Monday, January 20, 2014

बंडखोर कवी आणि लढाऊ कार्यकर्ता!

( १५ फेब्रुवारी १९४९-१५ जानेवारी २०१४)

नामदेव ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुण्याजवळील पूर या छोटय़ा गावी झाला. त्यांच्या आईचं गाव कनेरसर. ही दोन्ही गावं नदीच्या दोन्ही तीरावर आहेत, पुण्यापासून ४० किमी अंतरावर. ढसाळ लहानपणीच वडिलांसोबत मुंबईत आले. इथल्या गोलपिठात त्यांनी वास्तव्य केलं. त्यांचे वडील खाटीकखान्यात खाटीक म्हणून काम करत. ढसाळांचं पाचवीपासूनचं शिक्षण मुंबईतच झालं. दहावीनंतर त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला. सुरुवातीच्या काळात ढसाळांनी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केलं, वेश्यावस्तीतही काम केलं. याच काळात चळवळीकडे ते वळले.
१७-१८व्या वर्षांपासूनच ढसाळांनी कविता लिहायला सुरुवात केली. टॅक्सी ड्रायव्हर असताना ढसाळ एकदा एका कविसंमेलनाला गेले होते. तिथं त्यांनी विचारलं की, मलाही कविता वाचायचीय. हा गबाळा मुलगा काय कविता वाचणार या हेटाळणीनं त्यांना परवानगी दिली. पण त्यांच्या कविता ऐकून सगळे अवाक झाले. नंतर ग. दि. माडगूळकर म्हणाले, 'आता रसाळ नामदेवांचा (संत नामदेव) काळ संपून ढसाळ नामदेवांचा काळ सुरू झालाय.'
विद्रोहाच्या प्रखर व तीव्र स्वर असलेल्या त्यांच्या कवितेनं सर्व साहित्य-जगताचं लक्ष वेधून घेतलं. 'गोलपिठा' (१९७२) या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. मुंबईचं अधोविश्व आणि दलित समाजाच्या व्यथा-वेदना त्यांनी अतिशय रांगडय़ा, जोशपूर्ण आणि कळकळीनं आपल्या कवितेतून मांडल्या.
'गोलपिठा'तल्या सगळ्याच कवितांनी आणि त्यातल्या धगधगीत वास्तवानं मराठी साहित्याला आणि मराठी समाजाला हलवून सोडलं. 'मंदाकिनी पाटील' ही त्यातली अशीच एका वेश्येची कहाणी सांगणारी दाहक कविता. 'गोलपिठा'ला विजय तेंडुलकरांनी प्रस्तावना लिहिली आहे. (त्या वेळी ढसाळ तेंडुलकरांना 'सर' म्हणत, पण नंतर त्यांचे संबंध तणावपूर्ण झाले. तेंडुलकरांची 'कन्यादान', 'कमला' ही नाटकं दलितविरोधी, त्यांची मानहानी करणारी असल्यानं ढसाळ त्यांचे विरोधक बनले. त्यांचा तो राग तेंडुलकरांच्या निधनापर्यंत कायम राहिला.)
ढसाळांनी 'आंधळे शतक' या पुस्तकात एके ठिकाणी म्हटलंय की, 'जगातला सर्वात जुना व्यवसाय हा वेश्याव्यवसाय समजला जातो. देहविक्री करून चरितार्थ चालवणं हे पाश्चात्त्यांत प्राचीन काळी गलिच्छ मानलं जात नव्हतं. मुंबईतला प्रतिष्ठित वेश्याव्यवसाय १७ व्या शतकातच सुरू झाला असं मानलं जातं.'
मुंबईतला रेड लाइट एरिया म्हणजे कामाठीपुरा, फोरास रोड, पूर्वीचा फॉकलंड रोड, गोलपिठा, जमना मॅन्शन, ग्रांट रोड पूल... या एरियातल्या प्रत्येक गोष्टीविषयी ढसाळांना तपशीलवार माहिती होती. 'आंधळे शतक'मध्ये त्यांनी लिहिलंय, 'प्रत्येक मालकिणीच्या मागे माफिया असतो. कामाठीपुऱ्यात अशा १६ टोळय़ा आणि १०० मनीलेंडर्स आहेत. रेड लाइट एरियावर नियंत्रण ठेवणारी व्हिजिलन्स ब्रँच देहापासून दिडकीपर्यंत सर्व प्रकारचे हप्ते राजरोस उकळत असते. ते पोलीस अधिकाऱ्यापासून उच्चाधिकाऱ्यापर्यंत जातात.'
ढसाळांचं 'पिला हाऊस'शी जवळचं नातं 
होतं. त्यांची 'पिला हाऊसचा मृत्यू' नावाची कविताही आहे. त्यावर त्यांनी लेखही लिहिलेत. 'कामाठीपुरा', 'संत फॉकलंड रोड', 'भेंडी-बाजार' या काही कविताही अशाच.
मलिका अमरशेख यांच्याबरोबरचं नामदेव ढसाळ यांचं आयुष्यही बरंचसं वादळी राहिलं. १९८० च्या दशकात काही काळ ते वेगळेही राहिले आहेत. मलिकाताईंनी मला 'उद्ध्वस्त व्हायचंय' या आत्मचरित्रात त्यांच्या आयुष्याविषयी फार उघडपणे लिहिलंय. मात्र त्यांचा मुलगा आशुतोषनं त्यांना पुन्हा एकत्र आणलं. सध्या अंधेरीच्या घरी ते तिघे एकत्र राहत.
राजकीय चळवळ
 
ढसाळांनी ९ जुलै १९७२ रोजी कवी ज. वि. पवार यांच्यासह 'दलित पँथर' या लढाऊ संघटनेची स्थापना केली. १९७५-८० दरम्यान शिवसेनेचा 'टायगर' (बाळासाहेब ठाकरे), फॉरवर्ड ब्लॉकचे 'लॉयन' (जांबुवंतराव थोटे) आणि दलितांचा 'पँथर' (नामदेव ढसाळ) अशा तीन शक्ती तोडीस तोड मानल्या जायच्या. 'तुमचा टायगर तर आमचा पँथर' अशा घोषणा पँथरचे कार्यकर्ते द्यायचे. पण दशकभरातच या संघटनेत फूट पडली. ढसाळ यांचं आणीबाणीला उघड उघड समर्थन होतं. त्यांनी 'आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र-प्रियदर्शिनी' नावाची एक दीर्घ कविता इंदिरा गांधींवर लिहिली आहे. दरम्यान, काही काळ ढसाळ यांनी काँग्रेसमध्येही काम केलं. मग नंतरच्या काळात नामदेव ढसाळ राजकारणापासून काहीसे बाजूला  पडले. १९९० नंतर ढसाळ पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. १९९२ साली नामदेव ढसाळ खासदार होते. त्याआधीही एकदा खेडमधून, तर एकदा मुंबईतून त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली होती. अलीकडच्या काळात ढसाळांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा त्यांच्यावर बरीच टीकाही झाली. एवढंच नव्हे तर त्यांच्या राजकीय भूमिका अलीकडच्या काळात सातत्यानं वादग्रस्त ठरल्या.
साहित्य चळवळ
गेली काही वर्षं ढसाळ मुंबईत 'इंटरनॅशनल लिटरेचर फेस्टिव्हल' भरवत होते. पण पैशाअभावी त्यात सातत्य राहिलं नाही. एका वर्षी गुंथर ग्राससारख्या नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकाला बोलावण्यात आलं होतं, परंतु काही कारणानं ते येऊ शकले नाहीत.
त्रिनिदादमध्ये वास्तव्यास असलेले 
पारितोषिक विजेते लेखक व्ही. एस. नायपॉल जेव्हा जेव्हा भारतात, विशेषत: मुंबईत येत, तेव्हा तेव्हा ढसाळांना सोबत घेऊन फिरत. ढसाळांकडून त्यांनी कामाठीपुऱ्यापासून अनेक गोष्टी समजावून घेतल्या, पण त्याविषयी दूषित नजरेनं लिहिलं. ढसाळांचा त्यांच्याबरोबरचा अनुभव काही चांगला नाही. ढसाळ त्यांना 'त्रिनिदादचा ब्राह्मण' म्हणत.
दिलीप चित्रे यांनी गौरी देशपांडे यांच्या घरासमोर 'साहित्य सहवासा'त धरणं आंदोलन केलं होतं. त्यात ढसाळ सहभागी झाले होते. नंतर एकदा चित्रे यांनी 'साहित्य सहवासा'तील दडपशाहीविरुद्ध आंदोलन केलं, तेव्हा ढसाळ यांनी चार-पाच लॉऱ्या भरून पँथर कार्यकर्ते आणि भाई संगारेसह पाठिंबा दिला होता.
लेखन
डिसेंबर १९८० मध्ये ढसाळ आजारी पडले. जानेवारी १९८१ मध्ये त्यांना 'मायस्थेनिया ग्रेविस' हा आजार असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर गेली ३०-३२ वर्षे ते या आजाराशी लढत होते. पण या काळातही त्यांनी तेवढय़ाच जोमानं कवितालेखनही केलं.
ढसाळ यांचे आतापर्यंत एकंदर बारा कवितासंग्रह आणि दोन कादंबऱ्या आणि चार लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. 'आज दिनांक'मध्ये 'माहौल' नावानं त्यांनी सदर लिहिलं होतं. त्यातल्या जहाल, रोखठोक आणि आगपाखड करणाऱ्या भाषेमुळे ते चांगलंच गाजलं. त्याचंच पुढे 'आंधळे शतक' हे पुस्तक आलं. 'सामना' या दैनिकात त्यांनी प्रदीर्घ काळ 'सर्व काही समष्टीसाठी' हे सदर लिहिलं तर 'सत्यता' या साप्ताहिकाचंही काही काळ संपादन केलं. त्यांच्या कवितांचे हिंदी, इंग्रजी तसेच अन्य भारतीय व परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्या कवितांच्या इंग्रजी अनुवादाला २००७चा ब्रिटिश कौन्सिलचा पुरस्कार मिळाला आहे.
ढसाळांचा 'तृष्णा' या नावानं गाण्याचा अल्बमही येणार होता. त्यातली गाणी शंकर महादेवनसारख्या नामवंतांनी गायलीत. या अल्बमचं रेकॉर्डिगही झालंय. पण अजून तो काही आलेला नाही. त्याच्या रेकॉर्डिगच्या सी. डी. ढसाळांच्या घरी धूळ खात पडल्यात. ढसाळांचा स्वतंत्र म्हणावा असा शेवटचा संग्रह म्हणजे 'निर्वाणा अगोदरची पीडा'. या संग्रहातील ढसाळांची कविता ही विद्रोहाची नसून ती समष्टीच्या सनातन दु:खाविषयी बोलणारी आहे. व्यक्तिगत व सामाजिक विद्रोहापासून समष्टीच्या दु:खापर्यंत झालेला ढसाळ यांच्या कवितेचा प्रवास आता थांबला आहे.
ब्रेख्त हा नाटककार म्हणत असे, 'फॅसिस्ट कवी-लेखकांना पहिले ठार मारतात, पण आता काळ बदललाय, फॅसिस्टही बदललेत. आता ते कवी-लेखकांना जिवे मारत नाहीत. अनुल्लेखानं, बहिष्कृत करून मारतात.' एका वेळी हा प्रयोग या मनोवृत्तीच्या लोकांनी भाऊ पाध्ये यांच्यावर केला होता. त्यानंतर तो ढसाळ यांच्यावर केला गेला. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. ढसाळांची कविता भारतभर आणि जगातही अनेक ठिकाणी पोचली, वाखाणली गेली.
अलीकडे ढसाळ अंधेरी-मालाड लिंक रोडवर 'मोगल दरबार' नावाचं छोटंसं हॉटेल चालवत होते. आजच्या मराठी समाजात कवी-लेखकांना सुखा-समाधानानं जगणं महाकठीण. गेली अनेक वर्षं ढसाळ यांनी त्याचा अनुभव घेतला. पण या समाजावर बहिष्कार टाकण्याएवढय़ा टोकाला जाण्याइतपत ते कधी कडवट झाले नाहीत. ढसाळांनी लेखनाकडे कधीही व्यावसायिक वृत्तीनं पाहिलं नाही. स्वत:ला ते प्रज्ञावंत-निष्ठावंत लेखक-कवीच मानत. त्यांच्यातील राजकीय-सामाजिक कार्यकर्ता वजा केला तर उरतो तो फक्त लेखक-कवीच.
साहित्य अकादमी या भारतीय साहित्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या केंद्रीय संस्थेनं आपल्या सुवर्णमहोत्सवानिमित्त भारतभरातल्या साहित्यिकांमधून नामदेव ढसाळ यांची निवड केली. नामदेव ढसाळांना मराठीतील नोबेल पुरस्काराच्या तोडीचा लेखक मानलं जातं. त्यांच्या मोजक्याच कवितांचा इंग्रजीत अनुवाद झाला असला तरी जगभरातल्या नामवंत साहित्यिकांना नामदेव ढसाळ त्यांच्या हलवून टाकणाऱ्या कवितांमुळे माहीत आहेत.

Monday, January 13, 2014

वाचण्याचा जागतिक आनंद!



द प्लेजर ऑफ रीडिंग या अँटोनिया फ्रेजर यांनी संपादित केलेल्या पुस्तकात जगभरातल्या चाळीस लेखकांनी आपल्या वाचनानंदावर लिखाण केलंय. या चाळीस लेखांसाठी चाळीस चित्रकारांनी चित्रंही काढली आहेत.



 

मातृभाषा ही निसर्गत: आणि जन्मत: मानवप्राण्याला मिळते. त्यामुळे ती बोलायला शिकण्यासाठी फारसे काही प्रयत्न करावे लागत नाहीत. लहान मूल इतरांचे शब्द ऐकत ऐकत बोलायला शिकतं. पण भाषा लिहायला मात्र रीतसर शिकावी लागते. त्यासाठी अक्षरांची ओळख करून घ्यावी लागते. आणि भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी तर आणखी रीतसर प्रयत्न करावे लागतात. असंच वाचनाचं असतं. भाषा बोलायला-लिहायला यायला लागली की वाचताही येतं. त्यामुळे वाचन ही गोष्टही आपल्याला निसर्गत: मिळालेली गोष्ट असावी असा अनेकांचा समज होतो. पण लिखित भाषेवर चांगलं प्रभुत्व मिळवण्यासाठी जसं मार्गदर्शन, अभ्यास, शिस्त आणि काटेकोर नियोजन करावं लागतं, तसंच वाचनाच्या बाबतीतही करावं लागतं. त्याशिवाय चांगला वाचक होता येत नाही.  पण अर्थार्जनासाठी रीतसर शिक्षण घ्यावं लागतं, तसंच वाचक म्हणून प्रगल्भावस्था गाठण्यासाठीही रीतसर मार्गदर्शन घेण्याची गरज असते, हे अनेकांच्या गावीही नसतं. त्यामुळे बहुतेक जण आयुष्यभर मिळेल ते वाचत राहतात. काय वाचावं हेच अनेकांना आयुष्यभर कळत नाही. त्यासाठी कुणा चांगल्या मार्गदर्शकाचा सल्ला घ्यावा असंही त्यांना वाटत नाही. परिणामी ही माणसं कायम कविता-कथा-कादंबऱ्याच वाचत राहतात. वय आणि वाचन यांची सांगड तर अनेकांना घालता येत नाही.

वाचनाच्या बाबतीत प्रगल्भावस्था गाठावयाची असेल तर मार्गदर्शन, शिस्त आणि काटेकोर नियोजन गरजेचं असतं. तरच त्या वाचनाचा फायदा होतो. बालपण, किशोरावस्था, कुमारावस्था, प्रौढपण आणि वृद्धावस्था हे आपल्या आयुष्याचे टप्पे. यानुसार आपलं वाचन बदलायला हवं. कविता-गोष्टी, कथा-कादंबऱ्या, चरित्र-आत्मचरित्र, वैचारिक साहित्य आणि तत्त्वज्ञानात्मक साहित्य अशा चढत्या क्रमानं वाचनाचा प्रवास झाला तर त्या वाचनाला एक निश्चित दिशा आहे असं म्हटलं जातं.
त्यामुळे चांगलं वाचन करण्यासाठी चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. असे मार्गदर्शक आई-बाबा, शिक्षक, मित्र हे जसे असू शकतात, तसेच चांगल्या लेखकांनी आपल्या वाचनाविषयी लिहिलेले लेख वा पुस्तकंही असू शकतात. मराठीमध्ये ज्याला 'बुक ऑन बुक्स' म्हणतात अशा प्रकारची पुस्तकं फारशी नसली तरी इंग्रजीमध्ये मात्र अशा प्रकारच्या पुस्तकांचं समृद्ध असं दालन आहे. 'द प्लेजर ऑफ रीडिंग' (एडिटेड बाय अँटोनिया फ्रेझर, ब्लूम्सबरी, लंडन, पाने : २५२, किंमत : १७.९९ पौंड.) हे पुस्तक त्यापैकीच एक. रॉयल आकाराचं आर्टपेपरवर छापलेलं आणि संपूर्ण रंगीत असलेलं हे पुस्तक फारच सुंदर आहे. 


हे पुस्तक संपादित केलं आहे अँटोनिया फ्रेझर यांनी. ऐतिहासिक चरित्रकार, रहस्यकथा लेखक आणि लंडनमधील पेन या संस्थेच्या माजी अध्यक्ष असलेल्या फ्रेझर यांना नामवंत साहित्यिक-कलांवत कुठली पुस्तकं वाचतात याविषयी अतोनात कुतूहल आहे. म्हणून त्यांनी या पुस्तकासाठी इंग्रजीमध्ये लिहिणाऱ्या जगभरातल्या ४० नामवंत साहित्यिकांना त्यांच्या वाचनाविषयी लिहायला सांगितलं. त्यानुसार स्टिफन स्पेंडर, मायकेल फूट, डोरिस लेसिंग, जॉन मार्टिमर, रुथ रेंडेल, सायमन ग्रे, मार्गारेट अ‍ॅटवुड, मेल्विन ग्रेग, गीतचा मेहता, वेंडी कोप यांसारख्या लेखकांनी सुरुवातीला केलेलं वाचन, आपल्या वाचनावर झालेला घरचा - आजूबाजूच्या वातावरणाचा, सहवासातल्या लोकांचा-शिक्षकांचा परिणाम, मनावर परिणाम करून गेलेली पुस्तकं, प्रभावित केलेली पुस्तकं याविषयी समरसून लिहिलं आहे. शिवाय प्रत्येकानं लेखाच्या शेवटी 'माझी आवडती पुस्तकं' म्हणून दहा पुस्तकांची यादी दिली आहे. काहींनी तीच का आवडली याची कारणमीमांसा केली आहे, तर काहींनी आवडती दहा पुस्तकं सांगणं कठीण आहे, तरीही फार विचार करून ही दहा नावं देत आहे, असा अभिप्राय दिला आहे.
 मायकेल फूट या ब्रिटिश पत्रकार आणि मार्क्‍सवादी खासदाराचे वडील उत्तम वाचक होते, त्यामुळे घरात भरपूर पुस्तकं होती. तरीही तो वाचनाकडे जरा उशिराच वळला. बट्र्राड रसेल त्याला शिकवायला होते. त्यामुळे रसेलचे 'द कॉन्क्वेस्ट ऑफ हॅपीनेस' हे फूटचे आवडते पुस्तक. याशिवाय अनरेल्ड बेनेटच्या 'हाऊ टू लिव्ह ऑन २४ अवर अ डे' आणि 'लिटररी टेस्ट -हाऊ टू फॉर्म इट' या दोन छोटय़ा पुस्तकांविषयी लिहिलं आहे. 'हाऊ टू लिव्ह ऑन २४ अवर अ डे' या पुस्तकानं माझं आयुष्य बदलवलं असं फूटनं म्हटलंय. फूट लंडनचा पंतप्रधान होता होता राहिले.


मार्गारेट अ‍ॅटवुड या प्रसिद्ध कादंबरीकर्तीवर एडगर अ‍ॅलन पोचे 'ग्रीम्स फेअरी टेल', मेल्विनची 'मॉबी डिक', जेन ऑस्टिनची 'प्राइड अँड प्रेज्युडिस', 'वुदरिंग हाइट्स', ऑर्वेलची '१९८४', कोत्स्लरची 'डार्कनेस अ‍ॅट नून' या कादंबऱ्यांचा प्रभाव पडला असल्याचं ती मान्य करते. उतारवयात मात्र ती वाङ्मयीन मासिकांपासून ते शब्दकोशापर्यंत वेगवेगळे वाचन करते. तिला आपल्या दहा पुस्तकांची यादी द्यायला आवडत नाही. तरीही तिने अलीकडच्या वाचलेल्या पाच कादंबऱ्यांची आणि पाच पुन: पुन्हा वाचलेल्या पाच कॅनडिअन कादंबऱ्यांची नावं दिली आहेत.

मेल्विन ब्रॅग या ब्रिटिश कादंबरीकाराने 'टेल्व्ह बुक्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड' हे पुस्तक लिहिलं असून इंग्रजी भाषेचं चरित्र सांगणारं 'द अ‍ॅडव्हेंचर ऑफ इंग्लिश' हे पुस्तकही लिहिलं आहे. ब्रॅगनं वयाच्या आठव्या वर्षांपर्यंत केशकर्तनालयात बसून अनेक पुस्तकं वाचली. तरुणपणी तो बेडवर पडून वाचू लागला. रॉबिनहूडच्या पुस्तकांचं त्याला काही काळ व्यसनच लागलं होतं. ब्रॅगला जेन ऑस्टिन किंवा ई.एम. फोर्स्टर, पुश्किन, हॉथॉर्न यांची पुस्तकं प्रौढवयात पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटतात. ब्रॅगलाही आपली दहा पुस्तकं सांगताना बरेच प्रयास करावे लागले. शेवटी त्यानं टॉलस्टॉय, डी.एच. लॉरेन्स, चेखॉव्ह, चार्ल्स डिकन्स, विल्यम फॉकनर यांच्या पुस्तकांची नावं दिली आहेत. त्यानं म्हटलंय की, चांगलं लेखन करण्यासाठी तुम्हाला वाचावंच लागतं.
 ओदिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांच्या कन्या, लेखक-पत्रकार आणि लघुपट दिग्दर्शिका असलेल्या गीता मेहतांना शिक्षणासाठी बोर्डिगमध्ये राहावं लागल्यानं पावसाळ्यात बाहेर पाऊस पडत असताना, घराची खूप आठवण येत असताना त्यांना पुस्तकांनी सोबत केली. घरी गेल्यावर तर किती तरी पुस्तकं त्यांची कायम वाट पाहात असायची. एके काळी त्यांनी वाचनालयातून अधाशासारखी पुस्तकं वाचली. आता त्या हवी ती पुस्तकं विकत घेऊ शकतात. भारतातली वाचनालयं आणि रस्त्यावरील पुस्तक विक्रेते यांच्याविषयी त्यांनी ममत्वानं लिहिलं आहे. विमान चुकल्यावर आपल्याला रहस्यमय कादंबऱ्या वाचायला आवडतात असं त्या म्हणतात.
हरमायनी ली या ब्रिटिश समीक्षिकेला नातेसंबंधांची गुंतागुंत उलगडून दाखवणाऱ्या कादंबऱ्या वाचायला आवडतात. त्यातल्या दोन कादंबऱ्या- ज्या तिला आजही आवडतात आणि ज्यांचा खूप प्रभाव पडला-त्या म्हणजे एलिझाबेथ बोवेन्सची 'टु द नॉर्थ' आणि सोसमंड लेहमनची 'द वेदर इन द स्ट्रीट्स'.

या चाळीस लेखांसाठी तब्बल चाळीस चित्रकारांनी चित्रं काढली आहेत. प्रत्येक लेखाच्या सुरुवातीला एक पानभर चित्र आणि लेखामध्ये तीन-चार छोटी छोटी चित्रं असं त्यांचं स्वरूप आहे. म्हणजे चाळीस भिन्न स्वभावधर्माचे, निरनिराळ्या सामाजिक-कौटुंबिक परिस्थितीतले लेखक आणि तसेच चाळीस चित्रकार यांचा समसमायोग या पुस्तकाच्या निमित्तानं जुळून आला. सर्वच चित्रकारांनी काढलेली चित्रं इतकी सुंदर आहेत की, बऱ्याचदा आपण मध्येच लेख वाचायचं थांबून चित्रंच पाहू लागतो. काही नुसती पाहून पटकन लक्षात येत नाहीत. मग त्यासाठी लेख वाचायला लागतो. आधी सर्व लेखच वाचावेत आणि मग सगळी चित्रं पाहावीत असंही ठरवता येत नाही आणि आधी सर्व चित्रंच पाहावीत आणि मग सगळे लेख वाचावेत असंही करता येत नाही. या चाळीस चित्रकारांनी पुस्तकांचे उपयोग, त्यांचे महत्त्व, ते वाचत असताना वाचकाची होणारी अवस्था, त्याच्या मनात येणारे विचार यातून पुस्तकांची जी दुनिया उभी केली आहे, ती केवळ प्रेक्षणीयच नाही तर उत्फुल्ल करणारी आहे. त्याविषयी स्वतंत्रपणे सविस्तर लेखच लिहायला हवा.
असो. वाचनानंदाची खुमारी सांगणारं हे पुस्तक वाचनीय आणि प्रेक्षणीय तर आहेच, पण ते फँटसीसारखं आपल्यावर गारूड करतं, भारावून टाकतं. 'बुक ऑन बुक्स' या वाङ्मय प्रकारातील हे एक नितांतसुंदर पुस्तक आहे. ज्याला चांगलं वाचन करायचं आहे त्याच्यासाठी आणि त्याचबरोबर ज्याला वाचनाला सुरुवात करायची आहे त्याच्यासाठीही एक चांगला मार्गदर्शक ठरेल असं.


पुन्हा एकदा अनंत अंतरकर

Published in Loksatta, Sunday, December 29, 2013
भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्या बरोबर एक र्ष आधी अनंत अंतरकर यांनी 'हंस' हे वाङ्मयीन मासिक सुरू केलं, तर स्वातंत्र्यानंतर एक वर्षांनी 'मोहिनी' हे मासिक सुरू केलं. त्याआधी त्यांनी 'सत्यकथा' आणि 'वसंत' मासिकांतही काही काळ काम केलं होतं. पुढे १९५३ साली अंतरकरांनी 'नवल' सुरू केलं. अशा या तीन भिन्न प्रकृतीच्या आणि स्वभावधर्माच्या मासिकांचे संस्थापक-संपादक असलेल्या अनंत अंतरकर यांचं जन्मशताब्दी वर्ष २०१०-११ साली साजरं झालं. त्यानिमित्तानं त्यांच्या एका मुलीनं अनुराधा औरंगाबादकर यांनी 'अनंता'ची फुलं' हे त्यांचं चरित्र लिहिलं, तर दुसऱ्या मुलीनं, म्हणजे प्रस्तुत संपादिकेनी त्यांच्याविषयीच्या या स्मृतिगौरवग्रंथाचं संपादन केलं आहे.
या पुस्तकाचे एकंदर चार विभाग आहेत. 'सुहृदांची अंतरे' या पहिल्या विभागात विविध लेखक, पत्रकार यांनी अंतरकरांविषयी लिहिलेले लेख आहेत. 'निवडक अंतरकर' या दुसऱ्या विभागात अंतरकरांच्या 'चोरटे हल्ले' व 'गाळीव रत्ने' या पुस्तकातील आणि इतर काही लेख आहेत. 'सहचरी-निर्मला अंतरकर' या तिसऱ्या विभागात स्वत:च्या आईविषयी अरुणा अंतरकर यांनी लिहिलं आहे.
'सुहृदांची अंतरे' या पहिल्या विभागात एकंदर एकवीस लेख आहेत. त्यात ना. सी. फडके, पु. भा. भावे, अरविंद गोखले, बाळ सामंत, विजय तेंडुलकर, रमेश मंत्री, शि. द. फडणीस, यशवंत रांजणकर, इंद्रायणी सावकार, वसंत शांताराम देसाई,    शं. ना. नवरे,  इत्यादींचा समावेश असून, आनंद आणि अरुणा (प्रस्तुत पुस्तकाच्या संपादक) या अंतरकरांच्या मुलांचेही लेख आहेत. लेखांचा क्रम पुस्तकात जो दिला आहे तो तसाच का दिला आहे, याचा संपादिकेनी खुलासा केलेला नाही. पण सर्व लेख वाचल्यावर लक्षात येतं की, यातील बरेचसे लेख हे अंतरकरांच्या निधनानंतर म्हणजे १९६६ नंतर लिहिले गेले असावेत. जन्मशताब्दीच्या निमित्ताने लिहिलेल्या लेखांची संख्या त्या तुलनेत कमी असावी. इतक्या उशिरा लेख छापताना त्या लेखांची पूर्वप्रसिद्धी, वर्षे इत्यादी तपशील लेखासोबत दिला असता तर तो लेख वाचताना अधिक सोयीचं ठरलं असतं. संपादनाची शिस्त म्हणून ते गरजेचं होतं, पण तसं झालेलं नाही. (त्याचा अतिशय त्रोटक उल्लेख शेवटच्या विभागात केला आहे.) शिवाय लेखांचा क्रमही फारसा व्यवस्थित वाटत नाही. ना. सी. फडके यांचा पहिलाच लेख अतिशय जुजबी आणि सामान्य आहे. शिवाय त्यातली माहिती इतर लेखांतही आली आहे. तेव्हा हा लेख आणि मजकुराची पुनरावृत्ती व नावीन्य वाटावं असं काही नसल्यानं शं. ना. नवरे, भा. ल. महाबळ, श्रीराम शिधये आणि आशा काळे यांचे लेखही वगळता आले असते तर जास्त बरं झालं असतं. विजय तेंडुलकर, अरविंद गोखले, शि. द. फडणीस, यशवंत रांजणकर यांचे लेख अंतरकरांचे संपादक म्हणून आणि माणूस म्हणून वेगवेगळे पैलू प्रत्ययकारीरीत्या उलगडून सांगणारे आहेत. त्यातून अंतरकरांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाची चांगल्या प्रकारे ओळख होते. आनंद आणि अरुणा या अंतरकरांच्या मुलांचे लेख तसे वाचनीय आहेत, पण त्यात काही अनावश्यक ठिकाणी अतिशयोक्ती, उपमा-अलंकार यांची भरमार झाल्याने ते विशेष पकड घेत नाहीत. वडिलांबद्दल लिहिताना फारसं तटस्थपणे पाहणं शक्य नसल्याने असं होणं साहजिक आणि समजण्यासारखंही आहे.
यानंतरचा तब्बल २४४ पानांचा दुसरा विभाग आहे अंतरकरांच्या निवडक साहित्याचा. सुरुवातीला 'चोरटे हल्ले' या पुस्तकातील निवडक लेख आहेत. त्यानंतर 'मौज', 'सत्यकथा', 'विविधवृत्त' या तीन नियतकालिकांमध्ये १९४० साली त्यावर आलेली परीक्षणे दिली आहेत. शिवाय नामवंतांची प्रशस्तीही. त्यानंतर 'गाळीव रत्ने' या पुस्तकातील निवडक लेख आहेत. त्यानंतर या पुस्तकावरील १९४३ साली 'सत्यकथा'त प्रकाशित झालेला वि. ह. कुळकर्णी यांचा लेख आणि 'विविधवृत्त'मधील एक परिच्छेद दिला आहे. त्यानंतर अंतरकरांच्या इतरत्र प्रकाशित झालेल्या एक हास्यकथा, एक सांगीतिका, दोन ललित लेख आणि एक रहस्यकथा या लेखनाचा समावेश आहे. १९४०-४३ साली लिहिलं गेलेलं विनोदी साहित्य आज तेवढं विनोदी वाटणार नाही ही उघड गोष्ट आहे. त्यामुळे 'चोरटे हल्ले' आणि 'गाळीव रत्ने' या पुस्तकातील निवडक लेख आता वाचनीय वाटत नाहीत. 'संपादकांची सुखदु:ख' आणि 'घाईत घाई' हे ललितलेख मात्र अंतरकरांच्या संपादकीय अनुभवांशी निगडित असल्याने ते चांगले जमले आहेत. या दोन लेखांतून मासिकाच्या संपादकाला कोणकोणत्या व्यवधानातून जावं लागतं, याची तोंडओळख होते.
या पुस्तकाच्या मलपृष्ठावर अंतरकरांविषयीचे विविध लेखकांचे  अभिप्राय छापले आहेत आणि त्यांचेच पहिल्या विभागात अंतरकरांविषयीचे लेख आहेत. या सर्वानी अंतरकरांच्या संपादक असण्याविषयी भरभरून आणि अभिमानानं लिहिलं आहे. एका ध्येयनिष्ठ, कष्टाळू आणि निस्सीम वाङ्मयप्रेमी संपादक म्हणून अंतरकर कसे होते, याचं सम्यक आणि समतोल चित्रण त्यांच्या लेखातून उभे राहतं. पण इथेच एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, या मान्यवरांनी अंतरकरांविषयी ज्या आदरानं आणि प्रेमानं लिहिलं आहे, तसं त्यांनी अंतरकरांच्या लेखनाविषयी लिहिलेलं नाही. किंबहुना, तो उल्लेख त्यांनी जाणीवपूर्वक टाळला असावा, असं त्यांचे लेख वाचताना वाटतं. ही गोष्ट बरीच सूचक आणि बोलकी आहे. अंतरकर संपादक म्हणून श्रेष्ठ होते, यात काही वाद नाही, पण ते चांगले लेखक होते का, याचा विचार करण्यासारखा आहे. किमान त्यांचं या पुस्तकातलं लेखन वाचून तसा प्रश्न नक्कीच पडतो. त्यामुळे त्यांच्या साहित्याला इतकी पाने देऊन निव्वळ पुस्तकाचा आकार आणि किंमत वाढण्यापलीकडे फार काही साध्य झालेलं नाही. पुस्तक लिहिताना किंवा संपादित करताना त्याचा आकार आणि किंमत यांचाही विचार करायला हवा. कारण पुस्तक विनाकारण मोठं केलं की त्याची किंमत वाढते आणि मग अशी पुस्तकं वाचक आकार आणि किमतीच्या निकषावर मागे टाकतात. परिणामी, संबंधित लेखकाचे वा संपादकाचे काम दुर्लक्षित होण्याची शक्यता असते. या पुस्तकाचंही काटेकोरपणे संपादन केलं असतं तर किमान १००-१५० पानं कमी होऊ शकली असती. परिणामी पुस्तक अधिक वाचनीय झालं असतं.
तिसऱ्या विभागात संपादिकेनी आपल्या आईविषयी लिहिलं आहे. त्यात शेवटी संपादिका लिहितात- ''तू तिथे मी' जातीचं प्रेम तिनं अण्णांवर केलं. त्यांचं समरसत्व इतकं होतं की, ती त्यांच्याबरोबर सतीच जायची! पण शेवटी तिच्यातली आई जिंकली!' या एकाच वाक्यातून या लेखाची जातकुळी लक्षात येते. आई-वडिलांचं एकमेकांवरील नितांत प्रेम सांगण्याच्या नादात सती जाण्यासारख्या अमानुष प्रथेचं आपल्याकडून नकळतपणे समर्थन केलं जात आहे, याचंही भान राखलं गेलेलं नाही.
चौथा विभाग हा परिशिष्टे, संकीर्ण, अनंत-पत्रे यांचा आहे. त्यातील शेवटचा भाग हा अंतरकरांच्या निधनोत्तर निवडक प्रतिक्रियांचा आहे. तो असला काय अन् नसला काय, त्यानं पुस्तकाच्या गुणवत्तेत काहीही फरक पडत नाही. पण आपल्या वडिलांविषयी मान्यवर साहित्यिक काय म्हणतात, याचा सोस अधिक असल्यानं या गोष्टी घेतल्या असाव्यात. ''अनंता'ची फुलं'मधून जसा अनंत अंतरकर यांना पूर्ण न्याय मिळत नाही, तसा या स्मृतिगौरवग्रंथातूनही मिळत नाही. 'अभिजात साहित्यिक रुचीमुळे अनंत अंतरकर मर्यादित अर्थबळावर मात करून व्यवसायात अग्रभागी पोचले आणि तसेच टिकून राहिले.' असं अतिशय नेमकं आणि सार्थ वर्णन विजय तेंडुलकरांनी केलं आहे. 'सत्यकथा' ते 'हंस' असा अभिरुचीसंपन्न प्रवास करणाऱ्या, 'हंस'सारखं दर्जेदार मासिक काढणाऱ्या आणि 'मोहिनी', 'नवल'सारखे वेगळे प्रयोग करणाऱ्या अंतरकरांना आता एका समर्थ चरित्रकाराची नितांत गरज आहे. त्याशिवाय त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाची ओळख पुरेशा गांभीर्यानं होणार नाही असं वाटतं. त्यासाठी 'अनंत अंतरकर आमचे वडील' या मानसिकतेतून त्यांच्या मुलांनी बाहेर पडायला हवं, असं नम्रपणे सुचवावंसं वाटतं. कारण त्याशिवाय तरणोपाय नाही.
'अक्षरयोगी' (अनंत अंतरकर : व्यक्ती आणि कार्य) - संपादन- अरुणा अंतरकर, प्रकाशक- अरुणा अंतरकर, पुणे, 

पृष्ठे - ४१५, मूल्य - ४५० रुपये.

'पुन्हा एकदा अंतरकर?' छे:, पुन्हा एकदा कुरापत!

Published in Loksatta, Sunday, January 5, 2014
२९ डिसेंबरच्या 'लोकरंग'च्या अंकात राम जगताप यांनी 'अक्षरयोगी' या माझ्या पुस्तकाबद्दल लिहिलेला द्वेषमूलक व अभिरुचिहीन मजकूर वाचून सखेदाश्चर्य वाटलं आणि करमणूकही झाली. यापूर्वी 'अनंताची फुलं' या अनुराधा औरंगाबादकर (माझी मोठी बहीण) यांच्या पुस्तकाबद्दल त्यांनी असाच थयथयाट केला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मान ठेवून त्या उपद्व्यापाकडे आम्ही दुर्लक्ष केलं होतं. परंतु आता त्याच बेतालपणे अंतरकरांवरच्या दुसऱ्या पुस्तकाबद्दल त्यांनी लिहिलं, तेव्हा त्यांच्या लिखाणामागचा आकस आणि अंतरकरद्वेष उघड झाला आहे.
'अक्षरयोगी'ला अपशकुन करण्याचा हा विघ्नसंतोषी प्रयत्न असेल, तर तो पूर्णपणे फसणार आहे. मराठी साहित्य क्षेत्रातल्या दिग्गजांनी आणि सुजाण वाचकांनी 'अक्षरयोगी'चं स्वागत केलं आहे. साहजिक राम जगताप यांनी या पुस्तकाचं कितीही अवमूल्यन करण्याचा प्रयत्न केला तरी काही बिघडत नाही. त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टीने केलेल्या टीकेकडे दुर्लक्ष करून मी गप्प राहिले असते. पण दु:खाची गोष्ट म्हणजे तरीही या नगण्य प्रतिक्रियेची दखल घेणं मला भाग आहे. कारण त्यांनी त्यात काही आरोप करून माझी अकारण बदनामी करण्याचा उपद्व्याप केला आहे. तसंच काही ठिकाणी संदर्भ आणि सभ्यता यांच्या मर्यादेबाहेर जाऊन सवंग शेरेबाजी केली आहे. माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या आत्मसन्मानाच्या रक्षणाखातर तिचा समाचार घेणं भाग आहे.
या पुस्तकात निर्मला अन्तरकर यांच्यावरील लेखात ''(अण्णांबरोबर) ती सतीच जायची..,'' असं वाक्य मी लिहिलं आहे. त्यातून मी 'सतीच्या अमानुष प्रथेचं समर्थन करीत आहे याचं मला भान राहिलेलं नाही, असा अजब निष्कर्ष काढला आहे. हा लेख मी सतीच्या प्रथेवर लिहिला नसून माझ्या आईवर लिहिला आहे. तिच्या समर्पण भावनेचं वर्णन करण्यासाठी मी मराठी भाषेतल्या, रूढ झालेल्या एका वाक्प्रचाराची मदत घेतली आहे. त्या एका वाक्यातून एका दुष्ट प्रथेचं समर्थन कसं होऊ शकतं? कुसुमाग्रज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या थोर साहित्यिकांनीसुद्धा आपल्या काळांमध्ये सतीत्वाच्या गुणाचा (कृतीचा नव्हे!) दाखला दिला आहे. कुसुमाग्रजांच्या काव्यात 'आता तर आहे पुण्य सतीचेच उणे' असा उल्लेख आहे, तर 'बुद्धय़ाचि वाण धरिले करी हे सतीचं' असं सावरकरांनी कवितेत म्हटलं आहे. यावरून या दोघांनी सतीप्रथेचं समर्थन केलं आहे, असा निष्कर्ष कुणी काढला, तर मराठी भाषेच्या अज्ञानापोटी केलेला अर्थाचा अनर्थ होईल किंवा दुसऱ्याचा हेतूपुरस्सर केलेला अपमान होईल; त्या व्यक्तीची बदनामी होईल.
या ताशेऱ्यात त्यांनी 'यावरून या लेखाची जातकुळी कळते' अशी भर घातली आहे. 'जातकुळी' हा शब्द वापरताना या थोर समाजसुधारकाला आपण जातपातीच्या अमानुष प्रथेचं भान आहे का, असा सवाल का करू नये? समीक्षकानं कोणत्याही लेखनाचं संपूर्ण वाचन करून व संदर्भ समजून घेऊन मतं व्यक्त करायची असतात. एखाद्या वाक्यावरून लेखनाची समीक्षा होत नसते. 'समीक्षा' या शब्दाची फोड 'सम+ईक्षा' अशी आहे व या शब्दाचा अर्थ सम्यक दृष्टीनं, समतोल वृत्तीनं केलेली पाहणी- असा आहे. समीक्षेच्या या व्याख्येत त्यांचं लेखन बसतं का?
समीक्षकाला वाक्यामागचा अर्थ तर कळत नाहीच; पण जे डोळ्यासमोर आहे, तेही दिसत नाही. याचं उदाहरण म्हणजे 'पुस्तकाच्या मलपृष्ठावर अंतरकरांविषयीचे (लेखकांचे) अभिप्राय छापले आहेत आणि त्यांचेच लेख पहिल्या भागात छापले आहेत..' हा त्यांचा दुसरा शेरा. हे अभिप्राय त्या लेखकांनी स्वतंत्र लिहिलेले नाहीत आणि लेख वेगळे लिहिलेले नाहीत. त्यांच्या लेखनातूनच हे अभिप्राय संकलित करून मलपृष्ठावर छापले आहेत. अशा प्रकारे मलपृष्ठावर अभिप्राय देऊन पुस्तकाच्या स्वरूपाविषयी वाचकांना कल्पना देणं, हा प्रकाशनाच्या क्षेत्रातला जुना प्रघात आहे. एवढी सर्वसामान्य गोष्ट लेखन क्षेत्रात काम करणाऱ्याला माहीत नसेल, तर त्याला समीक्षा करण्याचाअधिकार नाही, असं खेदानं व नाइलाजानं म्हणावं लागेल. मुळात, मलपृष्ठावरच्या मजकुराचा पुस्तकाच्या मूल्यमापनाशी आणि समीक्षेशी संबंधच नसतो. तो जोडून टीका करणं हे अज्ञानमूलक आहेच; शिवाय आकसानं व उरकून टाकण्याच्या वृत्तीनं पाटय़ा टाकणंही आहे.
जगताप पुस्तक नीट वाचत नाहीत आणि समजून घेत नाहीत याचा ठळक पुरावा म्हणजे त्यांचा पुढील शेरा : 'या पुस्तकात मान्यवर लेखकांनी अंतरकरांबद्दल लेखक म्हणून बोलण्याचं टाळलं असावं.' जगतापांना व्यक्तिश: अंतरकरांचं लेखन आवडलं नसेल तर ते त्यांचं मत आहे; ते त्यांचं स्वातंत्र्य आहे. पण आपलं मत सांगण्यासाठी त्यांनी दुसऱ्या लेखकांचा गैरवापर करू नये. ना. सी. फडके, अरविंद गोखले, शं. ना. नवरे, प्र. श्री. नेरूरकर आणि यशवंत रांजणकर यांच्या या पुस्तकातल्या लेखांमध्ये अंतरकरांच्या लेखनगुणाची स्पष्ट व गुणग्राहक दखल आवर्जून घेतलेली आहे. मलपृष्ठावर गोखले व नवरे यांच्या अभिप्रायांचाही समावेश आहे. पुस्तकाचं मलपृष्ठसुद्धा वाचण्याचं सहजसोपं काम ज्यानं केलेलं नाही, त्यानं आतल्या लेखांचं वाचन उचित गांभीर्यानं, प्रामाणिकपणे केलं असेल का, शंकाच आहे.
राहता राहिली बाब- या पुस्तकातल्या इतर मान्यवरांनी अंतरकरांच्या लेखनाचा उल्लेख वा अनुल्लेख करण्याची! तर या पुस्तकातले काही लेखक दुसऱ्या व तिसऱ्या पिढीतले आहेत. त्यांना अंतरकर लेखक म्हणून ठाऊक नसणार, हे उघड आहे. संपादक म्हणून ते अंतरकरांच्या संपर्कात होते. साहजिकच त्यांच्या लेखांमध्ये 'संपादक अंतरकर' दिसतात. याचा अर्थ- लेखक म्हणून अंतरकर त्यांना मान्य नव्हते, असा जगतापांना लावायचा असेल तर त्यांनी खुशाल लावावा. या पुस्तकात अनंत काणेकर, चिं. वि. जोशी, ग. त्र्यं. माडखोलकर आदी प्रभुती त्या काळातल्या दिग्गज लेखकांनी आणि १९४० च्या- म्हणजे अंतरकर लिहीत होते त्या काळातल्या मान्यवर समीक्षकांनी अंतरकरांच्या लेखनगुणाची घेतलेली दखलही नोंदलेली आहे. या काळातल्या जाणकारांनादेखील अंतरकरांचा लेखनगुण मान्य आहे, हे 'अक्षरयोगी' वाचून आलेली वाचकांची पत्रं माझ्याकडे आहेत. 'अक्षरयोगी' वाचल्यानंतर(च) मुंबईच्या 'महाराष्ट्र सेवा संघ' या मान्यवर साहित्यसंस्थेनं त्याची दखल घेणारा कार्यक्रम अलीकडेच आयोजित केला होता. तेव्हा अंतरकरांचा लेखनगुण नव्यानं सिद्ध करण्याची वेगळी गरज नाही.
समीक्षकानं पुस्तक जसं आहे त्यानुसार त्याची समीक्षा करावी, हा नियम जगताप यांना ठाऊक नसावा. ते कसं असावं, याबद्दलची आपली अपरिपक्व मतं दुसऱ्यांवर लादण्याची दंडेली ते करत राहतात. वेगवेगळ्या लेखांमधून तीच ती माहिती पुन्हा पुन्हा आल्याची तक्रार ते करतात. ही माहिती नसून अंतरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे निरनिराळे पैलू आहेत, हा साधा फरक त्यांना कळत नाही? एकाच व्यक्तीबद्दल अनेक जण लिहितात तेव्हा काही गोष्टींची पुनरावृत्ती अपरिहार्य आहे, हे त्यांनी समजून घ्यायला हवं होतं.
समीक्षेशी व पुस्तकाच्या मूल्यमापनाशी काडीचा संबंध नसलेल्या किरकोळ गोष्टींची जंत्री करून खुसपटं काढण्याचा त्यांचा उपद्व्याप अनाकलनीय आहे. पुस्तकाची जास्त पृष्ठसंख्या व किंमत, पुस्तकातल्या पुनर्प्रकाशित लेखांच्या प्रसिद्धी तारखा यांच्याबद्दल त्यांच्या तक्रारी अनाठायी आहेत. पूर्वप्रकाशित लेखांच्या नियतकालिकांना श्रेय मी दिलंच आहे. ते म्हणे जुजबी आहे. म्हणजे काय? ते स्वतंत्र पानावर सोनेरी वेलबुट्टी काढून द्यायला हवं का? आणि त्यामुळे पृष्ठसंख्या वाढली, की हे मग छडी मारण्याची संधी घेणार! पुस्तकाचं स्वरूप व पृष्ठसंख्या ठरवणं हा त्याच्या संपादकाचा व किंमत ठरवणं हा प्रकाशकाचा अधिकार आहे. त्याबद्दल समीक्षकानं बोलण्याचं काम नाही. गंमत पाहा- समीक्षेशी संबंध नसलेल्या अशा गोष्टी (उणीदुणी) जगताप बघतात; पण पुस्तकाचं मुखपष्ठ, मांडणी, छपाई यांच्याबद्दल ते ब्र काढत नाहीत.
मात्र, त्यांची उलटतपासणी सुरू होते.. 'या पुस्तकाचं आणि अंतरकरांबद्दलचे १९६६ मध्ये प्रसिद्ध झालेले लेख इतक्या उशिरा छापण्याचं कारण काय?' अंतरकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त आणि त्यांचं कार्य व लेखन यांची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी हे पुस्तक काढलं आहे, ही माझी भूमिका पुस्तकाच्या मनोगतात स्पष्ट केली आहे. ते वाचलं असतं तर हा प्रश्न त्यांना पडला नसता. १९६६ साली प्रसिद्ध झालेले लेख २०१३ मध्ये छापू नयेत, असा कायदा आहे का? हे लेख वाचनात आल्यामुळेच खरं तर मला हे पुस्तक काढण्याची प्रेरणा मिळाली. मला नेहमीसारखा चरित्रग्रंथ किंवा नातलग, स्नेही परिवारांचे लेख असलेला गौरवग्रंथ काढायचा नव्हता. अंतरकरांचं साहित्यिक व्यक्तिमत्त्व दाखवणारं आणि विशेषत: त्यांच्या संपादनाची प्रक्रिया स्पष्ट करणारं साहित्य मला या पुस्तकासाठी हवं होतं. संपादक व प्रकाशक यांच्या कार्याची व परिश्रमांची मराठी साहित्यात अजूनही दखल घेतली जात नाही. माझा उद्देश या लेखांमधून पूर्ण होतो असं मला वाटतं. या पुस्तकात अन्य लेखकांचे १९ आणि अंतरकर कुटुंबातल्या फक्त दोन जणांचे लेख आहेत. त्यात आनंद अंतरकरांचा लेख संपादक व गुरू असलेल्या अंतरकरांबद्दल आहे. त्यांच्या आणि माझ्या लेखांबद्दल जगताप यांची पिरपिर आहेच. हे लेख तसे वाचनीय आहेत, असं म्हणण्याचं औदार्य ते एकीकडे दाखवतात, आणि हे आपण भलतंच काय लिहिलं असं वाटून लगेचच आम्हाला छडीही मारत गरजतात- 'पण या लेखामध्ये अतिशयोक्ती, उपमा, उत्प्रेक्षा यांचा मारा आहे!' पण अतिशयोक्ती कुठे आहे आणि तो मारा कुठे आहे, याची उदाहरणं ते देत नाहीत. जगताप पुढे आम्हाला हुकूम देतात : 'अनंत अंतरकर आमचे वडील या मानसिकतेतून त्यांच्या मुलांनी बाहेर यावं.' अरे वा! आणि ते काय म्हणून? अनंत अंतरकर आमचे वडील होते, हे जैविक सत्य आहे. आणि केवळ जैविक नव्हे, तर अभिमानास्पद सत्य आहे. आजवर आम्ही 'साक्षेपी टीका' ऐकून होतो. जगतापांमुळे मराठी साहित्यात 'आक्षेपी टीका' या नव्या प्रकाराची मूल्यवान भर पडली आहे.
- अरुणा अन्तरकर

Sunday, January 12, 2014

कडेलोटाकडून 'क्रांती'कडे!

भारतात  आर्थिक उदारीकरणाची सुरुवात झाली त्याआधी सोनं गहाण ठेवण्याची नामुष्की आली होती हे बहुतेकांना माहीत असतं. ती- सोनं गहाण ठेवल्याची- बातमी ज्यांनी प्रथम बाहेर आणली, ते ज्येष्ठ पत्रकार शंकर अय्यर यांनीच भारतातल्या आणखी सहा क्रांतिकारी बदलांकडे जरा बारकाईने पाहिलं.. या सात बदलांमागची निकड काय नि किती होती, हेही..
आर्थिक उदारीकरणानं १९९१ ते २०११ या दोन दशकांत भारतीय जनमानस चांगलंच ढवळून काढलं. या घुसळणीमुळेच, हा २० वर्षांचा काळ स्वातंत्र्योत्तर भारतातील एक महत्त्वाचं पर्व मानला जाण्याची शक्यता निर्माण झाली. शेती, सेवा, उद्योग, शिक्षण, आरोग्य, प्रसारमाध्यमं, नाटक, चित्रपट, साहित्य अशा अनेक क्षेत्रांवर उदारीकरणाचा बरा-वाईट परिणाम झाला आहे. या काळात भारतातील सर्व सेवासुविधा आणि क्षेत्रं उदारीकरणाच्या तडाख्यात सापडली आहेत. गेल्या काही वर्षांत कुठल्याही क्षेत्राचा आढावा घेताना ९१ पूर्व आणि नंतर अशीच मांडणी केली जात आहे. (किंवा तशी मांडणी केली जायला हवी, असा बदल या दोन दशकाने घडवला आहे.) मग ते शिक्षण असो की सेवा उद्योग. बर्लिनची भिंत पडल्यानंतर केवळ पूर्व आणि पश्चिम जर्मनीतच बदल झाला असं नाही तर जगही बर्लिन िभतपूर्व आणि नंतर असं विभागलं गेलं. नव्वदच्या दशकात भारतात सुरू झालेल्या आर्थिक उदारीकरणाने भारताचीही अशीच विभागणी केली आहे.
पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव आणि तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांना या उदारीकरण पर्वाचे शिल्पकार मानले जाते. पण या पर्वाची सुरुवात झाली तरी कशी? कुठल्याही मोठय़ा बदलाची सुरुवात ही छोटय़ा गोष्टीमधूनच होते. १९९१ मध्ये परकीय गंगाजळी आटली आणि भारतावर सोने गहाण टाकण्याची वेळ आली. प्रसंग म्हटला तर बाका होता. त्या वेळी अर्थमंत्री मनमोहन सिंग यांना संभाव्य आणि बऱ्याचशा अपरिहार्य परिस्थितीची कल्पना आली. त्यांनी नरसिंह राव यांना ही बिकट परिस्थिती सांगितली आणि त्यांनी दूरदृष्टीने निर्णय घेत मनमोहन सिंग यांच्या धोरणांना पाठिंबा दिला आणि उदारीकरण पर्वाला सुरुवात झाली.
या साऱ्या घडामोडीचा साक्षीदार होण्याची संधी सर्वप्रथम पत्रकारांना मिळते. इंडियन एक्स्प्रेसचे पत्रकार शंकर अय्यर यांना ती मिळाली. एवढेच नव्हे तर त्यांनी तिचा पुरेपूर फायदाही उठवला, असंच म्हणावं लागेल. कारण परकीय गंगाजळी आटल्याने भारतावर सोने गहाण टाकण्याची वेळ आली आहे, ही बातमी अय्यर यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'मध्ये दिली.. देशातील जनतेला याची काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे या बातमीने भारतीय अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण ढवळून निघाले. अय्यर यांनी नंतरच्या घडामोडींचेही वृत्तांकन केले. म्हणजे एका ऐतिहासिक घडामोडीची सुरुवात त्यांनी अतिशय जवळून पाहिली, अनुभवली.
त्या आधारावर त्यांनी 'अ‍ॅक्सिडेंटल इंडिया' हे पुस्तक लिहिलं आहे. याचे उपशीर्षक आहे 'अ हिस्ट्री ऑफ द नेशन्स पॅसेज थ्रू क्रायसिस अँड चेंज'. एकंदर नऊ प्रकरणांतून त्यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला आहे. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे १९४७ ते १९९१ आणि १९९१ ते २०११ या दोन टप्प्यांमध्ये भारताने नेमकी कशी वाटचाल केली, याचा आढावा घेताना अय्यर यांनी एक प्रमेय मांडले आहे. ते म्हणजे स्वातंत्र्यापासूनचा कुठलाही महत्त्वाचा बदल हा पेचप्रसंग निर्माण झाल्यावरच घडला आहे. १९६४ ची हरित क्रांती, १९६९ मधील बँकांचे राष्ट्रीयीकरण, १९७०ची श्वेतक्रांती, १९८२ ची महत्त्वाकांक्षी माध्यान्ह आहार योजना, १९९० मधील सॉफ्टवेअर क्रांती आणि २००५ मधील माहितीच्या अधिकाराचा कायदा या सात गोष्टींनी अभूतपूर्व म्हणावे असे बदल केले. भारतीय जनमानसासह इतरही अनेक गोष्टींचा कायापालट केला. त्यामुळे भारतीयांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला. पांढरपेशा म्हटल्या जाणाऱ्या मध्यमवर्गाचे निम्न, मध्यम आणि उच्च असे तीन स्तर तयार झाले. शिवाय त्याची संख्याही किती तरी पटीने वाढली. खेडय़ांचा कायापालट झाला, शहरांचा चेहरामोहरा बदलला. एक ना अनेक. पण वरील सातही बदलांची सुरुवात अपरिहार्यतेच्या टकमक टोकावर पोहोचल्यानंतरच झाली, असे हे अय्यर यांचे प्रमेय आहे. किंबहुना त्यांचा काहीसा ठाम दावा आहे. वरील सातही बदल कोणते पेचप्रसंग उद्भवल्यावर घेतले गेले त्यांची तपशिलासह त्यांनी प्रकरणनिहाय मांडणी केली आहे. म्हणजे त्यांनी आपले प्रमेय माहिती, संदर्भ आणि पुराव्यांसह मांडले आहे. अर्थात तरीही तो वादाचा विषय होऊ शकतो, तो भाग वेगळा.
पण त्यातून एक गोष्ट नक्की स्पष्ट होते की, भारताची आजवरची प्रगतीही द्रष्टेपणातून आणि भविष्याचा विचार करून झालेली नाही तर ती कडेलोटाच्या टोकावर पोहोचल्यावर निर्माण झालेल्या आणीबाणीतून झालेली आहे.
भारतीय जनमानसाचा हा स्वाभाविक धर्म आहे. त्यामुळे आला दिवस साजरा करायचा, उद्याचा विचार करायचा नाही, ही विचारसरणी राज्यकर्त्यांच्याही हाडीमांसी भिनली असल्याने बाका प्रसंग निर्माण होईपर्यंत सर्व जण गाढ झोपलेले असतात.
लोकानुनयी राजकारण, आघाडय़ांची सरकारे, प्रांतिक अस्मिता आणि दबावगट; जातीय-धार्मिक भेद अशा अनेक कारणांनी कटू पण अपरिहार्य निर्णय घेण्याचे सरकार टाळते तरी किंवा आधी घेतलेले निर्णय मागे तरी घेते. जग ज्या गतीने आणि रीतीने बदलत आहे, त्याचा नुसता कानोसा घेतला तरी 'सर्व पर्याय संपल्यावर येणारी जाग' या मानसिकतेतून बाहेर पडण्याची नितांत निकडीची गरज आहे, याचे भान हे पुस्तक वाचल्यावर येते.
हे पुस्तक केवळ भारताच्या आर्थिक बदलांचा आढावा घेणारे नाही, तर ते त्यामागे असलेल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि इतर क्षेत्रांचाही आढावा घेते. तो घेताना अय्यर यांनी भरपूर कष्ट घेतले आहेत. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, उद्योग अशा क्षेत्रांतील मान्यवरांच्या पन्नासहून अधिक मुलाखती घेतल्या आहेत. याशिवाय इतर लेखकांनी लिहिलेली पुस्तके, खासगी अभ्याससंस्थांचे तसेच सरकारी अहवाल, लेख, प्राथमिक व दुय्यम संदर्भ साधने यांचाही बारकाईने अभ्यास केला आहे. त्यामुळे या पुस्तकाला विशेष संदर्भमूल्य प्राप्त झालेले आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, इतिहास आणि वर्तमान या सर्व पातळ्यांवरील आधुनिक भारताचा प्रवास कसा झाला, कसा होत आहे, याचा हा साक्षात्कारी 'इतिहास' आहे.
हे पुस्तक वाचून झाल्यावर खरं तर थोडी विषण्णता येते आणि कडेलोटाच्या टोकावर पोहोचल्यावरच भानावर येण्याच्या आपल्या भारतीय मानसिकतेवर काही तरी अक्सीर इलाज करायची गरज आहे, याची तीव्रतेने जाणीव होते.
अ‍ॅक्सिडेंटल इंडिया : शंकर अय्यर,
अलेफ बुक कंपनी, नवी दिल्ली,
पाने- ३५२, किंमत : ६९५ रुपये