Sunday, October 27, 2013

(मराठी साहित्याची) कत्तल करणारा माणूस!

Published in Loksatta, Sunday, October 27, 2013
पन्नास वर्षांपूर्वी- १९६३ साली, वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी अशोक शहाणे यांनी 'आजकालच्या मराठी वाङ्मयावर 'क्ष'- किरण' या शीर्षकाचा घणाघाती लेख लिहून मराठी साहित्य व साहित्यिकांवर अक्षरश: बॉम्बगोळा टाकला होता. या घटनेच्या र्अधशतकपूर्तीनिमित्ताने या मूळ लेखाचा परामर्श....
वसंत सरवटे यांनी ठणठणपाळसाठी काढलेले मार्मिक चित्र, ललित, जानेवारी १९६४. 
-----------------------------------------------------------------------
अशोक शहाणे यांचं आत्ताचं वय वर्षे ७८ आहे. पन्नास वर्षांपूर्वी- १९६३ साली, वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी त्यांनी 'आजकालच्या मराठी वाङ्मयावर 'क्ष'- किरण' या शीर्षकाचा घणाघाती लेख लिहून मराठी साहित्यावर तेव्हा अक्षरश: आणि शब्दश: बॉम्बगोळा टाकला होता. हा मूळ लेख त्यांनी पुण्यात 'काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम' या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादासाठी लिहिला होता. खरं तर तेव्हा शहाणे यांचं मराठी साहित्यात विशेष काही नाव नव्हतं. बंगाली साहित्यिक मोती नंदी यांच्या काही कथांचा त्यांनी मराठी अनुवाद केला होता, तेवढाच. तेव्हा शहाणे पुण्याचं साहित्यपीठ मानल्या जाणाऱ्या मराठी साहित्य परिषदेपासून दहाएक मिनिटांच्या अंतरावर एक खोली भाडय़ानं घेऊन राहत होते. मधू साबणे, भालचंद्र नेमाडे हे त्यांचे त्यावेळचे मित्र.
त्यांच्या या लेखाचं इंग्रजी नाव 'लिटरेचर अँड कमिटमेंट' असं होतं. हा लेख त्यांनी मासिक 'मनोहर'ला पाठवला. त्याच्या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या अंकात हा लेख दोन भागांत 'आजकालच्या मराठी वाङ्मयावर 'क्ष'-किरण' या नावानं छापून आला आणि मराठी साहित्यात एकच खळबळ उडाली. शहाणे यांनी एक प्रकारे मराठी साहित्याचा एक्स-रे काढून त्याचं चारित्र्यहनन केलं होतं. दुसरी गोष्ट अशी झाली की, 'मनोहर' हे मासिकही या लेखामुळे चर्चेत आलं. तोवर या मासिकाकडे साहित्यजगताचं विशेष लक्ष नव्हतं.
''क्ष'-किरण' छापून आल्यावर पुण्यातील मराठी साहित्यविश्वात मोठीच धांदल उडाली. पुढच्या दोन-चार दिवसांत या लेखाचा निषेध करण्यासाठी मसापमध्ये निषेध सभा बोलावण्यात आली. त्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कादंबरीकार ना. सी. फडके होते. ते या लेखानं खूपच चिडले होते. त्यांचं अध्यक्षीय भाषण खूपच आवेशपूर्ण आणि भडकवणारं होतं. त्यांनी- ''जो हात हे लिखाण करू शकला व ज्या हाताने हे प्रसिद्धीसाठी स्वीकारले, ते हात कलम झाले पाहिजेत,'' असे संतप्त उद्गार काढले.
फडके यांच्या या विधानावरून पुण्यातली साहित्यजगतातली परिस्थिती किती स्फोटक बनली होती याची कल्पना येते. जो- तो या लेखावर तावातावानं बोलू लागला.
जानेवारी १९६४ च्या 'ललित'मध्ये ठणठणपाळ यांनी शहाणे यांच्या लेखावर मल्लिनाथी करणारा 'वाङ्मय आणि बांधिलकी' हा लेख लिहिला. ''अलीकडे मराठी साहित्यात, विशेषत: टीकाक्षेत्रात भोंगळपणा खूपच निर्माण झाला आहे. एखाद्या साहित्यकृतीविषयी टीकाकाराकडून स्पष्ट मत मिळणेच दुरापास्त होते. एखादी कृती बरी वाटावी, त्यातल्या त्यात उजवी ठरावी, अशी चमत्कारिक पद्धत रूढ झाली होती. पण अशा अनिश्चित भाषेला मूठमाती देणारा नवा टीकाकार उदयाला आला आहे! 'उदयाला आला' असे म्हणण्यापेक्षा तो 'चक्क डोक्यावर आला' असे म्हणणेच योग्य ठरावे! (तरीही ठरावेच!) हा नवा टीकाकार म्हणजे अशोक शहाणे ( 'मोती नंदी'फेम!). तसे म्हटले तर स्वारीने फारसे काही लिहिलेले नाही. अधिकतर मोती नंदी या बंगाली लेखकाच्या काही कथा त्यांनी भाषांतरित केल्या आहेत. पण स्वारी उपजत टीकाकार (टीकाखोरच!) आहे..'' अशी लेखाची सुरुवात करून ठणठणपाळने पुढे शहाण्यांनी वाङ्मयाची 'जे जे लिहिले गेले ते वाङ्मय' अशी सर्वसमावेशक व्याख्या कशी केली आहे, याचा उल्लेख केला आहे.
''लोकहितवादी चिपळूणकर, आगरकर, टिळक, केतकर वगैरे श्रेष्ठ, ज्येष्ठ विभूतींना त्यांनी एका परिच्छेदात गाडून टाकले आहे. हरी नारायण आपटे हे मोठे कादंबरीकार असे मराठी लोक अभिमानाने म्हणतात.. पण शहाण्यांच्या मते, हरीभाऊंनी स्कॉट आणि डिकन्स यांच्या कादंबऱ्या समोर ठेवून आपले लेखन केले. वा. म. जोशी, खांडेकर आणि विभावरी शिरूरकर ही मंडळी शहाण्यांचे दोन-चार फटके खाऊन जिवानिशी बचावली.. मर्ढेकर हे किमान एक महत्त्वाचेसुद्धा कवी नाहीत; कारण त्यांनी चार-दोन बऱ्या कविता लिहिल्या आणि बाकी जुळवाजुळव केली. 'एवढे कुणीही करतो'असे शहाणे यांचे मत. 'मीच कथा लिहावी' असा गर्व गंगाधर गाडगीळ यांनी आजवर वाहिला. पण फुकट! शहाणे यांनी त्यांना 'खुजे मर्ढेकर' म्हणून चक्क खाली बसवले आहे. (गर्वाचे घर खाली म्हणतात ते हे असे!) आणि ते नवकवी- विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर आणि वसंत बापट (चोर लेकाचे!) स्वत:ला नवकवी म्हणवून 'सत्यकथे'त कविता छापून घेत होते. बरे झाले त्यांची खोड मोडली ती! शहाणे यांनी त्यांना टपल्या मारून चक्क रविकिरण मंडळात बसवले आहे..'' असे शहाण्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर बॉम्बगोळे टाकले होते, त्यांच्या त्यांच्या नावानं परत ठणठणपाळनं ठणाणा केला.
शहाणे यांच्या मते, आधुनिक मराठी साहित्यात गोडसे भटजी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चिं. वि. जोशी, जी. ए. कुलकर्णी, आचार्य अत्रे, काकासाहेब गाडगीळ, पु. शि. रेगे हे मोजून सात लेखक. शहाण्यांना आठवं बोट काही मोडावं लागलं नाही. ए. वि. जोशी, विंदा करंदीकर हे लोक शहाणे यांच्या मते ठीक म्हणावेत असे. शहाणे यांनी विनोबा भावे यांना 'मराठीतला हा एकमात्र समग्र माणूस' असे म्हटले होते, तर बालकवींना 'अलीकडच्या काळात अस्सल कविता लिहिणारा हा एकमेव अस्सल कवी' असे या लेखात म्हटले होते.
शहाण्यांच्या मते, मराठीत थोर कलाकृती किती आहेत? मोजून तीन.
१) माझा प्रवास, २) स्मृतिचित्रे आणि ३) रणांगण.
झालं! यापल्याड शहाणे यांनी मराठी साहित्यात इतर कुणाचीही गणती केलेली नाही. निदान तेव्हा केली नव्हती, असं म्हणू या.
हा घणाघाती लेख पुस्तकरूपाने प्रकाशित व्हायला बराच काळ जावा लागला. शहाणे यांच्या 'नपेक्षा' (२००५) या एकुलत्या एक पुस्तकात या लेखाचा समावेश आहे. छापील २७ पाने भरेल एवढा हा लेख आहे. यात मराठी साहित्यिक आणि साहित्याचं टीकावस्त्रहरण करणारा मजकूर तसा तुलनेनं दहा पानांचाच आहे. बाकी लेखात साहित्याच्या संदर्भात बांधीलकी, साहित्यातली 'बीट' पिढी आणि स्वत:ची पिढी याविषयी लिहिलं आहे. आणि त्यात कुठेही शेरेबाजी नाही. विशेषत: त्यांनी स्वत:च्या पिढीचाही उद्धार केला आहे. 'आमची पिढी ही षंढांची पिढी आहे, असे आम्ही पूर्वीच जाहीर केले आहे,' असंही त्यांनी सांगून टाकलंय. त्याआधी शहाणे यांनी 'षंढांची पिढी' या नावानं एक कविता लिहिली होती. त्याचा हा संदर्भ आहे.

या कवितेचा एक किस्सा आहे. ही कविता ग. दि. माडगूळकर यांच्या वाचनात आली. तेव्हा भाऊ पाध्ये यांच्या पुस्तकावरून सेन्सॉर बोर्डाचा वाद चालू होता आणि गदिमा त्या बोर्डावर होते. डेक्कनला मित्रासोबत फिरत असताना ते सहज म्हणून गदिमांना भेटायला गेले. मित्रानं शहाणे यांची ओळख करून देताच गदिमा म्हणाले, ''अरे, याचं कुणीतरी लग्न लावून द्या रे! म्हणजे हा पुन्हा असं काही लिहिणार नाही.'' तर ते असो.
''क्ष' किरण'मध्ये टिळक, आगरकर, मर्ढेकर, गाडगीळ, बापट, करंदीकर, पु. ल. देशपांडे या आदरणीय आणि प्रात:स्मरणीय व्यक्तिमत्त्वांबद्दल शेरेबाजीवजा विधाने केल्यामुळे खळबळ उडणं साहजिकच होतं.
आधुनिक मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे खंड गेली ३०-४० वर्षे मसाप प्रकाशित करीत आहे. पण तो अजूनही पूर्ण व्हायला तयार नाही. शहाणे यांनी मात्र पन्नास वर्षांपूर्वीच तो अवघ्या छापील २७ पानांमध्ये मांडून दाखवला आणि त्याशिवायही बरंच काही सांगितलं.
तत्कालीन मराठी साहित्यिक आणि साहित्याची अशी कत्तल केल्यावर शहाणे यांनी गप्प बसावं ना! पण गप्प बसतील तर ते शहाणे कुठले! त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, 'आपल्याकडे नाही तरी म्हणायची पद्धतच आहे- गप्प बसायचं काय घेतो? पण मी काही गप्प बसणार नाही. अजून बरंच काम बाकी आहे.' क्ष-किरण टाकल्यापासून शहाणे यांचं मराठी साहित्याचं शल्यचिकित्सा करण्याचं काम चालूच आहे. ते लिहितात कमी; पण बोलतात खूप. जगणं थोर आणि लिहिणं कमअस्सल- अशी त्यांची धारणा तेव्हा होती आणि आजही आहे. ते एका दृष्टीनं चांगलंच आहे. एरवी त्यांच्या साध्या बोलण्यातही चार-दोन साहित्यिकांचे खून पडतातच.
त्यामुळे जरा सावध राहा.

No comments:

Post a Comment