Monday, April 23, 2012

वाचन - का, कसे आणि किती?

ग्रंथ हेच गुरू, ग्रंथासारखा सखा नाही, असं म्हटलं जातं. ते खरंही आहे. पण ते कुणासाठी? तर ज्यांना ग्रंथांशी, आपण पुस्तक हा सुटसुटीत आणि सोपा शब्द वापरू, मैत्री करायची तीव्र इच्छा आहे, त्यांच्यासाठी. ज्यांना पुस्तकांशी मैत्रीच करायची नाही, त्यांच्यासाठी ते शत्रूसारखेच परके आणि अनोळखी असतात. चांगला मित्र हाही गुरू असतोच, अशी गुरूची व्याख्या ताणता येऊ शकते. काही लोक तसा प्रयत्न करतातही. पुस्तकांना मित्र करताना किंवा गुरू करतानाही एखाद्या चांगल्या मार्गदर्शकाचा सल्ला-मार्गदर्शन घ्यायला हवं. पण नेमकं हेच लक्षात घेतलं जात नाही. त्यामुळे अनेकांच्या वाचनाची सुरुवात वाट्टेल तशीआणि सुचेल तशीहोते. जे हाती मिळेल ते हे लोक वाचतात, त्याचा फडशा पाडतात. खूप भुकेलेल्या माणसानं खाण्याचे खूप पदार्थ एकाच वेळी पाहून त्यावर तुटून पडावं, तसे सुरुवातीला वाचन करणारे लोक अध्याशासारखे वाचायला लागतात. काही काळापुरतं हे चालतंही, पण वाचनाबाबत काहीएक प्रगल्भता यावयाची असेल तर असं वाचन निरुद्देश आणि निर्थक ठरतं.
 
आपण शाळेत जातो. तिथे वेगवेगळे शिक्षक आपल्याला वेगवेगळे विषय शिकवतात. कॉलेजात गेल्यावर ही विभागणी अधिक काटेकोरपणे होते. म्हणजे त्या त्या विषयातले अभ्यासू प्राध्यापक त्यांचा त्यांचा विषय आपल्याला समजावून सांगतात. आपण ज्या प्रकारचं शिक्षण घेतो, त्यानुसार आपल्याला पुढे नोकरी मिळते. उदा. कलाशाखेचं शिक्षण घेणारा माणूस चांगला चार्टर्ड अकांउंट होऊ शकणार नाही वा याउलट चांगला चार्टर्ड अकाउंट चांगला प्राध्यापक होऊ शकेलच असं नाही. अर्थात एखाद-दुसरा अपवाद असतोच. पण सामग्य्रानं विचार करताना अपवाद गृहीत धरून चालत नाही. असो.
 
..तर शिक्षणाच्या बाबतीत आपण जसे त्या त्या क्षेत्रातल्या अभ्यासू शिक्षकांचं मार्गदर्शन घेतो, तसंच पुस्तक वाचनाच्या बाबतीत घ्यायला हवं. कारण ग्रंथ हेच गुरू’, ‘ग्रंथ हेच मित्रया व्याख्या तशा पाहिल्या तर फार ढोबळ आहेत. म्हणजे त्या चुकीच्या आहेत असं नव्हे, पण त्या परिपूर्ण आणि पुरेशा काटेकोर नाहीत. आपण वाचायला लागू आणि पुस्तकंच आपल्याला मार्गदर्शन करतील, असा समज बाळगणं तितकंसं बरोबर नाही. कारण अशा सैल आणि स्वैर वाचनाचं रेटून समर्थन करणारे लोक कालांतरानं त्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त करतात. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. याची अनेक उदाहरणं आहेत. म्हणून काय वाचावं आणि कसं वाचावं, याचा साक्षेप असायलाच हवा. त्यासाठी चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. अशा मार्गदर्शकामुळे आपल्या वाचनाला निश्चित दिशा मिळते, आपला निर्थक खर्च होणारा वेळ वाचतो आणि अशा नियोजनपूर्वक वाचनाचा चांगला फायदाही होतो. थोडक्यात आपल्याला वाचनाचे विषय ठरवता येतात आणि त्या विषयातलीही कुठली पुस्तकं वाचावीत, याबाबत आपण जागरूक आणि चोखंदळ होतो.
 
पण यावरही काही लोक असा आक्षेप घेतात की, हे म्हणजे चांगल्या आरोग्यासाठी फक्त व्हिटॅमिन्सच्या गोळ्याच खायला पाहिजेत, असं म्हणण्यासारखं आहे! या आक्षेपाचं खंडन करणं फारसं अवघड नाही. मुळात ही तुलना चुकीची आहे. ही काव्यात्म तुलना आहे. त्यात वास्तवापेक्षा चमत्कृतीवर भर आहे. दुसरं, वाचन ही काही उत्स्फूर्त करण्यासारखी क्रिया नाही. ती स्वयंप्रेरणा असू शकते, पण तिला शिस्तीचीही गरज असते. कारण योग्य शिस्त आणि काटेकोर नियोजन ही कोणत्याही यशाची पहिली पायरी असते. शिस्तीच्या जोरावर आपण आपले ध्येय निश्चितपणे गाठू शकतो.
 म्हणून वाचनाच्या बाबतीत प्रगल्भावस्था गाठावयाची असेल तर अशी मार्गदर्शन, शिस्त आणि काटेकोर नियोजन गरजेचंच असतं. तरच त्या वाचनाचा फायदा होतो.शिवाय वय आणि वाचन यांचीही योग्य वेळी सांगड घालायला हवी. बालपण, किशोरावस्था, कुमारावस्था, प्रौढपण आणि वृद्धावस्था हे आपल्या आयुष्याचे टप्पे. यानुसार आपलं वाचन बदलायला हवं. कविता-गोष्टी, कथा-कादंबऱ्या, चरित्र-आत्मचरित्र, वैचारिक साहित्य आणि तत्त्वज्ञानात्मक साहित्य असा चढत्या क्रमानं वाचनाचा प्रवास झाला तर त्या वाचनाला एक निश्चित दिशा आहे असं म्हटलं जातं. वयानुसार आपण जसे बदलत जातो, तो आपल्या जाणिवा प्रगल्भ होत जाण्याचा अपरिहार्य भाग असतो. त्याला आपण योग्य अभ्यासाची, शिस्तीची जोड दिली तर त्या त्या वयात त्या त्या प्रकारच्या विषयांबाबत आपली समज परिपक्व व्हायला मदत होते. त्यासाठी वाचन मोठय़ा प्रमाणावर उपयुक्त ठरू शकतं. त्यामुळे वयाचे टप्पे आणि वाचनाच्या अवस्था यांची सांगड घालायलाच हवी. कारण वाचन शेवटी कशासाठी करायचं असतं? राल्फ स्टेगनर या लेखकानं आपल्या रोडस् टु रीडिंगया पुस्तकात वाचनामागच्या उद्दिष्टांची यादी दिली आहे. ती अशी-
  • एक विधी म्हणून किंवा सवयीमुळे कर्तव्याच्या भावनेतून
  • वेळ घालवण्यासाठी साधन म्हणून
  • वर्तमान घडामोडींचं ज्ञान व आकलन व्हावं यासाठी
  • तात्कालिक, वैयक्तिक समाधानासाठी
  • दैनंदिन जीवनाची व्यावहारिक गरज म्हणून, व्यावसायिक हितासाठी
  • व्यावसायिक वा धंद्यातील गरजेपोटी
  • वैयक्तिक व सामाजिक गरजेपोटी
  • सामाजिक आणि नागरिकी जीवनाची आवश्यकता म्हणून
  • स्वत:चा विकास व्हावा, स्वत:ची सुधारणा व्हावी किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमीचा एक अतूट भाग म्हणून
  • निखळ बौद्धिक गरज म्हणून
  • निखळ आध्यात्मिक गरज म्हणून
व्यक्तीगणिक या उद्दिष्टांमध्ये फरक दिसून येईल. प्रत्येक माणूस एकाच उद्देशानं वाचन करेल, असं नाही. कारण आपलं कुटुंब, शालेय जीवन, प्रसारमाध्यमांचा प्रभाव, वाचनालयांची संख्या, ग्रंथ-व्यापार आणि सरकार या घटकांचा आपल्या वाचनावर प्रभाव पडतो. त्यानुसार आपल्या वाचनाच्या उद्देशांची निश्चिती होते. ते उद्देश वरीलपैकी कोणतेही असले तरीही त्यासाठी चांगल्या मार्गदर्शकाची गरज असतेच.
  

पण असा मार्गदर्शक मिळणार कुठे? कारण वाचणारे लोक आधीच कमी, त्यात चांगले वाचक त्याहून कमी. शिवाय आपल्या अवतीभवती असा मार्गदर्शक असायला हवा. असेल तर त्यानं आपल्याला वेळ देऊन तसं मार्गदर्शन करायला हवं. त्यात वाचन कसं करावं याचे काही अभ्यासक्रम नाहीत आणि क्लासेसही नाहीत. म्हणजे वाचनाबाबत चांगला मार्गदर्शक मिळणं ही शालेयवयात चांगला शिक्षक मिळण्याइतकीच अवघड गोष्ट आहे. पण आपण आपल्या उद्दिष्टावर ठाम असू, त्यासाठी आपल्याकडे पुरेशी तळमळ असेल आणि आपल्याकडे पुरेसे सातत्य असेल तर असा मार्गदर्शक मिळतोच.
 
असा मार्गदर्शक प्रगल्भ वाचक असू शकतो किंवा अशा प्रगल्भ वाचकानं लिहिलेलं पुस्तकही असू शकतं. अशा पुस्तकाचं उदाहरण द्यायचं तर मॉर्टिमर अ‍ॅडलर यांच्या हाऊ टु रीड अ बुकया पुस्तकाचं देता येईल. 1940 साली प्रकाशित झालेले हे पुस्तक द क्लासिक गाइड टु इंटलिजंट रीडिंगमानलं जातं. सध्या या पुस्तकाची सुधारित आवृत्ती बाजारात उपलब्ध आहे. यामध्ये अ‍ॅडलर यांनी वाचनाची कलाकशी आत्मसात करावी याविषयी सांगून पुढे प्रकरणनिहाय व्यावहारिक साहित्य, काल्पनिक साहित्य, कथा-नाटक आणि कविता, इतिहासविषयक पुस्तकं, विज्ञान-गणितविषयक पुस्तकं, तत्त्वज्ञान-समाजशास्त्रविषय पुस्तकं कशी वाचावी, याविषयी अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केलं आहे. वाचन ही कलाआहे आणि ती प्रयत्नपूर्वक आत्मसात करता येते, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केलं आहे. सुरुवातीला उल्लेख केलेल्या राल्फ स्टेगनर लिखित रोडस् टु रीडिंगया आणि अ गाइड टु रीडिंगया लायमन अ‍ॅबॉट व एसा डॉन डिकिन्सन यांनी संपादित केलेल्या पुस्तकांतही वाचनाविषयी चांगलं मार्गदर्शन आहे. 

 तेव्हा वाचक म्हणून प्रगल्भ होण्यासाठी मार्गदर्शकाकडून आपले विषय आणि दिशा निश्चित करून घ्यावी हे उत्तम! 

No comments:

Post a Comment