Sunday, January 24, 2016

‘तारतम्य’कार

डॉ. अरुण टिकेकर ‘लोकसत्ता’चे संपादक झाले, तेव्हा त्यांनी ‘नि:पक्ष, उदारमतवादी’ (त्यांचा मूळ शब्द- नॉन कॉन्फर्मिस्ट, लिबरल) असं आपलं धोरण जाहीर केलं होतं, आणि ते त्यांनी आपल्या एक दशकाहून अधिकच्या संपादकीय कारकिर्दीत कसोशीनं पाळलं. खरं म्हणजे महाराष्ट्रातील पत्रकारिता ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून ध्येयवादी राहिली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात देशहित मागे पडून समाजहित हा मराठी पत्रकारितेचा स्थायीभाव व्हायला हवा होता, पण स्वातंत्र्योत्तर काळातील बहुतांशी संपादक हे स्वातंत्र्यपूर्व काळातील ध्येयवादी पत्रकारितेला आदर्श मानणारे होते. किंबहुना तेव्हापासूनच कार्यरत असलेले होते. त्यात स्वतंत्र भारताची उभारणी, देशाची राज्यघटना, पं. नेहरू यांच्यासारखा आदर्शवादी पंतप्रधान आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठी वर्तमानपत्रांतील संपादकांपासून वरिष्ठ सहकाऱ्यांपर्यंत अनेकांची विविध राजकीय विचारधारांशी असलेली बांधीलकी, यामुळे सुरुवातीची १५-२० वर्षं ही भारलेली होती. त्या आदर्शवादाला पहिला धक्का बसला तो आणीबाणीने.
या आणीबाणीने भारतीय आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोतही बदलला. खरं म्हणजे साठचं दशक हे एकोणिसाव्या शतकाइतकं नसलं तरी साहित्य, राजकारण, समाजकारण, धर्मचिकित्सा, सामाजिक सुधारणा, यांच्यामुळे एका नव्या पुनरुत्थानाचं होऊ पाहत होतं. महाराष्ट्र राज्य साहित्यातल्या नवकथेपासून म्हैसाळमधील दलितमुक्तीच्या प्रयोगांपर्यंत अनेक सुधारणांचं आगार बनलं होतं.
हे एका अर्थाने समाजप्रबोधनाचं दुसरं पर्व होतं, पण पाहता पाहता दोन दशकांत साहित्यातल्या नवप्रवाहांपासून सामाजिक संस्थांच्या स्वरूपांपर्यंत सगळीकडे साचलेपण येत गेलं आणि समाजप्रबोधनाची, समाजहिताची भूमिका मागे पडत जाऊन ‘मी, माझं, मला’ हा विचार बळावत गेला. राजकीय नेतृत्वापासून साहित्यिक धुरिणांपर्यंत अनेक क्षेत्रांतील ‘लोकहितवादी लीडरशिप’ एकाच वेळी मागे पडत, निष्प्रभ होत गेली. सर्व क्षेत्रांतील मान्यवरांच्या विचारांचा, चिंतनाचा आणि मननाचा केंद्रबिंदू आक्रसत गेला.
 असं का झालं, हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे, त्यामुळे आता त्याच्या तपशिलात जायला नको.
पण ही उलटी गंगा थांबवण्याचे प्रयत्न झाले नाहीत असं नाही. उलट दलित पँथर, लघुनियतकालिकांची चळवळ, शरद जोशींची शेतकरी संघटना, सुरुवातीची शिवसेना, एक गाव एक पाणवठा, अशा अनेक लहान-मोठ्या चळवळींनी या उलट्या गंगेला चोख उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने या साऱ्या प्रयोगांचं यश हे मर्यादितच राहिलं. त्यामुळे विचार पिछाडीवर आणि मतलब आघाडीवर येत गेला.
राजकीय अभ्यासक सुहास पळशीकर यांनी आणीबाणी ही भारतातील सर्व संस्थात्मक पातळीवरील अपयशाचा परिपाक होती, असं विश्लेषण केलं आहे. पुरोगामी, सुधारणावादी आणि देशाचं नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्राची ७०-८० या दोन दशकांतील अवनती हीसुद्धा राज्यातील सर्व पातळ्यांवरील अपयशाचाच परिपाक म्हणावा लागेल.
ऐंशीचं दशक संपलं आणि नव्वदचं सुरू झालं. टिळकांनंतर गांधींचं नेतृत्व मान्य करायला महाराष्ट्रानं जवळपास नकारच दिला होता, पण काळाच्या दबावापुढे महाराष्ट्रातील टिळक प्रभूतींचं काही चाललं नाही. मात्र, या ‘विरोधासाठी विरोध’ पद्धतीच्या राजकारणात या धुरिणांनी आपलं आणि महाराष्ट्राचं नुकसान करून घेतलं. नव्वदच्या दशकात आलेल्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाबाबतही अशीच आडमुठी भूमिका घेऊन महाराष्ट्रातील साहित्यिकांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी महाराष्ट्राचं पुन्हा एकदा एक प्रकारे नुकसानच केलं.
जुलै १९९१ मध्ये तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनी आर्थिक उदारीकरणाची/जागतिकीकरणाची द्वाही फिरवणारं अर्थसंकल्पीय भाषण करून त्याच्या अंमलबजावणीला देशात सुरुवात केली. तेव्हा महाराष्ट्रात दोन महत्त्वाच्या घडामोडी घडत होत्या. अभिजनांचं नेतृत्व करणारे ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक गोविंदराव तळवलकर निवृत्त होण्याच्या मार्गावर होते आणि त्यांची अभिजात, ध्येयवादी पत्रकारिताही. तळवलकरांच्या अभिजन पत्रकारितेला शह देणारी माधव गडकरी यांची ‘लोकसत्ता’मधील नको इतकी लोकाभिमुख पत्रकारिताही काहीशी ओहोटीला लागली होती.
जागतिकीकारणाने देशासह महाराष्ट्रातही प्रचंड घुसळणीला सुरुवात केलेली असताना अनपेक्षितपणे डॉ. अरुण टिकेकर ‘लोकमान्य, लोकशक्ती’ असलेल्या ‘लोकसत्ता’चे सप्टेंबर १९९१मध्ये संपादक झाले आणि त्यांनी ‘लोकसत्ता’चा चेहरामोहरा बदलायला सुरुवात केली. (१९९५ मध्ये कुमार केतकर ‘मटा’चे संपादक झाले आणि या दोन दूरदृष्टीच्या संपादकांनी मराठी पत्रकारितेला कालानुरूप नवा साज चढवायला सुरुवात केली. केतकर डाव्या चळवळीतून आणि इंग्रजी पत्रकारितेतून आलेले आणि टिकेकर पत्रकारितेचा तीन पिढ्यांचा वारसा लाभलेले, पण पत्रकारितेऐवजी संशोधन-अध्यापन या क्षेत्रात रमलेले. त्यांच्यातील साम्य आणि फरक हाही स्वतंत्र लेखाचा विषय असल्याने तूर्त इथेच थांबू.) टिकेकरांनी ‘लोकसत्ता’च्या संपादकपदाची १० वर्षं पूर्ण केली, तेव्हा प्रदीप कर्णिक यांनी “लोकसत्ता’मधील अरुणोदय’ या शीर्षकाचा लेख एका दिवाळी अंकात लिहिला होता. (तत्पूर्वी शशिकांत सावंत यांनी १९९६ साली कुमार केतकरांविषयी ‘‘मटा’तील झंझावात’ असा लेख दुसऱ्या एका दिवाळी अंकात लिहिला होता.)⁠⁠⁠⁠ असो.
डिसेंबर १९९२पासून टिकेकरांनी ‘लोकसत्ता’च्या रविवार पुरवणीत ‘तारतम्य’ हे साप्ताहिक सदर लिहायला सुरुवात केली, त्यामागे एवढी मोठी पार्श्वभूमी होती. हे सदर सलग पाच वर्षं- म्हणजे डिसेंबर १९९७ पर्यंत चाललं. आधी काँग्रेस आणि १९९५ ते ९९ या काळातील युतीचं सरकार महाराष्ट्रात होतं. या दोन्ही पक्षांच्या ध्येयधोरणांची चिकित्सा करण्याबरोबरच टिकेकरांनी या सदरातून महाराष्ट्रातील सामाजिक-सांस्कृतिक आणि वाङ््मयीन घटना-घडामोडींचीही चिकित्सा करायला सुरुवात केली. हे सदर पाच भागांत पुस्तकरूपाने प्रकाशित झाल्यानंतर टिकेकरांनी त्यांना ‘उद्रेक-पर्वातील महाराष्ट्राच्या मानसिकतेची मीमांसा’, ‘अस्वस्थ-वर्षातील महाराष्ट्राचे चित्रण’, ‘सत्तांतर वर्षातील महाराष्ट्राची स्थिती’, ‘महाराष्ट्राच्या सांस्कृतिक घसरणीचे आणखी एक वर्ष’ आणि ‘संभ्रमावस्थेतील महाराष्ट्राचे आणखी एक वर्ष’ अशी उपशीर्षकं दिली. ‘नि:पक्ष, उदारमतवादी’ अशी स्वत:ची भूमिका सांगणाऱ्या टिकेकरांनी हे सदर लिहिताना न्या. रानडे यांच्या उदारमतवादाचा वारसा सांगत आणि ‘सुधारक’कार आगरकर यांचा आरसा दाखवत महाराष्ट्राची राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक आणि वाङ्मयीन चिकित्सा करताना ‘‘तारतम्य’पूर्ण विचार’ हे सूत्र समोर ठेवलं होतं. चांगल्या चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणायचं ते नेमकं कशाच्या आधारे, याची साधार मांडणी केली. कुठल्याही समाजामध्ये जेव्हा प्रचंड घुसळण होत असते, तो समाज संक्रमणकाळातून जात असतो, तेव्हा त्याला आधीच्या वारशाची पुर्नओळख करून द्यावी लागते. कारण सामाजिक-सार्वजनिक नीतीमत्ता ही नेहमी परंपरा, आदर्श आणि प्रेरणा यांच्या बळावर निर्माण होत असते. अनेक सुशिक्षित, विचारी महाराष्ट्रीयांच्या मनातलं किंबहुना त्यांना जे जाणवतं आहे, पण नीट शब्दांत सांगता येत नाही, ते टिकेकरांनी अचूकपणे सांगायला सुरुवात केली आणि तेही ‘तारतम्या’ने. त्यामुळे पुलं-सुनीता देशपांडे यांनी बंद केलेला ‘लोकसत्ता’ पुन्हा ‘तारतम्य’ वाचण्यासाठी सुरू केला. टिकेकरांची भाषा प्रगल्भ, सामान्य भाषेत सांगायचे तर, विद्वत्जड; पण तरीही त्यांचं ‘तारतम्य’ अल्पावधीतच लोकप्रिय झालं. कुठलाही पूर्वग्रह न बाळगता, चुकूनही अभिनिवेश न आणता, आक्रस्ताळेपणा न करता आणि शेरेबाजीच्या तर अनवधानानेही वाटेला न जाता, टिकेकरांनी शांत, संयमी पण परखडपणे रानडे-आगरकरी बुद्धिवाद प्रमाण मानत लेखन केलं. त्यामुळे ते ज्यांच्यावर टीका करत त्यांनाही त्यांची मांडणी फारशी खोडून काढता आली नाही. शिवाय नि:पक्ष आणि उदारमतवादामुळे कुठल्याच राजकीय विचारधारेची, पक्षाची, व्यक्ती-संघटनांची बाजू कधीही त्यांनी घेतली नाही. सच्च्या बुद्धिवाद्याला या गोष्टींचं पथ्य सांभाळावंच लागतं. टिकेकर त्यात तसूभरही कमी पडले नाहीत. त्यामुळे ‘तारतम्यकार’ अशी टिकेकरांची ओळख महाराष्ट्रातील सुशिक्षितांमध्ये निर्माण झाली. टिकेकरांनी एकप्रकारे या सदराच्या माध्यमातून ‘तारतम्यपूर्ण विचार’ कसा करावा याचा वस्तुपाठच घालून दिला.
पाच वर्षांनंतर ‘तारतम्य’ हे सदर टिकेकरांनी जाणीवपूर्वक बंद केलं. कारण आपल्या लेखनामध्ये तोचतोचपणा येऊ लागला, असं त्यांना वाटलं. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९९९मध्ये त्यांनी ‘सारांश’ हे नवं साप्ताहिक सदर ‘लोकरंग’मध्ये लिहायला सुरुवात केली. साप्ताहिक स्वरूपात प्रकाशित झालेल्या या सदराचं २००१मध्ये पुस्तक निघालं, तेव्हा त्याला टिकेकरांनी उपशीर्षक दिलं - ‘समकालीन समाजाच्या संस्कृतीविषयी सात निबंध’. आणि सर्व लेखांची सात दीर्घ निबंधांमध्ये विभागणी करून त्यांनी हे सदर किती अभ्यासपूर्वक लिहिलं होतं, याची जाणीव करून दिली. ‘नेतृत्वाचे प्रशिक्षण’, ‘इतिहासाचे ओझे’, ‘साहित्याचे समाजशास्त्र’, ‘अभिव्यक्ती-स्वातंत्र्याचे राजकारण’, ‘संस्कृतीचा अपकर्ष’, ‘जीवनशैलीचा अभाव’ आणि ‘समाजमनाचे अस्वास्थ्य’ या सात निबंधांतून टिकेकरांनी महाराष्ट्राच्या अवनतीची कारणपरंपरा विशद केली. २००० हे विसाव्या शतकातलं शेवटचं वर्ष. तेव्हा या वर्षात टिकेकरांनी वर्षभर ‘कालमीमांसा’ या नावानं पुन्हा साप्ताहिक सदर लिहून ‘गेल्या दोनशे वर्षांतील सामाजिक बदलांची गती, त्या बदलांचे गतिरोधक ठरलेल्या प्रवृत्ती, त्या प्रवृत्ती बळावण्याची कारणं, त्या कारणांमागील राजकीय व अन्य प्रकारची गुंतागुंत’ यांची मीमांसा केली. म्हणजे ‘सारांश’ आणि ‘कालमीमांसा’ ही दोन्ही सदरं परस्परपूरक होती. त्यात त्यांनी महाराष्ट्रीय समाजाची सर्वांगीण चिकित्सा केली, एकोणिसाव्या शतकाच्या कॅनव्हॉसवर; तर आधीच्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक आणि वाङ्मयीन या क्षेत्रांची परखड चिकित्सा केली. म्हणजे विश्लेषण, कारणपरंपरा आणि उपाययोजनांसाठी आवश्यक असलेली पार्श्वभूमी असा टिकेकरांच्या ‘तारतम्य’, ‘सारांश’ आणि ‘कालमीमांसा’ या सदरांचा गाभा आणि आवाका आहे. काही वर्षांनी निवडक ‘तारतम्य’ व निवडक अग्रलेख यांचे संग्रह ‘अस्वस्थ महाराष्ट्र- भाग १ व २’ या नावाने प्रकाशित झाले. नुकत्याच प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘कालान्तर’ या पुस्तकाचं उपशीर्षक आहे -‘सामाजिक आणि सांस्कृतिक पडझडीचा आलेख’.
एकोणिसावं शतक हे महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या आणि सर्व क्षेत्रांतील सुधारणांचं शतक होतं. त्यामुळे आजच्या कुठल्याही प्रश्नाकडे पाहण्यासाठी, त्याचं यथायोग्य आकलन करून घेण्यासाठी त्या शतकातल्या परंपरा, आदर्श आणि प्रेरणांशिवाय पर्याय नव्हता. स्वातंत्र्यानंतर अवघ्या दोनेक दशकांतच महाराष्ट्राची वैचारिक आघाडीवर आणि सर्व क्षेत्रांत पिछेहाट का होते आहे, याची साधार मांडणी टिकेकर यांनी ‘तारतम्य’, ‘सारांश’ आणि ‘कालमीमांसा’मधून केली. हे करतानाच त्यांनी आधीच्या संकल्पनांचीही पुनर्मांडणी केली. पण त्याकडे अजून कुणाचंच लक्ष गेलेलं नाही अन तोही स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
या सर्व पुस्तकांतून टिकेकरांनी काय सांगितलं?
... तर ‘तारतम्यपूर्ण विचार’ म्हणजे काय, तो कसा करायचा असतो आणि त्यासाठीच्या परंपरा, आदर्श आणि प्रेरणा काय असाव्या लागतात!  

Wednesday, January 20, 2016

पवारांचा हात?!?

अपेक्षेप्रमाणे पिंपरी-चिंचवड येथील ८९वे साहित्यसंमेलन अनेक ऐतिहासिक विक्रम करणारे ठरले आहे. संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे १३४ पानांचे अध्यक्षीय भाषण शेवटपर्यंत मुद्रित स्वरूपात उपलब्ध होऊ शकले नाही आणि त्यांनी बहुधा ते भाषण बाजूला ठेवत त्यांना दिलेल्या १५ मिनिटांच्या वेळात उत्स्फूर्त भाषण करून आपल्याकडे आवेश, आरोळ्या आणि आजवर इतरांनी सांगितलेले विचारच पुन्हा नव्याने सांगण्याची हातोटी यापलीकडे काहीही नाही, हे नेहमीप्रमाणे पुन्हा सिद्ध केले. त्यामुळे त्यांच्या भाषणाची फारशी दखल न घेतलेलीच बरी. छापील भाषणाचा यथावकाश परामर्श घेता येईलच. असो. सबनीस यांच्या नावे या निमित्ताने अजून एका पुस्तकाची भर पडली, हेही नसे थोडके. तशीच भर शरद पवार यांच्या नावेही पडली आहे. त्यांच्याही नावे उदघाटक वा स्वागताध्यक्ष या नात्याने साहित्यसंमेलनाच्या व्यासपीठावर सर्वाधिक वेळा हजेरी लावण्याचा विक्रम जमा झाला आहे. पवार निष्णात राजकारणी असल्याने ते कुठल्याही साहित्याच्या व्यासपीठावर आले की, साहित्यिकांना चार खडे बोल सुनावत तुम्ही आमच्यासारखे होऊ नका, असा उपदेश करतात. तसा त्यांनी यावेळीही केला. त्याचवेळी सबनीस यांच्या निवडीमागे माझा काही हात नाही, ते संमेलनाध्यक्ष झाल्यावरच माझी त्यांची भेट झाली, असा खुलासाही केला. पण तो कुणालाही पटणारा नाही. कारण श्रीपाल सबनीस, अरुण जाखडे, शरणकुमार लिंबाळे, विठ्ठल वाघ, चंद्रकुमार नलगे, रवींद्र शोभणे आणि श्रीनिवास वारुंजीकर यांनी या वर्षीच्या संमेलनाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले होते. नलगे-शोभणे यांनी नंतर आपली उमेदवारी मागे घेतली. कारण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुखपत्राचे विद्यमान संपादकाने फोन करून आता तुम्ही उमेदवारी मागे घेतली तर पुढच्या वर्षी राष्ट्वादी काँग्रेस तुम्हाला पाठिंबा देईल असे सांगितले होते. असेच फोन या संपादकांनी इतर उमेदवारांनाही केले. आणि त्या उमेदवारांच्या जवळच्या लोकांनाही केले. या संपादकांच्या म्हणण्यानुसार, शरद पवार यांनी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू पी. डी. पाटील यांना फोन करून स्वागत समितीची ८५ मते सबनीस यांच्या पारड्यात टाकायला सांगितली आहेत. शिवाय याच संपादकांनी सबनीस यांच्या घरी जाऊन पवारसाहेब आणि राष्ट्रवादीची सगळी ताकद आपल्या पाठीशी आहे, असे सांगितले. तेथून साहित्यक्षेत्रातल्या अनेकांना फोन केले. आता हे सर्व पवारांनी सांगितले नव्हते, ते त्या संपादकांनी पवारांचे नाव परस्पर वापरून केले, असे पवार जाहीर करतील का? नाहीतर त्यांच्याच शब्दांचा आधार घेत म्हणायचे तर ‘महाराष्ट्रात कुठेही, काहीही झाले तरी त्यात पवारांचा हात आहे, असे म्हणण्याची जी पद्धतच आहे’, ती अगदीच काही निराधार नाही. दाऊद इब्राहिमच्या बेनामी संपत्तीत वा किल्लारीच्या भूकंपात पवारांचा हात नसेलही, नसावाही, यावर त्यांच्या पक्षाबाहेरची आणि महाराष्ट्रातीलही कितीतरी माणसे डोळे झाकून विश्वास ठेवतील. पण अलीकडच्या काळात साहित्यसंस्था-नाट्यसंस्था यांच्या निवडणुकांमध्ये पवारांचा हात नाही वा त्यांच्या माणसांचा व साहित्याचा काडीइतकाही संबंध नसतानाही ती या संस्थांवर निवडून येत नाहीत हे पवार नाकारू शकणार नाहीत. पण त्यांनी सराईत राजकारण्यासारखे ‘हात झटकले’ तरी ‘कानून’सारखे त्यांचे ‘हात’ किती ‘लंबे’ आहेत, हे महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याही महत्त्वाच्या कार्यक्रमाला, उपक्रमाला, योजनेला पवारांचा ‘हात’भार लागल्याशिवाय ती यशस्वी होत नाही, अशी अनेकांची श्रद्धा आहे आणि ती अंधश्रद्धा असल्याचे अजून तरी पवारांनी सिद्ध करून दाखवलेले नाही. असो. या संमेलनाच्या निमित्ताने तर पवारांनी साहित्य महामंडळालाही संमेलनाध्यक्ष निवडणुकीचा अजेंडा ठरवून दिला आहे. संमेलनाध्यक्षांची निवड ही पाच माजी संमेलनाध्यक्षांनी करावी असे पवारांनी म्हटले आहे आणि त्याची सुरुवात पुढच्या संमेलनापासून करावी हेही सांगितले आहे. आता महामंडळाने पवारांचे ऐकले, तर उघडपणे त्यांचा ‘हात’ स्पष्ट होईल! पण चाणाक्ष लोकांच्या लक्षात आलेच असेल की, पवार असे सांगतात तेव्हा त्यांना नेमके त्याच्या उलट म्हणायचे असते. त्यामुळे महामंडळ काय करते ते कळेलच. २०१२चे नाट्यसंमेलन आणि २०१४चे साहित्यसंमेलन ही दोन्ही बारामतीमध्ये झाली होती. त्यातला ‘हात’भार तर पवारांना नाकारता येणार नाही. त्यावेळी मोहन आगाशे नाट्यसंमेलनाध्यक्ष आणि फ. मुं. शिंदे साहित्यसंमेलनाध्यक्ष हे केवळ ‘पवारां’मुळेच होऊ शकले, हेही उघड गुपित आहे. त्यामुळे त्यासाठी पवारांनी कुठलाही खुलासा केला तरी वा नाही केला तरी पवारांच्या ‘हस्तकौशल्या’चे सामर्थ्य महाराष्ट्र पुरेपूर जाणून आहे. तब्बल २८ वर्षांपूर्वी पुण्यात १६-१७ जानेवारीलाच सामाजिक परिषदेची शताब्दी साजरी करण्यात आली. त्यावेळी काहींनी रीतीप्रमाणे ‘राजकारणाचे जोडे बाहेर ठेवा’ वगैरे सांगून पाहिले. त्यावर या परिषदेचे उदघाटन करताना समाजवादी नेते नानासाहेब गोरे म्हणाले होते, “राजकारणाचे जोडे कसले बाहेर ठेवता? आम्ही चाळीस चाळीस वर्षे राजकारणात आहोत, ते काय मूर्ख म्हणून आहोत? महाराष्ट्रात सर्वात मोठा समाज कोणता, तर मराठ्यांचा. मराठ्यांच्यात सर्वात महत्त्वाचा माणूस कोण, तर शरद पवार. त्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती, तर राजकारण. तेच बाजूला ठेवल्यावर समाजाची कसली सुधारणा होणार? अशी भूमिका घेणाऱ्यांच्या हातून महाराष्ट्रातील समाजाची काहीही सुधारणा होणार नाही.” गोरे म्हणतात, ते आजही तितकेच खरे आहे. पवारांशिवाय महाराष्ट्रात काहीही होत नाही, होऊ शकत नाही. पवार संमेलनाला येणार म्हटल्यावर शेवटच्या क्षणापर्यंत ताकास तूर न लागू देणारे मुख्यमंत्री फडणवीसही तोंडदेखले का होईना, आलेच. पवार येणार म्हटल्यावर अनेकांनी सबनीस, महामंडळ आणि संमेलन यांच्यावर घातलेला बहिष्कार मागे घेत संमेलनाला हजेरी लावली. पवार येणार म्हटल्यावर या संमेलनाचे काही खरे नाही, असे जे कालपर्यंत म्हणत होते, ते आता या संमेलनाच्या ‘न भूतो न भविष्यती’पणाची चर्चा करू लागले आहेत. पवारांच्या दृश्य-अदृश्य हातांचा महिमा हा असा आहे! आणि तरीही पवारांना मात्र त्याचे श्रेय अजिबात नको असते, हीसुद्धा त्यांच्याच राजकारणाची थोरवी आहे!!!


Thursday, January 14, 2016

आत्ममग्न, आत्मलुब्ध आणि लबाड प्रक्षुब्धांचे संमेलन

पिंपरी-चिंचवड येथे उद्यापासून सुरू होणारे ८९वे साहित्य संमेलन हे  आतापासूनच आत्ममग्न, आत्मलुब्ध, लबाडांची मांदियाळी बनले आहे. संमेलनाचे नियोजित आत्ममग्न अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, साहित्य महामंडळाचे कोडगे प्रतिनिधी, आत्मलुब्ध आयोजक डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू पी. डी. पाटील, संमेलन निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे सांगत सबनीस यांची जुनी गैरप्रकारांची प्रकरणे उकरून काढणारे संधिसाधू, संमेलनाच्या आडून आपला सांस्कृतिक राजकारणाचा घातक अजेंडा पुढे रेटणारे राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप हे राजकीय पक्ष आणि सबनीसांनी मोदींविषयी केलेल्या विधानावरून राईचा पर्वत करत विनाकारण भुई धोपटण्याचा प्रयत्न करणारे मोदीभक्त, यांनी संयुक्तपणे या संमेलनाचे तीन तेरा वाजवण्याचा विडा उचलला आहे असे दिसते. न्या. रानडे यांनी १८७८ साली सुरू केलेल्या साहित्य संमेलनाची आजची ही दुरवस्था महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक-साहित्यिक पातळीवरील तोतयागिरीच्या उच्छादाचे एक टोक म्हणावे लागेल. हा उन्माद उद्या प्रत्यक्ष संमेलनाच्या वेळी कुठल्या थराला जाईल, एवढाच काय तो आता प्रश्न राहिला आहे. या उन्मादी उच्छादाचे खापर सध्या तरी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या माथी फोडण्याचा प्रकार होत असला आणि त्याला तेही काही प्रमाणात कारणीभूत असले तरी, याला वरील सर्व अपप्रवृत्ती कारणीभूत आहेत. सबनीसांनी आपल्या वावदूक विधानांनी सुरुवातीपासूनच वादांचा धुरळा उडवून दिला असला तरी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या वर्षीच्या निवडणुकीत प्रचंड गैरप्रकार केल्याचे आरोप होत आहेत, त्याचे काय? त्याविषयी कालच मुंबईतील गिरगाव पोलीस ठाण्यात विश्वास पाटील, राजन खान, भारत सासणे, महेश केळुस्कर, अशोक मुळे, मुरलीधर साठे यांनी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस, महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य, महामंडळाचे निर्वाचन अधिकारी अॅड. प्रमोद आडकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. गेले काही दिवस मोदींविषयीच्या विधानांवरून भाजपेयींनी ज्यांचा अभिमन्यू करायचा प्रयत्न केला आहे, त्या सबनीसांनी पाच जानेवारी रोजी मोदींना लिहिलेले पत्र परवा पत्रकार परिषदेत वाचून दाखवून दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे खरेतर मोदीभक्तांनी विजयोत्सव साजरा करायला हवा होता, पण त्यांनी हा ‘माफीनामा’ नसल्याचा शंख केला आहे. या संमेलनासाठी प्रचंड पैसा खर्च करून त्यानिमित्ताने छबी उजळवण्याच्या मागे लागलेले डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू पी. डी. पाटील यांचे कान राष्ट्रवादी काँग्रेसचे सेकंड सुप्रीमो अजित पवार यांनी उपटल्याने त्यांनी सबनीसांचे नाक धरून त्यांच्यावर दबाव आणला. परिणामी ‘सामर्थ्य आणि मर्यादांवर आधारित संवाद-संघर्षवादी सेक्युलर भूमिका’ अशा शीर्षकाचे ११० पानी अध्यक्षीय भारुड वाचण्याचा ऐतिहासिक पराक्रम करू पाहणाऱ्या सबनीसांनी ‘झाले गेले ते गंगेला मिळाले, आता उदार अंत:करणाने मराठी रसिकांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी एकत्र यावे’ असे मानभावी आवाहन केले आहे. त्याचवेळी ‘आम्ही मागील अनेक महिन्यांपासून जी रात्रंदिवस मेहनत करत आहोत ती आता सत्कारणी लागेल’ अशी धूर्त प्रतिक्रिया पी. डी. पाटील यांनी दिली आहे. तर महामंडळाच्या हिकमती अध्यक्षा माधवी वैद्य यांनी ‘संमेलन विर्विघ्नपणे पार पडणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. इतर विषयावर मी संमेलनानंतर बोलेन’ असा इशारा दिला आहे. हीच प्रतिक्रिया सबनीस यांचे बोलविते धनी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही आहे, असे त्यांच्या पडद्यामागच्या चालींवर दिसून येते. सबनीसांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर मोदीभक्तांची उबळ निदान काही प्रमाणात तरी शमायला हरकत नव्हती. शेवटच्या क्षणी का होईना, सबनीसांनी त्यांचा विरोध नक्कीच दुबळा केला आहे. मात्र सबनीसांच्या चारित्र्याचे भांडवल करून त्यांना आणि महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना न्यायालयात खेचण्याची शर्यत अजूनही काही आत्मसंतुष्टांना लागलेली आहे. त्यात आता काही संधिसाधू मान्यवरांचीही भर पडली आहे. त्यांनी आपले प्रयत्न केवळ संमेलन चालू असेपर्यंतच सुरू न ठेवता त्यानंतरही चालू ठेवावेत आणि साहित्य महामंडळातल्या मुखंडांच्या मुसक्या आवळाव्यात. कारण यंदा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जो सार्वत्रिक तोतयागिरीचा उच्छाद पाहायला मिळतो आहे, त्यातून मराठीतल्या साहित्यिकांविषयीची उरलीसुरली सहानुभूतीही सामान्य रसिकांमधून नष्ट होण्याची साधार भीती आहे. सध्या देशात आणि राज्यात सत्तेच्या कृपाशिर्वादाने जो चिथावणीखोर उन्मादाचा ज्वर शिगेला पोहोचला आहे, त्यात आत्ममग्न, आत्मलुब्ध आणि लबाड प्रक्षुब्धांचीच मांदियाळी एकत्र आली आहे. साराच कळप संधिसाधूंचा आणि मुजोरांचा जमला की, त्यातून निवड करता येत नाही. या कळपातल्या कुणाविषयीही सुहानुभूती बाळगायचे कारण नाही. पण लबाड मतलबांसाठी इतरांना वेढू पाहणाऱ्या सुमारांची सद्दी हटवली नाही, तर सबनीस बरे होते, असे म्हणायची वेळ भविष्यात येईल.

Sunday, January 10, 2016

नवे ‘यादव’, नवे ‘वार’करी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी एकेरी स्वरूपाची भाषा वापरून वादग्रस्त विधाने केल्यामुळे गेले काही दिवस ८९व्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस वादाच्या चक्रव्यूहात सापडले आहेत. भाजपेयींसाठी मोदी हे प्रात:स्मरणीय दैवत असल्यामुळे त्यांनी सबनीस यांच्यावर रोज वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला आहे, दुसरीकडे सबनीस यांना जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. सबनीस यांनी निखालसपणे केलेल्या औचित्यभंगाबद्दल साधी दिलगिरीही व्यक्त न करता अडेलतट्टूपणाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे असहिष्णुतेत मुळातच अव्वल असलेल्या भाजपेयींना आणखी चेव आला आहे. सबनीसांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यापासून ‘माफी मागितल्याशिवाय त्यांना संमेलनाच्या व्यासपीठाची पायरीही चढू देणार नाही’, अशी दर्पोक्ती करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. संमेलनाध्यपदी निवड झाल्यापासून सबनीस यांनी केलेली बहुतांश विधाने ही बेताल आणि बेमुर्वतखोर म्हणावी अशीच आहेत. त्यामुळे त्यांची बाजू घेण्याचे काहीच कारण नाही. शिवाय कालच्या ‘मी मराठी Live’मधील बातमीनुसार, साहित्य संमेलनाच्या निवडणूक प्रक्रियेमध्येही गैरप्रकार झाले असल्याचे दिसते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार हे सबनीसांचा बोलविता धनी आहेत, यावर आम्ही १० नोव्हेंबर रोजी ‘पवार-पुरस्कृत संमेलनाध्यक्ष’ या अग्रलेखातून लिहिले होतेच. पवारांच्या पाठिंब्यामुळेच सबनीस साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले, ही वस्तुस्थिती आहे. दोन वर्षांपूर्वी पवारांनी असाच ‘सांस्कृतिक इंजिनीअरिंग’चा प्रयोग करून फ. मुं. शिंदे यांच्या गळ्यात संमेलनाध्यक्षपदाची माळ घातली होती. अलीकडच्या काळात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही पवारांनी केलेले अनेक प्रयोग अंगलट आले आहेत. त्यातून बोध न घेता पवारांनी यंदाच्या संमेलनात पुन्हा रस घेतला आहे. गेल्या वर्षी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून निर्माण झालेल्या कलुषित वातावरणावर उतारा म्हणून पवारांनी पुन्हा ‘सांस्कृतिक इंजिनीअरिंग’चा प्रयोग करून सबनीस यांना निवडून आणल्याचे सांगितले जाते. पण ‘लोक माझे सांगाती’ असे उच्चरवाने सांगणाऱ्या आणि सामान्य खेडेगावातल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचीही जन्मकुंडली माहीत असलेल्या पवारांचा सबनीसांविषयीचा अंदाज सपशेल चुकलेला दिसतो. सबनीसांच्या ब्राह्मण असण्याला प्राधान्य देऊन त्यांचे साहित्यिक योगदान लक्षात न घेणाऱ्या पवारांची निवड किती चुकीची होती, हे सबनीसांनी गेल्या काही दिवसांत सिद्ध करून दाखवले आहे. संमेलनाध्यक्षासारखे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अॅम्बेसेडरचे पद सबनीसांना वर्षभरासाठी मिळाले आहे. पण त्या उच्चासनाचे गांभीर्य समजण्याइतकी शहाणीव त्यांच्याकडे नसल्याने त्यांनी त्या उच्चासनाची उंची खुजी केली आहे. त्यामुळे सध्या देशभर उद्दाम झालेल्या भाजपेयींचे चांगलेच फावले आहे. महाराष्ट्रातील जनमानस शहाणे होण्याऐवजी दिवसेंदिवस कलुषित होत चालले आहे. त्याचा सध्या देशात आणि राज्यात सत्तेत असलेले भाजप सरकार जोरकसपणे फायदा करून घेत आहे. राज्यात सामाजिक-जातीय-राजकीय आणि सांस्कृतिक ध्रुवीकरणाला सुगीचे दिवस आले आहेत. भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन राजकीय पक्षांच्या कृपाशीर्वादाने अनेक व्यक्ती-संस्था-संघटना एकमेकांविरुद्ध दंड थोपटत मुजोर प्रवृत्तीचे दर्शन घडवत आहेत. सबनीसांच्या निमित्ताने सध्या महाराष्ट्रात जे काही भयकारी चित्र आकाराला येत आहे, ते पाहून, २००९ सालच्या साहित्य संमेलनाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तेव्हाचे संमेलनाध्यक्ष डॉ. आनंद यादव यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीवरून वाद उकरून काढून अनेक व्यक्ती-संस्था-संघटनांनी असेच आपापले उखळ पांढरे करून घेतले होते. त्यात यादवांचा बळी गेला. त्यांना संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा तुकोबांच्या चरणी वाहावा लागला आणि त्यांच्या शिवाय त्या वर्षीचे साहित्य संमेलन महामंडळाने पार पाडले. तेव्हाच्या आततायी वारकरी संघटनांची जागा आता त्यांच्याहून आततायी भाजपेयींनी घेतली आहे आणि आनंद यादवांइतक्याच बेजबादार भूमिकेत आता सबनीस आहेत. नेपथ्याला असलेले साहित्य महामंडळही त्या वेळेप्रमाणेच बोटचेप्या लाचारीची भूमिका पुन्हा पार पाडताना दिसत आहे. हा सारा प्रकार कमालीचा निषेधार्ह आहे. सबनीसांविषयी आधी कोणाला फारशी माहिती नव्हती आणि आता मराठी साहित्यिकांमध्ये किंवा जनमानसामध्ये थोडीही सहानुभूती नसल्याचे दिसते आहेच. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने म्हणूनही त्यांचे समर्थन कोणी करू नये असा भीमपराक्रम त्यांनी करून ठेवला आहे. सबनीसांच्या धमक्यांविषयी राष्ट्रवादी काँग्रेसने चिंता व्यक्त केली असली तरी, उद्या सबनीसांचा ‘आनंद यादव’ केला गेला, तर साहित्य संमेलनाची प्रतिष्ठा पुन्हा एकदा मातीमोल करण्याचे पातक त्यांच्याच माथी येणार आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.

Tuesday, January 5, 2016

झपाटलेला झंझावात

शरद जोशी हे एक वादळ होते. झपाटून टाकणारा झंझावात होता. त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये एक लढाऊ ऊर्जा निर्माण केली. स्वित्झर्लंडमधील सुखासीन आयुष्याची हमी देणारी मोठ्या पदाची नोकरी सोडून जोशी कोरडवाहू शेती करण्यासाठी १९७७ मध्ये भारतात परतले. सुरुवातीचे दोनेक प्रयोग फसल्यानंतर त्यांनी शेती का परवडत नाही, याचा शोध घेतला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र हे कंगालांचे अर्थशास्त्र आहे. शासन, धनदांडगे शेतकऱ्याची लूट करत आहेत. मग त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची एकजूट करण्यासाठी १९८९मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना केली. आणीबाणीनंतरचा काळ त्यांच्या प्रयत्नांना पूरक ठरला. ऐंशीच्या दशकात त्यांनी केवळ महाराष्ट्रच नाही, तर अख्खा देश शेतकरी आंदोलनाने दणाणून सोडला होता. १९८० ते ९५ ही पंधरा वर्षे शेतकरी आंदोलनाचा सुवर्णकाळ होता. पत्रकार, मध्यमवर्गीय, राज्यकर्ते, प्रशासक, अर्थशास्त्रज्ञ अशा सर्वांनाच शेतीचे अर्थशास्त्र, शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यावरचे उपाय समजावून सांगितले. शेतकऱ्यांनाही शेतीचा आतबट्ट्याचा व्यवहार समजावून दिला. त्यातून शेतकऱ्यांचा एल्गार चेतवून राष्ट्रव्यापी चेतना निर्माण झाली. पाहता पाहता लाखो शेतकरी त्यांच्याशी जोडले गेले. त्यांनी पोलिसांच्या लाठ्याकाठ्या अंगावर झेलल्या. मग तो १९८६ मध्ये चांदवडचा अभूतपूर्व महिला मेळावा असो की, लासलगावचे कांदा आंदोलन असो. त्यांनी कांद्याच्या भावासाठी चाकणला बाजर यशस्वीरित्या बंद करून दाखवला. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव-निफाड भागात कांदा आणि ऊस या पिकांच्या भावासाठी मोठे लढे उभारले, आंदोलने केली, रास्ता रोको-रेल रोको केले. मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग अनेक दिवस रोखून धरला. शरद जोशींनी नेमकी हेरून शेतकरी समाजातील माणसे उभी केली, त्यांना घडवण्याचे काम केले. खेड्यापाड्यातल्या माणसांना घेऊन चळवळ उभी करणे हे सोपे काम नसते. शेतकी, शेतकरी, शेतमालाचा भाव या प्रश्नांना ऐरणीवर आणून त्याची राज्यकर्त्यांना दखल घ्यायला लावली. शेती हा व्यवसाय आहे, जीवनपद्धती नाही, असे क्रांतिकारी वाटणारे पण थेट वास्तवाला भिडणारे विचार मांडून जोशींनी लढे उभारले. राजकीय पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यात आणि त्यांच्या सरकारी भूमिकांमध्ये या प्रश्नांना स्थान मिळाले. राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांचे राहणीमान, जीवन, शेतीचा उत्पादन खर्च पोहोचवण्याचे ऐतिहासिक काम जोशी यांनी केले. ‘इंडिया’ आणि ‘भारत’ या संकल्पनेची मांडणी केली. त्यांची शेतीप्रश्नाची मांडणी क्रांतिकारी होती आणि आंदोलनाची व्यूहरचना अतिशय अभिनव होती. शेतकऱ्याच्या शोषणावरच भांडवलाची निर्मिती करणे हे सरकारचे अधिकृत धोरण आहे, हा नवा विचार त्यांनी मांडला. केवळ वैचारिक मांडणी, आर्थिक विश्लेषण करून जोशी थांबले नाहीत. त्याला त्यांनी संघटनेची, व्यूहात्मक आंदोलनाची जोड दिली. लाख लाख शेतकऱ्यांच्या सभा आणि आंदोलने त्यातून उभी राहिली. उत्पादन खर्चावर आधारित भावासाठी अशी आंदोलने तोवर महाराष्ट्राने पाहिली नव्हती. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर ग्रामीण भागात सर्वात मोठी कुठली चळवळ उभी राहिली असेल तर ती शरद जोशींच्या शेतकऱ्यांची. जोशी यांचे वक्तृत्व, भाषा, व्यासंग, प्रेरणा विविधांगी होती. त्यांचे इंग्रजी-मराठी भाषेवरचे प्रभुत्व भुरळ घालणारे होते. जागतिक अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास असलेल्या आणि नंतर भारतातील शेतीच्या अर्थशास्त्राची सैद्धांतिक मांडणी करणाऱ्या जोशींचे नाव त्यांच्या आंदोलनाने केवळ देशातच नाही, तर जगभरात पोहोचवले. भारतीय शेतीच्या दारिद्र्याचे नवे आणि वास्तवाधारित विश्लेषण महात्मा फुले यांच्यानंतर आक्रमकपणे मांडण्याचे काम कोणी केले असेल तर ते जोशी यांनीच. ‘मी मतं मागायला आलो तर जोड्याने मारा’ म्हणणाऱ्या जोशी यांनी १९९४ मध्ये ‘स्वतंत्र भारत’ या नावाने पक्ष काढला. निवडणुका लढवल्या. सुरुवातीची दहा वर्षे ज्या काँग्रेसचे ते तिखट टीकाकार होते, तिच्याच कह्यात ते गेले. नंतर तर त्यांची गाडी भाजपच्याही सावलीतही थांबली. त्यांची राजकीय तटस्थता खिळखिळी झाली, तसे वैचारिक बांधिलकीलाही तडे गेले. पण, थेट शेतकऱ्याशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेणे, हा जोशी यांचा विशेष होता. त्यात त्यांनी कधीही मध्यस्थ निर्माण होऊ दिले नाहीत. ते जोशी आणि त्यांच्या संघटनेचे सर्वात मोठे यश होते आणि चारित्र्यही. या चारित्र्याची जपणूक संघटनेच्या काही नेत्यांनी केली नाही, तशी जोशींनीही केली नाही. त्यामुळे ९०नंतर ती निष्प्रभ होत गेली. संघटना अपयशी ठरली असली तरी शेतीच्या दारिद्र्याचे त्यांनी मांडलेले वास्तव, शेतीच्या अवनीतीची त्यांनी केलेली कारणमीमांसा आणि त्यावर सुचवलेल्या उपाययोजना यांचे महत्त्व मात्र कधीही कमी झाले नाही. शेती आहे, तोवर ते कमी होणारही नाही, हीच मिळकत घेऊन हा योद्धा अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहे.

महाराष्ट्राचे सोमनाथ चटर्जी

म. गांधी यांनी तत्त्वहीन राजकारण, नीतिमत्तारहित व्यापार, कष्टाविना संपत्ती, चारित्र्याविना शिक्षण, मानवतेविना विज्ञान, विवेकहीन सुखोपभोग आणि त्यागरहित भक्ती अशी सात ‘सामाजिक पापकर्मे’ सांगितली आहेत. या पापकर्मांच्या विरोधात लढण्याचे काम कम्युनिस्ट पक्षातील सगळ्या संस्था-संघटना आणि नेते करतात, हे भारतातील कम्युनिस्टांच्या कार्यपद्धतीवरून कुणालाही सहजपणे कळेल. जन्माने बंगाली आणि कर्माने नागपुरी असलेले कॉ. अर्धेंदू भूषण बर्धन हेही त्यापैकीच एक बिनीचे शिलेदार होते. ‘या क्रियावान सा पण्डिता’ असे एक संस्कृतवचन आहे. बर्धन यांचे सबंध आयुष्य या विधानाचा मूर्तिमंत आविष्कार होता. त्यांचा जन्म प. बंगालमधील २५ सप्टेंबर १९२५ चा. पण सरकारी नोकरीत असलेल्या वडलांची चाळीसच्या दशकात नागपूरला बदली झाली आणि नागपूर हीच बर्धन यांची कर्मभूमी झाली. वयाच्या पंधराव्या वर्षी ते कम्युनिस्ट पक्षात सामील झाले. ते साल होते १९३९ आणि बर्धन यांचे तेव्हा वय होते पंधरा. विशेष म्हणजे तेव्हा भारतात कम्युनिस्ट पक्षावर बंदी होती. त्यामुळे पक्षाच्या नावाने उघडपणे कोणतीही गोष्ट करता येत नव्हती. त्यात वडील सरकारी नोकरीत. त्यामुळे पहिला संघर्ष घरातच उभा राहिला. बर्धन यांनी सतराव्या वर्षी घर सोडले आणि ते कम्युनिस्ट पक्षासाठी ‘फुलटायमर’ म्हणून काम करू लागले. अनेक छोट्या-मोठ्या आंदोलनांत सहभागी झाल्यामुळे बर्धन यांना सतत अटक करून तुरुंगात डांबले जाई. पण दोन-तीन महिन्यांत त्यांची सुटका केली जाई. याच काळात बर्धन प्रभावी वक्ता आणि कुशल संघटक म्हणून पुढे आले. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेला दक्षिणामूर्ती चौक हा एकेकाळी आरएसएसविरोधी लोकांची वस्ती म्हणून ओळखला जायचा. कारण या भागात हिंदू महासभेचे लोक जास्त प्रमाणात होते. ते गणेशोत्सवात व्याख्याने आयोजित करायचे. त्यात बर्धन यांना नेहमी बोलावले जाई. त्यात बर्धन संघावर सडकून टीका करत. १९५१ साली कम्युनिस्ट पक्षाला कायदेशीर मान्यता मिळाली आणि बर्धन यांच्या राजकारणाला उभारी आली. १९५७च्या निवडणुकीत बर्धन नागपुरातून महाराष्ट्राच्या विधानसभेवर अपक्ष आमदार म्हणून आले. तेव्हा त्यांनी महामहोपाध्याय वा. वि. मिराशी यांच्या सांगण्यावरून कालिदासाचे स्मारक उज्जैन ऐवजी रामटेकलाच व्हायला हवे, यावर विधानसभेत जोरदार भाषण केले. त्याने प्रभावित होऊन तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी त्या कामाला गती दिली. म्हणजे बर्धन हे त्या स्मारकाचे खरे शिल्पकार. विद्यार्थी चळवळीतून बर्धन यांचे नेतृत्व घडले. त्यामुळे त्यांची नाळ शेवटपर्यंत त्या चळवळीशी जोडलेली राहिली. नागपुरातील गिरणी कामगारांच्या मागण्यांसाठी त्यांनी कितीतरी आंदोलनांचे नेतृत्व केले, उपोषणे केली. ऑल इंडिया ट्रेड यूनियन काँग्रेसमध्ये सदस्यापासून अध्यक्षापर्यंत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या निमिर्तीनंतर म्हणजे १९६७ साली आणि आणीबाणीनंतर म्हणजे १९८० साली आणि जागतिकीकरणाच्या पूर्वसंध्येला म्हणजे १९८९ साली बर्धन यांनी लोकसभेचीही निवडणूक लढवली. पण त्यात त्यांना यश आले नाही. तसाही कुठलाही सच्चा कॉम्रेड केवळ निवडणूक जिंकण्यासाठी सार्वजनिक जीवनात कार्यरत नसतो आणि निवडणूक हरला म्हणून त्याच्या सार्वजनिक कामाची गतीही मंदावत नाही. बर्धन यांचेही तसेच होते. ‘पडलो’ एवढेच घरी सांगून ते दुसऱ्या दिवसापासून नेहमीच्याच उत्साहाने कामाला लागत. या देशात एक दिवस क्रांती होणार आहे आणि ती कामगार-शोषित-शेतकरी-आदिवासीच करणार आहेत, असा प्रत्येक कॉम्रेडला दुर्दम्य आशावाद असतो. बर्धन यांचाही तो होताच. नव्वदच्या दशकात बर्धन दिल्लीला गेले. कम्युनिस्ट पक्षामध्ये उपमहासचिव ते सचिव अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी तत्त्वनिष्ठेने सांभाळल्या. दिल्लीच्या राजकारणात राहूनही आणि इतकी वर्षे कम्युनिस्ट पक्षात राहूनही बर्धन शेवटपर्यंत सिनिक झाले नाहीत. ‘संसदेतील साडपाचशे खासदारांपैकी ३००हून अधिक खासदार करोडपती आहेत, ही परिस्थिती बदलली पाहिजे. मजूर-शेतकरी-कामगार यांच्या न्यायासाठी क्रांती झाली पाहिजे, त्यासाठी साम्यवाद हाच एकमेव मार्ग आहे,’ या निष्ठेवरील त्यांचा विश्वासही कधी ढळला नाही. उतारवयात अनेक कम्युनिस्ट कडवट होतात, पण कॉ. बर्धन यांनी तो मार्ग जाणीवपूर्वक टाळला. सोमनाथ चटर्जींसारखीच त्यांचीही पक्षावरील निष्ठा वादातीत होती. त्यामुळे पक्ष देईल ती जबाबदारी शिरसावंद्य मानून ते काम करत राहिले. स्वत:बद्दल बोलायला बर्धन यांना अजिबात आवडायचे नाही. त्यामुळेच त्यांनी अनेकांनी अनेकदा आग्रह करूनही आत्मचरित्र लिहिले नाही ते नाहीच. भारतीय राजकारणात आजघडीला सामाजिक नीतीमत्ता, सार्वजनिक चारित्र्य, साधी राहणी, व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा, महत्त्वाकांक्षा न बाळगता निरसलसपणे आपले काम करणे आणि तळागाळातल्या शोषितांचा कळवळा, हे फक्त कम्युनिस्ट पक्षातील नेत्यांमध्येच दिसते. त्यातील एक आघाडीचे शिलेदार असलेले कॉम्रेड बर्धन हे ‘महाराष्ट्राचे सोमनाथ चटर्जी’ होते!

Saturday, January 2, 2016

आनंदयात्री

मंगेश पाडगावकर यांच्या निधनाने महाराष्ट्रातील नवथर तरुणांच्या, मध्यमवर्गीय प्रौढांच्या, एकेकाळी त्यांच्या कविता वाचून प्रेमात पडलेल्यांच्या वा प्रेमात पडल्यावर त्यांच्या कविता वाचलेल्या वयोवृद्धांच्या आणि प्रेम हाच जगण्याचा एकमात्र विषय मानणाऱ्यांच्या काळजाचा एकतरी ठोका चुकला असेल. महाराष्ट्रातल्या तीन-चार पिढ्यांना आनंद देण्याचे, त्यांच्या प्रेमाची लज्जत वाढवण्याचे काम पाडगावकरांनी केले. जगण्यावर निस्सीम भक्ती करत आणि जगण्याचेच बोलगाणे गात पाडगावकर आयुष्यभर जगले, वागले आणि तशाच त्यांनी कविताही लिहिल्या. ते मराठीतले खरेखुरे आणि बहुधा एकमेव आनंदयात्री कवी होते. साधारणपणे पावणेसहा फुट उंची, गोरा वर्ण, नीटनेटकी वेशभूषा, जाड भिंगांचा चश्मा आणि अखंड गप्पा ही कवी आणि माणूस पाडगावकरांची प्रमुख वैशिष्ट्ये होती. आणि त्यांची बुल्गानीन दाढीही. पन्नासच्या दशकात बुल्गानीन म्हणून रशियाचे एक पंतप्रधान होते. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण दाढी पाडगावकरांनी स्वीकारली. ती त्यांना इतकी फिट झाली की, पुढे ती ‘पाडगावकरांची दाढी’ म्हणूनच प्रसिद्ध झाली. उलट बुल्गानीन यांच्या दाढीविषयी बोलताना ‘बुल्गानीन अशी पाडगावकरांसारखी दाढी ठेवायचे!’ असे गमतीने सांगितले जाऊ लागले. वयाच्या ऐंशीनंतर अतिशय तरळ प्रेमकविता सुचणाऱ्या या कवीला प्रतिभावंतच म्हणायला हवे. पाडगावकर हा माणूस जगण्यावर नितांत प्रेम करणारा होता. जगण्याचा उत्सव सतत साजरा करत राहणे, हेच त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय मानले होते. पाडगावकरांनी आपल्या आयुष्यात  दाहक अनुभवही घेतले. पण ती दाहकता, कटुता त्यांच्या बोलण्या-वागण्यात कधीही येत नसे. इतरांना फक्त आनंद द्यायचा, एवढेच एक ब्रीद त्यांनी आयुष्यभर जपले. ते माणसांचे गाणे गात राहिले. आणि तेच त्यांच्या लोकप्रियतेचे गमक आहे. पाडगावकर शालेय वयातच कविता लिहायला लागले. ‘धारानृत्य’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९५० साली प्रकाशित झाला, तर ‘अखेरची वही’ हा शेवटचा कवितासंग्रह २०१३ साली प्रकाशित झाला. म्हणजे जवळपास ६३ वर्षे पाडगावकरांनी सातत्याने कविता लिहिली. कारण त्यांना माणूस समजून घेण्यात अनिवार कुतूहल होते, पण इतकी वर्षे सातत्याने माणसांविषयी कविता लिहून मला माणूस कळला आहे, असे पाडगावकर कधी म्हणाले नाहीत. मोठ्यांसाठी २८ कवितासंग्रह (त्यात मीरा, कबीर, सूरदास यांच्या रचनांचे मराठी अनुवादही आहेत.) आणि मुलांसाठी १० बालकवितासंग्रह असे एकंदर ३८ कवितासंग्रह पाडगावकरांनी लिहिले. ‘सलाम’, ‘बोलगाणी’, ‘जिप्सी’, ‘गझल’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रचंड लोकप्रिय ठरले. पाडगावकरांनी बहुतांश प्रेमकविता लिहिली असली तरी ‘सलाम’मध्ये उपरोध व उपहास, ‘उदासबोध’मध्ये विडंबन आणि ‘बोलगाणी’मधील लयबद्धता हे त्यांनी जाणीवपूर्वक केलेले प्रयोग आहेत. पाडगावकरांना शालेय वयात सक्तीने ‘बायबल’ शिकावे लागले. तारुण्याच्या उंबरठ्यावर त्यांच्यावर ओशोंचा प्रभाव पडला, पण पाडगावकर कुणाच्या झेंड्याखाली गेले नाहीत. त्यांनी त्यांची बोलगाणी लिहिणारा कवी ही ओळख संपू दिली नाही. कुठल्याही राजकीय विचारधारेशी बांधीलकी न मानताही आनंदाने, जगण्याचा उत्सव साजरा करत जगता येते, त्यातही आनंद असतो, हे पाडगावकर यांनी त्यांच्या जगण्यातून आणि कवितेतून दाखवून दिले. पाडगावकरांनी कवितेशिवाय इतर लेखन मोजकेच केले. शेक्सपिअरच्या ‘द टेम्पेस्ट’, ‘ज्युलिअस सीझर’ आणि ‘रोमिओ अँड ज्युलिअेट’ या तीन नाटकांचे मुळाबरहुकूम भाषांतर केले. बायबलच्या नव्या कराराचे आणि कमला सुब्रमण्यम यांच्या दोन खंडी महाभारताचेही मराठी भाषांतर केले. याशिवाय त्यांची गद्यलेखनाची ‘निंबोणीच्या झाडामागे’, ‘चिंतन’, ‘स्नेहगाथा’, ‘शोध कवितेचा’, ‘आले मेघ भरून’, ‘असे होते गांधीजी’ अशी सहा पुस्तके प्रकाशित झाली, पण पाडगावकरांची खरी ओळख ही कवी म्हणूनच राहिली, यापुढेही राहील. असा आणि इतका समरस झालेला दुसरा कविमाणूस महाराष्ट्रात दाखवता येणार नाही. अशा प्रकारच्या जगण्याविषयी फारसे बरे बोलण्याचे दिवस आता राहिले नाहीत आणि तशा जगण्याची सोयही राहिली नाही. त्यामुळे आजच्या-उद्याच्या पिढ्यांना पाडगावकरांची थोरवी अनुभवता येणार नाही, पण त्यांच्या कविता मात्र त्यांना भावतील, आवडतील. नवथर प्रेमिकांचे पाडगावकर अजून कैक वर्षे आवडते कवी राहतील. ते कवी म्हणून प्रसिद्ध पावू लागले होते, तेव्हा ‘शीळ’वाल्या ना. घ. देशपांडे यांनी त्यांना एक महत्त्वाचा कानमंत्र दिला होता - ‘कविता जर अनेक अंगांनी फुलायची असेल, तर कवितेशिवायच्या इतर सर्व वाटा बंद केल्या पाहिजेत.’ पाडगावकरांनी नाघंचा हा सल्ला जवळपास आयुष्यभर प्रमाण मानला. त्यामुळेच ते इतकी वर्षे सातत्याने कविता लिहू शकले. पाडगावकरांनी स्वत:चा शिष्यसंप्रदाय निर्माण केला नाही. पण त्यांना द्रोणाचार्य आणि स्वत:ला एकलव्य मानणाऱ्यांचा महाराष्ट्रात नंतर बराच सुकाळ झाला. या लोकांनी पाडगावकरांचेच शब्द उलटेपालटे फिरून त्यांची स्वत:च्या कविता म्हणून नव्याने नाणी पाडली. ‘लिज्जत’ पापडसाठी पाडगावकरांनी अनेक वर्षे पावसावर कविता लिहिली. पावसाळा सुरू झाला की, वर्तमानपत्रात लिज्जड पापडची पाडगावकरांच्या नव्या कोऱ्या कवितेसह जाहिरात हा एकेकाळी अनेकांच्या औत्सुक्याचा विषय झाला होता. नंतर तो चेष्टेचाही होत गेला. विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर या त्रिकुटाने महाराष्ट्रभर कवितावाचनाचे कार्यक्रम करून कवितेला लोकाश्रय मिळवून दिला. गद्यकविता लयीत म्हटल्या तर त्या लोकांना आवडतात, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले, पण दिलीप चित्रे यांच्यासारख्या लघुनियतकालिकांच्या परंपरेतील कवीने ‘करंदीकार-बापट-पाडगावकर यांनी कवितेचे बघे निर्माण केले... कवितेची प्रतिमा न उंचावता फक्त कवीचीच प्रतिमा उंचावली,’ अशी टीका त्यावर केली. साठीच्या दशकानंतर लोकप्रिय ते सर्व त्याज्य ही विचारसरणी बळावत गेल्याने अशी टीका होणे क्रमप्राप्त होते. ती काही प्रमाणात रास्तही आहे, पण लोकप्रिय कवीचीही समाजाला अभिजात कवींइतकीच गरज असते, हे नाकारून चालणार नाही. पाडगावकरांना अभिजात होण्याची महत्त्वाकांक्षा नव्हती आणि बाजारू होण्याचा सोसही नव्हता. समाजातल्या एका मोठा समूहाच्या भावभावनांना हात घालणाऱ्या कविता लिहिणे, एवढेच पाडगावकर करू शकत होते आणि तेच त्यांनी केले. बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज आणि ना. घ. देशपांडे यांची बहुतांश कविता पाडगावकरांना वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत तोंडपाठ होती. आपल्या आधीच्या पिढीतल्या कवींच्या कविता अशा मुखोद्गत असलेले आणि आपल्या समकालीन कवींविषयी सजग असलेले पाडगावकर हे कवी म्हणून निदान लोकप्रियतेच्या बाबतीत तरी मोठेच होते. त्यांच्या कवितासंग्रहाच्या किमान दोन ते कमाल पंचवीस आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. अशी आणि इतकी वाचकप्रियता लाभलेला कवी महाराष्ट्रात निदान नजीकच्या काळात तरी निर्माण होण्याची शक्यता कमीच आहे. तोवर जगण्याचे बोलगाणे गाण्यासाठी, प्रेमाच्या आणा-भाका घेण्यासाठी आणि भवतालाकडे निर्मळ दृष्टीने पाहण्यासाठी पाडगावकरांशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही.