Saturday, March 28, 2015

लिखों तो डरो कि उसके कई मतलब लग सकतें हैं

तुम्ही इतरांच्या भावना दुखावल्या जातील असं काहीही लिहू-बोलू शकण्याचीही सोय राहिलेली नाही. लेखकांनी, विचारवंतांनी स्वत:वर सेन्सॉरशिप लादून घेतली तरच त्यांचा जगण्याचा हक्क शाबूत राहू शकतो, अन्यथा नाही.
-------------------------------------------------------------------
कहो तो डरो कि हाय यह क्या कह दिया
न कहो तो डरो कि पुछेंगे चुप क्यों हों
सुनो तो डरो कि अपना कान क्यों दिया
न सुनो तो डरो कि सुनना लाज़िमी तो नहीं था
देखो तो डरो कि एक दिन तुम पर भी यह न हों
न देखो तो डरो कि गवाही में क्या बयान दोगे
सोचो तो डरो कि यह चेहरे पर न झलक आया हो
न सोचो तो डरो कि सोचने को कुछ दे न दें
पढ़ो तो डरो कि पीछेसे झांकनेवाला कौन है
न पढ़ो तो डरो कि तलाशेंगे क्या पढ़ते हो
लिखों तो डरो कि उसके कई मतलब लग सकतें हैं
न लिखो तो डरो कि नयी इबारत सिखाई जाएगी
डरो तो डरो कि कहेंगे डर किस बात का है
न डरो तो डरो कि हुकुम होगा कि डर

हिंदीतील प्रसिद्ध कवी विष्णू खरे यांची ‘डरो’ ही कविता कविमित्र गणेश विसपुते यांनी परवा आपल्या फेसबुक वॉलवर टाकली. गणेशनी लिहिलं आहे की, ‘विष्णू खरेंच्या ‘डरो’ या कवितेला उपशीर्षक आहे- १२ जुलै १९७६. पण ते १ मार्च २०१५ असंही असू शकतं. तत्कालीन राजकारणाच्या परिणामांचं परिमाण त्या कवितेला असलं तरी ती भारतातल्या सार्वकालिक राजकारणाबरोबरच समाज, साहित्य, संस्कृती, अर्थकारण अशा सगळ्या क्षेत्रांना सर्व काळात लागू होते.’
ऑगस्ट २०१३ मध्ये ‘अंनिस’चे नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. जानेवारीत महिन्यात तामीळनाडूमधील पेरुमल मुरुगन यांनी त्यांच्यातील ‘लेखका’चा मृत्यू घडवून आणला. नुकत्याच कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर गोळ्या झाडल्या गेल्या. त्यात पानसरे यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी. आता तािमळनाडूमधील पुलीयूर मुरुगेसन यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. ‘Balachandran Enra Peyarum Enakkundu’ (Balachandran is also my name) या त्यांच्या कादंबरीतील काही उल्लेखांमुळे हा हल्ला करण्यात आला.
आता बांगलादेशातील अशाच काही घटना पाहू. बांगलादेशात रज़ीब हैदर या ब्लॉगलेखकाला त्यांच्या लिखाणामुळे २०१३ मध्ये ठार मारण्यात आलं, तर गेल्याच महिन्यात अविजित रॉय या आणखी एका ब्लॉगलेखकाची आणि लेखक हुमायून अज़ाद या लेखकाची हत्या करण्यात आली. रॉय यांच्या पत्नीही हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत.
म्हणजे बांगलादेशातील इस्लामिक मूलतत्त्ववादी आणि भारतातील हिंदू मूलतत्त्ववादी यांच्यात फारसा फरक उरलेला नाही. फरक आहे तो एवढाच की, बांगलादेशात मुस्लिम धर्मावर टीका करणाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे, तर भारतात हिंदूधर्मावर.
अविजित रॉय हे अमेरिकेत राहत. ते ढाक्यात आपल्या घरी आले आणि त्यांची हत्या करण्यात आली. इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांनी तसा पूर्वइशारा दिला होताच. तर मुरुगन यांच्यावर दबाव आणून त्यांना स्वत:तील लेखकाची हत्या करायला भाग पाडलं गेलं. शिवाय त्यांना वाळीत टाकलं गेलं. शेवटी त्या पती-पत्नीनी चेन्नईला बदली करून आपल्या गावाचा त्याग केला. मुरुगन यांच्यावरील दबावाचा निषेध केला गेला नाही, असं नाही. त्यांच्या विद्यार्थ्यांनी ‘सपोर्ट पेरुमल मुरुगन’ हे फेसबुक पेज सुरू केलं. तािमळनाडूतील प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशननं मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली. याशिवाय इतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे निषेध केला. दाभोलकर-पानसरे यांच्यासंदर्भातही निषेध सभा, मोर्चे, लेख लिहिले गेले.
पण हे निषेधाचे सूर फार लवकर विरून जाण्याचीही कडेकोट सोय करण्यात आली आहे.
धार्मिक मूलतत्त्ववाद नावाचे छोटे छोटे राक्षस आपल्याजवळ पोहचले आहेत, एवढंच नाही तर ते आपल्या आगेमागे फिरत आहेत. हिंदू धर्म, जात, श्रद्धा-अंधश्रद्धा, देव-धर्म, कर्मकांड-व्रत-वैकल्यं कशाही विरुद्ध ब्र उच्चारायची सोय उरलेली नाही. तुम्ही इतरांच्या भावना दुखावल्या जातील असं काहीही लिहू-बोलू शकण्याचीही सोय राहिलेली नाही. लेखकांनी, विचारवंतांनी स्वत:वर सेन्सॉरशिप लादून घेतली तरच त्यांचा जगण्याचा हक्क शाबूत राहू शकतो, अन्यथा नाही.
हा धार्मिक उन्माद कशाची आठवण करू देतो?
निखालसपणे हिटलरच्या वर्ण-द्वेषाची. जर्मनीच्या या हुकूमशहानं ज्यूंच्या कत्तलीचा सपाटा लावला होता. पण तेव्हाच्या जर्मनीतल्या मध्यमवर्गाचा तो हिरो होता. त्याचं प्रचंड कौतुक होतं जर्मनांना. भारतात अगदी तसंच चित्र नाही. नरेंद्र मोदी काही हिटलर नव्हेत. त्यांनी काही हिंदूविरोधकांची सरसकट हत्या करण्याचं राष्ट्रीय धोरण जाहीर केलेलं नाही. पण ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. आणि त्यांच्या जेमतेम वर्षभराच्या कारकिर्दीतही हिंदू मूलतत्त्वादाचा उन्माद हिटलरच्या काळातल्या उन्मादी मध्यमवर्गाचीच आठवण करून देणारा आहे. विष्णू खरे म्हणतात तसा सर्वच बाजूंनी लेखक-विचारवंत यांना गॅस चेंबरमध्ये गाठण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
प्रसिद्ध कादंबरीकार श्याम मनोहर यांची एक कथा आहे, ‘छोटे छोटे राक्षस’ नावाची. एक राक्षस कितीही भयानक असला तरी त्याच्याशी लढता येतं. अनेक छोट्या छोट्या राक्षसांशी कसं लढायचं, हा यक्षप्रश्न आहे.
आणि या घडीला तरी त्यावर उत्तर नाही. 

विनोद मेहता नावाचा मानदंड

''गिरीलाल जैन, नानपोरिया, सुरेंद्र निहाल सिंग, प्रेम भाटिया, शामलाल वगैरे लोक ग्रेट होते, तपस्वी होते. समाज, संस्कृती आणि राजकारणाच्या धारणा आणि प्रेरणा त्यांना अवगत होत्या. आपल्या लिखाणात ही संपादक मंडळी भारतीय समाजमनाची स्पंदनं आणि लक्षणं अचूक मांडत. या व्रतस्थ, ज्ञानवंत विद्वानांच्या सभेत विनोद उपरा वाटायचा.
म्हणूनच आपला वाटायचा. कारण तो आपल्या प्रत्येक वार्ताहराचं मोल जाणून होता. संपादकीय लिहिलं की आपलं अाणि पेपरचं नातं संपलं अशा निर्लेपवृत्तीने त्याला ग्रासलं नाही. म्हणूनच विनोद संपूर्ण पेपरचा विचार करतो. वर्तमानपत्राचं रूप सुबक, आकर्षक असावं याचा आग्रह धरतो... बातम्या बोजड, कंटाळवाण्या असू नयेत म्हणून धडपडतो. वाचकांशी दोस्ताना करण्याची वृत्ती वर्तमानपत्रांनी ठेवावी, ही विनोदची कल्पना.''

विनोद मेहता यांनी १९९५च्या अखेरीला दिल्लीहून ‘आऊटलुक’ हे साप्ताहिक सुरू केलं, तेव्हा त्यांचे एकेकाळचे सहकारी पत्रकार अंबरीश मिश्र यांनी त्यांच्याविषयी ‘आज दिनांक’मध्ये ‘आशिक मस्त फकीर’ या नावाने एक लेख लिहिला होता... त्यातील वरील परिच्छेद आहे.
गंमत पाहा. भारतातील बहुतांशी राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील वर्तमानपत्रं ही भांडवलदार मालकांची. वर उल्लेख केलेले सर्व याच वर्तमानपत्रांचे ‘नोकरदार संपादक’, पण तरीही त्यांचा व्यासंग, विद्वता, समाजभान आणि जी कुठल्याही संपादकाकडे असायला हवी अशी प्रगल्भ स्वरूपाची दूरदृष्टी याबाबत कधीही, कुणालाही शंका घेता आली नाही. विनोद मेहता व्यासंग, विद्वता याबाबतीत वर उल्लेखित संपादकांपेक्षा काहीसे उणे नक्कीच होते, पण समाजभान आणि प्रगल्भ दूरदृष्टी याबाबतीत ते तितकेच समकक्ष होते. मेहता जातील तिथे आपल्या स्वातंत्र्यासाठी मालकांशी भांडले, मनासारखं काम करता येत नाही हे पाहून त्यांनी सणकीत त्या वर्तमानपत्रांना सोडचिठ्ठी दिली.
अवघ्या वीस वर्षांत विनोद मेहता यांनी ‘डेबोनेयर’ (१९७४), ‘संडे ऑब्जर्व्हर’ (१९८०), ‘इंडियन पोस्ट’ (१९८७), ‘द इंडिपेडंट’ (१९८९) या पाच मुंबईतील आणि ‘पायोनियर’ (१९९२) हे दिल्लीतील एक वर्तमानपत्र वा नियतकालिकांचं संपादक म्हणून काम केलं.
७४ साली ‘डेबोनेयर’ हे मासिक सुरू झालं, तेव्हा त्याच्या संपादकपदी एक परदेशी व्यक्ती होती. ‘डेबोनेयर’ सुरू होऊन सात-आठ महिनेच झाले होते, पण त्याची अवस्था तितकीशी चांगली नसल्यानं ते बंद पडण्याच्या मार्गावर होतं. तेव्हा मेहता मालकाला म्हणाले, ‘मला थोडी संधी द्या. पुढच्या सहा महिन्यांत त्याचा खप वाढवून दाखवतो.’ आणि ते त्यांनी करून दाखवलं. सलग सात वर्षे मेहता ‘डेबोनेयर’च्या संपादकपदी होते. या मासिकाने तेव्हा अभूतपूर्व गोंधळ उडवला होता. मध्यमवर्गीय पांढरपेशा माणसाने तर ‘शांतम् पापम्’ करत या मासिकाचं नावही घरात उच्चारणं टाकलं होतं. ‘डेबोनेयर’चा सेक्स हा प्रमुख घटक होता, पण तेवढीच त्याची आेळख होऊ पाहत होती. मेहता संपादक झाले आणि ‘डेबोनेयर’ला एका गंभीर वाङ्मयीन नियतकालिकाचं स्वरूप आलं. साहित्य संपादक सायरस मिस्त्री, कलासमीक्षक गीता कपूर, काव्यसंपादक इम्तियाज धारकर यांसारखी नामवंत मंडळी त्यांनी एकत्र आणली. शिवाय कितीतरी नव्या लेखकांना मेहतांनी लिहितं केलं. उपमन्यू चटर्जी, गीव्ह पटेल, दिलीप चित्रे, गौरी देशपांडे असे अनेक ‘डेबोनेयर’चे लेखक होते. सामाजिक दांभिकतेवर अतिशय बुद्धिमान आणि धारदार उपरोध करण्याचं काम ‘डेबोनेयर’ करत असे. India’s first real girlie magazine असणाऱ्या ‘डेबोनेयर’ला सेक्स या विषयाचीही खुल्या मनानं आणि कलात्मक मांडणी करणारं मासिक असा मेहतांनी लौकिक मिळवून दिला. पण तो गंभीर अर्थानेच. ‘डेबोनेयर’ला त्यांनी दांभिक उच्चमध्यमवर्गीयांचं ‘प्लेबॉय’ होऊ दिलं नाही. ‘डेबोनेयर’चा प्रत्येक अंक हा वाचकांसाठी धक्का असायचा, पण पुढे मेहतांनी ‘डेबोनिअर’ सोडलं आणि त्याचं स्वरूपही झपाट्यानं बदललं. त्याचा खपही कमी होत गेला.
त्यानंतर मेहता ‘संडे ऑब्जर्व्हर’चे संस्थापक-संपादक झाले. या वृत्तपत्राला मेहतांनी पुढच्या सहा वर्षांच्या काळात ‘आशियातील सर्वात जास्त खप असलेलं रविवार-वृत्तपत्र’ असा लौकिक मिळवून दिला, पण तेही त्यांनी सोडलंच शेवटी. १९८७मध्ये ते ‘दी इंडियन पोस्ट’चे संपादक झाले, पण थोड्याच दिवसांत तिथंही राजीनामा दिला. मग ते अनुक्रमे ‘बॉम्बे’ आणि ‘द इंडिपेडेंट’चे संपादक झाले. ‘द इंडिपेंडंट’ हे ‘टाइम्स ऑफ इंडिया’चं भावंड म्हणून सुरू झालं. टाइम्स समूहानं मेहता आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भरपूर पगार दिला. ‘टाइम्स’चे तत्कालीन संपादक दिलीप पाडगावकर, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक गोविंद तळवळकर आणि ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’चे संपादक प्रीतीश नंदी यांचे डोळे विस्फारले गेले. असं म्हणतात की, तेव्हापासून हे संपादक एका बाजूला आणि मेहता एका बाजूला असे दोन तट पडले. लवकरच या दुसऱ्या टीमकडे एक दणदणीत निमित्तही चालून आलं. मोरारजी देसाई नव्हे तर यशवंतराव चव्हाण हे अमेरिकेच्या सीआयएचे एजंट म्हणून काम करत, अशी बातमी मेहता यांनी ‘द इंडिपेडेंट’मध्ये छापली. आणि पाडगावकर-तळवळकर यांना आयतंच कोलीत मिळालं. परिणामी २९व्या दिवशी मेहता यांना टाइम्सच्या इमारतीचे जिने उतरावे लागले.
त्यानंतर मेहतांनी मुंबईलाच रामराम ठोकला आणि थेट दिल्ली गाठली. तिथं ते ‘पायोनिअर’चे संस्थापक-संपादक झाले, पण तेही त्यांनी १९९४ साली सोडलं. म्हणून ते स्वत:चं वर्णन  ‘Editor Who Has Lost the Most Jobs’ असं करत. वीस वर्षांत सहा वर्तमानपत्रांना सोडचिठ्ठी दिल्यावर मेहता हा ‘बेभरवशाचा संपादक’ आहे अशी प्रतिमा झाली नसती तरच नवल. त्यामुळे १९९५ साली त्यांनी ‘आऊटलुक’ या नव्या इंग्रजी वृत्तसाप्ताहिकाची घोषणा केली, तेव्हा सर्वांनी गृहीतच धरलं होतं की, मेहता आहेत आहे तोवर हेही साप्ताहिक चालेल आणि ते सोडून गेले की, त्याचाही बोऱ्या वाजेल. कारण मेहता होते तोपर्यंत आधीची सारी वृत्तपत्रं गाजली होती आणि ते सोडून गेल्यावर ती वाजलीही होती. पण विनोद मेहतांनी आपल्या आधीच्या प्रतिमेला छेद दिला. अन् तोही एक नव्हे, दोन नव्हे तब्बल सतरा वर्षं. केवळ एवढंच नव्हे तर या साप्ताहिकाला भारतातील आघाडीचं साप्ताहिक बनवलं. संपादकपदावरून ते तीन-चार वर्षांपूर्वी निवृत्त झाले. तेव्हापासून ते ‘आऊटलुक’चे एडिटोरिअल चेअरमन म्हणून काम पाहत होते, पण ‘आऊटलुक’ त्यांनी ठरवून दिलेल्या ध्येयधोरणांनुसारच आजही चालतो आहे.
Open, Debate-provoking and Liberal journal अशी मेहता यांच्या ‘आऊटलुक’ची सुरुवातीपासून ओळख आहे. याशिवाय विविधता, लेखांचा आवाका, मजकुराची अचूकता, बोलकी छायाचित्रं-ग्राफिक्स, सुबक व उत्तम मांडणी, चांगलं मुद्रण आणि विनोद मेहतांचा अंकावरील खास ठसा ही वैशिष्ट्यही. सातत्यानं चांगले अंक काढणं, आपल्या वाचकांच्या विश्वासाला तडा न जाऊ देणं हे शिवधनुष्य पेलणं सोपं नसतं. ‘आऊटलुक’ त्याबाबतीत व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण होतो. एकच विषय घेऊन त्याच्या वेगवेगळ्या बाजू समोर आणण्याचं कामही ‘आऊटलुक’ करतं आणि एकाच विषयाचा बऱ्यापैकी पाठपुरावाही. अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील ए. राजा आणि नीरा राडिया यांच्यातील ध्वनिफीती ‘आऊटलुक’नंच बाहेर काढल्या. त्यात वीर संघवी, बरखा दत्त या इंग्रजीतल्या जान्यामान्या पत्रकारांच्या नावांचा भांडाफोडही ‘आउटलुक’नेच केला. खळबळजनक बातम्या, इंग्रजीत ज्याला ‘स्कूप्स’ म्हणतात, ‘आऊटलुक’ तेही ‘इंडिया टुडे’च्या चालीवर करतंच. ‘आउटलुक’ आणि ‘इंडिया टुडे’ ही इंग्रजी साप्ताहिकं इंग्रजी वर्तमानपत्राच्या दोन पावलं पुढे असतात. अनेकदा या साप्ताहिकांच्या कव्हर स्टोरीज इंग्रजी वर्तमानपत्राच्या हेडलाइन्स होतात.
मात्र हेही खरं की, मेहता यांच्या ‘आऊटलुक’ने काही न पटणाऱ्या भूमिकाही घेतल्या आहेत. काश्मीर प्रश्नाबाबतची टोकदार भूमिका आणि अरुंधती रॉयला अवास्तव महत्त्व देऊन तिचं प्रस्थ वाढवणं ही त्यातली दोन महत्त्वाची उदाहरणं. अरुंधतीचे मोठमोठे आणि प्रचंड एकांगी लेख ‘आऊटलुक’ सातत्यानं छापत असतं. अरुंधतीची भूमिका ही विनोद मेहता यांची वा त्यांच्या ‘आऊटलुक’ची नाही असं मेहता यांनी सांगितलंही, पण वर अशीही टिपणी केली की, ‘रॉय यांचे लेख कितीही मोठे आणि न पटणारे असतील तरी ते वाचले जातात.’ ही भूमिका विनोद मेहतांच्या लिबरल आणि समन्वयवादी भूमिकेला छेद देणारी होती. या संवेदनशील विषयांवर ‘ओपिनिअन मेकर’ची भूमिका घेण्यात ते कमी पडले असं खेदानं म्हणावं लागतं.
नैतिकदृष्टया बेबंद, तात्त्विकदृष्टया स्वैर, वैचारिक भूमिकांबाबत कमकुवत आणि सामाजिक भानाबाबत अजागृत अशी सध्याची इंग्रजी-मराठीतील संपादक मंडळी असतात. शिवाय त्यांचे हेवेदावे इतके टोकाचे असतात की, ते असतील त्या वर्तमानपत्रात त्यांचीच सेन्सॉरशिप असते. आपल्याला ज्यांचे विचार मान्य नाहीत अशा लेखक मंडळींना त्यांच्याकडून ‘बॅन’ केले जाते. आणि जे स्तुतिपाठक असतात, आपल्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करत नाहीत अशांनाच स्थान दिले जाते. विरोधाचा ‘ब्र’ उच्चारलेला त्यांच्या वर्तमानपत्रात छापून येऊ शकत नाही.
‘नोकरदार संपादकां’ची ही सेन्सॉरशिप मोदी सरकारप्रणीत ‘बॅनमॅन’ दीनानाथ बात्रा प्रभुतिइतकीच भयानक आहे.
सत्य बोलणं हे वैयक्तिक फायद्याची मान मुरगाळणारं असतं आणि आजकाल ते कोणालाच नको असतं.
त्यासाठी विनोद मेहता यांच्यासारखाच संपादक हवा. जो १०० टक्के सुहृद असतो, जो स्वत:ला न्यायाधीश मानत नाही, जो सर्व विचारसरणीच्या लेखकांना आपल्या वर्तमानपत्रात-नियतकालिकात हक्कानं स्थान देतो, त्यांच्या विरोधी मतांची कदर करतो. मेहता यांच्यासरखे संपादक आपलं नियतकालिक हे केवळ आपलंच मुखपत्र असलं पाहिजे असे अघोषितपणे ठरवत नाहीत, ते सर्वांचं व्यासपीठ मानतात. म्हणूनच ‘आऊटलुक’मध्ये रामचंद्र गुहा लिहितात, तसे अरुंधती रॉय यांचे २०-३० पानी लेखही असतात. सुधींद्र कुलकर्णी असतात, तसे पवन वर्मा असतात. कुमार केतकर असतात, तसे किरण नगरकर असतात. तरुण तेजपाल मित्र असले तरी योग्य वेळी त्यांच्यावरही टीका केली जाते. सेक्ससारख्या विषयावर विशेषांक असतो, तसा सिव्हिल सोसायटीवरही असतो. राजकारणाची सखोल चिकित्सा असते, त्या बरोबरीने सामाजिक प्रश्नांचीही चर्चा असते.
ट्रेंड येतात आणि जातात. परंपरेचं तसं नसतं. ती वटवृक्षासारखी मातीच्या गाभ्याला भिडलेली असते, तिचं खोड वर्तमानाशी झुंज देत असतं आणि फांद्या आभाळाला गवसणी घालायचा प्रयत्न करत असतात आणि त्याची डेरेदार सावली सर्वांना शीतल करायचा प्रयत्न करत असते. विनोद मेहता हे अशा सशक्त परंपरेचे शिलेदार आहेत.
काही संपादकांच्या विद्वत्तेचं आणि तुच्छतेचं महाराष्ट्रात अजूनही कौतुक केलं जातं. मेहता तितके काही विद्वान नव्हते, पण तेवढ्या विद्वत्तेनंही त्यांना पुष्कळ नम्र केलं होतं. त्यामुळे ते आपल्या सहकाऱ्यांसह लेखकांपर्यंत कुणालाच कमी लेखत नसत. म्हणूनच त्यांचा संपर्क फक्त दिल्लीतल्या हाय प्रोफाइल, उच्चभ्रू विद्वानांपुरतच मर्यादित नव्हता, तो सामान्यातल्या सामान्य वाचकांशीही होता आणि लेखकांशीही. प्रसारमाध्यमं लोकशाही आणि स्वातंत्र्याची राखणदार असतात, असं मानलं जातं. लोकशाही प्रक्रिया, लोकशाही मूल्यं, सामाजिक व आर्थिक नैतिकता आणि नैतिक सामाजिक व्यवहार यांची राखणदारी करणं म्हणजे पत्रकारिता करणं असं विश्लेषण जुनेजाणते पत्रकार करतात. मेहता यांची पत्रकारिता या प्रकारची होती.


मेहता यांनी कुठल्याही पत्रकारितेचा कोर्स केला नव्हता, पत्रकारितेवरच्या एखाद्या कार्यशाळेतही भाग घेतला नव्हता. ट्रेनी म्हणून त्यांनी कुठल्या वर्तमानपत्रामध्येही काम केलं नव्हतं. तरीही ते थेट संपादक झाले. पण मग त्यांनी ती पात्रता अंगीही बाणवत नेली. नवे नवे प्रयोग करत, मोडत शिकत राहिले. त्यातून ‘आऊटलुक’सारख्या उत्तम साप्ताहिकाचा जन्म झाला. असं सुदैव सर्वांनाच लाभतं असं नाही. ज्यांना लाभतं त्यांना ते पेलवतंच असंही नाही. पुन्हा अबंरीश मिश्र यांचेच शब्द वापरायचे तर मेहता ‘टपोरी’, ‘उनाड संपादक’ होते, तरी त्यांनी संपादकपदाची खुर्ची उत्तमरीत्या पेलून दाखवली. त्यांच्या मार्गाने इतरांना जाता येईलच असं नाही, पण नव्यानं पत्रकारितेत येऊ इच्छिणाऱ्या, असणाऱ्या आणि संपादक होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने ‘लखनौ बॉय’ आणि ‘एडिटर अनप्लग्ड’ या आत्मचरित्राच्या दोन्ही भागांची पारायणं करायला हवीत. त्यातून फार काही शिकता आलं नाही, तरी किमान ‘वरिष्ठांशी लाचार’ आणि ‘कनिष्ठांशी मुजोर’ वृत्तीने वागू नये, एवढं तरी नक्कीच शिकता येईल.   

गरज ‘हिंदू डाव्यां’ची

मोदी सरकारच्या पराक्रमाच्या बातम्या रोजच्या रोज प्रसारमाध्यमांतून ज्या गतीने येत आहेत, तो माराच इतका जोरदार आहे की, त्यांच्याकडे शांतपणे पाहायला बहुतेकांना जमत नाही. आणि नेमका त्याचाच फायदा उठवला जातो आहे. मोदी सरकारची रणनीती इतकी चाणाक्षपणाची आणि हुशारीची आहे की, त्याचा अजूनही भल्याभल्यांना अंदाज येताना दिसत नाही. किंबहुना, दुसरी शक्यता अशी आहे की, भारतातील पुरोगामी विचारवंत-लेखक यांनी हे सर्व अपरिहार्य आहे असे मानून त्याकडे ‘जे जे होईल ते ते पाहावे’ या न्यायाने शांत बसणेच पसंत केले असावे. या शक्यतांमुळे मागच्या आठवड्यात ‘पांचजन्य’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्राचे माजी संपादक बलदेवभाई शर्मा यांची निवड ‘नॅशनल बुक ट्रस्ट’च्या अध्यक्षपदी केली गेली, या बातमीकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही. इंग्रजी प्रसारमाध्यमांत त्याच्या तुरळक बातम्या आल्या, पण मराठी प्रसारमाध्यमांनी तर त्याची फारशी दखलही घेतली नाही.
मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांची कामगिरी खरोखरच प्रशंसेस आणि कौतुकास पात्र आहेत, यात काहीच शंका नाही. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ‘इंडियन कौन्सिल ऑफ    हिस्टोरिकल रिसर्च’च्या अध्यक्षपदी वाय. सुदर्शन राव या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या इतिहासकाराची तर विश्राम जमादार या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनुयायाची ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या अध्यक्षपदी नेमणूक केली.
असाच प्रकार ‘नियोजन आयोगा’बाबतही झाला. त्याचा तर थेट ‘नीती आयोग’च करण्यात आला. हे असेच चालू राहिले तर लवकरच साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी, ललित कला अकादमी, राष्ट्रीय अनुदान आयोग यांच्या अध्यक्ष वा संचालकपदीही हिंदुत्ववादी, विशेषत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निष्ठावान अनुयायांची निवड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शर्मा, राव, जमादार यांच्या पात्रतेचा, क्षमतेचा ऊहापोह इंग्रजी प्रसारमाध्यमांत झाला आहे, होत आहे. राव यांच्या पात्रतेवर थेट बोट ठेवणारे लेख तर रामचंद्र गुहा यांच्यासारख्या आजच्या सर्वात विद्वान इतिहासकारानेच लिहिले होते. हिंदुत्ववादी लेखक-विचारवंतांना विरोध करण्याचे एकमेव कारण असे आहे की, हे लोक विचार, संशोधन, विश्लेषण आणि अभ्यास यांच्याऐवजी केवळ मिथके आणि रूढीप्रामाण्य यांचाच उदोउदो करतात. के. सुदर्शन राव यांनी त्यांची निवड झाल्यावर जातिव्यवस्थेविषयी जी मुक्ताफळे उधळली होती, ती गोष्ट फार जुनी नाही.
डाव्या विचारसरणीला प्रमाण मानणाऱ्या इतिहासकारांना भारतात महत्त्वाचे स्थान आहे, याचे कारण त्यांची मांडणी ही केवळ मार्क्स-लेनिन यांची विचारसरणी पुढे रेटते म्हणून नव्हे तर ते इतिहासाकडे शोषित, कामगार यांच्या बाजूने पाहण्याचे काम करतात म्हणून. तसा प्रकार हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लेखक-विचारवंतांच्या बाबतीत होताना दिसत नाही. कारण ते पुरस्कार करतात तो जातिव्यवस्थेचा, रूढीप्रामाण्य, मिथके आणि कर्मकांडे यांचा. ब्रिटिशांनी या देशाचे वाटोळे केले, हिंदूच या देशाचे खरे रहिवासी आहेत, जातिव्यवस्थेनेच या देशाची एकता टिकवून ठेवली, मुस्लिम-ख्रिश्चन हे परकीय आहेत, अशी शेंडाबुडखा नसलेली मिथके ठासून सांगण्याचे काम सगळे हिंदुत्ववादी लेखक-विचारवंत करत असतात. त्यांना नेहमी सत्ताधाऱ्यांचे स्तुतिपाठक म्हणून राहायला आवडते, आयुष्याचे जीवितकर्तव्य असल्यासारखे. गतानुगतिकतेचे टोकाचे प्रेम आणि आपल्या विचारांना विरोध करणाऱ्यांचा टोकाचा द्वेष, एवढाच कार्यक्रम हिंदुत्ववादी लेखक-विचारवंत राबवतात हा तर नेहमीचा अनुभव आहे.
थोडक्यात, सगळेच हिंदुत्ववादी हे ‘अरुण शौरी’ असतात. म्हणजे ते अभ्यास करतात पण फक्त स्वत:च्या सोयीपुरता, संशोधन करतात पण फक्त आपल्या फायद्याचे असेल तेवढ्यापुरतेच आणि लेखन करतात तेही आपल्याला आपला अजेंडा पुढे रेटता येईल यासाठी. मग संशोधनाच्या नावाखाली मागचे-पुढचे संदर्भ तोडून विधाने निवडायची, निष्कर्ष काढताना जेवढी म्हणून पूर्वग्रहदूषित टीका झालेली असेल तेवढ्याचाच विचार करायचा आणि आजच्या प्रश्नांसाठी मध्ययुगीन नीती-मूल्यांची उदाहरणे द्यायची, असा ‘अरुण शौरी’ पुरस्कृत आदर्श हा सर्वच हिंदुत्ववादी लेखक-विचारवंतांचा असतो.
हिंदुत्ववाद्यांमध्ये सगळेच उजवे असतात, ‘हिंदू डावे’ असा शब्दप्रयोग त्यांच्यातल्या कुणा-लेखक विचारवंतांविषयी वापरला जाताना दिसत नाही. ‘हिंदू डावे’ कधी काळी भारतात होते, असे म्हणतात. पण ते काळाच्या ओघात नामशेष झाले. महात्मा गांधी या हिंदु डाव्यांचे शिरोमणी होते. गांधीच्या हत्येनंतर गांधी आणि त्यांचे ‘हिंदू डावे’ समर्थकही अंतर्धान पावत गेले. आता परत त्या ‘हिंदू डाव्यां’चे पुनरुज्जीवन करण्याची नितांत निकडीची गरज निर्माण झालेली आहे. ‘हिंदू उजव्यां’ना ‘हिंदू डावे’ हाच चांगला पर्याय ठरू शकतो...निदान तूर्तास तरी.