Tuesday, July 29, 2014

तिस-या प्रहरातील प्रश्नोपनिषद

प्रा. विजया राजाध्यक्ष म्हटले की, ‘बहुपेडी विंदा’, ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’, ‘कवितारती’, ‘शोध मर्ढेकरांचा’, ‘पुन्हा मर्ढेकर’ असे समीक्षाग्रंथ आठवतात. ‘संवाद’ या पुस्तकामध्ये विजयाबाईंनी विंदा करंदीकर, गंगाधर गाडगीळ आणि वा. ल. कुलकर्णी यांच्या घेतलेल्या वाङ्मयीन मुलाखती मोठ्या रोचक आहेत.  विजयाबाईंनी आस्वादक समीक्षेला मराठीमध्ये काहीएक प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या कामी काही दमदार पावले टाकली आहेत. पण तरीही आस्वादक समीक्षेविषयीचे समज काही पूर्णपणे नाहिसे झालेले नाहीत. या समीक्षालेखनाला दुय्यम मानले जातेच. पण विजयाबाईंनी त्याची पर्वा न करता आपले लेखन चालूच ठेवले आहे. दोन वर्षापूर्वी त्यांना विंदा करंदीकरांच्या नावाचा पहिला पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी आरती प्रभूंवर लेखन करण्याचा मनोदय व्यक्त केला होता.

थोडक्यात विजयाबाई पूर्णपणे वाङ्मयीन स्वरूपाचे-त्यातही समीक्षात्मक स्वरूपाचे लेखन करणा-या लेखिका आहेत. पण एवढीच काही त्यांची ओळख नाही. विजयाबाई प्रदीर्घ काळ कथालेखनही करत आल्या आहेत. आत्तापर्यंत त्यांचे सतरा-अठरा कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. नुकतेच त्यांचे नवे पुस्तक प्रकाशित झाले आहे. पण ते समीक्षालेखन नाही की कथासंग्रह नाही. तो चक्क दोन कादंब-यांचा संग्रह आहे. या पुस्तकाचे नाव आहे, तीन प्रहर. या संग्रहामध्ये दोन लघुकांदब-या आहेत. म्हणजे आकाराने त्या लहान आहेत म्हणून त्यांना ढोबळ अर्थाने लघुकादंब-या म्हणायचे. विजयाबाईंनी ‘कादंबरी की लघुकादंबरी? वाचकांनीच ते ठरवावे’ असे प्रास्ताविकात सांगून टाकले आहे.

विशेष म्हणजे कादंबरी लेखनाचा विजयाबाईंचा हा पहिलाच प्रयत्न आहे. यातील ‘बंदिश’ ही पहिली कादंबरी ‘माझ्या लेखनप्रवासात घडलेला हा एक अपघात आहे’ असे त्यांनी प्रास्ताविकात लिहिले आहे, तर ‘आयुष्य : पहिलं की तिसरं?’ ही दुसरी कादंबरी हाही कादंबरी लेखनाची वाट शोधण्याचा, ती काही अंशी सापडली असे वाटण्याचा अनुभव’ असे लिहिले आहे. म्हणजे पुस्तकाचे नाव ‘तीन प्रहर’, त्यात दोन लघु म्हणाव्या अशा कादंब-या आणि प्रत्यक्षात तिस-या प्रहरातल्या विजयाबाईं-सारख्या व्रतस्थ समीक्षक-कथालेखिकेनं लिहिलेल्या, असा हा योग आहे. यातून या दोन्ही कादंब-यांचे विषय माणसाच्या तिस-या प्रहारातील जीवनाविषयीचे आहेत, हे ठसठशीतपणे अधोरेखित करायचे असावे.

‘बंदिश’ ही कादंबरी एका शास्त्रीय गायकाविषयीची आहे. म्हणजे संगीत हे तिच्या मध्यवर्ती आहे. जोगबुवा आणि विष्णू यांच्या संबंधांतून ही कादंबरी फुलत जाते. आयुष्य सपाट नसते, त्यात अनेक आरोह आणि अवरोह असतात. या दोन्हींची मिळून बंदिश होते.

‘आयुष्य : पहिलं की तिसरं?’ ही तर सरळ सरळ ‘नयन लागले पैलतीरी’ अशा अवस्थेत असलेल्या वामनराव आणि त्यांच्या कुटुंबाची कथा आहे. या दोन्ही कादंब-यांचे तपशील खूप देता येतील, पण त्या लघुकादंब-या असल्याने ते फार देण्यात अर्थ नाही. पण या दोन्ही कादंब-यांची काही साम्यस्थळे सांगता येतील. या दोन्हींमध्ये तिसरा प्रहर हा काळ मुख्य आहे. म्हणजे त्या काळात जगणा-या दोन नायकांची ही रुढार्थाने कथा आहे. शिवाय या दोन्हींमध्ये पात्रांची संख्या अगदी मोजकी आहे. ही कथानके तशी फार नावीन्यपूर्ण नाहीत, पण वाचनीय नक्कीच आहेत.

लेखिका काहीतरी सांगू पाहतेय, ते आपल्यापर्यंत पोहचतेही. पण थेटपणे भिडते का, याचे उत्तर फारसे समाधानकारकपणे देता येत नाही. पण लेखिकेनं या दोन्ही कादंब-यांच्या निमित्ताने वाधर्क्यातील माणसांविषयी काही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते प्रश्नोपनिषद समजून घ्यायला हवे.

विजयाबाईंनी काही वर्षापूर्वी ‘मराठीतील काही कादंब-या या भरकटलेल्या कथा आहेत, असे म्हटले जाते. त्याला धरून असे म्हणता येईल की काही कथा या गुदमरलेल्या कादंब-या आहेत,’ असे विधान केले होते. त्याची इथे आठवण इथे होते, पण ती निराळ्या अर्थाने. कारण प्रस्तुत पुस्तक वाचून वाटते की, हा काही नियम असेलच असे मानायचे कारण नाही. किमान या पुस्तकाला तरी ते लागू पडत नाही. कारण विषयाच्या आवाक्यानुसारच त्यांची लांबी आहे. त्याला कादंबरी म्हणा किंवा लघुकादंबरी फारसा काही फरक पडत नाही. पण हे सगळे आपले वाचक म्हणून. अभ्यासू समीक्षकांची मते कदाचित वेगळीही असू शकतात.

तीन प्रहर : विजया राजाध्यक्ष, राजेंद्र प्रकाशन, मुंबई

No comments:

Post a Comment