Sunday, April 17, 2011

प्रगल्भ वाचकांचा घाम काढणारं पुस्तक



मराठीमध्ये दरवर्षी तीन हजार पुस्तकं प्रकाशित होतात. त्यातली जवळपास सत्ताविसशे पुस्तकं वाचायची तर सोडाच पण हातात घ्यायच्याही दर्जाची नसतात. उरलेल्या तीनशेंपैकी काही फक्त चाळण्यासाठी, काही नुसतीच पाहण्यासाठी, काही एकदा वाचून टाकून देण्यासाठी तर अगदीच थोडी पुन्हा पुन्हा वाचण्यासाठी असतात. हे विधान कुणाला थोडंसं अतिशयोक्तीपूर्ण वाटलं तरी दुर्दैवानं ते सत्य आहे!


अलीकडेच प्रकाशित झालेलं ‘नवी क्षितिजे’कार विश्वास पाटील यांचं ‘कार्ल मार्क्‍स- व्यक्ती आणि विचार’ हे पुस्तक मात्र पुन्हा पुन्हा वाचावं असं आहे. कार्ल मार्क्‍सचं इतकं गंभीर स्वरूपाचं चरित्र मराठीमध्ये याआधी लिहिलं गेल्याचं ऐकिवात, वाचनात आणि पाहण्यातही नाही.


विश्वास पाटील हे अतिशय अभ्यासू आणि दांडगे वाचक होते. केवळ वाचनाला वेळ देता यावा म्हणून त्यांनी भारत पेट्रेलियम (आधीची ‘बर्मा सेल’) या कंपनीत आयुष्यभर कनिष्ठ पदावर नोकरी केली; वरिष्ठांनी दिलेली अनेक प्रमोशन्स नाकारली. ‘नवी क्षितिजे’ या वैचारिक त्रमासिकाचं त्यांनी पंचवीसेक वर्षे संपादन केलं. त्यातील त्यांचा एकेक लेख 30-40 पानांचा असे. पाटलांनी धर्म, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, अस्तित्ववाद या विषयावर बरंचसं लेखन केलं आहे. पण त्यांच्या हयातीत ‘झुंडीचे मानसशास्त्र’ हे त्यांचं एकमेव पुस्तक प्रकाशित होऊ शकलं. त्यानंतरचं हे दुसरं पुस्तक. त्यांच्या अप्रकाशित लेखनाची अजूनही काही पुस्तकं प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. ती प्रकाशित झाल्यानंतर त्यांच्या व्यासंगाची, अभ्यासाची आणि बुद्धिमत्तेची ओळख महाराष्ट्राला होईल. तो दिवस लवकर येवो!


खरं म्हणजे विश्वास पाटील यांचं निधन होऊन आता जवळपास आठ वर्षे होत आली आहेत. इतक्या उशिरानं का होईना हे पुस्तक आता प्रकाशित झालं आहे, ते केवळ पाटलांच्या मुलीने घेतलेल्या पुढाकारामुळे. मात्र पाटलांनी हे लेखन कधी करून ठेवलं होतं, याची नोंद पुस्तकात नाही.


प्रस्तुत पुस्तक हे कार्ल मार्क्‍सचं वैचारिक चिकित्सा करणारं चरित्र आहे. त्यामुळे मार्क्‍सच्या वैयक्तिक आयुष्याविषयी विश्वास पाटलांनी फारच थोडी पानं खर्च केली आहेत. त्यांचा सर्व भर मार्क्‍सचं विचारविश्व समजून देण्यावर आणि त्यातल्या उणिवांवर नेमकेपणानं बोट ठेवण्यावर आहे. या पुस्तकात एकंदर सहा प्रकरणं आहेत. त्यातील ‘व्यक्ती आणि विचार’ हे पहिलंच प्रकरण तब्बल 245 पानांचं आहे, तर उर्वरित पाच प्रकरणांसाठी फक्त 89 पानं खर्च केली आहेत. पण हाच खरा या पुस्तकाचा गाभा आहे. या प्रकरणांमध्ये पाटलांनी मार्क्‍सच्या विचारांचा, तत्त्वज्ञानाचा आणि कम्युनिस्टांच्या भाबडेपणाचा अतिशय संयत भाषेत पण परखडपणे समाचार घेतला आहे.


आपले तीव्र स्वरूपाचे मतभेद नोंदवतानाही त्यांनी खूपच समतोल आणि प्रगल्भ भाषा वापरली आहे. सवंग विधानांचा आणि शेरेबाजीचा मोह कटाक्षानं टाळला आहे.


‘व्यक्ती आणि विचार’ या पहिल्या प्रकरणाचे पाटलांनी सात पोटविभाग पाडले आहेत. त्यातल्या पहिल्यात मार्क्‍सचं बालपण, त्याची जडणघडण, जेनीबरोबरचे प्रेमप्रकरण, लग्न, मुद्रणाविषयीची त्याची मर्मदृष्टी, मार्क्‍सवरील हेगेल आणि लुडविग फोरवाखचा प्रभाव याविषयी लिहिलं आहे. दुस-यात, मार्क्‍सनं हेसकडून घेतलेली ‘शुद्ध तात्त्विक साम्यवादाची दीक्षा’, पॅरिसमधील वास्तव्य, एंगल्सशी ओळख आणि मैत्री आणि जेनी यांचा समावेश आहे. तिस-यात, आरंभीचा मार्क्‍सवाद, मार्क्‍सचा स्वभाव आणि लेखनशैली, बौद्धिक जडणघडण, हेगेलच्या तत्त्वज्ञानाचा मार्क्‍सनं लावलेला अन्वयार्थ इथपर्यंतचा भाग आहे. चौथ्यात, हेगेलकडून मार्क्‍सनं उसनवारीनं घेतलेल्या कल्पना, त्याचा जडवादाविषयीचा सिद्धांत; पाचव्यात मार्क्‍सच्या तात्त्विक संकल्पना; सहाव्यात हेगेलच्या दृष्टिकोनावरील आणि आधीच्या आर्थिक सिद्धांतावरील मार्क्‍सचे आक्षेप; आणि सातव्यात मत्ता आणि दुरावा याविषयीचं मार्क्‍सचं विवेचन यांचा आढावा आहे. थोडक्यात मार्क्‍सच्या विवेचनाचा, सिद्धांतांचा आणि त्याच्या आक्षेपांची सविस्तर ओळख या सात भागातून होते. पण ही चर्चा मुख्यत: तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील असल्यानं ती समजून घेणं थोडं जड जातं.


‘क्रांती : एक फसवी घोषणा’, ‘संवाद आणि विसंवाद’, ‘डाव्यांच्या बौद्धिक गोंधळातून बाहेर येण्यासाठी..’, ‘फसवी सत्ये’ आणि ‘मार्क्‍सवाद हाही एक धर्मपंथच’ ही या पुस्तकातल्या प्रकरणांची शीर्षकंच आपल्या मार्क्‍स आणि मार्क्‍सवादी तत्त्वज्ञानाविषयीच्या समजुतींना आणि समजांना उलटंपालटं करून टाकणारी आहेत.


‘क्रांती : एक फसवी घोषणा!’ या प्रकरणात ‘क्रांती’ या मार्क्‍स आणि मार्क्‍सवाद्यांच्या अतिशय हुकमी हत्याराची यथोचित चिरफाड केली आहे. ‘क्रांती’ या शब्दाच्या उत्पत्तीपासून मार्क्‍सला अभिप्रेत असलेल्या क्रांतिविषयक तीन संकल्पनांचा उलगडा केला आहे. ‘औद्योगिक क्रांती’, ‘हरित क्रांती’ हे शब्दप्रयोगच मुळात कसे निर्थक आहेत, हेही सांगितलं आहे. पाटलांच्या म्हणण्याच्या गर्भितार्थ असा आहे की, मार्क्‍सला अभिप्रेत असलेली क्रांती जगात अजून कुठंही घडलेली नाही आणि घडण्याची शक्यताही नाही. ते लिहितात,‘‘क्रांती हा शब्द अफूसारखा आहे. अनेक बुद्धिमंतांच्या व बुद्धिजीवींच्या मेंदूला त्या शब्दामुळे गुंगी येते; मग सामान्यांचा विचार न केलेलाच बरा! एवढे असूनही क्रांतीची कल्पना मोडीत निघण्याची मात्र शक्यता नाही.’’ समाजाचा उद्धार करावा, अशी महत्त्वाकांक्षा बाळगणारे आदर्शवादी बुद्धिजीवी समाजात आहेत, तोपर्यंत क्रांतीचे तत्त्वज्ञान मरणार नाही. कारण आधुनिक बुद्धिजीवींचं तेच एकमेव श्रद्धास्थान आहे, असा त्यांचा दावा आहे.


‘संवाद आणि विसंवाद’ या प्रकरणात पाटलांनी तीन नोव्हेंबर 1864 रोजी मिखाईल बाकुनिन यांनी कार्ल मार्क्‍स यांच्या घेतलेल्या शेवटच्या मुलाखतीचा सरळ अनुवाद छापून टाकला आहे. तिचं शीर्षक मात्र त्यांनी स्वत: दिलं असावं. कारण तोच त्यांचा या मुलाखतीचा अन्वयार्थ आहे. मलपृष्ठावर त्याचं स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटलं आहे,‘‘मिखाईल बाकुनिन याने मार्क्‍सची घेतलेली परखड मुलाखत म्हणजे मार्क्‍सची घेतलेली उलटतपासणीच आहे. ही मुलाखत म्हणजे संवाद आणि विसंवादाचा एकत्र आविष्कार आहे.’’


‘डाव्यांच्या बौद्धिक गोंधळातून बाहेर येण्यासाठी..’ या प्रकरणाची मांडणी पाटलांनी थोडय़ाशा आक्रमकपणे केली आहे. त्यांचा असा चढा स्वर केवळ याच प्रकरणात लागला आहे, पण तरीही त्यांचे युक्तिवाद तेवढेच समर्थ आहेत. सध्याच्या घडीला डावी विचारसरणी जगाचं आकलन करून घेण्यात आणि तिचं विश्लेषण करण्यात कशी कमकुवत झाली आहे, याची साधार मांडणी पाटलांनी केली आहे. ती अतिशय धारदार आहे. जगाचा व्यवहार दिवसेंदिवस अनाकलनीय होत चालला असला तरी डावे आपलीच पोथी प्रमाण मानत असल्यानं त्यांची कशी भंबेरी उडाली आहे हे सांगताना ते लिहितात, ‘‘..उजव्यांना विरोध करीत राहणे, हीच डाव्या राजकीय कृतीची परिसीमा आहे. या कोंडीतून कदाचित सुटका नसावी. तथापि, या संबंधात असे म्हणावेसे वाटते की, जोवर हा बौद्धिक संभ्रम असाच टिकून राहिल, तोवर आमचे बौद्धिक जीवनही तसे निकृष्ट राहिल.’’


‘फसवी सत्ये’ या प्रकरणात ‘काम मिळण्याचा हक्क’ ही कामगारांची मागणी समूहाच्या पातळीवर विचार करता कशी तर्कदुष्ट आहे याचं विवेचन आहे. पाटील म्हणतात, ‘‘काम मिळण्याचा हक्क कामगाराला आहे; पण काम न देण्याचा हक्क मालकाला नाही, असे काहीतरी हे तर्कशास्त्र असावे.’’ याच प्रकरणाच्या दुस-या भागात रूसो या विचारवंतानं मांडलेल्या ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेची उलटतपासणी केली आहे. ‘स्वातंत्र्य ही संकल्पना विरोधाभासात्मकतेवर आधारलेली गोष्ट आहे’ हा त्यातील प्रतिपाद्य विषय आहे.


‘मार्क्‍सवाद हाही एक धर्मपंथच’ हे शेवटचं प्रकरण तर कोणत्याही साचेबंद विचारसरणीची मेंदूवरील झापडं दूर करेल असं आहे. उदाहरणादाखल त्यातील काही वाक्येच पाहू- - मार्क्‍सवाद हा राजकीय कार्यक्रम वा प्रोजेक्ट आहे. इतिहास काही निश्चित नियमांना धरून पुढे पुढे सरकतो आणि मार्क्‍सला या नियमांचे पक्के पूर्वज्ञान आहे, हे यामागील गृहीतकृत्य. इतिहासाची विरोध-विकासात्मक वाटचाल, या वाटचालीतील कामगारवर्गाची भूमिका, हे सर्व वस्तुनिष्ठ आहे, असे तो मानतो. परंतु कामगारवर्गाला मार्क्‍सने दिलेल्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका कामगारवर्ग घेऊ शकतो, ही गोष्ट मार्क्‍सने विचारातच घेतलेली नाही. (पान 339) - मार्क्‍स जरी सांगत असला की, शेवटी मानवजातीचे काय होणार आहे, हे इतिहासाने आधीच सांगून ठेवले आहे, तरी खरी गोष्ट अशी आहे की, माणसाचा उद्या, त्याचे भविष्य नेहमीच ओपन किंवा अनिर्णित असते. भूतकाळापासून आपण खूप शिकू शकतो, परंतु आपला भूतकाळच भविष्याला जन्म देईल, या प्रकारची भाकिते कोणीही काढू शकत नाही. कोणी काढली, तर ती भाकिते खोटी ठरण्याचीच शक्यता अधिक असते. (पान 340) - मार्क्‍सवाद आणि साम्यवाद दोन्हीही धर्मसंप्रदाय आहेत-ज्यू, ख्रिस्ती व इस्लाम या संप्रदायाइतकेच कडवे. ज्यू,ख्रिस्ती व इस्लाम धर्म परमेश्वराच्या आश्वासनांचा हवाला देतात; तर साम्यवाद इतिहासाच्या. परंतु चौघेही पुढे येणा-या ‘सुखी’ या अर्थाने परमेश्वरी राज्याचे आश्वासन देतात. (पान 341)


विश्वास पाटलांची ही विधानं अतिशय विचारशील आहेत हे खरे, पण ती मार्क्‍सवाद्यांच्या दृष्टीनं विवादास्पद आणि स्फोटक आहेत. पण इथं हेही स्पष्ट केलं पाहिजे की, त्यांनी आपल्या विधानांचं पुरेसं स्पष्टीकरण केलेलं आहे. अनेक नामवंत विचारवंतांची अवतरणं दिलेली आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे पाटलांची भाषा अतिशय नेमकी आणि नेटकी आहे. तिला उपमा, प्रतिमा आणि अलंकारांचा अजिबात सोस नाही. आपलं म्हणणं स्पष्ट करण्यासाठी त्यांनी कुठेही गैरलागू आणि असंबद्ध उदाहरणं दिलेली नाहीत. थोडक्यात या पुस्तकाची भाषा प्रगल्भ स्वरूपाची आहे. त्यामुळे ते थांबून थांबून काळजीपूर्वक वाचावं लागतं. म्हणून ते वाचकाकडून भरपूर वेळेची मागणी करतं.


त्या अर्थानं हे पुस्तक प्रगल्भ वाचकांचा घाम काढणारं आहे, त्याची दमछाक करणारं आहे..आणि मार्क्‍सवाद्यांना घाम फोडणारंही! निदान महाराष्ट्रात तरी अलीकडच्या काळात ‘मार्क्‍सवादा’ची इतकी परखड चिकित्सा इतर कुणी करू धजलेला नाही. कारण मार्क्‍सचं तत्त्वज्ञान हे कामगार वर्गाचं तत्त्वज्ञान बनवलं गेल्यानं मार्क्‍सच्या विरोधात बोलणं म्हणजे कामगार-शोषित-पीडित यांच्या विरोधात बोलणं आणि मार्क्‍सवाद्यांच्याच भाषेत सांगायचं तर ‘भांडवलदारांचा एजंट’ होणं, असं समीकरण तयार केलं गेलं आहे. त्यामुळे ते पातक स्वत:हून कोण कशाला ओढवून घेणार?


आता शेवटचा मुद्दा. ‘झुंडीचे मानसशास्त्र’ हे विश्वास पाटील यांचं पुस्तक बरंच गाजलं होतं. पण ते त्यांनी लं बाँ या फ्रेंच लेखकाचं ‘द क्राउड’ आणि एरिक हॉपर या अमेरिकन लेखकाचं ‘ट्रू बिलिव्हर’ या दोन पुस्तकांच्या आधारे लिहिलेलं होतं. तसा स्पष्ट उल्लेखही ते करत. परंतु त्या मूळ लेखनाचे जशास तसे भाषांतर न करता त्यातल्या प्रमुख मुद्दय़ांची ते मराठी वाचकांना समजेल अशा पद्धतीनं मांडणी करत. त्यामुळे मूळ लेखनाचा परिचय असलेल्या वाचकांना त्यात कधी कधी फार नवीन काही मिळतही नाही. पण प्रत्येक वाचकालाच काही जगातली तत्त्वज्ञानावरची सर्वच्या सर्व पुस्तकं वाचणं शक्य नसतं. अशा वाचकांसाठीच विश्वास पाटील लेखन करत. अनेक जगभरातल्या अनेक विचारवंतांच्या वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये विखुरलेल्या विचारांची ते सुसंगत पुनर्माडणी करतात. प्रस्तुत पुस्तकही त्याला अपवाद नाही. याही पुस्तकात पाटलांचं स्वत:चं फारच कमी आहे. प्रस्तुत पुस्तकात पाटलांनी जे काही लेखन केलं आहे, तेही जगातल्या त्या त्या क्षेत्रातले विचारवंत, अभ्यासक-संशोधक यांनी मांडलेल्या सिद्धांतांच्या आधारेच केलं आहे. त्यांनी मांडलेले अनेक मुद्दे सर इसाया बर्लिन ते मिर्सा एलियाड अशा अनेक विचारवंतांनी आधीच सांगितलेले आहेत. पण म्हणून काही या पुस्तकाचं महत्त्व कमी लेखण्याचं कारण नाही.


सुजाण आणि चांगलं काही वाचण्यासाठी आसुसलेल्या वाचकांसाठी हे पुस्तक मोठी बौद्धिक मेजवानी आहे. सध्याचं जागतिक राजकारण पाहता आणि जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये मार्क्‍सवादाचा झालेला पाडाव पाहता विश्वास पाटील यांचं हे पुस्तक अतिशय स्वच्छ आणि नवा दृष्टिकोन देणारं आहे. आजचं जग ज्या मार्क्‍सवादापलिकडच्या दिशेनं चाललं आहे, ती दिशा समजावून देणारं हे पुस्तक आहे. 
कार्ल मार्क्‍स - व्यक्ती आणि विचार विश्वास पाटील पद्मगंधा प्रकाशन, पुणे पाने- 344, किंमत- 280 रुपये

8 comments:

  1. धन्यवाद, एका वाचनीय पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल, शोधायला हवं...

    ReplyDelete
  2. You have done a remarkable job.
    Thanks a lot, Mitraa

    ReplyDelete
  3. Dhanyavaad, Shodhun vachatoch ata he !

    ReplyDelete
  4. हे विश्वास पाटील आणि पानिपत कार विश्वास पाटील वेगवेगळे आहेत काय?

    ReplyDelete
    Replies
    1. हो. हे विश्वास पाटील नवी क्षितिजे या त्रै मासिकाचे संपादक होते.

      Delete
    2. धन्यवाद जगताप सर...
      जरुर वाचेन त्यांची पुस्तके

      Delete
  5. धन्यवाद राम जगताप बरेच दिवस प्रयत्न करूनही ह्या पुस्तकबद्दल माहिती मिळत नव्हती. पण आज तुमच्यामुळे ती माहिती मिळाली.

    ReplyDelete
  6. Thanks Shri Ram Jagtap. I am interested in both books. Where I can get 'Zundiche Manasshastra'?
    Suhas Sapatnekar

    ReplyDelete