Tuesday, July 29, 2014

‘मायाबाजारा’तली माणसं!

या संकलनात मंटोनं लिहिलेली बारा व्यक्तिचित्रं आहेत आणि त्या सर्वच व्यक्ती हिंदी चित्रपटसृष्टीतील आहेत. यात अशोककुमार, नर्गिस, नसीम बानो, बाबूराव पटेल, सितारा, नूरजहाँ या परिचित नावांचा समावेश आहे, तसाच कुलदीप कौर, रफ़ीक ग़ज़नवी, बी. ए. देसाई, नवाब काश्मिरी, पारो, श्याम अशी काही फारशा चित्रपटशौकिन नसणा-यांसाठी अपरिचित म्हणावी अशीही नावं आहेत.

मंटो हाच मुळात कलंदर आणि वेडापीर म्हणावा असा लेखक! जगण्याशी सतत चार हात करत अनेक लेखकांना सतत प्राप्त परिस्थितीशी झगडावं लागतं. पण मंटोला तर त्याच्या लेखनाशीही झगडावं लागलं. त्याच्या लेखनावरून अनेकदा गदारोळ झाले, कोर्टकचे-या झाल्या; त्याचा मंटोला खूप मनस्तापही झाला. मंटो आपल्या परीनं झगडत राहिला. त्यात काही काळ मंटो मुंबईतल्या हिंदी चित्रपटसृष्टीतही झगडत होता. त्या काळात मंटोचा पडद्यावरील आणि पडद्यामागच्या अनेक कलाकारांशी संपर्क आला. मंटो मुळात माणसांचा लोभी होती. त्याला माणसं आवडायचीच. तो सतत माणूस समजून घेण्याचा प्रयत्न करत असायचा. त्याच्या कथा वाचताना याचा सातत्यानं प्रत्यय येत राहतो.

या संकलनाच्या मलपृष्ठावर मुहम्मद हसन अस्करी यांचा अभिप्राय आहे. तो असा- ‘‘मंटोच्या दृष्टीने कोणताही माणूस मूल्यहीन नव्हता. तो प्रत्येक माणसाला अशा विश्वासाने भेटायचा की त्याच्या अस्तित्वात कोणता ना कोणता अर्थ दडलेला असेल आणि एक ना एक दिवस हा अर्थ व्यक्त होईल. अशा विलक्षण माणसांबरोबर त्याला आठवडेच्या आठवडे भटकताना मी पाहिलं आहे. मला आश्चर्य वाटायचं की मंटो यांना कसं काय सहन करतो! पण मंटोला बोअर होणं माहीत नव्हतं. त्याच्यासाठी प्रत्येक मानवी जीवन आणि माणूस निसर्गाचं एक रूप होतं; तसंच प्रत्येक व्यक्ती मनोवेधक होती. चांगलं व वाईट, बुद्धिमान व मूर्ख, सभ्य व असभ्य असा प्रश्न मंटोजवळ जरादेखील नव्हता. त्याच्याजवळ माणसांचा स्वीकार करण्याची इतकी विलक्षण क्षमता होती की त्याच्यासोबत जो माणूस असेल, त्याच्यासारखाच तो व्हायचा.’’

या संकलनातली माणसं काही तशी सामान्य नव्हेत. मंटो ज्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत वावरत होता, तेव्हा ही माणसं फारशी नावारूपाला आली नव्हती, त्यातली काही नंतर बाहेरही पडली. पण अस्करी म्हणतात त्याप्रमाणे मंटोनं त्यांच्यासोबत जो काही काळ घालवला, त्यांचं काम पाहिलं, तो संपूर्ण काळच मंटोनं प्रत्येक व्यक्तिचित्रात उभा केला आहे. माणूस समजून घेताना मंटो त्याचा भवतालही समजून घेत असे. त्याच्या नजरेनं जगाकडे पाही. त्यामुळे ही सर्वच व्यक्तिचित्रं मनोवेधक झाली आहेत.

जगण्याचा संघर्ष, ऐश्वर्य आणि परत गतकाळाकडे हे चक्र उलटसुलट, तिरपागडं किंवा वाकडंतिकडं वाटय़ाला आलेल्या माणसांच्या कहाण्या काहीशा विदारक होतात. त्याला कधीकधी फार तार्किक कारणंही नसतात. पण कधीकधी चुकीचा काळ मात्र असतो. मंटोचे या संकलनातले नायक-नायिका तर ‘मायाबाजारा’तलेच होते आणि मंटोही त्यांच्यातच होता. त्यामुळे त्याच्यासाठी आतले-बाहेरचे असा हा प्रवास नव्हता. म्हणून या संकलनातून या बारा व्यक्तींबरोबर मंटोही तुकडय़ातुकडय़ातून उलगडतो.

याचा अनुभव अशोककुमारवरील पहिल्याच लेखात येतो. मंटोनं या लेखात अशोककुमार आणि बॉम्बे टॉकिजविषयी  लिहिलं आहे. अशोककुमारच्या अगदी साध्यासाध्या गोष्टीतून त्याच्या व्यक्तिमत्त्वावर पुरेसा प्रकाश टाकला आहे. पण त्याचवेळी या प्रकाशाचा एक झोत सतत मंटोवरही राहिला आहे. त्यामुळे या व्यक्तिचित्राचा शेवट अशोककुमारच्या नोटेशनवर न होता, तो मंटोचं पुढे काय होतं, या नोटेशनवर होतो.

नर्गिसच्या व्यक्तिचित्राची सुरुवातच फार मजेशीरपणे होते. मंटोची बायको आणि तिच्या दोन बहिणी मंटोच्या न कळत फावल्या वेळात वेगवेगळ्या अभिनेत्रींना फोन करून टाइमपास करत असतात. त्यात एकदा त्या नर्गिसला फोन करतात. तिची खूप तारीफ करतात. हा सिलसिला बरेच दिवस चालू राहतो. एकेदिवशी त्या नर्गिसला आपल्या घरी बोलावतात. नर्गिस जद्दनबाईला घेऊन त्यांना भेटायला जाते. पण नेमका त्याच दिवसी मंटो लवकर घरी येतो. मंटो त्या वेळी ‘फिल्मिस्तान’मध्ये नोकरी करत असतो. त्यामुळे जद्दनबाई त्याला फार चांगल्या पद्धतीनं ओळखत असतात. पण त्याविषयी त्याची बायको आणि मेहुण्या मंटोला काहीच सांगत नाहीत.

मंटोचीही ती नर्गिसशी पहिलीच भेट असते. पुढे मंटोनं नर्गिसच्या अभिनयाविषयी फार छान लिहिलं आहे. मंटो लिहितो, ‘‘नर्गिसने अभिनयाचे टप्पे हळूहळू गाठले, हे चांगलं झालं. एकाच उडीत तिने शेवटचा टप्पा गाठला असता तर चित्रपट पाहणा-या जाणकार मंडळींच्या व प्रेक्षकांच्या भावनांना अजाणतेपणाने दु:खाचा स्पर्श झाला असता. आपल्या अल्लडपणाच्या वयातही ती चित्रपटाच्या पडद्याबाहरेही अभिनेत्री बनून राहिली असती आणि चलाख व धूर्त व्यापाराच्या फुटपट्टीने आपलं आयुष्य मोजत राहिली असती.’’ शेवटी मंटोनं लिहिलं आहे, ‘‘शेवटी आयुष्य म्हणजे छाया-प्रकाशाची गुंफण आहे. या छाया-प्रकाशाच्या गुंफणीचं चित्रण म्हणजे हे फिल्मी जीवन! पण कधी कधी या फिल्मी जीवनात असा काही पेच पडतो, असं काही वळण येतं की प्रकाश हा प्रकाश उरत नाही, सावली ही सावली उरत नाही.’’

मेरठची कैची अर्थात पारो या अभिनेत्रीविषयी लिहिताना मंटोनं परत अशोककुमार यांच्याविषयीही लिहिलं आहे. कारण ही अभिनेत्री ‘फिल्मिस्तान’ची होती. पारो ही मेरठची वारांगना होती. हिंदी चित्रपटात काम करण्याच्या आवडीपायी ती ‘फिल्मिस्तान’मध्ये आली. तिनं काही चित्रपटही केले. पण त्यापेक्षा मंटोनं पारोचं व्यक्तिमत्त्व ज्या पद्धतीनं उभं केलं आहे, ते वाचून पाहण्यासारखंच आहे.

असं यातल्या सर्वच व्यक्तिचित्रांबद्दल सविस्तर लिहिता येईल. लिहायलाही हवं. पण लक्षात घेण्याचा मुद्दा असा की, मंटोनं या संकलनातल्या प्रत्येक व्यक्तिचित्रात अशी काही जादू भरली आहे की, तुम्ही  प्रत्येक व्यक्तीमध्ये गुंतत जाता. या काही विजयाच्या कहाण्या नाहीत. मंटोनं कुणाचंही उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला नाही, तसंच कुणाचं खच्चीकरणही केलं नाही. त्यानं जे जे आहे ते ते तसं सांगितलं आहे. त्यामुळे यातल्या सर्वच व्यक्तिचित्रांमध्ये परस्परविसंगती, विसंवाद, संघर्ष, संकटं, मान-सन्मान, कौतुक, मानहानी, अशा अनेक गोष्टी येतात. विजय तेंडुलकरांनी एके ठिकाणी म्हटलं आहे, ‘काही व्यक्ती या तुकड्या तुकड्यांनी लहान-मोठ्या असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही तुकडे मोठे असतात, काही तुकडे लहान असतात.’ मंटोची ही बारा व्यक्तिचित्रं अगदी तशीच आहेत.    


No comments:

Post a Comment