Sunday, June 23, 2013

उदारमतवादी समीक्षकाच्या गुजगोष्टी

LOKSATTA, Published: Sunday, June 23, 2013


प्रा. रा. ग. जाधव हे साठच्या दशकातले एक मान्यवर समीक्षक. दहा वर्षे एस.टी.त कारकुनी, दहा वर्षे प्राध्यापकी आणि वीस वर्षे मराठी विश्वकोशात मानव्य विद्यांचा प्रमुख संपादक, अशी रा.गं.ची व्यावसायिक कारकीर्द. त्यांनी थोडंफार कवितालेखनही केलं आहे, अलीकडे ललित लेखनही केलं आहे. पण त्यांची मुख्य ओळख आहे ती समीक्षक म्हणूनच. मराठी साहित्य-समीक्षेच्या क्षेत्रात त्यांचा अतिशय आदरपूर्वक आणि कौतुकाने उल्लेख केला जातो. त्या रा. गं.च्या निवडक लेखाचे हे पुस्तक, 'संध्यासमयीच्या गुजगोष्टी'. त्याचे शीर्षक पुरेसे बोलके आणि सूचक आहे. रा. ग. हे वृत्तीने समीक्षक आहेत आणि स्वभावाने निरागस. त्यामुळे त्यांच्या लेखनात आणि जगण्यात एक अलवार हळुवारपण असते. याचा अर्थ असा नव्हे की, त्यात ठामपणा नसतो. तो तर असतोच. पण सर्जनशील साहित्याविषयी एका मर्यादेनंतर फार ठाम विधानं करता येत नाहीत, याची स्पष्ट जाणीव असते. आणि रा. ग. पुस्तकाला एक सेंद्रिय कलाकृती मानतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे 'साहित्याचे परिस्थितीविज्ञान' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. वय वर्षे ऐंशीच्या सांजपर्वात त्यांची लेखणी धीम्या गतीने चालूच आहे, नव्हे ती नवा काहीतरी विचार मांडू पाहते आहे, याची चुणूक त्यांनी 'इकॉलॉजी ऑफ लिटरेचर' ही संकल्पना मांडून दाखवली आहे. त्याची मराठी साहित्यविश्व कितपत दखल घेईल माहीत नाही. रा. गं.नाही त्याची खात्री नाहीच. माझे पुस्तक कोणी वाचणार नाही, असे त्यांनाही वाटते. असो.

प्रस्तुत पुस्तक मात्र रा. गं.च्या इतर पुस्तकांपेक्षा बरेचसे वेगळे आहे. यात साहित्यविषयक लेख आहेत, पण हे रूढार्थाने समीक्षेचे पुस्तक नाही. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर या गुजगोष्टी आहेत. मुख्य म्हणजे त्या सांजपर्वातील आहेत. म्हातारपण हे दुसरे बालपण असते, असे गमतीने(च) म्हटले जाते. पण रा. गं.बाबत ते गमतीने म्हणण्याचीही सोय नाही. कारण ते म्हणतात, ''सांजपर्व माणसाला मीविषयी बोलायला प्रवृत्त करते, खरे तर संधीच देते. पूर्वी हिरीरीने मांडलेल्या विचारांना परिपक्व सहिष्णुता देते. स्वत:कडे व स्वत:च्या सर्व पूर्ण संचिताकडे हळुवार तटस्थपणे पाहण्याची दृष्टी देते. सांजपर्वाच्या छायेत म्हणून संकीर्णतेचे रंगरूप ल्यालेल्या गुजगोष्टी सुचू लागतात.''


थोडक्यात सांजपर्व हे स्वत:कडेच नव्याने पाहायला लावणारे, स्वत:चा शोध घ्यायला लावणारे वय असते. त्यात रा. ग. समीक्षक. त्यामुळे ते स्वत:कडेही समीक्षकाच्याच नजरेतून पाहतात, आणि स्वत:ला अजिबात झुकते माप देत नाहीत.  'उदारमतवादी समीक्षक' अशी रा. गं.ची मराठी साहित्यविश्वात ओळख असली तरी ते स्वत:बाबत मात्र तितकेसे उदार नाहीत, असे दिसते. यातले काही लेख इतर लेखकांविषयीही लिहिलेले आहेत. त्यांना आदरांजली म्हणून किंवा त्यांचं अभिनंदन करण्यासाठी. त्या सर्वामध्ये मननीयता आणि सात्त्विक स्वीकारशीलता आहे. हळुवार परिपक्वता या पुस्तकातील सर्वच लेखांमधून जाणवते.


या पुस्तकात एकंदर अठ्ठावीस लेख असून ते चार भागांत विभागले आहेत. पहिल्या विभागातील नऊ लेख हे स्वत:विषयी आहेत. त्यातून रा. गं.च्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू जाणून घेता येतील. एरवी कमालीचे संकोची, भिडस्त असणाऱ्या रा. गं.नी या विभागात स्वत:च्या मनीचे काही गुज सांगितले आहे. पण तरीही ते लिहितात, 'काही जण मला आत्मचरित्र लिहायचा आग्रह करतात. आत्मचरित्र म्हणजे सत्याचे प्रयोग. आहे का धाडस? मग कशाला लिहा? त्या वाटेनं मी जाणार नाही. आत्मप्रौढी करण्यासाठी आत्मचरित्र लिहू नये.'


'सध्या थोर लेखकांची अनुपस्थिती आहे, आव्हानात्मक साहित्यकृतीही निर्माण होत नाहीत, प्रयोगशीलताही कमीच दिसते. या अंधाऱ्या पोकळीत समीक्षेचे अभ्यासकच प्रकाशाचे दीप उजळतील, असे मला वाटते.' असा विश्वास रा. ग. दाखवतात. 'दलित लेखकांनी गांधीजींचं 'माय एक्स्परिमेंट विथ ट्रथ' वाचावं..मराठीखेरीज अन्य भारतीय भाषांतील दलित वाङ्मयात आयडियॉलॉजी कमी आणि वाङ्मय अधिक आहे. आपल्याकडे उलट आहे.', 'मनमोहन आणि ग्रेस यांच्या कवितेत फँटसी आणि इमॅजिनेशनचा संगम आहे', 'प्रत्यक्ष जगण्याच्या परीक्षेत बहुतेक लोक नापासाच! कारण जगातील सर्वात अप्रिय सत्य हे 'मी'विषयीच असते' असे काही चांगले तुकडे वा ओळी या पुस्तकातील लेखांत सापडतात. आणि त्या आपल्याला थोडय़ाशा चमकावून जातात. रा. गं.नी त्या फार साधेपणाने सांगितल्या आहेत, पण त्या तशा नाहीत.


दुसऱ्या विभागात साहित्यसंस्कृती, भाषा, साहित्य संमेलनाचे औचित्य, साहित्यातील बाप, लेखक-वाचक यांच्यातील अंतर, परिभाषा, सार्वजनिक ग्रंथालय, प्रादेशिक साहित्य या विषयांवरील एकंदर नऊ लेख आहेत. तिसऱ्या विभागातील 'बन्सीधर, तू आता कुठे रे जाशील?' आणि 'अद्भुताचे ब्रह्मांड' हे दोन्ही लेख, एकंदर जीवनाविषयी रा. गं.ना काय वाटतं, याविषयी आहेत. मात्र जीवनाकडे पाहण्याची रा. गं.ची या दोन्ही लेखांतील दृष्टी ही समीक्षकाची नसून ललित लेखकाची आहे. चौथ्या विभागातील आठही लेख तसे पाहिले तर समीक्षकीय दृष्टीचे, पण टिपणवजा आहेत. त्यातून फारसं काही नवीन हाती लागत नाही. पण तरीही काही निरीक्षणे, मुद्दे जाणून घेता येतातच. 'श्यामची आई', 'स्वामी', 'कोसला' या तीन कादंबऱ्या, नारायण सुर्वे, जी. ए. कुलकर्णी, वसंत आबाजी डहाके यांच्यावरील लेख हे प्रासंगिक असले तरी त्यातून रा. ग. 'कसं पाहतात?' हे जाणून घेता येतं. पण या लेखांची लांबी-रुंदी छोटी असल्याने त्यातून त्यांनी फार मोठा व्यूह मांडलेला नाही. 'आधुनिक मराठी विनोद-परंपरा'हा शेवटचा लेख मराठीतील विनोदी लेखनाचा धावता आढावा घेणारा आहे. 


दोनेक वर्षांपूर्वी ज्येष्ठ कोकणी लेखक रवींद्र केळेकर यांचे 'ओथांबे' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. (ओथांबे म्हणजे ओथंबून आलेले दवबिंदू) केळेकर यांचे विविध विषयांवरील विचार त्यात एकत्र केले आहेत. रा. गं.चे हे पुस्तक काही तसे नाही. 'माझे चिंतन' हे त्यांचे पुस्तक त्यांच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने प्रकाशित झाले आहे, त्यातून त्यांच्या विचारांचा गाभा चांगल्या प्रकारे समजावून घेता येतो. त्या तुलनेत प्रस्तुत पुस्तकात चिंतन फारसं नाही, पण मननीयता आणि एकंदरच जगणं, मराठी साहित्य याविषयीची स्वीकारशीलता आहे.

 
यातील सर्वच लेख हे आठ-दहा पानांचेच आहेत. शिवाय हे समीक्षक रा. गं.नी गप्पा माराव्या तसं लिहिलेलं 
पुस्तक आहे, हेही वैशिष्टय़च की! त्यामुळे त्यात समीक्षकीय परिभाषा फारशी नाही. अनौपचारिक शैली, साधीसोपी भाषा आणि काहीशी काव्यमय लय, ही काही यातील लेखांची वैशिष्टय़े आहेत. 'खेळीमेळी', 'वासंतिक पर्व' हे रा. गं.चे दोन ललित लेखसंग्रह अनुक्रमे २००८ व २००९ साली प्रकाशित झाले. त्यानंतरचा हा तिसरा. शिवाय सांजपर्वातला. त्यामुळे यातलं मार्दव व लालित्य मनमोकळं आणि दिलखुलास म्हणावं असं आहे. 


एका परीने हे बहुधा रा. गं.चं शेवटचं पुस्तक असण्याची दाट शक्यता आहे. कारण उरलंसुरलं असं या पुस्तकाचं पुस्तक आहे. वय वर्षे ऐंशीमध्येही रा. गं.ना नव्या पुस्तकाचं अप्रूप वाटतं. त्याचा पहिला पहिला नवाकोरा वास सुखावतो. गेली ४०-५० पन्नास वर्षे सातत्याने, निरलस वृत्तीने लेखन करणाऱ्या एका उदारमतवादी समीक्षकाच्या या पुस्तकाचं वाचकांनाही अप्रूप वाटावं आणि त्याच्या वाचनानं तेही सुखावेत. कारण गेली पन्नासहून अधिक वर्षे केवळ मराठी साहित्याचं चिंतन-मनन करणयात घालवलेल्या एका व्रतस्थ समीक्षकाचं हे लेखन आहे. जगाकडे, जीवनाकडे आणि मराठी साहित्याकडे सतत कुतूहलाने पाहात राहिल्याने रा. गं.कडे चार वेगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत..आणि त्या या पुस्तकात उतरल्या आहेत. त्यातून निदान काही जणांना तरी काही नव्याने सापडू शकेल.


'संध्यासमयीच्या गुजगोष्टी' - प्रा. रा. ग. जाधव, 

साधना प्रकाशन, पुणे, 
पृष्ठे - १७२, मूल्य - १२५ रुपये.

Monday, June 17, 2013

सावध ऐका पुढल्या हाका...

LOKSATTA : Sunday, June 16, 2013


उदारीकरणाच्या गेल्या दोन दशकांमध्ये शेती, सेवा, उद्योग, शिक्षण, आरोग्य, प्रसारमाध्यमं, चित्रपट, संगीत, साहित्य या क्षेत्रांमध्ये झपाटय़ानं अनेक स्थित्यंतरं झाली. यातल्या काही क्षेत्रांचा तर नव्या तंत्रज्ञानानं अगदी कायापालट करून टाकला आहे. तो केवळ स्तिमित करणारा आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर संगीताचं घेता येईल. एकेकाळी संगीताच्या तबकडय़ा होत्या. मग एल. पी. आल्या. नंतर कॅसेट निघाल्या. त्यानंतर सी.डी.चं आगमन झालं. आणि आता मोबाइल आणि आयपॉड आलेत. यातल्या प्रत्येक नव्या तंत्रानं आधीचं तंत्र मोडीत काढलं. पण या सर्व प्रवासात संगीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदतच झाली. पूर्वी संगीत ऐकण्यावर बऱ्याच मर्यादा होत्या आणि त्यामुळे ती एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. पण मोबाइल आणि आयपॉड या दोन्हींनी संगीताला फारच सोयीस्कर, सर्वगामी आणि सर्वसंचारी करून टाकलं. त्यामुळे संगीत ही कुठेही, केव्हाही ऐकण्याची गोष्ट झाली. लोकही त्याचा फायदा घेऊ लागले. लोकल, बस, शाळा-कॉलेज, ऑफिस, घरी, प्रवासात, अगदी टॉयलेटमध्ये असतानाही आता संगीत ऐकता येतं. लोक ते ऐकतातही. तंत्रज्ञानानं संगीताच्या बाबतीत ही जी काही उलथापालथ घडवली आहे, ती लोकांच्या संगीताविषयीच्या दबावामुळे घडली नसून त्या- त्या क्षेत्रातल्या शक्यता तपासण्याच्या महत्त्वाकांक्षेतून घडली आहे. या नवनव्या तंत्रांमुळे संगीताची उपयुक्तता वाढली आणि ते सहजसाध्य झालं, म्हणून त्याचा वापर वाढला. असे बदल इतरही काही क्षेत्रांमध्ये होत आहेत. त्यात मराठी प्रकाशन व्यवहाराचाही उल्लेख करावा लागेल. संगीताइतक्या पटीत नाही, पण तशा प्रकारे मराठी पुस्तकांबाबतही स्थित्यंतरं झाली आहेत, होत आहेत.

एकेकाळी पुस्तकं विकत घेणं ही खास मध्यमवर्गाची चैन होती. पण गेल्या वीस वर्षांच्या काळात मध्यमवर्गाचे उच्च, मध्यम आणि निम्न असे तीन वर्ग झाले असून त्यात फार मोठय़ा समाजसमूहाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे आता पुस्तक विकत घेण्याविषयीची अनुकूलता कितीतरी पटींनी वाढली आहे. पूर्वी आवडही कमी आणि अनुकूलताही कमी होती. आता सेवासुविधांच्या साधनांमुळे, माहितीच्या प्रचंड स्फोटामुळे आणि पैशाच्या खुळखुळण्यामुळे आवड आणि अनुकूलता या दोन्हींबाबत परिस्थिती खूपच सुधारली आहे. साहित्य संमेलनामध्ये तीन दिवसांत होणारी काही कोटींची पुस्तकविक्री, गावोगावी सातत्याने होणारी पुस्तक प्रदर्शने, ५० रुपयांत पुस्तकं मिळताहेत म्हटल्यावर तासन् तास रांगा लावून पुस्तकं विकत घेणारे लोक- ही काही उदाहरणं यासंदर्भात लक्षात घेण्यासारखी आहेत.


कथा-कादंबरी-कविता या सर्जनशील विषयांवरील पुस्तकांची संख्या 'जैसे थे' असताना उपयुक्ततावादी पुस्तकांची संख्या मात्र कमालीची वाढली आहे. त्यांना वाचकांचा खूप चांगला प्रतिसादही मिळतो आहे. पण या पुस्तकांना खुद्द काही प्रकाशकांकडून नाकं मुरडली जातात. वस्तुत: उपयुक्ततावादी पुस्तकं म्हणताना आपल्याला नेमकं काय अभिप्रेत आहे, हे नीट समजून घेतलं पाहिजे. त्यात मानसिक आरोग्य, अध्यात्म, जीवनशैली, स्वास्थ्य, आहार, करिअरविषयक, संभाषणकौशल्य अशा पुस्तकांचा समावेश होईल. पण त्यातच अपारंपरिक प्रकारातल्या पुस्तकांना टाकून चालणार नाही. या प्रकारात खूप वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकं प्रकाशित होत आहेत. आयुष्यभर तोंडी तलाकच्या विरोधात काम करणाऱ्या सय्यदभाई यांचे 'दगडावरची पेरणी', विठ्ठल कामत यांचे 'इडली, ऑर्किड आणि मी', शोभा बोंद्रे यांचे 'मुंबईचे डबेवाले', सुनील ठाणेदार यांचे 'ही तो श्रींची इच्छा', रमेश जोशी यांचे 'माझी कॉपरेरेट यात्रा' अशा अनेक पुस्तकांचा उल्लेख करता येईल. राजहंस, मनोविकास यासारख्या प्रकाशन संस्था अपारंपरिक पुस्तकं मोठय़ा प्रमाणावर प्रकाशित करत आहेत. त्यांना वाचकांचा चांगला प्रतिसादही मिळतो आहे. या प्रकारच्या पुस्तकांचं वाढलेलं मार्केट ही खरं तर फार आश्वासक अशी संधी आहे मराठी प्रकाशकांसाठी.


इंटरनेट, ब्लॉग, इंग्रजी वर्तमानपत्रे यांच्यामुळे जगातील बेस्टसेलर आणि गाजलेल्या पुस्तकांची माहिती सहजासहजी वाचकांपर्यंत पोहोचू लागली आहे. त्यातून गाजलेली पुस्तकं, त्यांचे लेखक यांच्याविषयी उत्सुकता निर्माण होत आहे. हे लक्षात घेऊन आधी मेहता पब्लिशिंग हाऊस आणि नंतर साकेत प्रकाशन यांनी अनुवादित पुस्तकं प्रकाशित करायला सुरुवात केली. मेहताने तर कितीतरी विषयांवरील पुस्तके अनुवादित केली आहेत, करत आहेत. ही सर्व पुस्तकं बेस्टसेलर तरी आहेत किंवा गाजलेली तरी. त्यांच्याविषयी मराठी वाचक आता पुरेसा सजग झाल्यामुळे या पुस्तकांना बाजारात मागणी आहे. 


एकेकाळी वर्षांला किमान हजार-बाराशे पुस्तकं मराठीत प्रकाशित होत. ही संख्या गेल्या वीस वर्षांच्या काळात वाढून आता तीन हजारांच्याही पुढे गेली आहे. म्हणजे दर महिन्याला २५०-३०० नवी पुस्तकं बाजारात येतात. त्यांच्या प्रत्येकी एक हजार प्रती गृहीत धरल्या तर साधारणपणे तीन लाख पुस्तकांच्या प्रती छापल्या जातात. प्रत्येक पुस्तकाची किंमत ढोबळमानाने शंभर रुपये धरली तर किती कोटी रुपयांची उलाढाल होते, याचा अंदाज करता येईल. 


पण तरीही पुस्तकांच्या किमती हा अजूनही कळीचा मुद्दा ठरतो आहे. इंग्रजीमध्ये एकाच पुस्तकाच्या साधारणपणे हार्डबाऊंड आणि पेपरबॅक अशा दोन प्रकारांतल्या आवृत्त्या काढल्या जातात. काही वर्षांपूर्वी आधी फक्त हार्डबाऊंड आवृत्ती प्रकाशित केली जायची. मग त्यानंतर काही महिन्यांनी वा एखाद् दुसऱ्या वर्षांने पेपरबॅक आवृत्ती काढली जायची. आता इंग्रजी प्रकाशक तसे करत नाहीत. ते एकाच वेळी दोन्ही आवृत्त्या बाजारात आणू लागले आहेत. म्हणजे त्या पुस्तकाबद्दलची वाचकांची ओढ तीव्र असतानाच ते बाजारात येते आणि त्याची चांगली विक्री होते. मराठी प्रकाशकांनाही हा पर्याय स्वीकारता येण्यासारखा आहे. मध्यंतरी '५० रुपयांत एक पुस्तक' या योजनेला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, त्यावरून याची खात्री पटायला हवी. तसे झाले तर पुस्तकांची विक्री कितीतरी पटींनी वाढेल. 


काळ बदलतो तशी वाचकांची अभिरुची बदलते. एकेकाळी शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, लेखक, संशोधक, शास्त्रज्ञ अशा बुद्धिजीवी लोकांपुरतीच पुस्तकं ही 'नडीव' गोष्ट होती. आता ती तशी राहिलेली नाही. तिचा परीघ कितीतरी पटींनी विस्तारला आहे. मात्र, त्या आसुसलेल्या, पुस्तकांची वाट पाहणाऱ्या वाचकांपर्यंत पोहोचण्यात मराठी प्रकाशकच कमी पडत आहेत. 


कुठलंही नवं माध्यम आलं की, त्याचे फायदे आणि तोटे सांगणारे लोक पुढे येत असतात. म्हणजे स्वागत करणारे आणि विरोध करणारे. ते मराठी प्रकाशन व्यवहारातही आहेत. ई-बुक रीडरमुळे छापील पुस्तकांचं भवितव्यच धोक्यात येणार असल्याची हाकाटी काहींनी सुरू केली आहे. छपाईचा शोध हा मानवाला लागलेला सर्वात महत्त्वाचा आणि मूलभूत स्वरूपाचा शोध आहे. म्हणजे असं की, छपाईचा शोध विजेच्या शोधासारखा आहे. वीज वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध होईल, तिचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येईल; पण तिला मोडीत काढून नवंच काहीतरी उभं राहणं हे जसं कठीण आहे, तसंच पुस्तक छपाईचंही आहे (सौरऊर्जा, बायोगॅस हे विजेला पर्याय म्हणून शोधले गेले असले तरी त्यामुळे विजेची अपरिहार्यता अजिबात कमी झालेली नाही!). त्यामुळे ई-बुक रीडरमुळे पुस्तकवाचनावर काही परिणाम होईल असे वाटत नाही. शिवाय त्यांची संख्या जेमतेम दोन टक्के भरेल इतकीही नाही. पण नको त्या गोष्टीसाठी आरडाओरड करणं ही काही मराठी प्रकाशकांची फॅशन झाली आहे. 


इंटरनेटमुळे बातम्या, छायाचित्रं, लेख, पुस्तकं, कोश सहजासहजी उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे लोकांची माहितीची भूक वाढली आहे. कारण माहिती मिळवणं सोपं झालं. त्यामुळे लोक इंटरनेटवर बऱ्याच गोष्टींसाठी अवलंबून राहू लागले आहेत. त्यातून वाचनाच्या दिशा विस्तारायला मदतच झाली आहे. 


याचं चांगलं प्रत्यंतर येतं ते 'अक्षरधारा'च्या पुस्तक प्रदर्शनात. महाराष्ट्रभर फिरून पुस्तक प्रदर्शन करणाऱ्या या संस्थेने इंटरनेट आणि इतर ठिकाणांहून माहिती पोहोचून उत्सुकता चाळवलेल्या लोकांना आधी पुस्तकांपर्यंत आणण्याचं काम केलं. मग त्यांच्यापुढे वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकांचे अगणित पर्याय उपलब्ध करून दिले. त्यामुळे केवळ पुस्तकं पाहण्यासाठी, कुणाला तरी भेट देण्यासाठी वा मुलांसाठी पुस्तकं विकत घ्यायला येणारा मध्यमवर्ग हळूहळू चाराऐवजी सहा आणि सहाऐवजी दहा पुस्तकं एकाच वेळी विकत घेऊ लागला. 'अक्षरधारा'च्या पुस्तक प्रदर्शनात येणारा बहुतांश ग्राहक हा पुस्तकांविषयी उत्सुकता असणारा, पण वाचनाविषयी तसा अनभिज्ञ असलेला असतो. 
उदारीकरणाचा काळ हा अधिक चांगल्या प्रकारे व्यावसायिकता अंगी बाळगण्याचा काळ आहे. त्या तुलनेत मराठी प्रकाशन व्यवहार मात्र अजून सुशेगात आहे. लेखकाचे मानधन, पुस्तकांची विक्री, जाहिरात, वितरण, प्रसिद्धी यांबाबत ते गाफील म्हणावे इतके मागे तरी आहेत किंवा रडके तरी आहेत. शिवाय जुनी नीतिमूल्यं उराशी कवटाळून बसलेले आहेत. स्वत:हून कुठलाही नवीन बदल स्वीकारायचा नाही; पण इतर कुणी करत असेल तर त्याला मात्र नावं ठेवायची! 


आजचं बदलतं समाजवास्तव टिपणाऱ्या, त्यांना भिडू पाहणाऱ्या विषयांचा शोध घेऊन त्यावर पुस्तकं लिहून देणाऱ्या लेखकांचा शोध घेणं आणि त्यांना लिहितं करण्याची गरज आहे. लेखकानं प्रकाशकाकडे हस्तलिखित आणून देणं आणि प्रकाशकाने ते प्रकाशित करणं, यापेक्षा आता प्रकाशकांनी नव्या विषयांचा आणि नव्या लेखकांचा शोध घेणं गरजेचं झालं आहे. साधना प्रकाशनाला फारसं मनुष्यबळ हाताशी नसताना, कुठलीही यंत्रणा नसताना जे शक्य होत आहे, ते ज्या प्रकारची पुस्तकं प्रकाशित करत आहेत, आणि त्यांना जो प्रतिसाद मिळत आहे, त्यातून चार गोष्टी व्यावसायिक प्रकाशकांना शिकता येण्यासारख्या आहेत. नक्षलवाद ही आजची अतिशय ज्वलंत राष्ट्रीय समस्या आहे. त्यावरचं मराठीतलं पहिलं पुस्तक साधनानं प्रकाशित केलं. हे इतर कुठल्याही प्रकाशकाला सुचलं नाही. अजूनही या विषयावर मराठीत लेखन होण्याची नितांत गरज आहे. अशीच- बदलता ग्रामीण महाराष्ट्र, बदलती शहरं यांची स्पंदनं टिपणारं, त्यात होणाऱ्या बदलांना गवसणी घालू पाहणारी पुस्तकं येण्याचीही तेवढीच निकड आहे. उदारीकरणाचं समर्थन करणारं, त्याचं स्वागत करणारं लेखन मराठीत कुणीही करताना दिसत नाही. समर्थन न करू दे; पण होत असलेले बदल तरी आपण नीटपणे समजून घेणार आणि समजावून देणार आहोत की नाही, याचा मराठी प्रकाशकांनी गांभीर्याने विचार करायची गरज आहे.

  
थोडक्यात, उदारीकरणाच्या काळाने मराठी प्रकाशन व्यवहारात अनेक संधी निर्माण केल्या आहेत, तशी काही आव्हानेही उभी केली आहेत. या संधीचा मराठी प्रकाशक जितक्या चांगल्या प्रकारे लाभ उठवतील आणि आव्हानांना जेवढय़ा धीराने सामोरे जातील, तेवढं त्यांच्या आणि वाचकांच्याही फायद्याचंच आहे!

Thursday, June 6, 2013

वाचलीच पाहिजेत अशी ४० पुस्तकं


प्रत्येक जण आपल्याला आवडेल ते वाचतच असतो. पण वाचलंच पाहिजे असं काय काय आहे मराठीत.

१) भारतीय संविधान (अधिकृत प्रत)
आपल्या राज्यघटनेत काय काय आहे हे आपल्याला माहीत असलंच पाहिजे. ती वाचणं अपरिहार्यच!


२) स्त्रीपुरुषतुलना - ताराबाई शिंदे
एकोणिसाव्या शतकात स्त्रीवादी मांडणी करणारे, काळाच्या अत्यंत पुढे असलेले हे पुस्तक म्हणजे भारतातील स्त्रीवादी मांडणीचा एन्सायक्लोपीडियाह्णच आहे.


३) स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक
एका सामान्य स्त्रीच्या संसारातील साध्यासुध्या, कडू-गोड, आंबट-तुरट आठवणींनी, संगती-विसंगतींनी भरलेली, पण प्राजंळपणे, सूक्ष्मपणे आणि विनोदबुद्धीने सांगितलेली ही असामान्य आणि अद्वितीय कलाकृती आहे.


४) झेडुंची फुले - केशवकुमार
विडंबन या विषयावरचं मराठीतलं एकमेव पुस्तक आहे. यानंतर एकाही पुस्तकाचं नाव घेता येत नाही.


५) मर्ढेकरांची कविता 
ज्या कवितांविषयी गेली साठ-सत्तर र्वष सातत्याने लिहिलं जात आहे, त्या मर्ढेकरांच्या कवितांचा हा छोटासा संग्रह. 


६) मुंबईचे वर्णन - गोविंद नारायण माडगावकर
मुंबईविषयीचं हे पुस्तक मुंबईविषयीच्या आजवर लिहिल्या गेलेल्या सर्व पुस्तकांमध्ये श्रेष्ठ आहे.


७) आगरकर वाङ्मय (खंड १ ते ३)- संपा. दि. य. देशपांडे व नातू
आगरकर वाचल्याशिवाय बुद्धिवाद म्हणजे काय आणि विचारकलह म्हणजे काय, हे समजून घेता येत नाही.


८) दिवाकरांच्या नाटय़छटा
नाटय़छटा हा वाङ्मयप्रकार मराठीमध्ये फक्त दिवाकरांनीच लिहिला आणि तोही उत्तम प्रकारे. 


९) भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास - इतिहासाचार्य वि. का. राजवाडे
आजच्या र्निबधपूर्ण शरीरसंबंधांच्या काळात एकेकाळी भारतात विवाहाचे आणि शरीससंबंधांचे कोणकोणते मार्ग होते, याचा इतिहास यात वाचायला मिळतो.


१०) युगान्त - इरावती कर्वे
महाभारताकडे कसं पाहावं आणि महाभारत कसं वाचावं याचे वस्तुपाठ जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचावं. 


११) निवडक ठणठणपाळ - जयवंत दळवी
मराठीतलं सर्वाधिक काळ चाललेलं सदर आणि मराठी साहित्यिकांची इतक्या निर्भेळपणे टिंगलटवाळी करणारं सदाबहार पुस्तक.


१२) मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास - पु. ल. देशपांडे
पुलंचं हे दुर्लक्षित पण महत्त्वाचं पुस्तक आहे. 


१३) गावगाडा - त्रिंबक नारायण आत्रे
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील बारा बलुतेदार व्यवस्थेचं समाजशास्त्रीय रीतीने चित्रण करणारं हे पुस्तक आहे. आत्रे यांच्या करडय़ा नजरेतून ग्रामीण भागाचा कुठलाच भाग आणि विषय सुटलेला नाही. 


१४) साता उत्तराची कहाणी - ग. प्र. प्रधान
समाजवादी, साम्यवादी, रॉयवादी, पत्री सरकार, आंबेडकरवादी, हिंदुत्ववादी आणि गांधीवादी अशा सात विचारसरणींची १९४० ते ८० याकाळातली वैचारिक चर्चा ललित अंगाने करणारे आणि त्यासाठी पत्रे, आठवणी, गप्पा आणि फ्लॅशबॅक असा तंत्रांचा वापर करणारे हे पुस्तक. 


१५) न्या. रानडे यांचे चरित्र - न. र. फाटक
ऐन पंचविशीत फाटकांनी लिहिलेलं हे न्या. महादेव गोविंद रानडे यांचं चरित्र वाचल्याशिवाय रानडय़ांविषयी जाणून घेता येणं शक्य नाही.


१६) बहिणाबाईची गाणी 
जगण्याचं तत्त्वज्ञान इतक्या सोप्या आणि नेमक्या शब्दांत तत्त्वज्ञानाच्या पुस्तकातही सापडत नाही.


१७) आधुनिक भारत- आचार्य शं. द. जावडेकर
‘गीतारहस्य’नंतरचा थोर ग्रंथ असं या पुस्तकाचं वर्णन प्रसिद्ध लेखक वा. म. जोशी यांनी केलं आहे. याच वर्षी या पुस्तकाला पंचाहत्तर र्वष पूर्ण होतील. 


१८) मी कसा झालो- आचार्य अत्रे
अत्रे यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, त्यांची भाषा, वाक्यरचना आणि विचारसौंदर्य जाणून घेण्यासाठी हे पुस्तक लेखन करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने वाचलेच पाहिजे.


१९) निवडक म. श्री. माटे (खंड १ व २)
विचार असाही करायचा असतो आणि खरं तर असाच करायचा असतो, याचं तारतम्य माटेंच्या या निवडक लेखनातून ठसठशीतपणे दृग्गोचर होते.


२०) खरे मास्तर - बाळुताई खरे
मराठीमध्ये एकंदरच वडिलांविषयी लिहिलेली पुस्तके फारच कमी आहेत. हे पुस्तक वडिलांविषयी मुलीने लिहिलेले असले तरी त्यातून दोन पिढय़ांतील बदल, ताणेबाणे आणि बदलते प्राधान्यक्रम यांची ही कहाणी आहे. यातून विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा काळ चांगला टिपला गेला आहे.


२१) वाचू आनंदे (बालगट व कुमारगट) - संपा. माधुरी पुरंदरे
बालवयीन आणि कुमारवयीन मुलांचे भावविश्व आणि जाणिवा समृद्ध करणारा हा पुस्तकसंच (मुले आणि पालकांसाठीही) नितांत वाचनीय आहे.


२२) जागर - नरहर कुरुंदकर
विचार कसा करावा हा कुरुंदकरांच्या एकंदरच लेखनाचाच गाभा आहे. जागरह्णमध्ये तो अधिक तीव्रपणे समोर येतो आणि आपले विचारविश्व बदलून टाकतो.


२३) रामनगरी - राम नगरकर
स्वत:कडे इतक्या तटस्थपणे पाहून, स्वत:च्याच बावळटपणाची, चुकांची खिल्ली यात लेखकाने ज्या खिळाडूवृत्तीने सांगितली आहे, तशी मराठीतल्या इतर आत्मचरित्रांमध्ये क्वचितच दिसते.


२४) नपेक्षा - अशोक शहाणे
मराठी लघुनियतकालिकांचे जनक असलेल्या अशोक शहाणेंचं हे एकमेव पुस्तक. अतिशय बेरकीपणाने मराठी वाङ्मय व वाङ्मय संस्कृतीची झाडाझडती त्यांनी यात घेतली आहे. 


२५) निशाणी डावा अंगठा - रमेश इंगळे उत्रादकर
कोटय़वधी रुपये खर्च करून महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या साक्षरता मोहीमेचं नेमकं काय झालं, याचं भेदक चित्रण या कादंबरीत आहे. 


२६) विठोबाची आंगी - विनय हर्डीकर
१९८०ते २००० या दोन दशकातील फर्स्ट पर्सन डाक्युमेंटरीह्ण या प्रकारातील दीर्घ लेखांचा संग्रह. यातला प्रत्येक लिहिताना आपला घाम निघाला असे लेखकाने म्हटले आहे आणि यातला प्रत्येक लेख वाचताना वाचकाचाही घाम निघतो. 


२७) वैचारिक व्यासपीठे - गोविंद तळवलकर
भारतातील सात, युरोप-अमेरिकेतील सात आणि पाकिस्तानतील एक अशा एकंदर पंधरा इंग्रजी नियतकालिकांची वैशिष्टय़ूपर्ण ओळख. ही सर्व नियतकालिके तळवलकर अनेक र्वष सातत्याने वाचत आले आहेत. 


२८) सारांश - अरुण टिकेकर
आजच्या सामाजिक अनारोग्याची कारणं आणि त्यावरील उपाय या पुस्तकातील सात निबंधांतून जाणून घेता येतात. 


२९) बदलता भारत - भानू काळे
उदारीकरणाला १९९१मध्ये भारतात सुरुवात झाल्यावर पहिल्या १०-१२ वर्षांतल्या भारतीय समाजमनाचा शोध घेणारं पहिलं पुस्तक. तो लेखकाने भारतभर फिरून घेतला आहे. जागतिकीकरण समजून घ्यायला निदान आत्ता तरी मराठीतलं हे एकमेव पुस्तक आहे.


३०) कथा आणि कथेमागची कथा 
(खंड १ व २) - राजन खान
एक आघाडीचा सर्जनशील कथाकार (आणि कादंबरीकारही) आपल्या कथा लिहिताना काय काय पूर्वतयारी करतो, त्याविषयी कसकसा विचार करतो, त्याला विषय कसे सुचतात, तो ते कसे फुलवतो, अशा वाचकांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं एक कथा आणि त्या कथेमागचा लेख या उदाहरणांसह यात वाचता येतो.


३१) श्यामकांतची पत्रे
रियासतकार गो. स. सरदेसाई यांच्या मुलाने १९१२ ते १९१५ या काळात शांतिनिकेतनमधून वडिलांना लिहिलेल्या १८७ पत्रांचा हा संग्रह. अशा प्रकारच्या पत्रसंग्रहाचं मराठीतला पहिलाच प्रयत्न असलेलं हे पुस्तक नितांत वाचनीय आहे.


३२) तुकारामदर्शन - डॉ. सदानंद मोरे
तुकाराम आधुनिक काळात कुठे कुठे आणि कसेकसे सापडतात, त्याचं हे विविधांगी दर्शन थक्क करणारं आहे. तुकाराम महाराष्ट्राचं जगणं किती व्यापून राहिले आहेत, त्याची यातून प्रचीती येते.


३३) दगडावरची पेरणी - सय्यदभाई
तोंडी तलकाच्या विरोधात हमीद दलवाई यांच्या प्रेरणेने आणि स्वत:च्या बहिणीच्या अनुभवाने गेली ३०-४० र्वष मोहीम चालवणाऱ्या एका जिद्दीच्या कार्यकर्त्यांचे हे कार्यकथन आहे.


३४) शतकांचा संधिकाल - दिलीप पुरुषोत्तम चित्रे
विसाव्या शतकाच्या शेवटाला एक दशक बाकी असतानाच या शतकातल्या उलथापालथींचा आढावा यात घेतला आहे. गेलं शतक किती बदललं याचा अंदाज यावरून येऊ शकतो.


३५) गांधींनंतरचा भारत - रामचंद्र गुहा, अनु. शारदा साठे
भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास अतिशय नेमकेपणाने, तटस्थपणे आणि रंजकपणे सांगणारे हे पुस्तक भारतीय राजकारण समजून घेण्यासाठी आवर्जून वाचावे असे आहे.


३६) आठवले तसे - दुर्गा भागवत
दुर्गाबाईंच्या परखड समीक्षेचा आणि समतोल दृष्टिकोनाचा प्रत्यय देणारे हे पुस्तक आहे.


३७) शाळा - मिलिंद बोकील
पौगंडवस्थेतून प्रत्येक जण जातो. त्यामुळे त्या प्रत्येकाच्या मनात एक ‘शाळा’ असते. कधीतरी शाळेत गेलेल्या आणि कधीही न गेलेल्या असा सर्वाची ही कादंबरी आहे. 


३८) चनिया मनिया बोर - चंद्रकांत खोत
मुलांसाठीच्या गोष्टींचं इतकं भन्नाट लिहिलेलं, सजवलेलं आणि छापलेलं दुसरं पुस्तक मराठीमध्ये नसावं.


३९) नक्षलवादाचे आव्हान - देवेंद्र गावंडे
नक्षलवादी चळवळीचे इतके जवळून, इतके सत्यपूर्ण आणि वास्तव चित्रण करणारे हे पुस्तक वाचल्यावर सदसद्विवेदबुद्धी असलेली कुठलीही व्यक्ती नक्षलवादाच्या रोमँटिसिझममध्ये अडकणार नाही.


४०) अरेबियन नाईट्स (खंड १ ते १६)- रीचर्ड बर्टन, अनु. गौरी देशपांडे
माणसांच्या चांगूलपणाच्या, दांभिकतेच्या, नैतिक-अनैतिकतेच्या, वासना-आकांक्षेच्या, असूया-मत्सर-द्वेष आणि सद्भावनेच्या इतक्या धमाल आणि रंजक गोष्टी केवळ याच पुस्तकात वाचायला मिळतात.

Tuesday, June 4, 2013

आम्हास आम्ही पुन्हा पाहावे, काढुनी चष्मा डोळ्यांवरचा!

नकारात्मकता हा एकच दृष्टिकोन ठेवून उदारीकरणामुळे झालेल्या बदलांकडे पाहण्याचं वळण बहुतेकांना पडत आहे, पडले आहे. त्यामुळे या बदलांकडे पाहण्याचा वेगळा कोणता दृष्टिकोन असू शकतो आणि त्यातून पाहिल्यानंतर चित्र कसं दिसतं, याची ही चाचपणी.  मराठी साहित्यातील काही सकारात्मक बदल टिपण्याचा प्रयत्न.
LOKSATTA, Published :  Sunday, June 2, 2013.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

उदारीकरणाच्या गेल्या वीस-बावीस वर्षांत राजकारण, समाजकारण, सोयीसुविधा, शिक्षण, उद्योग, पत्रकारिता, शेती, सामाजिक चळवळी अशा अनेक क्षेत्रांत जे बदल झाले आहेत, त्याला मराठी साहित्यही अपवाद नाही. जागतिकीकरणात मराठी साहित्याचा परीघ वाढला आहे आणि केंद्रही बदललं आहे. एकेकाळी साडेतीन टक्क्यांचं साहित्य म्हणून ज्याची हेटाळणी केली जात होती, ते साहित्य आपल्या महानगरी कक्षा सोडून ग्रामीण पर्यावरणाला भिडलं आहे. तेव्हा महानगरी साहित्य हेच एकंदर मराठी साहित्य होतं. आता त्याचं स्वरूप बदलून एकंदर मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी ग्रामीण साहित्य आलं आहे. आजचं सर्जनशील साहित्य सर्वाधिक प्रमाणात ग्रामीण भागातूनच येत आहे. महानगरी साहित्याची निर्मिती बऱ्यापैकी रोडावली आहे. मिलिंद बोकील, मेघना पेठे, कविता महाजन अशी काही मोजकी नावं सोडली तर महानगरी साहित्यात फारसं काही नवं लिहिलं जात नाही. फारसं काही घडतानाही दिसत नाही.
साहित्याचं केंद्रच बदल्याने मराठी साहित्यातील सर्वात मोठी घडामोड मानली जाणारी घटना, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्वरूपही गेल्या बारा-पंधरा वर्षांत कमालीचं बदललं आहे. ते अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक होऊ पाहत आहे. पण हाच कळीचा आणि वादाचा मुद्दाही होऊ पाहत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून बुजुर्ग आणि सध्याचे आघाडीचे साहित्यिक फटकून राहतात. किंबहुना त्याविषयी फार नकारात्मकतेने बोलतात. ही साहित्य संमेलने बंद करून टाकली पाहिजेत, तिथे साहित्याचं काहीही घडत नाही; या संमेलनात आणि गावातल्या उरुसात काहीही फरक राहिलेला नाही; साहित्य संमेलन ही राजकारणाची भाऊगर्दी झाली आहे, अशी टीका सातत्याने केली जात आहे. 
यामुळे होतं काय की, संमेलनाविषयी आणि तिथल्या वातावरणाविषयी जरा जास्तच निराशाजनक चित्र रंगवलं जात आहे. परिस्थिती आहे त्यापेक्षा जास्तच फुगवून सांगण्याचा प्रकार आणि समस्यांचा बागुलबुवा करण्याचा प्रयत्न केला जातो आहे असं वाटतं. 'आमच्या काळी असं होतं' वा 'अमुक काळी असं होतं' हा तर ज्येष्ठांचा शिरस्ताच असतो. त्यातूनच संमेलनाविषयीची टीका अधिकाधिक कडवट होत चालली आहे. शिवाय राजकारण आणि राजकीय नेते यांच्याविषयीची नकारात्मकता हा कॉमन म्हणावा असा फॅक्टर आहे. जगाला एका विशिष्ट दिशेनं ढकलण्याचं काम करायचं असेल तर आधी जगाचं नीट आकलन करून घेण्याची गरज असते. जग जसं आहे, ते तसं का आहे हे समजून घेतल्याशिवाय त्याविषयी काही विधानं करणं हे फारसं बरोबर ठरत नाही.
१८७८ साली न्या. महादेव गोविंद रानडे यांनी पहिलं ग्रंथकार संमेलन भरवलं, ते नियमितपणे दरवर्षी भरायला पुढची जवळपास पन्नास र्वष जावी लागली आणि या काळात हे संमेलन ही फक्त अभिजनांची मक्तेदारी होती. त्यामुळेच म. फुल्यांनी पहिल्याच संमेलनाच्या निमंत्रणाचा स्वीकार केला नव्हता. फुल्यांना अपेक्षित असलेला बदल व्हायला पुढची पंचाहत्तर वर्षे जावी लागली. १९९५ साली परभणीला नारायण सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ६८वं साहित्य संमेलन भरलं. त्याला एक ऐतिहासिक महत्त्व होतं. एक तर ते सुव्र्यासारख्या कामगारवर्गातून पुढे आलेल्या साहित्यिकाच्या अध्यक्षतेखाली भरलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आधीच्या पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सातारा यांसारख्या मोठय़ा शहरांपेक्षा मराठवाडय़ातील परभणीसारख्या शहरात भरलं होतं. या संमेलनाला साहित्य रसिकांचा मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून संमेलनाची गर्दी हा चर्चेचा विषय ठरू लागला. ही गर्दी उत्तरोत्तर वाढतच जात आहे. २००६ साली मारुती चितमपल्ली यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूरला भरलेल्या ७९व्या संमेलनात या गर्दीने उच्चांक नोंदवला. ती गर्दी २००२ साली पुण्यात भरलेल्या आणि २०१० साली ठाण्यात भरलेल्या साहित्य संमेनाच्या वेळी मात्र दिसली नाही. म्हणजे महानगरातला साहित्याचा टक्का आता साडेतीन टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. 
याउलट गेल्या वीस-बावीस वर्षांत ग्रामीण भागात शिक्षणाचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे. शाळा, त्यांची संख्या, शाळेत जाणाऱ्या मुलामुलींची संख्या, गळतीचं कमी होत गेलेलं प्रमाण यामुळे शिक्षणाचा टक्का उत्तरोत्तर वाढतच गेला आहे. वीस-पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर किमान दहावीपर्यंतचं शिक्षण उपलब्ध होतं, ते आता पाच-सात किलोमीटरवर आलं आहे आणि या सर्व शाळा हा केंद्र सरकारच्या उदारीकरणाच्या- खासगीकरणाच्या धोरणामुळे निर्माण झालेल्या आहेत. आरक्षणाच्या धोरणामुळे बहुजन समाजाला मोठय़ा प्रमाणावर शिक्षणाची संधी मिळून तो त्याचा लाभ घेतो आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुशिक्षित वर्गाचं प्रमाण वाढत आहे. याशिवाय टीव्ही, मोबाइल, वाहतुकीच्या सोयीसुविधा, प्रसारमाध्यमांची उपलब्धता या गोष्टीही दाराशी आल्याने ग्रामीण जनतेच्या आकलनाच्या कक्षा वाढल्या आहेत. लेखन, वाचन, कला, संस्कृती यांविषयी आस्था निर्माण झाली आहे. साहित्य संमेलनाला होणारी गर्दी ही या सगळ्याचा परिपाक आहे. या गर्दीला साहित्य रसिकांमध्ये परावर्तीत करण्याचं आव्हान आहे, नाही असं नाही. पण ही प्रक्रिया जरा वेळ घेणारी आहे. ती सुरू झाली असली तरी तिची गती बरीच संथ आहे. त्यामुळे आता त्याविषयी आशावादी राहणं हाच सर्वात चांगला पर्याय आहे. 
साहित्य संमेलनासारखी मोठी घडामोड तीन दिवस आपल्या गावाजवळ भरणं, तिथे आपण कालपर्यंत ज्यांची केवळ नावंच ऐकून होतो वा वाचून होतो असे जानेमाने साहित्यिक पाहायला, जमल्यास त्यांच्याशी बोलायला मिळणं, परिसंवाद, कविसंमेलनं यातून या गर्दीच्या मनात कुठेतरी साहित्याविषयी आस्था निर्माण करणारं बीज पडतं आहे. त्याचे कोंब व्हायला वेळ लागेल, पण ते आज ना उद्या नक्की होतील. ग्रामीण भागातल्या लोकांना लेखक माहीत नसतात, पुस्तकं माहीत नसतात. एवढंच नाहीतर पुस्तकं म्हणजे नेमकं काय हेही माहीत नसतं. अशा लोकांना साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपला आवाका वाढवण्याची संधी मिळते आणि संमेलनही तळागाळात रुजायला मदत होते. तेच गेल्या काही वर्षांत होत आहे. 
अ. भा. साहित्य संमेलन हा मराठी साहित्यातला मुख्य प्रवाह आहे, हे एकदा नीट समजून घेतलं पाहिजे. तो 'मास'साठीचा उपक्रम वा सोहळा आहे. त्यामुळे तिथे ज्या मोठय़ा साहित्यिकांना जावंसं वाटत नाही, त्यांनी जाऊ नये. ते गेले वा न गेल्याने संमेलनाची उपयुक्तता कमी होत नाही. त्यामुळे या लोकांनी संमेलनाला तुच्छ लेखण्याचा उद्योग मात्र बंद केला पाहिजे. कारण संमेलन त्यांच्यासाठी नाही. साहित्य संमेलन हा सर्वसामान्य रसिकांशी होणारा साहित्यसंवाद आहे. त्यामुळे तो त्यांच्या पातळीवर उतरूनच केला पाहिजे. 
अ. भा. मराठी साहित्य संमेलन दिवसेंदिवस अधिकाधिक देखणं, भव्य होत आहे, त्याविषयीही नापसंती व्यक्त केली जाते. पण इथे हे लक्षात घ्यायला हवं की, मोठय़ा समूहाला आकर्षित करायचं असेल, आपल्याकडे खेचून घ्यायचं असेल तर गोष्टी जरा भव्यदिव्य कराव्या लागतात. त्यात चुकीचं काही नाही. कारण शेवटी संमेलन हे त्यांच्यासाठीच आहे. तो काही विद्यापीठीय पातळीवरील परिसंवाद नसतो की, तिथे एका प्राध्यापकाने बोलायचं आणि इतर प्राध्यापकांनी आपली बोलायची वेळ येईपर्यंत ऐकायचं. तशा आंबट चर्चा गंभीर चेहरा धारण करून अशा संमेलनात व्हायला लागल्या तर या संमेलनाकडे सर्वसामान्य रसिक फिरकणार नाहीत. विचारवेध साहित्य संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन, आंबेडकरी साहित्य संमेलन, ओबीसी साहित्य संमेलन अशा स्वरूपाच्या साहित्य संमेलनात अतिशय बोजड आणि विद्यापीठीय पातळीवरच्या सैद्धांतिक चर्चा केल्या जातात. अशी संमेलनं यशस्वी होतात असा दावा केला जातो. पण छोटय़ा स्वरूपाची संमेलन यशस्वी होतातच, मात्र तिथंही दर्जाचं आव्हान असतं. आणि त्या निकषावर त्यांची परिस्थिती यथातथाच असते, हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. शिवाय तेथे रसिक-श्रोत्यांची उपस्थितीही मर्यादित व बऱ्यापैकी एकसाची असते. महत्त्वाचं म्हणजे, या संमेलनांचं स्वरूप आणि उद्दिष्ट मर्यादित असल्याने ती सर्वसामान्य रसिकांची न होता, त्या त्या क्षेत्रातल्या कार्यकर्त्यां लेखकांपुरतीच मर्यादित झाली आणि परिणामी हळूहळू निष्प्रभ होत गेली.
अ. भा. साहित्य संमेलन हा मराठी साहित्यातला मुख्य प्रवाह आहे. त्यात सर्वाना सामावून घेण्याचा प्रयत्न केला जातो. पण या संमेलनाचीही एक मर्यादा आहे. सर्व असंतुष्ट गटातटांना आणि समूहांना सामावून घेण्याचीही एक स्थिती असते. त्यामुळे ते शंभर टक्के कधीच होणार नाही. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर संमेलन पार पाडायचं असेल, अधिकाधिक लोकांना त्यात सामावून घ्यायचं असेल तर गुणवत्ता वा दर्जाबाबत फार आग्रही राहता येत नाही. 
एकेकाळी ग्रामीण भागातल्या जनतेला आपल्या आवडत्या साहित्यिकांना पाहण्यासाठी कित्येक र्वष वाट पाहावी लागत होती. आता टीव्ही, प्रसारमाध्यमांच्या सहज उलब्धतेमुळे ते खूप सुकर झालं आहे. त्यामुळे त्यांची उत्सुकता खूप वाढली आहे. जी गोष्ट सहजासहजी उपलब्ध होते, तिचा पटकन स्वीकार केला जातो. हल्ली ग्रामीण भागातही बरेचसे साहित्यिक उपक्रम होऊ लागले आहेत. पुणे-मुंबईतील जानेमाने साहित्यिक, वक्ते, नेते तिथपर्यंत सहजासहजी जात आहेत. याचा फार सकारात्मक परिणाम होत आहे. साहित्य संमेलनाविषयीची उत्सुकता वाढण्याचं हेही एक कारण आहे.
राहता राहिला मुद्दा संमेलनाचं व्यासपीठ राजकीय होत असल्याचा. अ. भा. साहित्य संमेलनासारखी घडामोड भव्यदिव्य स्वरूपात करायची तर त्यासाठी मोठं मनुष्यबळ आणि आर्थिक बळ लागतं. या दोन्ही गोष्टी साहित्यिकांकडे वा चळवळी करणाऱ्यांकडे असत नाहीत. त्या राजकीय नेत्यांकडेच असतात. त्यामुळे त्यांची मदत घ्यावीच लागते. त्याबाबत 'अहो पापम्' असा दृष्टिकोन बाळगून काहीही साध्य होणार नाही. गेल्या काही वर्षांत राजकारण करण्यासाठी- म्हणजे निवडणुका लढवण्यासाठी आणि जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड पैसा लागतो. राजकीय नेत्यांच्या सभा पुणे-मुंबईसारख्या मोठय़ा शहरात असोत की, हिंगोली, वसमतसारख्या जिल्हा-तालुक्याच्या ठिकाणी असोत, त्यासाठीचे श्रोते रीतसर जमवावे लागतात. साहित्य संमेलनात जर लाखोंच्या संख्येने लोक येत असतील, तर राजकीय नेते त्याचा आपल्या राजकारणासाठी वापर करून घेणारच ना! इतक्या मोठय़ा जनसमुदायाशी फारशी यातायात न करता संवाद करता येत असेल, आपला अजेंडा त्यांच्यापर्यंत पोहोचवता येत असेल तर राजकीय नेते संमेलनाचं आयोजक पद, स्वागताध्यक्षपद राजीखुशीने स्वीकारतील, ते अधिकाधिक देखणं कसं होईल हे पाहतील. 
अ. भा. साहित्य संमेलनाचं स्वरूप गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने बदलण्यामागे अशी काही कारणं आहेत आणि हे बदल काही फार वाईट नाहीत. उलट ही चांगल्या दिशेने प्रवास करायच्या बदलाची सुरुवात आहे. त्यामुळे साहित्य संमेलनात जे काही घडकं, ते फार काही वाईट नाही.
 त्यामुळे समाजातील विशिष्ट वास्तवाला भिडणारे साहित्य आणि प्रत्यक्ष समाजातील समस्यांना भिडणारे कार्यकत्रे यांनी किमान सकारात्मक विचार करावा आणि किमान सकारात्मक कृती करावी, ही अपेक्षा अगदीच अनाठायी म्हणता येणार नाही. पण विचार करणाऱ्यांनी कुठलीच कृती करायची नाही आणि कृती करणाऱ्यांनी कुठलाच, किमान तारतम्यपूर्ण ठरेल असा विचार करायचा नाही, असंच ठरवलं असेल तर परिस्थिती कठीणच राहणार.. तिच्यात सुधारणा होण्याची फारशी शक्यता नाही. 
अ. भा. साहित्य संमेलनाकडे तुम्ही कसं पाहता, हे जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या डोळ्यावरच्या जुन्याच चष्म्यातून न पाहता, त्याच्या काचा साफ करून अधिक समंजस आणि व्यापकपणे पाहण्याची नितांत गरज आहे. मर्ढेकर म्हणतात तसे, आम्हास आम्ही पुन्हा पाहावे, काढुनी चष्मा डोळ्यांवरचा! आणि तसं पाहायला लागलं तर लक्षात येईल की, परिस्थिती आपण समजतो तितकी वाईट नाही.