Monday, April 23, 2012

वाचन - का, कसे आणि किती?

ग्रंथ हेच गुरू, ग्रंथासारखा सखा नाही, असं म्हटलं जातं. ते खरंही आहे. पण ते कुणासाठी? तर ज्यांना ग्रंथांशी, आपण पुस्तक हा सुटसुटीत आणि सोपा शब्द वापरू, मैत्री करायची तीव्र इच्छा आहे, त्यांच्यासाठी. ज्यांना पुस्तकांशी मैत्रीच करायची नाही, त्यांच्यासाठी ते शत्रूसारखेच परके आणि अनोळखी असतात. चांगला मित्र हाही गुरू असतोच, अशी गुरूची व्याख्या ताणता येऊ शकते. काही लोक तसा प्रयत्न करतातही. पुस्तकांना मित्र करताना किंवा गुरू करतानाही एखाद्या चांगल्या मार्गदर्शकाचा सल्ला-मार्गदर्शन घ्यायला हवं. पण नेमकं हेच लक्षात घेतलं जात नाही. त्यामुळे अनेकांच्या वाचनाची सुरुवात वाट्टेल तशीआणि सुचेल तशीहोते. जे हाती मिळेल ते हे लोक वाचतात, त्याचा फडशा पाडतात. खूप भुकेलेल्या माणसानं खाण्याचे खूप पदार्थ एकाच वेळी पाहून त्यावर तुटून पडावं, तसे सुरुवातीला वाचन करणारे लोक अध्याशासारखे वाचायला लागतात. काही काळापुरतं हे चालतंही, पण वाचनाबाबत काहीएक प्रगल्भता यावयाची असेल तर असं वाचन निरुद्देश आणि निर्थक ठरतं.
 
आपण शाळेत जातो. तिथे वेगवेगळे शिक्षक आपल्याला वेगवेगळे विषय शिकवतात. कॉलेजात गेल्यावर ही विभागणी अधिक काटेकोरपणे होते. म्हणजे त्या त्या विषयातले अभ्यासू प्राध्यापक त्यांचा त्यांचा विषय आपल्याला समजावून सांगतात. आपण ज्या प्रकारचं शिक्षण घेतो, त्यानुसार आपल्याला पुढे नोकरी मिळते. उदा. कलाशाखेचं शिक्षण घेणारा माणूस चांगला चार्टर्ड अकांउंट होऊ शकणार नाही वा याउलट चांगला चार्टर्ड अकाउंट चांगला प्राध्यापक होऊ शकेलच असं नाही. अर्थात एखाद-दुसरा अपवाद असतोच. पण सामग्य्रानं विचार करताना अपवाद गृहीत धरून चालत नाही. असो.
 
..तर शिक्षणाच्या बाबतीत आपण जसे त्या त्या क्षेत्रातल्या अभ्यासू शिक्षकांचं मार्गदर्शन घेतो, तसंच पुस्तक वाचनाच्या बाबतीत घ्यायला हवं. कारण ग्रंथ हेच गुरू’, ‘ग्रंथ हेच मित्रया व्याख्या तशा पाहिल्या तर फार ढोबळ आहेत. म्हणजे त्या चुकीच्या आहेत असं नव्हे, पण त्या परिपूर्ण आणि पुरेशा काटेकोर नाहीत. आपण वाचायला लागू आणि पुस्तकंच आपल्याला मार्गदर्शन करतील, असा समज बाळगणं तितकंसं बरोबर नाही. कारण अशा सैल आणि स्वैर वाचनाचं रेटून समर्थन करणारे लोक कालांतरानं त्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त करतात. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. याची अनेक उदाहरणं आहेत. म्हणून काय वाचावं आणि कसं वाचावं, याचा साक्षेप असायलाच हवा. त्यासाठी चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. अशा मार्गदर्शकामुळे आपल्या वाचनाला निश्चित दिशा मिळते, आपला निर्थक खर्च होणारा वेळ वाचतो आणि अशा नियोजनपूर्वक वाचनाचा चांगला फायदाही होतो. थोडक्यात आपल्याला वाचनाचे विषय ठरवता येतात आणि त्या विषयातलीही कुठली पुस्तकं वाचावीत, याबाबत आपण जागरूक आणि चोखंदळ होतो.
 
पण यावरही काही लोक असा आक्षेप घेतात की, हे म्हणजे चांगल्या आरोग्यासाठी फक्त व्हिटॅमिन्सच्या गोळ्याच खायला पाहिजेत, असं म्हणण्यासारखं आहे! या आक्षेपाचं खंडन करणं फारसं अवघड नाही. मुळात ही तुलना चुकीची आहे. ही काव्यात्म तुलना आहे. त्यात वास्तवापेक्षा चमत्कृतीवर भर आहे. दुसरं, वाचन ही काही उत्स्फूर्त करण्यासारखी क्रिया नाही. ती स्वयंप्रेरणा असू शकते, पण तिला शिस्तीचीही गरज असते. कारण योग्य शिस्त आणि काटेकोर नियोजन ही कोणत्याही यशाची पहिली पायरी असते. शिस्तीच्या जोरावर आपण आपले ध्येय निश्चितपणे गाठू शकतो.
 म्हणून वाचनाच्या बाबतीत प्रगल्भावस्था गाठावयाची असेल तर अशी मार्गदर्शन, शिस्त आणि काटेकोर नियोजन गरजेचंच असतं. तरच त्या वाचनाचा फायदा होतो.शिवाय वय आणि वाचन यांचीही योग्य वेळी सांगड घालायला हवी. बालपण, किशोरावस्था, कुमारावस्था, प्रौढपण आणि वृद्धावस्था हे आपल्या आयुष्याचे टप्पे. यानुसार आपलं वाचन बदलायला हवं. कविता-गोष्टी, कथा-कादंबऱ्या, चरित्र-आत्मचरित्र, वैचारिक साहित्य आणि तत्त्वज्ञानात्मक साहित्य असा चढत्या क्रमानं वाचनाचा प्रवास झाला तर त्या वाचनाला एक निश्चित दिशा आहे असं म्हटलं जातं. वयानुसार आपण जसे बदलत जातो, तो आपल्या जाणिवा प्रगल्भ होत जाण्याचा अपरिहार्य भाग असतो. त्याला आपण योग्य अभ्यासाची, शिस्तीची जोड दिली तर त्या त्या वयात त्या त्या प्रकारच्या विषयांबाबत आपली समज परिपक्व व्हायला मदत होते. त्यासाठी वाचन मोठय़ा प्रमाणावर उपयुक्त ठरू शकतं. त्यामुळे वयाचे टप्पे आणि वाचनाच्या अवस्था यांची सांगड घालायलाच हवी. कारण वाचन शेवटी कशासाठी करायचं असतं? राल्फ स्टेगनर या लेखकानं आपल्या रोडस् टु रीडिंगया पुस्तकात वाचनामागच्या उद्दिष्टांची यादी दिली आहे. ती अशी-
  • एक विधी म्हणून किंवा सवयीमुळे कर्तव्याच्या भावनेतून
  • वेळ घालवण्यासाठी साधन म्हणून
  • वर्तमान घडामोडींचं ज्ञान व आकलन व्हावं यासाठी
  • तात्कालिक, वैयक्तिक समाधानासाठी
  • दैनंदिन जीवनाची व्यावहारिक गरज म्हणून, व्यावसायिक हितासाठी
  • व्यावसायिक वा धंद्यातील गरजेपोटी
  • वैयक्तिक व सामाजिक गरजेपोटी
  • सामाजिक आणि नागरिकी जीवनाची आवश्यकता म्हणून
  • स्वत:चा विकास व्हावा, स्वत:ची सुधारणा व्हावी किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमीचा एक अतूट भाग म्हणून
  • निखळ बौद्धिक गरज म्हणून
  • निखळ आध्यात्मिक गरज म्हणून
व्यक्तीगणिक या उद्दिष्टांमध्ये फरक दिसून येईल. प्रत्येक माणूस एकाच उद्देशानं वाचन करेल, असं नाही. कारण आपलं कुटुंब, शालेय जीवन, प्रसारमाध्यमांचा प्रभाव, वाचनालयांची संख्या, ग्रंथ-व्यापार आणि सरकार या घटकांचा आपल्या वाचनावर प्रभाव पडतो. त्यानुसार आपल्या वाचनाच्या उद्देशांची निश्चिती होते. ते उद्देश वरीलपैकी कोणतेही असले तरीही त्यासाठी चांगल्या मार्गदर्शकाची गरज असतेच.
  

पण असा मार्गदर्शक मिळणार कुठे? कारण वाचणारे लोक आधीच कमी, त्यात चांगले वाचक त्याहून कमी. शिवाय आपल्या अवतीभवती असा मार्गदर्शक असायला हवा. असेल तर त्यानं आपल्याला वेळ देऊन तसं मार्गदर्शन करायला हवं. त्यात वाचन कसं करावं याचे काही अभ्यासक्रम नाहीत आणि क्लासेसही नाहीत. म्हणजे वाचनाबाबत चांगला मार्गदर्शक मिळणं ही शालेयवयात चांगला शिक्षक मिळण्याइतकीच अवघड गोष्ट आहे. पण आपण आपल्या उद्दिष्टावर ठाम असू, त्यासाठी आपल्याकडे पुरेशी तळमळ असेल आणि आपल्याकडे पुरेसे सातत्य असेल तर असा मार्गदर्शक मिळतोच.
 
असा मार्गदर्शक प्रगल्भ वाचक असू शकतो किंवा अशा प्रगल्भ वाचकानं लिहिलेलं पुस्तकही असू शकतं. अशा पुस्तकाचं उदाहरण द्यायचं तर मॉर्टिमर अ‍ॅडलर यांच्या हाऊ टु रीड अ बुकया पुस्तकाचं देता येईल. 1940 साली प्रकाशित झालेले हे पुस्तक द क्लासिक गाइड टु इंटलिजंट रीडिंगमानलं जातं. सध्या या पुस्तकाची सुधारित आवृत्ती बाजारात उपलब्ध आहे. यामध्ये अ‍ॅडलर यांनी वाचनाची कलाकशी आत्मसात करावी याविषयी सांगून पुढे प्रकरणनिहाय व्यावहारिक साहित्य, काल्पनिक साहित्य, कथा-नाटक आणि कविता, इतिहासविषयक पुस्तकं, विज्ञान-गणितविषयक पुस्तकं, तत्त्वज्ञान-समाजशास्त्रविषय पुस्तकं कशी वाचावी, याविषयी अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केलं आहे. वाचन ही कलाआहे आणि ती प्रयत्नपूर्वक आत्मसात करता येते, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केलं आहे. सुरुवातीला उल्लेख केलेल्या राल्फ स्टेगनर लिखित रोडस् टु रीडिंगया आणि अ गाइड टु रीडिंगया लायमन अ‍ॅबॉट व एसा डॉन डिकिन्सन यांनी संपादित केलेल्या पुस्तकांतही वाचनाविषयी चांगलं मार्गदर्शन आहे. 

 तेव्हा वाचक म्हणून प्रगल्भ होण्यासाठी मार्गदर्शकाकडून आपले विषय आणि दिशा निश्चित करून घ्यावी हे उत्तम! 

Sunday, April 22, 2012

पुस्तकांचे शत्रू आणि वाचनाचा बागुलबुवा


पुस्तकं आणि वाचन यांच्याविषयी गैरसमज खूप आहेत आणि फँटसीही. या दोन्हींच्या पलीकडे जाऊन आणि वास्तवात राहून विचार केला तर काय काय दिसतं? त्यातून अनेक तथ्य समजून घेता येतात आणि पुस्तकांचं नेमकं स्थान काय, हेही. या लेखात नेमकं तेच मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बदलतं तंत्र हा काही पुस्तकांचा शत्रू नाही आणि ई-बुक रीडरचं पुस्तकांपुढे आव्हानही नाही.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, 
जागतिकीकरणाच्या गेल्या दोन दशकांमध्ये शेती, सेवा, उद्योग, शिक्षण, आरोग्य, प्रसारमाध्यमं, चित्रपट, संगीत, साहित्य अशा क्षेत्रांमध्ये झपाट्यानं अनेक स्थित्यंतरं झाली. यातल्या काही क्षेत्रांचा तर नव्या तंत्रज्ञानानं अगदी कायापालट करून टाकला आहे. तो केवळ स्तिमित करणारा आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर संगीताचं घेता येईल. एकेकाळी संगीताच्या तबकड्या होत्या. मग एल. पी. आल्या. नंतर कॅसेट निघाल्या. त्यानंतर सी.डी.चं आगमन झालं. आणि आता आयपॉड आणि मोबाइल आलेत. यातल्या प्रत्येक नव्या तंत्रानं आधीचं तंत्र मोडीत काढलं. पण या सर्व प्रवासात संगीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यास मदत झाली. पूर्वी संगीत ऐकण्यावर ब-याच मर्यादा होत्या. पण आयपॉड आणि मोबाइल या दोन्हींनी संगीताला फारच सोयीस्कर आणि सर्वगामी, सर्वसंचारी करून टाकलं. त्यामुळे संगीत ही कुठेही, केव्हाही ऐकण्याची गोष्ट झाली. लोकही त्याचा फायदा घेऊ लागले. लोकल, बस, शाळा-कॉलेज, ऑफिस, घरी, प्रवासात अगदी टॉयलेटमध्ये असतानाही आता संगीत ऐकता येतं. लोक ते ऐकतातही.
 
तंत्रज्ञानानं संगीताच्या बाबतीत ही जी काही उलथापालथ घडवली आहे, ती लोकांच्या संगीताविषयीच्या दबावामुळे घडली नसून त्या त्या क्षेत्रातल्या शक्यता तपासण्याच्या महत्त्वाकांक्षेतून घडली आहे. या नवनव्या तंत्रामुळे संगीताची उपयुक्तता वाढली आणि ते सहजसाध्य झालं, म्हणून त्याचा वापर वाढला. असे बदल काही क्षेत्रांबाबत झपाट्यानं होतात, तर काही क्षेत्रांमध्ये धीम्यागतीनं. 

आज लोक ज्या गतीनं आणि पद्धतीनं संगीत ऐकतात, ते संगीताचे खरोखरच एवढे आणि इतके चाहते आहेत का? आणि होते का? तर नक्कीच नाही. पण ते आता सहजासहजी उपलब्ध आहे म्हणून बरेचसे लोक सतत कानाला इअरफोन लावून ते ऐकत असतात. ही सोय त्यांना वीसेक वर्षापूर्वी मिळाली असती तर तेव्हाही त्यांनी असंच केलं असतं.
 
कुठलंही नवं माध्यम आलं की, त्याचे फायदे आणि तोटे सांगणारे लोक पुढे येत असतात. म्हणजे स्वागत करणारे आणि विरोध करणारे. सिनेमा कृष्णधवल होता. पुढे त्याचं रंगीत तंत्र विकसित झालं. पण व्ही. शांताराम यांच्यासारख्या तेव्हाच्या आघाडीच्या दिग्दर्शकानं सुरुवातीला त्याला विरोध केला. आणि आपले एक-दोन चित्रपट हक्कानं कृष्णधवल बनवले. पण या नव्या तंत्राचा रेटा इतका जबरदस्त होता की, शांताराम यांनाही पुढचे सिनेमे रंगीत करावेच लागले. म्हणजे तंत्राची ताकद आंधळी असते. तिला चांगलं-वाईट यांच्याशी देणंघेणं नसतं. ते वरदान नसतं तसंच शापही नसतं. तुम्ही त्याचा कसा वापर करता, त्यावर ते अवलंबून असतं.

पुस्तकांच्या व्यवहारामध्ये म्हणजे प्रकाशन व्यवहारामध्येही त्याचा शोध लागल्यापासून म्हणजे पंधराव्या शतकापासून आत्तापर्यंत अनेक स्थित्यंतरं झाली आहेत. त्यातल्या छपाई, डीटीपी, प्लेट मेकिंग, बाइंडिंग, डिझाइन, विक्री, वितरण, जाहिरात अशा सर्वच तंत्रामध्ये खूप बदल झाले आहेत, होत आहेत. आताच्या पिढीला शिळा प्रेस, खिळा प्रेस ही काय भानगड आहे, हेही माहीत असायचं कारण नाही. 

पण या सर्व प्रकारात छापील पुस्तकांविरोधात आजवर कुठलंही तंत्र दंड ठोकून उभं राहिलं नव्हतं. ते आता ई-बुक रीडरच्या माध्यमातून उभं राहिलं आहे. त्यामुळे छापील पुस्तकांचं भवितव्यच धोक्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि ती केवळ मराठीतच नाहीतर जगभरात सुरू झालेली आहे. काही अतिउत्साही आणि काही चिंतातूर लोक त्याविषयी प्रेमानं आणि काळजीनं चर्चा करू लागली आहेत. ई-बुक रीडरचे फायदे सांगणं सुरू झालं आहे. त्यात एकाच वेळी काहीशेच नव्हे तर काही हजार पुस्तकं कशी मावू शकतात, तो कुठंही, कसाही नेता येतो, कुठंही, कसाही ‘उघडून’ वाचता येतो वगैरे वगैरे. त्याकडे वळण्याआधी यापूर्वी कुणाकुणाला पुस्तकांचे शत्रू म्हणून उभं करण्याच्या प्रयत्न झाला ते पाहू.


 
पुस्तकांचे शत्रू?

टीव्ही आल्यावर मुलांचं सततचं टीव्ही पाहणं पाहून ती आता पहिल्यासारखी पुस्तकं वाचत नाहीत, अशी आधी कुजबूज, मग तक्रार आणि नंतर हाकाटी सुरू झाली. पण जरा बारकाईनं पाहिलं तर टीव्हीमुळे पुस्तक वाचनावर फारसा काही परिणाम झाल्याचं दिसत नाही. उलट दिवसेंदिवस पुस्तकांचा खप वाढतच आहे. 
 
संगणकामुळेही अनेक लोकांचा रोजगार बुडेल, लोक बेरोजगार होतील अशी ओरड करण्यात आली होती. पण तसं काही झालं नाही. उलट संगणकामुळे कितीतरी नवे रोजगार निर्माण झाले, त्याची त्याआधी कुणी कल्पनाही केली नव्हती. 

नव्वदच्या दशकात इंटरनेट आलं. त्यानं प्रत्येक वेळी छोटे छोटे संदर्भ पाहण्यासाठी ग्रंथालयात जाण्याचा त्रास वाचवायला सुरुवात केली. त्यावर बातम्या, छायाचित्रं, लेख, पुस्तकं, कोश उपलब्ध होऊ लागले. तेव्हा इंटरनेटमुळे आता पुस्तकांच्या वाचनावर परिणाम होईल, अशी ओरड सुरू झाली. पण गेल्या बारा-पंधरा वर्षात तसं काही झालं नाही. उलट इंटरनेटमुळे लोकांची माहितीची भूक आणखीनच वाढली. कारण माहिती मिळवणं सोपं झालं. त्यामुळे लोक इंटरनेटवर ब-याच गोष्टींसाठी अवलंबून राहू लागले. त्यातून वाचनाच्या दिशा विस्तारायला मदतच झाली. 

अशीच चर्चा काही वर्षापूर्वी वर्तमानपत्रांच्या रविवार पुरवण्यांची होती. वीस-पंचवीस वर्षापूर्वीच्या मराठी वर्तमानपत्रांच्या रविवार पुरवण्या पाहिल्या तर दिसतं की, त्यामध्ये साहित्य-कला-संस्कृती यांना महत्त्वाचं स्थान होतं. अनेक मान्यवर लेखक त्यामध्ये लिहीत असत. त्यामुळे त्यांचा दर्जा चांगला होता. पुस्तकांच्या खपावर त्याचा परिणाम व्हायला हवा होता खरं तर. पण तो फारसा झाला नाही. या पुरवण्या साप्ताहिकांचं काम करू लागल्या, त्यामुळे काही साप्ताहिकं मात्र बंद पडली. पण वर्तमानपत्रांनी आठवड्याच्या शेवटी या पुरवण्या द्यायला सुरुवात केल्यानं एकंदर साप्ताहिकांची संख्या वाढली, असंच म्हणावं लागेल. या पुरवण्यांमुळे लोकांचा साहित्याशी परिचय होऊ लागला, सतत संपर्क येऊ लागला. त्याचा परिणाम त्यांना पुस्तकांकडे वळण्यात झाला. जागतिकीकरणाच्या काळात वर्तमानपत्रं आणि त्यांच्या पुरवण्या यांनी आपला साहित्यकेंद्री परीघ बदलून तो समाजकेंद्री केला. तेव्हा त्यावर थोडीफार टीका झाली. पण हा बदल काळानुरूप असल्यानं तो रास्तच होता. 

न्यूज चॅनेल्स आल्यावर आता वर्तमानपत्रांचं काही खरं नाही, त्यांचा खप कमी होईल अशी चर्चा झाली. पण आज काय परिस्थिती आहे? उलट वर्तमानपत्रांचा खप वाढतो आहे. न्यूज चॅनेल्समुळे लोकांना महत्त्वाच्या बातम्या कळायला दुस-या दिवसाच्या सकाळपर्यंत थांबावं लागत नाही. ते त्यांना लगेच कळतं. पण तेवढ्यावर त्यांचं समाधान होत नाही. त्यांना त्या घटनेची इत्थंभूत माहिती हवी असते. म्हणून ते दुस-या दिवशी हमखास वर्तमानपत्र घेतात. म्हणजे न्यूज चॅनेल्सचा वापर ट्रेलरसारखा केला जातो. दुसरं असं की, न्यूज चॅनेल्स आणि वर्तमानपत्रं हे काही प्रतिस्पर्धी नाहीत. दोघांचं काम बातम्या सांगणं हेच असलं तरी. चॅनेल्सना माहिती ताबडतोब लोकांपर्यंत पोहचवायची असते, तर वर्तमानपत्रांना ती अधिक नीटनेटकी, सर्व तपशीलांसह द्यायची असते. शिवाय त्या बातमीच्या मागची बातमी सांगायची असते. घटना, घडामोडीचं विश्लेषण करायचं असतं. काही विषयांकडे कसं पाहावं हे सांगायचं असतं, भाष्य करायचं असतं. त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ असतो. त्यामुळे चॅनेल्स आणि वर्तमानपत्रं ही एकमेकांना पूरकच ठरली.

थोडक्यात टीव्ही, इंटरनेट, न्यूज चॅनेल्स, वर्तमानपत्र यापैकी कुठल्याही माध्यमानं पुस्तकांचं नुकसान केलेलं नाही. उलट ती अंतिमत: पुस्तकांना पूरकच ठरली आहेत. कारण माहिती-मनोरंजनाचं तंत्र या माध्यमांनी अधिकाधिक सोपं करण्याचं काम केलं.

मग आता पुस्तकांचं भवितव्य धोक्यात वा वाचनाला ओहोटी अशी हाकाटी का होते? तर काही लोक मुळातच तंत्रशरण असतात. उपयुक्ततेचा पुरस्कार करण्यातून ते तंत्राच्या आहारी जातात. त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात आणि इतरांना त्यातून ‘गिनीपिग’ मिळतो. पण या दोन्ही गोष्टी तात्पुरत्या असतात. कारण नवं तंत्र आलं की, हे लोक आधीचं टाकून नव्याचा स्वीकार करतात. आता लेखनासाठी किती लोक टाइपरायटर वापरत असतील, या एका उदाहरणावरून याचा अंदाज येईल. मग या हाकाटीला जबाबदार कोण?

घटन, वास्तव आणि सत्याची सरमिसळ

जगात जरा काही खुट्ट झालं की, पत्रकार आणि सर्जनशील लेखक (क्रिएटिव्ह रायटर) तर्कवितर्क लढवण्यात सर्वात पुढे असतात. पत्रकारांना एकाच विषयावर फार काळ राहता येत नाही. ते काही दिवसांनी दुसरीकडे वळतात. पण सर्जनशील लेखकांचं तसं नसतं. त्यामुळे टीव्ही, वाहिन्या, संगणक, इंटरनेट, न्यूज चॅनेल्स, मोबाईल, आयपॉड, जागतिकीकरण.. अगदी वैज्ञानिक प्रगतीचं कुठलंही उदाहरण घ्या, त्याला सर्वात जास्त विरोध करण्यात सर्जनशील लेखक पुढे असल्याचं दिसेल. केवळ मराठी लेखकच नाही, तर भारतातल्या आणि जगातल्या सर्व भाषांमधल्या सर्जनशील लेखकांमध्ये हे सापडतं. 

याचं मुख्य कारण हे आहे की, या लेखक मंडळींचं जगाबद्दलचं आकलन नेहमीच अपुरं राहिलेलं आहे. त्यांना व्यापक परिप्रेक्ष्यात पाहता येत नाही आणि सामग्य्रानं विचारही करता येत नाही. ते कथा-कादंब-यांमध्ये स्वत:च्या, शेजा-याच्या, आजूबाजूच्या इतर पन्नास लोकांच्या अनुभवांची सरमिसळ करतील. त्यातून एक व्यापक चित्र मांडण्याचा त्यांचा दावा असतो, पण त्यात घटना (Fact), वास्तव (Reality) आणि सत्य (Truth) यांची सरमिसळच जास्त असते. त्यांना एकेका व्यक्तीचा सुटासुटा विचार करता येतो, पण अनेक व्यक्तींचा एकसमयावच्छेदेकरून विचार करता येत नाही. शिवाय कुठल्याही एका व्यक्तीच्या अनुभवाला मर्यादा असतात आणि कुठल्याही एकाच व्यक्तीच्या अनुभवाचे सामाजिक सिद्धांत होत नसतात. पण यादृष्टीनं सर्जनशील लेखकांनी स्वत:ला विकसित केलेलं नसतं. त्यामुळे आपले वैयक्तिक अनुभव किंवा इतरांचे तसेच अनुभव घेऊन त्यावरून ते निष्कर्ष काढतात.
 
शिवाय सुखात्मिका आणि शोकांतिका याच दोन परिघात ते साहित्याची मांडणी करतात. मानवी जगणं या दोन लंबकापुरतंच मर्यादित नसतं. ते त्यापलीकडेही खूप काही असतं. त्यात सुखात्मिका असते, तशी शोकांतिकाही असते आणि त्याशिवायही खूप काही असतं. त्यामुळे एकंदर संपूर्ण समाजाचा विचार केला तर या गोष्टी तशा सामान्य असतात. पण सर्जनशील लेखक ते लक्षात घेत नाहीत. 

हिंदीमध्ये ‘ब्रेक के बाद’ नावाचा एक कथासंग्रह आहे. टीव्हीमुळे माणसांच्या जगात काय काय दुष्परिणाम झाले, याचं काहीसं भयावह चित्र त्यातल्या कथांमधून रंगवलं आहे. त्यात पंकज मित्रा यांची ‘पडम्ताल’ नावाची एक कथा आहे. तिची सुरुवातच अशी आहे, ‘और किशोरीरमण बाबू यानी मेरे पडमेस के घर के बडम बाऊ जी घर में रंगीन टीवी सेट आने के आठ दिनों के बाद ही मर गए.’ या सुरुवातीवरूनच कुठल्याही सुज्ञ माणसाच्या लक्षात येईल की, ही सरळ सरळ फँटसी आहे. 

एकंदर सर्जनशील साहित्य हे थोड्याफार फरकानं अशा फँटसीसारखंच असतं. कारण मानवी जगणंच मुळात इतकं व्यामिश्र आणि अनाकलनीय असतं की, त्याबाबतची कोणतीच शक्यता नाकारता येत नाही आणि गृहीतही धरता येत नाही. म्हणूनच तर सर्जनशील साहित्याची निर्मिती होते.
 
..आणि पुस्तकं म्हणजे केवळ सर्जनशील साहित्य नव्हे. वाचक म्हणून प्रगल्भता गाठायची असेल तर कथा-कादंब-या-कविता यांच्यापासून शक्य तेवढं लांब राहिलं पाहिजे. समाजाचं आणि जगाचं आकलन करून घेण्यासाठी त्यांचा काहीच उपयोग नसतो.
 
चांगल्या जगण्याचा सतत युटोपिया करत राहणं ही मानवी जगण्याची मूलभूत प्रेरणा आहे. माणसं जन्माला येतात ती का? आणि मरतात ती का? या प्रश्नाची उत्तरं अजून वैज्ञानिक कसोट्यांवर शोधली जायची बाकी आहेत. तोपर्यंत जन्माला येणा-या, जन्मलेल्या माणसांनी काय करायचं? तर त्यांनी चांगल्या जगण्याचा युटोपिया करत राहायचा. ते काम नेहमी साहित्यानं केलं आहे. आणि त्याला वास्तवाचा, इतिहासाचा, भूगोलाचा, तर्कनिष्ठ विचारांचा आणि वैज्ञानिक प्रगतीचा आधार देण्याचं कामही साहित्यानंच केलेलं आहे.
 
साहित्यच श्रेष्ठ का?

साहित्याला एकाच वेळी इतिहासाचं डायमेन्शन असतं तसं भूगोलाचंही. शंभर-दोनशे वर्षापूर्वीचा काळ कसा होता आणि आजचा कसा आहे, झांजिबार वा क्युबामधले लोक कसे आहेत, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी काय आहेत, त्यांच्या प्रथापरंपरा काय आहेत, त्यांच्या देवदेवता, आवडीनिवडी, हे सारं पुस्तकांच्या माध्यमातून समजून घेता येतं. त्याच्याशी समरस होता येतं. जसं माणसांच्या बाबतीत तसंच प्राणी, पशू-पक्षी, नद्या, पर्वत, समुद्र, समुद्राखालचं जग, आकाशातलं जग, सारं काही पुस्तकांच्या माध्यमातून जाणून घेता येतं. इतिहास-भूगोल-तत्त्वज्ञान-समाजशास्त्र-मानसशास्त्र-राज्यशास्त्र-अर्थशास्त्र-विज्ञान-अध्यात्म-पर्यावरण..जगातलं जे जे काही आहे ते ते पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला घरबसल्या समजून घेता येतं. त्यासोबत मनानं का होईना वावरता येतं. म्हणूनच साहित्य सर्व ललितकलांमध्ये श्रेष्ठ मानलं जातं.
 
पण जग समजून घेण्याची महत्त्वाकांक्षा काही सर्वानाच असत नाही. आणि ज्यांना असते त्यांनाही ते पूर्णपणे समजून घेता येतं असं नाही. आपल्या सभोवतालचं जग नेमकं कसं आहे, याची नीट माहिती नसते, तोपर्यंतच लोक ते समजून घेण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असतात. जगाच्या अफाटतेचा अंदाज यायला लागला की, पहिल्यांदा काय लक्षात येत असेल तर आपलं क्षुद्रपण! कारण केवळ अंदाज आल्यावर जाणीव होते की, हे जग पुरतं समजून घेणं आपल्याला शक्य नाही. पण या जाणीवेपर्यंत पोहचण्यातही अनेकांची आयुष्य खर्ची होतात. जे लोक फारच कर्तृत्ववान, बुद्धिमान आणि प्रतिभावान असतात, त्यांनाही जगाचे केवळ काही तुकडेच समजून घेता येतात. आणि ते पुढच्या पिढ्यांना समजून देण्यात त्यांची आणि त्यांच्या नंतरच्या काही पिढ्यांची आयुष्य खर्ची पडतात. अशा कैक पिढ्या आतापर्यंत खर्ची पडल्या आहेत, पण जगाच्या तळाचे काही कोपरेही अजून माणसाला नीट समजून घेता आलेले नाहीत.
 
वाचनाची फँटसी

..मूळ मुद्दयावर येऊ. मुद्दा आहे पुस्तकांचा. शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, लेखक, संशोधक, शास्त्रज्ञ, अशा बुद्धिजीवी लोकांचं वाचन सर्वसामान्यांपेक्षा जास्त असणं साहजिक असतं. कारण तो त्यांच्या कामाचा, व्यवसायाचा भाग असतो. त्यामुळे त्यांचं कौतुक जरूर वाटावं, पण वैषम्य वाटण्याचं काहीच कारण नाही. हे वाचणारे लोकही खूप वाचतात असंही नाही. दिवसाचे सतरा-आठ तास वाचन करणं ही केवळ फँटसीच आहे. इतकं वाचन करणं कुणालाही शक्य नसतं आणि त्याची गरजही नसते.
 
तसं पाहिलं तर कुणालाही त्याच्या संबंध आयुष्यात फार पुस्तकं वाचणं शक्य नसतं. उदा. एका माणसाचं सरासरी वय शंभर वर्षे धरू. वयाच्या दहाव्या वर्षी तो वाचायला लागला असं गृहीत धरू. दिवसाला एक पुस्तक वाचणं दिवसाचे चोवीस तास वाचन करूनही शक्य होणार नाही. अगदी पट्टीचा वाचकही आठवड्याला किमान दोन तर कमाल चार-पाच पुस्तकं वाचू शकतो. म्हणजे वर्षभरात 104 आणि फार फार तर दुप्पट-अडीच पट पुस्तकं वाचून होतील. वयाच्या ऐंशीपर्यंत हा आकडा दोन लाखांपर्यंत जाईल. पण एवढा नित्यनेम अगदी पट्टीच्या वाचकालाही शक्य होत नाही.
 
मराठीमध्ये दरवर्षी सर्व प्रकारची किमान आठ-दहा हजार पुस्तकं प्रकाशित होतात. 1805साली पहिलं मराठी पुस्तकं छापलं गेलं, तेव्हापासून मुद्रितस्वरूपात छापल्या गेलेल्या पुस्तकांची संख्या काही लाखांच्या घरात भरेल. (त्यातही सुरुवातीच्या काळात फार पुस्तकं प्रकाशित होत नव्हती, जी अलीकडच्या काळात कितीतरी वेगानं प्रकाशित होत आहेत, हे गृहीत धरूनही.) म्हणजे केवळ मराठीतीलही सर्व पुस्तकं वाचणं कुणालाही शक्य नाही. मग जगातली सर्व पुस्तकं वाचण्याची तर गोष्टच करायला नको.

कारण जगात दर सेकंदाला कुठे ना कुठे एकतरी पुस्तकं प्रकाशित होतंच. ती सगळी पुस्तकं नुसती पाहायची म्हटली तरी शक्य नाही. 

मुळात हेही लक्षात घेतलं पाहिजे की, पुस्तकं वाचणं हे काही कुणाही माणसाचं अंतिम ध्येय असत नाही, असू नये. ते एक साधन असतं, आपल्या क्षेत्रातल्या माहिती, भारदस्त शब्द वापरायचा तर ज्ञान, नवनव्या गोष्टी, जाणून घेण्याचं. आपण ज्या विषयात काम करतो आहोत, त्याबाबत अपडेट राहण्याचं. 

पण वाचनाविषयीच्या वरील गैरसमजामुळे ज्यांचा एरवी पुस्तकांशी फार संबंध येत नाही, असे लोक हे आपल्याला झेपणार नाही म्हणत पुस्तकांच्या वाट्याला जात नाहीत. त्यामुळे अंतिमत: त्यांचाही तोटा होतो आणि समाजाचाही. 

ही तर समाजविकृतीच

मुळात पुस्तकांचं वेगळेपणही समजून घेतलं पाहिजे. कोणतंही पुस्तक एकदा वाचून झालं की, त्या व्यक्तीपुरतं त्याचं महत्त्व संपतं. (काही पुस्तकं ही पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटतात, असं काही लोक म्हणत असतात. ते लोक जेवढ्या वेळा एकच पुस्तक परत परत वाचतात, तेवढी नवी पुस्तकं वाचण्यापासून दुरावतात हेही खरं.) अशा वेळी ते आपल्याकडेच ठेवण्यात पॉइंट नसतो. ते दुस-याला वाचायला देऊन टाकावं, त्यानंही त्याचं वाचून झालं की आणखी कुणाला तरी देऊन टाकावं. असं झालं तर पुस्तकांचा यथायोग्य उपयोग होतो आणि त्यांचा प्रसारही होतो. पण इथंच माणसाचा स्वार्थीपणा आड येतो. तो आपली कुठलीच गोष्ट सहसा इतरांना द्यायला तयार होत नाही. स्वत: विकत घेतलेलं पुस्तकही इतरांना देत नाही. यातून त्याचा हावरेपणा आणि चेंगटपणा उघड होतो.
 
त्यामुळे खूप वाचणा-या लोकांकडे पुस्तकं साठत जातात. आणि तेवढी पुस्तकं बाजारातून बाद होतात. शिवाय ज्यांची प्रत्येक पुस्तक विकत घ्यायची ऐपत नसते, त्यांना पुस्तक वाचणं शक्य होत नाही. म्हणून ग्रंथालयं, वाचनालयं निघाली. त्यामुळे वाचन काही प्रमाणात वाढलं. नंतर इंटरनेटमुळे वाढलं. पाचपन्नास वर्षापूर्वी वाचणारे लोक किती होते? फार तर दोन टक्के. मधल्या काळात शिक्षणाचा सर्वत्र प्रसार झाल्यानं ते प्रमाण आधीपेक्षा कितीतरी वाढलं. आता ई-बुक रीडरमुळे ते आणखी वाढायला मदत होईल. सध्या तर कधी नव्हे एवढी परिस्थिती अनुकूल आहे. त्याचा फायदा उठवण्यात प्रकाशक-विक्रेतेच कमी पडत आहेत. ई-बुक रीडर सध्या तब्बल 10,000 हजार रुपयांपर्यंत खाली आले असले तरी, ते सर्वाना परवडतील असे नाहीत. आणि त्यांच्याबाबतीत मोबाइलमध्ये झाली तशी किमतीची जादूई घडामोड होण्याची शक्यताही दिसत नाही. कारण ती अजूनही आपल्या आयुष्यातली नडीव गोष्ट नाहीत. खरं तर व्हायला हवीत. 
 
कारण कुठलाही माणूस जन्मत: अडाणीच असतो. त्याला सर्व प्रकारची शिक्षणं घेत स्वत:ला समृद्ध करत राहावं लागतं. पण ही प्रेरणाही सर्वानाच सर्वकाळ सारख्याच प्रमाणात राहिल असंही नाही. प्रत्येकाची कौंटुबिक परिस्थिती, आजूबाजूची परिस्थिती, तो राहतो तो समाज, त्याच्या चालीरीती, प्रथा-परंपरा, नीतिनियम, त्याची प्रगल्भता या सर्वावर त्याची जडणघडण अवलंबून असते. पण या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाण्याची संधी आणि वय प्रत्येकाला मिळतंच. म्हणूनच प्रत्येकानं आयुष्यात सर्व गोष्टी केल्या पाहिजेत, शिकल्या पाहिजेत. कारण आयुष्यभर केवळ एकाच प्रकारचं काम करणं ही समाजविकृती आहे. (आयुष्यभर केवळ लेखन, वाचन आणि मनन करणं हीही समाजविकृतीच आहे, असं इतिहासकार शेजवलकर म्हणतात.) त्यामुळे सर्वानी सर्व प्रकारची, निदान शक्य तेवढय़ा प्रकारची कामं केली पाहिजेत आणि शक्य तेवढे छंदही जोपासले पाहिजेत. एकाच वेळी या सर्व गोष्टी करता येतील असं नव्हे, पण क्रमाक्रमानं का होईना केल्या पाहिजेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा सर्वागीण विकास व्हायला मदत होईल आणि त्यातून समाजाचाही विकास होईल. 

एकदा का हे समजून घेण्याच्या प्रयत्न केला तर बरेचसे प्रश्न सोपे होतील. मग वाचनाच्या बागुलबुवाला आपण आता घाबरतो तसं घाबरणार नाही. कारण तंत्रज्ञानानं कितीही नेत्रदीपक प्रगती केली तरी ते ज्ञानाला पर्याय होऊ शकणार नाही, होऊ शकत नाही, हे जाणून घेण्याची गरज आहे. आणि माहिती-ज्ञान मिळवण्याचा अजूनही सर्वात सोयीचा आणि निधरेक मार्ग पुस्तकंच आहेत. त्यामुळे प्रत्येकानं आपल्याला जमेल तसं, जमेल तितकं आणि जमेल तेव्हा वाचन केलंच पाहिजे. पुस्तकांच्या वाचनाशिवाय निदान सध्या तरी माणसाला सद्गती नाही. 
 

Saturday, April 21, 2012

'मराठा समाज'ची दुसरी आवृत्ति

मी आणि सुशीलने संपादित केलेल्या 'मराठा समाज'ची दुसरी आवृत्ति प्रकाशित झाली.

Monday, April 16, 2012

मराठी विनोदातला शुभशकुन

बब्रुवान रुद्रकंठावार हे मराठवाड्यातील अलीकडे विनोदी लेखन करू लागलेले लक्षवेधी साहित्यिक. त्यांचं या आधीचं बर्ट्रांड रसेल विथ देशी फिलॉसॉफीहे विनोदी लेखांचं पुस्तक बरंच नावाजलं गेलं. त्यानंतरचा त्यांचा हा संग्रहही लक्षवेधी आणि त्यांच्या लेखनाचं सामर्थ्य जाणवून देणारा आहे. पण गंमत म्हणजे दोन पुस्तकं प्रकाशित होऊनही हे बब्रुवान रुद्रकंठावार आपल्या मूळ अवतारात उतरायला तयार नाहीत असं दिसतं. म्हणजे बब्रुवान रुद्रकंठावार हे त्यांचं टोपणनाव आहे. या नावाचा कुणीही माणूस मराठवाड्यात नाही. तर त्या नावानं लेखन करणारी वेगळीच व्यक्ती आहे, हे आता बहुतेकांना कळून चुकलं आहे. तर ते असो.
 
या रुद्रकंठावार यांच्या लेखनाची काही वैशिष्ट्यं सांगायची तर तिच्यात मराठवाडी त-हेवाईक बेरकीपणा प्राध्यान्यानं दिसतो. मराठवाड्यातील सर्वसामान्य माणसं काही फारशी हिंग्लिश बोलत नाहीत, पण रुद्रकंठावार यांची पात्रं सराइतपणे मराठीवाडी वळणाचं हिंग्लिश बोलतात. ती भाषा त्यांच्या तोंडी कुठंही कृत्रिम वाटणार नाही, याची काळजीही रुद्रकंठावार घेतात. त्यामुळे ग्रामीण पात्रं आणि त्यांची वैश्विक समज यांचं अफलातून मिश्रण रुद्रकंठावार यांच्या लेखनात वाचायला मिळतं.
 
प्रस्तुत संग्रहात एकंदर अठरा लेखांचा समावेश आहे. या प्रत्येक लेखाच्या शीर्षकात एक तरी इंग्रजी शब्द आहे. लेखात तर इंग्रजी शब्दांचा सढळ म्हणावा इतका वापर आहे. काही ठिकाणी तो फार बेमालूमपणे येतो. सुटय़ासुटय़ा लेखांत तर तो जाणवतही नसणार. पण पुस्तक सलग वाचताना ते प्रकर्षाने जाणवत राहतो. पण तरीही प्रस्तुत लेखकाचा विनोद खास त्याचा मराठवाडी बाणा कुठंही सुटू देत नाही, हेही नमूद करण्याजोगं आहे.
 
विनोदी लेखकाचं जे प्रधान वैशिष्टय़ असतं, त्यात त्याच्या भाषेचा मोठा वाटा असतो. लेखकानं मराठवाडय़ातील अनेक बोलीभाषा, त्यांची ढब, लकब यांची स्वत:च्या लेखनासाठी एक स्वतंत्र भाषा तयार केली आहे. ग्रामीण लोकांकडे वरवर असणारा साधेपणा आणि क्षणार्धात स्वभावत: येणारा बेरकीपणा या गोष्टी हे या लेखकाचं दुसरं बलस्थान आहे.
 
शिवाय लेखकाची ही पात्रं, विशेषत: बब-या, जी समज आणि बेरकीपणा दाखवतात, तो इरसालपणाच्या पातळीवर जाणारी असल्यानं त्यांचं लेखन वाचकाला पकडून ठेवतं. आता हा इरसालपणा नोंदवायचा तर कथा तपशीलबहुल असून चालणार नाहीत. त्यामुळे लेखकाच्या या कथांमध्ये/खरं तर लेखांमध्ये संवादांवर जास्त भर आहे. हे लेख बहुतांश संवादमय आहेत. वर्णनं करण्यात लेखक कुठंही स्वत:चे शब्द आणि वाचकांचा वेळ वाया जाऊ देत नाही. तो थेट मुद्दय़ाला हात घालतो. त्यातून त्याला सांगायची असते, ती गोष्ट तो सांगतोच, पण ती उलगडतो संवादातून. त्यामुळे त्यात एक प्रकारचा ठसका येतो. त्यातून खूप गमतीजमती घडतात अणि आपोआपच विनोदनिर्मिती होते. पण लेखकाचा अजूनही भर फक्त विसंगती शोधण्यावरच आहे की काय, अशी शंकाही चाटून जाते.
 
खरं तर असं संवादात्मक लिहिणं आणि तोच फॉर्म सतत वापरणं हे काही सोपं काम नाही. त्यासाठी भाषेवर हुकूमत हवी. विषयाच्या लांबी-रूंदीचं अचूक टायमिंग हवं आणि कुठं थांबायचं आणि कुठं नाही, याचंही व्यवधान सांभाळता यायला हवं. या सर्वामध्ये लेखक आता पारंगत होत असल्याच्या खुणा या संग्रहात जागोजागी जाणवतात.
 त्यामुळे या पुढच्या काळात बब्रुवान रुद्रकंठावार यांना स्वत:च्या मूळ नावाबरहुकूम अवतरून लेखन करायला हरकत नसावी. त्यांनी जाणकार वाचकांचं कधीचंच लक्ष वेधून घेतलं आहे, पण सर्वसामान्य वाचकांमध्येही स्वत:चं स्थान ते धिम्या गतीने का होईना, पक्कं करत आहेत. हा मराठी विनोदी लेखनातला शुभशकुन मानायला हवा. आणि तो वर्धिष्णूही व्हायला हवा. विनोदी लेखकाला सातत्य पाळावं लागतं आणि आपल्या लेखनाचा आलेख नेहमी चढता ठेवावा लागतो, या दोन कसरती त्याला करता आल्या तर मग त्याला मागे वळून पाहण्याची फुरसत वाचकच देत नाहीत. बब्रुवान रुद्रकंठवार यांच्या बाबतीत तशा शक्यता या दुस-या संग्रहाने खुणावू लागल्या आहेत, एवढं मात्र निश्चितपणाने म्हणता येतं.  
ट-या, डिंग्या आन गळे : बब्रुवान रुद्रकंठावार
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 
पाने : 168, किंमत : 150 रुपये

Monday, April 9, 2012

ज्या वयात प्रेमात पडायला पाहिजे होते तेव्हा पडलो नाही!

' चेहरे बोलतात, डोळे बोलतात' असा एक लेख काही वर्षांपूर्वी आमचे मित्र विनय हर्डीकर यांनी लिहिला होता. त्यात लग्न या विषयावर घनघोर आणि धीरगंभीर चर्चा करून झाल्यावर एके दिवशी एक परिचित महिला लेखकाला सांगते की, 'लग्न झाल्यावर सुरुवातीला आपण शुद्हीवर कुठे असतो? आणि जगाचे भान कुठे असते? आपण आपल्याच धुंदीत असतो. आमचा संसार तर गेंरेजमध्ये सुरु झाला.' लेखक लिहितो, हे एकले आणि लग्नाचे टेंशन एकदम उतरले.
पण असे धुंदीत असणारे लोक वेगले असतात. सर्वसाधारण जग तसे नसते. ते फार व्यवहारी आणि मतलबी असते. विचारापेक्षा तुमची सांपत्तिक स्थिति अशी आहे, यावर तुमचा वकुब जोखला जातो. तुम्ही भरपूर वाचता, छान लिहिता, तुमच्याकडे खुप पुस्तके आहेत, तुमचे विचार चांगले आहेत, देव-धर्म यावर तुमचा विश्वास नाही, जातपात तुम्ही मानत नाही, हे सगले चांगले आहे, पण तुमचे स्वताचे घर आहे का? पगार किती आहे? संसार करायचा तर ते महत्त्वाचे आहे, नाही का? असे विचारले जाते. पुणे - मुंबई या शहरात रहायचे तर घर हवे, ३०-४० हजार पगार हवा. नाहीतर लग्नाच्या बाजारात तुमची किंमत शुन्य. हे वास्तव कटु आहे.
लोक सुशिक्षित असतील तितके घर, पगार या गोष्टिंना जास्त महत्त्व दिले जाते. सुशिक्षित म्हणणाऱ्या मुलींनाही चांगला पगार आणि घर असणारा, म्हणजे सेटल्ड मुलगाच हवा असतो. बाकी त्याचे विचार आणि प्रगल्भता या गोष्टिना काही महत्त्व नसते. आपण सुशिक्षित आहोत, नोकरी करतो, तेव्हा मुलगाही सुशिक्षित आणि नोकरी करणारा असावा, अशा अपेक्षा कोणी करत नाही. स्वताच्या आणि जोड़ीदाराच्या हिम्मतिवर करून दाखवण्याची धमक कुणी दाखवत नाही. पाहिजे ते रेडिमेड. आणि आपण दोघे मिळून आपल्याला हवे ते कमउ असा प्रामाणिकपणा तर फारच दुर्मिळ झालाय.
अशी सारी स्थिति आहे. अशा स्थितीत संसारनामक व्यवहार पुरुषांच्याच ताब्यात राहणार नाही काय? नव्या प्रथा आणि पायंडे पडायचे तर त्यासाठी नव्या दिशेने विचार करायला हवा. आहे त्याच धोपट मार्गाचा स्वीकार करून चालणार नाही. कारण त्यातून आपल्याकडे दुय्यमपणाची भूमिका येते, इतपत विचारही केला जात नाही. हे फार म्हणजे फारच वाईट आहे. हिशेबीपणाने लग्नाचाही विचार केला जात असेल तर तो सरळ सरळ व्यवहारच होणार. आणि त्यात आपण स्वाभिमानिपनाने जगु शकणार नाही, पण याचे भय कुणाला पडलेले दिसत नाही. आहे ते तसेच चालू द्यावे आणि आपल्यावर अन्याय होतोय याचीही ओरड चालू ठेवावी असेच सारे मानून चालत असतील तर बदल कसे घडणार? हे म्हणजे शिवाजी इतरांच्या  घरात जन्माला यावा, त्याने आणखी कुणाशी तरी लढाई करावी आणि त्याचे फायदे मात्र आम्ही उपटावे असा प्रकार झाला!
एकेकाळी चळवळी होत्या, त्यामुल़े  तरुण - तरुणी भारावलेले होते. काहीतरी करून दाखवण्याची धमक त्यांच्यामध्ये होती. त्या ध्येय वादातून समविचारी जोड़ीदाराची निवड केली जाई. तसा जोड़ीदर मिळावा म्हणून अनेकजन मुद्दामहून चळवळीत येत. जोड़ीदार मिळवत. पण आता चळवळीच  संपल्यामुले समविचारी जोड़ीदार मिळणे कठीण होउन बसले आहे.
हे सगल़े मी मित्राला सांगितल्यावर तो म्हणाला, अशी धुंदी अनुभवायची असेल तर त्यासाठी कुणाच्या प्रेमात का पडला नाहीस, लेका?
मी म्हणालो, तेच तर राहून गेले मित्रा. ज्या वयात प्रेमात पडायला पाहिजे होते, तेव्हा पडलो नाही आणि आता प्रेमात पडण्याचे वय राहिले नाही.

Monday, April 2, 2012

प्रिय वाचक मित्रहो...

 हा ब्लॉग मी गेल्या दोन वर्षांपासून लिहितो आहे. तेरा हजारांहून अधिक पेज विएव आणि ४० सभासद अशी सध्या ब्लॉगची स्थिती आहे. साप्ताहिक सदर असावे या बेताने आणि गतीने मी ब्लॉग लिहितो. अनेक जन सभासद होतात, ब्लॉग पाहतात, पण आपली प्रतिक्रिया कळवत \लिहीत नाहीत, याचा अर्थ मी जे लिहितो ते किमान कळवन्याच्या पात्रतेचे नाही असाच घ्यायचा का?
मला वाटते आपण आपल्या प्रतिक्रिया\मते कळवलीत तर मला त्याचा उपयोग होईल. माझ्याकडून झालेल्या चुका समजतील आणि माझे काही गैरसमजही दूर होण्यास मदत होईल. तेव्हा आपण आपल्या सूचना जरुर कळवाव्यात.
मी लिहायचे आणि तुम्ही पाहून\वाचून पुढे जायचे हा वन वे काही चांगला नाही, तेव्हा आपण थोडा पुढाकार घ्यावा ही विनंती.
आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत.