Tuesday, February 7, 2012

अनपेक्षित यशस्वी संमेलन

चंद्रपूरसारख्या नक्षलवादाने ग्रस्त असलेल्या भागात साहित्य संमेलन घेणे हेच मुळात एक धाडस होते. ते साहित्य महामंडळाने यशस्वीपणे करून दाखवले. संमेलन जाहीर झाल्यापासून नक्षलवादाचा कुणीच बागुलबुवा केला नाही. संमेलनात पहिल्याच दिवशी ‘नक्षलवाद, लोप पावत चाललेली आदिवासी संस्कृती आणि मराठी साहित्य’ असा परिसंवाद होता. त्यात अभय बंग यांनी साहित्यिकांवर चांगलेच तोंडसुख घेतले. संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनीही अध्यक्षीय भाषणात मराठी साहित्यकांना चार खडे बोल सुनावले आणि सेन्सॉरबाह्य सेन्सॉरशिपविषयीही आवाज उठवला. त्यामुळे त्यांच्या भाषणाची तिन्ही दिवस संमेलनात अधूनमधून चर्चा होत राहिली. संमेलन चंद्रपूर शहरापासून किमान पाच-सात किलोमीटर लांब असलेल्या ‘राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालया’त भरवले असल्यामुळे काही गैरसोयी झाल्या. तरीही संमेलनाला आयोजकांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त उपस्थिती लाभली, हे आर्श्चर्यकारक आणि उत्साहवर्धक आहे. गेल्या वर्षी ठाण्यात झालेल्या संमेलनापेक्षा ही संख्या कितीतरी जास्त आणि लक्षणीय होती, हे विशेष. त्यामुळे संमेलनातल्या सर्व कार्यक्रमांना श्रोते लाभले. शिवाय त्याचा फायदा पुस्तक प्रदर्शनातल्या प्रकाशक-विक्रेत्यांनाही झाला, ही त्याहूनही चांगली गोष्ट म्हणायला हवी. या संमेलनात तिथल्या खाद्यपदार्थाची चर्चाही झाली नाही, तेही बरेच झाले! थोडक्यात संमेलन रूढार्थाने सुरळीत पार पडले. कुठल्याही बाष्कळ विषयांवर वाद झडून किंवा सेलेब्रिटींना अनावश्यक महत्व दिल्याने संमेलनाचा साहित्यावरचा फोकस हलण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात बळावले होते. ते यंदा झाले नाहीत आणि संमेलनाच्या व्यासपीठावरूनही कुणी फार काही पोकळ घोषणा-नारे दिले नाहीत. त्यामुळे कुठल्याही वादाशिवाय या संमेलनाची सांगता झाली. पण ही काही आयोजकांनी वा साहित्य महामंडळाने विचारपूर्वक ठरवलेली कृती नव्हती. ते आपसूक घडून आले, हा योगायोगच म्हटला पाहिजे. असे नियोजन करावे, असे महामंडळाने ठरवले पाहिजे आणि त्यानुसार संमेलनाची गुणवत्ता वाढवण्याचा विचारपूर्वक प्रयत्न झाला पाहिजे. म्हणजे मग दरवर्षी संमेलनात ‘मराठीच्या भविष्या’बद्दलची वांझोटी चर्चा न होता काहीतरी रचनात्मक काम करण्याच्या दिशेने पाऊल टाकता येईल. संतसाहित्याशी महामंडळाने 99 वर्षाचा करार केला आहे की काय, तेही कळायला मार्ग नाही. कारण या विषयावर दरवर्षी परिसंवाद असतोच. तो असायला हरकत नाही, पण त्याचा विषय आणि वक्ते यांची तरी विचारपूर्वक निवड व्हावी की नाही? दरवर्षी साधारणपणे तोच निष्कर्ष, अनुमान आणि योगदान सांगितले जाणार असेल तर ते कर्मकांड का करावे? ज्या संमेलनाकडून फारशा कोणाच्या अपेक्षा नव्हत्या, ते केवळ सुरळीतच नव्हे, तर दमदारपणे पार पडल्यामुळे पुढच्या वर्षीच्या संमेलनासाठी आयोजकांना आणखी बळ आले असेल. आगामी संमेलनात ‘स्वच्छता आणि टापटिपी’च्या गुणांबरोबरच साहित्य महामंडळाला थोडी चैतन्याची आणि उत्साहाची भर घालता आली, तर सोन्याहून पिवळे!

No comments:

Post a Comment