Sunday, December 25, 2011

दुबे द कॅटलिस्ट

दुबेंचा जन्म मध्य प्रदेशातील बिलासपूरचा. तिथल्या म्युनिसिपल शाळेत त्यांचं शिक्षण झालं. ते पाच वर्षाचे असतानाच त्यांची आई वारली. मग वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी नागपूरला पाठवलं. तिथं ते अँग्लो-इंडियन कुटुंबात राहिले. पण काही दिवसांनी परत बिलासपूरला गेले. तिथे शाळेत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला. त्यांच्याशी ते जोडले गेले. वयाच्या बावीसाव्या वर्षी इंटर झालं आणि दुबेंनी मुंबईला प्रस्थान ठेवलं. त्यांना क्रिकेटमध्ये करिअर करायचं होतं! झेविअर्स कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. कॉलेजच्या क्रिकेट टीममध्ये त्यांची निवडही झाली. याच कॉलेजात दुबेंना विजय आनंद भेटला आणि दुबे नावाच्या स्कूलची पावलं नाटकाच्या दिशेनं पडायला लागली. विजय आनंदनं त्यांना स्वत:बरोबर न्यायला सुरुवात केली. बदली नट म्हणून कामंही मिळू लागली. मुंबईत तेव्हा भांगवाडीमध्ये गुजराती नाटकांची चळवळ मोठय़ा जोमात होती. तिथेही दुबे जायला लागले. तिथेच त्यांना पार्श्वनाथ आळतेकर भेटले. ते दुबेंचे नाटय़क्षेत्रातले पहिले गुरू. दुबेंचा तोतरेपणा आळतेकरांनी घालवला. एक दिवस विजय आनंद दुबेंना थिएटर युनिटमध्ये घेऊन गेले. तिथं तेव्हा इब्राहीम अल्काझी आणि पी. डी. शेणॉय हे दोन स्टॉलवर्ट होते. दुबेंनी अल्काझींकडून नाटकाच्या कोरिओग्राफीचे धडे गिरवले.
 
नाटकाच्या अक्षांश-रेखांशमध्ये जे जे काही करता येणं शक्य आहे, आणि त्याच्या जेवढय़ा म्हणून शक्यता आहेत, त्या पणाला लावून पाहणारा दुबे हा दिग्दर्शक होता. मग ते सात्र्चं नो एक्झिटअसेल, धर्मवीर भारतींचं अंधायुगअसेल, बादल सरकारांचं वल्लभपूरची दंतकथा’, महेश एलकुंचवारांचं गाबरे’, ज्याँ अनुईचं अँटिगनी’, मोहन राकेश यांचं आधे अधुरेअसेल किंवा विजय तेंडुलकरांचं खामोश! अदालत जारी है’.. दुबेंनी केलेल्या प्रत्येक नाटकात हे दिसेल. श्याम मनोहर हे कादंबरीचे अक्षांश-रेखांश पणाला लावू पाहणारे कादंबरीकार. त्यांची नाटककार अशी ओळख दुबेंमुळेच झाली. दुबे साहित्य सहवासमध्ये राहत. एकदा त्यांची कवी दिलीप चित्रे यांच्याशी ओळख झाली. चित्रेंनी त्यांना मनोहरांचं नाटक सुचवलं. पण ते वाचल्यावर दुबे म्हणाले, ‘कशासाठी करायचं मी हे?’ चित्रेही तेवढेच खटनट. ते दुबेंना म्हणाले, ‘यू स्टार्ट फ्रॉम एंड.चित्र्यांच्या नावावर एवढा एकच विध्वंस जमा असला तरी दुबेंच्या नावे मात्र असे कैक विध्वंस जमा आहेत. नाटककाराच्या नाटकाची वासलात कशी लावायची हे दुबे पूरेपूर जाणत आणि आपल्या पद्धतीने ते त्याची स्टार्ट फ्रॉम दि एंडकिंवा स्टार्ट फ्रॉम इन बिट्वीनअशी कशीही मांडणी करू शकत, नव्हे करतच. त्यासाठी नाटककाराशी भांडत. वर सांगत, ‘नाटककाराचं नाटक त्याच्यापेक्षा मला जास्त समजतं.आणि दुबेंचं हे म्हणणं खरंच होतं. नाटकाचा प्रयोगाच्या दृष्टीनं विचार दुबे ज्या शक्यतांनिशी करत, तो तेच करू जाणोत! याबाबतीत (तेंडुलकरांनंतर) ते कमालीचे वाकबगार होते.
 
दुबे हा माणूस स्टॉलवर्ट होता. त्यामुळे त्यांनी नाटकंही स्टॉलवर्ट लोकांचीच केली. धर्मवीर भारती, विजय तेंडुलकर, गो. पु. देशपांडे, बादल सरकार, मोहन राकेश, गिरीश कार्नाड, महेश एलकुंचवार हे त्यांचे नाटककार; तर डॉ. श्रीराम लागू, अमरिश पुरी, नसिरुद्दीन शाह, रत्ना पाठक, भक्ती बर्वे, सुलभा देशपांडे, विहंग नायक, किशोर कदम, सोनाली कुलकर्णी हे त्यांचे नट. पण दुबे विशी-पंचविशीतल्या मुला-मुलींबरोबरही तेवढय़ाच तन्मयेतनं नाटक करत. तरुणांचा त्यांच्या भोवती कायम गराडा असे, विशेषत: मुलींचा.
 
गिधाडेया विजय तेंडुलकरांच्या नाटकानं एकेकाळी महाराष्ट्रात मोठी खळबळ माजवली होती. सेन्सॉर बोर्डानं या नाटकातल्या गर्भपाताच्या लाल डागावर आणि अन्यकाही गोष्टींवर आक्षेप घेतल्यावर डॉ. लागूंपासून नाटय़क्षेत्रातल्या संबंधितांनी सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात आघाडी उघडली होती. तेव्हा दुबेंनी डॉ. लागूंना सुचवलं की, नाटकाच्या सुरुवातीला प्रेक्षकांना सूचना करायची - आम्ही निळा डाग दाखवतो आहोत. तो लाल आहे असं प्रेक्षकांनी समजावं.त्यानुसार डॉ. लागूंनी ती सूचना देऊन नाटकाचे प्रयोग केले. कायद्याची लढाई कायद्यानंच लढली पाहिजे, पण ती लढतानाही आपल्या विरोधकांना सभ्यपणानं कसं हास्यास्पद ठरवता येतं, याचं इतकं उत्तम उदाहरण दुसरं कुठलं असणार!
 
दुबे हे तीन अंकी गुरुकुल आहे’, ‘दुबे हा स्कूल ऑफ थॉट आहे’, ‘दुबे इज अ‍ॅन इन्स्टिटय़ूशनअसं काहीही म्हणण्यात अर्थ नाही. कारण दुबे आता आपल्यात नसले तरी ते जिथे कुठे असतील तिथून आपल्याला मूर्खात काढणार. कारण संस्था वा संस्थान म्हटलं की, फॅसिझमला सुरुवात होते असं त्यांचं म्हणणं होतं. दुबे आक्रमकपणे, चढेलपणे आणि कधी कधी विक्षिप्तपणे वागत असले तरी ते पूर्णपणे लोकशाहीवादी होते, हे मात्र निर्विवाद सत्य आहे. यावर त्यांच्या मित्रांचं, शिष्यांचं, समकालीनांचं आणि  शत्रूंचंही एकमत होईल.
 
दुबेंनी हिंदी, गुजराती, इंग्रजी आणि मराठी अशा चारही भाषांमध्ये नाटकांचं दिग्दर्शन केलं. अनेक नाटकांचे इंग्रजीतून अनुवाद केले. त्यांचे प्रयोग केले. चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आणि नाटकांमध्येही काम केलं. याचवर्षी नाटय़समीक्षक शांता गोखले यांनी सत्यदेव दुबे : अ फिप्टी इअर जर्नी थ्रु थिएटरहे दुबेंवरील पुस्तक संपादित केलं आहे. त्यात प्रत्येक दशकानुसार विभाग करून दिग्दर्शक, अभिनेता, नाटय़शिक्षक, नाटककार अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वावरणा-या दुबेंचा सर्वागीण आणि तपशीलवार आढावा घेतला आहे. साठच्या दशकात दुबेंच्या नाटय़कारकिर्दीला सुरुवात झाली. साठ आणि सत्तरच्या दशकातील हिंदी, बंगाली, कन्नड आणि मराठी रंगभूमीवर दुबेंनी उलथापालथ घडवली. दिग्दर्शक म्हणून नाटकाचा अतिशय सखोलपणे विचार करण्याची आणि नाटककाराच्याही लक्षात येणार नाहीत अशा संहितेतील अनेक शक्यता आजमावून पाहण्याची दृष्टी दुबेंकडे होती.
 
दुबेंनी मराठी नाटकातली अध्र्यापेक्षा जास्त माणसं घडवली. नाटय़लेखन कार्यशाळा/नाटय़शिबिरं घेऊन अनेक तरुण रंगकर्मीना घडवलं. त्यांच्या कारकिर्दीला दिशा दिली. त्यांच्यामध्ये रंगभूमीकडे आणि अभिनयाकडे गंभीरपणे पाहण्याची दृष्टी रुजवली. सतत नवे नवे प्रयोग करून पाहिले. नाटककारांना स्फूर्ती दिली. त्यांच्यातील सामर्थ्ये त्यांनाच उलगडून दाखवली. म्हणून नाटकानं झपाटलेल्या दुबेंचं वर्णन एकाच शब्दात करायला हवं. ते म्हणजे, दुबे द कॅटलिस्ट. गेल्या पाच दशकांमध्ये भारतीय रंगभूमीवर जी काही उलथापालथ घडवून आली, जे काही प्रयोग झाले, जे काही तरुण नाटककार, तरुण नाटय़कर्मी पुढे आले, त्यातल्या बहुतेकांचे दुबे हे कॅटलिस्ट होते, उत्प्रेरक होते. विज्ञानात समीकरणं घडून यायला कॅटलिस्ट लागतो, तो नसेल तर ते घडून येत नाही. भारतीय रंगभूमीवर तीच भूमिका पं. सत्यदेव दुबे यांनी निभावली आहे.

ग्रेस यांच्याकडे कसे पहावे?

सतरा डिसेंबरची संध्याकाळ नागपूरकरांसाठी एक ग्रेसफुल संध्याकाळ होती. नाटककार महेश एलकुंचवार आणि कविवर्य ग्रेस या नागपूरकरांच्या दोन्ही आवडत्या व्यक्ती एकाच व्यासपीठावर होत्या. थेट समोरासमोर. निमित्त होते, ग्रेस यांच्या विदर्भ भूषण पुरस्काराचं. त्यामुळे एलकुंचवार ग्रेस यांच्याविषयी काय बोलतात याची सर्वाना उत्सूकता होती. आणि आपल्या बोलण्यावर ग्रेस यांची काय प्रतिक्रिया येईल, याचा अदमास स्वत: एलकुंचवारही घेत असावेत. कारण हे दोन्ही सारस्वत नागपुरात राहत असले, दोघेही नागपूरकरांचे लाडके असले तरी या दोघांमध्ये काहीसं शीतयुद्ध आहे असे बोलले जाते. त्यात हे दोघंही तसे कधी काय बोलतील आणि त्यांचं कधी बिनसेल याचा भरवसा नसलेले साहित्यिक. त्यात एलकुंचवारांनी ग्रेसविषयी बोलायचं आणि त्याला प्रत्यक्ष ग्रेस हजर असणार!

एलकुंचवारांचं त्यादिवशीचं भाषण ज्यांनी ऐकलं असेल त्यांना क्षणभर नक्कीच त्यांची तारीफ केली असेल. ग्रेस यांच्या कवितेविषयी आणि त्यांच्या ललितलेखनाविषयी फारसं काही भाष्य न करता एलकुंचवारांनी ग्रेस यांच्याकडे कसं पाहावं यावरच जास्त बोलणं पसंत केलं. ते म्हणाले, ‘‘ग्रेस यांच्या कवितेत खोल-अतिखोल दु:ख आहे. मात्र या तात्कालिक, व्यावहारिक दु:खाबद्दल ग्रेस बोलत नाहीत. ते बोलतात अनाम आणि मानवजातीच्या अथांग दु:खाबद्दल. ग्रेस ही मराठी साहित्यातील एक अलौकिक घटना आहे. त्यांची कविता अनुकरणीय नाही. म्हणूनच सामर्थ्य असेल तर त्यांची कविता पचवावी अन्यथा त्यांच्या कवितेला शरण जावे. ज्याला अस्वस्थ होता येत नाही, त्याने ग्रेस यांची कविता वाचू नये.’’
 
यात थोडी हुशारी आहे, थोडं शहाणपणही आहे आणि थोडं सत्यही आहे. खरं तर एलकुंचवार यांनी काहीच नवीन सांगितलेलं नाही. पण त्यांनी ‘सामर्थ्य असेल तर त्यांची कविता पचवावी अन्यथा त्यांच्या कवितेला शरण जावे’ असं जे म्हटले आहे, ते मात्र नक्कीच विचारणीय आहे. जगप्रसिद्ध तत्त्वज्ञ नित्शे यांनी म्हटलं आहे, ‘‘चांगली पुस्तकं वाचताना लेखकाबरोबरचे मतभेद शोधले पाहिजेत,’’ तर दुसरे जगप्रसिद्ध तत्त्वज्ञ थोरो यांनी म्हटलं आहे, ‘‘ग्रंथ ज्या हेतुपुरस्सरतेने आणि संयमाने लिहिले जातात, तितक्याच हेतुपुरस्सरतेने आणि संयमाने ते वाचले गेले पाहिजेत ’’ नित्शे आणि थोरो यांच्या विधानांचा उत्तरार्थ जवळपास सारखाच आहे. चांगल्या पुस्तक वाचण्याच्या या पूर्वअटीच असतात. ते संयमानं आणि त्यामागचा हेतू जाणून घेऊनच वाचायला हवं आणि वाचून झाल्यावर लेखकाबरोबरचे मतभेदही शोधायला हवेत. पण हे होणार कधी? जर संबंधित विषयात आपलीही लेखकाएवढीच मातब्बरी असेल तर...

 मराठीतलं यच्चयावत समीक्षालेखन पहा. प्रत्येकाचा वकुब त्यात ठसठशीतपणे ठळक होत राहतो. प्रत्येकाची गृहितकं वेगळी आणि अभ्यासही तुटपुंजा. शिवाय स्वत:ची मतं कोणत्याही पूर्वग्रहानं दूषित न होऊ देण्याएवढंही शहाणपण अनेकांकडे नाही. त्यामुळे त्यामध्ये त्यांच्या त्यांच्या पूर्वग्रहांची प्रतिबिंबं डोकावत राहतात.
 
मुळात ग्रेस हे मराठीतले एक अलौकिक प्रतिभेचे कवी आणि ललित लेखक आहेत. त्यांच्यावर दुबरेधतेचा शिक्का तर अनेकवार मारून झाला आहे. ग्रेस यांचं लेखन आपल्या आवाक्यात येत नाही आणि ते आपल्याला समजलंच पाहिजे तोवर माघार नाही, असं कुणी इरेलाही पडत नाही, त्यामुळे ग्रेसची पुरेशी व्यवस्थित समीक्षाच झालेली नाही. यथायोग्य समीक्षा ही तर दूरची गोष्ट झाली. ग्रेस आत्मलुब्ध कवी आहेत, गूढवादी आहेत, सौंदर्यवादी आहेत, अशा विशेषणांपलीकडे जाण्याची गरज कोणाला वाटत नाही. तर दुसरीकडे ग्रेस यांना स्वत:बद्दलच अनिवार प्रेम आणि इतरांच्या प्रतिक्रियेबद्दल बेदरकार कोरडेपणा असल्यामुळे ते त्याची पर्वाही करत नाहीत. ‘आलात तर तुमच्यासह नाहीतर तुमच्याशिवाय’ असा त्यांचा बाणा असावा बहुतेक!
 
..तर असा हा तिढा आहे. तो सोडवायचा कसा?  काही लोक पारलौकिक सुखाच्या गोष्टी करत असतात, तसे ग्रेस पारलौकिक दु:खाच्या गोष्टी करतात. शिवाय त्यांची प्रतिमासृष्टी गहनगूढाच्या पातळीवर जाते. त्यांच्या प्रतिमा तरल आणि उत्कट नसतात, त्या जाणिवेच्या तीव्रतर पातळीवर जाणाऱ्या असतात. ज्यांची आपण कल्पनाही केलेली नसते, त्या विश्वाच्या अद्भुततेवर ग्रेस जातात. तिथपर्यंत जाणं वाचकाला शक्य होत नाही आणि वाचकाचा हात धरून त्याला आपल्या कवितेच्या गाभ्याबरोबर नाही, पण निदान कवितेबरोबर तरी न्यावं याकडे ग्रेस कधी लक्ष देत नाहीत. तरीही ग्रेस यांच्याभोवती एक आकर्षणाचं आणि आदराचं वलय आहेच. एखाद्या अनोळखी साधुपुरुषाबद्दल असावं तसं! ग्रेस हे संध्यामग्न कवी-ललित लेखक आहेत. त्याची लक्षणं समजून घेतल्याशिवाय त्यांना समजून घेता येणार नाही, ते समजणारही नाहीत.
 
काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव म्हणाले होते, ‘उत्तम कलाकृती वाचताना तिला शरण गेलं पाहिजे.’ म्हणजे नित्शे, थोरो, जाधव आणि एलकुंचवार या चौघांच्या विधानाचा लसाविमसावि साधारणपणे सारखाच आहे. ही कसोटी ग्रेस यांच्या कविता आणि ललितलेखांना लावून पाहिली तर काय होईल? मुळात ती लावता येईल का? ग्रेस यांची पुस्तके उत्तम कलाकृती वा चांगली पुस्तकं म्हणावीत काय? असे प्रश्नोपनिषद सुरू होईल. पण हा प्रश्न तात्पुरता बाजूला ठेवून हीच कसोटी लावून ग्रेस समजून घ्यायचा प्रयत्न केला तर काहीतरी सूत्र नक्कीच हाती लागण्याची दाट शक्यता आहे.
 
शिवाय ग्रेस यांच्या कविता आणि ललितलेखनाची भाषा पाहिली की, कुणीही जाणकार वाचक थक्क होत असणार. हे भाषा वैभव मराठीचंच आहे का, असा प्रश्न त्याला पडत असणार. भाषेच्या अक्षांक्ष-रेखांक्षच्या क्षितिजात जे जे काही होऊ शकते, त्या सा-या शक्यता ग्रेस यांच्या लेखनात पणाला लागलेल्या दिसतात. दिग्दर्शक म्हणून पं. सत्यदेव दुबे आणि कादंबरीकार म्हणून श्याम मनोहर हाच प्रयोग कमी-अधिक फरकाने अनेक र्वष करत आले आहेत. त्याअनुषंगानंही ग्रेस यांच्या लेखनाकडे पाहायला हवं.

 ग्रेस यांना उशिरा का होईना, साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यानिमित्तानं तरी ग्रेस यांच्याबद्दल अब्रुदार, समंजस आणि पूर्वग्रहांपलीकडे जाऊन विचार करायला हवा.

Thursday, December 22, 2011

त्या नांव ग्रंथ

वर्षाची अखेर आणि नववर्षारंभ हा काळ साहित्यक्षेत्रातील चैतन्याचा असतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड, साहित्य अकादमीचे पुरस्कार, दमाणी पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशनचे पुरस्कार, 26 जानेवारी रोजी जाहीर होणारे पद्मसन्मान मागेपुढे जाहीर होतात. साहित्य अकादमीचे पुरस्कार तर 24 भारतीय भाषांतील लेखकांना दिले जातात. नुकत्याच जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये 20 भाषांचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. आठ पुरस्कार कवितासंग्रहांना, सात कादंब-यांना, तीन निबंधांना, एक कथासंग्रहाला, एक इतिहासाला, एक नाटकाला आणि एक आत्मचरित्राला जाहीर झाला आहे. म्हणजे, सर्जनशील लेखनाचाच पुरस्कारांसाठी प्रामुख्याने विचार केला गेला आहे. निवड समितीच्या सदस्यांमध्ये प्रामुख्याने सर्जनशील लेखकच असतात, हे याचे कारण असावे. त्यामुळेच यंदा रामचंद्र गुहा यांच्या इंडिया आफ्टर गांधीया इतिहासलेखनाला मिळालेला पुरस्कार सर्वार्थाने वेगळा ठरतो. भारतीय भाषांमध्ये वैचारिक लेखन होतच नसावे किंवा होत असेल तर ते पुरस्काराच्या गुणवत्तेचे नसावे! मराठीमध्ये तर गेली काही वर्षे वैचारिक लेखन म्हणजे गांधी, आंबेडकर, फुले, शाहू, टिळक, भांडवलवाद-समाजवाद, जातिवास्तव याच विषयावरील लेखन. म्हणजे भूतकाळाचंच पुनर्मूल्यांकन करण्यात सारी ऊर्जा खर्च केली जाते. आजच्या समाजवास्तवाचा वेध घेणारी, आजच्या समस्या-प्रश्नांची उकल करणारी पुस्तके मराठी आणि भारतीय भाषांमध्ये लिहिली जात नाहीत. एखाद्या पुस्तकाला वा लेखकाला पुरस्कार दिला जातो, याचा अर्थच असा असतो की, ते पुस्तक, तो लेखक  आणि त्याचा विचार आजच्या समाजासाठी उपयोगाचा आहे. इतकी साधी अपेक्षाही राष्ट्रीय पातळीवरच्या पुरस्कारांमधूनही पूर्ण होताना दिसत नाही. आज कधी नव्हे इतकी वैचारिक मंथनाची-घुसळणीची भारतीय समाजाला नितांत गरज आहे. कारण, त्यातूनच समाजाला आपल्यापुढील आणि देशापुढील आव्हानांना समजून घेता येते. त्यांचा योग्य अन्वयार्थ लावता येतो. सामाजिक उत्तरदायित्वासाठी भूतकाळाचा डिंडिम वाजवून निभत नाही. त्यासाठी वर्तमानाची पालखी उचलावी लागते. ही जबाबदारी सुशिक्षित आणि बुद्धिवादी वर्गावरच असते. हा वर्ग सर्वकाळ संख्येने छोटाच असतो. त्याला उद्देशूनच तर कविवर्य केशवसुतांनी म्हटले आहे की, ‘प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणीत तयात खोदा, निजनामे वरीती नोंदा’. आणि केशवसुतांच्याही कितीतरी आधी समर्थ रामदासांनी म्हणून ठेवले आहे, जेणें धारिष्ट चढे, जेणें परोपकार घडे, जेणें विषयवासना मोडे, त्या नांव ग्रंथ’.

Monday, December 12, 2011

प्रसन्न खुमासदारी!

जगातली कुठलीही कला रीतसर शिकता येते, तिचे प्रशिक्षण घेता येते. पण त्यात वाखाणण्याजोगी प्रगती करता येईल की नाही याबाबत कुणीच ठामपणे काही सांगू शकत नाही. मिरांडा आणि त्यांचे एकेकाळचे सहकारी आर. के. लक्ष्मण यांनी जे.जे.चीच काय पण कुठल्याच चित्रकलावर्गाची शिकवणी लावली नव्हती. पण तरीही त्यांनी व्यंगचित्रकार म्हणून जो लौकिक मिळाला तो अपूर्व असाच आहे. मिरांडा हे तर प्रसन्नतेचे आणि खुमासदारपणाचे स्वामी होते. त्यांनी भारतीय चित्रांच्या शैलीमध्ये बदल घडवून आणला, चित्रे आणि व्यंगचित्रे या दोन्हींमध्ये.
मिरांडांची कुठलीही चित्रे घ्या. त्यातून ते काही सांगू पाहत आहेत, सुचवू पाहत आहेत असे फारसे दिसत नाही; तर जे जसे आहे ते तसे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्या चित्रातली झाडे असोत की, माणसे, इमारती असोत की वाहने, सर्व काही तपशीलानिशी, त्याच्या रंगरूपासह असते. त्यामुळे त्यांची चित्रे पाहणा-याला स्वत:कडे आकर्षून घेतात. प्रत्यक्ष त्या ठिकाणाचे दर्शन तर घडवतातच पण आपणही त्याच ठिकाणी आहोत असा फीलदेतात. अशी प्रसन्नता चित्रांत असण्यासाठी तुमचे आयुष्यही तसेच प्रसन्न असावे लागते. चला, आता आपण रस्त्यावरच्या भिका-यावर छान/वाचणा-यांचं मन हेलावून टाकणारी कविता लिहूअसे ठरवून लिहिता येत नाही, तसेच तशी चित्रेही काढता येत नाहीत. 
मिरांडा यांच्या चित्रांनी, त्यांच्या मिस्टर बंडलदास, निंबूपानी, मिस फॉन्सेका या पात्रांनी मोठी लोकप्रियता मिळवली होती, ती त्यांच्या अंगभूत वैशिष्टय़ांमुळे. ती स्वतंत्र व्यक्तिमत्त्वे होती. पण मिरांडांनी इतरांची सदरे, पुस्तके यांनाही प्रसन्न आणि खुमासदार करण्याचे काम केले आहे. राउण्ड अँड अबाउटया बिझी बीउर्फ बेहराम काँन्ट्रॅक्टर यांच्या वाचकप्रिय सदरासाठी मिरांडा यांनी बरीच वर्षं चित्रे काढली. विथ मॅलिस अँड टुवर्डस वन अँड ऑलया जवळपास सतरा भारतीय भाषांमध्ये सिंडिकेट होणा-या खुशवंतसिंग यांच्या सदराचं-विजेच्या दिव्यातील सरदार-हे बोधचिन्हही मिराडांनीच काढले होते. अलीकडेच हे सदर खुशवंतसिंग यांनी बंद केले, तेव्हा विजेच्या दिव्यातला सरदारआता भेटणार नाही या कल्पनेने अनेकांना चुकल्याचुकल्यासारखे झाले. ही मिरांडांच्या चित्राला मिळालेली मोठीच दाद मानायला हवी. 
मिरांडा मुंबईत असताना कुलाब्याला राहायचे. या त्यांच्या घरात पत्नीसह-मुलांसह कुत्रा, मांजर, कोंबडे, खार, चार कासवे आणि एक डुक्कर इतके लोक राहायचे. असा चित्रकार जगण्यावर आणि स्वत:च्या कलेवर उत्कटपणे प्रेम करणारा असणारच यात काही शंका नाही. कदाचित त्यामुळेच जगभर फिरलेले, जगभरातल्या तब्बल 22 देशांमध्ये स्वत:च्या चित्रांची प्रदर्शने भरवलेले मिरांडा स्वत:ला आय अ‍ॅम अ मेनली सोशल कार्टुनिस्टअसं म्हणवून घेत असत.

Sunday, December 11, 2011

तुम तो मेरे बच्चे हों

गोष्ट असेल 2003 ची. पदवी परीक्षा पास होऊन वर्षे झाले होते. एका साहित्यिक मासिकात काम करत होतो. मराठी पुस्तकं, वाङ्मयीन मासिकं यांचं वाचन करण्याचा झपाटा लावला होता. त्यात पुण्यात रोज कुठे ना कुठे काही तरी सांस्कृतिक-साहित्यिक कार्यक्रम होत असायचे. पुणे शहराचा सांस्कृतिक परीघ टिळक स्मारक मंदिर, भरत नाटय़ मंदिर आणि बालगंधर्व रंगमंदिर या वर्तुळात संपत असल्याने मजा होती. त्यामुळे रोज एक तरी कार्यक्रमाला जाण्याची आणि साहित्य-कला-संस्कृती या क्षेत्रातल्या एका तरी नव्या माणसाला भेटायची, त्यांच्याशी बोलायची संधी मिळत होती. त्यातल्या बहुतेकांची पुस्तके आधीच वाचलेली असत, काहींच्या मुलाखती वाचलेल्या असत, काहींबद्दल ऐकलेलं असे. त्यामुळे त्यांच्याशी दोन-पाच मिनिटं संवाद करता यायचा. शिवाय कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांच्याभोवती इतकी गर्दी असायची की, जास्त वेळही मिळायचा नाही. असे एकंदर बरे दिवस चाललेले होते.
 
माझा रूम पार्टनर एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता. हे हॉटेल विजयानगर कॉलनीतल्या मंगेशकर कुटुंबीयांच्या अपार्टमेंटच्या शेजारीच होते. त्यामुळे काही वेळा त्यांच्याकडे येणारे पाहुणे या हॉटेलमध्ये उतरत असत. एके दिवशी पार्टनर म्हणाला की, आमच्या हॉटेलमध्ये पद्मा सचदेव नावाच्या कश्मिरी लेखिका उतरल्या आहेत. त्यांचे नाव ऐकल्याबरोबर माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. त्यांना मंगेशकर कुटुंबीयांच्या वतीने दिला जाणारा वाङ्विलासिनी पुरस्कार मिळाल्याची बातमी नुकतीच वृत्तपत्रात वाचली होती. त्याआधीच्या आठवडय़ात साप्ताहिक लोकप्रभामध्ये निरंजन उजगरे यांनी सचदेव यांच्या एका कवितेचा मराठी अनुवाद केला होता. त्यात त्यांचा अल्पपरिचयही दिला होता. तेवढय़ावरून त्यांना भेटायची इच्छा निर्माण झाली. सचदेव मूळच्या काश्मीरच्या असल्या तरी हल्ली त्या दिल्लीमध्ये राहतात. त्यामुळे दिल्लीतल्या साहित्यिक वर्तुळाबद्दल माहिती कळेल असाही होरा होता. पण दुसरं मन सांगत होतं की, आपल्यासारख्या पोराला त्या एवढय़ा लेखिका कशाला भेटतील? आणि आपण काय बोलणार त्यांच्याशी? पण तरीही पार्टनरला म्हणालो, ‘मला त्यांना भेटता येईल का?’ तो म्हणाला, त्यांना विचारून सांगतो. पण मला काही खात्री नव्हती. पण दुस-या दिवशी पार्टनरचा फोन आला की, ‘अध्र्या तासात हॉटेलला ये. पद्माजी तुझी वाट पाहात आहेत.मी रेकॉर्डर घेऊन धावतपळत हॉटेलला गेलो. पार्टनर त्यांच्या खोलात गेऊन गेला. त्यांनी आमचं आनंदानं स्वागत केलं.
 
मला पाहून म्हणाल्या, ‘‘आप तो बडे नौजवान हो, दोस्त.
 
मी म्हणालो, ‘‘हां, अभी डिग्री पुरी की है और एक लिटररी मॅगझिन में काम कर रहा हूँ.’’
 
‘‘बडीं अच्छी बात है. लेकिन कुछ पढते हो या नहीं?’’
 मी म्हणालो, ‘‘पढते तो है. आपके कुछ आर्टिकल हमने साहित्य अकादेमी के समकालीन भारतीय साहित्यमें पढे है. कुछ कविताएँ भी पढी है.’’
यावर त्या खुलल्या. आणि सांगायला लागल्या की, मी मुंबई आकाशवाणीवर काम करत होते. त्यावेळी मराठीमध्ये प्रतिमा आणि प्रतिभाकार्यक्रम दूरदर्शनवर सादर होत असे. तो मी हिंदीमध्ये करत असते. धर्मयुगच्या धर्मवीर भारतींनी मला कसं कवितेकडून गद्य लिखाणाकडे वळवलं, इस्मत(चुगताई)आपाशी कसा संबंध आला, शांता शेळकेंशी कशी मैत्री झाली, मंगेशकर कुटुंबीयांबरोबरचे संबंध कसे जुळले, असं त्या बोलत राहिल्या. मी ते सारं रेकॉर्ड करत होतो.
 
अर्धा-पाऊण तास आमची प्रश्नोत्तरे चालली. पण मग आमच्याकडचे प्रश्न संपले. मात्र त्यांचा आमच्यासाठीचा वेळ संपलेला नव्हता. त्या म्हणायच्या, और पुछो. पण काय विचारणार आमच्याकडचे प्रश्न विचारून झाले होते. बरे त्यांच्या बोलण्यातून नवेनवे प्रश्न शोधून ते विचारण्याएवढी अक्कल तेव्हा नव्हती.
 
मी म्हणालो, ‘‘पद्माजी, आप की कौन कौन सी किताबें आई है?’’ उनके बारे में बताइयें. त्यांनी सांगितलं.
 
मग मी म्हणालो, ‘‘आपको कौन कौन से अ‍ॅवार्ड मिले है?’’ त्यांनी तेही सांगितलं.
 
थोडय़ा वेळाने त्यांच्या लक्षात आलं की, आम्हाला हिंदी आणि भारतीय साहित्यविश्वाची फारशी माहिती नाही. त्यातलं फारसं काही आम्ही वाचलेलं नाही.
 
पण पद्माजींचं मोठेपण असं की, त्यांनी मग आणखी तपशीलवार आणि खुलासेवार माहिती सांगायला सुरुवात केली. माझे एक शिक्षक सांगायचे की, पेपर कसा लिहायचा? तर तो तपासणा-याला त्या विषयातलं काहीही कळत नाही. तेव्हा त्याला नुसतं उत्तर वाचून तो विषय कळेल इतक्या सोप्या पद्धतीने ते लिहायचं. पद्माजी अगदी तसं आम्हाला हिंदी साहित्यविश्व-विशेषत: दिल्लीतलं साहित्यविश्व उलगडून दाखवत होत्या.
 
त्यांच्या वागण्या-बोलण्यात कमालीचा साधेपणा होता. तास-दीड तास गप्पा मारल्यावर त्या आम्हाला तीन मजले उतरून खाली सोडायला आल्या. कारण त्यांना लिफ्टची प्रचंड भीती वाटत असे. निघताना त्या म्हणाल्या, ‘‘तुम मेरे बच्चों जैसे हो. कभी कभी फोन किया करो.’’ त्यांनी आपलं व्हिजिंटिंग कार्ड दिलं. त्यावर फक्त त्यांचं नाव आणि दिल्लीचा पत्ता होता. दिल्लीला गेल्यावरही त्यांनी मला एक-दोनदा फोन केला. दोन वर्षानी पुण्यात आल्यावर मला पुन्हा बोलावून घेऊन माझी चौकशी केली.
 सांगायचं असं की, इतकी मोठी लेखिका नवख्या मुलांशी इतक्या आत्मीयतेनं वागू शकते, याचा इतका सुंदर अनुभव नंतर आजवर तरी मला पुन्हा आला नाही.

केवळ पुस्तकं वाचतो, म्हणून..

मी तेव्हा पुण्यात राहत होतो. सकाळ दैनिकाच्या जवळ असणा-या एका लस्सी, सँडविच आणि दही विकणा-या दुकानात काम करत होतो. तिथे सर्वात जास्त आजूबाजूचे आणि ‘सकाळ’मधील लोक येत. तिथल्या ताकाची चव चांगली होती. आणि विशेषत: अजिबात आंबट नसलेले दही मिळायचं. त्यामुळे दुकान तसं व्यवस्थित चालायचं. ‘सकाळ’मध्ये कँटीन होतं. पण दुपारच्या जेवणानंतर ताक प्यावंसं वाटणारे लोक तिथे आवर्जून ताक प्यायला येत. त्यांना हवे ते पदार्थ देऊन झाल्यावर आणि ब-याचदा त्यांना पदार्थ देताना माझ्या हातात पुस्तक असे. ते मी इतर वेळी वाचत बसलेला असे. लोक सँडविच खात गप्पा मारत बसत, त्यांचा तो निवांत वेळ असे काहीसा. पण मी मात्र त्यांच्याशी ओळख झाल्यावरही फारसा बोलत नसे. हातातलं पुस्तक वाचत असे. हळूहळू त्यातल्या काहींनी मी कुठलं पुस्तक वाचतोय ते विचारायला सुरुवात केली. मी त्यांना पुस्तक दाखवायला लागलो.

तेव्हा आचार्य जावडेकर, नरहर कुरंदकर, श्री. म. माटे, वा. म. जोशी यांची पुस्तकं मी आवडीने वाचत असे. ती पाहून ‘सकाळ’चे एक निवृत्त कर्मचारी काका गाडगीळ  फार खुश होत. ते मला नवनव्या पुस्तकांची नावं सांगत, लेखकांची नावं सांगत. ती पुस्तकं वाचायचा आग्रह करत. कधी कधी म्हणत, ‘जरा वेळाने घरी ये. तुला एक मस्त पुस्तक वाचायला देतो.’ त्यांच्या घरी खूपच पुस्तकं होती. ते एकटेच राहत, त्यामुळे घरात ते आणि पुस्तकंच पुस्तकं असत. मी जाई तेव्हा ते नवनवी पुस्तकं मला दाखवत, त्यातलं मला हवं असलेलं पुस्तक दोन दिवसांच्या अटीवर वाचायला देत. त्यामुळे माझी जावडेकर, माटे, कुरुंदकर, गोविंद तळवळकर, साने गुरुजी, ग. प्र. प्रधान, अशा अनेक लेखकांची पुस्तकं वाचून झाली. मी माझं शुद्धलेखन सुधारण्याचा प्रयत्न करत होतो. आपल्या लेखनात एकही चूक राहून नये म्हणून मी व्याकरणाचे नियम समजून घेत होतो. हे त्यांना समजल्यावर त्यांनी मला य. ए. धायगुडे यांचे ‘मराठी मुद्रितशोधन’चे दोन भाग भेट दिले. मी एकदा पुलंचं ‘बटाटय़ाची चाळ’ वाचत होतो. ते पाहून ते म्हणाले, ‘अरे, हे पुस्तक तू वाचतोस ते ठीक आहे. पण पुलंची वाचावीत अशी पुस्तकं म्हणजे, ‘व्यक्ती आणि वल्ली’ आणि ‘मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास’. ते तू वाच. नाहीतर असं करतो मी ती तुला भेटच देतो.’ त्यानुसार त्यांनी मला ती भेट दिली.


काकांची पुस्तकांची आवड तशी चोखंदळ होती. भलतीसलती पुस्तकं ते मला वाचायला देत नसत. मी एकदा वपु काळे यांचं ‘पार्टनर’ हे पुस्तक वाचत होतो. पुस्तक तसं बेकारच होतं. ते काकांनी पाहिलं. मला म्हणाले, ‘मित्रा, वा.म. जोशी, कुरुंदकर, माटे वाचणा-या माणसानं वपु काळे यांच्या वाटय़ाला जाऊ नये.’


काका असं थोडंच बोलत. पण मी ते गांभीर्यानं घेत असे. त्यामुळे माझं वाचन फार भरकटलं नाही. त्याला एक शिस्त लागली. ते विचारप्रधान राहिलं. एकदा शांता शेळके यांचा कुठलासा कार्यक्रम होता. त्यात त्या म्हणाल्या की, मी माझ्या आयुष्यातला बराचसा वेळ नको ती पुस्तकं वाचण्यात घालवला. तेव्हा मी त्याचं समर्थन केलं खरं पण आयुष्याच्या उतारवयात मला त्याचं वाईट वाटतं.’ आदल्यादिवशीच मी त्यांचा एक जुना लेख वाचला होता. त्यांनी त्यात म्हटलं होतं की, ‘काही लोक केवळ जीवनसत्त्वाच्या गोळ्या खाऊनच जगावं, तशी काही निवडक पुस्तकं वाचत असतात.’ त्याचा प्रतिवाद त्यांनीच केला होता.


मी ते दुस-या दिवशी काकांना सांगितलं. काका तर चांगले वाचक होते, त्यांना त्यांच्या वाचनाचा अभिमानच होता. पण त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, ते मला म्हणाले, ‘तू या आठवडय़ापासून दर रविवारी माझ्या घरी यायचं आणि तुझ्या आवडीची पाच पुस्तकं घेऊन जायची.’ माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. पण ते खरंच म्हणत होते. नंतर मला वाटलं, एक दोन आठवडे देतील. पण सतत सहा महिने दर रविवारी ते मला त्यांनी दिलेल्या शब्दांप्रमाणे पाच पुस्तकं देत होते. त्यात समग्र टिळक, श्री. व्यं. केतकरांच्या ज्ञानकोशाचे सर्व खंड, त्र्यं. शं. शेजवलकरांची पुस्तकं, माटे-कुरुंदकर-जोशी यांची पुस्तकं. किती नावं घ्यावीत?


खरं तर मी काही काकांचा नातेवाइक नव्हतो. त्यांच्यासाठी मी कुठलंही काम केलं नव्हतं. त्यांनीही कुठलीही कामं कधी मला करायला सांगितली नाहीत. मी केवळ पुस्तकं वाचतो, म्हणून त्यांच्याकडची सर्व पुस्तकं त्यांनी मला देऊन टाकली. ते मला तेव्हाही स्वप्नवत वाटत होतं आणि आजही आश्चर्यकारकच वाटतं.   

इतिहास माणसाला शहाणं करतो!

स्वतंत्र भारत नावाच्या लोकशाही देशाचा हा अगदी अलीकडच्या म्हणजे 1947 ते 2007 या साठ वर्षाचा इतिहास आहे. ही वाटचाल गुहांनी काहीशा स्थुलपणे मांडली आहे आणि तीही बव्हंशी राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अंगानं. पण वस्तुनिष्ठ इतिहासलेखनाशी प्रामाणिक राहून मांडली आहे. त्यांच्या लेखनात कुठलाही पूर्वग्रह नाही, ही या पुस्तकाची सर्वात मोठी आणि जमेची बाजू आहे. किंबहुना त्यामुळेच हे पुस्तक आपले अनेक गैरसमज दूर करण्यास मदत करतं. ‘इतिहास माणसाला शहाणा करतो’ असं बेकनचं एक वचन आहे. मुद्दा आहे तो, आपल्याला शहाणं व्हायचं की नाही?
 ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
रामचंद्र गुहा हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत, इतिहास, क्रिकेट आणि पर्यावरण या विषयांचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. ‘इंडिया आफ्टर गांधी’ हे गुहांचं इंग्रजी पुस्तक 2007 साली प्रकाशित झालं, तेव्हा त्याची ‘द इकॉनॉमिस्ट’, ‘वॉल स्ट्रिट जर्नल’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘सॅनफ्रॅन्सिको क्रॉनिकल’, ‘टाइम आउट’ या आंतरराष्ट्रीय  नियतकालिकांनी ‘बुक ऑफ ऑफ द इअर’ म्हणून निवड केली होती. तर लंडनच्या ‘टाइम्स लिटररी सप्लिमेंट’नं ‘An insightful, spirited and elegantly crafted account of India since 1947' असा त्याचा गौरव केला होता.
गुहांनी पुस्तकामागची भूमिका स्पष्ट करताना लिहिलं आहे, ‘‘सामाजिक संघर्षाची प्रयोगशाळा म्हणून एखाद्या इतिहासकाराच्या दृष्टिकोनातून विसाव्या शतकातील भारत हा एकोणिसाव्या शतकातील युरोपइतकाच रोमहर्षक आहे..निश्चित दृष्टिकोनापेक्षा माझ्यामधील कुतूहलाची भावना अधिक बळकट आहे. न्यायनिवाडात्मक निष्कर्ष काढण्यापेक्षा मला समजून घेण्यात अधिक रस आहे..पण या कथाकथनाची मी जी पद्धत अवलंबिली आहे ती निश्चित करण्यामागे दोन मूलभूत मनसुबे होते. एक म्हणजे भारताच्या सामाजिक आणि राजकीय वैविध्याचा आदर राखणे आणि दुसरे म्हणजे आतापर्यंत सर्व भारतीय व परदेशी अभ्यासक व नागरिकांना सदैव जे कोडे पडत आले आहे त्याचा उलगडा करणे. हे कोडे कोणते, तर भारत खरोखरच का अस्तित्वात आहे?’’
 
भारत नुसता टिकला नाही तर आता महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे. शिवाय भारत आजघडीला जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. भारताचा हा प्रवास कसा झाला याचा आलेख गुहा यांनी यात सविस्तरपणे मांडला आहे.
 पुस्तकाचे एकंदर पाच विभाग असून त्यात 30 प्रकरणांचा समावेश आहे. ‘तुकडेजोडणी’, ‘नेहरूंचा भारत’, ‘केंद्र सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न’, ‘लोकप्रियतावादाचा उदय’ आणि ‘ऐतिहासिक घटनांचा मागोवा’ अशी पाच विभागांची नावं तर उपसंहाराचं नाव आहे ‘एक अस्वाभिक राष्ट्र’ आणि उपोद्घाताचं ‘भारत टिकून का आहे?’.

पहिल्या विभागात स्वातंत्र्य, पाकिस्तानची फाळणी, देशभर उसळलेल्या दंगली थांबवण्यासाठीचे म. गांधींचे प्रयत्न, त्यांची हत्त्या, संस्थानांचं विलिनीकरण, जम्मू आणि काश्मीरचं विलिनीकरण आणि राज्यघटना कशी साकारली याचा सविस्तर आढावा आहे.
 
दुस-या विभागाचं शीर्षक, ‘नेहरूंचा भारत’, पुरेसं बोलकं व नेमकंही आहे. यात 1949 ते 54 या सर्वात धामधुमीच्या, ताणतणावाच्या आणि संघर्षाच्या काळाचा इतिहास आहे.
 
‘केंद्र सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न’ या तिस-या विभागात ‘दक्षिणेकडील राज्यांचं आव्हान’, ‘पराभवाचा अनुभव’, ‘वर्तमान कालखंडातील शांतता’ आणि ‘अल्पसंख्याकांची काळजी’ अशी चार प्रकरणं आहेत. 1962 च्या पराभवाचं खापर नेहरूंच्या माथी फोडलं जातं. गुहांनी त्याबाबत कोणतंही भाष्य करणं टाळलं आहे, पण त्यांनी दिलेले पुरावेच इतके सज्जड आहेत की, त्याची गरजही राहत नाही.
 
सुरुवातीच्या या तीन विभागांमध्ये साधारपणे 1963 पर्यंतच्या काळातली स्वतंत्र भारताची वाटचाल अतिशय सविस्तर रेखाटली आहे. यासाठी 450 पृष्ठे दिलेली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात लहान-मोठी 500 संस्थानं होती. सरदार पटेल आणि त्यांचे सहाय्यक व्ही. पी. मेनन यांनी ती किती चातुर्यानं, सामंजस्यानं आणि प्रसंगी दटावणीनं  सामील करून घेतली याची कहाणी मोठी रोचक व मजेशीर आहे.
 
‘लोकप्रियतावादाचा उदय’ या चौथ्या विभागातल्या पहिल्याच प्रकरणाची सुरुवात होते, पं. नेहरूंच्या निधनानं. स्वतंत्र भारताची  लोकशाही, निधर्मी आणि सार्वभौम प्रजासत्ताक देश म्हणून पायाभरणी करणा-या नेहरूंचं निधन हा तमाम भारतीयांना मोठाच धक्का होता. त्यानंतर पंतप्रधान झालेल्या आणि ‘नेहरूंचा योग्य वारसदार’ म्हणवल्या गेलेल्या लालबहादूर शास्त्रींची अल्प कारकीर्दही धामधूम आणि संघर्षाचीच ठरते.
 
शास्त्रींनंतर ‘इंदिरा गांधी पर्वा’ला सुरुवात होते. त्यांचं धडाडीचं नेतृत्व काही ठाम निर्णय घेतं, पण जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनामुळे त्या देशावर आणीबाणी लादतात. गुहांनी आणीबाणीला फार महत्त्व दिलेलं नाही. पण तरीही आणीबाणीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मोठी गळचेपी झाली, वगैरे गैरसमज दूर करण्याचं काम या प्रकरणातून होतं. कुठलाही पूर्वग्रह न बाळगता आणि केवळ इतिहासकाराच्या दृष्टिकोनातूनच गुहांनी आणीबाणीविषयी लेखन केलं आहे. पण ते मात्र सज्जड पुराव्यांच्या आधारे. त्यामुळे त्यांच्या प्रतिपादनातून असा निष्कर्ष निघतो की, आणीबाणीला इंदिरा गांधी आणि जयप्रकाश नारायण दोघंही सारख्याच प्रमाणात जबाबदार आहेत. इंदिरा गांधी यांना खलनायक आणि जयप्रकाशांना हिरो ठरवणा-या अनेकांच्या गळी हे कटूसत्य उतरणं अवघड आहे.
 
शेवटचा विभाग निरोपाचा आणि सर्वसमावेशक आढावा घेणारा आहे. त्यातल्या ‘समृद्धी’ या प्रकरणाच्या शेवटी गुहा लिहितात, ‘‘भारत एक देश म्हणून टिकणार नाही ही कल्पना मात्र फारच अतिशयोक्तीपूर्ण आहे. कारण भारताची राज्यघटना बनविणा-या आपल्या पूर्वसूरींनी त्यात सांस्कृतिक बहुविधता या एकाच राष्ट्रामध्ये फळेल व फुलेल अशी व्यवस्था केलेली आहे. त्याच वेळी हेही लक्षात ठेवले पाहिजे की भरात नजीकच्या काळात महासत्ता बनेल ही कल्पनाही अपरिपक्व आहे.’’
 
‘लोकांचे मनोरंजन’ या शेवटच्या प्रकरणात जात, वर्ण, वर्ग, प्रदेश, भाषा, धर्म आणि लिंग या सर्व प्रकारच्या भेदांना ओलांडून जाणा-या आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका निभावणा-या (म्हणजे हिंदी चित्रपट, नाटक, लोककला, हिंदुस्तानी व कर्नाटक संगीत, बिलियर्डस, हॉकी, फूटबॉल, क्रिकेट, आकाशवाणी व दूरदर्शन यांचा) सांस्कृतिक बहुविधतेचा  ऊहापोह केला आहे.
 
या सर्वाच्या जोडीला गुहांनी पं. नेहरू, इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण, नागा चळवळीचे नेते अंगामी फिझो, केरळचे इ. एम. एस. नंबुद्रिपाद, काश्मीरचे शेख अब्दुल्ला यांची चरित्रंही लिहिली आहेत. भारताच्या पूर्वेकडच्या भागाविषयी एरवीही आपल्याला फारशी माहिती नसते. त्यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळाविषयी गुहांनी बरंच लिहिलं असल्यानं ती सर्वस्वी नवी आहे.
 
‘भारत टिकून का आहे?’ या उपसंहाराची कारणमीमांसा गुहांनी सार्वत्रिक निवडणुकांपासून केली आहे. ते लिहितात, ‘‘भारतीय लोकशाहीचे मृत्युलेख तर अनेक वेळा लिहिले गेले आहेत. पुन्हा पुन्हा असे आवर्जून सांगितले गेले आहे की, हा गरीब, फाळणी झालेला, प्रचंड वेगळेपण असलेला देश ख-या अर्थाने मुक्त आणि न्याय्य निवडणुका फार काळ घेऊच शकणार नाही.’’ पण पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून या देशात खरोखरच ख-या अर्थानं मुक्त आणि न्याय्य निवडणुका पार पडत आल्या आहेत. अगदी काश्मीरच्या खो-यात आणि नक्षलवादी भागातही हिंसाचाराला, धाकदपटशाला न जुमानता लोक मतदानासाठी मोठय़ा प्रमाणावर रांगा लावतात हे सत्य सा-या जगाला माहीत आहे. अनेक परदेशी निरीक्षकांनीही मतदानस्थळी हजर राहून त्याच्या न्याय्यतेचा निर्वाळा दिलेला आहे. भारतासारख्या अजब देशात सार्वत्रिक निवडणुका इतक्या निर्धोक वातावरणात पार पडू शकतात, हाताच्या बोटावर मोजता येतील इतपतच गैरप्रकार घडतात, ही एकच गोष्ट या देशाच्या एकसंधपणाच्या ग्वाहीसाठी पुरेशी ठरावी.
 
उठसूठ भारताची तुलना पाश्चात्य देशांशी-विशेषत: अमेरिका-लंडनशी करणा-या चिंतातूर जंतूनाही गुहांनी फटकारलं आहे. ते दाखवून देतात की, पाश्चात्य जगातील राष्ट्रांना एकत्र बांधण्यासाठी एक भाषा, एक धर्म, एक भूभाग, एक शत्रू या पैकी एखादा वा हे सगळेच घटक कारणीभूत ठरलेले आहेत. भारत या सर्वच गोष्टींना सणसणीत आणि दणदणीत अपवाद आहे. हिंदू बहुसंख्य असले तरी भारत हिंदू राष्ट्र नाही. भारत धर्मनिरपेक्ष आणि सार्वभौम प्रजासत्ताक आहे. सध्याचे पंतप्रधान, लोकसभेच्या सभापती, उपराष्ट्रपती व काँग्रेसच्या अध्यक्षा यांच्याकडे पाहिले तरी ते पटेल. आणि हे प्रातिनिधित्व हिंदी चित्रपटांपासून खेळांपर्यंत आणि उद्योगांपासून ते शिक्षणव्यवस्थेपर्यंत सर्वत्रच पाहायला मिळतं.
विविध धर्म, विविध भाषा हे भारतीय संघराज्याचे मैलाचे दगड आहेत. त्यामुळे राष्ट्रवादाचे पाश्चात्य सिद्धांत भारताला लागू होत नाहीत. भारतासारख्या इतकं वैविध्य असलेल्या देशात सलग साठ र्वष लोकशाही टिकून राहणं हा जगापुढे भारतानं निर्माण केलेला नवा आदर्श आहे, हे समजून घेण्याची गरज आहे.

पण भारत हा खरोखरच लोकशाही देश आहे की नाही, या प्रश्नाचं उत्तर गुहा ‘फिप्टी-फिप्टी’ असं देतात. ते लिहितात, ‘‘जेव्हा निवडणुका होतात किंवा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा व आचारस्वातंत्र्याचा प्रश्न असतो तेव्हा इथे लोकशाही आचरणच असते. पण जेव्हा राजकारण्यांचा व्यवहार आणि राजकीय संस्थांचा प्रश्न येतो तेव्हा तिथे लोकशाही अभावनेच असते. पण भारतात पन्नास टक्के लोकशाही आहे ही वस्तुस्थितीसुद्धा इतिहास, परंपरा आणि सनातनी शहाणपणाला चपराक मारणारी आहे. ’’ गुहा म्हणतात, भारतात 50 टक्के लोकशाही असली तरी 80 टक्के एकजूट आहे. ‘‘आजच्या भारताचे भवितव्य परमेश्वराच्या हातात नसून सामान्य माणसाच्या हातात आहे. जोपर्यंत भारतीय संविधान अगदी ओळखू येणार नाही इतके बदलले जात नाही आणि निवडणुका नित्यनेमाने व योग्य पद्धतीने पार पडतात, धर्मनिरपेक्षतेचे वातावरण व्यापक पातळीवर टिकविले जाते, नागरिक आपल्या पसंतीच्या भाषेत बोलू व लिहू शकतात, जोपर्यंत सर्वसमावेशक बाजारपेठ अस्तित्वात आहे आणि ब-यापैकी नागरी प्रशासन व सैन्यसेवा उपलब्ध आहे, आणि हो, हेही मी विसरू इच्छित नाही की जोपर्यंत हिंदी चित्रपट सर्वत्र पाहिले जातात आणि त्यातली गाणी गायिली जातात तोपर्यंत भारताचे अस्तित्व टिकून राहील.’’ असा गुहांनी या पुस्तकाचा शेवट केला आहे.
 
गुहांचं इंग्रजी लेखन अतिशय ओघवतं आहे. त्यांना जे काही सांगायचं असतं ते नीट तपशिलानिशी आणि स्पष्टपणे सांगण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे त्यांची भाषणं आणि लेखन खूपच प्रभावी ठरतं. त्याचाच प्रत्यय त्यांच्या ‘इंडिया आफ्टर गांधी’मध्येही येतो. शारदा साठे यांनी त्याचा तितकाच समर्थपणे मराठी अनुवाद केला आहे. मराठीमध्ये गंभीर पुस्तकांचे अनुवाद करण्याच्या फंदात फारसं कुणी पडत नाहीत. महिन्याला जे ढिगानं अनुवाद होत आहेत, त्यांची यादी पाहिली तरी याचा प्रत्यय येतो.
 
पण एवढय़ा मोठय़ा पुस्तकाचा अनुवाद करताना काही त्रुटी-चुका राहणं साहजिक असतं. तशा त्या या पुस्तकातही आहेत. पण त्या किरकोळ म्हणाव्या अशाच आहेत. या अनुवादाचं काटेकोरपणे संपादन झालं असतं, तर त्या टाळता आल्या असत्या, असंही वाटतं.
 
साठे यांनी मूळ इंग्रजी आवृत्तीतील ऋणनिर्देश, नोट्स व संदर्भसूचीची 126 पानं वगळली आहेत. अशा प्रकारच्या पुस्तकाला संदर्भसूची हवीच. अभ्यासकांसाठीच  ती गरजेची असते असं नाही, जिज्ञासू आणि जाणकारांसाठीही गरजेची असते. अशी पुस्तकं वाचकांना इतर पुस्तकांकडे वळायला मदत करत असतात.
 
गेल्या साठ वर्षात भारतात लोकशाही शासनप्रणाली टिकून राहिली, पण तिला काही अडचणींच्या डोंगरांचा कमी प्रमाणात सामना करावा लागला म्हणून नव्हे तर, तर अशा डोंगरामागून डोंगरांचा सामना करतच तिचा प्रवास चालू आहे. सुरुवातीची 10-15 वर्षे तर सर्वच बाजूंनी कस पाहणारी होती. सुदैवानं देशाच्या नेतृत्वाची धुरा पं. नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर अशा दिग्गजांच्या हाती असल्यानं भारत तगला. आणीबाणी, राज्य पातळीवरच्या आणि केंद्रीय पातळीवरच्या चळवळी, दंगली, हिंसाचार, राजकीय हिंसा-हत्या, जातीयवादी पक्ष-संघटना, हिंदुत्ववादी पक्ष-संघटना, नक्षलवाद, शेजारच्या देशांची आक्रमणं, विरप्पनसारखे बंडखोर अशा कितीतरी संकटांचा सामना करावा लागला, आजही करावा लागतो आहे. येत्या काळात ‘सिव्हिल सोसायटी’ नामक भंपक लोकांचा उच्छाद ही नवी डोकेदुखी उभी राहण्याची चिन्हं अण्णा हजारेंच्या तथाकथित आंदोलनानं अधोरेखित केली आहेत. असो. कुठल्याही घटनेचं, प्रश्नाचं समग्र आकलन करून घ्यायचं असेल तर राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण या तिन्ही बाजूंचा विचार करावा लागतो. तरच ते आकलन निर्दोषतेच्या जवळपास पोहोचू शकतं. गुहांनी या तिन्ही बाजूंचा पुरेसा विचार केला असल्यानं प्रस्तुत पुस्तक स्वातंत्र्योत्तर भारत समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे.
 ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गांधींनंतरचा भारत : रामचंद्र गुहा, अनुवाद- शारदा साठे, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे,
 पाने : 888+35, किंमत : 800 रुपये