Saturday, March 23, 2013

भाबडय़ा पितृप्रेमाचे अवास्तव स्तोत्र!

Published: Loksatta, Sunday, March 10, 2013
एके काळी दर्जेदार मासिकं म्हणून गाजलेल्या 'सत्यकथा' आणि 'हंस' या मासिकांचे अनुक्रमे  कार्यकारी व संस्थापक-संपादक म्हणून काम केलेल्या अनंत अंतरकर यांची ही जीवनकहाणी. त्यांच्या मुलीनेच लिहिलेली. लेखिका अनुराधा औरंगाबादकर यांनी शीर्षक पानावर 'जीवनकहाणी' असे तर प्रास्ताविकात 'चरित्र' असे दोन्ही शब्द वापरले आहेत. मात्र या पुस्तकाला अंतरकरांची जीवनकहाणीही म्हणता येणार नाही आणि चरित्र तर नाहीच नाही. वडिलांविषयीच्या आठवणी जमवताना केलेले प्रयत्न, लेखिकेचं स्वत:चं आत्मचरित्र आणि अंतरकरांविषयीच्या लेखिकेच्या आठवणी असं या पुस्तकाचं एकंदर स्वरूप आहे.
अंतरकर हे लेखिकेचे वडील असल्याने त्यांच्याविषयी आदर, आपुलकी, अभिमान असणं समजण्यासारखं आहे. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचं, त्यांच्याविषयीच्या गैरसमजांचं निराकरण करणं, हेही न्याय्य आहे. पण त्यासाठी सोयीस्कर सत्य सांगणं आणि सतत वडिलांचंच गुणगान आळवणं, हे सर्वथा गैर आहे. भारंभार तपशील आणि अनावश्यक आठवणी-घटना-प्रसंग सांगण्यात पानंच्या पानं खर्च केली आहेत. शब्दांच्या या डोंबारखेळातून वाचकाच्या हाती मात्र फारसं काही लागत नाही.
अगदी स्पष्टच सांगायचं तर चरित्र म्हणून असलेली कुठलीही अपेक्षा हे पुस्तक पूर्ण करत नाही. पुस्तकाच्या शीर्षकापासूनच लेखिकेच्या गोंधळाला सुरुवात होते. चरित्रपर पुस्तकाचं शीर्षक इतकं काव्यमय असत नाही, अगदी ते वाङ्मयीन असलं तरी. त्यामुळे हा गोंधळ भाषा बेजबाबदारपणे वापरण्याचा आहेच, पण विचारांची स्पष्टता नसण्याचाही आहे. वडिलांकडे तटस्थ, समतोल पद्धतीने पाहणं त्यांना शक्य झालेलं नाही. अंतरकर आपले वडील म्हणून त्यांचंच प्रत्येक वेळी कसं बरोबर असणार आणि इतरांनी त्यांच्यावर कसा अन्याय केला असणार, अशी सरळ विभागणी त्या करतात. अंतरकर 'सत्यकथा' आणि 'वसंत' या दोन मासिकांत असताना आणि 'हंस' सुरू करण्याच्या काळात त्यांचे मुळगावकर यांच्याशी झालेले मतभेद नोंदवताना लेखिकेने फक्त अंतरकरांवर अन्याय झाला, यावरच भर दिला आहे. पुढे अंतरकरांनी स्वत: 'हंस' सुरू केल्याने त्यांच्यावर इतर मालकांनी अन्याय करण्याचा प्रश्न नव्हता, तेव्हा लेखिकेने त्यांच्या सामान्य आठवणी तपशीलवार सांगितल्या आहेत.
अंतरकरांनी 'सत्यकथा', 'वसंत', 'हंस', 'मोहिनी'मध्ये कसं नवोदित-प्रस्थापित लेखकांचं लेखन छापलं, नवोदितांना कसं उत्तेजन दिलं, स्वत: विविध प्रकारचं लेखन कसं केलं याची अतिशय ढोबळ आणि सामान्य स्वरूपाची माहिती दिली आहे. शिवाय त्यातही गफलती केल्या आहेत. तरुण वसंत सरवटे जेव्हा पहिल्यांदा अंतरकरांकडे आपली व्यंगचित्रं घेऊन गेले, ती पाहून 'हा पुढे मोठा व्यंगचित्रकार होणार,' असं अंतरकर म्हणाले. त्यावर लेखिका टिप्पणी करतात की 'अण्णांचं हे भाकीत सरवटे यांनी खरं करून दाखवलं.' म्हणजे अंतरकरांनी ते भाकीत वर्तवलं नसतं तर सरवटे बहुधा व्यंगचित्रकार म्हणून पुढे आलेच नसते का? अशी विधानं लेखिकेनं इतरही लेखक-चित्रकरांच्या बाबतीत केली आहेत. ती केवळ गैरलागूच नाहीतर बढाईखोरही आहेत.
शिवाय लेखिकेचं स्वत:वरही अतोनात प्रेम असल्यामुळे त्यांनी स्वत:बद्दलही भरपूर लिहिलं आहे. या पुस्तकासाठी माहिती मिळवण्यासाठी आपण कशा खस्ता खाल्ल्या याची लांबलचक वर्णनं केली आहेत. त्यामुळे कधी कधी असा प्रश्न पडतो की, लेखिकेला अंतरकरांविषयी सांगायचंय की स्वत:विषयी सांगायचंय? अंतरकर त्यांचे वडील असल्याने हे काही प्रमाणात होणं क्षम्य आहे, पण ते अक्षम्य म्हणावं इतक्या जास्त प्रमाणात झालं आहे. शिवाय त्या हकिकतीही विनाकारण अलंकारित शब्दांत लिहिल्या आहेत. उदा. 'मी गोडबोलेंना सांगत होते. बाहेर पाऊस कोसळत होता. बाहेर पडणं अशक्य होतं. गप्पांचा फड रंगत होता,' अशी कितीतरी उदाहरणं पुस्तकात आहेत. ती वाचताना प्रश्न पडतो ही अंतरकरांची जीवनकहाणी आहे की कादंबरी आहे?
लेखनातला बाळबोधपणा पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेपासूनच दिसायला लागतो. सुरुवातीला 'नमन नटवरा' अशी नांदी लिहिली आहे. म्हणजे आपण चरित्र लिहीत आहोत की एखादं नाटक वा तमाशाचा वग लिहीत आहोत याचंही भान लेखिकेनं ठेवलेलं नाही. त्यानंतर आहे 'सरस्वतीस्तवन'. यात पहिल्या ओळीत लेखिकेनं 'चरित्र' हा शब्द वापरला आहे, पण पुढे जे काही लिहिलं आहे ते वाचून धक्काच बसतो. या प्रतापांनंतर 'समुद्रसाद' नावाचं सुक्त आहे, रत्नागिरीच्या समुद्राला उद्देशून आळवलेलं. (पुस्तकाच्या शेवटीही असंच 'भैरवी' नावाचं समुद्रसुक्त आहे.) त्यानंतर सुरू होतं 'कोकणकिनारी' हे अंतरकरांची पूर्वपीठिका सांगणारं प्रकरण. त्यात लेखिका सुरुवात करते आर्य अफगाणिस्तानातून हिंदुस्थानात आले आणि समुद्रमार्गे गुहागपर्यंत आले इथपासून. पण पुढच्या चार ओळीत आर्याचा निकाल लावून 'अंतरकर' हे नाव कसं पडलं या परिच्छेदाची सुरुवात होते. पान १६-१७ वर अंतरकरांच्या बारशाची हकीकत आहे. त्यात १२ डिसेंबर १९११ रोजी पंचम जॉर्ज यांनी कलकत्ता ही राजधानी बदलून दिल्ली कशी केली याचीच हकीकत बारशाच्या वर्णनापेक्षा जास्त आहे. अशा उंच उडय़ा पुस्तकाच्या नावाप्रमाणे 'अनंत' आहेत.
'वसंत' मासिक सोडताना अंतरकरांनी दत्तप्रसन्न काटदरे यांना लिहिलेलं पत्र वा 'हंस' सुरू करताना मुळगावकरांना लिहिलेली चिठ्ठी दिली आहे. त्यातील मजकूर पुरेसा बोलका आहे. पण लेखिकेचं वडिलांवर असलेलं अतोनात प्रेम आणि वाचकांविषयी असलेली शंका (त्यांना ही पत्रं वाचून कळतील की नाही याची) इतकी जबर की, त्यांनी पुढे त्यातल्या ओळींचं विश्लेषण केलं आहे. वस्तुत: त्याची काहीएक गरज नव्हती. वडिलांचे इतरांशी झालेले मतभेद नोंदवताना त्यांचाच कैवार घेतला आहे, पण आव असा आणला आहे की 'केवळ माझे वडील म्हणून मी हे सांगत नाहीये..मराठी वाङ्मयाच्या इतिहासात चुकीच्या नोंदी होऊ नयेत ही एकच तळमळ याच्यामागे हात जोडून उभी आहे.' हा अभिनिवेश पुस्तकभर आहे. मराठी वाङ्मयाची लेखिकेची व्याख्या फारच जुजबी वा सोयीस्कर असावी असे दिसते.
या पुस्तकावर संपादकीय संस्कार अजिबात झालेले नाहीत. 'सोनेरी स्वप्नपूर्ती' हे 'हंस'-'मोहिनी'ची निर्मितीकथा सांगणारं प्रकरण आहे १३१ पानांचं. त्याचं काटकोरपणे संपादन केलं असतं तर ते ते अवघ्या ५०-६० पानांत बसलं असतं आणि वाचनीयही झालं असतं. 'वैभवी वाटा' हे ६० पानी प्रकरणही असंच संपादित करून ३० पानांत बसवता आलं असतं. दोनशे-सव्वादोनशे पानांत सांगून होईल त्यासाठी तब्बल साडेतीनशे पानं खर्च केली आहेत. शिवाय शुद्धलेखनाच्या, वाक्यरचनेच्या चुकाही आहेतच. तेच ते संदर्भ, तपशील पुन:पुन्हा येत राहतात. प्रकरणांची विभागणी करताना ती इतकी निष्काळजीपणे केली आहे की, त्यातून अंतरकरांच्या आयुष्याचे कुठलेही टप्पे धडपणे समजावून घेता येत नाहीत. काव्यमय, अलंकारिक भाषा, उमाळे-उसासे, तक्रारी आणि शब्दांची अनाठायी उधळमाधळ हे या पुस्तकाचे विशेष आहेत.
जीएंची अंतरकरांविषयीची एक आठवण पुस्तकात सुरुवातीलाच दिली आहे. जी.ए. लिहितात, '..संपादक म्हणून अंतरकरांचं कार्य मोठं आहे व ते सगळ्यांसमोर आहे. ते तसे मोठे आहेत, म्हणूनच मला त्यामागचा माणूस शोधायचा आहे. त्यामागचा माणूस हवा आहे.' त्यापुढे लेखिकेने लिहिले आहे की, 'जीएंची इच्छा मला शिरसावंद्य आहे. त्यातून मला लेखनदिशा मिळाली.' पण त्याचा प्रत्यय पुस्तकातून येत नाही. दुसरं म्हणजे जीएंनी अंतरकरांची कारकीर्द पाहिलेली होती. ती त्यांना प्रत्यक्ष माहीत होती, म्हणून त्यांना त्यामागचा माणूस जाणून घ्यावासा वाटत होता. आज अंतरकरांचं काम माहीत असलेले किती लोक असतील? तेव्हा आताच्या काळात त्यांचं चरित्र लिहिताना तेही ध्यानात घ्यायला हवं होतं. पण या पुस्तकात त्याचा पूर्णपणे अभाव दिसतो. त्यामुळे एक चांगला विषय वाया घालवला आहे, असं म्हणावं लागतं. शिवाय लेखन करताना जे गांभीर्य पाळायला हवं होतं, ते न पाळल्याने अंतरकरांविषयी गैरसमज निर्माण होण्याचा मोठा धोका आहे. काही शिष्य आपल्या गुरूचा त्यांनी दिलेल्या शिकवणीची कॉपी-पेस्ट थिअरी वापरून पराभव करतात, तर काही मुलं आपल्या आई-वडिलांचा त्यांच्यावरील अतोनात प्रेमापोटी पराभव करतात. अंतरकर लेखिकेचे गुरू आणि वडील असल्याने त्यांच्याकडून दोन्ही प्रमाद घडले आहेत.
थोडक्यात चरित्र कसं नसावं, याचं हे पुस्तक उत्तम उदाहरण ठरावं. काय लिहावं अन् काय लिहू नये याचा विवेक नसल्यावर आणि कसं लिहू नये याचा साक्षेप नसल्यावर अशी पुस्तकं जन्माला येतात. आणि ती ज्यांच्याविषयी लिहिली जातात त्यांच्याविषयी जनमानसात असलेल्या आदराच्या भावनेला हकनाक टाचणी लावतात. या पुस्तकातून अंतरकरांसारख्या साक्षेपी संपादकांचं कर्तृत्व समोर येण्याऐवजी त्याला उलट गालबोटच लागलं आहे, ही खेदाची गोष्ट आहे. या पुस्तकामुळे अंतरकरांना न्याय मिळवण्याऐवजी त्यांचं एका परीनं अवमूल्यनच झालं आहे.
ज्यांना अंतरकरांचं योगदान माहीत आहे, त्यांना या चरित्राकडे कदाचित उदारपणे पाहणं शक्य होईलही, पण ज्या पिढीला ते माहीत नाही, त्यांच्यापुढे या पुस्तकातून अंतरकरांचं जे चित्र उभं राहत आहे ते सुखावह व हितावह नाही, असं नाइलाजानं नमूद करावं लागतं. चरित्रलेखन इतक्या सैलपणे हाताळण्याचा वाङ्मयप्रकार नाही.
'अनंता'ची फुलं - अनुराधा औरंगाबादकर,
प्रतीक प्रकाशन, पुणे,
पृष्ठे - ३४९, मूल्य - ३०० रुपये.

Saturday, March 9, 2013

चरित्रकाराचे रसाळ चरित्र

कथा- कादंबरी- कविता यांच्यापेक्षा एखाद्या व्यक्तीचे चरित्र लिहिणे हे अवघड काम मानले जाते. कारण त्यात कल्पनेच्या भराऱ्या मारता येत नाहीत की वस्तुस्थितीचा विपर्यास करता येत नाही. (आणि ज्या पुस्तकांमध्ये असे प्रकार होतात त्यांना 'चरित्र' मानले जात नाही.) चरित्रनायकाकडे निरक्षीरविवेकानेच पाहावे लागते. समतोल आणि तटस्थपणा या कसोटय़ा लावून त्याचे मूल्यमापन करावे लागते. तत्कालीन सर्व प्रकारची संदर्भसाधने, चरित्रनायकाने स्वत: केलेले आत्मपर वा इतर लेखन, त्याचा इतरांशी वा इतरांचा त्याच्याशी असलेला खासगी पत्रव्यवहार, समकालिनांची चरित्रे-आत्मचरित्रे, रोजनिश्या, तत्कालीन वर्तमानपत्रे यांची बारकाईने छाननी करून माहिती मिळवावी लागते. ती संगतवार लावून त्यांचा योग्य अन्वयार्थ लावावा लागतो. पुराव्यांची विश्वासार्हता पडताळून घेऊन त्यांची खातरजमा करावी लागते. यातून अभ्यासाअंती जे निष्कर्ष येतील ते तितक्याच स्पष्टपणे मांडण्याचे धैर्य दाखवावे लागते. थोडक्यात- चरित्रनायकाचा कैवारही घेता येत नाही आणि त्याला केवळ आरोपीच्या पिंजऱ्यातही उभे करून चालत नाही.


या कसोटीला बऱ्याच प्रमाणात पत्रकार व प्राध्यापक न. र. फाटक यांनी लिहिलेली चरित्रे उतरतात असा निर्वाळा अनेक मान्यवर देतात. फाटक हे मराठीतले एक साक्षेपी चरित्रकार मानले जातात. फाटकांनी न्या. रानडे, ना. गोखले, लोकमान्य टिळक, यशवंतराव होळकर, नाटय़ाचार्य खाडिलकर यांच्याबरोबरच समर्थ रामदास, संत एकनाथ, ज्ञानेश्वर या संतांची साक्षेपी चरित्रे लिहून मोठेच सांस्कृतिक संचित पुढील पिढय़ांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

फाटक यांनी १८-१९ वर्षे पत्रकारिता केली. त्यानंतर ते रुईया महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथूनच ते निवृत्त झाले. 'मी प्रथम वृत्तपत्रकार, नंतर प्राध्यापक व ग्रंथकार आहे,' असे स्वत: फाटकांनीच एका कार्यक्रमात म्हटल्याचे म. म. अळतेकर यांनी नमूद केले आहे. फाटक पत्रकार व प्राध्यापक होतेच; पण तितकेच चांगले चरित्रकारही होते. त्यामुळेच आज त्यांची ओळख ही मुख्यत: त्यांच्या चरित्रलेखनामुळेच आहे. त्यांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षी लिहिलेले न्या. रानडे यांचे चरित्र आजही महत्त्वाचे मानले जाते. रानडे यांच्याविषयी आजवर बरेच लिहिले गेले आहे; परंतु त्यांच्याविषयी जाणून घेताना वा लिहिताना फाटकांचे चरित्र वगळून पुढे जाता येत नाही.

अशा चरित्रकार फाटकांचे चरित्र त्यांच्या विद्यार्थिनी अचला जोशी यांनी लिहिले आहे. त्यामुळे 'चरित्रकाराचे चरित्र' असे या पुस्तकाचे वर्णन करावे लागेल. अचला जोशी यांना आधी विद्यार्थिनी म्हणून आणि नंतर स्नेही म्हणून फाटकांचा सहवास लाभला. शिवाय त्यांचे फाटकांच्या कुटुंबाशी घरगुती संबंध होते. त्यामुळे या चरित्राला एक आपलेपणाचा आणि आदराचा स्पर्श झालेला आहे.

फाटकांचे चरित्र लिहिताना केवळ त्यांच्या चरित्राचाच विचार करून चालणार नव्हते. त्यांच्या 'अठराशे सत्तावनची शिपाईगर्दी', 'मुंबई नगरी', 'नारायणराव पेशवे यांचा खून की आत्महत्या?' अशा इतर लेखनाचाही विचार करावा लागणार होता. शिवाय फाटकांनी वेळोवेळी दिलेल्या व्याख्यानांची संख्याही पाचशेहून अधिक आहे. म्हणजे चरित्रनायक फाटक यांची ग्रंथसंपदा आणि कर्तृत्व औरसचौरस म्हणावे असे आहे. जोशी यांनी त्यापैकी शक्य तेवढे लेखन नजरेखालून घालून हे चरित्र पूर्ण केले आहे.

चरित्रलेखनामागच्या आपल्या भूमिकेविषयी जोशी यांनी प्रास्ताविकात म्हटले आहे की, 'सरांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या घटना-प्रसंग लिहीत गेले. एका वेळी अनेक स्तरांवर चालत असलेल्या सरांच्या अनेकविध भूमिकांचे पेड विणत हे चरित्र पुरं केलं. सरांच्या जीवनाच्या त्या- त्या कालखंडात जे मुख्यत्वानं घडलं, त्याला अनुसरून या चरित्राची 'संपन्न संस्कारांचं बाळकडू', 'पत्रकार : चरित्रकार : टीकाकार', 'मूर्तिभंजक', 'अध्यापनपर्व व संस्थाजीवन', 'ग्रंथनिर्मिती', 'निर्भय, निर्भीड साहित्यप्रवास', 'वन्स अ टीचर, ऑलवेज अ टीचर' आणि 'अखेर' अशा आठ प्रकरणांमध्ये विभागणी केली आहे.

फाटकांच्या महत्त्वाच्या चरित्रांचा, त्यांच्या वर्तमानपत्रातील आणि प्राध्यापकीय कारकीर्दीचा जोशी यांनी सविस्तर आढावा घेतला आहे. फाटकांच्या कौटुंबिक जीवनाचा आणि घरगुती आठवणींचा यातला भागही रसाळ झाला आहे. त्यातून घरातले फाटक चांगल्या प्रकारे उभे राहतात. लेखनाच्या बाबतीत अतिशय आग्रही, सडेतोड आणि निर्भीड असणारे फाटक प्रत्यक्षात आपले कुटुंब, मित्र, विद्यार्थी यांच्याशी किती ममत्वाने आणि अगत्याने वागत याचे हृदयस्पर्शी चित्र यात रेखाटलेले आहे. नको तितका फटकळपणा, पूर्वग्रह आणि काही बाबतीतला पक्षपात या फाटकांच्या स्वभावदोषांबद्दलही लेखिकेने स्पष्टपणे लिहिले आहे.

मराठीतली चरित्रलेखन परंपरा ही साधारणपणे चरित्रनायकाच्या बाजूची वा स्तुतीपर अशीच आहे. चरित्रनायकाविषयी आदर वा भक्ती ठेवूनच चरित्रे लिहिली जातात. त्यामुळे चरित्रनायकाला झुकते माप देण्याचा प्रयत्न होतो. याउलट, चरित्रनायकाचे दोष व मर्यादा सांगण्याच्या प्रयत्नांत त्याच्यावर कधी कधी अन्यायही होतो. या दोन्ही गोष्टी फाटकांनी लिहिलेल्या चरित्रांमध्येही काही प्रमाणात घडलेल्या आहेत. म्हणूनच 'नामदार गोखले' या फाटकांच्या चरित्राचे परीक्षण करताना संशोधक य. दि. फडके यांनी म्हटले होते की, 'चरित्र लिहिणे म्हणजे चरित्रनायकाचे वकीलपत्र घेणे नव्हे.' तेव्हा फाटकांच्या चरित्राची कालसुसंगत समीक्षा करण्याचीही गरज होती असे वाटते. शिवाय फाटक यांनी केलेल्या आत्मपर लेखनाचा वापर केला किंवा नाही, याचा अचला जोशी यांनी उल्लेख केलेला नाही. त्यातून कदाचित 'मी प्रथम वृत्तपत्रकार..' या त्यांच्या विधानाचा आणि त्यांच्या एकंदर निर्भीड लेखनाचा अन्वयार्थ लागू शकला असता. पण ही काही जोशी यांच्या या चरित्राची मर्यादा नव्हे; कारण त्यांनी फाटक यांचे कौटुंबिक जीवन आणि त्यांच्या ग्रंथसंपदेचा आढावा या दोन विषयांभोवती या चरित्राची गुंफण केली आहे. त्यातून फाटक एक व्यक्ती व पत्रकार-प्राध्यापक म्हणून उलगडण्यास मदत होते.

या पुस्तकाची निर्मिती मुंबई साहित्य संघाने उत्तमरीत्या केली आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ, मांडणी, छपाई, कागद या सर्वच बाजू देखण्या झाल्या आहेत. त्यामुळे या चरित्राची किंमत जरा जास्त झाली आहे. मात्र, हे चरित्र विद्यार्थी, प्राध्यापक, पत्रकार आणि जिज्ञासूंनी आवर्जून वाचावे असे आहे. कारण लोकोत्तर पुरुषांची नवनवी चरित्रे लिहिली जाणे, ती समाजामध्ये त्या- त्या वेळी वाचली जाणे, हा त्या समाजाच्या सांस्कृतिक प्रगल्भतेचा पुरावा असतो.

'ज्ञानतपस्वी रुद्र' (नरहर रघुनाथ फाटक यांचे चरित्र) - अचला जोशी, मुंबई मराठी साहित्य संघ, पृष्ठे- २८०, मूल्य- ४५० रुपये.



वेडेपीर, कलंदर

काही माणसं मोठी मजेशीर असतात. त्यांचे छंद जगावेगळे असतात. पण तरीही आपण काहीतरी वेगळं करतोय असंही त्यांना वाटत नाही. बाळ बेंडखळे हे असेच एक कलंदरवृत्तीचे छांदिस्ट गृहस्थ. यांना कुठला छंद असावा? तर भुयारं पाहण्याचा. जिथे कुठे भुयार आहे, अशी बातमी मिळायचा अवकाश हे चालले त्याच्या मागावर. मग त्यासाठी वेळ-काळ-तहान-भूक कशाचंही भान त्यांना राहत नाही. आपण अडचणीत येऊ, भुयारात साप, तरस-कोल्हे ते वाघापर्यंत अनेक प्राणी असतात.. पण बेंडखळेंना त्यांचीही भीती वाटत नाही. अंधाऱ्या जगातली, दगडाखालची, कडेकपाऱ्यांच्या बेचक्यातली, उजेड सहन न होणारी सृष्टी या माणसाला भुरळ घालते. त्यांच्याविषयी जाणून घेण्याची अनावर हौस व्यापून टाकते. बेंडखळेंनी आपल्या १२ आणि १६ वर्षांच्या बहिणींनाही भुयाराच्या अंधार कोठडय़ात उतरवले. हे त्यांचं वेड इतकं अनिवार आहे की, विवाहाच्या दुसऱ्या दिवशी बेंडखळे एका भुयारात लपून बसलेल्या जखमी वाघाला पाहायला गेले. त्याला अगदी बॅटरीच्या प्रकाशात चार हाताच्या अंतरावर डोळा भरून पाहण्यात रमून गेले.


या पुस्तकात एकंदर सात भुयारकथा आहेत. पहिल्या प्रकरणात भुयार कसं तयार होतं, त्याची शास्त्रीय-भौगोलिक माहिती, भुयारांचं व्यक्तिमत्त्व, भुयारांचे प्रकार (विहिरीतील, तळघरातील, किल्ल्यांच्या तटबंदीतील, बुरुजातील, डोंगरातील), त्यात आढळणारे सरडे, पाली, साप अशा प्राण्यांची माहिती आहे. दुसऱ्या प्रकरणात रत्नागिरीच्या हातखंब्याच्या गुहेत लपून बसलेल्या जखमी वाघाला आत शिरून पाहण्याच्या धाडसाची कहाणी वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात. तिसऱ्या प्रकरणात कोतुळ-संगमनेर परिसरातल्या कोंबडकिल्ल्यातल्या भुयाराची गोष्ट आहे. आतमध्ये गेलेलं कोणीही परत माघारी येत नाही, अशी या भुयाराबाबत स्थानिकांची माहिती होती, तेव्हा बेंडखळे यांचा आत जाऊन पाहण्याचा निश्चय आणखीनच दृढ झाला. भुयाराच्या तळापर्यंत गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, हे तर तरसाचं काम आहे. शिवाय तिथे एक गणपतीची मूर्तीही होती. म्हणजे काही वर्षांपूर्वी तिथे माणसांचा सहवास होता. चौथ्या प्रकरणात सह्य़ाद्रीच्या रांगेतल्या कुंजरगडातल्या भुयाराविषयी आहे. कुंजर म्हणजे हत्ती. या भुयारातही दोन सहकाऱ्यांना सोबत घेऊन गेले आणि सुखरूप बाहेर आले. तेव्हा बरीच मंडळी त्यांच्या स्वागतासाठी बाहेर उभी होती. पाचव्या प्रकरणात भुयारात उतरल्यावर भेटलेल्या धामण सापाच्या युगुलाची कशी भेट होते आणि भुयाराचा वरचा भाग कोसळल्यावर खाली डोकं वर पाय अशा अवस्थेत बराच वेळ कसं निपचित पडून राहावं लागतं, याचा काहीसा थरारक अनुभव आहे. या प्रकरणाने भांबावलेली धामणजोडी शेवटी बेंडखळेंच्या अंगावरूनच बाहेर पडते. याच प्रकरणात बेंडखळे यांनी विषारी व बिनविषारी साप ओळखण्याचा आणि विषारी सापांना मारण्याचा वारसा आई-वडिलांकडूनच कसा मिळाला, याविषयीही लिहिलं आहे.

सहावं प्रकरण हे दाभोळच्या चंडिका देवस्थानातल्या भुयाराविषयी आहे. गुहेत असलेल्या या मंदिरात गेल्यावर तिथल्या पुजारी सांगतो की, आतमध्ये दोन भुयारं आहेत, एकातून थेट काशीला जाता येतं, तर दुसऱ्यातून बनारसला. पूर्वज इथूनच गुप्त प्रवास करत. बेंडखळेंनाही तसाच प्रवास करावासा वाटला. म्हणून ते त्या भुयारांत उतरले. तर ती आतमध्ये पूर्णपणे बंद होती. मग बेंडखळे बाहेर आले. नुकत्याच दर्शनासाठी आलेल्या आजोबांना तुमच्या नातवाला १५ मिनिटांत काशी-बनारस दाखवतो, म्हणून दोन्ही भुयारात घेऊन जातात. तो बाहेर आल्यावर खरी गोष्ट सांगतो आणि त्यांच्या कालपर्यंतच्या समजुतीवर फेरविचार करायला लावतो.

प्रत्येक प्रकरणाला बेंडखळे यांनी काढलेली रेखाचित्रंही सुरेख आहेत. प्रत्येक भुयाराची रचना त्यांनी काढून दाखवली आहे. शिवाय त्यात आढळणारे वेगवेगळे प्राणी, अात जाताना सोबत ठेवायची हत्यारं यांचीही रेखाचित्रं आहेत. मात्र त्या तुलनेत मुखपृष्ठावर केवळ बेंडखळेंचंच छायाचित्र छापलं आहे. ते मलपृष्ठावर घेऊन मुखपृष्ठ अधिक चांगलं करणं शक्य होतं.

साधी, सोपी भाषा हे या पुस्तकाचे एक वैशिष्टय़ आहे. आपण काहीतरी भन्नाट सांगतोय वा करतोय, असा त्यात आविर्भाव नाही. त्यामुळे लेखन मनाची पकड घेतं. भुयारं हा सृष्टीचा भौगोलिक आविष्कार असल्याने त्यात राहणाऱ्या जीवांचा त्यावर अधिक अधिकार आहे, त्यांना न दुखावता भुयार कसं पाहावं, याचा चांगला नमुना म्हणजे हे पुस्तक आहे. भुयाराविषयी अकारण, खातरजमा न करताच केवळ सांगोवांगीमुळे पसरलेल्या दंतकथांना निपटून काढण्याचाही प्रयत्न बेंडखळे यांनी केला आहे. इतक्या वेगवेगळ्या भुयारांत शिरूनही बेंडखळे आणि त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांना कुठलाही विपरित अनुभव आलेला नाही, हे विशेष महत्त्वाचं. बेंडखळे कुठलंही भुयार पाहताना स्वत:बरोबर कुणीतरी नवा सहकारी घेऊन गेले. कधी स्थानिक, कधी वयानं अगदीच लहान. तसे साहसी सहकारी त्यांना वेळोवेळी मिळालेही. आणि आता पुस्तकाच्या रूपाने आपल्यासमोर तो अनुभव तपशीलवार आणि रोचकपणे मांडला आहे. वाचन हाही एकप्रकारचा सहप्रवास असतो. काहींना प्रत्यक्ष कृती करण्याची प्रेरणा अशा इतरांच्या अनुभवातूनही होत असते. सर्वानीच असं वेड स्वत:ला लावून घ्यावं, असं नाही, पण अशा वेडेपीर, कलंदर वृत्तीच्या माणसांविषयी निदान जाणून तरी घ्यावं.

'भुयार' - बाळ बेंडखळे, चैतन्यऋतु प्रकाशन, मुंबई, पृष्ठे - १०८, मूल्य - १३० रुपये.



मृत्युंजयी ऋणानुबंध

वयाच्या तिशीच्या आत लिहिलेल्या काही कादंबऱ्या मराठीमध्ये माइलस्टोन मानल्या जातात. शिवाजी सावंतांची 'मृत्युंजय', भालचंद्र नेमाडय़ांची 'कोसला', व्यंकटेश माडगूळकरांची 'बनगरवाडी' या तिन्ही कादंबऱ्या या लेखकांनी वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी लिहिलेल्या आहेत. पण या तिन्हींमध्ये विक्री, खप आणि प्रभाव याबाबत सावंतांची 'मृत्युंजय' अधिक सुदैवी ठरत आली आहे. अजून पाच वर्षांनी या कादंबरीचा सुवर्णमहोत्सव साजरा होईल, पण त्याआधीच ती पुन्हा चर्चेत आली आहे. या कादंबरीने नुकताच कोर्टातला सामना जिंकला असून आता ती नव्या रूपात आणखी काही वाचक-प्रदेश पादाक्रांत करायला सज्ज झाली आहे. गेल्या वर्षी पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊसने व्यंकटेश माडगूळकरांच्या सर्व पुस्तकांचे हक्क विकत घेतले, तेव्हा मराठी प्रकाशन व्यवहारामध्ये बरीच खळबळ उडाली होती. काहींनी छन्न-प्रच्छन्न टीकाही केली होती. पण मेहतांनी माडगूळकरांची सर्व पुस्तके नव्या दिमाखात बाजारात आणली आणि लगोलग शिवाजी सावंत यांच्या 'मृत्युंजय', 'छावा', 'युगंधर' या कादंबऱ्यांचेही हक्क विकत घेण्याची तयारी दाखवली. त्याला सावंतांचे सध्याचे प्रकाशक कॉन्टिनेन्टलने हरकत घेऊन मेहतांना कोर्टात खेचण्याचा प्रयत्न केला. त्याचा निकाल नुकताच अपेक्षेनुसार मेहतांच्या बाजूने लागला आहे. आता सावंतांच्या तिन्ही लोकप्रिय कादंबऱ्या नव्याने उपलब्ध होतील. त्याची सुरुवात 'मृत्युंजय'पासून होत आहे. १९६७ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीने सावंतांना 'मृत्युंजयकार' अशी उपाधी मिळाली. आतापर्यंत या कादंबरीच्या २७ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. शिवाय तिचे हिंदी, कन्नड, इंग्रजी, गुजराती, मल्याळम् अशा नऊ भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. अलीकडच्या चार-पाच वर्षांच्या काळात या कादंबरीच्या पायरेटेड प्रतीही पुण्या-मुंबईत राजरोस मिळू लागल्या. त्यांनाही वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या पायरेटेड प्रतींची किती विक्री झाली, याची अधिकृत आकडेवारी मिळण्याची सोय नाही. पण या सर्वाचा विचार केला तर पन्नास लाख वाचकांनी ही कादंबरी आत्तापर्यंत वाचली आहे, असे अनुमान काढता येते. १९९० साली कोलकात्यातील 'रायटर्स वर्कशॉप' या प्रख्यात प्रकाशन संस्थेचे संस्थापक-संचालक पी. लाल यांनी 'मृत्युंजय'ची नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केली होती. जगातल्या या सर्वोच्च सन्मानाच्या दारावर दस्तक देणारी ही मराठीतली पहिलीच कादंबरी. या सर्वाचा इत्यर्थ असा आहे की, गेली ४५ र्वष 'मृत्युंजय' वाचकांवर गारूड करून आहे.  
'मृत्युंजय'च्या लोकप्रियतेचे रहस्य सांगताना सावंत नेहमी एक विधान करायचे, ते असे- 'रामायण जीवन कसे असावे हे सांगते, तर महाभारत जीवन कसे आहे हे सांगते.' मानवी जीवनातल्या कमालीच्या गुंतागुंतीच्या आणि अनाकलनीय वाटणाऱ्या वाटा-वळणांचे यथार्थदर्शन महाभारतातून होते. महाभारतातला कुठला ना कुठला प्रसंग कोणत्याही माणसाला स्वत:च्या आयुष्याशी जोडता येतोच येतो. त्यामुळे रामायण थोडय़ा नवथर, भाबडय़ा वा ध्येयवादी लोकांना आवडते, तर महाभारत हे जगण्याचा पुरेसा अनुभव घेतलेल्या कुणालाही आपलेसे वाटते. रामायणाला कुणी विराट म्हणत नाही, ते भाग्य महाभारताच्याच वाटय़ाला शतकानुशतके आलेले आहे, ते त्यामुळेच. 'मृत्युंजय' ही उघडपणेच महाभारतावर आधारित कादंबरी आहे. 
सर्जनशील साहित्य नवी नैतिकता सांगत नाही, तर ते समाजात रूढ वा मान्य असलेल्या नैतिकतेच्या गोष्टींची जोडाजोड, तोडमोड करून तयार होते. महाभारत नेमके तसे आहे. कटकारस्थाने, हेवेदावे, रागलोभ, सत्ताकांक्षा, मानापमान, प्रेम-द्वेष, अहंकार, स्खलनशीलता, अवहेलना, कुचंबणा, पराक्रम, त्याग, सचोटी, प्रामाणिकपणा, शालीनता अशी सगळी मानवी मूल्ये महाभारतात पाहायला मिळतात. 
शिवाय माणसांना सुखात्मिकेपेक्षा शोकात्मिका जास्त आवडतात, आपल्याशा वाटतात. हे जागतिक साहित्यातल्या अभिजात म्हणवल्या जाणाऱ्या कादंबऱ्यांची नावे पाहिल्यावर सहज लक्षात येते. अशा कादंबऱ्यांच्या नायकाकडे श्रेष्ठ दर्जाची गुणवत्ता असावी लागते, पण त्याचे योग्य श्रेय त्याला उपभोगता येत नाही. त्याच्या वाटय़ाला सतत दुर्दैव यावे लागते. अशा नायकाचा शेवट अकाली वा दु:खदरीत्या व्हावा लागतो. त्यामागे कपट-कारस्थाने, धोका, दबाव असेल तर आणखीच उत्तम. महाभारतातला कर्ण नेमका तसा आहे. (भीष्म, अश्वत्थामा, अभिमन्यूही काही प्रमाणात तसेच आहेत.) कर्णाच्या वाटय़ाला जन्मापासूनच अवहेलना आली. कुंतीपुत्र असूनही चाकरी करावी लागली. श्रेष्ठ असूनही दुय्यमत्व पत्करावे लागले..आणि अंगी शौर्य असूनही केवळ शापामुळे मरण पत्करावे लागले. म्हणजे उच्च कोटीच्या शोकात्म नायकाची सारी लक्षणे कर्णाच्या चरित्रात सापडतात. त्यामुळे कर्णासारखे वीर पुरुष जेव्हा कादंबऱ्यांचे नायक होतात, त्यातही सावंतांसारखे जादुई शब्दकळेच्या लेखकाचे नायक होतात, तेव्हा ते आणखीनच धीरोदात्त, भव्य होतात. सर्जनशील साहित्यात नेहमीच प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट केल्या जातात. 'मृत्युंजय'मध्ये कर्णाचेही तसेच होते. बरे, हा कर्ण होमरच्या 'ओडिशी'तला नाही की, दान्तेच्या 'डिव्हाइन कॉमेडी'तला नाही. तर तो आपल्या संस्कृतीचा अपरिहार्य भाग असलेल्या, आपल्या पूर्वजांच्या कैक पिढय़ांना मुखोद्गत असलेल्या महाभारतातला आहे. हा ऋणानुबंधही 'मृत्युंजय'ला दशांगुळे वर उचलतो. 
अतिशय पल्लेदार, रसाळ आणि ओघवती भाषा हे शिवाजी सावंतांच्या लेखणीचे वैशिष्टय़. भरजरी, दिपवून टाकणाऱ्या उपमा-अलंकारांची लयबद्ध पखरण हा प्रधान शैलीविशेष. त्यामुळे त्यांची भाषा सामान्य वाचकाला बेमालूमपणे संमोहित करते. 'मृत्युंजय' मध्ये तर ते खूपच होते. खरे तर ही कादंबरी, त्यात सावंतांसारखा शब्दप्रभू तिचा निर्माता. त्यामुळे त्यात तथ्यांची मोडतोड जरा जास्तच आहे. पण प्रेम शास्त्रकाटय़ाच्या तराजूत तोलायची गोष्ट नसते. 'मृत्युंजय'वरच्या वाचकांच्या प्रेमाचेही तसेच आहे. त्याला सत्याची, तथ्याची, साक्षेपाची चाड नाही. विवेकाची भीडमुर्वत नाही. तो आपला 'मृत्युंजय'वर लुब्ध आहे. या लुब्धतेला विश्रब्धतेची जोड आणि साक्षेपाचा आधार कधी मिळेल, हे सांगता येत नाही. महाभारतातील प्रत्येक पात्रांशी सावंतांचा ऋणानुबंध जडला होता, तसाच वाचकांचाही सावंतांच्या 'मृत्युंजय'शीही जडला आहे, जडलेलाच राहील. कारण जगण्याचे महाभारत सतत चालूच असते आणि रणांगणात उभ्या असलेल्या मर्त्य मानवांपुढे सत्य, न्याय, विवेक, बुद्धिवाद या गोष्टी कोवळ्याच ठरतात