात उपलब्ध आहे. आणि अजूनही त्याची जेमतेम दुसरी आवृत्तीच चालू आहे. इतकी वर्षे या पुस्तकाचे गठ्ठे सांभाळत ठेवणा-या व्हिनस प्रकाशनाचे त्यासाठी कौतुकच करायला हवे.
 
‘ग्रंथव्यवहार’ या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात लिमये यांनी ग्रंथव्यवहाराच्या रितसर शिक्षणाची आवश्यकता नमूद करून त्यासाठी दोन वर्षाचा अभ्यासक्रम करावा असे सुचवले आहे. एवढेच नव्हे तर तर त्यात कोणकोणत्या विषयांचा समावेश असावा, प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची व्यवस्था कशी असावी याचीही स्थूल रूपरेषाही दिली आहे. मात्र त्यांचे स्वप्न महाराष्ट्रात अजून साकार झाले नाही, एवढेच नव्हे तर दिल्लीच्या ‘फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स’ या देशव्यापी संस्थेलाही पूर्णपणे साकार करता आलेले नाही. त्यांचा अभ्यासक्रम आहे, पण तो फारच अल्प मुदतीचा आहे. या गोष्टीमुळे मराठी प्रकाशन व्यवसायाला कुशल आणि कार्यक्षम व्यक्ती मिळत नाहीत. ही त्यांच्यापुढची मोठीच समस्या आहे. असो.
 
प्रकाशन व्यवसायात नव्याने येऊ इच्छिणा-यांनी ही दोन्ही पुस्तके अनिवार्य पाठय़पुस्तके म्हणून वाचली पाहिजेत. पण मराठी प्रकाशनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कुठल्याही सरकारी परवानग्या घ्याव्या लागत नाहीत. कुठलेही शिक्षण घ्यावे लागत नाही. त्यामुळेच असा एक गैरसमज निर्माण झाला आहे की, त्यासाठी कुठल्या अभ्यासाचीही गरज नाही. परिणामी मराठी प्रकाशनाकडे हौस, आवड नाहीतर शुद्ध पैसे कमावण्याचा धंदा म्हणूनच पाहिले जाते.
 
अ. ह. लिमये यांनी 1972 साली ‘मराठी ग्रंथप्रकाशनाचे स्वरूप : प्रेरणा आणि परंपरा’ हे पुस्तक लिहिले. खरं तर तो त्यांचा पीएच.डी.चा प्रबंध होता. तोवर प्रबंध टंकलिखित स्वरूपात विद्यापीठाला सादर करायची पद्धत होती. विद्यापीठांनी नेमलेले मार्गदर्शक तो वाचून  संमत वा असंमत करत असत. पण लिमये यांना स्वत:च्या प्रबंधाबद्दल पुरेपूर आत्मविश्वास असावा. कारण तो त्यांनी छापील पुस्तकाच्या स्वरूपातच पुणे विद्यापीठाला सादर केला, आणि तो विद्यापीठाकडून संमतही करण्यात आला. ‘ग्रंथप्रकाशन’ या विषयावर पीएच.डी. करणारे पहिले प्रकाशक असा या प्रबंधाने लिमये यांना नावलौकिक मिळवून दिला.
 
मराठी भाषेतील पहिले छापील पुस्तक 1805 साली बंगालमधील सेरामपूर येथे विल्यम कॅरी या पादऱ्याने छापले. तिथपासून मराठी पुस्तकांच्या छपाईला सुरुवात झाली. त्यामुळे लिमये यांनी आपल्या वरील पुस्तकात 1805 ते 1900 या पहिल्या जवळपास 100 वर्षाचा मराठी ग्रंथप्रकाशनाच्या वाटचालीचा मागोवा घेतला आहे.
प्रकाशकांच्या प्रेरणा काय होत्या, त्यासाठी त्यांनी कुठल्या परंपरा आधारभूत मानल्या, मराठी प्रकाशनाचे या काळात कुठले प्रधान हेतू राहिले, ग्रंथप्रकाशनाचा हा व्यवहार, प्रचार आणि प्रसार कसा झाला याचाही सविस्तर आढावा लिमये यांनी घेतल्यामुळे या पुस्तकाला मराठी प्रकाशनव्यवहाराच्या संदर्भात खूपच महत्त्व आहे. कारण मराठी ग्रंथप्रकाशनाचा इतिहास लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता.
 
लिमये यांच्यानंतर दोन वर्षानी शं. गो. तुळपुळे यांचे ‘मराठी ग्रंथनिर्मितीची वाटचाल’ हे पुस्तक पुण्याच्या ग्रंथोत्तेजक सभेने प्रकाशित केले. यामध्ये मराठी प्रकाशनांचा त्यांच्या कामगिरीनुसार आणि पुस्तकसंख्येनुसार काहीसा क्रमश: इतिहास कथन केला आहे. खाजगी प्रकाशकांव्यतिरिक्त साहित्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था या सरकारी संस्थांच्या ग्रंथनिर्मितीबरोबरच साहित्य अकादेमी, नॅशनल बुक ट्रस्ट या निमसरकारी संस्थांच्या पुस्तक प्रकाशनांच्या प्रयत्नांपर्यंत वाटचाल रेखाटली आहे. या पुस्तकानंतर मात्र असे काही प्रयत्न झाले नाहीत. 2005 साली मराठी ग्रंथप्रकाशनांच्या सुरुवातीला 200 वर्षे झाली. तेव्हा मात्र ज्येष्ठ प्रकाशक शरद गोगटे यांनी या 200 वर्षातील मराठी ग्रंथप्रकाशनांचा इतिहास लिहायला घेतला. तो 2008 साली ‘मराठी ग्रंथप्रकाशनाची 200 वर्षे’ या नावाने प्रकाशित झाला.
 
याचा अर्थ गेल्या 200 वर्षात ग्रंथप्रकाशनाचा इतिहास लिहिण्याचे केवळ तीनच प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे या तिन्ही पुस्तकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि  लिमये यांच्या पुस्तकाचे तर विशेष महत्त्व आहे. पण या पुस्तकामध्ये त्यांच्या आठवणी सांगण्यावरच भर दिला असल्याने गोगटे वगळता या बाजूचा इतर कुणी फारसा विचारच केला नाही.
 
त्यामुळे यातील इतर लेखांचे स्वरूप जुजबी आठवणी असेच आहे. सदानंद-रामदास भटकळ यांनीही वैयक्तिकच आठवणी सांगितल्या आहेत. लिमये ‘शापित गंधर्व’ असल्याने आणि आता त्यांच्या निधनाला 36-37 वर्षे झाल्याने त्यांच्याविषयी फार मोठे पुस्तक वाचण्यात कुणाला स्वारस्य वाटेल, असा विचार करून 119 पानांचे पुस्तक तयार केले असावे. मात्र त्यात तब्बल 24 लेख आणि प्रस्तावना यांचा समावेश आहे. यावरून त्यातील लेखांची लांबी-रुंदी आणि व्याप्ती कुणाच्याही लक्षात येईल. शरद गोगटे यांचा 13 पानी लेख वगळता इतर सर्व लेख दोन-तीन पानांचेच आहेत. याउलट गोगटे यांच्यासारखे पाच-सहाच अभ्यासपूर्ण लेख घेतले असते तर पुस्तक चांगले झाले असते. पण तसे न झाल्याने हे पुस्तक पुन्हा मर्यादित वाचकांपर्यंतच राहण्याची शक्यता आहे. पण आजवर खूपच कमी मराठी प्रकाशकांनी आपली आत्मचरित्रं लिहिली आहेत, त्यांची चरित्रं तर त्याहून कमी लिहिली गेली. गौरवग्रंथ-स्मृतिग्रंथांची संख्याही जेमतेम आहे. त्यामुळे भविष्यात कधी कुणाला मराठी ग्रंथप्रकाशनांचा तपशीलवार इतिहास लिहायची इच्छा झालीच, तर त्याच्यापुढे संदर्भ साधनांची मोठीच अडचण उभी राहण्याची शक्यता आहे. सदानंद भटकळ, श्री. पु. भागवत, केशव भिकाजी ढवळे, रा. ज. देशमुख, केशवराव कोठावळे यांनी आपली आत्मचरित्रं लिहिली असती तर तो भावी पिढय़ांसाठी उत्तम दस्ताऐवज होऊ शकला असता आणि सध्याच्या प्रकाशकांसाठी तो मार्गदर्शक झाला असता. मौखिक इतिहासापेक्षा ग्रथित इतिहासाचे दडपण मोठे असते. तसे दडपण नंतरच्या पिढय़ांवर येण्यासाठी इतिहासाचे दस्तऐवजीकरण करायचे असते, पण हे मराठी ग्रंथ प्रकाशकांच्या आधीच्या पिढय़ांनी लक्षात घेतले नाही. त्यामुळे बरेच नुकसान झाले आहे. ‘ग्रंथ प्रकाशक आणि ग्रंथ विक्रेते या समाजाच्या सांस्कृतिक आणि ज्ञानात्मक गरजा भागवणा-या संस्था असतात’ असे श्रीपुंनी 1987 साली म्हटले होते.
पण त्या दृष्टीने मराठी प्रकाशकांनी पावले उचलली नाहीत आणि इतरांनी श्रीपुंचे ते विधान पुरेशा गांभीर्याने घेतले नाही. परिणामी मराठी ग्रंथ व्यवसायाचे जे व्हायचे तेच झाले, होत आहे. स्वत:च्या सांस्कृतिक कामाची नीट मांडणी करण्याची जबाबदारी प्रकाशकांना इतरांवर टाकून चालणार नाही, हे त्यांना कधीतरी लक्षात घ्यावेच लागेल. तो दिवस त्यांच्यासाठीचाच सुदिन असेल. अनंतराव यांच्या या पुस्तकाच्या निमित्ताने तेवढे तरी त्यांच्या लक्षात आले तरी पुष्कळ झाले. 
जिद्दी अनंतराव-प्रवास एका ग्रंथव्यावसायिकाचा :
संकलक सुरेश नवरे, व्हीनस बुक स्टॉल, पुणे
पाने : 119, किंमत : 100 रुपये

2 comments:

  1. अभ्यासपूर्ण अतिशय महत्वाचा लेख. थँक्स.

    ReplyDelete
  2. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती.. मला हे पुस्तक शिवाय लेखात उल्लेख असलेली दोन्ही पुस्तकेही हवी आहेत.. कशी मिळतील कृपया मार्गदर्शन करावे.. प्रा डाॅ सायली आचार्य नाशिक संपर्क - 8421382083

    ReplyDelete