Monday, February 27, 2012

साहित्य तोतयांचा उच्छाद

टिकेकर यांनी लोकमतच्या मंथन (26 FUB.12) या रविवार पुरवणीत लिहिलेला हा लेख.

- अरुण टिकेकर
कुसुमाग्रज हयात असताना त्यांचं नाशकातलं निवासस्थान मराठी तसंच अमराठी साहित्यिकांना एखाद्या मंदिरासारखं वाटत असे. नाशिकभेटीत शिरवाडकरांची भेट घेणं हा त्यांच्या कार्यक्रम-यादीतला एक अत्यावश्यक घटक असे. शिरवाडकरांहून अधिक लोकप्रिय, अधिक मान-सन्मान मिळवलेले, अधिक मानधन घेणारे वा मिळवलेले साहित्यिक महाराष्ट्रात कमी नव्हते, आताही कमी नाहीत. परंतु शिरवाडकरांइतका आदरभाव साहित्यिकांकडून, साहित्य-रसिकांकडून मिळाल्याची उदाहरणं विरळा.
शिरवाडकरांच्या वाड्मयीन महत्तेला केलेला हा मानाचा मुजरा असायचा हे तर खरंच. पण त्याहूनही तो शिरवाडकरांनी जी जीवन-मूल्यं आयुष्यभर जपली त्या जीवन-मूल्यांसाठी होता हेही तितकंच खरं. साहित्यिकानं सामाजिक जबाबदारीचं भान सतत बाळगलं, सामाजिक चारित्र्य काचेच्या भांड्यासारखं आयुष्यभर जपलं, तर का नाही त्याच्या वाड्मयीन कर्तृत्वाला नैतिकतेची झळाळी येणार? का नाही बडे बडे राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिकांच्या नव्या पिढीचे प्रतिनिधी, साहित्यसेवक, वाड्मय-प्रेमी, सामान्य वाचक त्यांच्यासमोर नतमस्तक होणार? पण तेथे चारित्र्याचे अधिष्ठान पाहिजे ना!
शिरवाडकरांना वाड्मयीन तेज प्राप्त झालं, ते त्यांच्या वाड्मयीन महत्तेला त्यांच्या मूल्यं जपणार्‍या चारित्र्याची साथ लाभली म्हणून. त्यांच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक चारित्र्य जपणुकीच्या अनेकविध कथा सांगता येतील. अनेकांना त्या ज्ञातही आहेत. पण त्यापासून कुणी बोध घेतल्याचं ऐकिवात नाही.
महाराष्ट्राचा एक सुसंस्कृत, सर्जनशील आणि एक सर्वश्रेष्ठ नेता गणला जाणारा मुख्यमंत्री एकदा त्यांच्या घरी जाऊन त्यांची यथायोग्य वास्तपुस्त करताना त्यांना म्हणाला - ‘चला ना माझ्याबरोबर! हेलिकॉप्टरनं. जाऊ पुण्याला! गप्पाही होतील आपल्या. पुण्याच्या समारंभात नाही तरी आपण दोघंही एकत्रच आहोत!’ शिरवाडकरांनी त्याची विनंती विनम्रपणे नाकारली आणि म्हणाले ‘आपण पुढे व्हा! मी येतोच मागोमाग.’ त्या सर्वश्रेष्ठ नेत्याचा वारसदार अशी ज्याची ख्याती तोही पुढे एकदा शिरवाडकरांच्या घरी गेला आणि स्वत: वाड्मयप्रेमी असल्यानं त्यानं त्यांचा शाल-श्रीफळ-गुच्छ देऊन मनापासून सत्कार केला. शिरवाडकरांनी तो विनम्रभावानं स्वीकारला. सत्काराचं सामान आतल्या खोलीत नेण्याचं निमित्त करून दुसरी शाल-श्रीफळ आणलं आणि त्या मुख्यमंत्र्याचा प्रति-सत्कार तिथल्यातिथंच केला! इतरांकडून विनाकारण काही घ्यायचं नाही, घ्यावंच लागलं काही तर संधी मिळताच ते तितक्याच आदरपूर्वक परत करायचं, हा सार्वजनिक जीवन- मूल्यांमधला अगदी साधा आणि मूलभूत सिद्धांत. काल-परवापर्यंत बहुसंख्यांनी तो पाळला. पण हळूहळू राजकीय नेत्यांकडून आपला सत्कार होणं हा सरकारी कामकाजाचा आणि आपल्या सामाजिक अधिकाराचा भागच आहे, अशी भावना साहित्यिकांत रुजली. सरकारी साहित्य-पुरस्कार, सरकारी मान-मरातब आणि सरकारी आर्थिक मदत हा साहित्यिकांचा अधिकार असल्याचं मानलं जाऊ लागलं. शिरवाडकरांचं वागणं आजच्या कित्येक साहित्यिकांना मानभावीपणाचं, औद्धत्याचं वाटेल. क्वचित मूर्खपणाचंही वाटेल. पण त्यांच्या आर्जवी शब्दांमुळे दोन्ही मुख्यमंत्र्यांना तसं वाटलं नाही, यातच सारं आलं. साहित्यिकाचा दबदबा, त्याचा दरारा न बोलता समाजात वाढतो, तो अशा निग्रही घटनांमुळे, हे मात्र नक्की.
फक्त बड्या असामींबद्दल शिरवाडकरांचं वागणं असं निर्मोही असे असंही नव्हे. मला आठवतं, ‘लोकसत्ता’च्या संपादकपदी असताना वृत्तपत्राच्याच कामासाठी नाशिकला गेलो होतो. माझे सहकारी हेमंत कुलकर्णी यांच्याबरोबर शिरवाडकरांच्या निवासस्थानी गेलो, त्यांना माझ्या ‘जन-मन’ या पुस्तकाची एक प्रत दिली. ते कदाचित वाचणार नाहीत, स्नेह्याला वा ग्रंथालयाला भेट देतील, म्हणून त्यावर काही लिहिलं नाही. काही वेळ त्यांच्या सहवासात बसून आम्ही कामाला निघून गेलो. काम संपल्यावर परत हॉटेलमध्ये आलो, तर काऊंटरवर एका मोठय़ा पाकिटात त्यांची तीन नवी पुस्तकं माझ्या नावासह ‘भेटीप्रीत्यर्थ’ स्वाक्षरी करून ठेवलेली आढळली. इतरांकडून काहीही कारणाशिवाय घ्यायचं नाही, हा सार्वजनिक चारित्र्य-संहितेतला संकेत किती अप-प्रकारांपासून माणसाला वाचवू शकतो, याचा अनुभवच घेतलेला बरा!
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे या महापुरुषाची एक गोष्ट सांगितली जाते. त्यांच्या एका व्याख्यानापूर्वी बोलणार्‍या ओळख-कर्त्यानं न्यायमूर्ती रानडे यांना वास्तविक मुंबई हायकोर्टाचे प्रथम भारतीय न्यायमूर्ती म्हणून नेमणं कसं अगत्याचं होतं, त्यांच्यावर अन्याय कसा झाला, वगैरे प्रकारचं अस्थानी वक्तव्य केलं. न्यायमूर्ती रानडे यांची कुचंबणा झाली. पण मूळच्या अतिसंकोची स्वभावानुसार ते जाहीरपणे काही बोलले नाहीत. सरळ आपल्या व्याख्यानाला सुरुवात केली. व्याख्यान संपल्यानंतर मात्र त्यांनी त्या व्यक्तीला बोलावून त्याला चार बोल सौम्य भाषेत सुनावले आणि म्हटलं,
''Always remember, questions of salary and promotion are no to be discussed in public.'' (पगार आणि बढती यासारख्या समस्यांचा ऊहापोह सार्वजनिक ठिकाणी कधी करायचा नसतो!) सार्वजनिक ठिकाणी काय आणि कशा प्रकारचे उल्लेख टाळायचे, या विषयीचे संकेत पूर्वजांनी सांगितले असूनही त्याकडे काणाडोळा करत आज सारे केवळ तेवढेच बोलत असतात. कोणत्याही महाविद्यालयाच्या प्राध्यापक कक्षात या पलीकडे जाऊन काही चर्चा होते का, याविषयी प्राध्यापकांनीच आत्मपरीक्षण करावं. या वर्गात साहित्यिक-समीक्षक-ग्रंथप्रेमी-वाचकही आलेच.
समाज-जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत अधोगती झाली असताना केवळ साहित्यिक वर्गाला असं बाहेर काढणं योग्य होईल का, असा ठेवणीतला प्रश्न हमखास विचारला जाईल. पण हा युक्तिवाद बिनतोड नाही. साहित्यिकावर काही सामाजिक जबाबदारी आहे. समाजशिक्षण, समाज-प्रबोधन करण्याची. समाजातल्या कालबाह्य चालिरीतींना तिलांजली देण्याचा पुरस्कार करण्याची, समाज-मनाची तयारी करून घेण्याची! परंपरानिष्ठांचा हात धरून त्यांना सामिलकीचे, सामंजस्याचे धडे देण्याची! अति- आधुनिकांच्या फाजील आणि अविवेकी उत्साहाला वेसण घालण्याची! सामाजिक प्रगती म्हणजे तरी काय? सामाजिक प्रगती म्हणजे श्रीमंत-गरीब, सबल-दुर्बल, पुरुष-स्त्री यासारखे भेद संपूर्णत: मिटवण्यासाठी समतेच्या दिशेनं टाकलेलं पाऊल! अर्थात सर्वक्षेत्रीय समानता ही आदर्शवत आहे. अखेरीस कविकल्पनाच ती. तरीही त्या दिशेनं पावलं टाकणं ही मानवी आयुष्याची सांस्कृतिक ओढ असते. आणि संस्कृतीची जाण आणि जाणीव ही फक्त मानवालाच असते. अन्य प्राण्यांना नाही. ही सार्वत्रिक समानता आणण्याची प्रक्रिया समाजात घडून येण्यासाठी साहित्यिकांनी समाज-घटकांची मनोभूमिका घडवण्याचे प्रयत्न आपल्या कृती-उक्तीतनं, साहित्यकृतींच्या माध्यमातनं तसंच आचरणाच्या साह्यानं करावेत अशी त्यांच्याकडून अपेक्षा असते. याचा अर्थ वेळप्रसंगी आम जनमताच्या ओघवत्या प्रवाहाविरुद्ध पोहण्याची शक्ती साहित्यिकांच्या लेखणीत, वाणीत आणि आचरणात असावी लागते. ही शक्ती म्हणजेच नैतिक सार्मथ्य. नैतिक सार्मथ्याचंच दुसरं नाव व्यक्तिगत आणि सार्वजनिक चारित्र्य. त्यांचं हे सार्मथ्य वाढावं म्हणून समाजानं, प्रशासनानं त्यांना सर्व प्रकारचं प्रोत्साहन द्यावं, ही पुरस्कारांमागची मूळ भूमिका.
व्यक्तिगत आणि सार्वजनिक दोन्ही जीवनात साहित्यिकांनी नैतिकता जपावी, असा आग्रह धरणारे काल-परवापर्यंत बरेच होते. न्यायमूर्ती रानडे यांचं मत तर असं होतं की, व्यक्तिगत आणि सार्वजनिक अशा नैतिकतेत फरकच करता येत नाही. व्यक्तिगत जीवनात नीतिमान असलेली व्यक्ती सार्वजनिक जीवनात भ्रष्टाचार करूच शकत नाही आणि ती व्यक्ती जर व्यक्तिगत जीवनात नीतिमान नसेल तर सार्वजनिक व्यवहारात ती नैतिक असणं संभवत नाही. एक बाब स्पष्ट करणं आवश्यक आहे. नैतिकता ही मूल्याधारित असते. सत्य, मानवता, विश्‍वबंधुत्व, अहिंसा अशी काही मूल्यं शाश्‍वत असतात, तर सामाजिक न्याय, आधुनिकता, श्लील-अश्लील, नैतिकता अशी काही मूल्यं कालानुरूप बदलत जातात. आपल्या साहित्यकृतींच्या माध्यमातनं साहित्यिकांनी शाश्‍वत मूल्यांचा पुरस्कार करावा आणि कालबाह्य झालेल्या अशाश्‍वत मूल्यांना मोडीत काढून नव्या मूल्यनिर्माणाला हातभार लावावा, समाज-मनाला सौम्य झटके देत बदल घडून आणावा ही अपेक्षा असते.
समाज-जीवनाची सर्वक्षेत्रीय अधोगती झाली, मग आम्हालाच दोष का द्यावा, असं म्हणून अन्य समाज-घटकांशी बरोबरी साधणारे साहित्यिक पुरस्कार, सन्मान मात्र मिळाले पाहिजेत, नव्हे, शासनाचं ते कर्तव्यच आहे असं म्हणत आपलं वेगळेपण दाखवतात. ही दुटप्पी भूमिका ते घेतात, तेव्हा त्यांचं ढोंग उघडकीला येतं. ही खरं तर आत्मवंचनाच म्हणता येईल. लोकशाहीत अर्ज करण्याशिवाय पर्याय नसतो आणि त्यात बिघडलं कोठे, असा युक्तिवाद करत ‘अखिल भारतीय मराठी साहित्य-संमेलनांच्या अध्यक्षपदापासून ते ग्रंथ पुरस्कारांसारख्या शासकीय-अशासकीय योजनांपर्यंत अर्ज दाखल करण्याची अहमहमिका लागते, मतलब साधण्यासाठी किंबहुना आर्थिक वा अन्य प्रकारच्या स्वार्थासाठी सर्व प्रकारच्या लबाड्या केल्या जातात. जातीय, प्रांतीय, विभागीय गणितं घातली जातात, स्नेहार्द्रता हा एकच निकष लावून दुय्यम - तिय्यम दर्जाच्या साहित्यकृतींची आणि ते प्रसवणार्‍या साहित्यिकांची भलामण केली जाते, त्या समाजात पहिल्या आणि दुसर्‍या-तिसर्‍या वा नापास साहित्यिक वर्गातला फरक पुसला जातो. ही अगतिक, लाचार अवस्था झाली. निलाजरेपणानं त्याचंही सर्मथन करण्यात येतं, तेव्हा साहित्यिकांचा स्वाभिमान, अस्मिता वगैरे शब्दप्रयोग पोकळ वाटायला लागतात. ज्या समाजात साहित्यिक स्वत:चे स्वत: सेन्सॉर व्हायला तयार नाहीत, त्या समाजात एखाद्या सुविख्यात आणि सक्षम साहित्यिकाची साहित्यकृती फसलेली, निराश करणारी आहे, असं म्हणण्याचं धाडस कुणी करत नाही. प्रकाशकांनाही फसलेली साहित्यकृती कशी विकायची हे ज्ञात होतं आणि ‘परीक्षण’ नावाखाली विशेषणांची खैरात करणारी मंडळी तयार होतात. प्रत्येक पुस्तक ‘आगळं-वेगळं’ असल्याची जाहिरात वाचकांना फसवू शकते. सारा ग्रंथ-व्यवहार अप्रामाणिकपणावर आधारलेला असतो, साहित्य-तोतये समाजात अधिक निर्माण झाले की, शालोपयोगी, रुग्णोपयोगी, खाद्योपयोगी अशा पुस्तकांना वाड्मयकृतींचा दर्जा मिळतो. अशाच पुस्तकांना प्राधान्य मिळू लागलं की, वाड्मयाचा समाज-मन घडवण्याचा आद्य हेतू वगैरे विसरला जातो. साहित्यिकांची नि:स्पृहता, चारित्र्य वगैरे विसरलं जातं. या सार्‍याचा परिणाम छापील किंवा लिखित शब्दांना महत्त्वच न उरण्यात होतो.
असं आपल्या समाजाचं झालं आहे काय, आपल्या साहित्यिकांच्या शब्दांना पुरस्कारादि मोल मिळत असलं तरी त्या शब्दांचा समाज-मनावरील प्रभाव संपला आहे काय, हा प्रश्न प्रत्येक साहित्यिकानं स्वत:ला विचारणं गरजेचं झालं आहे. साहित्यिकांचं प्रवाह-पतित होणं हे समाजाला परवडणारं नसतं.
जेव्हा-जेव्हा आपल्यावर सामाजिक आपत्ती कोसळली तेव्हा तेव्हा काल-परवापर्यंत संत साहित्यानं आपल्याला तारलं. मनोधैर्य दिलं. समाजाची मनोभूमिका बदलण्याचं कार्य केलं. अन्यायाचा प्रतिकार आणि सामाजिक न्यायाचा पुरस्कार करण्यास शिकवलं. संतांच्या विचार-धनाला चारित्र्याची जोड होती म्हणूनच त्यांचे शब्द प्रभावीठरले, समाजाने ते मानले. आज संतांची जागा साहित्यिकांनी घेतली आहे, पण त्यांच्या शब्दांना चारित्र्याचं नैतिक बळ नाही. परिणामी शब्दांचा प्रभाव उरला नाही. आज समाजाचं सांस्कृतिक अवमूल्यन झालं आहे, पण लोकशाहीच्या बळावर तगताना अस्तित्वाचा प्रश्न समाजाला छळत नसल्यामुळे साहित्यिकांच्या सामाजिक जबाबदारीला आव्हान नाही. ते आव्हान मिळेलच तर आपले साहित्यिक ते पेलण्यास सर्मथ नसण्याचाच अंदाज बांधता येतो.
When culture declines, art flourishes असा एक सिद्धांत मांडला जातो. संस्कृतीचा अपकर्ष होतो, तेव्हा साहित्यिक, कलावंत, वगैरे मंडळी आपापल्या माध्यमाच्या साह्यानं वैचारिक रणकंदन माजवतात, बंड करून उठतात, वैचारिक क्रांती घडवून आणतात आणि नवा तत्त्वबोध जन्माला येतो. तो संस्कृती वाचवतो. सामाजिक जीवनात शुद्ध वर्तनाची तमा न बाळगणार्‍या आपल्या समाजात आज भ्रातृभाव, सहिष्णुता आदि मूल्यांची पीछेहाट झाली आहे. आपल्या असभ्यपणाचंसुद्धा सर्मथन केलं जात आहे. बुद्धिप्रामाण्य, विवेक आदिंचं वैचारिक अधिष्ठान उरलं नाही. तरीही साहित्यिक मूग गिळून, मुखलेप झाल्यासारखे गप्प बसले आहेत. कोणत्याही राजकीय व सामाजिक समस्यांवर भाष्य करण्याचं टाळत आहेत. राज्यकर्त्यांनाच काय, कोणाही उच्चपदस्थाला, धनिक-वणिकांना का दुखवा, असा सोयिस्कर विचार ते करत आहेत. असं दुखवलं तर जणू एखादा पुरस्कार, मान-सन्मान यांना ते पारखे होतील. वास्तविक अडचणीचे सवाल खडे करणं आणि परखडपणे आणि मुख्यत: तटस्थपणे भाष्य करणं, हीच तर त्यांच्यावरची जबाबदारी! ऐन जबाबदारीच्या क्षणी मौन पाळणारे साहित्यिक ज्या विषयांशी आपला प्रत्यक्ष संबंध नाही, त्याबद्दल मात्र भरभरून बोलत सांस्कृतिक समस्यांची गुंतागुंत वाढवायला मागं-पुढं पाहत नाहीत, हा सार्वजनिक चारित्र्याच्या अभावाचाच भाग म्हणता येईल. उदाहरणार्थ- प्रत्येक लेखक काही भाषा तज्ज्ञ नसतो. तरीही एखादं पुस्तक प्रसिद्ध होताच तो सिद्धहस्त लेखक झाल्याच्या आविर्भावात भाषा आणि संस्कृतीवर बोलण्याचा जणू परवाना मिळाला आहे, असं समजून घडाघडा आपली अज्ञानी मतं बोलत सुटतो. भाषेबद्दल किती मुखानं आज कारणमीमांसा होत आहे, याची गणतीच न केलेली बरी. म्हणजे जिथे भाष्य करायला पाहिजे तिथं मौन, जिथं मौन बाळगणं इष्ट तिथं मात्र मतप्रदर्शन, हाही सामाजिक चारित्र्याचा अनादरच होय.
अन्य समाज-घटकांच्या भ्रष्टाचारावर प्रभावी भाष्य करण्याचा अधिकार साहित्यिकांना तेव्हाच मिळेल, जेव्हा ते आपल्यातल्या वाड्मय निर्मितीगुणांना योग्य वर्तनाचं अधिष्ठान देऊन अन्य समाज-घटकांवर प्रभाव पाडू शकतील. अवतीभोवतीच्या साहित्यिकांच्या पेय-पानाच्या आणि बाह्य संबंधांच्या कहाण्यांकडे अंगुलीनिर्देश करत आपण त्यातले नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करणं ही चारित्र्याची फारच तोकडी व्याख्या होईल. साहित्यिकांनी निदान आपलं सामाजिक वर्तन आजमितीला स्वच्छ ठेवलं, तर असांस्कृतिक गटांगळ्य़ा खाणार्‍या समाजाला काहीबाही लाभ तरी होऊ शकेल. शिरवाडकरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांच्याशी नातं सांगणार्‍या साहित्यिकांकडे मागणं तरी दुसरं कोणतं मागायचं!

Sunday, February 26, 2012

भाषेबाबतच्या या अनास्थेला जबाबदार कोण?

'बाळासाहेब एक फतवा काढा..मराठी बोला!असा लेख ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांनी आठ-दहा वर्षापूर्वी लिहिला होता. अशी सक्ती करून काही उपयोग होतो का, हा वेगळा मुद्दा आहे. पण मराठीविषयीची तीव्र चिंता साधूंनी या लेखात व्यक्त केली होती. आणि त्या चिंतेतूनच त्यांनी मराठी बोलण्यासाठी फतवा काढण्याची भाषा केली होती! पण मराठीच्या भवितव्याविषयी फार चिंतातुर न होताही काही गोष्टींचा विचार करता येईल. किमान भाषिक कौशल्ये आणि शब्दकोशांची निर्मिती यांच्याबाबतीत सध्या काय स्थिती आहे?  

भाषिक कौशल्यांबाबतची अनास्था
बोलणे, ऐकणे, वाचणे आणि लिहिणे ही चार प्राथमिक भाषिक कौशल्ये मानली जातात. ही कौशल्ये विकसित करण्याचे काम प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पातळीवर टप्प्याटप्प्याने व्हायला हवे. त्याचवेळी  साहित्याने त्याला समांतर जबाबदारी निभवायला हवी. पण या पातळीवरही प्रचंड अनास्था दिसते. परिणामी कितीही पदव्या संपादन केल्या तरी तरुणांची भाषा समृद्ध होत नाही. नुसत्या शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होईल असे नाही आणि त्याची भाषा-संपन्न होईल असेही नाही!
 
उत्तम श्रोता, चांगला वाचक, बरा वक्ता आणि जेमतेम लेखक असे ऐकणे, वाचणे, बोलणे आणि लिहिणे या भाषिक कौशल्याचे पर्यवसान व्हायला हवे. शिक्षणाचे हेच उद्दिष्ट असायला हवे. कारण तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जाणार असा, कोणतीही नोकरी वा व्यवसाय करणार असा, ही कौशल्ये तुम्ही आत्मसात केलीच पाहिजेत. पण जनमानसाचा कानोसा घेतल्यावर याचा फारसा प्रत्यय येताना दिसत नाही. सार्वजनिक समारंभ-संमेलने-चर्चासत्रे या ठिकाणी लोकांना जेव्हा काही शंका असल्यास वा प्रश्न असल्यास विचारा असे सांगितले जाते, तेव्हाची गंमत पाहण्यासारखी असते. बहुतांश जणांना आपल्याला नेमकेकाय म्हणायचेय, आपला नेमका प्रश्न काय हेच सांगता येत नाही. ते इतका पाल्हाळ लावतात की, तुमचा नेमका प्रश्न काय असे पुन्हा पुन्हा विचारावे लागते. प्रश्न विचारण्यातून शहाणपण कळते, तर उत्तरातून हुशारी कळते, असे म्हणतात! पण या शहाणपणाचे दर्शन सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अभावानेच दिसते.
 
वाचनाच्या बाबतीतही अशीच त-हा आहे. अनेकांना काय वाचावे हेच आयुष्यभर कळत नाही. त्यासाठी कुणा चांगल्या मार्गदर्शकाचा सल्ला घ्यावा असेही त्यांना वाटत नाही. परिणामी ही माणसे आयुष्यभर कविता-कथा-कादंबऱ्याच वाचत राहतात. मला फक्त विज्ञान कादंब-या आवडतातकिंवा मला अर्नाळकरांच्या कादंब-या आवडतात’, असे जेव्हा लोक सांगतात तेव्हा यांना काय वाचावे?’ हेच बहुधा कळलेले दिसत नाही याची खात्रीच पटते. वय आणि वाचन यांची सांगड तर अनेकांना घालता येत नाही.
 
जेमतेम लेखक म्हणजे किमान चार ओळींचे चांगले पत्र लिहिता येणे. पण हेही अनेकांना जमत नाही. थोडक्या शब्दांत बरेच काही सांगता येते. पण तो कौशल्याचा आणि भाषाप्रभुत्वाचा भाग असतो. पण हा साक्षेप साधे पत्र लिहिण्यापासून ते कथा-कादंबऱ्यांपर्यंत कुठेच फारसा पाळला जाताना दिसत नाही. मराठी साहित्यिकांना व प्राध्यापकांना हे किमान कौशल्य अवगत करता येत नाही, याचे पुरावे त्यांच्या लेखनातून, भाषणांतून आणि बोलण्यातून मिळत राहतात! साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची छापील भाषणे यासंदर्भात पाहण्यासारखी आहेत.

 थोडक्यात बोलणे, ऐकणे, वाचणे आणि लिहिणे ही प्राथमिक भाषिक कौशल्ये प्राथमिक पातळीवरच कच्ची राहतात. त्यामुळे त्याचे भयावह परिणाम आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. भाषा-विवेक नसलेल्या समाजामध्ये कोशवाङ्मयाची निर्मिती आणि त्यांचे महत्त्वही दुर्लक्षिलेच जाणार!
 
इच्छाशक्तीचा अभाव
मराठीमध्ये कोशवाङ्मयाची समृद्ध म्हणावी अशी परंपरा आहे. ज्ञानकोश, संस्कृतिकोश, चरित्रकोश, व्यायामकोश, समाजविज्ञान कोश, महाराष्ट्र शब्दकोश, सरस्वती कोश, अशी मोठमोठी कामे एकेकाळी झाली.  

श्री. व्यं. केतकरांनी १९२० ते १९२७ या आठ वर्षात ज्ञानकोशाचे २३ खंड प्रकाशित केले. हा कोश केवळ विषयसंग्रह कोश ठरू नये, तर तो महाराष्ट्राच्या भाषिक, सांस्कृतिक, आर्थिक राजकीय उलाढालींचे साधन ठरावा, अशी केतकरांची अपेक्षा होती. त्याप्रमाणे त्यांनी त्याची रचना केली. हिंदुस्थान आणि जगया त्यांच्या प्रस्तावना खंडावरून त्यांची कल्पना येते. पण केतकरांच्या कामाची बूज त्यांच्या हयातीत राखली गेली नाही आणि त्यानंतरही. अतिशय हालअपेष्टा सोसून केतकरांनी ज्ञानकोशतयार करून मराठी भाषेला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण नंतरच्या काळात त्यांच्या ज्ञानकोशाची नवी सुधारित आवृत्ती प्रकाशित करण्यासाठीही कुणी पुढे येऊ शकले नाही. तशी इच्छाही कुणाला झाली नाही.
 
मराठी विश्वकोशाची काय स्थिती आहे हे आपण गेली ४०-५० वर्षे पाहतोच आहोत. या काळात जग ज्या गतीने बदलले आहे, त्याचा आवाकाच या विश्वकोश नामक मंडळाला उमगत नसल्याने तो कधीच कालबाह्य झाला आहे. पण त्यामुळे ब्रिटानिका एन्सायक्लोपिडिआया जगातील सर्वात मोठय़ा कोशाचा आदर्श समोर असलेल्या विश्वकोशाची अवस्था लाजीरवाणी म्हणावी अशी झाली आहे!
 
अशीच परिस्थिती शब्दकोशांची आहे. वेगवेगळ्या शब्दांचे कोश त्या भाषेत नव-नव्या शब्दांची भर घालण्याचे काम करीत असतात. त्यामुळे शब्दकोशांची संख्या जास्त असायला हवी. भाषा समृद्ध करण्यासाठी ते आवश्यक असतात. पण चांगले शब्दकोशच नसतील तर ते होणार कसे? सध्या बाजारात उपलब्ध असलेला कुठला इंग्रजी-मराठी शब्दकोशउत्तम म्हणावा असा आहे, या प्रश्नांचे उत्तम फारसे समाधानकारक नाही. कारण या कोशांच्या नव्या सुधारित आवृत्त्या, पुरवण्या ज्या सातत्याने प्रकाशित व्हायला हव्यात, त्यांच्या अद्ययावतीकरणाचे जे प्रयत्न व्हायला हवेत, तेच होताना दिसत नाहीत. त्यामुळे सोवनी, नवनीत आणि ऑक्सफर्ड मराठी हेच तीन कोश वापरावे लागतात. पण हे तीनही कोश फारच अपुरे आहेत, मात्र त्यांच्याशिवाय पर्यायही नाही! अशीच परिस्थिती इंग्रजी-मराठी आणि मराठी-मराठी या शब्दकोशांचीही अवस्था आहे. मराठी-मराठी शब्दकोशामध्ये प्र. न. जोशी यांचा आदर्श मराठी शब्दकोशहाच काय, तो त्यातल्या त्यात चांगला म्हणावा असा कोश. पण तोही बहुतेकांना माहीत नसावा.
 
थोडक्यात, अलीकडच्या काळात कोशवाङ्मयाची निर्मिती खूपच रोडावली आहे. शब्दकोश, वाक्यसंप्रदाय कोश, संज्ञा-संकल्पना कोश अशा चढत्या क्रमांच्या कोशांची सतत निर्मिती होणे आणि त्यांच्या सुधारित आवृत्त्या प्रकाशित होणे हा भाषेच्या समृद्धीचा आणि वाढीचा उत्तम पर्याय असतो. पण तेही होताना दिसत नाही. मग भाषिक वृद्धी व समृद्धी होणार तरी कशी?
 
मराठी भाषेची परवड
 भाषा ही सतत प्रवाही असते. त्या प्रवाहाला तुम्ही कसे वळण देता, यावर तिची वृद्धी आणि समृद्धी होत जाते. नुसत्या साहित्याने भाषेची वाढ आणि समृद्धी होत नाही. दर्जेदार साहित्य फक्त भाषेला स्थिरत्व देते, असे मराठी भाषा - उद्गम आणि विकासकर्ते कृ. पां. कुलकर्णी यांनी म्हटले आहे ते खरेच आहे.
भाषा समृद्ध होण्यासाठी आणि तिचा प्रवाह सतत सशक्त होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. काळाच्या गतीनुसार भाषा बदलत असते आणि समाजही. त्यामुळे त्या गतीने भाषेमध्ये नव्या नव्या शब्दांची-संज्ञा-संकल्पनांची निर्मिती होणे गरजेचे असते. जागतिकीकरणाच्या गेल्या वीस वर्षात समाजजीवनात जे आमूलाग्र म्हणावे असे बदल झाले आहेत, त्या तुलनेत मराठी भाषेमध्ये किती नव्या शब्दांची-संज्ञा-संकल्पनांची भर पडली आहे? भरपूर इंग्रजी शब्द जसेच्या तसे वापरल्याने ती आजच्या काळाची भाषा होत नाही. पण नव्वदोत्तर काळात लिहू लागलेल्या कवींनी आणि लेखकांनी इंग्रजाळलेल्या शब्दांचा-वाक्यप्रयोगांचा इतका धुडगूस घातला आहे की विचारू सोय नाही!
 
पण त्याहून भयानक आहेत, ते या भाषेलाच आजच्या काळाची भाषा म्हणून तिचा पुरस्कार करणारे बुद्धिजीवी. पोस्ट-मॉडर्निझम नावाच्या शेंडाबुडखा नसलेल्या उठवळ संकल्पनेचा विनाकारण गवागवा आणि पुरस्कार करून या लोकांनी आपला भाषाविवेककधीच गमावला आहे! पण दुर्दैवाने याच लोकांकडे छापील माध्यमे असल्याने मराठी भाषेची परवड चालूच आहे.
 
सर्वसामान्यांना पचेल, रूचेल आणि समजेल अशा भाषेत लिहिण्याऐवजी हे लोक केवळ स्वत:च्या पांडित्याचे प्रदर्शन करण्यासाठीच लिहीत असतात! परिणामी विनाकारण अगम्य शब्द, वाक्यरचना आणि संकल्पना वापरून वाचकांना घाबरून टाकतात. त्यावर आमच्या डोक्यावरून गेले, म्हणजे तुम्ही चांगलेच लिहिले असणारअशा चतुर प्रतिक्रिया देऊन वाचक मोकळे होतात, पण त्याचा सोयीस्कर अर्थ घेऊन हे पंडितस्वत:चीच पाठ थोपटून घेत राहतात!!
 
यांची अशी, त्यांची तशी त-हा!
 सर्वाना समजेल अशा भाषेत लिहिणे ही फारच कठीण गोष्ट असते म्हणा! सरकारी पातळीवरचे मराठी, प्राध्यापकी मराठी आणि सर्वसामान्यांकडून बोलले जाणारे मराठी अशा प्रमाण मराठीच्या तीन तीन त-हा पाहायला मिळतात, त्या याचमुळे. शुद्धलेखनाच्या नियमांविषयीही एकमत न होण्याचे कारणही हेच आहे. परिणामी सरकारी आणि प्राध्यापकी मराठीचा सर्वसामान्यांच्या मराठीशी काही संबंध राहिलेला नाही आणि सर्वसामान्यांच्या मराठीला बुद्धिजीवी वर्गाकडून कमी लेखले जाते.
 
नव्या शब्दांची निर्मिती सर्वसामान्यांकडूनही होत असते, याचे भान आपल्याकडच्या भाषेच्या अभ्यासकांना तरी कितपत आहे कोण जाणे! फ्लॉवरया इंग्रजी शब्दाचे फुलवरअसे मराठी रूप केले गेले. ते कुणा मराठी साहित्यिक, प्राध्यापक वा भाषाशास्त्राच्या अभ्यासकाने केले नाही; तर ग्रामीण भागातल्या अशिक्षित जनतेने केले. असे अनेक शब्द एरवी अडाणी, निरक्षर आणि खेडुत म्हणवणारे लोक घडवत असतात. पण याकडे आपल्याकडचे बुद्धिजीवी लक्ष देत नाहीत. भाषेची वृद्धी फक्त आपलीच मक्तेदारी आहे असा समज करून घेतल्याने सर्वसामान्य जनतेने घडवलेल्या असा शब्दांना शब्दकोशात स्थान मिळत नाही. आणि शब्दकोशातील शब्द सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे प्रयत्नही पुरेशा प्रमाणात केले जात नाहीत.

 संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पदनामकोशतयार करण्यात आला. तो नव्या शब्दांच्या निर्मितीचा तसा चांगला प्रयत्न होता. त्यातील काही शब्द आता समाजमान्य झाले आहेत. पण या कोशाची बदनामी करण्याचा आणि त्याची टिंगलटवाळी करण्याचा विडा, तेव्हा काही मराठी साहित्यिकांना उचलला होता! खरे तर या पदनामकोशातले चांगले शब्द ठेवून बाकी शब्दांना नव्याने पर्याय शोधायला हवे होते. जेणेकरून ते शिष्टसंमत झाले असते. पण तसा प्रयत्नही कुणी केला नाही.
 
खेडय़ापाडय़ातल्या बायाबापडय़ा काबाडकष्ट करून पै-पैसा जमून, अनंत व्यवधाने असतानाही प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन हौसेने एखादा दागिना सोनाराकडून घडवून घेतात. आणि मग तो अभिमानाने अंगावर मिरवतात. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तृप्त समाधान पाहायला मिळते. मराठी भाषेत नव्याने घडवल्या जाणाऱ्या एकेका शब्दालाही अशीच श्रमाच्या घामाची तुरट-खारट चव आल्याशिवाय आणि ते दिमाखाने मिरवल्याशिवाय त्यांना ऐश्वर्य मिळणार नाही, त्यांचा प्रसार होणार नाही आणि ते प्रचलितही होणार नाहीत.
 
इंग्रजीमध्ये दरवर्षी ऑक्सफर्ड डिक्शनरीची सुधारित आवृत्ती प्रकाशित होते. तेव्हा, यंदा त्यात जगभरातल्या भाषांमधील कोणकोणते शब्द जशाचे तसे स्वीकारण्यात आले आहेत, याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध होतात. भारतीय आणि मराठी वृत्तपत्रांमध्येही या बातम्या येतात! असा शब्दकोश मराठीमध्ये का असू नये? आमचा सारा जोर इंग्रजीला विरोध करण्यात आणि मराठीच्या नावाने कंठशोष करण्यातच किती दिवस खर्च होणार आहे?

 भाषेच्या समाजशास्त्राकडे आणि भाषाशास्त्राकडे मराठी साहित्यिक-प्राध्यापक-पत्रकार-शिक्षक असे सर्वच बुद्धिजीवी घटक दुर्लक्ष करत असल्याने मराठी भाषेविषयीची अनास्था दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोंबडी अंडं घालते पण कलकलाट करते ब्रह्मांड घातल्यासारखाअसे मार्क ट्वेन या अमेरिकन लेखकाने म्हटले आहे. मराठीच्या भवितव्याची आणि मराठी वाचवा, मराठी वाचवाअसा कंठशोष करणा-यांची त-हा यापेक्षा वेगळी नाही!

Sunday, February 19, 2012

कण्हणारे शेल्फ आणि धडपडणारा वाचक!

पुस्तकांविषयीची पुस्तकंया वाङ्मयप्रकारातल्या पुस्तकांची समीक्षा करता येत नाही आणि त्यांचा चांगला परिचयही करून देता येत नाही. (अशी दुहेरी अडचण इतर विषयांवरच्या पुस्तकांबाबत होत नाही.) पण तरीही त्यावर लिहिण्याची वेळ येतेच. कारण ती इतरांशी शेअर करावी अशी असतात ना, म्हणून! 
प्रदीप सॅबॅस्टियन हे द हिंदू’, ‘डेक्कन हेरॉल्ड’, ‘बिझनेस वर्ल्ड’,  तहलका’, ‘कारवाँया इंग्रजीतील नियतकालिकांमध्ये लिहितात. त्यांचं बहुतांशी लेखन हे पुस्तकांविषयीची पुस्तकं, वाचन याविषयांवर असतं. सॅबॅस्टियन उत्तम वाचक आहेत आणि पुस्तकांचे संग्राहकही.  बिब्लोफाइलम्हणजे ग्रंथप्रेमीअसं ते स्वत:चं वर्णन करतात.
 
सॅबॅस्टियन यांची भाषा सुबोध आणि रसाळ असते. त्यामुळे त्यांचं लेखन वाचकाला स्वत: बरोबर घेऊन जातं. पण आता स्वत:बरोबर ठेवावं आणि वाचावंच असं त्यांचं पुस्तकच बाजारात आलं आहे. त्यामुळे आजवर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेले आणि आपल्या वाचनातून सुटलेले लेख एकत्रितपणे वाचता येऊ शकतात.
 
शिवाय या संग्रहात घेताना त्यांनी त्या लेखांवर आवश्यक तिथे संस्कार केले आहेत, काहीचं पुनर्लेखनही केलं आहे. त्यामुळे द ग्रोनिंग शेल्फ अँड अदर इन्स्टन्सेस ऑफ बुक लव्हहे पुस्तक वाचलंच पाहिजे अशा अनिवार्य यादीत नक्कीच वर्ग करण्यासारखं  आहे.
 
या पुस्तकाचं मराठी भाषांतर कण्हणारं शेल्फ आणि पुस्तकप्रेमाच्या इतर गोष्टीअसं काहीसं करता येईल. पुस्तकांच्या पहिल्या आणि दुर्मीळ आवृत्त्या, पुस्तकांचा इतिहास, पुस्तक संग्राहक आणि जुन्या पुस्तकांच्या किमती, पुस्तकांविषयीची पुस्तकं यामध्ये सॅबॅस्टियन यांना खूप रूची आहे. शिवाय वाचक म्हणूनही ते मजेशीर आहेत. पुस्तकाचं मुखपृष्ठ, बांधणी, त्याची स्पाईन, मलपृष्ठ, निर्मिती, पुस्तकाच्या नव्याको-या प्रतीचा वास या गोष्टी त्यांना वेडावतात, खुणावतात. काही पुस्तकं ही फक्त डोळ्यांनी पाहायची असतात, काही पुस्तकं ही फक्त नाकानं अनुभवायची असतात, काही पुस्तकं ही फक्त चाळायची असतात, काही पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचायची असतातअसं म्हटलं जातं. पण सॅबॅस्टियन या सर्वच गोष्टी करणा-या वाचनवेडय़ा संप्रदायातले आहेत.
 
या संग्रहाचे एकंदर नऊ भाग आहेत. द प्लेझर्स ऑफ बिब्लोफाइल’, ‘एडिशन्स’, ‘द ब्राऊजर्स एक्टॅसी’, अ जन्टल मॅडनेस’, ‘द बुक इटर्स’, ‘द रायटसर्’, ‘रुइन्ड बाय रीडिंग’, ‘लव्हड अँड लॉस्टआणि बुकस्टोअर्सअशी या विभागांची शीर्षकं आहेत. द प्लेझर्स ऑफ बिब्लोफिलीम्हणजे ग्रंथसंग्राहकाचं सुखया पहिल्या विभागातल्या चार लेखांत सॅबॅस्टियन यांनी स्वत:च्या घरातल्या शेल्फमधल्या पुस्तकांबाबतचे अनुभव लिहिले आहेत. स्वत:च्या घरातली पुस्तकं मनासारखी लावून झाल्यावर सॅबॅस्टियन म्हणतात, ‘पुस्तकं माझं घर आणि आयुष्य सुसज्ज करतील.पण पुढच्याच लेखाच्या सुरुवातीलाच ते पुन्हा जाहीर करून टाकतात की, मी माझ्या नव्या पुस्तकांच्या कपाटाबद्दल फारसा आनंदी नाही. त्यांनी वॉल्टर बेंजामिनच्या माय अनपॅकिंग लायब्ररीया लेखाचा संदर्भ दिला आहे. पण हा पहिला विभाग वाचताना अ‍ॅनी फॅडिमनचं एक्स लिब्रिसहे पुस्तक प्रकर्षानं आठवतं. लग्न झाल्यावरही बराच काळ अ‍ॅनी आणि तिचा नवरा यांचा ग्रंथसंग्रह वेगवेगळाच असतो. एके दिवशी तो एकत्र करायचा असे ते ठरवतात,  त्यावेळचे मजेशीर प्रसंग आणि वाद यांचं वर्णन अ‍ॅनीनं मॅरिइंग लायब्ररीया लेखात केलं आहे. शेवटी ती लिहिते, ‘त्याची पुस्तकं आणि माझी पुस्तकं ही आता आमची पुस्तकं झाली आहेत. आम्ही खरोखरच एकमेकांचे जीवनसाथी आहोत!
 
एडिशन्स’ (आवृत्त्या) या दुस-या विभागातल्या पहिल्याच लेखात रिक गेकोस्की या दुर्मीळ पुस्तकाच्या विक्रेत्याविषयीची किस्सा आहे. 1988 मध्ये रिक गेकोस्की लोलिताया लोकप्रिय कादंबरीच्या पहिल्या इंग्रजी आवृत्तीची किंमत 3,250 डॉलर्स इतकी जाहीर करतो. तेव्हा काही दिवसांनी ग्रॅहम ग्रीन त्याला पत्र लिहून कळवतात की, तुम्ही सांगता ती प्रत पहिल्या इंग्रजी आवृत्तीची नसावी. पण माझ्याकडच्या पहिल्या पॅरिस आवृत्तीची किंमत काय येईल? रिकोस्की ग्रीन यांच्याकडची ती प्रत 4000 डॉलर्सना विकत घेतो. या उदाहरणावरून पाश्चात्य देशात पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रतींना किंवा दुर्मीळ प्रतींना काय किंमत मिळू शकते, याची झलक पाहायला मिळते. याच लेखात सॅबॅस्टियन यांनी अशा दुर्मीळ पुस्तकांविषयीच्या पुस्तकांविषयी, त्यांच्या संग्राहकाविषयी लिहिले आहे. पुढच्या लेखांमध्येही पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तींविषयीची बरीच माहिती दिली आहे. ती रंजक आणि वेधक आहे.
 
पुस्तकांच्या मुखपृष्ठांविषयी, ज्याला इंग्रजीमध्ये बुक जॅकेट म्हणतात त्याविषयी, जॉन गिल्के, डॅनियल स्पायगलमॅन या पुस्तकचोरांविषयी, पुस्तकांच्या समासामध्ये वाचकांकडून लिहिले जाणारे शेरे, अभिप्राय आणि त्याविषयीची पुस्तकं, पुस्तकसंग्राहकांविषयीची पुस्तकं, बिछान्यामध्ये पडून पुस्तक वाचनाची त - हा, पुन्हा पुन्हा होणारं वाचन याविषयी सबॅस्टियन यांनी लिहिलेले लेखही वाचनीय आणि रंजक आहेत.
 
पण विशेषत: दोन लेखांचा आवजून उल्लेख करायलाच हवा. पहिला म्हणजे प्रिंट एरियाज’ (2004) आणि मुव्हेबल टाइप’ (2008) या अभिजीत गुप्ता आणि स्वपन चक्रवर्ती यांनी संपादित केलेल्या या दोन पुस्तकांविषयीचा लेख. भारतातल्या पुस्तकांच्या प्रदीर्घ प्रवासाची हकीकत सांगणारी ही दोन्ही पुस्तकं आपल्या देशातील पुस्तकांच्या परंपरेचा, प्रवासाचा आणि संस्कृतीचा आलेख काढतात. या पुस्तकांद्वारे भारतातील छापील पुस्तकांचा इतिहास समजून घ्यायला मदत होते.
 
असाच दुसरा लेख आहे, पुस्तकांविषयीच्या चित्रपटांविषयी. कुठल्या कुठल्या चित्रपटांमध्ये पुस्तकांचे संदर्भ, पुस्तकांचे उल्लेख, पुस्तकांचे संग्राहक येतात, कुठली पुस्तकं येतात याची धावती सफर घडवणारा हा लेख ही प्रत्यक्ष वाचायची गोष्ट आहे, वर्णन करण्याची नाही. त्यामुळे त्याविषयी इथं लिहिण्यात काहीच हशील नाही.
 
शेवटी सॅबॅस्टियन यांनी ग्रंथसूची दिली आहे. खंद्या पुस्तकप्रेमीसाठी अशी यादी हे एक प्रकारचं आव्हान असतं. कारण ती वाचताना यातली किती पुस्तकं आपल्याकडे आहेत आणि किती नाहीत, याचा तो पडताळा घेतो. त्यातली जास्त पुस्तकं त्याच्याकडे असतील तर तो ज्याम खूश होतो आणि नसतील तर मात्र चरफडत त्यातील जी जी पुस्तकं शक्य आहेत, ती मिळवायला लागतो. सॅबॅस्टियन यांची ही यादी वाचताना अशीच अवस्था होते. थोडक्यात आपलं ग्रंथवेड आणखीनच उफाळून येतं. कार्ल मार्क्‍स यांनी धर्म ही अफूची गोळी आहेअसं म्हटलं आहे. पण पुस्तकवेडय़ांसाठी पुस्तकांविषयीची पुस्तकंही अफूच्या गोळीसारखीच असतात. त्याची नशा उतरता उतरत नाही. सॅबॅस्टियन यांचं हे पुस्तक ती नशा वाढवतच राहतं.
 
दुसरी अडचण अशी आहे की, या पुस्तकात इतर अनेक पुस्तकांचे आणि लेखकांचे इतके संदर्भ दिलेले आहेत की, हे लोक आपल्याला माहीत कसे नाहीत, अशी आपली तगमग होते. कितीतरी वाचनवेडे, ग्रंथसंग्राहक, पुस्तकचोर आणि पुस्तकांविषयीच्या पुस्तकांचे संदर्भ या पुस्तकात इतस्तत: विखुरलेले आहेत. पुस्तक वाचून झाल्यावरही ते आपली पाठ सोडत नाहीत. पुस्तकांविषयीच्या पुस्तकांची हीच तर गंमत असते. तुम्ही एका रस्त्याने चालायला लागलात की, ते तुमच्यासमोर आणखी दहा वाटा खुल्या करतं. मग त्यांच्यावरून मुशाफिरी केल्याशिवाय आपल्याला राहवत नाही.
 
  • द ग्रोनिंग शेल्फ अँड अदर इन्स्टन्सेस ऑफ बुक लव्ह : 
    प्रदीप सॅबॅस्टियन, 
    हॅचेट इंडिया, गुरगाव,
    पाने : 295, किंमत : 395 रुपये

Sunday, February 12, 2012

पुस्तकवेडा!

२७ जानेवारी २०१६ रोजी काढलेले छायाचित्र
वसंत आठवले हा पुण्यातील एक अवलिया माणूस आहे. आजच्या जमान्यात जुनी पुस्तकं विकून कितीसे पैसे मिळणार, पण हा माणूस  गेली 35-40 वर्षे हाच व्यवसाय निष्ठेनं करतो आहे. एवढंच नव्हेतर तर आपल्या मुलांनाही आपला हा वारसा दिलाय.
 
सोमवार हा आठवडय़ाचा पहिला दिवस. या दिवशी एरवी गजबजलेल्या पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील बहुतांशी दुकानं बंद असतात. त्यामुळे दोन्ही बाजूचा फुटपाथ रिकामा असतो. इथंच बाजीराव रस्त्यालगतच्या युनायटेड बँकेच्या शेजारच्या फुटपाथवर सकाळी सकाळी आठवले आपलं जुन्या पुस्तकांचं दुकान मांडून बसतात. ते साधारणपणे नऊ वाजेपर्यंत येतात. पण पुस्तकवेडे लोक तासभर आधीपासूनच त्यांची वाट पाहात ताटकळत थांबलेले असतात. आठवले आले की, सर्व जण त्यांच्या पुस्तकांवर तुटून पडतात. यात कुणाला कधी काय मिळेल याचा नेम नसतो. अनेकांना कितीतरी वर्षापासून शोधत असलेला दुर्मीळ ग्रंथ मिळतो, तर काहींना त्यांच्या अभ्यासाचे पण त्यांना माहीत नसलेले ग्रंथ मिळतात. त्यामुळे आठवल्यांच्या या रस्त्यावरच्या दुकानाला भेट दिली की, रा. चिं. ढेरे, निरंजन घाटे, ह. अ. भावे, आनंद हर्डीकर, सु. रा. चुनेकर, महावीर जोंधळे असे पुण्यातील अनेक साहित्यिक भेटतात. तुम्ही आठवलेंकडे जायला लागलात की, या साहित्यिकांशीही तुमची हळूहळू मैत्री व्हायला लागते.
 पण आठवले नुसते पुस्तकविक्रेते नाहीत. त्यांच्याकडे तुम्ही जायला लागलात की, आठवले सुरुवातीला तुम्ही कुठली पुस्तकं घेता याचं बारकाईनं निरीक्षण करतात आणि मग तुम्हाला कुठली पुस्तकं हवी असतात, याचा त्यांना अचूक अंदाज येतो. त्यानुसार ते तुमच्यासाठी त्या प्रकारची पुस्तकं वेगळी काढून ठेवायला लागतात. पुण्यातल्या अनेक पुस्तकवेडय़ा मंडळींना आठवलेंनी कितीतरी दुर्मीळ पुस्तकं दिली आहेत. पुणे विद्यापीठाच्या ग्रंथालयात तर अनेक पुस्तकं आठवलेंकडचीच आहेत.
आठवले चांगले वाचकही आहेत. विशेषत: दुर्मीळ पुस्तकांबद्दलची त्यांची माहिती खूपच दांडगी आहे. त्यामुळे कुठल्या पुस्तकाचं नेमकं काय महत्त्व आहे, सध्या ते बाजारात उपलब्ध आहे की नाही, झालं तर त्याची किंमत काय असेल याचा त्यांना अचूक अंदाज असतो.
 
शिवाय आठवलेंची आणखी एका गोष्टीसाठी ख्याती आहे. त्यांना तुम्ही कुठलेही दुर्मीळ पुस्तक सांगा, ते पुस्तक आठवले तुम्हाला दोन-चार महिन्यांत मिळवून देतातच. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ‘ज्ञानकोशा’चे खंड, ‘केसरीप्रबोध’, ‘केसरीचे छोटे फाइल’, श्री. म. माटे यांचा ‘विज्ञानबोध’, त्रिं. ना. आत्रे यांचं ‘गावगाडा’, त्र्यं. शं. शेजवलकरांचे मोटे प्रकाशनाने काढलेले लेखसंग्रह, ‘सकाळ’चे संस्थापक ना. भि. परुळेकरांचं ‘निरोप घेता’, ‘विविधज्ञानविस्तार’चे बांधीव अंक असं अगदी कुठलंही. शिवाय आपण आठवलेंकडे जायला लागलो की, आपल्याला अनेक शोध लागतात. आत्रे यांच्या ‘गावगाडा’मधील अनघड शब्दांचा अर्थ सांगणारं एक स्वतंत्र पुस्तकच प्रकाशित झालेलं आहे, स्वातंत्र्यपूर्वकाळात गांधीजींविषयी इंग्रजी वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या व्यंग्यचित्रांचा स्वतंत्र संग्रहच आहे इत्यादी इत्यादी. १८२८मधील पुण्याचा नकाशा पुणे महानगरपालिकेला मिळाला तो आठवलेंमुळेच.
 
2010 साली पुण्यात भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांना ना. धों. महानोर यांच्या बरोबरीनं संमेलनाच्या उद्घाटनासाठी खास निमंत्रण देण्यात आलं होतं. पण ही कुणा पुणेरी साहित्यिकाला सुचलेली गोष्ट नव्हती. ती सुचली नगरसेवक असलेल्या आणि आठवलेंच्या शेजारी राहणाऱ्या सतीश देसाई यांना. त्यांच्या सूचनेला सर्वानी अनुमोदन देऊन आठवलेंचा यथोचित गौरव केला.
 
आठवले यांचे वडील संगीत नाटकांमध्ये काम करत. ‘प्रभात’चे ‘आधी बीज एकले’सारखी उत्तम गाणी लिहिणारे शांताराम आठवले हे या आठवले यांचे पुतणे. त्याविषयीच्या आठवणी हा आठवले यांच्या आयुष्यातला एक ठेवणीतला कप्पा आहे. त्यांचा पुरेसा विश्वास संपादन केल्यानंतरच तो हा कप्पा उघडा करतात. असो. वसंत आठवले किर्लोस्कर ऑईल इंजिन्समधील ग्रंथालयात काम करत. 1985 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि जुन्या पुस्तकांचा व्यवसाय सुरू केला. पण आठवलेंनी आपल्या व्यवसायाचं दुकान काही अजून थाटलेलं नाही. सोमवारी लक्ष्मी रोडवर ते फूटपाथवर आपलं  दुकान उघडून बसतात, तर मंगळवार ते शनिवार या दिवशी सकाळी नऊ ते साडेबारापर्यंत बाजीराव रोडवरील सरस्वती भुवन रात्र विद्यालयाच्या फुटपाथवर जुन्या पुस्तकांची पथारी मांडून बसलेले असतात. तिथं अनेक लोक पुस्तकं शोधत असतात, चाळून पाहत असतात. रस्त्यावरून चालणारा कुणीतरी गंमत म्हणून डोकावून पाहतो आणि त्याला त्याच्या आवडीचं काहीतरी मिळून जातं.
 
आठवलेंमुळे आता सरस्वती भुवनच्या फुटपाथवर त्यांच्या शेजारीच अजून एक-दोन लोक जुनी पुस्तकं घेऊन येतात. सोमवारी लक्ष्मी रोडवर तर आता आठवलेंच्या शेजारच्या पुस्तकवाल्यांची संख्या बाजीराव रोडपर्यंत लांबत गेली आहे. त्यांच्याकडेही पुस्तकं मिळतातच, पण आठवले ते आठवलेच! त्यांच्याकडे जसे आश्चर्याचे सुखद धक्के अनुभवायला मिळतात तसे इतरत्र मिळत नाहीत. त्यामुळे सर्वाची पावलं पुन्हा पुन्हा आठवलेंकडेच वळतात.
 
आठवलेही आपला व्यवसाय निष्ठेनं करतात. जुनी पुस्तकं कुठे मिळतील याचा ते सतत शोध घेत असतात, ज्यांना आपला ग्रंथसंग्रह विकायचा आहे, त्यांच्याकडून आठवले तो घेऊन येतात आणि त्यातले माणिक-मोती ज्यांना हवे असतात त्यांना देतात. शिवाय त्यांचे वाचन उत्तम असल्यामुळे त्यांच्याविषयी सर्वाना ममत्व वाटत असतं. जे खरे दर्दी असतात, ते भावात फार घासाघीस न करता आठवले सांगतील ती किंमत प्रमाण मानतात. रा. चिं. ढेरे, निरंजन घाटे यांचा त्यात प्राधान्यानं समावेश करावा लागेल.
 फार पूर्वी पुण्यात ढमढरे हे जुन्या पुस्तकांचे विक्रेते होते. त्यांनी स. ग. मालशेंना ताराबाई शिंदे यांचं ‘स्त्रीपुरुषतुलना’ हे महाराष्ट्राला माहीत नसलेलं पुस्तक दिलं. मालशेंनी त्याची मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीनं दुसरी आवृत्ती काढली. मालशेंची ही प्रत प्रमाण मानून नंतर या पुस्तकाच्या अनेकांनी आवृत्त्या काढल्या. हे सगळं घडलं ते केवळ ढमढेरेंमुळे. त्यांचा हा ज्ञानदानाचा एकहाती वारसा गेली काही वर्षे आठवले चालवत आहेत. त्यांनी अनेकांना ज्ञानसंपन्न करण्याचं काम केलं आहे. त्यातून त्यांची अनेक साहित्यिकांशी स्नेह जुळला आहे. ही श्रीमंती शब्दात न मोजता येणारी, पण ती आठवले रोजच्या रोज अनुभवत असतात. पण त्याचा दुराभिमान तर सोडाच पण साधा अभिमानही त्यांच्या वागण्या-बोलण्यात नसतो. तुम्ही त्यांच्याकडे कधीही जा, ते तुमचं स्वागत करतील, तुम्हाला हवी ती पुस्तकं मिळवून देण्यासाठी शक्य तेवढा प्रयत्न करतील.

Tuesday, February 7, 2012

अनपेक्षित यशस्वी संमेलन

चंद्रपूरसारख्या नक्षलवादाने ग्रस्त असलेल्या भागात साहित्य संमेलन घेणे हेच मुळात एक धाडस होते. ते साहित्य महामंडळाने यशस्वीपणे करून दाखवले. संमेलन जाहीर झाल्यापासून नक्षलवादाचा कुणीच बागुलबुवा केला नाही. संमेलनात पहिल्याच दिवशी ‘नक्षलवाद, लोप पावत चाललेली आदिवासी संस्कृती आणि मराठी साहित्य’ असा परिसंवाद होता. त्यात अभय बंग यांनी साहित्यिकांवर चांगलेच तोंडसुख घेतले. संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनीही अध्यक्षीय भाषणात मराठी साहित्यकांना चार खडे बोल सुनावले आणि सेन्सॉरबाह्य सेन्सॉरशिपविषयीही आवाज उठवला. त्यामुळे त्यांच्या भाषणाची तिन्ही दिवस संमेलनात अधूनमधून चर्चा होत राहिली. संमेलन चंद्रपूर शहरापासून किमान पाच-सात किलोमीटर लांब असलेल्या ‘राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालया’त भरवले असल्यामुळे काही गैरसोयी झाल्या. तरीही संमेलनाला आयोजकांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त उपस्थिती लाभली, हे आर्श्चर्यकारक आणि उत्साहवर्धक आहे. गेल्या वर्षी ठाण्यात झालेल्या संमेलनापेक्षा ही संख्या कितीतरी जास्त आणि लक्षणीय होती, हे विशेष. त्यामुळे संमेलनातल्या सर्व कार्यक्रमांना श्रोते लाभले. शिवाय त्याचा फायदा पुस्तक प्रदर्शनातल्या प्रकाशक-विक्रेत्यांनाही झाला, ही त्याहूनही चांगली गोष्ट म्हणायला हवी. या संमेलनात तिथल्या खाद्यपदार्थाची चर्चाही झाली नाही, तेही बरेच झाले! थोडक्यात संमेलन रूढार्थाने सुरळीत पार पडले. कुठल्याही बाष्कळ विषयांवर वाद झडून किंवा सेलेब्रिटींना अनावश्यक महत्व दिल्याने संमेलनाचा साहित्यावरचा फोकस हलण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात बळावले होते. ते यंदा झाले नाहीत आणि संमेलनाच्या व्यासपीठावरूनही कुणी फार काही पोकळ घोषणा-नारे दिले नाहीत. त्यामुळे कुठल्याही वादाशिवाय या संमेलनाची सांगता झाली. पण ही काही आयोजकांनी वा साहित्य महामंडळाने विचारपूर्वक ठरवलेली कृती नव्हती. ते आपसूक घडून आले, हा योगायोगच म्हटला पाहिजे. असे नियोजन करावे, असे महामंडळाने ठरवले पाहिजे आणि त्यानुसार संमेलनाची गुणवत्ता वाढवण्याचा विचारपूर्वक प्रयत्न झाला पाहिजे. म्हणजे मग दरवर्षी संमेलनात ‘मराठीच्या भविष्या’बद्दलची वांझोटी चर्चा न होता काहीतरी रचनात्मक काम करण्याच्या दिशेने पाऊल टाकता येईल. संतसाहित्याशी महामंडळाने 99 वर्षाचा करार केला आहे की काय, तेही कळायला मार्ग नाही. कारण या विषयावर दरवर्षी परिसंवाद असतोच. तो असायला हरकत नाही, पण त्याचा विषय आणि वक्ते यांची तरी विचारपूर्वक निवड व्हावी की नाही? दरवर्षी साधारणपणे तोच निष्कर्ष, अनुमान आणि योगदान सांगितले जाणार असेल तर ते कर्मकांड का करावे? ज्या संमेलनाकडून फारशा कोणाच्या अपेक्षा नव्हत्या, ते केवळ सुरळीतच नव्हे, तर दमदारपणे पार पडल्यामुळे पुढच्या वर्षीच्या संमेलनासाठी आयोजकांना आणखी बळ आले असेल. आगामी संमेलनात ‘स्वच्छता आणि टापटिपी’च्या गुणांबरोबरच साहित्य महामंडळाला थोडी चैतन्याची आणि उत्साहाची भर घालता आली, तर सोन्याहून पिवळे!

Sunday, February 5, 2012

साहित्य संमेलन आणि डिकन्सची द्विजन्मशताब्दी

काल 85व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता झाली, तर उद्या चार्ल्स डिकन्स या इंग्रजीतील अभिजात कादंबरीकाराच्या द्विजन्मशताब्दी वर्षाची सांगता होईल.
 
या दोन्ही घटना परस्परांहून भिन्न आणि एकमेकांशी तुलना करता न येणाऱ्या. पण यानिमित्ताने दोन गोष्टींची विशेष दखल घ्यायला हवी. एक, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांचे प्रदीर्घ भाषण, तर दोन, ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांनी चार्ल्स डिकन्सवर ‘साधना’ (11 फेब्रु.)मध्ये लिहिलेला जवळपास तेवढाच प्रदीर्घ लेख. डहाके यांचे भाषण अ4 डेमी आकारातील 48 पानांचे आहे, तर तळवळकरांचा लेख साप्ताहिकाची 20 पाने एवढा आहे. तो अ4 डेमी आकारात 40 पानांचा होईल. तळवलकरांच्या लेखामधील एकंदर शब्दसंख्या आहे, सुमारे साडेआठ ते नऊ हजार, तर डहाके यांच्या लेखातील एकंदर शब्दसंख्या आहे, जवळपास अकरा हजार. साहित्य संमेलनाला 134 वर्षाची परंपरा आहे, तर डिकन्सच्या निधनाला 141 वर्षे होऊनही तो कादंब-याच्या रूपाने जिवंत आहे.
 
तळवलकर-डहाके तुलना इथे अभिप्रेत नाही. पण तळवलकरांनी मराठी वाचकांना इंग्रजी भाषेतली पुस्तके आणि इंग्रजी लेखक यांच्याकडे वळवले, तर डहाके यांचे वर्णन काही मराठी समीक्षक ‘अस्वस्थ शतकाचा कवी’ असे करतात, हे आवर्जून नमूद करायला हवे.
 
तळवलकर यांनी आपल्या या प्रदीर्घ लेखातून  डिकन्सचे व्यक्तिमत्त्व, विचार, साहित्य आणि त्याचा सामाजिक प्रभाव यांचा परामर्श घेताना डिकन्स प्रत्यक्ष जगला, वावरला तो काळच जिवंत केला आहे. या लेखात डोस्टोव्हस्की, जॉर्ज ऑर्वेल, ए. एम. फोर्स्टर, जॉर्ज बनार्ड शॉ, चेस्टर्टन अशा जागतिक कीर्तीच्या अनेक लेखकांचे संदर्भ आहेत. त्यांच्या डिकन्सविषयीच्या मतांचा ऊहापोह आहे.
 
डिकन्सने एकंदर सोळा कादंब-या लिहिल्या. ‘डेव्हिड कॉपरफिल्ड’, ‘पिकविक पेपर्स’, ‘अ टेल ऑफ टू सिटीज’, ‘अवर म्युच्युअल फ्रेंड’, द ख्रिसमस बुक’ या त्यातील काही प्रसिद्ध कादंब-या. त्यांचीही तळवलकरांनी ओळख करून दिली आहे. तळवलकरांच्या लेखनीला उपमा, अलंकार, प्रतिमा यांचा सोस नाही. ती भाषेचा बडेजावही मिरवत नाही. तरीही या लेखात त्यांनी कितीतरी सौंदर्यस्थळे नोंदवली आहेत. इंग्लंडमध्ये लेखकांना किती मानसन्मान असतो याची प्रचिती जशी या लेखातून येते, तशीच डिकन्सच्या नावाने सुरू असलेली ‘दि डिकन्स फेलोशिप’ ही ११० वर्षापूर्वीची संस्था आजही कशी त्याच जोमाने काम करत आहे याचीही ओळख होते.
 
मार्क्‍सवादी, पंथवादी क्रांतिकारी, प्रॉटेस्टंट, कॅथलिक अशा कुठल्याच एका पंथात डिकन्सला बसवणे योग्य नसल्याचा निर्वाळा ऑर्वेलने दिला आहे. सामान्य लोक, गरिबांच्या घरातील आणि घराबाहेरील मुले हा डिकन्सचा चिंतनाचा आणि लेखनाचा विषय होता. त्याची ‘डेव्हिड कॉपरफिल्ड’ ही कादंबरी बरीचशी आत्मचरित्रात्मक असली तरी त्यात अशा मुलांचे जीवन अतिशय प्रत्ययकारी रीतीने आले आहे. डिकन्सच्या ‘पिकविक पेपर्स’ या कादंबरीचा वाचकवर्ग अगदी खालच्या वर्गापासून न्यायाधीश, राजकारणी, डॉक्टर, वकील या उच्चभ्रूवर्गापर्यंत सर्वदूर म्हणावा इतका पसरलेला होता. आजवर डिकन्सची अनेक चरित्रे, त्याच्या साहित्याचा अभ्यास करणारी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आणि प्रत्यक्ष डिकन्सची पुस्तके तर आजही जगभर वाचली जात आहेतच. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकानंतरही डिकन्स टिकून आहे ही गोष्टच किती थोर आहे!
 
याउलट डहाके यांच्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेबद्दलची सनातन चिंता, जागतिकीकरण, साहित्यिकांची उदासीनता हे विषय आहेत. जागतिकीकरणाच्या विरोधात बोलण्याची फॅशन तर मराठीमध्ये जागतिकीकरणा- बरोबरच उदयाला आलेली आहे. त्यामुळे जागतिकीकरण आणि फॅशन या दोन्ही गोष्टीला आता वीस वर्षे झाली आहेत. या वीस वर्षात जागतिकीकरणाने आपला देशातल्या शेती, सेवा, उद्योग, शिक्षण, आरोग्य, प्रसारमाध्यमे, नाटक, चित्रपट, साहित्य अशा अनेक क्षेत्रांवर बरा-वाईट परिणाम केला आहे. त्याचे मोजमाप करायचे काम इंग्रजीमध्ये मार्क टुली, बिमल जालान, शंकर आचार्य, एम. एम. सुरी, इंडियन एक्सप्रेस ग्रुप अशा अनेकांनी आपापल्या परीने केले आहे. पण मराठी साहित्यिक इंग्रजी वाचत नाहीत. आणि वाचले तरी त्यांच्या आकलनाच्या मर्यादा इतक्या तोकडय़ा आहेत की, वंदना शिवा,         पी. साईनाथ, अरुंधती रॉय हे लोक लिहितात, तेवढेच खरे आणि बाकी सगळे झुट असा त्यांनी आधीच (गैर)समज करून घेतल्याने ते त्याची शहानिशा करायला जात नाहीत. आक्षेप आहे, तो डहाके यांनी जागतिकीकरणावर ते काल-आज आल्यासारखे तोंडसुख घ्यावे आणि तरीही त्यांना काय म्हणायचे आहे याचा थांग लागू नये यावर. जागतिकीकरण आले, तेव्हाही खरे तर ते स्वीकारायचे की नाकारायचे हा पर्याय आपल्यासाठी उपलब्ध नव्हताच. मिलिंद बोकील यांच्या शब्दांत सांगायचे तर ती ‘कालगती आहे, मानवी संस्कृतीने इतिहासाच्या या टप्प्यावर स्वीकारलेली ही एक जगण्याची पद्धत आहे’. त्यामुळे त्याच्या नावाने बोटे मोडून लोकांची दिशाभूल करण्याऐवजी स्वत:चा चष्मा काढून आपली दृष्टी आणि चष्मा दोन्ही स्वच्छ करण्याची गरज आहे! कारण एकीकडे जागतिकीकरणाचे सारे फायदे उपभोगायचे आणि दुसरीकडे त्यावर टीका करायची, हा दांभिकपणा म्हणवला जाऊ शकतो.
 
अर्थात डहाके यांनी लेखकांच्या मुस्कटदाबीबद्दल आणि उदासीनतेविषयी जे खडे बोल सुनावले आहेत, ते त्यांच्या भिडस्तपणाच्या पलीकडे जाणारे नक्कीच आहेत. तेही थोडके नसे. ‘गेली काही वर्षे मराठीची गरज कशी नाही याचा वृत्तपत्रांतून प्रचार करण्यात गेलेली आहेत’ अशी काही मोघम आणि अतिशयोक्त विधाने सोडली तर डहाकेंचे भाषण एकंदर आजवरच्या अध्यक्षीय भाषणांच्या परंपरेला साजेसेच आहे. त्यात नवीन असे फारसे काही नाही आणि फारसे अपेक्षाभंग करणारेही काही नाही.
 
तरीही डहाके यांच्याकडून आम्हाला जरा अधिक अपेक्षा होत्या अशा प्रतिक्रिया काही लोक व्यक्त करतील तर काही लोक तळवलकरांनी डिकन्सचे अधिक सखोल विश्लेषण केले असते तर बरे झाले असते असेही म्हणतील. तो मतभेदाचा मुद्दा आहे. पण आपल्या समाजाला जशी तळवलकरांची गरज आहे, तशीच डहाकेंचीही आहे. दोघेही आपापल्या जागी योग्यच आहेत. प्रश्न त्यांचा नसून आपला आहे. आपल्याला कुणाच्या कोणत्या गोष्टींचा आदर्श घ्यायचा आहे? कारण त्यावर आपल्या आकलनाच्या कक्षा रूंदावणे वा न रूंदावणे याचा न्यायनिवाडा अवलंबून आहे.
 
पण एक छोटीशी अपेक्षाही व्यक्त करायला हरकत नसावी. २००४ साली औरंगाबादला झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव होते. संमेलनाआधी काही दिवसांपूर्वी संभाजी बिग्रेडने पुण्यातल्या भांडारकर इन्स्टिटय़ूटची नासधुस केली होती. त्यावर संमेलनात काय प्रतिक्रिया उमटते याकडे सर्वाचे लक्ष लागलेले होते. संमेलनात या घटनेचा निषेध व्हायला हवा असा एक मतप्रवाह होता, तर दुसरा अध्यक्षांनी आपल्या भाषणात त्याविषयी बोलावे असे मानणाऱ्यांचा होता. संमेलनावर या तणावाची दाट छाया जाणवत होती. वादविवादापासून कायम चार हात लांब राहणाऱ्या आणि वृत्तीने-प्रवृत्तीने निरागस असणाऱ्या रागंच्या वाटय़ालाच अशी परिस्थिती यावी याची काहींना हळहळ वाटत होती. मात्र, अध्यक्षीय भाषणात भांडारकर वा संभाजी बिग्रेडचा नामोल्लेख रागंनी केला नाही. पण दोन वर्षानी म्हणजे फेब्रुवारी २००६च्या ‘अंतर्नाद’मध्ये ‘अध्यक्षीय हाल(अ)हवाल’ असा दीर्घ लेख लिहून स्वत:च स्वत:च्या अध्यक्षीय कारकिर्दीचा सडेतोड पंचनामा केला. त्याआधी आणि त्यानंतरही असा प्रांजळपणा पाहायला मिळाला नाही. रागंनी त्या लेखाच्या शेवटी लिहिले आहे, ‘संमेलनाचे अध्यक्षपद हे खूप उंचावरचे आसन आहे. अध्यक्षाने तिथे पोहोचले पाहिजे. हे भान मला तरी स्पष्टपणे लगेचच आले नाही. बहुधा अजूनही आले नाही..एखादा भव्यदिव्य योग वाटय़ास यावा आणि दुर्दैवाने त्याची दिव्यभव्यताच आपणाला समजू नये, असे काहीसे झाले असे मला वाटते.’ अध्यक्ष म्हणून ‘आपण नापास झाल्याची’ कबुली रागंनी त्यात दिली आहे.
 रागंचा हा लेख मध्यबिंदू मानून त्यानंतरच्या अध्यक्षांना त्यांच्या मनाचा कौल विचारायला हरकत नाही. खरे तर तो त्यांनी स्वत:हूनच जाहीर करणे अधिक श्रेयस्कर ठरेल. आणि तसे झाले तर मराठी साहित्यात नवी परंपरा सुरू होईल. डिकन्सला  इंग्लंडमध्ये जेवढी प्रतिष्ठा आहे, त्या तोडीची गुणवत्ता संपादन करण्याच्या दिशेने मराठी साहित्यिकांनी टाकलेले ते एक पाऊल असेल.

Saturday, February 4, 2012

साक्षेपी वाचनासाठीचे वस्तुपाठ!

आज संध्याकाळी अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सांगता होईल आणि सालाबादाप्रमाणे या संमेलनाची फलश्रुती काय, हा सनातन प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होईल. त्यावर नेहमीप्रमाणे वाद-विवादही होतील. मग यातून मसावि पार काही निघत नसून लसाविच तेवढा निघतो आहे, असा जुनाच निष्कर्ष काही लोक पुन्हा काढून दाखवतील. पण त्याचबरोबर पुढच्या वर्षीचे साहित्य संमेलन कुठे याचीही हळूच विचारणा करतील. या संमेलनाची गरज आहेच, त्याला नाक मुरडण्याचे काहीच कारण नाही. पण वाचनसंस्कृती आणि ग्रंथसंस्कृती वाढीला लागण्यासाठी आणखीही काही गोष्टींची आवश्यकता असते. त्यातलाच एक भाग म्हणजे बुक ऑन बुक्सया वाङ्मय प्रकारातील पुस्तकांची संख्या वाढणेही तितकेच गरजेचे असते. दुर्दैवाने मराठीमध्ये या प्रकारच्या पुस्तकांची संख्या फारच अल्पस्वल्प आहे.
मराठीत नाटय़छटालिहिणारे दिवाकर, ‘झेंडूची फुलेलिहिणारे केशवकुमार, ‘शतपत्रेलिहिणारे लोकहितवादी, ‘हायकूलिहिणाऱ्या शिरीष पै अशा एकांडय़ा शिलेदारांची परंपरा कुणी चालवायला धजावत नाही. तसंच स्वत:च्या ग्रंथ-शोधाची, ग्रंथ-संग्रहाची आणि ग्रंथ-प्रेमाची मातब्बरी सांगता यावी एवढा साक्षेप संपादन करण्यासाठीही कुणी फारसा पुढाकार घेत नाही. असे म्हणतात की, समाज प्रगल्भ व्हायचा असेल तर त्याची ग्रंथश्रीमती वाढायला हवी. आणि ती वाढवण्यासाठी जास्तीत जास्त ग्रंथमार्गदर्शक, ग्रंथसंग्राहक, ग्रंथस्नेही निर्माण व्हायला हवेत. ती आपल्या समाजासाठी नितांत निकडीची गोष्ट आहे.
 
ग्रंथसंस्कृती आणि वाचनसंस्कृतीच्या बाबतीत आपला समाज गरीबअसणं, आपण गरीबअसणं, ही काही फारशी शोभादायक गोष्ट नव्हे!
 
मराठीमध्ये आजवर ही सांस्कृतिकगरिबी दूर करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून प्रयत्न केले, त्यात अलीकडच्या काळात अरुण टिकेकर यांचा प्राधान्याने उल्लेख करावा लागेल. त्यांच्या अक्षरनिष्ठांची मांदियाळीया पुस्तकाने बुक ऑन बुक्सया मराठीतल्या वाङ्मय प्रकारात अतिशय मोलाची भर घातली आहे.
 
अलीकडच्या काळातले हे अशा प्रकारचे एकमेव पुस्तक असावे! पण अशा पुस्तकांचे मोठेपण उमजण्याएवढा सुज्ञपणा मराठी वाचकांमध्ये अजून आलेला नाही! मात्र असे असले तरी ग्रंथसंस्कृती आणि वाचनसंस्कृतीच्या बाबतीत आपल्याला सुज्ञ करणारे हे पुस्तक आहे.
 पुस्तकांचे वाचन न करताही वैचारिक भरणपोषण होत असलेली माणसे असणार किंवा काही माणसांचा तसा समज असणार! आपण एवढेच म्हणू शकतो की, ती थोर माणसे असणार!
पण ज्यांना आपले वैचारिक भरणपोषण चांगल्या पद्धतीने करायचे आहे, हे जग समजून घ्यायचे आहे आणि झालेच तर इतरांनाही समजावून द्यायचे आहे, त्यांना वाचनाशिवाय पर्याय असत नाही. आपल्या वाचनावर आपली कौंटुबिक स्थिती, आई-वडलांचे संस्कार, शालेय जीवन, आजूबाजूचा परिसर, प्रसारमाध्यमे आणि आपण ज्या देशात राहतो तो देश, यांचा परिणाम होत असतो. त्यानुसार आपल्या वाचनाची वा न वाचनाची दिशा ठरत असते. पण तरीही अगदी समर्थ रामदासांची साक्ष न काढताही असे म्हणता येईल की, वाचनाची लसप्रत्येकाने टोचून घ्यायलाच हवी. त्याला उतारा नाही.
 
अनेक जण हौसेखातर वाचन करतात. शिक्षक-प्राध्यापक-पत्रकार यांना सक्तीने वाचन करावे लागते. पण टिकेकरांच्या शब्दांत थोडा फरक करून सांगायचे तर ते आपल्या लाइफ-स्टाइलमध्ये मुरलं पाहिजे’. पुढे एके ठिकाणी टिकेकर असेही म्हणतात की, ‘माझ्या मतानुसार, आपल्या आवडीच्या, निवडीच्या विषयात आवर्जून केलेलं वाचन हेचं खरं वाचन. असं वाचन हे अभ्यासया वर्गात मोडू शकतं, कारण अशा वाचनातून आपल्या तुटपुंज्या ज्ञानात भर पडू शकते.
 
थोडक्यात वाचनाबाबतही चोखंदळच असले पाहिजे. नुसत्या हौसेला निदान वाचनाच्या बाबतीत तरी मोल नाही. ज्यांना आपले ज्ञान वाढवण्याची जिगिषा आहे, त्यांच्यादृष्टीने तरी! पण ते असो.
 टिकेकरांचे ग्रंथप्रेम हे अनिवार वेडाच्या पलीकडचं आहे!
त्यांनी मी ग्रंथसंग्राहक कसा झालो, दुर्मीळ ग्रंथ-विक्रेते अन् ग्रंथ-संग्राहकांचा स्नेही कसा झालो, कोणते ग्रंथ संग्रही आले, त्या ग्रंथांनी काय दिले, कोणत्या ग्रंथांनी माझ्या विचाराची दिशा बदलली, मला मार्ग दाखवला याविषयीचे विवेचन या छोटय़ाशा पुस्तकात केले आहे.
 
या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या ग्रंथ-शोधया भागात टिकेकरांनी आपल्या 25-30 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रभर आणि अहमदाबाद, दिल्ली, गुरगाव असा शहरांमध्ये घेतलेल्या ग्रंथांच्या शोधांची रसाळ हकिगत सांगितली आहे. त्यासाठी त्यांनी तब्बल 122 पाने दिली आहेत.
 
टिकेकरांनी ग्रंथ-शोधाचा प्रवास सांगताना मुंबईत दुर्मीळ पुस्तकं मिळणा-या ठिकाणांची सफर घडवली आहे, तशी रद्दीच्या ढिगा-यात तासन्तास घालवल्यानंतर मिळालेल्या मौलिक ग्रंथांच्याही कहाण्या सांगितल्या आहेत. महाराष्ट्रबाहेरच्या उत्तम ग्रंथ मिळणाऱ्या अड्डय़ांचाही ठावठिकाणा सांगून टाकला आहे! समानधर्मा ग्रंथ-सोबत्यांविषयीही लिहिले आहे, तसेच थोडय़ाशा उशिरामुळे गेलेल्या ग्रंथांविषयीची रुखरुखही नोंदवली आहे.
 
या पुस्तकातून एकेकाळी मुंबईमध्ये फ्लोरा फाउंटन, ‘न्यू अँड सेकंडहँड बुकशॉप’, ‘स्ट्रँड’, ग्रँट रोड स्टेशनजवळचा सेंट्रल बुक डेपो’, ‘कोकिल अँड कंपनीअसा दुकानांनी जोपासलेल्या ग्रंथसंस्कृतीचीही ओळख करून दिली आहे.
 
ग्रंथांचा शोध हा अज्ञाताच्या शोधासारखा असतो. त्यात कधी काय मिळेल याचा भरवसा नसतो. पायपीट करूनही कधी कधी हाती काहीच लागत नाही, तर कधी ज्याच्या शोधात आपण असतो त्यापेक्षा वेगळेच काहीतरी मिळते. म्हणजे दुसराच शोध लागतो. त्या मिळालेल्या पुस्तकातून आणखी नव्या पुस्तकांच्या वाटा सापडतात. मग त्यांचा शोध सुरू होतो. ही मालिका नव-नव्या आवर्तनांनिशी वाढतच राहते. त्यात कित्येक दिवस, तास आणि वर्षही जातात. टिकेकरांनी या शोधात आपल्या आयुष्याची उमेदीची २५-३० वर्षे घालवली. बऱ्याचदा त्यांना हवी ती पुस्तके मिळाली नाहीत. पण त्याची त्यांनी कधीच पर्वा केली नाही. कारण या सैल भ्रमंतीत त्यांना कितीतरी नव्या पुस्तकांच्या, ग्रंथसोबत्यांच्या ओळखी झाल्या. त्यांच्याशी आपला वाचनानंद वाटून घेता आला.
 
त्यामुळे हा प्रवास काहीसा अडनिडा झाला खरा, पण त्यातून अतिंमत: फायदाच झाला. ग्रंथांचा क्लोरोफॉर्म त्यांना धुंद करत राहिला. अर्थात ती धुंदी जगू पाहणा-यांनाच हा प्रवास करता येतो! मध्ये गळाठून जाणाऱ्यांनी या वाटेला जाऊ नये, हेही तितकेच खरे!
 
पुस्तकाच्या वाचन-बोधया दुस-या भागात, म्हणजे ३३ पानांत, ‘वाचनया विषयावर दिलेले व्याख्यान आहे. यात टिकेकरांनी त्यांना ज्या ग्रंथांनी वाचनानंद दिला,  जगाच्या अज्ञाताची गुपिते समजावून दिली, थोडक्यात ज्यांनी त्यांना प्रभावित केले, त्या ग्रंथांविषयी लिहिले आहे. यासोबत वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी काय करायला हवे, तिचे फायदे काय, याचाही थोडक्यात ऊहापोह केला आहे. ग्रंथ-मार्गदर्शकाची गरज का असते, तो नसला तर काय होते, असला तर काय होते याविषयी सांगत स्वत:च्या वाचनप्रवासाचा चढता आलेख सांगितला आहे.
 
काव्य, कथा, कादंबऱ्या, चरित्र, आत्मचरित्र, तत्त्वचिंतन या वाचनक्रियेच्या चढत्या पायऱ्या आहेत, असं मला वाटतं,’ असे त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे. तो त्यांचा स्वानुभव आहे, तसाच ते जे आजवर वाचन करत आले आहेत, त्यातून त्यांना सापडलेला निष्कर्षही आहे. तो फार मोलाचा आहे. कारण जगात दर मिनिटाला कुठे ना कुठे एक तरी पुस्तक प्रकाशित होते. आपण कितीही ठरवले तरी, अगदी रात्रीचा दिवस करायचा ठरवले तरी, ती सारी पुस्तके वाचणे एका आय्मुष्यात कुणालाच शक्य नाही. (ज्यांचा पुनर्जन्मनामक गोष्टींवर विश्वास आहे, त्यांना दहा जन्म घेऊनही ते शक्य होणारे काम नाही!) आणि त्याची गरजही नसते. मराठीतलीही अगदी सुरुवातीपासूनची सर्व पुस्तके वाचणेही शक्य नाही. आणि वाचूही नयेत. कारण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकच असतो. इतिहासकार शेजवलकरांच्या शब्दांत सांगायचे तर सर्व जन्म एकच एक काम करन्यांत घालविणें हीहि समाजविकृति होय.
 
वाचन हे शेवटी जगाचे आकलन करून घेण्याचे साधन असते. पण हे साधनही योग्य प्रकारे वापरण्याची गरज असते. त्यासाठी मोठा विवेक असावा लागतो. तो कमवायचा कसा, त्याचा प्रवास नेमका कसा व्हायला हवा याचे वस्तुपाठ टिकेकरांच्या या पुस्तकात जागोजागी भेटतात. म्हणून हे पुस्तक मराठीमधील बुक ऑन बुक्सया प्रकारातले एक सर्वोत्तम पुस्तक आहे.
 
2005 साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या आतापर्यंत तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या, हा त्याचा पुरावा आहे!
 टिकेकरांना त्यांच्या वाचन-प्रवासात कुणी ग्रंथ-मार्गदर्शक मिळाला नाही. गोविंद तळवलकरांनी अ लिस्ट ऑफ बुक्स फॉर अ‍ॅडव्हान्स्ड रीडिंगही एम. एम. रॉय यांनी प्रगत वाचकांसाठी तयार केलेली ग्रंथांची यादी दिली. ती वगळता टिकेकरांनी ग्रंथांनाच वाट पुसत आपला वाचन-प्रवास घडवला’, प्रशस्त केला.
पण प्रस्तुत पुस्तक लिहून मात्र टिकेकरांनी मराठी वाचकांना ऋणको करून ठेवले आहे. कारण ज्यांना आपली वैचारिक प्रगती करून घ्यायची आहे, किमान काय वाचावे, कसे वाचावे याचा साक्षेप कमवायचा आहे, त्यांच्यासाठी टिकेकरांचे हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक ठरू शकते. तेव्हा या गुरूचा गंडाबंद शिष्यहोणे अनिवार्य आहे!
 
  • अक्षरनिष्ठांची मांदियाळी : अरुण टिकेकर
  • रोहन प्रकाशन, पुणे
  • पाने : 173, किंमत : 140 रुपये