Tuesday, June 2, 2015

संपलेल्या गोष्टीचे उरलेले प्रश्न

प्रिय अरुणा,
हे पत्र तुला लिहायला अंमळ उशीरच झाला आहे. तशीही तू गेली ४२ वर्षं कोमात होतीस. त्यामुळे या काळातही तुला पत्र लिहिलं असतं तर त्याचा मायना वेगळा असता, त्याचा उद्देशही वेगळा असता; पण तेही तुला वाचता- ऐकताही आलं नसतं. या पत्राचंही तसंच होणार आहे; पण तरीही तुला हे पत्र लिहावंसं वाटलं. वर्तमानपत्रातल्या अशा पत्राला ‘अनावृत पत्र’ म्हणतात,
हे तुला कदाचित माहीत असेल-नसेल; पण गेली ४२ वर्षं तू ज्या केईएम हॉस्पिटलमध्ये होतीस, तेथील तुझी देखभाल करणाऱ्या नर्स, डॉक्टर आणि तुझ्याविषयी सहानुभूती, हळहळ वाटणाऱ्या आणि तुझ्यावर ज्या वासनांध पुरुषी प्रवृत्तीने बलात्कार करून तुझी दशा केली, त्या पुरुषी प्रवृत्तीबद्दल किमान ते कमाल संताप व्यक्त करणाऱ्या काहींपर्यंत हे पत्र पोहोचेल. २७ नोव्हेंबर, १९७३ रोजी केईएममधल्याच सोहनलाल या वॉर्डबॉयने साखळीने तुझा गळा आवळून तुझ्यावर बलात्कार केला आणि तेव्हापासून तुझं आयुष्य ना धड जीवन ना धड मरण, असं विचित्र होऊन बसलं. त्याची अखेर १८ मेला तुझ्या मृत्यूने झाली.
माणूस मेल्यावर त्याच्याविषयी वाईट बोलू नये, असा भारतीय संस्कृतीचा सर्वसाधारण संकेत आहे. खरं म्हणजे तो होता. आजकाल कुणी अशा सर्वसाधारण संकेताच्या गोष्टी पाळत बसत नाही. तुम्ही जिवंत असताना जे काही वागाल-बोलाल त्याचा जाहीर पंचनामा फेसबुकवर होतो. धोबीघाटावर जसं एकाच कपड्याला निवडून-निवडून यथेच्छ बडवलं जातं, तसं फेसबुकवरही केलं जातं; पण हेही तितकंच खरं की, तेथील माणसं तितकीच माणुसकी असणारी, संवेदनशीलही असतात. बघ ना, तुझी प्रकृती खालावत चालली आहे, याच्या बातम्या जाहीर झाल्या-झाल्या तुझ्याबद्दल फेसबुकवर चर्चा सुरू झाली. काहींनी तर तू गेलीस, असं गृहीत धरून तुला श्रद्धांजलीही वाहून टाकली. ‘RIP...…RIP’चा रिप्ले करायला फारसे श्रम पडत नाहीत; पण तूही फार ताणलं नाहीस. या आगाऊ ‘रेस्ट इन सायलेन्स’चा यथोचित आदर करत त्यांना आश्वस्त केलंस. तुझं अंतर्मन जागृत असलं पाहिजे,
याची त्यावरून खात्री पटली.
बातम्यांबरोबरच तू कथा-कादंबरी-नाटक यांचाही विषय झालीस. १९८५मध्ये हरकिसन मेहता यांनी ‘जड चेतन’ ही गुजराती कादंबरी तुझ्या आयुष्यावर लिहिली. १९९४मध्ये तुझ्यावर दत्तकुमार देसाई यांनी ‘कथा अरुणाची’ हे मराठी नाटक लिहिलं. १९९८मध्ये तुझ्या ५०व्या वाढदिवसाचं निमित्त साधून पूर्वाश्रमीच्या केईएममधील नर्स आणि नंतर पत्रकार झालेल्या पिंकी विराणी यांनी ‘अरुणाज स्टोरी’ हे इंग्रजी पुस्तक लिहिलं. पुढे त्याचा मराठी अनुवादही झाला. लवकरच तुझ्या कथेवर आधारित चित्रपट येऊ घातलाय.
तुझी देखभाल करणाऱ्या नर्सेसनी तुझी वॉर्ड क्रमांक चारमधली खोली तुझं स्मृतिस्थळ म्हणून जाहीर करावं, अशी विनंती रुग्णालयाकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ठाण्याच्या नर्सिंग ट्रेनिंग स्कूलला तुझं नाव देण्याची घोषणा केलीय. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तुझ्या नावानं एक लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर केला.
तो महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात समाजात आवाज उठवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना दिला जाणार आहे. तुझ्या नावे राज्यशासनानं स्मारक उभारावं, अशी मागणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे. लवकरच तुझ्या नावाने केईएम हॉस्पिटलच्या आवारात पुतळा उभारण्याची, तुझं नावच केईएम हॉस्पिटलला देण्याची मागणी होईल. तुझ्या नावानं एखादं उद्यान सुरू होईल. एखादा रस्ताही तुझ्या मालकीचा केला जाईल. या साऱ्या गोष्टी त्यांच्याबाबतच होतात, जे लोक आपल्या निधनानंतरही ‘जिवंत’ राहतात. याच कारणामुळे तू आधी होतीस, त्यापेक्षा आता अधिक मोठी झालीस.
तू जे भोगलंस, सोसलंस ते इतर कुणाच्याही वाट्याला कधीच येऊ नये, इतकं भयानक होतं. नर्स म्हणून केईएममध्ये तुला फार वर्षं झाली नव्हती... आणि तिथल्याच एका नराधमाने तुझं आयुष्य बरबाद केलं.
(हे आपल्याच माणसाने केलेल्या त्या अत्यंत निष्ठूर गुन्ह्याचं प्रायश्चित्त आहे, असं केईएममधील कुणी म्हटलेलं नाही, हेही नोंदवण्यासारखं आहे.) हे म्हणजे एकेकाळच्या सतीप्रथेसारखंच झालं. त्या काळी नाही का, नवऱ्याच्या धडधडत्या चितेत त्याच्या जित्याजागत्या बायकोला फेकलं जायचं आणि मग ‘सती गेली’ म्हणत नंतर तिचे देव्हारे माजवायचे, असा प्रकार होता. वर ‘बुद्ध्याच वाण धरिले करि हे सतीचे’, ‘मावळातल्या मर्द मराठ्या घेई सतीचे वाण’, ‘आता तर आहे पुण्य सतीचेच उणे’ असा या ‘सती’चा गुणगौरवही मराठी काव्यांतून अनेकांनी केला आहे. ‘सतीचं वाण’ हा वाक्प्रचारही याच प्रथेची देन आहे. १८२९पर्यंत लॉर्ड बेंटिंकने सतीप्रथा बंद करेपर्यंत भारतात जिवंत स्त्रियांना सर्रास नवऱ्याच्या चितेत ढकललं जात होतं. ज्या स्वखुशीने जात होत्या, त्यांना नवऱ्यानंतर मागे राहिलेल्या बाईचं काय होतं, याची जाणीव होती, म्हणून त्या नवऱ्याच्या चितेला जवळ करत. जिवंत बाईला जाळायचं आणि नंतर तिच्या व्रताची सतीचं वाण म्हणून तारीफ करायची, ही दांभिकता खास भारतीय संस्कृतीचं लक्षण आहे, हे तुला माहीत होतं की नाही? 
तुही त्या अर्थानं सतीच. फार तर ‘आधुनिक सती’ म्हणू या; पण आपण मेल्यावर पुढे आपलं काय होईल, याची कल्पना तू केली होतीस की, नाही माहीत नाही. कुठलाही माणूस मेल्यावर त्याच्याविषयीची स्वाभाविक प्रतिक्रिया ही ‘चांगला माणूस होता’ अशीच (मोघम) असते! पण तू सर्वसामान्य नव्हतीस. या घटनेनंतर तुझ्या वाट्याला ‘नको असलेलं सेलिब्रिटीपण’ आलं होतं. तुझ्याकडे देश-विदेशातील प्रसारमाध्यमांचं लक्ष लागलेलं. जरा काही खुट्ट झालं की, सगळ्यांच्या नजरा तुझ्यावर खिळायच्या. तुझ्या मरणानं त्यात आता भरच पडली आहे. आता तुला ‘लिजंड’ (दंतकथा) म्हणून जिवंत ठेवलं जाईल. तुझ्याबद्दल वाटणारी हळहळ, सहानुभूती यांचा टक्का अजून वाढला आहे. काहींचा संतापही अनावर होत राहील; पण असे आवाज नेहमीच छोटे असतात. आता हेच पाहा ना, तू म्हणे कुठल्याही पुरुषाचा आवाज ऐकला, तरी घाबरून ओरडायचीस; पण आता तुझ्या नावानं विविध मागण्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांचीच संख्या अधिक आहे. याला काव्यगत न्यायच म्हणावं लागेल.
तुझं ज्याच्याशी लग्न ठरलं होतं, त्या डॉक्टरचं पुढे काय झालं, याबाबत कुणीच फारसं जाणून घेतलं नाही. त्यानं लग्न केलं का? तो नंतरही केईएममध्येच होता? तिथूनच निवृत्त झाला? तो या सगळ्या प्रकाराकडे कसं पाहतो? हे कुणालाच जाणून घ्यावंसं वाटलं नाही. तुझ्या घरच्यांनी तुझ्याकडे इतकी वर्षं पाठ फिरवली; पण परवा “आम्हाला अरुणाला हॉस्पिटलनं भेटू दिलं नाही,” असा आरोप मात्र जरूर केला. गेली ४२ वर्षं तुझी देखभाल केईएममधील ज्या डॉक्टरांनी-नर्सेसनी केली, त्यांच्याबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये थोडंफार छापून आलं. त्यांचा त्याग वाखाणण्यासारखाच आहे. इतक्या निरलस वृत्तीने त्यांनी तुझी सेवा केली, याबद्दल त्यांचं जरूर कौतुक केलं पाहिजे; पण ही निरलस वृत्ती उद्या इतर कुणा दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या सामान्य स्त्रीच्याबाबतीत दाखवली जाईल? जिला नातेवाईकांनी वाऱ्यावर सोडून दिलं आणि जिच्याकडे आपल्या आजारावर उपचारांसाठी पैसे नसतील अशी एखादी वृद्ध वा आजारी व्यक्ती केईएममध्ये आली, तर तिच्यावर तुझ्यासारखेच उपचार केले जातील? तिचीही तुझ्यासारखीच देखभाल केली जाईल? ती व्यक्ती केईएमची कर्मचारी नसेल, तिचं नावही अरुणा शानबाग नसेल; पण तिला मिळणाऱ्या सेवासुविधा तुझ्यासारख्याच
असतील? असं घडू शकेल? राज्य सरकारने तुला या हॉस्पिटलमधून हलवण्याचे एक-दोन वेळा प्रयत्न केले; पण ते तुझी देखभाल करणाऱ्या नर्सेसनी हाणून पाडले. तसाच प्रकार इतर एखाद्या जराजर्जर रुग्णाबाबत घडेल? केईएममधील कर्मचारी व व्यवस्थापन तिच्या पाठीशी इतक्याच ठामपणे उभं राहील? तुझ्या बलिदानातून केईएम नावाचं हे सरकारी हॉस्पिटल व तेथील डॉक्टर-नर्सेस या पुढच्या काळात समाजासमोर कोणता आदर्श उभा करतील? त्यांच्या त्यागाची, निरलस सेवेची परंपरा तुझ्यानंतरही चालूच राहील? ‘रुग्णसेवा हीच समाजसेवा’ असंच त्यांचं ब्रीद असेल? होईल? की तुला विशेष अपवाद ठरवून इतर गोरगरीब रुग्णांना उपचारांअभावी, देखभालाअभावी या हॉस्पिटलच्या दारात, नाहीतर खाटांवर तडफडावं लागेल? नर्सची वाट पाहत तासनतास वेदनांनी तळमळत राहावं लागेल? तुझ्या देखभालीबाबतीत जे केईएममध्ये घडलं, त्याची सातत्यानं पुनरावृत्ती घडत राहिली, तर तेच तुझं खरं स्मारक असेल, नाही का?
राहता राहिला समाजाचा मुद्दा. त्यातल्या अनेकांनी तुझ्याप्रती सोशल मीडियावर सद्भावना व्यक्त केल्याच आहेत. उरलेल्या अनेकांनी असं जाहीरपणे व्यक्त न होताही तुझ्या मृताम्यास शांती लाभो, असं मनोमन नक्कीच म्हटलं असेल. काहींच्या भावनांचा मात्र तुझ्या मृत्यूनं स्फोट झाला असेल. ते ‘आणखी अशा किती
अरुणा घडणार?’ असे संतप्त सवाल उपस्थित करतील. काहींना खजीलही वाटेल. हे सारे आपापल्या जागी बरोबरच आहेत. प्रश्न आहे तो, यापलीकडे जाण्याचा. मानसिकता बदलण्याचा. आपल्यामध्ये दडलेले सोहनलालचे
छोटे-मोठे अंश खुडून टाकण्यासाठी यांपैकी किती लोक पुढाकार घेतील? तसं घडणं हीच तुला खरी श्रद्धांजली ठरेल, नाही का?   

No comments:

Post a Comment