Thursday, October 31, 2013

काय करावं आणि कसं पाहावं?

मूर्ती यांनी प्रत्येक विषयाला स्वानुभवाकडे तरी वळवलं आहे किंवा स्वानुभवाकडून तरी ते विषयाकडे गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्या-लिहिण्यात सच्चेपणा आहे, कळकळ आहे आणि बांधीलकीही. त्यामुळे या पुस्तकातून काय करायला हवं आणि कसं पाहायला हवे, याबाबतचा दृष्टिकोन मिळू शकतो. आणि तो खूप महत्त्वाचा आहे, हेही खरे.

हे पुस्तक म्हणजे इन्फोसिसचे एक संस्थापक एन. नारायण मूर्ती यांनी वेळोवेळी दिलेल्या भाषणांचा आणि लिहिलेल्या काही नैमित्तिक लेखांचा संग्रह आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर या संग्रहाविषयी भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा अभिप्राय छापला आहे. तो असा- ‘‘लाखो भारतीयांसाठी नारायण मूर्ती हे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. केवळ त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि नेतृत्वामुळे नाही, तर मूल्याधिष्ठित वागणूक आणि व्यक्तिगत आचरणामुळे नारायण मूर्ती हे अवघ्या देशासाठी आदर्श ठरले आहेत. ते जगासामोर भारताच्या नव्या, प्रगतिशील चेहर्‍याचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनी दिलेल्या व्याख्यानांचा हा संच येणा-या पिढय़ांना माहितीपर, प्रेरणादायक आणि मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे.’’

त्याखाली मायक्रोसॉफ्ट कॉपरेरेशनच्या बिल गेट्स यांचा अभिप्राय आहे- ‘‘नारायण मूर्ती यांनी अनेक अडथळे पार करून हे दाखवून दिलं आहे की, भारतात जागतिक दर्जाच्या, मूल्याधिष्ठित कंपनीची उभारणी करणं शक्य आहे. मूर्तीच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे नावीन्य आणि उद्योजकतेच्या जगात चमक आली आहे, आपली स्वत:कडे पाहण्याची आणि जगाची भारताकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. व्याख्यानांच्या या संचाद्वारे, व्यवसायामधील मूल्यं आणि नेतृत्वगुणाचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं आहे.’’

खरं तर या दोन्ही प्रतिक्रियांमधून या पुस्तकाचं स्वरूप पुरेसं स्पष्ट होतं. या पुस्तकाकडे कसं आणि कोणत्या अपेक्षेनं पाहायला हवं याचंही सूचन या प्रतिक्रियांमध्ये आहे. नारायण मूर्ती यांनी आपल्या अतिशय साध्या घरातून सुरू केलेली ‘इन्फोसिस’ ही कंपनी आज जगातील सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक नामांकित कंपनी आहे. तिचा इथपर्यंतचा प्रवास हा सचोटी, मेहनत, सक्षम नेतृत्व, मूल्यं आणि सामाजिक बांधीलकी या पायावर उभा राहिला आहे. पण हे सगळं कसं जुळून आलं, हा वारसा कसा आणि कुठे मिळाला, याची स्पष्टीकरणं या संग्रहातील भाषणं आणि लेखांमध्ये सापडतात.

वाचकांच्या सोयीसाठी पुस्तकाचे एकंदर दहा भाग केले आहेत. विद्यार्थ्यांना संदेश, मूल्ये, महत्त्वाचे राष्ट्रीय मुद्दे, शिक्षण, नेतृत्वासमोरील आव्हानं, कॉपरेरेट आणि सार्वजनिक व्यवस्थापन, औद्योगिक सामाजिक जबाबदारी आणि समाजसेवा, उद्योजकता, जागतिकीकरण आणि इन्फोसिस या दहा विभागांमध्ये 38 भाषणं व लेखांचा समावेश आहे. ‘विद्यार्थ्यांना संदेश’ या पहिल्याच विभागात आठ भाषणं आहेत. तेवढे लेख वा भाषणं इतर कुठल्याच विभागात नाहीत. हे कदाचित जाणीवपूर्वक केलं आहे का, हे माहीत नाही! मात्र ही सर्वच भाषणं देशात आणि जगातल्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभात केलेली भाषणं आहेत, हेही नोंद घेण्यासारखं आहे.

ही भाषणं फार चमकदार नाहीत की फारशी प्रभावित करणारीही नाहीत. पण साध्या साध्या प्रसंगांतून मूर्ती यांनी ज्या गोष्टी त्यात सांगितल्या आहेत, त्यांनी त्यांचं आयुष्य कसं बदललं याचा प्रत्यय येतो. प्रत्येक विद्यार्थ्यांने शिक्षण संपवून बाहेरच्या जगात पाऊल ठेवताना ते जग नेमकं कसं आहे, हे समजावून घेतलं पाहिजे, स्पर्धेची-कष्टाची-गुणवत्तेची नेहमी तयारी ठेवली पाहिजे, हे मूर्ती थोडाफार बदल करत परत परत सांगतात, तेव्हा त्यांची जडणघडण कोणत्या मूल्यांच्या पायावर झाली आहे, हे स्पष्ट होत जातं.

म्हणजे या पुस्तकातून मूर्ती यांच्या अभ्यासाचे विषय कोणते आहेत, त्यांचा व्यासंग कसा आहे, त्यांनी कोणापासून प्रेरणा घेतली आणि भारताबद्दलची त्यांची व्हिजन काय आहे, यापेक्षा मूर्ती यांची जडणघडण कशी झाली, इन्फोसिसचा प्रवास कसा झाला आणि तिला प्रचंड यश कसं मिळालं, याची गुपितं समजावून घेता येतात.

‘जागतिकीकरण’ या भागात मूर्ती सरळ सरळ जागतिकीकरणाचा पुरस्कार करतात. त्यावर मूर्ती मोठय़ा कंपनीचे मालक असल्याने ते तसं करणारच, असा प्रश्न बहुधा हे पुस्तक वाचणारा तरी उपस्थित करणार नाही. कारण जागतिकीकरणाची अपरिहार्यता आणि त्याचं वस्तुनिष्ठ विश्लेषण मूर्तीनी करण्याचा प्रयत्न केला आहे. सेवा-उद्योगात जागतिकीकरणाने जी क्रांती केली आहे, त्याचाही आढावा त्यांनी घेतला आहे.

परंतु यातील काही भाषणं वा लेख फारच त्रोटक आहेत. उदाहरणार्थ ‘मी माध्यमिक शाळेचा मुख्याध्यापक असतो तर..’, ‘चक दे इंडिया’ इत्यादी. ते लेख वगळायला हवे होते असं वाटतं. त्यामुळे पुस्तक आणखी सुटसुटीत झालं असतं.

पश्चिमेकडून भारतानं काय शिकायला हवं आणि भारताकडून पश्चिमेनं काय शिकायला हवं, याविषयी मूर्ती बोलले आहेत, तसंच देशातील भ्रष्टाचार कसा थांबवता येईल याविषयी त्यांनी एक भाषण दिलं आहे. शहरनियोजन, धर्मनिरपेक्षतेचं महत्त्व, कॉपरेरेट गव्हर्नन्स, भांडवलवाद, उद्योजकता या विषयांवरही मूर्ती बोलले आहेत किंवा त्यांनी लिहिलं आहे.

एखादी व्यक्ती यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचते, तेव्हा समाज तिच्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा करायला लागतो. ‘तुम्ही यावर बोललं पाहिजे’, ‘त्याविषयी बोललं पाहिजे’, ‘अमुक अमुकवर तुमची भूमिका स्पष्ट केली पाहिजे’ असे आग्रह केले जातात. त्याचं प्रतिबिंब यातील काही भाषणांमध्ये आणि लेखांमध्येही पाहायला मिळतं. पण ‘आपण त्याविषयातले तज्ज्ञ अभ्यासक नाही आहोत’, हे लक्षात घेऊन मूर्ती यांनी चतुरपणे प्रत्येक विषयाला स्वानुभवाकडे तरी वळवलं आहे किंवा स्वानुभवाकडून तरी ते विषयाकडे गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्या-लिहिण्यात सच्चेपणा आहे, कळकळ आहे आणि बांधीलकीही. म्हणून या पुस्तकातून काय करायला हवं आणि कसं पाहायला हवं, याबाबतचा दृष्टिकोन मिळू शकतो. आणि तो खूप महत्त्वाचा आहे, हेही खरं.

मात्र हे पुस्तक वाचून कुणी फार झपाटून जाणार नाही. हे सेल्फ हेल्प वर्गातलं पुस्तक नाही. त्यामुळे ते वाचून मूर्तीसारखं यश आपल्याला मिळवता येईल, असा दृष्टिकोन असणा-यांसाठीही हे पुस्तक नाही. तर मूर्ती यांनी इन्फोसिस कोणत्या मानदंडावर उभा केला. ते मानदंड उभारले कसे आणि त्यांचं संवर्धन कसं केलं, हे समजावून देणारं हे पुस्तक आहे. ते त्यासाठीच वाचायला हवं.

अ बेटर इंडिया, अ बेटर वर्ल्ड : एन. नारायण मूर्ती, मराठी अनुवाद : चित्रा वाळिंबे, मेहता पब्लिशिंग हाऊस.

No comments:

Post a Comment