Tuesday, February 9, 2016

मराठी नियतकालिके - एक स्थूल आढावा

१९६२मध्ये सुरू झालेले आणि मराठी साहित्यसमीक्षेतला वाहिलेले ‘आलोचना’ हे मासिक १९९१ साली बंद झाले. त्याला यावर्षी २५ वर्षे होतील. मराठी पुस्तकांची परखड आणि सडेतोड समीक्षा करणाऱ्या, इंग्रजीतील ‘इकॉनॉमिस्ट’ या नामांकित साप्ताहिकाप्रमाणे लेखासोबत लेखकाचे नावे न छापणाऱ्या आणि आपल्या २९ वर्षांच्या कार्यकाळात साहित्यसमीक्षेमध्ये एक प्रकारचा धाक निर्माण करणाऱ्या ‘आलोचना’ची आजकाल कुणाला फारशी आठवणही होत नाही. ‘आलोचना’ बंद पडले त्याच वर्षी देशात आर्थिक उदारीकरणाला सुरुवात झाली. त्यालाही यंदा पंचवीस वर्षे होत आहेत. या काळात वाचनाच्या नावडीपासून अर्थकारणाच्या ओढग्रस्तीपर्यंत अनेक घटक मराठी नियतकालिकांच्या मुळावर आले आहेत. जागतिकीकरणाचे मराठी साहित्यावर नेमके काय परिणाम झाले आहेत, हा स्वतंत्र आणि बराच मोठा विषय आहे. त्या विश्लेषणात न शिरता मराठीतल्या नियतकालिकांचा हा स्थूल आढावा घेण्याचा प्रयत्न...
...................................................................................
१८०५ साली मराठी मुद्रण सुरू झाल्यानंतर ३५ वर्षांनी, १८४० साली ‘दिग्दर्शन’ हे मराठीतलं पहिलं मासिक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं. जांभेकर यांच्या ‘दिग्दर्शन’चं अनुकरण करणारी  १८४० ते १९०० काळात ११५ नियतकालिकं सुरू झाली. त्यातली काही लवकरच बंद पडली. तरी बा. द. सातोस्कर म्हणतात त्याप्रमाणे “...तेव्हापासून तो दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या (१९३९) शंभर वर्षाचा काळ हा मराठी मासिकांचा प्रयोगकाळ होता. धर्म नि कर्तव्य, हौस नि साहित्यसेवा या हेतूनेच या कालखंडातील बहुतेक मासिके निघाली आणि त्यामुळेच ती बंद पडली तरी त्यांनी मराठी साहित्याचा इतिहास घडविला आहे हे विसरता येत नाही. धर्म, तत्त्वज्ञान, साहित्य, काव्य, इतिहाससंशोधन, अबलोन्नति, समाजसुधारणा, करमणूक वगैरे विविध विषयांना वाहिलेल्या आणि कोणत्याही एकाच विषयाला न वाहिलेल्या या मासिकांनी समाजाला ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यांचा पुरवठा केला. मराठी माणसाची दृष्टि विशाल बनविली. त्याला बहुश्रुत केला.”
१८६० साली ‘सर्वसंग्रह’ हे मासिक मुंबईहून सुरू झालं. मराठी साहित्याच्या क्षेत्रात अतिशय मौलिक कामगिरी पुढच्या सात वर्षांत या मासिकानं केली. प्राचीन मराठी काव्य संपादन व संशोधन करून पहिल्यांदा ‘सर्वसंग्रह’ने प्रकाशित केले. मोरोपंतांचं समग्र आर्याभारत, रामायण, केकावलि, मंत्रभागवत, आनंदतनय, वामन, तुकाराम, रामदास, मुक्तेश्वर, ज्ञानेश्वर इत्यादींची कविता शुद्ध करून व अर्थनिर्णायक टीपा देऊन ‘सर्वसंग्रह’ने छापली.
‘सर्वसंग्रह’ १८६७ साली बंद पडलं आणि त्याच वर्षी ‘विविधज्ञानविस्तार’ सुरू झालं. ते १९३८ सालापर्यंत अव्याहतपणे सुरू होतं. रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांच्या या मासिकाने मराठी मासिकांना प्रतिष्ठा आणि उच्च दर्जा मिळवून दिला. “विस्तारात लेख छापून येणे म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीची एम.ए.ची डिग्री मिळाल्याची मान्यत मिळणे होय” असे उदगार एका लेखकाने काढल्याची नोंद बा.द. सातोस्कर यांनी केली आहे. भाषा, ज्ञानविज्ञान व कला यांच्या अभिवृद्धीसाठी ‘विविधज्ञानविस्तारा’ने अतिशय मोलाची कामगिरी केल्याचं प्रसिद्ध संशोधक अ.का. प्रियोळकर यांनी म्हटलं आहे. तत्कालीन असा एकही विषय नाही, असा एकही वाङ््मयप्रकार नाही आणि असा एकही विद्वान लेखक नाही, जो ‘विविधज्ञानविस्तार’मध्ये आला नाही. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या ‘सुदाम्याचे पोहे’, हे मराठीतील विनोदी साहित्याची सुरुवात करणारं पुस्तकही लेखमालेच्या स्वरूपात याच मासिकात प्रकाशित झालं. समीक्षक वा. ल. कुळकर्णी यांनी ‘विविधज्ञानविस्तार’च्या वाङ््मयीन कामगिरीचा आढावा घेणारं पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते म्हणतात - “...प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन इतिहास, धर्म आणि संस्कृती, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, प्राच्यविद्या इत्यादी ज्ञानशाखांतील लेखनाबरोबरच ‘विस्तारा’ने अखेरपर्यंत प्राचीन व अर्वाचीन वाङ््मयाची समीक्षा आणि वाङ््मयतत्त्वविचार यांना आपल्या अंकांमधून मानाचे स्थान दिले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ‘विस्तारा’ने केलेल्या या सांस्कृतिक कार्याचे मोल एवढे मोठे आहे की, त्याचे स्मरण होताच आपण नतमस्तक होतो.”
त्यानंतर महत्त्वाची कामगिरी केली ती विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या ‘निबंधमाला’ या १८७४ साली सुरू झालेल्या मासिकाने. मराठी साहित्यात ‘निबंधमाला’ने क्रांती केली असे म्हटले जाते. चिपळूणकर या मासिकाचे संपादक, मालक, लेखक, प्रकाशक असे सर्व अर्थाने सर्वसर्वाे होते. यात इतरांच्या लेखनातले उतारे व वाचकपत्रं सोडली तर इतर कुणाचंही लेखन प्रकाशित झालं नाही. ‘निबंधमाला’चे एकंदर ८४ अंक प्रकाशित झाले. त्यातून चिपळूणकरांनी मोरोपंत यांच्या कवितांपासून ते लोकहितवादी, म. फुले यांच्या विचारांचा परामर्श घेण्यापर्यंत अनेक विषय हाताळले. ‘निबंधमाला’च्या सर्व अंकांचं एकत्रित पुस्तक नंतर प्रकाशित झालं असून ते मराठीतलं एक क्लासिक पुस्तक मानलं जातं. चिपळूणकरांनी मराठी गद्यलेखनाचा पाया ‘निबंधमाला’मधून घालून दिला. त्याचे त्यांच्या काळी अनुकरण झालंच, पण आजही होत आहे.
१८८२ साली चिपळूणकरांच्या निधनानंतर ‘निबंधमाला’ तीन अंक एकदम निघून बंद झाली. नंतर अनेक मासिकं निघाली. त्यांनी आपापल्यापरीने मराठी वाङ्मयाला चालना देण्याचा प्रयत्न केला. त्यातील अनेक अल्पजीवीही ठरली.


‘केरळकोकिळ’ हे मासिक १८८६ साली प्रकाशित झालं. ते १९१५ पर्यंत प्रकाशित होत राहिलं. हे महाराष्ट्राबाहेर असलेल्या कोचीन येथून प्रकाशित होत होते. त्याची महाराष्ट्रातील वर्गणीदारांची संख्या १००० इतकी होती, जी तोपर्यंत प्रकाशित होत असलेल्या इतर कुठल्याही मासिकाची नव्हती. पुढे ती साडेतीन हजारापर्यंत गेली. यावरून ‘केरळकोकिळ’च्या लोकप्रियतेची कल्पना यायला हरकत नाही. मराठी माणसांना मासिकाच्या वाचनाची गोडी लावण्यात सर्वात यशस्वी कुठलं मासिक झालं असेल तर ते ‘केरळकोकिळ’. कृष्णाजी नारायण आठल्ये हे या मासिकाचे कल्पक संपादक होते.
१९०९ साली मराठीतला पहिला दिवाळी अंक प्रकाशित करणारे का. र. मित्र यांचं ‘मासिक मनोरंजन’ १८९५ साली सुरू झालं. आधुनिक मराठी वाङ््मयाचं पहिलं व्यासपीठ म्हणता येईल असं त्याचं स्वरूप होतं. ‘मनोरंजन’चे पहिल्या वर्षातच तीन हजार वर्गणीदार झाले होते. त्याने ‘केरळकोकिळ’चा विक्रम पहिल्या वर्षातच मोडायचं काम केलं.
लघुकथेचा पूर्वज म्हणता येईल अशा गोष्टींना मित्र यांनी ‘मनोरंजन’मधून सुरुवात केली. त्याला महाराष्ट्रात भरपूर लोकप्रियता मिळाली. ‘मनोरंजन’च्या चाळीस वर्षांत मराठीतील जवळपास सर्व तत्कालीन नामवंत लेखकांनी त्यात लिहिलं. तत्कालीन महाराष्ट्राच्या विद्वतेचा आणि रसिकतेचा संगम या मासिकात पाहायला मिळतो. विसाव्या शतकाच्या पहिल्या पंचवीस वर्षांतलं सर्वश्रेष्ठ मासिक म्हणजे ‘मनोरंजन’.
१९२६ नंतरचा काळ हा वाङ्मयीन नियतकालिकांचा काळ आहे. ‘नवयुग’, ‘रत्नाकर’, ‘यशवंत’, ‘प्रतिभा’, ‘पारिजात’, ‘प्रगति’, ‘ज्योत्स्ना’, ‘विहंगम’, ‘विश्ववाणी’, ‘वागीश्वरी’ या नियतकालिकांनी मराठी लघुकथेच्या विकासाला मदत केली. नंतरच्या काळात ‘अभिरुची’, ‘सत्यकथा’, ‘छंद’, ‘आलोचना’, ‘ललित’, ‘मसाप पत्रिका’, ‘प्रतिष्ठान’, ‘हंस’, ‘अनुष्टुभ’, ‘कवितारती’, ‘पंचधारा’ यांसारख्या अनेक नियतकलिकांनी मराठी साहित्याचं दालन समृद्ध केलं.
त्यातील ‘सत्यकथा’ हे १९३३ ते १९८२ या काळात, ‘अभिरुची’ १९४३ ते १५५३ व १९६६ ते ७६ या दोन टप्प्यांत आणि ‘छंद’ १९५४ ते १९६० या काळात प्रकाशित झालं. मान्यवर कवी पु. शि. रेगे यांनी ‘छंद’ या द्वैमासिकाचं संपादन केले. जेमतेम सहा-सात वर्षे चाललं असलं तरी या मासिकानं आपला वेगळा ठसा उमटवला होता. पण हे स्टॉलवर्ट लेखकांचं मासिक होतं, हेही तितकंच खरं. भाषा, साहित्य आणि ललितकला यांना वाहिलेल्या या मासिकाची आजही आठवण काढली जाते. ते ‘सत्यकथा’च्या पंक्तीतील म्हणून.
‘सत्यकथा’ हे मासिक मराठी साहित्यातील मानदंड मानला जातो. श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन हे दोन दिग्गज सत्यकथेचे संपादक. ‘सत्यकथा’ने नवकथा, नवकविता, नवसमीक्षा आणि ललितगद्य यांच्याबाबतीत मराठी साहित्यात भरीव असं काम केलं. साठच्या दशकातली मराठीमधली नवकथेची चळवळ ‘सत्यकथा’मधूनच सुरू झाली. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर हे नवकथेचे प्रवर्तक. त्यांचे सर्वाधिक लेखन ‘सत्यकथा’मधून प्रकाशित झाले. ‘सत्यकथा’मध्ये फक्त स्टॉलवर्ट लेखक लिहीत होते असे नाही. भागवत-पटवर्धन यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या लेखकांचा शोध आपल्यापरीने घेतला. त्यांच्या साहित्याला ‘सत्यकथा’मध्ये जागा दिली. त्यांना प्रोत्साहन दिलं. ‘सत्यकथा’ हे केवळ मासिक नव्हतं, ती वाङ्मयीन चळवळ होती. साहित्य, चित्रकला, रंगभूमी, चित्रपट, संगीत असा विविध क्षेत्रातील मंडळी ‘सत्यकथा’शी जोडली गेलेली होती. भागवत-पटवर्धन या संपादकद्वयींनी ते जाणीपर्वूक केलं होतं. केवळ मजकुराचं संपादन हे संपादकाचं काम नसतं तर माणसांचंही संपादन त्याने निगुतीने आणि चाणाक्षपणे करायचं असतं. भागवत-पटवर्धन या जोडगोळीने तेही मोठ्या प्रमाणावर केलं. आणि हेच ‘सत्यकथा’चे सर्वात मोठं बलस्थान होतं.
‘सत्यकथा’ हा मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह होता. त्यात सामील न होता, तिच्या प्रस्थापितपणाला आव्हान देत, त्याला पर्याय म्हणून १९५५ ते १९७५ या काळात लघुनियतकालिकांची चळवळ सुरू झाली. ‘शब्द’, ‘अथर्व’, ‘आत्ता’, ‘भारुड’, ‘फक्त’, ‘येरू’, ‘वाचा’, ‘अबकडई’ अशी विविध लघुनियतकालिकं याच चळवळीतली. दुसऱ्या महायुद्धानंतर जगभर जगभर व्यवस्थाविरोधाच्या संघर्षातून ज्या विविध चळवळी निर्माण झाल्या, त्यातला महाराष्ट्रातला, मराठी साहित्यातला आविष्कार म्हणजे लघुनियतकालिकांची चळवळ होय. या चळवळीने चाकोरीबाहेरच्या साहित्याला मोठं व्यासपीठ मिळवून दिलं. साहित्यातली लेखन-प्रकाशन यांच्या मिरासदारीला आव्हान दिलं. भाषेच्या हस्तिदंती मनोऱ्याला काही प्रमाणात भगदाडं पाडली. त्यामुळे या लघुनियतकालिकांचे मराठी साहित्यावर काही परिणाम नक्कीच झाले. १९७५ नंतर उदयाला आलेल्या दलित, ग्रामीण, स्त्रीवादी साहित्य चळवळींना या लघुनियतकालिकांच्या चळवळीने काही प्रमाणात आत्मविश्वास दिला. लघुनियतकालिकांचा प्रयोग तसा अल्पजीवी ठरला; पण त्यातून डॉ. भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये, अरुण कोलटकर, तुळशी परब, वसंत दत्तात्रेय गुर्जर, मनोहर ओक, नामदेव ढसाळ, चंद्रकांत खोत, अशोक शहाणे यांसारखे शैलीदार, आशयसंपन्न आणि कसदार लेखक पुढे आले.
केवळ समीक्षेला वाहिलेले ‘आलोचना’ हे मासिक वसंत दावतर यांनी १९६२ ते १९९१ या काळात म्हणजे तब्बल २९ वर्षं चालवलं. ‘आलोचना’मध्ये त्या काळात प्रकाशित झालेल्या पुस्तकांची परखड आणि सडेतोड समीक्षा असे. लेखासोबत लेखकाचं नाव छापलं जात नसे. नंतरच्या काळात वर्षातल्या शेवटच्या अंकात लेखक व लेख यांची एकत्रित सूची दिली जाई. परीक्षण तटस्थ असावं, त्याची समतोलपणे चर्चा केली जावी अशी अपेक्षा असते. पण ललित साहित्याची समीक्षा करताना त्यात परीक्षकाचा व्यासंग, रसिकता आणि आकलनक्षमता यांचा प्रभाव उतरतोच. हे लक्षात घेऊन ‘आलोचना’ने एकाच पुस्तकावरील, कवितेवरील वा कथेवरील एकापेक्षा जास्त परीक्षणं देण्याचा पायंडा पाडला. ललितसाहित्याच्या समीक्षेत मतऐक्यापेक्षा मतभेदच जास्त असतात आणि ते महत्त्वाचेही असतात, हे रुजवण्याचं काम ‘आलोचना’ने केलं.
‘अनुष्टुभ’ १९७७ची सुरुवात झाली. २००४ पर्यंत प्रकाशित झाल्यावर त्यात खंड पडला. अलीकडेच ते परत सुरू झालं आहे. या मासिकाने गंभीर प्राध्यापकी समीक्षा आणि सर्जनशील साहित्य यांना प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे ते लेखन-अध्यापन यांच्याशी संबंधित असलेल्यांचे प्रतिनिधित्व करतं. आंबेडकरी साहित्याचं व्यासपीठ म्हणता येईल असं ‘अस्मितादर्श’ हे मासिक गंगाधर पानतावणे यांनी १९६८पासून प्रकाशित करायला सुरुवात केली. महाराष्ट्रात दलित साहित्य म्हणून जी चळवळ उल्लेखिली जाते, तिचं हे मुखपत्र. आणि हेच या मासिकाचं योगदान आहे. हे मासिक अजूनही सुरू आहे. केवळ कवितेला वाहिलेलं ‘कवितारती’ हे द्वैमासिक १९८५ पासून सुरू झालं. नव्या-जुन्या कवींच्या कविता आणि काव्यसमीक्षा याबाबतीत तरी ‘कवितारती’ अव्वल दर्जाचं आहे.
‘पंचधारा’ हे हैद्राबादहून प्रकाशित होणारं द्वैमासिक  मराठी, तेलुगु, कन्नड, उर्दू आणि हिंदी  अशा पाच भाषांच्या साहित्यातील आदानप्रदानाचं माध्यम आहे. या पाच भाषांतील लक्षणीय साहित्य मराठीत आणण्याचं काम या मासिकाचं संपादक द. पं. जोशी यांनी केलं. हिंदी मासिकांच्या धर्तीवर पुस्तकाच्या आकाराएवढे भरगच्च विशेषांक काढण्याची पद्धत मराठीत फक्त ‘पंचधारा’च करताना दिसते.
जानेवारी १९६४ ला ‘ललित’ सुरू झालं. हे खऱ्या अर्थाने मराठीतलं पहिलं आणि एकमेव बुक ट्रेड जर्नल. मराठी प्रकाशकांना वाचकांपर्यंत आणि वाचकांना पुस्तकांपर्यंत पोहचवण्याचं काम ‘ललित’ करतं. त्याने सामान्य मराठी वाचकांची पुस्तकांबाबतची उत्सुकता वाढवण्याचं मोठं काम केलं आहे. ‘ललित’मधील पुस्तकांच्या जाहिरातीही मजकुराइतक्याच गंभीरपणे वाचल्या जातात. 


‘अंतर्नाद’, ‘मसाप पत्रिका’, ‘ललित’, ‘कवितारती’, ‘पंचधारा’, ‘अनुष्टुभ’ ही मराठी नियतकालिकं अजूनही प्रकाशित होत आहेत. पण या सर्व नियतकालिकांचं स्वरूप आता मरगळलं आहे. सध्या आवर्जून वाचावं, नाव घ्यावं, ज्याचा दबदबा आहे, असं एकही वाङ्मयीन नियतकालिक मराठीमध्ये नाही. ‘अंतर्नाद’ने सुरुवातीच्या काळात त्यादृष्टीने काहीएक चमक दाखवली होती. ‘प्रतिसत्यकथा’ असंही त्याचचं वर्णन केलं गेलं. पण त्याच्या मर्यादा लवकरच उघड झाल्या. नव्वदच्या दशकात ‘अभिधा’, ‘अभिधानंतर’, ‘नवाक्षर दर्शन’, ‘खेळ’, ‘ऐवजी’, ‘शब्दवेध’, ‘मुक्त शब्द’, ‘इत्यादी’, ही नियत-अनियतकालिकं सुरू झाली आहेत. पण त्यांच्या वाङ्मयीन योगदानाची दखल घेण्यासाठी अजून काही काळ जाऊ द्यावा लागेल. त्यामुळे सध्यातरी मराठीमध्ये वार्षिक दिवाळी अंक सोडले तर भरीव आणि ठोस वाङ्मयीन योगदान देणारं एकही नियतकालिक नाही.
 

माणूसपणाचा चिद्घोष करणारा बुलंद शायर

रस्ते में वो मिला था, मैं बच कर गुज़र गया
उस की फटी क़मीज़ मेरे साथ हो गयी

औरों जैसे हो कर भी हम बाइज्जत हैं बस्ती में
कुछ लोगों का सीधापन है, कुछ अपनी अय्यारी है

शहर में सब को कहाँ मिलती है रोने की जगह
अपनी इज़्जत भी यहाँ हँसने-हँसाने से रही

घर से मस्जिद है बहुत दूर चलो यूँ कर लें
किसी रोते हुए बच्चे को हँसाया जाए

पत्थरों की जुबाँ होती हैं दिल होते हैं
अपने घर के दरो-दिवार सजा कर देखो

इतक्या साध्या शब्दांत गहिरा आशय व्यक्त करणारी उच्च प्रतिभा लाभलेले शायर आणि गीतकार मुक़्तदा हसन उर्फ निदा फ़ाज़ली यांच्या निधनाने भारताने एक बुलंद आशावादी आणि निधर्मी कवी गमावला आहे. दिल्लीत जन्मलेले, ग्वाल्हेरमध्ये वाढलेले आणि मुंबईला कर्मभूमी मानलेले फ़ाज़ली हे उर्दूतील सत्तरच्या दशकानंतरचे महत्त्वाचे शायर होते. ग़ज़ल, कविता, दोहे यांच्या माध्यमातून त्यांनी अतिशय तरल, सुबोध आणि मार्मिक लेखन केले. त्यांचे साहित्य जनसामान्यांचे जगणे मुखर करते. मीर, ग़ालिब यांच्याइतकाच त्यांच्यावर कबीर, सूरदास, मीरा यांचाही प्रभाव होता. मराठीतील ज्ञानेश्वर, तुकोबा, नामदेव ढसाळ यांच्याविषयी त्यांना नितांत आदर होता. अल्लाइतकीच त्यांची राधा, कृष्ण, राम, महादेव या हिंदू देवतांवरही श्रद्धा होती. सूरदासाच्या कवितेने प्रभावित होऊन फ़ाज़ली यांनी शायर बनण्याचा निर्णय घेतला. देशाची फाळणी झाली होती आणि त्यांचे सारे कुटुंब त्यांना एकट्याला इथेच टाकून पाकिस्तानात निघून गेले होते, तेव्हाची ही गोष्ट आहे. एके दिवशी एका मंदिरासमोरून जाताना त्यांच्या कानावर सूरदासांची रचना पडली. त्यात राधा-कृष्णाच्या विरहाचे वर्णन होते. त्याने फ़ाज़ली इतके प्रभावित झाले की, त्यांनी त्याच क्षणी शायर व्हायचे ठरवले. तशी फ़ाज़ली यांना शायरी वारसाहक्काने मिळाली होती. त्यांचे वडील शायर होते. घरात उर्दू, फ़ारसीमधील कितीतरी कवितासंग्रह होते. लहानपणापासून फ़ाज़ली ते वाचत होते. पण, आपल्या काव्यात अरबी-फारसी भाषेतील कठीण शब्दांचा वापर फ़ाज़ली यांनी कटाक्षाने टाळला. हिंदी आणि उर्दू भाषेतील दिवार तोडून साध्या सोप्या शब्दांत कविता, ग़ज़ला आणि दोहे लिहिले. भारतीय लोकभावना सहजपणे व्यक्त करण्याचे लाजवाब कसब फ़ाज़ली यांच्याकडे होते. तात्त्विक विचार, भाष्य किंवा विवशतेला, अगतिकतेला शरण जाणे, या गोष्टींच्या मागे फ़ाज़ली यांची शायरी जात नाही, ती वास्तव समजून घेते. ते अव्हेरून लावत नाही की त्याच्यापासून लांब पळायचा प्रयत्न करत नाही. त्यांच्या शायरीतून व्यक्त होणारा आत्मविश्वास त्या वास्तवाशी संघर्ष करण्याची प्रेरणा देतो. साठच्या दशकात मुंबई हे उर्दू-हिंदी साहित्याचे केंद्र होते. तेव्हा फ़ाज़ली मुंबईत आले. ‘धर्मयुग’, ‘सारिका’ ही हिंदीतील नामांकित नियतकालिके मुंबईतून निघत होती. सत्तरच्या दशकात फ़ाज़लींनी अर्थार्जनासाठी हिंदी चित्रपटांसाठी गाणी लिहायला सुरुवात केली. पहिल्याच वेळी कमाल अमरोही यांच्या ‘रझिया सुलतान’साठी दोन गाणी लिहिण्याची संधी त्यांना मिळाली. दशकभर संघर्ष केल्यानंतर १९८०मध्ये ‘आप तो ऐसे न थे’ या चित्रपटातील त्यांचे ‘तू इस तरह से मेरी जिंदगी में शामील है’ हे गाणे हिट ठरले. नंतर ‘आहिस्ता-आहिस्ता’मधील ‘कभी किसी को मुक्कमल जहाँ नहीं मिलता’ हे गाणेही हिट ठरले. १९९९साली आलेल्या ‘सरफरोश’मधील त्यांची ‘होशवालों को खबर क्या’ ही जगजीत सिंह यांनी गायलेली ग़ज़लही हिट ठरली. त्यांचे अनेक दोहे आणि ग़ज़ला जगजीत सिंह यांनी लाखो लोकांपर्यंत पोहचवल्या. नव्वदच्या दशकात आलेला त्यांचा ‘इनसाइट’ हा अल्बम जगजित सिंह यांनी गायला होता. तोही तुफान लोकप्रिय झाला. त्यांचे कवितासंग्रहही लोकप्रिय ठरले. बशीर बद्र, जाँ निसार अख्तर, दाग़ देहलवी, मुहम्मद अलवी, जिगर मुरादाबादी यांच्या शायरीचे संग्रह त्यांनी संपादित केले. अनुवाद हा कवी-शायरसाठी रियाज असतो, या धारणेतून अनेक अनुवादही केले. फ़ाज़ली यांच्याकडे ‘चांगल्याला चांगले’ म्हणण्याची अफलातून स्वीकारशीलता होती. इतरांचे खुलेपणाने कौतुक करण्याचा मनाचा उमेदपणा होता. ते सौंदर्याचे चाहते होते आणि माणसांचे लोभी. ते अल्ला-देवालाही प्रश्न विचारत. म्हणूनच ते सामान्य माणसांसाठी पसायदान मागू शकले. त्याच्या जगण्याला शहरात राहूनही भिडू शकले. त्याला त्याच्या पातळीवर जाऊन समजून घेऊ शकले. जाती-धर्माच्या, अस्मितेच्या भिंती तोडून माणसांकडे माणूस म्हणून पाहू शकले. हा वारसा त्यांना कबीर, सूरदास, तुकोबा यांच्याकडून मिळाला होता. तो त्यांनी आपल्या लेखनातून भारतीयांपर्यंत पोहचवण्याचे काम इमाने-इतबारे केले. ती माणूसपणाची मैफल आता कायमची निमाली आहे.