Sunday, December 25, 2011

ग्रेस यांच्याकडे कसे पहावे?

सतरा डिसेंबरची संध्याकाळ नागपूरकरांसाठी एक ग्रेसफुल संध्याकाळ होती. नाटककार महेश एलकुंचवार आणि कविवर्य ग्रेस या नागपूरकरांच्या दोन्ही आवडत्या व्यक्ती एकाच व्यासपीठावर होत्या. थेट समोरासमोर. निमित्त होते, ग्रेस यांच्या विदर्भ भूषण पुरस्काराचं. त्यामुळे एलकुंचवार ग्रेस यांच्याविषयी काय बोलतात याची सर्वाना उत्सूकता होती. आणि आपल्या बोलण्यावर ग्रेस यांची काय प्रतिक्रिया येईल, याचा अदमास स्वत: एलकुंचवारही घेत असावेत. कारण हे दोन्ही सारस्वत नागपुरात राहत असले, दोघेही नागपूरकरांचे लाडके असले तरी या दोघांमध्ये काहीसं शीतयुद्ध आहे असे बोलले जाते. त्यात हे दोघंही तसे कधी काय बोलतील आणि त्यांचं कधी बिनसेल याचा भरवसा नसलेले साहित्यिक. त्यात एलकुंचवारांनी ग्रेसविषयी बोलायचं आणि त्याला प्रत्यक्ष ग्रेस हजर असणार!

एलकुंचवारांचं त्यादिवशीचं भाषण ज्यांनी ऐकलं असेल त्यांना क्षणभर नक्कीच त्यांची तारीफ केली असेल. ग्रेस यांच्या कवितेविषयी आणि त्यांच्या ललितलेखनाविषयी फारसं काही भाष्य न करता एलकुंचवारांनी ग्रेस यांच्याकडे कसं पाहावं यावरच जास्त बोलणं पसंत केलं. ते म्हणाले, ‘‘ग्रेस यांच्या कवितेत खोल-अतिखोल दु:ख आहे. मात्र या तात्कालिक, व्यावहारिक दु:खाबद्दल ग्रेस बोलत नाहीत. ते बोलतात अनाम आणि मानवजातीच्या अथांग दु:खाबद्दल. ग्रेस ही मराठी साहित्यातील एक अलौकिक घटना आहे. त्यांची कविता अनुकरणीय नाही. म्हणूनच सामर्थ्य असेल तर त्यांची कविता पचवावी अन्यथा त्यांच्या कवितेला शरण जावे. ज्याला अस्वस्थ होता येत नाही, त्याने ग्रेस यांची कविता वाचू नये.’’
 
यात थोडी हुशारी आहे, थोडं शहाणपणही आहे आणि थोडं सत्यही आहे. खरं तर एलकुंचवार यांनी काहीच नवीन सांगितलेलं नाही. पण त्यांनी ‘सामर्थ्य असेल तर त्यांची कविता पचवावी अन्यथा त्यांच्या कवितेला शरण जावे’ असं जे म्हटले आहे, ते मात्र नक्कीच विचारणीय आहे. जगप्रसिद्ध तत्त्वज्ञ नित्शे यांनी म्हटलं आहे, ‘‘चांगली पुस्तकं वाचताना लेखकाबरोबरचे मतभेद शोधले पाहिजेत,’’ तर दुसरे जगप्रसिद्ध तत्त्वज्ञ थोरो यांनी म्हटलं आहे, ‘‘ग्रंथ ज्या हेतुपुरस्सरतेने आणि संयमाने लिहिले जातात, तितक्याच हेतुपुरस्सरतेने आणि संयमाने ते वाचले गेले पाहिजेत ’’ नित्शे आणि थोरो यांच्या विधानांचा उत्तरार्थ जवळपास सारखाच आहे. चांगल्या पुस्तक वाचण्याच्या या पूर्वअटीच असतात. ते संयमानं आणि त्यामागचा हेतू जाणून घेऊनच वाचायला हवं आणि वाचून झाल्यावर लेखकाबरोबरचे मतभेदही शोधायला हवेत. पण हे होणार कधी? जर संबंधित विषयात आपलीही लेखकाएवढीच मातब्बरी असेल तर...

 मराठीतलं यच्चयावत समीक्षालेखन पहा. प्रत्येकाचा वकुब त्यात ठसठशीतपणे ठळक होत राहतो. प्रत्येकाची गृहितकं वेगळी आणि अभ्यासही तुटपुंजा. शिवाय स्वत:ची मतं कोणत्याही पूर्वग्रहानं दूषित न होऊ देण्याएवढंही शहाणपण अनेकांकडे नाही. त्यामुळे त्यामध्ये त्यांच्या त्यांच्या पूर्वग्रहांची प्रतिबिंबं डोकावत राहतात.
 
मुळात ग्रेस हे मराठीतले एक अलौकिक प्रतिभेचे कवी आणि ललित लेखक आहेत. त्यांच्यावर दुबरेधतेचा शिक्का तर अनेकवार मारून झाला आहे. ग्रेस यांचं लेखन आपल्या आवाक्यात येत नाही आणि ते आपल्याला समजलंच पाहिजे तोवर माघार नाही, असं कुणी इरेलाही पडत नाही, त्यामुळे ग्रेसची पुरेशी व्यवस्थित समीक्षाच झालेली नाही. यथायोग्य समीक्षा ही तर दूरची गोष्ट झाली. ग्रेस आत्मलुब्ध कवी आहेत, गूढवादी आहेत, सौंदर्यवादी आहेत, अशा विशेषणांपलीकडे जाण्याची गरज कोणाला वाटत नाही. तर दुसरीकडे ग्रेस यांना स्वत:बद्दलच अनिवार प्रेम आणि इतरांच्या प्रतिक्रियेबद्दल बेदरकार कोरडेपणा असल्यामुळे ते त्याची पर्वाही करत नाहीत. ‘आलात तर तुमच्यासह नाहीतर तुमच्याशिवाय’ असा त्यांचा बाणा असावा बहुतेक!
 
..तर असा हा तिढा आहे. तो सोडवायचा कसा?  काही लोक पारलौकिक सुखाच्या गोष्टी करत असतात, तसे ग्रेस पारलौकिक दु:खाच्या गोष्टी करतात. शिवाय त्यांची प्रतिमासृष्टी गहनगूढाच्या पातळीवर जाते. त्यांच्या प्रतिमा तरल आणि उत्कट नसतात, त्या जाणिवेच्या तीव्रतर पातळीवर जाणाऱ्या असतात. ज्यांची आपण कल्पनाही केलेली नसते, त्या विश्वाच्या अद्भुततेवर ग्रेस जातात. तिथपर्यंत जाणं वाचकाला शक्य होत नाही आणि वाचकाचा हात धरून त्याला आपल्या कवितेच्या गाभ्याबरोबर नाही, पण निदान कवितेबरोबर तरी न्यावं याकडे ग्रेस कधी लक्ष देत नाहीत. तरीही ग्रेस यांच्याभोवती एक आकर्षणाचं आणि आदराचं वलय आहेच. एखाद्या अनोळखी साधुपुरुषाबद्दल असावं तसं! ग्रेस हे संध्यामग्न कवी-ललित लेखक आहेत. त्याची लक्षणं समजून घेतल्याशिवाय त्यांना समजून घेता येणार नाही, ते समजणारही नाहीत.
 
काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव म्हणाले होते, ‘उत्तम कलाकृती वाचताना तिला शरण गेलं पाहिजे.’ म्हणजे नित्शे, थोरो, जाधव आणि एलकुंचवार या चौघांच्या विधानाचा लसाविमसावि साधारणपणे सारखाच आहे. ही कसोटी ग्रेस यांच्या कविता आणि ललितलेखांना लावून पाहिली तर काय होईल? मुळात ती लावता येईल का? ग्रेस यांची पुस्तके उत्तम कलाकृती वा चांगली पुस्तकं म्हणावीत काय? असे प्रश्नोपनिषद सुरू होईल. पण हा प्रश्न तात्पुरता बाजूला ठेवून हीच कसोटी लावून ग्रेस समजून घ्यायचा प्रयत्न केला तर काहीतरी सूत्र नक्कीच हाती लागण्याची दाट शक्यता आहे.
 
शिवाय ग्रेस यांच्या कविता आणि ललितलेखनाची भाषा पाहिली की, कुणीही जाणकार वाचक थक्क होत असणार. हे भाषा वैभव मराठीचंच आहे का, असा प्रश्न त्याला पडत असणार. भाषेच्या अक्षांक्ष-रेखांक्षच्या क्षितिजात जे जे काही होऊ शकते, त्या सा-या शक्यता ग्रेस यांच्या लेखनात पणाला लागलेल्या दिसतात. दिग्दर्शक म्हणून पं. सत्यदेव दुबे आणि कादंबरीकार म्हणून श्याम मनोहर हाच प्रयोग कमी-अधिक फरकाने अनेक र्वष करत आले आहेत. त्याअनुषंगानंही ग्रेस यांच्या लेखनाकडे पाहायला हवं.

 ग्रेस यांना उशिरा का होईना, साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यानिमित्तानं तरी ग्रेस यांच्याबद्दल अब्रुदार, समंजस आणि पूर्वग्रहांपलीकडे जाऊन विचार करायला हवा.

1 comment:

  1. you are right when you say that there are few critics in Marathi who have understood and appreciated or in some crude sense, evaluated Grace's poetry and prose. G.A.Kulkarni, an artist who belonged to Grace's heritage, has in some sense develped a critique of Grace's writings in his letters to Grace. These letters are now published.

    ReplyDelete