Tuesday, July 29, 2014

मुंबई नगरी बडी बांका

कुठल्याही शहराच्या स्थित्यंतराचा आलेख सातत्याने काढत राहणं, हे त्या शहराच्या स्थानीय इतिहासाच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्वाचं असतं. मुंबई हे तर जगातलं एक महत्त्वाचं शहर आहे. त्याची न्यूयॉर्क आणि लंडनसारख्या शहराशी काहीशी अतिशयोक्त असली तरी तुलना केली जाते. मुंबईचं शांघाय वा सिंगापूर करण्याचीही भाषा राजकारणी मंडळी अधूनमधून करत असतात. मुंबईबद्दल बोलायला लागलो की, मूळ सात बेटं आणि ती जोडल्यानंतर वसत गेलेलं शहर, ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक इथे गुजरात आणि इतर ठिकाणांहून आणलेली माणसं, सुरुवातीचं मुंबई शहर अशा अनेक गोष्टींना सुरुवात होते. अठराव्या-एकोणिसाव्या शतकातली मुंबई ही खरोखरच काहीशी अद्भुत, रंजक आणि मनोरम्य म्हणावी अशी होती. ‘जिवाची मुंबई’ हा शब्दप्रयोग त्या मुंबईच्या भ्रमंतीतूनच तयार झाला असावा.

मुंबईचं वैभव म्हणजे मुंबईतल्या भव्य आणि प्रेक्षणीय वास्तू. या बव्हंशी वास्तू तयार करण्यात ब्रिटिशांचा मोठा वाटा आहे. ब्रिटिश ज्या ब्रिटनचे नागरिक त्यातल्या लंडन या शहराचं वास्तूवैभव तर कितीतरी प्रचंड आणि भव्य म्हणावं असं आहे. लंडन या शहराबद्दल किती पुस्तकं असावीत? साधारणपणे 25,000 पुस्तकं या एकटय़ा शहराविषयी आहेत, असं सांगितलं जातं. या पुस्तकांमध्येही कितीतरी प्रकारचं वैविध्य आहे. एकोणिसाव्या शतकातल्या लंडनमधील फॅशन, एकोणिसाव्या शतकात प्रकाशित झालेल्या पुस्तकांतील लंडन, 1945 नंतरचं लंडन, पहिल्या महायुद्धापूर्वीचं लंडन, दुस-या महायुद्धानंतरचं लंडन अशी कितीतरी विषयांवरील पुस्तकं आहेत. आणि अजूनही लिहिली जात आहेतच.

अगदी एवढय़ा प्रमाणावर नसलं तरी मुंबईविषयीचं कुतूहल आणि आकर्षणही काहीसं असंच म्हणावं लागेल. त्यात परकीय लेखकांपासून स्वकीयांपर्यंत अनेक अभ्यासकांचा समावेश आहे. अलीकडेच दिवंगत झालेल्या शारदा द्विवेदी यांची मुंबईवरील देखणी कॉफीटेबल बुक्स अनेकांना माहीत असतील. ‘बिहाइंड द ब्यूटीफूल फॉरेव्हर - लाइफ, डेथ अँड होप इन अ मुंबई अण्डरसिटी’ हे अलीकडेच प्रकाशित झालेलं कॅथरीन बू या अमेरिकन महिला पत्रकाराचं पुस्तक सध्या भारतीय इंग्रजी वाचकांमध्ये बरंच गाजतं आहे. मुंबईतल्या अधोविश्वाबद्दलचं हे पुस्तक आहे.

मराठीमध्ये एखादं पुस्तक गाजत आहे, असं म्हणण्याची सोय नाही, पण अलीकडेच प्रकाशित झालेल्या अरुण पुराणिक यांच्या ‘हरवलेली मुंबई’ या पुस्तकाची अवघ्या दोन महिन्यात दुसरी आवृत्ती निघावी, ही या पुस्तकाबद्दलची वाचकपसंती नोंदवणारी उल्लेखनीय घटना म्हणावी लागेल. चौरस आकार, भरपूर कृष्णधवल छायाचित्रं, देखणी छपाई आणि पुराणिक यांनी कष्टपूर्वक, अभ्यास करून नोंदवलेली मुंबईच्या काही वैशिष्टय़ांची सफर ही या पुस्तकाची काही महत्त्वाची वैशिष्टय़ं. तसं तर संशोधन करून कुठल्याही विषयावर पुस्तक लिहिणं हे काही विशेष नवलाचं मानायचं कारण नाही. पण याबाबतीत पुराणिक बरेचसे सरस आहेत. कारण ते मूळचे मुंबईकर. त्यांचा जन्म गिरगावातल्या एका जुन्या चाळीत झाला. त्यामुळे लहानपणापासून त्यांना मुंबईची ओळख होत गेली. (मुंबईतल्या वेश्या पाहिल्याची त्यांची आठवण ते दोन वर्षाचे असतानाची आहे.) पण लहानपण आणि तरुणपण या काळात पुराणिकांनी पाहिलेली मुंबई आता राहिली नाही. त्याच्या काही खुणाच तेवढय़ा शिल्लक राहिल्या आहेत. त्याही आता एकेककरून नाहीशा होत आहेत. गिरणगावातले उंचच्या उंच टॉवर आणि मॉल यांनी लालबाग-परळचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. मुंबईच्या जुन्या साऱ्याच वैशिष्टय़ांचा चेहरा असा बदलला नसला तरी तो पहिला राहिलेला नाही, हेही तितकेच खरे.

मुंबईचं ही सर्व स्थित्यंतर टिपणं तसं अवघडच होतं. त्यामुळे पुराणिक यांनी आपल्या या पुस्तकात दक्षिण मुंबईवरच भर दिला आहे. शिवाय हे लेख त्यांनी सुटेसुटे वेगवेगळ्या वेळी लिहिले आहेत. पण हा प्रत्येक लेख म्हणजे मनोरम्य आणि रंजकतेची परमावधी म्हणावी असा आहे. ‘चोर बाजार’ या लेखात पुराणिक लिहितात, ‘‘त्यावेळी सॅण्डहर्स्ट रोडवरून जाताना, नळ बाजाराच्या समोरच्या गल्ल्यातून, ‘रास्ते का माल सस्ते में’, ‘जुना पुराना सामान’, ‘बे बे रुपया, कोई भी माल उठाव’, ‘मिठा खाजा, बै पैसा’ असे तारसप्तकात ओरडत रस्त्यावर आपला माल विकणाऱ्या या मुस्लीम फेरीवाल्यांचा (काबाडी लोकांचा) आवाज (तत्कालीन व्हाईसरॉयच्या) त्यांच्या कानी पडला. त्या काळात विरळ लोकवस्ती व रस्त्यांवर गाडय़ांची फराशी रहदारी नसल्याने रस्त्यांवर शांतता नांदत असे. तेव्हा फेरीवाल्यांच्या आवाजाच्या त्रासाला त्रासिकपणे ‘क्या शोर बाजार है’ असे म्हणून व्हाइसरॉयसाहेबांनी नाक मुरडले होते. त्यावरून या जुन्या बाजाराचे नाव ‘शोर बाजार’ पडले. लोकांनी त्याचा ‘चोर बाजार’ असा अपभ्रंश केला.’’ अशी माहिती दिली आहे. हा लेख इतका मजेशीर आहे की, असा काहीएक बाजार मुंबईत आहे याचाच आपल्याला अचंबा वाटतो.

पुस्तकातला पहिलाच लेख आहे चाळसंस्कृतीविषयी. (अलीकडेच नीरा आडारकर यांनीही मुंबईतल्या चाळींविषयी इंग्रजीमध्ये कॉफीटेबल बुक काढलं आहे!) या लेखासोबतची छायाचित्रं पाहण्यासारखी आहेत. गिरगाव, ठाकूरद्वार या भागातल्या चाळींची काही वैशिष्टय़े नोंदवली आहेत. ‘‘पहाटे दुधाच्या लाईनीत उभे राहण्यापासून ते रात्री गच्चीत झोपायला जागा मिळेपर्यंत इथे फक्त संघर्ष आणि संघर्षच असतो. इथे वेळप्रसंगी भांडण, मारामारी केल्याशिवाय मूल मोठेच होऊ शकत नाही, हे कटू वास्तव आहे. त्यामुळे ‘धाडस’ त्यांच्या रक्तात नकळत बाणवले जाते.’’ असे पुराणिक शेवटी शेवटी लिहितात तेव्हा या चाळीतल्या विश्वाची ‘खरी गंमत’ कळते. आणि ते जग यापुढच्या काळात पाहायला आणि अनुभवायला मिळणार नाही, याची चुटपूटही लागते.

या पुस्तकात एकंदर वीस लेख आहेत. ‘गिरगाव चौपाटी’, ‘पानसुपारी’, ‘पानवाला’, ‘अलेक्झांड्रा’, ‘नाक्यावरचा इराणी’, ‘मुंबईतील पोसखाने’, ‘रामा गडी’ या शीर्षकांवरूनच त्या त्या लेखाचा विषय समजतो आणि त्या लेखांना दिलेल्या समर्पक छायाचित्रांतून जिवंत होतो. खरं तर या सर्वच लेखांबद्दल, त्यांच्या वैशिष्टय़ांबद्दल लिहिता येईल. पण ते जागेच्या मर्यादेअभावी शक्य नाही. आणि त्यातून वाचकांची रंजकताही कमी होण्याचा धोका आहे. कारण चित्रपटाचा शेवट जसा सांगू नये तसा या पुस्तकातल्या कुठल्याच लेखाचा गाभा सांगण्यात हशील नाही. तो प्रत्यक्ष वाचूनच अनुभवायला हवा.

पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे पुस्तक कुणासाठी आहे? मुंबईविषयीचे आहे म्हणून ते फक्त मुंबईकरांसाठी आहे, असे अजिबात नाही. ज्या ज्या कुणाला मुंबईविषयी प्रामाणिक कुतूहल आहे, तिच्या जुन्या रूपाबद्दल आस्था आहे आणि स्थानिय इतिहासामध्ये रस आहे, त्या सर्वासाठी हे पुस्तक आहे. ही काही कथा-कादंबरी नाही, ही मुंबई शहराची एक धावती सफर आहे. तुम्ही या पुस्तकातली ठिकाणं प्रत्यक्षात पाहिली असतील तर तुम्हाला पुनप्र्रत्ययाचा आनंद मिळेल, पाहिली नसतील तर हे पुस्तक वाचून ती पाहण्याची इच्छा होईल. म्हणजे त्या जुन्या मुंबईचे आत्ता जे काही अवशेष शिल्लक आहेत, ते पाहता येतील. जुनी मुंबई आता अनुभवता येणार नाहीच, त्यामुळे त्यासाठी हे पुस्तक हाच काय तो काळ समजून घेण्याचा एक दुवा आहे.

No comments:

Post a Comment