Friday, July 11, 2014

ये मेरी जोहराजबीं तुझे मालूम नहीं....

Zohra Sehgal  (27 April 1912 – 10 July 2014)
'टायटॅनिक' जहाज तब्बल १०२ वर्षांपूर्वी- म्हणजे १९१२ साली बुडाले, त्याच वर्षी जोहरा सेहगल जन्मल्या. हा निव्वळ योगायोग. त्या बुडालेल्या जहाजाशी जोहरा यांचा ओढूनताणून संबंध लावणे चूकच ठरेल. जगाला गवसणी घालण्याची जिद्द आणि तरीही आपला प्रवास आपल्याच वेगाने करण्याचा स्वभाव जोहरा यांच्याकडे होताच, पण मजेत जगण्यासाठी आवश्यक असलेली वैचारिक आणि सांस्कृतिक समृद्धीही त्यांच्याकडे होती. या चैतन्यमयी आयुष्याची आनंदयात्रा आता निमाली आहे. एका शतकभराच्या साक्षीदार होण्याचे भाग्य लाभलेल्या सेहगल यांची सगळी आयुष्ययात्रा ही धाडसाची, संघर्षांची पण चैतन्याने रसरसलेली होती. त्यांच्या या प्रवासात हिंदी चित्रपटांचा किनारा जरा उशिराच आला. आज अनेकांना त्या आठवत असतील 'चीनी कम'मधील अमिताभ बच्चनच्या आईच्या भूमिकेसाठी. खुद्द अमिताभ यांनाही ही आई संस्मरणीय वाटली होतीच, मग चाहत्यांची काय कथा. 'माय' लागून गेलेल्या या आजीने वयाच्या ९५ वर्षी उत्साह, ऊर्जा, चैतन्य याबाबतीत या तगडय़ा अभिनेत्याला खरोखरीची तुल्यबळ साथ दिली. अशी साथ मिळाली की माणसे स्पर्धा करीत नाहीत, विनम्रपणे दुसऱ्याचे गुण स्वीकारतात. अमिताभ यांनीही म्हणे या चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर जोहरा यांच्या प्रशंसेसाठी शम्पेन पाठवले आणि सोबत एक चिठ्ठी.. 'तुम्हालाही कदाचित माझ्यासह काम करणे आवडले असेल, अशी आशा आहे. तुमच्यासह काम करणे हा माझ्यासाठी नवलोत्सव होता.. तुमची अदम्य ऊर्जा साऱ्याच तरुणांना स्फूर्ती देणारी आहे'! अर्थात, या स्तुतीने जोहराआजी फुशारल्या नसतील.. लॉरेन्स ऑलिव्हिए, पृथ्वीराज कपूर, सई परांजपे, त्याहीआधी दिग्गज नर्तक उदय शंकर अशांसह काम करण्याची सवयच त्यांना झालेली होती.
उत्तर प्रदेशातील खानदानी मुसलमान कुटुंबातला जोहरा यांचा जन्म. हे घराणे ब्रिटिशांच्या आगमनानंतरही नोकझोक टिकवून राहिलेले. वाघिणीच्या दुधाचा स्वीकार करणारे आणि आचारविचारानेही तरक्कीपसंद. त्यामुळेच, शालेय शिक्षण पूर्ण होता-होता 'लग्नापेक्षा करिअरच करेन म्हणते मी' असे जोहरा म्हणाल्यावर काका, भाऊ यांच्याकडून पाठिंबाच मिळाला. वयाच्या अठराव्या वर्षी त्या जर्मनीला नृत्य शिकायला गेल्या. तीन वर्षांनी भारतात परत आल्यावर, भारतीय नृत्यशैलींचा प्रसार जगभर करणारे प्रसिद्ध नर्तक उदय शंकर यांच्या नृत्यसंस्थेत त्या रुजू झाल्या. पुढील आठ वर्षांतील त्यांचे जगभ्रमण याच संस्थेमार्फत झाले आणि इथेच त्यांना जन्माचा जोडीदारही मिळाला.. कामेश्वर सेहगल. लाहोरमध्ये स्थायिक होऊन या जोडप्याने स्वत:ची डान्स अकॅडमी सुरू केली. पण लवकरच फाळणीचे वातावरण सुरू झाले. हा देश की तो, याचा निर्णय घ्यावाच लागणार हे दिसू लागले, तेव्हा पतीसह त्या मुंबईला आल्या आणि इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) या संस्थेचा सांस्कृतिक आधार त्यांना सहज मिळाला. इप्टा हीच १९४०-५० या काळात मुंबईतील सर्वाधिक मोठी सांस्कृतिक चळवळ होती. मुंबईतील बुजुर्ग, जानेमाने आणि नवोदित कलाकार मोठय़ा संख्येने इप्टाशी संबंधित. उदय शंकरांच्या तालमीत वाढलेल्या सेहगल नाटय़ऋषी इब्राहिम अल्काझी आणि पृथ्वीराज कपूर यांच्या सहकारी झाल्या आणि त्यांच्या नृत्यकौशल्याला अभिनयाचे पैलू पडू लागले. जातिवंत कलाकाराला आपल्या कलेशिवाय बाकी साऱ्या गोष्टी शून्यवत वाटतात. त्यामुळेच, इप्टात चालून आलेल्या पदास नकार देऊन त्या पृथ्वीराज कपूर यांच्या 'पृथ्वी थिएटर्स'मध्ये आल्या. १९४५ ते ५९ पर्यंत त्यांनी पृथ्वीराज कपूर यांच्यासह 'दीवार' 'शाकुंतल',  'पठाण', 'गद्दार', 'आहुती', 'कलाकार', 'पैसा', 'किसान' अशा नाटकांची निर्मिती केली. 'पठाण'पासून नाटकात छोटय़ामोठय़ा भूमिकाही करायला सुरुवात केली. तब्बल १४ वर्षे त्यांनी पृथ्वीराज कपूर यांच्यासह काम केले. पतीच्या अपघाती निधनामुळे १९५९ साली जोहरा यांनी पृथ्वी थिएटरचा राजीनामा दिला आणि पुढच्याच वर्षी ही मातबर नाटय़संस्था बंद पडली.
जहाज बुडेलशी परिस्थिती असताना अंत:प्रवाह ओळखून जहाजाने नवा मार्ग शोधावा, तसे जोहरा यांनी पुढल्या दोन वर्षांत केले.. मुंबईऐवजी दिल्लीत राहून तेथील नाटय़संस्थेत काम आणि शंकर्स वीकलीमध्ये नृत्य समीक्षालेखन, अशी दुहेरी जबाबदारी जोहरा सांभाळू लागल्या. याच काळात तत्कालीन रशिया, पूर्व जर्मनी आणि झेकोस्लोव्हाकियाचा तीन महिन्यांचा दौरा करून, भारतीय नृत्य आणि नाटय़ाविषयी अनेक व्याख्याने त्यांनी दिली. मग १९६२ मध्ये अभिनय अभ्यासक्रमासाठी त्यांना ब्रिटिश शिष्यवृत्ती मिळाली आणि लंडनमध्ये त्यांच्या आयुष्यातील तिसरे पर्व सुरू झाले. तब्बल दशकभरच्या लंडन-वास्तव्यात सुरुवातीला त्यांनी कारकुनी केली, काही काळ चहाचे हॉटेलही चालवले. पण १९६६ मध्ये 'द लाँग डिस्टन्स डय़ुएल' या बीबीसीवर सादर होणाऱ्या कार्यक्रमात भूमिका मिळाली. मग बीबीसीच्याच रुडयार्ड किपलिंगवरील मालिकेत आणि इतर नाटकांत कामे मिळत गेली. तरीही १९७४ साली त्या दिल्लीला परतल्या. 'राष्ट्रीय लोकनृत्य पथका'चे काम केंद्र सरकारने त्यांच्यावर सोपवल्यामुळे, सर्व भारतीय भाषांतील लोकनृत्ये बसवून त्यांचे भारतभर प्रयोग जोहरा यांनी केले. पण लवकरच आणीबाणी लागू झाली आणि त्या एकाधिकारशाहीने या संस्थेचा बळी घेतला. इथे काही खरे नाही हे ओळखून त्या लंडनला परतल्या. १९८७ पर्यंत लंडनच्या रंगभूमीवरील तसेच बीबीसीवरील अनेक नाटकांत भूमिका केल्या. सर लॉरेन्स ऑलिव्हिए, दिग्दर्शक सर टायरॉन गथ्री, फिओना वॉकर, प्रिसिला मॉर्गन आणि जेम्स केरी या ब्रिटिश रंगभूमीवरील दीपस्तंभांबरोबर काम केले.
इप्टा, पृथ्वी थिएटर, लंडनमधील ओल्ड विक, द ब्रिटिश ड्रामा लीग, बीबीसी अशा चढत्या भाजणीच्या प्रवासात जोहरा यांची वाटचाल सुखकर झाली असे नाही. प्रत्येक वेळी विस्थापितासारखा त्यांना आपला गाशा गुंडाळून नव्या ठिकाणी स्वत:बरोबर आपल्या कलेचेही पुनर्वसन करावे लागले. पण त्या कधी हिंमत हरल्या नाहीत की त्यांनी आपली प्रतिभा आळसावू दिली नाही. मिळेल त्या मार्गाने त्या वाट काढत राहिल्या. आठ वर्षे उदय शंकर, १४ वर्षे पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर आणि तब्बल २५ वर्षे लंडनमध्ये टीव्हीवर काम केल्यावर सेहगल ८७ साली भारतात परतल्या तेव्हा खरे तर अनेक संधींनी त्यांच्यापुढे हात जोडून उभे राहायला हवे होते. पण त्यांना हिंदी चित्रपटांतील छोटय़ा छोटय़ा भूमिका कराव्या लागल्या. तरीही त्यांनी उतारवयात १५ इंग्रजी नाटके, २६ चित्रपट आणि १४ टीव्ही मालिकांत काम केले. १९९३ ते २००५ या काळात काव्य-अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम केले. जाहिरातींसाठीही विचारणा होऊ लागली आणि जोहरा नाही म्हणाल्या नाहीत.. अशाच एका जाहिरातीत  विवेक ओबेरॉय त्यांचा हात हातात घेऊन म्हणतो, 'ये मेरी जोहराजबी, तुझे मालूम नहीं..'    
 काम करण्याची अफाट ऊर्जा, 'जाऊ तिथे तगून राहू' ही महत्त्वाकांक्षा, यांच्या जोडीला जगण्यावरचे नितांत प्रेम या गोष्टींनी जोहरा सेहगल यांना कायम चिरतरुण ठेवले. त्यांना पडद्यावर पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असेच म्हणावेसे वाटत असणार. उत्फुल्ल रसिकता आणि सळसळते चैतन्य यांचे शतक साजरे करून, त्याहीवर दोन वर्षे जगून त्या गेल्या.. न फुटण्याचे वरदान कोणत्याही जहाजाला मिळालेले नसते, पण आपले जहाज कसे डौलात पुढे नेत राहायचे, हे समजावे लागते. त्यासाठी केवळ निर्णयशक्ती नव्हे तर तंत्रावरली हुकमत आणि कौशल्यही आवश्यकच असते. हे सारे जोहरा नावाच्या जहाजाकडे होते. त्यालाही काळाच्या समुद्राने कवेत घेतले.

No comments:

Post a Comment