Tuesday, July 29, 2014

तिस-या प्रहरातील प्रश्नोपनिषद

प्रा. विजया राजाध्यक्ष म्हटले की, ‘बहुपेडी विंदा’, ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’, ‘कवितारती’, ‘शोध मर्ढेकरांचा’, ‘पुन्हा मर्ढेकर’ असे समीक्षाग्रंथ आठवतात. ‘संवाद’ या पुस्तकामध्ये विजयाबाईंनी विंदा करंदीकर, गंगाधर गाडगीळ आणि वा. ल. कुलकर्णी यांच्या घेतलेल्या वाङ्मयीन मुलाखती मोठ्या रोचक आहेत.  विजयाबाईंनी आस्वादक समीक्षेला मराठीमध्ये काहीएक प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या कामी काही दमदार पावले टाकली आहेत. पण तरीही आस्वादक समीक्षेविषयीचे समज काही पूर्णपणे नाहिसे झालेले नाहीत. या समीक्षालेखनाला दुय्यम मानले जातेच. पण विजयाबाईंनी त्याची पर्वा न करता आपले लेखन चालूच ठेवले आहे. दोन वर्षापूर्वी त्यांना विंदा करंदीकरांच्या नावाचा पहिला पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी आरती प्रभूंवर लेखन करण्याचा मनोदय व्यक्त केला होता.

थोडक्यात विजयाबाई पूर्णपणे वाङ्मयीन स्वरूपाचे-त्यातही समीक्षात्मक स्वरूपाचे लेखन करणा-या लेखिका आहेत. पण एवढीच काही त्यांची ओळख नाही. विजयाबाई प्रदीर्घ काळ कथालेखनही करत आल्या आहेत. आत्तापर्यंत त्यांचे सतरा-अठरा कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. नुकतेच त्यांचे नवे पुस्तक प्रकाशित झाले आहे. पण ते समीक्षालेखन नाही की कथासंग्रह नाही. तो चक्क दोन कादंब-यांचा संग्रह आहे. या पुस्तकाचे नाव आहे, तीन प्रहर. या संग्रहामध्ये दोन लघुकांदब-या आहेत. म्हणजे आकाराने त्या लहान आहेत म्हणून त्यांना ढोबळ अर्थाने लघुकादंब-या म्हणायचे. विजयाबाईंनी ‘कादंबरी की लघुकादंबरी? वाचकांनीच ते ठरवावे’ असे प्रास्ताविकात सांगून टाकले आहे.

विशेष म्हणजे कादंबरी लेखनाचा विजयाबाईंचा हा पहिलाच प्रयत्न आहे. यातील ‘बंदिश’ ही पहिली कादंबरी ‘माझ्या लेखनप्रवासात घडलेला हा एक अपघात आहे’ असे त्यांनी प्रास्ताविकात लिहिले आहे, तर ‘आयुष्य : पहिलं की तिसरं?’ ही दुसरी कादंबरी हाही कादंबरी लेखनाची वाट शोधण्याचा, ती काही अंशी सापडली असे वाटण्याचा अनुभव’ असे लिहिले आहे. म्हणजे पुस्तकाचे नाव ‘तीन प्रहर’, त्यात दोन लघु म्हणाव्या अशा कादंब-या आणि प्रत्यक्षात तिस-या प्रहरातल्या विजयाबाईं-सारख्या व्रतस्थ समीक्षक-कथालेखिकेनं लिहिलेल्या, असा हा योग आहे. यातून या दोन्ही कादंब-यांचे विषय माणसाच्या तिस-या प्रहारातील जीवनाविषयीचे आहेत, हे ठसठशीतपणे अधोरेखित करायचे असावे.

‘बंदिश’ ही कादंबरी एका शास्त्रीय गायकाविषयीची आहे. म्हणजे संगीत हे तिच्या मध्यवर्ती आहे. जोगबुवा आणि विष्णू यांच्या संबंधांतून ही कादंबरी फुलत जाते. आयुष्य सपाट नसते, त्यात अनेक आरोह आणि अवरोह असतात. या दोन्हींची मिळून बंदिश होते.

‘आयुष्य : पहिलं की तिसरं?’ ही तर सरळ सरळ ‘नयन लागले पैलतीरी’ अशा अवस्थेत असलेल्या वामनराव आणि त्यांच्या कुटुंबाची कथा आहे. या दोन्ही कादंब-यांचे तपशील खूप देता येतील, पण त्या लघुकादंब-या असल्याने ते फार देण्यात अर्थ नाही. पण या दोन्ही कादंब-यांची काही साम्यस्थळे सांगता येतील. या दोन्हींमध्ये तिसरा प्रहर हा काळ मुख्य आहे. म्हणजे त्या काळात जगणा-या दोन नायकांची ही रुढार्थाने कथा आहे. शिवाय या दोन्हींमध्ये पात्रांची संख्या अगदी मोजकी आहे. ही कथानके तशी फार नावीन्यपूर्ण नाहीत, पण वाचनीय नक्कीच आहेत.

लेखिका काहीतरी सांगू पाहतेय, ते आपल्यापर्यंत पोहचतेही. पण थेटपणे भिडते का, याचे उत्तर फारसे समाधानकारकपणे देता येत नाही. पण लेखिकेनं या दोन्ही कादंब-यांच्या निमित्ताने वाधर्क्यातील माणसांविषयी काही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते प्रश्नोपनिषद समजून घ्यायला हवे.

विजयाबाईंनी काही वर्षापूर्वी ‘मराठीतील काही कादंब-या या भरकटलेल्या कथा आहेत, असे म्हटले जाते. त्याला धरून असे म्हणता येईल की काही कथा या गुदमरलेल्या कादंब-या आहेत,’ असे विधान केले होते. त्याची इथे आठवण इथे होते, पण ती निराळ्या अर्थाने. कारण प्रस्तुत पुस्तक वाचून वाटते की, हा काही नियम असेलच असे मानायचे कारण नाही. किमान या पुस्तकाला तरी ते लागू पडत नाही. कारण विषयाच्या आवाक्यानुसारच त्यांची लांबी आहे. त्याला कादंबरी म्हणा किंवा लघुकादंबरी फारसा काही फरक पडत नाही. पण हे सगळे आपले वाचक म्हणून. अभ्यासू समीक्षकांची मते कदाचित वेगळीही असू शकतात.

तीन प्रहर : विजया राजाध्यक्ष, राजेंद्र प्रकाशन, मुंबई

‘मायाबाजारा’तली माणसं!

या संकलनात मंटोनं लिहिलेली बारा व्यक्तिचित्रं आहेत आणि त्या सर्वच व्यक्ती हिंदी चित्रपटसृष्टीतील आहेत. यात अशोककुमार, नर्गिस, नसीम बानो, बाबूराव पटेल, सितारा, नूरजहाँ या परिचित नावांचा समावेश आहे, तसाच कुलदीप कौर, रफ़ीक ग़ज़नवी, बी. ए. देसाई, नवाब काश्मिरी, पारो, श्याम अशी काही फारशा चित्रपटशौकिन नसणा-यांसाठी अपरिचित म्हणावी अशीही नावं आहेत.

मंटो हाच मुळात कलंदर आणि वेडापीर म्हणावा असा लेखक! जगण्याशी सतत चार हात करत अनेक लेखकांना सतत प्राप्त परिस्थितीशी झगडावं लागतं. पण मंटोला तर त्याच्या लेखनाशीही झगडावं लागलं. त्याच्या लेखनावरून अनेकदा गदारोळ झाले, कोर्टकचे-या झाल्या; त्याचा मंटोला खूप मनस्तापही झाला. मंटो आपल्या परीनं झगडत राहिला. त्यात काही काळ मंटो मुंबईतल्या हिंदी चित्रपटसृष्टीतही झगडत होता. त्या काळात मंटोचा पडद्यावरील आणि पडद्यामागच्या अनेक कलाकारांशी संपर्क आला. मंटो मुळात माणसांचा लोभी होती. त्याला माणसं आवडायचीच. तो सतत माणूस समजून घेण्याचा प्रयत्न करत असायचा. त्याच्या कथा वाचताना याचा सातत्यानं प्रत्यय येत राहतो.

या संकलनाच्या मलपृष्ठावर मुहम्मद हसन अस्करी यांचा अभिप्राय आहे. तो असा- ‘‘मंटोच्या दृष्टीने कोणताही माणूस मूल्यहीन नव्हता. तो प्रत्येक माणसाला अशा विश्वासाने भेटायचा की त्याच्या अस्तित्वात कोणता ना कोणता अर्थ दडलेला असेल आणि एक ना एक दिवस हा अर्थ व्यक्त होईल. अशा विलक्षण माणसांबरोबर त्याला आठवडेच्या आठवडे भटकताना मी पाहिलं आहे. मला आश्चर्य वाटायचं की मंटो यांना कसं काय सहन करतो! पण मंटोला बोअर होणं माहीत नव्हतं. त्याच्यासाठी प्रत्येक मानवी जीवन आणि माणूस निसर्गाचं एक रूप होतं; तसंच प्रत्येक व्यक्ती मनोवेधक होती. चांगलं व वाईट, बुद्धिमान व मूर्ख, सभ्य व असभ्य असा प्रश्न मंटोजवळ जरादेखील नव्हता. त्याच्याजवळ माणसांचा स्वीकार करण्याची इतकी विलक्षण क्षमता होती की त्याच्यासोबत जो माणूस असेल, त्याच्यासारखाच तो व्हायचा.’’

या संकलनातली माणसं काही तशी सामान्य नव्हेत. मंटो ज्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत वावरत होता, तेव्हा ही माणसं फारशी नावारूपाला आली नव्हती, त्यातली काही नंतर बाहेरही पडली. पण अस्करी म्हणतात त्याप्रमाणे मंटोनं त्यांच्यासोबत जो काही काळ घालवला, त्यांचं काम पाहिलं, तो संपूर्ण काळच मंटोनं प्रत्येक व्यक्तिचित्रात उभा केला आहे. माणूस समजून घेताना मंटो त्याचा भवतालही समजून घेत असे. त्याच्या नजरेनं जगाकडे पाही. त्यामुळे ही सर्वच व्यक्तिचित्रं मनोवेधक झाली आहेत.

जगण्याचा संघर्ष, ऐश्वर्य आणि परत गतकाळाकडे हे चक्र उलटसुलट, तिरपागडं किंवा वाकडंतिकडं वाटय़ाला आलेल्या माणसांच्या कहाण्या काहीशा विदारक होतात. त्याला कधीकधी फार तार्किक कारणंही नसतात. पण कधीकधी चुकीचा काळ मात्र असतो. मंटोचे या संकलनातले नायक-नायिका तर ‘मायाबाजारा’तलेच होते आणि मंटोही त्यांच्यातच होता. त्यामुळे त्याच्यासाठी आतले-बाहेरचे असा हा प्रवास नव्हता. म्हणून या संकलनातून या बारा व्यक्तींबरोबर मंटोही तुकडय़ातुकडय़ातून उलगडतो.

याचा अनुभव अशोककुमारवरील पहिल्याच लेखात येतो. मंटोनं या लेखात अशोककुमार आणि बॉम्बे टॉकिजविषयी  लिहिलं आहे. अशोककुमारच्या अगदी साध्यासाध्या गोष्टीतून त्याच्या व्यक्तिमत्त्वावर पुरेसा प्रकाश टाकला आहे. पण त्याचवेळी या प्रकाशाचा एक झोत सतत मंटोवरही राहिला आहे. त्यामुळे या व्यक्तिचित्राचा शेवट अशोककुमारच्या नोटेशनवर न होता, तो मंटोचं पुढे काय होतं, या नोटेशनवर होतो.

नर्गिसच्या व्यक्तिचित्राची सुरुवातच फार मजेशीरपणे होते. मंटोची बायको आणि तिच्या दोन बहिणी मंटोच्या न कळत फावल्या वेळात वेगवेगळ्या अभिनेत्रींना फोन करून टाइमपास करत असतात. त्यात एकदा त्या नर्गिसला फोन करतात. तिची खूप तारीफ करतात. हा सिलसिला बरेच दिवस चालू राहतो. एकेदिवशी त्या नर्गिसला आपल्या घरी बोलावतात. नर्गिस जद्दनबाईला घेऊन त्यांना भेटायला जाते. पण नेमका त्याच दिवसी मंटो लवकर घरी येतो. मंटो त्या वेळी ‘फिल्मिस्तान’मध्ये नोकरी करत असतो. त्यामुळे जद्दनबाई त्याला फार चांगल्या पद्धतीनं ओळखत असतात. पण त्याविषयी त्याची बायको आणि मेहुण्या मंटोला काहीच सांगत नाहीत.

मंटोचीही ती नर्गिसशी पहिलीच भेट असते. पुढे मंटोनं नर्गिसच्या अभिनयाविषयी फार छान लिहिलं आहे. मंटो लिहितो, ‘‘नर्गिसने अभिनयाचे टप्पे हळूहळू गाठले, हे चांगलं झालं. एकाच उडीत तिने शेवटचा टप्पा गाठला असता तर चित्रपट पाहणा-या जाणकार मंडळींच्या व प्रेक्षकांच्या भावनांना अजाणतेपणाने दु:खाचा स्पर्श झाला असता. आपल्या अल्लडपणाच्या वयातही ती चित्रपटाच्या पडद्याबाहरेही अभिनेत्री बनून राहिली असती आणि चलाख व धूर्त व्यापाराच्या फुटपट्टीने आपलं आयुष्य मोजत राहिली असती.’’ शेवटी मंटोनं लिहिलं आहे, ‘‘शेवटी आयुष्य म्हणजे छाया-प्रकाशाची गुंफण आहे. या छाया-प्रकाशाच्या गुंफणीचं चित्रण म्हणजे हे फिल्मी जीवन! पण कधी कधी या फिल्मी जीवनात असा काही पेच पडतो, असं काही वळण येतं की प्रकाश हा प्रकाश उरत नाही, सावली ही सावली उरत नाही.’’

मेरठची कैची अर्थात पारो या अभिनेत्रीविषयी लिहिताना मंटोनं परत अशोककुमार यांच्याविषयीही लिहिलं आहे. कारण ही अभिनेत्री ‘फिल्मिस्तान’ची होती. पारो ही मेरठची वारांगना होती. हिंदी चित्रपटात काम करण्याच्या आवडीपायी ती ‘फिल्मिस्तान’मध्ये आली. तिनं काही चित्रपटही केले. पण त्यापेक्षा मंटोनं पारोचं व्यक्तिमत्त्व ज्या पद्धतीनं उभं केलं आहे, ते वाचून पाहण्यासारखंच आहे.

असं यातल्या सर्वच व्यक्तिचित्रांबद्दल सविस्तर लिहिता येईल. लिहायलाही हवं. पण लक्षात घेण्याचा मुद्दा असा की, मंटोनं या संकलनातल्या प्रत्येक व्यक्तिचित्रात अशी काही जादू भरली आहे की, तुम्ही  प्रत्येक व्यक्तीमध्ये गुंतत जाता. या काही विजयाच्या कहाण्या नाहीत. मंटोनं कुणाचंही उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला नाही, तसंच कुणाचं खच्चीकरणही केलं नाही. त्यानं जे जे आहे ते ते तसं सांगितलं आहे. त्यामुळे यातल्या सर्वच व्यक्तिचित्रांमध्ये परस्परविसंगती, विसंवाद, संघर्ष, संकटं, मान-सन्मान, कौतुक, मानहानी, अशा अनेक गोष्टी येतात. विजय तेंडुलकरांनी एके ठिकाणी म्हटलं आहे, ‘काही व्यक्ती या तुकड्या तुकड्यांनी लहान-मोठ्या असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही तुकडे मोठे असतात, काही तुकडे लहान असतात.’ मंटोची ही बारा व्यक्तिचित्रं अगदी तशीच आहेत.    


मुंबई नगरी बडी बांका

कुठल्याही शहराच्या स्थित्यंतराचा आलेख सातत्याने काढत राहणं, हे त्या शहराच्या स्थानीय इतिहासाच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्वाचं असतं. मुंबई हे तर जगातलं एक महत्त्वाचं शहर आहे. त्याची न्यूयॉर्क आणि लंडनसारख्या शहराशी काहीशी अतिशयोक्त असली तरी तुलना केली जाते. मुंबईचं शांघाय वा सिंगापूर करण्याचीही भाषा राजकारणी मंडळी अधूनमधून करत असतात. मुंबईबद्दल बोलायला लागलो की, मूळ सात बेटं आणि ती जोडल्यानंतर वसत गेलेलं शहर, ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक इथे गुजरात आणि इतर ठिकाणांहून आणलेली माणसं, सुरुवातीचं मुंबई शहर अशा अनेक गोष्टींना सुरुवात होते. अठराव्या-एकोणिसाव्या शतकातली मुंबई ही खरोखरच काहीशी अद्भुत, रंजक आणि मनोरम्य म्हणावी अशी होती. ‘जिवाची मुंबई’ हा शब्दप्रयोग त्या मुंबईच्या भ्रमंतीतूनच तयार झाला असावा.

मुंबईचं वैभव म्हणजे मुंबईतल्या भव्य आणि प्रेक्षणीय वास्तू. या बव्हंशी वास्तू तयार करण्यात ब्रिटिशांचा मोठा वाटा आहे. ब्रिटिश ज्या ब्रिटनचे नागरिक त्यातल्या लंडन या शहराचं वास्तूवैभव तर कितीतरी प्रचंड आणि भव्य म्हणावं असं आहे. लंडन या शहराबद्दल किती पुस्तकं असावीत? साधारणपणे 25,000 पुस्तकं या एकटय़ा शहराविषयी आहेत, असं सांगितलं जातं. या पुस्तकांमध्येही कितीतरी प्रकारचं वैविध्य आहे. एकोणिसाव्या शतकातल्या लंडनमधील फॅशन, एकोणिसाव्या शतकात प्रकाशित झालेल्या पुस्तकांतील लंडन, 1945 नंतरचं लंडन, पहिल्या महायुद्धापूर्वीचं लंडन, दुस-या महायुद्धानंतरचं लंडन अशी कितीतरी विषयांवरील पुस्तकं आहेत. आणि अजूनही लिहिली जात आहेतच.

अगदी एवढय़ा प्रमाणावर नसलं तरी मुंबईविषयीचं कुतूहल आणि आकर्षणही काहीसं असंच म्हणावं लागेल. त्यात परकीय लेखकांपासून स्वकीयांपर्यंत अनेक अभ्यासकांचा समावेश आहे. अलीकडेच दिवंगत झालेल्या शारदा द्विवेदी यांची मुंबईवरील देखणी कॉफीटेबल बुक्स अनेकांना माहीत असतील. ‘बिहाइंड द ब्यूटीफूल फॉरेव्हर - लाइफ, डेथ अँड होप इन अ मुंबई अण्डरसिटी’ हे अलीकडेच प्रकाशित झालेलं कॅथरीन बू या अमेरिकन महिला पत्रकाराचं पुस्तक सध्या भारतीय इंग्रजी वाचकांमध्ये बरंच गाजतं आहे. मुंबईतल्या अधोविश्वाबद्दलचं हे पुस्तक आहे.

मराठीमध्ये एखादं पुस्तक गाजत आहे, असं म्हणण्याची सोय नाही, पण अलीकडेच प्रकाशित झालेल्या अरुण पुराणिक यांच्या ‘हरवलेली मुंबई’ या पुस्तकाची अवघ्या दोन महिन्यात दुसरी आवृत्ती निघावी, ही या पुस्तकाबद्दलची वाचकपसंती नोंदवणारी उल्लेखनीय घटना म्हणावी लागेल. चौरस आकार, भरपूर कृष्णधवल छायाचित्रं, देखणी छपाई आणि पुराणिक यांनी कष्टपूर्वक, अभ्यास करून नोंदवलेली मुंबईच्या काही वैशिष्टय़ांची सफर ही या पुस्तकाची काही महत्त्वाची वैशिष्टय़ं. तसं तर संशोधन करून कुठल्याही विषयावर पुस्तक लिहिणं हे काही विशेष नवलाचं मानायचं कारण नाही. पण याबाबतीत पुराणिक बरेचसे सरस आहेत. कारण ते मूळचे मुंबईकर. त्यांचा जन्म गिरगावातल्या एका जुन्या चाळीत झाला. त्यामुळे लहानपणापासून त्यांना मुंबईची ओळख होत गेली. (मुंबईतल्या वेश्या पाहिल्याची त्यांची आठवण ते दोन वर्षाचे असतानाची आहे.) पण लहानपण आणि तरुणपण या काळात पुराणिकांनी पाहिलेली मुंबई आता राहिली नाही. त्याच्या काही खुणाच तेवढय़ा शिल्लक राहिल्या आहेत. त्याही आता एकेककरून नाहीशा होत आहेत. गिरणगावातले उंचच्या उंच टॉवर आणि मॉल यांनी लालबाग-परळचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. मुंबईच्या जुन्या साऱ्याच वैशिष्टय़ांचा चेहरा असा बदलला नसला तरी तो पहिला राहिलेला नाही, हेही तितकेच खरे.

मुंबईचं ही सर्व स्थित्यंतर टिपणं तसं अवघडच होतं. त्यामुळे पुराणिक यांनी आपल्या या पुस्तकात दक्षिण मुंबईवरच भर दिला आहे. शिवाय हे लेख त्यांनी सुटेसुटे वेगवेगळ्या वेळी लिहिले आहेत. पण हा प्रत्येक लेख म्हणजे मनोरम्य आणि रंजकतेची परमावधी म्हणावी असा आहे. ‘चोर बाजार’ या लेखात पुराणिक लिहितात, ‘‘त्यावेळी सॅण्डहर्स्ट रोडवरून जाताना, नळ बाजाराच्या समोरच्या गल्ल्यातून, ‘रास्ते का माल सस्ते में’, ‘जुना पुराना सामान’, ‘बे बे रुपया, कोई भी माल उठाव’, ‘मिठा खाजा, बै पैसा’ असे तारसप्तकात ओरडत रस्त्यावर आपला माल विकणाऱ्या या मुस्लीम फेरीवाल्यांचा (काबाडी लोकांचा) आवाज (तत्कालीन व्हाईसरॉयच्या) त्यांच्या कानी पडला. त्या काळात विरळ लोकवस्ती व रस्त्यांवर गाडय़ांची फराशी रहदारी नसल्याने रस्त्यांवर शांतता नांदत असे. तेव्हा फेरीवाल्यांच्या आवाजाच्या त्रासाला त्रासिकपणे ‘क्या शोर बाजार है’ असे म्हणून व्हाइसरॉयसाहेबांनी नाक मुरडले होते. त्यावरून या जुन्या बाजाराचे नाव ‘शोर बाजार’ पडले. लोकांनी त्याचा ‘चोर बाजार’ असा अपभ्रंश केला.’’ अशी माहिती दिली आहे. हा लेख इतका मजेशीर आहे की, असा काहीएक बाजार मुंबईत आहे याचाच आपल्याला अचंबा वाटतो.

पुस्तकातला पहिलाच लेख आहे चाळसंस्कृतीविषयी. (अलीकडेच नीरा आडारकर यांनीही मुंबईतल्या चाळींविषयी इंग्रजीमध्ये कॉफीटेबल बुक काढलं आहे!) या लेखासोबतची छायाचित्रं पाहण्यासारखी आहेत. गिरगाव, ठाकूरद्वार या भागातल्या चाळींची काही वैशिष्टय़े नोंदवली आहेत. ‘‘पहाटे दुधाच्या लाईनीत उभे राहण्यापासून ते रात्री गच्चीत झोपायला जागा मिळेपर्यंत इथे फक्त संघर्ष आणि संघर्षच असतो. इथे वेळप्रसंगी भांडण, मारामारी केल्याशिवाय मूल मोठेच होऊ शकत नाही, हे कटू वास्तव आहे. त्यामुळे ‘धाडस’ त्यांच्या रक्तात नकळत बाणवले जाते.’’ असे पुराणिक शेवटी शेवटी लिहितात तेव्हा या चाळीतल्या विश्वाची ‘खरी गंमत’ कळते. आणि ते जग यापुढच्या काळात पाहायला आणि अनुभवायला मिळणार नाही, याची चुटपूटही लागते.

या पुस्तकात एकंदर वीस लेख आहेत. ‘गिरगाव चौपाटी’, ‘पानसुपारी’, ‘पानवाला’, ‘अलेक्झांड्रा’, ‘नाक्यावरचा इराणी’, ‘मुंबईतील पोसखाने’, ‘रामा गडी’ या शीर्षकांवरूनच त्या त्या लेखाचा विषय समजतो आणि त्या लेखांना दिलेल्या समर्पक छायाचित्रांतून जिवंत होतो. खरं तर या सर्वच लेखांबद्दल, त्यांच्या वैशिष्टय़ांबद्दल लिहिता येईल. पण ते जागेच्या मर्यादेअभावी शक्य नाही. आणि त्यातून वाचकांची रंजकताही कमी होण्याचा धोका आहे. कारण चित्रपटाचा शेवट जसा सांगू नये तसा या पुस्तकातल्या कुठल्याच लेखाचा गाभा सांगण्यात हशील नाही. तो प्रत्यक्ष वाचूनच अनुभवायला हवा.

पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे पुस्तक कुणासाठी आहे? मुंबईविषयीचे आहे म्हणून ते फक्त मुंबईकरांसाठी आहे, असे अजिबात नाही. ज्या ज्या कुणाला मुंबईविषयी प्रामाणिक कुतूहल आहे, तिच्या जुन्या रूपाबद्दल आस्था आहे आणि स्थानिय इतिहासामध्ये रस आहे, त्या सर्वासाठी हे पुस्तक आहे. ही काही कथा-कादंबरी नाही, ही मुंबई शहराची एक धावती सफर आहे. तुम्ही या पुस्तकातली ठिकाणं प्रत्यक्षात पाहिली असतील तर तुम्हाला पुनप्र्रत्ययाचा आनंद मिळेल, पाहिली नसतील तर हे पुस्तक वाचून ती पाहण्याची इच्छा होईल. म्हणजे त्या जुन्या मुंबईचे आत्ता जे काही अवशेष शिल्लक आहेत, ते पाहता येतील. जुनी मुंबई आता अनुभवता येणार नाहीच, त्यामुळे त्यासाठी हे पुस्तक हाच काय तो काळ समजून घेण्याचा एक दुवा आहे.

Thursday, July 17, 2014

चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील गेली ४० वर्षे प्रामुख्याने हिंदी कवितांचा मराठी अनुवाद करीत आहेत. तो व्यावसायिक हेतूने नसून केवळ आणि निव्वळ कवितेवरील प्रेमापोटी करीत आहेत. म्हणूनच अनुवादाचा पेशा स्वीकारलेल्या या प्राध्यापकाच्या निष्ठेला महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमीने नुकताच जाहीर केलेला पुरस्कार हा त्यांच्या साहित्यसेवेला केलेला सलामच म्हटला पाहिजे. औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयातून वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेले पाटील म्हणजे हिंदी-मराठी या भाषांमधला एक महत्त्वाचा सांस्कृतिक दुवा. भीष्म सहानींच्या 'तमस'च्या त्यांनी केलेल्या मराठी अनुवादाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, तसाच त्यांनी मराठीतल्या दलित कवितांचा 'सूरज के वंशधर' या नावाने केलेला हिंदी अनुवादही वाखाणला गेला. नामदेव ढसाळ यांच्या कविता पहिल्यांदा महाराष्ट्राबाहेर पोहोचवल्या त्या त्यांच्या हिंदी अनुवादाने. 'समकालीन हिंदी कविता' या त्यांच्या संग्रहातून मैथिलीशरण गुप्त यांच्यापासून असद झैदींपर्यंतच्या हिंदूी कवींच्या कविता मराठीत आल्या. हिंदी कवितेसाठीचे मार्गदर्शक म्हणावे असे हे पुस्तक आहे. 'भूखंड तप रहा है' ही चंद्रकांत देवताले यांची दीर्घ कविता 'भूखंड तापू लागलंय' या नावाने त्यांनी मराठीत आणली. २००८ साली पाटील यांनी 'कवितान्तरण' हा अनुवादित कवितांचा पाचशेहून अधिक पृष्ठांचा संग्रह प्रकाशित केला. त्यात शंभरावर देशी-विदेशीकवींच्या एकंदर जवळपास ४०० कविता (मराठीत!) आहेत. एकाच कवीने विविध भाषांमधील, वेगवेगळ्या काळांतील आणि अतिशय भिन्न प्रकृतीच्या कवितांचा मराठीला परिचय करून द्यावा, यातून त्यांची सांस्कृतिक असोशी दिसते. या संग्रहासाठी त्यांना महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. हिंदूीबरोबरच इंग्रजी, पंजाबी व कन्नड भाषेतील कविताही त्यांनी मराठीत आणल्या.
थोडक्यात, अनुवादाच्या क्षेत्रात असामान्य म्हणावे असे कर्तृत्व पाटील यांच्या नावे जमा आहे. चोखंदळ काव्यदृष्टी आणि कवितेवरील अव्यभिचारी निष्ठा यांचे निरंतर पाठबळ लाभलेल्या पाटील यांनी सुरुवातीपासून मराठीतल्या लघुअनियतकालिकांच्या चळवळीत अशोक शहाणे- भालचंद्र नेमाडे- रवींद्र किंबहुने- सतीश काळसेकर यांच्याबरोबर काम केले. औरंगाबादला त्यांनी नेमाडे आणि इतरांबरोबर सुरू केलेले 'वाचा प्रकाशन' बरेच वादळी ठरले होते. त्यानंतर त्यांनी अगदी अलीकडे 'तुला प्रकाशन' या नावाने काही कवितासंग्रह प्रकाशित केले होते. 'नि:संदर्भ', 'इत्थंभूत', 'बायका आणि इतर कविता', 'दिक्काल' हे पाटील यांचे स्वतंत्र कवितासंग्रह, तर 'आणि म्हणूनच', 'कवितेसमक्ष' ही काव्यसमीक्षेची पुस्तके, 'चौकटीबाहेरचे चेहरे' आणि 'विषयांतर' या दोन लेखसंग्रहात त्यांनी वेगवेगळ्या साहित्यिकांवर लिहिलेले लेखही विशेष उल्लेखनीय आहेत.

जया दडकर

काही माणसांना मानमरातब, प्रसिद्धी, कौतुकसोहळे यांच्याशी काडीमात्र देणंघेणं नसतं. असिधाराव्रतासारखं ते आपलं काम करत असतात. मराठीतील ज्येष्ठ लेखक जया दडकर हे अशा कलंदर वल्लींपैकीच एक नाव.
 'एक लेखक आणि एक खेडे', 'चिं. त्र्यं. खानोलकरांच्या शोधात', 'वि. स. खांडेकर सचित्र चरित्रपट' ही महत्त्वपूर्ण पुस्तकं आणि 'प्रकाशक रा. ज. देशमुख', 'संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश' (खंड १, सहसंपादक), 'श्री. दा. पानवलकर', 'निवडक पत्रे - नरहर कुरुंदकर' ही संपादनं दडकर यांच्या वेगळेपणाची, व्यासंगाची आणि परिश्रमाची उत्तम म्हणावीत अशी उदाहरणं आहेत. अस्सल मुंबईकराची जिद्द आणि संशोधकीय बाणा दडकर यांच्या व्यक्तिमत्त्वात मुरलेला आहे. रूढ चरित्रलेखन वा ललितरम्यतेऐवजी वेगळ्या तऱ्हेने माणसाचा तळठाव शोधत, त्याचा गाभा आणि आवाका उलगडण्याची दडकर यांची हातोटी विलक्षण आहे. खांडेकरांचा चरित्रपट काय किंवा खानोलकरांचा शोध, यातून दडकर यांची कसोशी आणि असोशी दृग्गोचर होते. श्री. पु. भागवतांचा सहवास आणि लघुनियतकालिकांची सोबत या दोन्ही गोष्टींचे धनी होण्याची संधी दडकर यांना मिळाली. म्हणूनच 'ललित' या ग्रंथप्रसारासाठी वाहिलेल्या मासिकाचा सुवर्णमहोत्सव आणि केशवराव कोठावळे पारितोषिकाचं तिसावं वर्ष यांचं औचित्य साधून या वर्षी दिलं जाणारं केशवराव कोठावळे पारितोषिक दडकर यांच्या 'दादासाहेब फाळके- काळ आणि कर्तृत्व' या ग्रंथाला मिळावं, ही जणू औचित्याची परमावधीच. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके यांची मराठीमध्ये तत्पूर्वी तीन चरित्रं लिहिली गेली होती. पण त्यातून फाळके यांना न्याय मिळत नाही, हे लक्षात आल्यावर दडकर यांनी फाळके नावाच्या महत्त्वाकांक्षी, प्रचंड हुन्नर असलेल्या जिगरी माणसाचं कालातीत कर्तृत्व त्यांना साजेलशा विस्तृत कॅनव्हासवर मांडण्याचा प्रयत्न केला. दडकर यांनी ज्या जागतिक परिप्रेक्ष्यात फाळके यांचं कर्तृत्व पाहिलं, त्यातून फाळके यांची भव्यता नेमकेपणाने अधोरेखित होते. फाळके भारतीय चित्रपटाचा श्रीगणेशा करत असताना जागतिक चित्रपटसृष्टीची वाटचाल कशा पद्धतीने होत होती याचा त्यांनी घेतलेला सविस्तर आढावा स्तिमित करतो. मराठीमध्ये अशा प्रकारच्या चरित्रलेखनाची पद्धत फारशी रूढ नाही, त्यामुळे २०११ साली प्रकाशित झालेल्या या चरित्राकडे कसं पाहावं, ते कसं वाचावं हे मराठी समीक्षक-वाचकांना ठरवता आलं नाही. त्यामुळे या चरित्राची व्हावी तशी चर्चा झाली नाही. 'देखल्या देवा दंडवत' या न्यायाने का असेना, आता तरी वाचक या चरित्राकडे वळतील अशी आशा करू या.

रवीन्द्र गोडबोले

प्रकाशन व्यवसायात ते काहीसे अपघातानेच आले. पुण्याच्या 'देशमुख आणि कंपनी'चे रा.ज. आणि सुलोचना देशमुख यांच्यानंतर या प्रकाशन संस्थेची मालकी गोडबोले यांच्याकडे आली. ते सुलोचनाबाईंचे भाचे. रा. ज. यांच्या निधनानंतर सुलोचनाबाईंना ते प्रकाशनाच्या कामात १९९५ पासून मदत करू लागले होते. ९८ मध्ये सुलोचनाबाईंचे निधन झाल्यावर त्यांनी 'देशमुख आणि कंपनी'चा प्रकाशन व्यवहार पूर्णपणे  बघायला सुरुवात केली. प्रकाशनासाठी कुठलेही पुस्तक स्वीकारताना संबंधित लेखकाबरोबर सविस्तर चर्चा करून त्याला पुन:पुन्हा त्याच्या हस्तलिखिताचे पुनर्लेखन करण्यास उद्युक्त करून त्याचे पुस्तक शक्य तितके परिपूर्ण करण्यावर गोडबोले यांचा कटाक्ष असे. त्यामुळे एकेका पुस्तकावर ते तीन तीन वर्षे काम करत. 'वेध महामानवाचा' (शिवाजी महाराजांवरील श्रीनिवास सामंत यांची कादंबरी), 'निवडक माटे', 'बा. भ. बोरकरांची समग्र कविता', 'धर्मक्षेत्रे-कुरुक्षेत्रे' (विश्वास दांडेकर), 'उत्तरायण' (रवींद्र शोभणे), 'निवडक कुरंदकर' अशी मोजकीच, पण महत्त्वाची पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. गेल्या तीन वर्षांत त्यांनी केवळ दोनच कादंबऱ्या प्रकाशित केल्या. गोडबोले हे व्यवसायाने केमिकल इंजिनीअर. काही काळ त्यांनी विविध नोकऱ्याही केल्या. नंतर महाविद्यालयातल्या तीन मित्रांबरोबर त्यांनी अ‍ॅक्व्ॉरिअस टेक्नॉलॉजीज ही कंपनी १९९१ साली सुरू केली. बांधकामाला लागणारी वेगवेगळ्या प्रकारची यंत्रसामग्री ते बनवत. रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग दर्शवणारे पट्टे, भिंतींना प्लास्टर करणारे यंत्र यांची भारतातील पहिली निर्मिती त्यांचीच. या कंपनीच्या अनेक उत्पादनांची युरोपकडे मोठय़ा प्रमाणावर निर्यात केली जाते. या कामातही त्यांची विचक्षण दृष्टी पाहायला मिळते. थोडक्यात गोडबोले निराळ्या वाटेने विचार व कृती करणारे आणि प्रत्येक कामात अचूकतेचा आग्रह धरणारे प्रकाशक आणि उद्योजक होते. विचाराने आधुनिक असले तरी गोडबोले यांना प्राचीन भारतीय संस्कृतीबद्दल डोळस कौतुकही होते. त्यामुळे परंपरा आणि आधुनिकता यांचा अतिशय चांगला संगम त्यांच्यामध्ये पाहायला मिळत असे.
गेल्या पाचेक वर्षांत त्यांना महाभारताने झपाटले होते. महाभारताच्या प्रमाण संहितेपासून या विषयावरील अनेक पुस्तकांचे त्यांनी अतिशय बारकाईने वाचन केले होते. त्यातून 'महाभारत- संघर्ष आणि समन्वय' या पुस्तकाची निर्मिती झाली. महाभारताकडे इतक्या चिकित्सेने पाहणारा इरावती कर्वे यांच्या 'युगान्त'नंतरचा हा ग्रंथ असे त्याचे वर्णन जाणकारांनी केले आहे. 'औरंगजेब- शक्यता आणि शोकांतिका', 'सम्राट अकबर', 'इंद्राचा जन्म' आणि 'वेदांचा तो अर्थ' या चार संशोधनपर पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. ही पुस्तके म्हणजे त्यांची चिरस्थायी ओळख ठरेल.

नदीन गॉर्डिमर

20 November 1923 – 13 July 2014
वर्णविद्वेषाच्या काळ्याकुट्ट अरण्याला भेदत जाणारी लेखिका म्हणून नदीन गॉर्डिमरचे नाव १९९१ सालच्या नोबेल पुरस्काराने सर्वतोमुखी झाले असले तरी ती त्याआधी कित्येक वर्षांपासून रस्त्यावर आणि कागदावर त्या विरोधात सातत्याने झगडत होती. नदीनचे वडील ज्यू तर आई ब्रिटिश. व्यवसायानिमित्त हे कुटुंब दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाले. वडिलांच्या दुकानात येणाऱ्या काळ्यांना ज्या तुच्छतेने वागवले जाई, ते पाहून लहानग्या नदीनच्या संवेदनशील मनावर ओरखडे उमटत. या ओरखडय़ांनी नदीन वयाच्या नवव्या वर्षांपासूनच लिहायला लागली. पंधराव्या वर्षी तिचे पहिले पुस्तक  प्रकाशित झाले.
आफ्रिकेत काळ्या-गोऱ्या वर्णसंघर्षांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांमध्ये काही गोरेही होते. त्यापैकी एक बुलंद आवाज होता नदीनचा. महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंगाच्या धर्तीवर 'आफ्रिकन नॅशनल काँग्रेस' शांततामय मार्गाने काम करीत असे. त्यात नदीन रुजू झाली. गोऱ्या सत्ताधीशांना नदीनचा हा संघर्ष कळत नव्हता. 'ही बया, गोरी असून काळ्यांच्या बाजूने का लढते?' असा त्यांचा सवाल असे. पण नदीन आपल्या अवतीभवती काळ्यांना जनावरांपेक्षाही अमानुष पद्धतीने वागवले जात असताना पाहूच शकत नसे. तिचा शांत स्वभाव अशा वेळी चवताळून उठे, तिच्या आवाजाला आणि शब्दांना धार येई. तिचे हे प्रखर शब्द आफ्रिकन सरकारला चटके देऊ लागले, तेव्हा 'द लेट बर्जर्स वर्ल्ड', 'अ वर्ल्ड ऑफ स्ट्रेंजर्स', 'बर्जर्स डॉटर', 'जुलैज पीपल' या तिच्या चार पुस्तकांवर सरकारने बंदी घातली. यातील पहिल्या दोन्ही पुस्तकांवरील बंदी दशकाहून अधिक काळ होती. मग नदीनची लढाई सेन्सॉरशिपच्या विरोधातही सुरू झाली. नदीनसाठी परदु:ख शीतल नव्हतेच. दु:खात असा भेदभाव करताच येत नाही, याचा वस्तुपाठ म्हणजे नदीनच्या कादंबऱ्या आणि कथा. १९९१ साली तिला नोबेल जाहीर करताना समितीने, 'तिच्या भव्य महाकाव्यासारख्या लेखनात परदु:खाबद्दलची तिची आत्मीयता प्रखरपणे प्रकट होते' असे नमूद केले. नोबेलबद्दल नदीनचे नेल्सन मंडेलांकडून अभिनंदन अपेक्षितच होते, पण जेव्हा तत्कालीन (आणि द. आफ्रिकेचे शेवटचे गोरे) राष्ट्राध्यक्ष फ्रेडरिक विलेम दि क्लर्क यांनीही तिचे अभिनंदन केले, तेव्हा नदीनला एक संघर्ष तडीस गेल्यासारखे वाटले. १५ कादंबऱ्या, २० कथासंग्रह आणि पाच लेखसंग्रह लिहिणारी नदीन जशी समर्थ लेखिका होती, तशीच समर्थ कार्यकर्तीही होती आणि तितकीच समर्थ आईसुद्धा. नव्वदच्या दशकात आफ्रिकन समाजाला एड्ससारख्या दुर्धर आजाराने ग्रासायला सुरुवात केली, तेव्हा त्याविषयी नदीनने तडफेने आणि हिरिरीने जनजागृती केली. ही संघर्षयात्रा १३ जुलै रोजी तिच्या निधनाने संपली.

Friday, July 11, 2014

ये मेरी जोहराजबीं तुझे मालूम नहीं....

Zohra Sehgal  (27 April 1912 – 10 July 2014)
'टायटॅनिक' जहाज तब्बल १०२ वर्षांपूर्वी- म्हणजे १९१२ साली बुडाले, त्याच वर्षी जोहरा सेहगल जन्मल्या. हा निव्वळ योगायोग. त्या बुडालेल्या जहाजाशी जोहरा यांचा ओढूनताणून संबंध लावणे चूकच ठरेल. जगाला गवसणी घालण्याची जिद्द आणि तरीही आपला प्रवास आपल्याच वेगाने करण्याचा स्वभाव जोहरा यांच्याकडे होताच, पण मजेत जगण्यासाठी आवश्यक असलेली वैचारिक आणि सांस्कृतिक समृद्धीही त्यांच्याकडे होती. या चैतन्यमयी आयुष्याची आनंदयात्रा आता निमाली आहे. एका शतकभराच्या साक्षीदार होण्याचे भाग्य लाभलेल्या सेहगल यांची सगळी आयुष्ययात्रा ही धाडसाची, संघर्षांची पण चैतन्याने रसरसलेली होती. त्यांच्या या प्रवासात हिंदी चित्रपटांचा किनारा जरा उशिराच आला. आज अनेकांना त्या आठवत असतील 'चीनी कम'मधील अमिताभ बच्चनच्या आईच्या भूमिकेसाठी. खुद्द अमिताभ यांनाही ही आई संस्मरणीय वाटली होतीच, मग चाहत्यांची काय कथा. 'माय' लागून गेलेल्या या आजीने वयाच्या ९५ वर्षी उत्साह, ऊर्जा, चैतन्य याबाबतीत या तगडय़ा अभिनेत्याला खरोखरीची तुल्यबळ साथ दिली. अशी साथ मिळाली की माणसे स्पर्धा करीत नाहीत, विनम्रपणे दुसऱ्याचे गुण स्वीकारतात. अमिताभ यांनीही म्हणे या चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर जोहरा यांच्या प्रशंसेसाठी शम्पेन पाठवले आणि सोबत एक चिठ्ठी.. 'तुम्हालाही कदाचित माझ्यासह काम करणे आवडले असेल, अशी आशा आहे. तुमच्यासह काम करणे हा माझ्यासाठी नवलोत्सव होता.. तुमची अदम्य ऊर्जा साऱ्याच तरुणांना स्फूर्ती देणारी आहे'! अर्थात, या स्तुतीने जोहराआजी फुशारल्या नसतील.. लॉरेन्स ऑलिव्हिए, पृथ्वीराज कपूर, सई परांजपे, त्याहीआधी दिग्गज नर्तक उदय शंकर अशांसह काम करण्याची सवयच त्यांना झालेली होती.
उत्तर प्रदेशातील खानदानी मुसलमान कुटुंबातला जोहरा यांचा जन्म. हे घराणे ब्रिटिशांच्या आगमनानंतरही नोकझोक टिकवून राहिलेले. वाघिणीच्या दुधाचा स्वीकार करणारे आणि आचारविचारानेही तरक्कीपसंद. त्यामुळेच, शालेय शिक्षण पूर्ण होता-होता 'लग्नापेक्षा करिअरच करेन म्हणते मी' असे जोहरा म्हणाल्यावर काका, भाऊ यांच्याकडून पाठिंबाच मिळाला. वयाच्या अठराव्या वर्षी त्या जर्मनीला नृत्य शिकायला गेल्या. तीन वर्षांनी भारतात परत आल्यावर, भारतीय नृत्यशैलींचा प्रसार जगभर करणारे प्रसिद्ध नर्तक उदय शंकर यांच्या नृत्यसंस्थेत त्या रुजू झाल्या. पुढील आठ वर्षांतील त्यांचे जगभ्रमण याच संस्थेमार्फत झाले आणि इथेच त्यांना जन्माचा जोडीदारही मिळाला.. कामेश्वर सेहगल. लाहोरमध्ये स्थायिक होऊन या जोडप्याने स्वत:ची डान्स अकॅडमी सुरू केली. पण लवकरच फाळणीचे वातावरण सुरू झाले. हा देश की तो, याचा निर्णय घ्यावाच लागणार हे दिसू लागले, तेव्हा पतीसह त्या मुंबईला आल्या आणि इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) या संस्थेचा सांस्कृतिक आधार त्यांना सहज मिळाला. इप्टा हीच १९४०-५० या काळात मुंबईतील सर्वाधिक मोठी सांस्कृतिक चळवळ होती. मुंबईतील बुजुर्ग, जानेमाने आणि नवोदित कलाकार मोठय़ा संख्येने इप्टाशी संबंधित. उदय शंकरांच्या तालमीत वाढलेल्या सेहगल नाटय़ऋषी इब्राहिम अल्काझी आणि पृथ्वीराज कपूर यांच्या सहकारी झाल्या आणि त्यांच्या नृत्यकौशल्याला अभिनयाचे पैलू पडू लागले. जातिवंत कलाकाराला आपल्या कलेशिवाय बाकी साऱ्या गोष्टी शून्यवत वाटतात. त्यामुळेच, इप्टात चालून आलेल्या पदास नकार देऊन त्या पृथ्वीराज कपूर यांच्या 'पृथ्वी थिएटर्स'मध्ये आल्या. १९४५ ते ५९ पर्यंत त्यांनी पृथ्वीराज कपूर यांच्यासह 'दीवार' 'शाकुंतल',  'पठाण', 'गद्दार', 'आहुती', 'कलाकार', 'पैसा', 'किसान' अशा नाटकांची निर्मिती केली. 'पठाण'पासून नाटकात छोटय़ामोठय़ा भूमिकाही करायला सुरुवात केली. तब्बल १४ वर्षे त्यांनी पृथ्वीराज कपूर यांच्यासह काम केले. पतीच्या अपघाती निधनामुळे १९५९ साली जोहरा यांनी पृथ्वी थिएटरचा राजीनामा दिला आणि पुढच्याच वर्षी ही मातबर नाटय़संस्था बंद पडली.
जहाज बुडेलशी परिस्थिती असताना अंत:प्रवाह ओळखून जहाजाने नवा मार्ग शोधावा, तसे जोहरा यांनी पुढल्या दोन वर्षांत केले.. मुंबईऐवजी दिल्लीत राहून तेथील नाटय़संस्थेत काम आणि शंकर्स वीकलीमध्ये नृत्य समीक्षालेखन, अशी दुहेरी जबाबदारी जोहरा सांभाळू लागल्या. याच काळात तत्कालीन रशिया, पूर्व जर्मनी आणि झेकोस्लोव्हाकियाचा तीन महिन्यांचा दौरा करून, भारतीय नृत्य आणि नाटय़ाविषयी अनेक व्याख्याने त्यांनी दिली. मग १९६२ मध्ये अभिनय अभ्यासक्रमासाठी त्यांना ब्रिटिश शिष्यवृत्ती मिळाली आणि लंडनमध्ये त्यांच्या आयुष्यातील तिसरे पर्व सुरू झाले. तब्बल दशकभरच्या लंडन-वास्तव्यात सुरुवातीला त्यांनी कारकुनी केली, काही काळ चहाचे हॉटेलही चालवले. पण १९६६ मध्ये 'द लाँग डिस्टन्स डय़ुएल' या बीबीसीवर सादर होणाऱ्या कार्यक्रमात भूमिका मिळाली. मग बीबीसीच्याच रुडयार्ड किपलिंगवरील मालिकेत आणि इतर नाटकांत कामे मिळत गेली. तरीही १९७४ साली त्या दिल्लीला परतल्या. 'राष्ट्रीय लोकनृत्य पथका'चे काम केंद्र सरकारने त्यांच्यावर सोपवल्यामुळे, सर्व भारतीय भाषांतील लोकनृत्ये बसवून त्यांचे भारतभर प्रयोग जोहरा यांनी केले. पण लवकरच आणीबाणी लागू झाली आणि त्या एकाधिकारशाहीने या संस्थेचा बळी घेतला. इथे काही खरे नाही हे ओळखून त्या लंडनला परतल्या. १९८७ पर्यंत लंडनच्या रंगभूमीवरील तसेच बीबीसीवरील अनेक नाटकांत भूमिका केल्या. सर लॉरेन्स ऑलिव्हिए, दिग्दर्शक सर टायरॉन गथ्री, फिओना वॉकर, प्रिसिला मॉर्गन आणि जेम्स केरी या ब्रिटिश रंगभूमीवरील दीपस्तंभांबरोबर काम केले.
इप्टा, पृथ्वी थिएटर, लंडनमधील ओल्ड विक, द ब्रिटिश ड्रामा लीग, बीबीसी अशा चढत्या भाजणीच्या प्रवासात जोहरा यांची वाटचाल सुखकर झाली असे नाही. प्रत्येक वेळी विस्थापितासारखा त्यांना आपला गाशा गुंडाळून नव्या ठिकाणी स्वत:बरोबर आपल्या कलेचेही पुनर्वसन करावे लागले. पण त्या कधी हिंमत हरल्या नाहीत की त्यांनी आपली प्रतिभा आळसावू दिली नाही. मिळेल त्या मार्गाने त्या वाट काढत राहिल्या. आठ वर्षे उदय शंकर, १४ वर्षे पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर आणि तब्बल २५ वर्षे लंडनमध्ये टीव्हीवर काम केल्यावर सेहगल ८७ साली भारतात परतल्या तेव्हा खरे तर अनेक संधींनी त्यांच्यापुढे हात जोडून उभे राहायला हवे होते. पण त्यांना हिंदी चित्रपटांतील छोटय़ा छोटय़ा भूमिका कराव्या लागल्या. तरीही त्यांनी उतारवयात १५ इंग्रजी नाटके, २६ चित्रपट आणि १४ टीव्ही मालिकांत काम केले. १९९३ ते २००५ या काळात काव्य-अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम केले. जाहिरातींसाठीही विचारणा होऊ लागली आणि जोहरा नाही म्हणाल्या नाहीत.. अशाच एका जाहिरातीत  विवेक ओबेरॉय त्यांचा हात हातात घेऊन म्हणतो, 'ये मेरी जोहराजबी, तुझे मालूम नहीं..'    
 काम करण्याची अफाट ऊर्जा, 'जाऊ तिथे तगून राहू' ही महत्त्वाकांक्षा, यांच्या जोडीला जगण्यावरचे नितांत प्रेम या गोष्टींनी जोहरा सेहगल यांना कायम चिरतरुण ठेवले. त्यांना पडद्यावर पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असेच म्हणावेसे वाटत असणार. उत्फुल्ल रसिकता आणि सळसळते चैतन्य यांचे शतक साजरे करून, त्याहीवर दोन वर्षे जगून त्या गेल्या.. न फुटण्याचे वरदान कोणत्याही जहाजाला मिळालेले नसते, पण आपले जहाज कसे डौलात पुढे नेत राहायचे, हे समजावे लागते. त्यासाठी केवळ निर्णयशक्ती नव्हे तर तंत्रावरली हुकमत आणि कौशल्यही आवश्यकच असते. हे सारे जोहरा नावाच्या जहाजाकडे होते. त्यालाही काळाच्या समुद्राने कवेत घेतले.