Monday, January 30, 2012

सावध ऐका पुढल्या हाका!

काळाच्या बरोबर जाणारांचा निदान पराभव होऊ शकत नाही. काळाच्या मागे राहणारांना मात्र इतरांच्या मागून केवळ फरफटत जावे लागते आणि त्यांचा केवळ पराभवच नव्हे, तर नाशही होण्याचा धोका संभवतो. इकडे ज्याच्याशी स्पर्धा करावयाची, त्या काळाची गती तर इतकी प्रचंड आहे की, आपण सध्या जेथे आहोत, तेथेच टिकून राहण्यासाठी देखील आपल्याला खूप वेगाने पळण्याची आवश्यकता आहे. आणि..आणि आपण तर चक्क झोपलोच आहोत!  - डॉ. आ. ह. साळुंखे, जून 1981
मराठी ही प्रादेशिक भाषा असल्याने तिची इंग्रजीशी तुलना होऊ शकत नाही. म्हणून आपण भारतीय भाषांपैकी हिंदीशी तुलना करून पाहू या. हिंदीतलं साहित्यविश्व आणि मराठीतलं साहित्यविश्व यांपैकी कोण आजच्या काळाशी सुसंगत आहे?
 
उदय प्रकाश हे हिंदीतले आघाडीचे कथाकार आहेत. uday-prakash.blogspot.com हा त्यांचा ब्लॉग  ब्लॉगजगतात सर्वाधिक वाचला जात असावा! या ब्लॉगवर उदय प्रकाश यांचे लेखन, त्यांच्या लेखनाचे अनुवाद, त्यांची मुखपृष्ठं, अनुवादक यांचीही अपडेट माहिती असते. हा अतिशय देखणा आणि सुंदर ब्लॉग आहे. याशिवाय उदय प्रकाश इंग्रजीमध्येही एक स्वतंत्र ब्लॉग लिहितात. प्रदीप जिलवाने हा तरुण लेखक pradeep-jilwane.blogspot.com या त्याच्या ब्लॉगवर हिंदीतील वेगवेगळ्या नियतकालिकांची, त्यांच्या विशेषांकांची ओळख करून देतो. सचिन महज सचिन हा तरुण पत्रकार naiebaraten.blogspot.com या नावानं ब्लॉग लिहितो. ‘मैं खिलाफ़ हूं, इस तरह दुनिया के.. यानी तुम्हारे जो इसे सही मानते हो.’ असं त्यानं आपल्या ब्लॉगवर लिहिलं आहे. hindilekhak.blogspot.comवर हिंदीतील साहित्यिकांची नवनवी छायाचित्रं पाहायला मिळतात. त्यांचं साहित्यप्रकारानुसार वर्गीकरणही केलं आहे. ही फक्त काही उदाहरणादाखल नावं झाली. याशिवाय अनेक तरुण लेखक, पत्रकार सातत्यानं हिंदीमध्ये मोठय़ा प्रमाणावर ब्लॉग लिहितात.
 
नेटवर किती हिंदी नियतकालिकं उपलब्ध असावीत? ‘कथादेश’, ‘तथा’, ‘दोआबा’, ‘नया ज्ञानोदय’, ‘पाखी’, ‘प्रतिलिपि’, ‘बहुवचन’, ‘वागर्थ’, ‘संस्कृति’, ‘हंस’, ‘हिमाचल मित्र’, ‘समकालीन साहित्यसमयांतर’ अशी तब्बल पन्नासपेक्षाही जास्त नियतकालिकं आणि त्यांचे ताजे अंक उपलब्ध असतात. www.kavitakosh.orgमध्ये हिंदीतल्या जान्यामान्या कवींच्या कवितांचा समावेश आहे. कवींनुसार त्यांची वर्गवारी केली आहे.
 
हिंदीतलं हे साहित्यविश्व नेटवर पाहताना साहित्याला समाजजीवनाचा आरसा का मानलं जातं, हे लक्षात येतं. नव्हे त्याची खात्रीच पटते.
 
एरवीही संस्कृतीविषयी बोलताना साहित्याचा केवळ उल्लेखच केला जात नाही तर ‘साहित्य म्हणजेच संस्कृती’ असं गृहीत धरलं जातं. म्हणजे साहित्याशिवाय संस्कृतीचा विचारच होऊ शकत नाही.
 पण मराठी साहित्यविश्वाला याची जाणीव आहे? ते समजून घेण्याचा त्यांनी आजवर गंभीरपणे प्रयत्न केला आहे का? या प्रश्नांची उत्तरं फारशी समाधानकारक नाहीत.
मराठीतल्या इंटरनेटवर असणा-या वेबसाईट्स, ब्लॉग यांच्या संख्येत केवळ साहित्यिकच नाही तर प्रकाशनसंस्था, वाङ्मयीन व इतर नियतकालिकं यांचा समावेश केला तरी ही संख्या फारच तोकडी भरते.
 ग्रंथाली, पॉप्युलर, राजहंस, मेहता पब्लिशिंग हाऊस, मॅजेस्टिक, ज्योत्स्ना,  लोकवाङ्मय गृह, साकेत अशा काही आघाडीच्या प्रकाशनसंस्थांच्या स्वत:च्या वेबसाइट्स आहेत. यातल्या बहुतेकांच्या स्वत:च्या गृहपत्रिकाही आहेत. ‘रूची’, ‘प्रिय रसिक’, ‘राजहंस ग्रंथवेध’, ‘मेहता मराठी ग्रंथजगत’, ‘आपले वाङ्मयवृत्त’, या त्यापैकी काही. या  गृहपत्रिकांचे कुठले अंक या वेबसाइट्सवर उपलब्ध आहेत? ‘प्रिय रसिक’चे फक्त जून ते सप्टेंबर या  2011 वर्षातले चार अंक, ‘रूची’चा ताजा अंक म्हणून ऑक्टोबर 2011 चा अंक, ‘मेहता मराठी ग्रंथजगत’चे फक्त सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2011 चेच तीन अंक उपलब्ध आहेत. ‘राजहंस’च्या साइटवर इतके दिवस ‘ग्रंथवेध’ उपलब्धच नव्हते. ते नुकतेच उपलब्ध झाले आहे. पण त्याचेही अलीकडचेच अंक आहेत. ‘वाङ्मयवृत्त’ला अजून साइटचं आकाश मिळालेलं नाही.हे करण्यासाठी काही मोठय़ा मनुष्यबळाची वा गुंतवणुकीचीही गरज नाही. फक्त थोडय़ाशा कल्पकतेचीच गरज आहे. पण तीही कुणी दाखवायला तयार नाही.
हे केवळ गृहपत्रिकांबाबतच आहे का? नाही कारण, प्रकाशनसंस्थांच्या ताज्या पुस्तकांची माहिती त्यांच्या वेबसाइट्सवर मिळेलच याचीही खात्री नसते.
 
‘मिळून सा-याजणी’, ‘शेतकरी संघटक’, ‘परिवर्तनाचा वाटसरू’, ‘साधना’, ‘पालकनीती’, ‘अंतर्नाद’, ‘आजचा सुधारक’, ‘नवभारत’, ‘ललित’, ‘अनुभव’, ‘कवितारती’, ‘पंचधारा’, ‘मसापपत्रिका’, ‘ढोल’, ‘विचारशलाका’, ‘सत्याग्रही विचारधारा’, ‘आंदोलन’, ‘किशोर’, ‘वास्तव रूपवाणी’, ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’, ‘बळीराजा’, ‘वनस्थळी’, ‘किलरेस्कर’, ‘आपला परममित्र’, ‘केल्याने भाषांतर’, ‘भाषा आणि जीवन’, ‘समाज प्रबोधन पत्रिका’, ‘साक्षात’ अशी 250-300 मराठी नियतकालिकं प्रसिद्ध होतात. यांपैकी किती नेटवर वाचता, पाहता येतात? यातल्या ‘मिळून साऱ्याजणी’, ‘शेतकरी संघटक’, ‘अनुभव’ आणि ‘साधना’ यांच्याच तेवढय़ा वेबसाइट्स आहेत. पण हे अंकही लगोलग साइटवर उपलब्ध होतीलच असं नाही.
 अशीच संख्या आहे मराठी ब्लॉग लिहिणा-या साहित्यिकांची. कविता महाजन यांचे muktvachan.blogspot.com, kavita-mahajan.blogspot.com, bhinn.blogspot.com, bharatiyalekhika.blogspot.com, ku-hoo.blogspot.com असे तब्बल पाच ब्लॉग आहेत. महाजन यांच्यासारखी आजची आघाडीची लेखिका या माध्यमाचा इतका उपयोग करून घेते, यातून इतरांनी बरंच काही शिकण्यासारखं आहे. पण हेही खरं की, महाजन यांचे हे ब्लॉग अलीकडच्या काळात फारसे अपडेट होताना दिसत नाहीत.
रेखा शहाणे यांनी अशोक शहाणे, भाऊ पाध्ये, तुळशी परब, वसंत दत्तात्रय गुर्जर या अनियतकालिकांच्या चळवळीतल्या शिलेदारांचे ब्लॉग सुरू करून त्यांच्याविषयीची शक्य तेवढी माहिती त्यावर उलब्ध करून दिली आहे.
 
तारा भवाळकर, डॉ. सदानंद मोरे यांचेही ब्लॉग आहेत. पण त्यावर त्यांच्या बायोडाटाशिवाय फारसं काही  त्यावर नाही. मोरे यांच्या ब्लॉगवर काही लेख आहेत म्हणा, पण हा ब्लॉगही अपडेट नाही. 
नंदिनी आत्मसिद्ध, ज्ञानदा देशपांडे यांचेही ब्लॉग आहेत आणि ते अपडेटही होतात.
 
गणेश मतकरी, अभिजीत रणदिवे हे तरुण गंभीरपणे ब्लॉग लिहितात.
 
कुमार सप्तर्षी आपले लेखन सतत ब्लॉगवर टाकून त्याची लिंक फेसबुकवर देतात. वाचकही त्यावर चर्चा करतात. सत्तरीच्या या कार्यकर्त्यांचा हा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.
 
पण ब्लॉग लिहिणारे मराठी साहित्यिक एवढेच. चार-दोन कमीजास्त. हौस म्हणून ब्लॉग लिहिणा-यांची संख्या मात्र खूपच आहे, पण तो स्वतंत्र लेखाचा विषय असल्यानं त्यांचा विचार करण्याचं कारण नाही.
 
आता फेसबुकवरील मराठी साहित्यिकांचा वावर पाहू. रा. रं. बोराडे हे मराठवाडय़ातील ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्य-संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष फेसबुकवर सतत जो बाष्कळपणा करत असतात तो उबग आणणारा आहे. भालचंद्र मुणगेकर, आनंद तेलतुंबडे ही मंडळीही सतत फेसबुकवर दिसतात. पण आपण उच्चभ्रू आहोत, हा अहंकार त्यांच्या नेटवरील वर्तनातही डोकावत राहतो. त्यामुळे त्यांच्याविषयीचं कुतूहल कुमार सप्तार्षीसारखं वाढताना दिसत नाही.
 
थोडक्यात मराठी साहित्यविश्वाला वेबसाइट्स-ब्लॉग या माध्यमांची ताकद समजलेली नाही असंच म्हणावं लागेल. पण काळाबरोबर कुणी असायला हवं हाही कळीचा मुद्दा आहे. सरसकट सर्वानीच त्यासाठी आटापिटा करायला हवा असंही नाही.
 
1) -40 हा साहित्यिक वयोगट या माध्यमांचा वापर काही प्रमाणात करताना दिसतो. पण अगदी स्पष्टच सांगायचं तर त्यांची या माध्यमावरील उपस्थिती ही ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ या प्रकारची आहे. मराठीमधले तरुण लेखक सर्वाधिक त्यांच्या ब्लॉगवर, साईटवर दिसत नाहीत, ते फेसबुकवर दिसतात. तिथे उथळ प्रश्नावर बाष्कळ चर्चा करण्यात या वर्गाचा मोठा पुढाकार आहे. या लोकांकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत. त्यामुळे त्यांनी असा उथळपणा न करता अधिक जबाबदारीनं वागणं अपेक्षित आहे. कारण हेच लोक उद्याच्या साहित्याचे शिलेदार आहेत. उद्याचे सांस्कृतिक प्रवक्ते आहेत.
 
2) 40-60 या वयोगटातल्या साहित्यिकांकडून या माध्यमांचा योग्य त-हेनं आणि सक्षमपणे वापर होणं अपेक्षित आहे. कारण हे लोक आजच्या आणि उद्याच्या साहित्याचे शिलेदार आहेत. त्यामुळे या लोकांची उदासीनता क्षम्य नाही.
 
3) वय वर्षे 60 नंतरचे साहित्यिक या माध्यमांचा विचार करत नसतील, तर ते एकवेळ समजण्यासारखं आहे. या वयात त्यांचे आरोग्याचे प्रश्न, उर्वरित लेखन सोडून त्यांना या माध्यमाबरोबर धावणं शक्य नाही. पण त्यातल्या काहींना या माध्यमांबद्दलचं कुतूहल स्वस्थ बसू देत नसेल, ही माध्यमं जाणून घेण्याची त्यांची इच्छा असेल तर ते स्वागतार्हच आहे.
 
लेखकांच्या स्वत:च्या वेबसाईटस हा प्रकार मात्र मराठीमध्ये अजूनही फारसा रुजताना दिसत नाही.
 मराठी लेखकांसाठी उच्चभ्रू आणि सेलिब्रेटी हे शब्द वापरले जाऊ शकत नाहीत. कारण त्यासाठी स्वत:ची डिग्निटी सांभाळता यावी लागते आणि पुरेसं सोशलही असावं लागतं. मराठी साहित्यिकांना या दोन्ही गोष्टी जमत नाहीत. ज्यांनी तसं करून पाहण्याचा प्रयत्न केला, त्यांचं हसं होतं. मराठीमध्ये उच्चभ्रू समाजातले जे काही हाताच्या बोटावर मोजण्याएवढे लेखक आहेत, त्यांना समाज विचारत नाही अन् तेही स्वत:च्या विद्वतेचा विनाकारण दर्प बाळगतात, सर्वसामान्यांना तुच्छ लेखतात. त्यामुळे ते समाजापासून तुटतात आणि एकटे पडतात. समाजाला सतत कुणाला ना कुणाला डोक्यावर घेऊन नाचायचं असतं, मग तो जे आपल्याला सहजासहजी उपलब्ध असतील त्यांचा उदोउदो करतो. सुमारांची सद्दी फोफावत चालली आहे, याचं एक कारण साहित्यिकांची उदासीन करणारी बधिरता हेही आहे.
ट्विटर हे माध्यम उच्चभ्रू आणि सेलिब्रिटी लोकांचं झालं आहे. खरं तर तसं त्याचं प्रयोजन नाही. पण अमिताभ बच्चन, शशी थरूर, सलमान रश्दी, शाहरूख खान, आमीर खान असे लोक (आणि आता पंतप्रधान मनमोहन सिंगसुद्धा!) त्यावर असल्यामुळे आणि ते सतत काहीतरी ‘ट्विट’ करत असल्यामुळे ट्विटर हे उच्चभ्रू समाजाचं झालं आहे. बच्चन, थरूर, रश्दी काय ‘ट्विट’ करतात याकडे प्रसिद्धीमाध्यमांचं लक्ष लागलेलं असतं. त्यांच्या ‘ट्विट’च्या बातम्या, हेडलाईन होतात. मराठीतल्या कुठल्याही लेखकाच्या नशिबी असे भाग्य येण्याची शक्यता नाही.
 
थोडक्यात मराठी साहित्यिक आणि साहित्यविश्वातले लोक सांस्कृतिक पुढारपण निभावण्याच्या बाबतीत प्रभावहीन का झाले आहेत?
 
1) आपल्या पाठीमागून येणा-यांना मागदर्शन करणं, आपला अनुभव त्यांच्याशी शेअर करणं, आपल्याकडून झालेल्या चुका त्यांच्याकडून होऊ नयेत यासाठी त्यांच्याशी सतत संपर्क ठेवून असणं.
 
2) सर्वसामान्यांना जगाच्या आकलनाबाबत, त्यांच्या दैनंदिन जगण्यातील सुख-दु:खांबाबत आणि जगण्याच्या प्रेरणेबाबत मार्गदर्शन करणं.
 
3) राजकीय नेते-पुढा-यांवर सतत दबाब टाकून, त्यांना स्वत:च्या म्हणण्याची दखल घ्यायला लावून त्यानुसार कृती करण्यास भाग पाडणं. त्यांना आपला वचक वाटेल, धाक वाटेल अशी तजवीज करणं.
 या तिन्ही प्रकारे पुढारपण करायचं असतं. पण याबाबतीतल मराठी साहित्यिक प्रभावहिन आहेत. कारण हे लोक काळाच्या प्रचंड मागे आहेत. काळ ज्या गतीनं आणि पद्धतीनं बदलत आहे, ते समजून घेण्याएवढीही कुवत ज्यांच्याकडे नाही, व्हिजन नाही. मग ते पुढारपण करणार तरी कसं?
केवळ साहित्य एके साहित्य याच गोष्टीचा ध्यास घेतल्यामुळे मराठी साहित्यिकांचं फार मोठं नुकसान होत आलं आहे. जीवनाच्या इतर अंगांचा, बदलांचा त्यांना जणू काही विसरच पडला आहे. त्यामुळे त्यांच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि इतर वैकल्पिक जाणिवा पुरेशा प्रगल्भच झाल्या नाहीत. परिणामी मराठी साहित्याचाही स्तर फारसा उंचावायला तयार नाही.
 
नव्या गोष्टींना सतत नाकं मुरडणारे, बदलांना विरोध करणारे, त्यांचं स्वागत करणारे, त्याकडे त्रयस्थपणे पाहणारे आणि त्याची अजिबात पर्वा न करणारे लोक सगळ्याच समाजात असतात. मात्र यातला कुठला गट संख्येनं जास्त आहे, प्रभावशाली आहे, यावर त्या समाजाचा प्रवास ठरत असतो. महाराष्ट्र ही सतत नाकं मुरडणा-या कर्मदरिद्री लोकांचीच छावणी असेल तर त्यातलं साहित्यही तसंच असणार यात काही शंका नाही.
 
साहित्यिकांनी बंदूकधारी कार्यकर्ते होण्याची गरज नसते, तशीच त्यांनी केवळ स्वत:च्याच कोशात राहण्याचीही आवश्यकता नसते. कारण या दोन्हींमुळे अंतिमत: त्यांचं आणि समाजाचंही नुकसानच होतं. मराठी साहित्यिकांना सामाजिक बांधीलकी-राजकीय बांधीलकी या शब्दांची फार अ‍ॅलर्जी आहे. लेखकानं इतरही भूमिका करायला हव्यात असा प्रश्न केला जातो, तेव्हा ‘अशा अपेक्षा लेखकाकडून का केल्या जातात? डॉक्टर, इंजिनीअर, सुतार, लोहार, गवंडी, इस्त्रीवाला यांच्याकडून का केल्या जात नाहीत? तेही समाजाचेच घटक आहेत ना?’ असा प्रतिसवाल ही मंडळी करतात. हा प्रतिसवाल बालिश आहे, आपण पुरेसे समंजस आणि प्रगल्भ नसल्याचाच पुरावा आहे. याचं भान त्यांना कधी येणार देव जाणे!
 
कारण ज्यांच्या मतांचा, विचारांचा आणि वर्तनाचा समाजावर भला-बुरा परिणाम होत असतो, त्यांच्याकडूनच समाज अशा अपेक्षा करत असतो. जे लोक या गोष्टींचे वाहक नसतात, त्यांना समाज हे प्रश्न विचारायला जात नाही इतका साधा विचार करता येत नसेल तर ती फारच शोचनीय बाब म्हणावी लागेल.
 
‘कलेसाठी कला की, जीवनासाठी कला’ या वादानं एकेकाळी मराठी साहित्यविश्वात बराच गदारोळ माजवला होता. हा वाद तेव्हाही, आजही आणि उद्याही निर्थकच गणला जाणार याचा अदमास वाद घालणा-यांना आणि त्यात सामील होणा-यांना येत नसेल तर ते दुर्दैवच म्हणावं लागेल आपल्या समाजाचं! ‘कलेसाठी कला’ आणि ‘जीवनासाठी कला’ या दोन्ही भूमिका जीवनवादी असल्यानं, त्या मानवी जीवनापेक्षा थोर नव्हेत, तर त्याची एक्स्टेंशन्स आहेत, इतकाही विचार करता येऊ नये?
 मराठी साहित्याचा मराठी समाजावर पुरेसा प्रभाव  पडत नाही, त्याचं कारण मराठी साहित्यिकांमध्ये असलेला वैचारिक व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि पक्या-प्रगल्भ धारणांचा अभाव हेच आहे. त्यामुळे त्यांनी काळाच्या हाका सावधपणे ऐकण्याची नितांत गरज आहे.

कवी पाडगावकरांची गोष्ट

या पुस्तकाचा लसाविमसावि समजून घेण्याची गरज आहे. आणि तो आहे पाडगावकरांना माणूस समजून घेण्यात असलेलं अनिवार कुतूहल. इतकी वर्षे सातत्यानं कविता लिहूनही मला माणूस कळला आहे, असं पाडगावकर म्हणत नाहीत, हे फार सूचक आहे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मंगेश पाडगावकर हे मराठीतले आनंदयात्री कवी आहेत. प्रेमकविता वयाच्या ऐंशीनंतरही सुचू शकणा-या कवीला खराखुरा प्रतिभावान म्हणायला हवे. शिवाय मी फक्त माझाच नाही तर इतरांचाही प्रेमानुभव माझ्या कवितेतून सांगतो म्हणून मला या वयातही प्रेम कविता सुचतात, हा पाडगावकरांचा युक्तिवाद त्यांची भवतालाकडे पाहण्याची दृष्टी सांगतो. अलीकडेच पाडगावकरांना महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. तेव्हा त्यांनी व्यक्त केलेले मनोगत आणि भाषणही त्यांची जीवनदृष्टी सांगणारेच होते. खरे तर त्यांचे हे भाषण पाडगावकरांमधील कवीची साक्ष पटवणारे होते. 
पाडगावकरांनी शालेयवयातच कविता लेखनाला सुरुवात केली. म्हणजे गेली साठ-पासष्ट वर्षे ते सातत्याने कविता लिहीत आहेत. अधिक नेमकेपणाने सांगायचे तर 1950 साली ‘धारानृत्य’ हा पाडगावकरांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला, तर ‘शब्द’ हा 23वा कवितासंग्रह 2009 साली प्रकाशित झाला. या शिवाय त्यांनी मुलांसाठी दहा कवितासंग्रह लिहिले आहेत. मीरा, कबीर, सूरदास यांचे मराठी अनुवाद केले आहेत. शेक्यपिअरच्या तीन नाटकांचेही त्यांनी मुळाबरहुकूम अनुवाद केले आहेत. आणि बायबलच्या नव्या कराराचेही.
 
म्हणजे पाडगावकरांची मुख्य प्रेरणा कविता हीच होती हे यातून सिद्ध होते. त्यामुळेच त्यांनी केलेले अनुवाद आणि इतर लेखन थोडे आहे हे साहजिक आहे. फार पूर्वी पाडगावकरांनी ‘निंबोणीच्या झाडामागे’ हा लघुनिबंधांचा संग्रह प्रकाशित केला होता. त्यानंतर अगदी अलीकडे पॉप्युलर प्रकाशनाने त्यांच्या गद्य लेखनाची पाच पुस्तकं प्रकाशित केली आहेत. ‘शोध कवितेचा’ हे त्यापैकीच एक. यात पाडगावकरांनी आपल्या काव्यप्रेरणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे लेख वेळावेळी नैमित्तिक प्रसंगाने लिहिले गेले आहेत. काही भाषणांचाही त्यात समावेश आहे. म्हणजे असे की, हे पुस्तकासाठी ठरवून झालेले लेखन नाही. पण तरीही या सुटय़ा सुटय़ा लेखांतून पाडगावकरांची कवितालेखनामागील भूमिका जाणून घेता येते. अर्थात पाडगावकरांना त्याविषयी फार काही सांगायचेही नाही. मोजक्याच गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत. पण परत परत सांगाव्या लागल्यामुळे या पुस्तकांतल्या बऱ्याचशा लेखांत आणि भाषणांत उदाहरणे व मुद्दय़ांची पुनरुक्ती झाली आहे.
 
कविता हा उत्स्फूर्त वाङ्मयप्रकार असल्याने त्याविषयी ठामपणे काही सांगता येत नाही. मुळात सर्जनशील लेखनाबाबतच कुठलेच ठाम विधान करता येत नाही. कारण अमूक कविता कशी सुचली याविषयी खुद्द कवीलाही निश्चितपणे काही सांगता येत नाही. त्यामुळे सर्जनशील लेखकाला त्याच्या लेखनाकडे तटस्थपणे पाहणे बऱ्याच वेळा शक्य होते नाही. त्यामुळे कवी, कादंबरीकार आणि कथाकार यांना तुमच्या लेखनामागच्या प्रेरणा, निर्मितीप्रक्रिया, साहित्यकृतींचा आस्वाद याविषयी विचारले तर त्याचे समाधानकारक उत्तर मिळेलच असे नाही. आणि त्यातून वाचकांचे समाधान होईल असेही नाही. पण तरीही सर्जनशील लेखकाला या दिव्यातून जावे लागते. पाडगावकरांनी ते दिव्य या पुस्तकाच्या माध्यमातून पारड केले आहे असे म्हणावे लागेल.
 
‘आपल्या काव्यनिर्मितीच्या तळाशी आत्मशोध असतो’ असे पाडगावकर इतक्या वेळा आणि इतक्या ठिकाणी म्हणालेले आहेत की, हे विधान आता सपक वाटू लागले आहे. पण खरोखरच पाडगावकरांचा आत्मशोध अजून संपलेला नाही. इथे आत्मशोध याचा अर्थ माणसाचा शोध, माणूस समजून घेण्याचा प्रयत्न असा आहे. त्यामुळेच त्यांना रोज जगण्याचे वेगवेगळे विभ्रम भुरळ घालतात. पाडगावकर ‘साहित्यनिर्मितीचे प्राणतत्त्व’ या लेखात लिहितात, ‘‘एक कवी म्हणून मी सतत माझ्या खांद्याचे हे स्वातंत्र्य जपत आलो. ख्रिस्त, बुद्ध, गांधी, मार्क्‍स, डॉ. आंबेडकर, जे. कृष्णमूर्ती, ओशो रजनीश यांचे खोल संस्कार माझ्यावर झाले. पण कुणाच्याही झेंडय़ाखाली मी कधीही उभा राहिलो नाही, किंवा कुठल्याही झेंडा बांधलेल्या काठीला मी माझ्या खांद्यावर चढून स्वार होऊ दिले नाही. माझ्या खांद्यावर काठीला बांधलेला झेंडा नाही, कुठलाही राजकीय, कलात्मक, इझमचा झेंडा नाही. यामुळे कुठलीही संघटना माझ्या पाठीशी उभी नाही. तसा मी अगदी एकटा आहे. पण झेंडा बांधलेली काठी माझ्या खांद्यावर नाही याचा एक फार मोठा फायदा मला झालेला आहे. अनुभवांचे त-हात - हांचे पक्षी निर्भयपणे माझ्या खांद्यावर येऊन बसतात आणि आपले गाणे गाऊ लागतात.’’
 
पाडगावकरांनी प्रेमकविता खूप लिहिल्या असल्या तरी त्यांनी कवितेच्या फॉर्ममध्ये अनेक प्रयोगही केले आहेत. ‘सलाम’मधील प्रचंड उपरोध आणि उपहास असलेली कविता, ‘उदासबोध’मधील विडंबन आणि ‘बोलगाणी’मधील लयबद्धता हे पाडगावकरांनी जाणीवपूर्वक केलेले प्रयोग आहेत. एकाच फॉर्ममध्ये त्यांनी अडकून घ्यायला नकार दिला याचे ते उदाहरण आहे. पाडगावकरांवर शेक्सपिअरचा आणि बायबलच्या नव्या कराराचा मोठा प्रभाव पडला. शालेयवयात त्यांना सक्तीनं बायबल शिकावं लागलं. पण शेक्सपिअर आणि बायबल दोन्हींचीही इंग्रजी भाषा प्रेमात पडावी अशीच आहे. पाडगावकरांचा कबजा तिनं घेतला. त्यामुळेच त्यांनी शेक्सपिअरच्या तीन नाटकांचे आणि बायबलच्या नव्या कराराचे अनुवाद मोठय़ा तन्मयतेने केले. भाषेचा नादानं असं नादावत राहिल्यामुळेच पाडगावकरांची काव्यउर्मी चिरंतन राहिली असावी.
 
खरं तर पाडगावकरांच्या या पुस्तकाचं सारं सार वरील परिच्छेदात आले आहे. त्यामध्ये वेगवेगळी उदाहरणं, प्रास्ताविकं यांची भर घालून, मुद्यांचा अधिक विस्तार करत, त्यांना नैमित्तिक जोड देत पाडगावकरांनी या संबंध पुस्तकातले लेख लिहिले आहेत.
 
पाडगावकर आणखी एके ठिकाणी म्हणतात, ‘‘सर्जनशील साहित्याची निर्मिती म्हणजे रांगोळीच्या रंगीत ठिपक्यांची आणि रेषांची आकर्षक आरास नव्हे! सर्जनशील साहित्य हे मानवी जीवनातल्या नानाविध अनुभवांना भिडून माणूस समजून घेते. ते माणसाच्या जगण्याचा, त्याच्या माणूसपणाचा अर्थ शोधत असते. हा शोधच ललित साहित्याच्या कलात्मक आकृतिबंधाचे रूप घेत असतो. शोधाची ही प्रेरणा क्षीण झाली की, साहित्य हे शब्दांच्या रंगीत पोकळ ठिपक्यांची आरास होऊन बसते.’’ हे विधान फारच सामान्य आहे असा याविषयी आक्षेप घेतला जाऊ शकतो.
 
त्यामुळे या पुस्तकाचा लसाविमसावि समजून घेण्याची गरज आहे. आणि तो आहे पाडगावकरांना माणूस समजून घेण्यात असलेलं अनिवार कुतूहल. इतकी वर्षे सातत्यानं कविता लिहूनही मला माणूस कळला आहे, असं पाडगावकर म्हणत नाहीत, हे फार सूचक आहे.
शोध कवितेचा : मंगेश पाडगावकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई,  
पाने : 180, किंमत : 250 रुपये

Tuesday, January 24, 2012

कळवण्यास अत्यंत आनंद होतो की....

आज अखेर ३२ फ़ॉलोअर्स आणि दहा हजार पेज विव्हचा टप्पा माझ्या ब्लॉगने पार केला आहे. ही माझ्यासाठी आनंदाची  गोष्ट आहे. इतके वाचक मिळणे ही कुठल्याही लेखकासाठी आनंदाची बातमी होणारच. पण हा आनंद मला झाला, त्यात आपणा सर्वांचा वाटा आहे, याची मला नम्र जाणीव आहे. 
आपण वेळोवेळी माझे लेखन वाचत आला आहात, त्यावर आपली मते नोंदवत आला आहात! पण सविस्तर प्रतिक्रिया क्वचित कधीतरी दिल्या आहेत. मला वाटतं आपण सविस्तर आपले म्हणणे  मांडले तर मला त्याचा फायदा होइल. आणि माझ्या लक्षात न आलेल्या काही गोष्टी समजू शकतील. या पुढे आपण तसे करावे.
आणि असाच लोभ असू द्यावा.

Monday, January 23, 2012

या हाकांना प्रतिसाद द्या!




 गेल्या वर्षी भारताविषयी पाच, तर चालू वर्षाच्या पहिल्याच महिन्यात चार महत्त्वाची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. भारताचा इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळ याविषयी काही सांगू पाहणारी ही पुस्तकं आवर्जून वाचायला हवीत. या लेखकांचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं आणि जमलंच तर त्यातून काही शिकायलाही हवं. पण त्या आधी या पुस्तकांकडे कसं पाहावं याविषयीचा हा लेख...
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
 भारतात प्रवासासाठी, व्यापारासाठी येणाऱ्या किंवा केवळ भारताला भेट देऊ इच्छिणा-या परकीय प्रवाशांची आणि व्यापाऱ्यांची भारताविषयीची उत्सूकता व कुतूहल तसं फार जुनं आहे. अगदी पुरातन म्हणावं असं! शिवाय भारताबद्दलचे त्यांचे आधीचे आणि प्रत्यक्ष भेट दिल्यावर झालेले समज-गैरसमजही तितकेच जुने आहेत. पण भारत हा परकीयांसाठी सतत कुतूहलाचा विषय राहिलेला आहे, यात काही नवल नाही.
 ब्रिटिश काळात भारताविषयी जी पुस्तकं लिहिली गेली, ती एकतर काहीशी नकारात्मक मानसिकता रंगवणारी होती किंवा भारत नीट समजून न घेता लिहिली गेलेली होती, असा एक मतप्रवाह आहे. दीडशे वर्षे ब्रिटिशांच्या गुलामगिरीत असलेला भारत स्वतंत्र झाला, तेव्हा लोकशाही देश म्हणून भारत फार काळ टिकाव धरू शकणार नाही, असा परकीय लेखक-विचारवंतांचा आडाखा होता. तसं त्यांनी जाहीरपणे, पुस्तकांच्या माध्यमातून बोलूनही दाखवलं होतं. पण त्या काळीही भारताविषयी सहानुभूती असलेल्या काही परकीय अभ्यासकांचा-लेखकांचा छोटासा गट होताच. ग्रॅनविल ऑस्टिनसारख्या लेखकानं तर भारताची राज्यघटना प्रत्यक्षात कशी साकारली, तिची बलस्थानं काय आहेत आणि जगातल्या इतर देशांच्या घटनांपेक्षा तिचं वेगळेपण काय याविषयी दोन पुस्तकंच लिहिली आहेत.
पण भारत लोकशाही देश म्हणून फार काळ टिकाव धरू शकणार नाही, हा मतप्रवाह अगदी कालपर्यंत जोरकस म्हणावा इतपत प्रबळ होता. पण भारत गेल्या साठ वर्षात लोकशाही देश म्हणून केवळ उभाच राहिला नाहीतर त्यानं आपली दमदार घोडदौड चालू ठेवली आहे. आजघडीला भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. पण तो जागतिक महासत्ता भविष्यात होईल की नाही, तसं स्वप्न त्यानं बाळगावं की नाही, हा मुद्दा बाजूला ठेवूनही भारताच्या आजवरच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करता येईल; त्याच्या वाटचालीबद्दल आशावाद व्यक्त करता येईल, अशी कामगिरी आणि प्रवास भारत करत आहे.
 
1990 साली भारतानं जागतिकीकरणाचा पुरस्कार केला. त्याला आता वीस वर्षे पूर्ण झाली आहेत. 2007 साली भारताला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे झाली. त्यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी ‘इंडिया आफ्टर गांधी’ हे पुस्तक लिहून ‘भारत टिकून का आहे?’ याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. या पुस्तकासाठी नुकतंच त्यांना साहित्य अकादमीच्या पुरस्कारानंही गौरवण्यात आलं.
 गेल्या वीस वर्षात भारतानं केलेली प्रगती फार भव्यदिव्य नसली तरी ती जगानं दखल घ्यावी इतपत नक्कीच आहे. ‘चिंडिया’च्या (म्हणजे भारत आणि चीनच्या) शर्यतीत कोण पुढे जाईल हाही वेगळा मुद्दा आहे. पण भारत आज जो काही आहे, तो तसा का आहे? आणि तो तसाच या पुढेही राहिल का? पुढे जाईल की मागे जाईल? त्यासाठी भारताला काय करावं लागेल? असे अनेक प्रश्न राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील बुद्धिवंतांना, विचारवंतांना, इतिहासकारांना आणि लेखकांना पडत आले आहेत. प्रश्न पडणं आणि त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणं हे बुद्धिवंतांचंच काम असतं! आणि ते आपापल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्नही करत आहेत.
त्यामुळेच अलीकडच्या काळात भारताविषयी भारतीय आणि परकीय लेखकांनी लिहिलेली पुस्तकं चर्चेचा विषय ठरू पाहत आहेत. त्यांची संख्याही दखल घ्यावी अशी होऊ पाहात आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. आवड, वाचन, अभ्यास, व्यासंग, विवेचन, विश्लेषण, पुनर्माडणी आणि समीक्षा ही चढती भाजणी असते. पण या साऱ्याच गोष्टी कुणा एकालाच करता येतील असं नव्हे. अनेक जण यातील एकेक विषय घेऊन त्यावरच आपलं लिखाण बेतू शकतात. कुणी यातले दोन-चार विषय घेऊन त्यावर आधारित लेखन करेल, तर कुणी फक्त पुनर्माडणी करेल वा समीक्षा करेल. विचारवंत, बुद्धिवंत, इतिहासकार, अभ्यासक, पत्रकार यांची स्वत:ची म्हणून काही बलस्थानं असतात, तशीच त्यांचे स्वत:चे म्हणून काही खास विषय असतात; ज्यांना सामान्यत: प्रभावक्षेत्र म्हटलं जातं. त्यांची त्यांची म्हणून एक अभ्यासाची, संशोधनाची पद्धत असते. त्यामुळे यापैकी कुणा एकाचंच संपूर्ण लेखन शंभर टक्के विश्वासार्ह आणि प्रमाण मानलं जाण्याची शक्यता नसते, जातही नाही. प्रत्येकाचं लेखन पडताळून, ताडून घेऊन त्यातून कुठल्या योग्य गोष्टींची नोंद घ्यायला हवी, कुठल्या विषयाबाबत प्रस्तुत लेखकाचं आकलन फारसं बरोबर नाही, कुठला विषय त्याला नेमकेपणानं उलगडला आणि कुठला नाही, हे समजावून घेऊन पुढे जावं लागतं.
 
कारण शेवटी सत्य असलं तरी सत्याचा अनुभवही ब-याचदा व्यक्तिसापेक्षच असतो. म्हणजे असं की, माणसाविषयी जगातल्या इतक्या लेखकांनी, विचारवंतांनी आणि अभ्यासकांनी लिहूनही अजूनही त्याच्याविषयीचं लिहिणं काही थांबलेलं नाही. माणसाविषयी जर असं असेल तर एखाद्या देशाविषयी लिहिणंही थांबणार नाही. त्याविषयीही एकच एक भाकित, निष्कर्ष कुणाला काढता येणार नाही. कुणी काढला तरी तो प्रमाण मानला जाईल, स्वीकारला जाईलच असंही नाही. जे सिद्धांत काळाच्या ओघातही टिकून राहतात, ते आपोआपच स्वीकारले जातात. मात्र आपलं म्हणणं भविष्यात कुणीतरी खोडून काढेल म्हणून कुणी ते मांडण्याचा प्रयत्नच करू नये असंही नाही. ज्ञानमार्गाचं मूळ आकर्षण फार जबरदस्त असतं. अशा आकर्षणानं झपाटलेले आणि पछाडलेले लोक आपण लोकांपर्यंत पोहचू का, लोक आपल्याला स्वीकारतील का, याची कधीच फिकीर करत नाहीत.
 
म्हणून तर गेल्या कित्येक वर्षापासून भारताविषयी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून, वेगवेगळ्या पैलूंची चर्चा करणाऱ्या पुस्तकांमध्ये सतत भरच पडत आहे. गेल्या वर्षी ‘इंडिया : अ पोर्ट्ेट’ हे ब्रिटिश लेखक आणि इतिहासकार पॅट्रीक फ्रेंच यांचं पुस्तक प्रकाशित झालं. याशिवाय  बीबीसीचे माजी भारतीय प्रमुख मार्क टुली यांचं ‘नॉन-स्टॉप इंडिया’, आनंद गिरीधरदास यांचं ‘इंडिया कॉलिंग’, थंत मिंट-यू यांचं ‘व्हेअर चायना मिटस इंडिया’, एम. एम. सुरी यांचं ‘ट्वेंटी इअर्स ऑफ इकॉनॉमिक्स रिफॉर्म्स इन इंडिया, 1991-2011’ ही पुस्तकं प्रकाशित झाली.
 
तर याच महिन्यात ‘इमर्जिग इंडिया - इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स अँड रिफॉर्म्स : बिमल जालान’, ‘इंडिया आफ्टर द ग्लोबल क्रायसिस : शंकर आचार्य’ आणि ‘इंडिया सिन्स 1950 - सोसायटी, पॉलिटिक्स, इकॉनॉमी अँड कल्चर :ख्रिस्तोफ जेफ्रेलोट’ आणि इंडियन एक्सप्रेस समूहाचं ‘रिफॉर्म्स 20-20 : लास्ट 20 इयर्स, नेक्स्ट 20 इयर्स’ ही चार पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. एक्सप्रेस समूहानं जवळपास 60-60 पानांच्या पुरवण्या असलेले पाच विशेषांक गेल्या वर्षभरात प्रकाशित केले. त्याचं हे पुस्तकरूप.  एक्सप्रेसच्या वेबसाइटवर या पुरवण्या उपलब्ध आहेत. पाचवा भाग डिसेंबर महिन्यात प्रकाशित झाला होता. तो त्यांच्या वेबसाइटसवरून आतापर्यंत 436,000 लोकांनी डाऊनलोड करून घेतला आहे. आणि याच आठवडय़ात तो पुस्तकरूपानंही उपलब्ध झाला आहे.
 म्हणूनच तर हे परकीय आणि आप्तस्वकीय लेखक काय म्हणताहेत, हे आपण जाणून घ्यायला हवं. हे सर्व आपापल्या क्षेत्रातले जाणकार आणि अभ्यासक आहेत. तेव्हा त्यांच्या हाकांना निदान प्रतिसाद तरी द्यायलाच हवा.

विचारांचा खळखळाट!

महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणा-या साहित्य आणि समाजकार्य पुरस्कारांनी एव्हाना बरीचशी प्रतिष्ठा मिळवली आहे. समाजाच्या विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय आणि अनुकरणीय व्यक्तींचा गौरव करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम स्तुत्यच आहे. शिवाय त्यानिमित्ताने काढण्यात येणा-या पूर्वीच्या संवादिनीआणि मंथनया स्मरणिका आणि सध्याचा एकत्रित विशेषांक हेही या सोहळ्याचं एक प्रमुख वैशिष्टय़ राहिलं आहे. पण नुकत्याच पुण्यात पार पडलेल्या या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यानिमित्त काढलेला साधना साप्ताहिकाचा विशेषांक वाचताना मात्र काहीशी निराशा होते. कारण यातल्या बहुतांशी पुरस्कारप्राप्त लेखकांची आणि कार्यकर्त्यांची मनोगतं नकारात्मक आहेत. त्याला अपवाद आहे तो कविवर्य मंगेश पाडगावकर आणि बचतगटाचं काम करणा-या नीलिमा मिश्रा यांचा. गेली पन्नास वर्षे सतत कविता लिहूनही पाडगावकरांची भावना मला माणूस समजून घ्यायचा आहे’, अशीच आहे. मला माणूस समजला आहे, याविषयी ते एका अक्षरानंही बोलायला तयार नाहीत, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाऊन, रॅमन मॅगसेसेसारखा प्रतिष्ठित पुरस्कार मिळूनही नीलिमा मिश्रा यांना अजून खूप काम करायचं आहे.
 पण हे दोन अपवाद वगळता मात्र इतर बहुतेक लेखांमधून व्यवस्थेविषयी आणि सभोवतालच्या परिस्थितीविषयी जरा जास्तच निराशाजनक चित्र रंगवलेलं दिसतंय. परिस्थिती आहे त्यापेक्षा जास्तच फुगवून सांगण्याचा प्रकार आणि समस्यांचा बागुलबुवा करण्याचा प्रयत्न केला जातोय असं ही मनोगतं वाचताना वाटतं. आमच्या काळी असं होतंवा अमूक काळी असं होतंहा तर ज्येष्ठांचा शिरस्ताच असतो. शिवाय शासनयंत्रणेविषयीची नकारात्मकता हा तर सर्वामध्ये कॉमन म्हणावा असा फॅक्टर आहे. जगाला एका विशिष्ट दिशेनं ढकलण्याचं काम करण्यासाठी आपल्या परिघापुरतं काम करून भागत नाही तर त्यासाठी आधी जगाचं नीट आकलन करून घेण्याचीही गरज असते. जग जसं आहे, ते तसं का आहे हे समजून घेतल्याशिवाय त्याविषयी काही विधानं करणं हे फारसं बरोबर ठरत नाही.
पण इथं मात्र उलटच प्रकार दिसतो. ज्यांचं समाजाविषयीचं, राजकारणाविषयीचं आणि लोकशाहीविषयीचं आकलनही अगदीच तोकडं म्हणावं असं आहे, असेच लोक त्याविषयी बेधडक विधानं करत आहेत. त्याची साक्षच या मनोगतातून प्रचितीला येते.
 
या लोकांचं काम अनुकरणीय आहे याबाबतही वाद असायचं कारण नाही. पण याची जाणीव त्यांना स्वत:लाही असायला हवी. राज्यशास्त्रामध्ये स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हेअशी एक स्वातंत्र्याची व्याख्या सांगितली जाते. तोच मुद्दा इथेही आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे बोलताना, विधानं करताना ती जबाबदारीनं करायला नकोत का? आपल्या कामाचा परीघ, आपलं कार्यक्षेत्र मर्यादित असेल तर आपलं वक्तव्यही त्या क्षेत्रापुरतं, आपल्या अनुभवांपुरतंच असायला हवं. पण इथं नेमकं उलट दिसतं. साऱ्यांनी आपल्या प्रश्नांसाठी शासनव्यवस्था आणि समाजव्यवस्था यावर तोंडसुख घेण्यात समाधान मानलं आहे.
 
समाजातील विशिष्ट वास्तवाला भिडणारे साहित्य आणि प्रत्यक्ष समाजातील समस्यांना भिडणारे कार्यकर्ते यांच्याकडे किमान काही विचार असावा आणि किमान काही कृती असावी, जी उल्लेखनीय म्हणावी अशी आहे, असा विचार करून हे पुरस्कार दिले जातात. अर्थात एखाद्या पुस्तकाला वा व्यक्तीला पुरस्कार दिला जातो याचा अर्थच असा असतो की ते पुस्तक, ती व्यक्ती वा तिचा विचार आजच्या समाजासाठी उपयोगाचा आहे. पण यांच्याकडे नेमका कोणता विचार आहे हे त्यांच्या पुरस्कारप्राप्त पुस्तकांमधूनही दिसत नाही आणि त्यांच्या मनोगतांतूनही दिसत नाही. त्यामुळे या लोकांना समाजच नीट समजला नसावा, अशी साधार शंका येते.
 
आपल्या वैयक्तिक अनुभवांना सामाजिक सिद्धांताचं रूप द्यायचं नसतं. पण आपल्या वैयक्तिक अनुभवांना/प्रश्नांना सामाजिककरण्याची मोठी चढाओढ कार्यकर्तानामक लोकांमध्ये दिसून येते. सतत कुठल्यातरी दोषांचं खापर सरकारनामक यंत्रणेवर फोडलं की आपलं काम झालं यातच समाधान मानलं जात आहे. दीर्घकालीन समस्यांवर केल्या जाणा-या उपाययोजनाही दीर्घकालीनच असाव्या लागतात. सामाजिक सुधारणांमध्ये शॉर्टकट नसतो. हे अठराव्या-एकोणिसाव्या शतकापासून भारतात झालेल्या सामाजिक सुधारणांवरून आणि त्यांच्या गतीवरून लक्षात यायला हरकत नाही. पण ते लक्षात कोण घेणार? त्यासाठीचा अभ्यास करणार कोण? त्यामुळेच आठ हात लाकडाच्या नऊ हात धलप्या काढण्याचा प्रकार होतो आहे.
 
कवी दिलीप चित्रे यांनी कुठल्याशा कवितेत म्हटले आहे की,
 
कृतीमागचा विचार
आणि विचारामागची कृती
या दोन्हींच्या दरम्यान असते
मी दिलेली आहुती
 पण विचार करणा-यांनी कुठलीच कृती करायची नाही आणि कृती करणाऱ्यांनी कुठलाच, किमान तारतम्यपूर्ण ठरेल असा विचार करायचा नाही, असंच ठरवलं असेल तर परिस्थिती कठीणच राहणार..तिच्यात सुधारणा होण्याची फारशी शक्यता नाही. आणि तरीही हेच लोक अनुकरणीय म्हटले जास्त असतील तर तो मात्र मोठाच धोका आहे.

Friday, January 20, 2012

सुदैवी संधीचे सोने करणा-या छायाचित्रकार

कोणताही पत्रकार हा त्याच्या काळाचा साक्षीदार असतो. वृत्तछायाचित्रकार तर आपल्या काळाला छायाचित्रांच्या माध्यमातून उत्तम प्रकारे नोंदवून ठेवतो. एक हजार शब्दांचे काम एक छायाचित्र करते, असे म्हटले जातेच. गेल्या वर्षी 25 फेब्रुवारी ते 10 एप्रिल दरम्यान एनजीएमएमध्ये (मुंबई) भरलेल्या हुमाई व्यारावाला- अ रेट्रोस्पेक्टिव्हया प्रदर्शनातली छायाचित्रे पाहताना निदान काही मुंबईकरांनी तरी याचा पुन:प्रत्यय घेतला असेल. या प्रदर्शनात व्यारावाला यांची सर्व छायाचित्रे, निगेटिव्ह, कॅमेरे यांचा समावेश होता. पण दुर्दैवाने हे व्यारावाला यांचे शेवटचेच प्रदर्शन ठरले.
तसे पाहिले तर व्यारावाला या फार सुदैवी म्हणायला हव्यात. कारण 1930 साली त्यांची करिअर सुरू झाली, तर 1970 साली त्या निवृत्त झाल्या. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व भारतात व्यारावाला यांच्या करिअरला सुरुवात झाली आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात ती बहरत गेली. भारताच्या इतिहासात 1945 ते 1960 हा काळ प्रचंड धामधुमीचा, संघर्षाचा आणि नवनिर्माणाचा होता. नेमक्या याच काळात व्यारावाला यांना फोटोग्राफी करायला मिळाली. ती त्यांनी मनापासून केली. त्यासाठी वेळकाळाचे बंधन मानले नाही. अचूक टायमिंग हा कुठल्याही छायाचित्रकारासाठी क्वेश्चन ऑफ प्रेस्टिजअसतो, याचे भान व्यारावाला यांनी सतत बाळगले. म्हणून त्यांचे काम आणि योगदान यापुढच्या काळातही उल्लेखनीय राहिले.
उण्यापुऱ्या चाळीस वर्षात व्यारावाला यांनी महात्मा गांधी, अब्दुल मौलाना आझाद, लाल बहादूर शास्त्री, सर्वपल्ली राधाकृष्णन, लॉर्ड माउंटबॅटन, पं. नेहरू, इंदिरा गांधी यांची कितीतरी छायाचित्रे आपल्या कॅमे-यात बंदिस्त केली. लाल किल्ल्यावरील पहिला प्रजासत्ताक दिन, १९३० सालचे गेट वे ऑफ इंडिया, ‘फोटो खींचना मना हैया पाटीच्या शेजारीच उभे राहिलेल्या पं. नेहरूंचे (1954) छायाचित्र अशी कितीतरी छायाचित्रे त्यांनी टिपली. पं. नेहरू यांचे वेगवेगळे मूड्स हा तर व्यारावाला यांचा आवडता विषय होता

व्यारावाला यांचा जन्म 9 डिसेंबर 1913 रोजी गुजरातमधील नवसारी येथील एका पारशी कुटुंबात झाला. माणेकशा या फोटोग्राफीचे वेड असलेल्या तरुणाच्या प्रेमात त्या पडल्या, तेव्हा त्या तेरा वर्षाच्या होत्या आणि जे.जे.मध्ये पेंटिंग शिकत होत्या. माणेकशा यांची फोटोग्राफी पाहून व्यारावाला यांनाही त्याचे वेड लागले. त्यांचे पहिले छायाचित्र बॉम्बे क्रॉनिकलमध्ये प्रसिद्ध झाले तेही पानभर आकारात.
नवऱ्याची कोणतीही मदत न घेता त्यांनी ते टिपले होते. त्या वेळी व्यारावाला यांना एका छायाचित्राचे एक रुपया मानधन मिळे. तीसुद्धा त्यावेळी मोठी रक्कम होती. कारण त्या काळी पेंटिंगमधून फारसे पैसे मिळत नसत. त्यामुळे व्यारावाला यांनी विचार केला की, छायाचित्रकार म्हणून आपल्याला बरे पैसे मिळतील. पण हे क्षेत्र तेव्हा पूर्णपणे नवे होते आणि भारतात तेव्हा एकही महिला या क्षेत्रात नव्हती. व्यारावाला यांच्या या निर्णयाने त्यांना भारतातील पहिली महिला वृत्तछायाचित्रकार बनवले आणि अनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदारही ठरवले.
युद्धाच्या वेळेला द इलस्टट्रेट वीकली ऑफ इंडियाया साप्ताहिकाने व्यारावाला यांना युद्धकाळातल्या घडमोडींची छायाचित्रे पाठवण्याची असाइनमेंट दिली. त्यातून त्या या साप्ताहिकासाठी जवळजवळ पूर्णवेळ काम करू लागल्या1942 साली व्यारावाला पती-पत्नींना ब्रिटिश इन्फॉर्मेशन सव्‍‌र्हिसमध्ये नोकरी मिळाली. तोपर्यंत मुंबईतील त्यांची छायाचित्रे तशी सामान्य माणसांची होती, पण दिल्लीला गेल्यानंतर त्यात राजकीय नेते-घडामोडी यांची भर पडली. ‘ब्रिइसने त्यांना
फ्री लान्सर म्हणून काम करायलाही परवानगी दिली. तेव्हा त्यांनी ऑनलुकर’, ‘टाइमआणि लाइफया मासिकांसाठीही छायाचित्रे काढली.
व्यारावाला यांनी त्या काळच्या कुठल्याच सत्याग्रहात, सभा-मोर्चे यांच्यामध्ये भाग घेतला नाही. पण या सर्वाची छायाचित्रे मात्र त्यांनी सातत्याने टिपली. ती आज लाखमोलाची ठरली आहेत2006 साली सबीना गाडीहोक यांनी इंडिया इन फोकस : कॅमेरा क्रॉनिकल्स ऑफ हुमाई व्यारावालाया नावाने त्यांचे चरित्र लिहिले1970 साली व्यारावाला यांनी काम थांबवले आणि त्या बडोद्याला स्थायिक झाल्या. आदल्याच वर्षी त्यांच्या पतीचे निधन झाले होते. काही वर्षे त्या आपल्या मुलासोबत राहिल्या. नंतर मुलाची बदली बडोद्याला झाली. तेव्हा त्याही बडोद्याला गेल्या. पण १९८९मध्ये कॅन्सरने त्यांच्या मुलाचे निधन झाले. तेव्हापासून त्या एकटय़ाच राहत होत्या. 1970 नंतर त्यांनी एकही छायाचित्र काढले नाही. टाटांनी नॅनोही एक लाख रुपयांची कार 2008 मध्ये लाँच करणार असल्याचे जाहीर केले, तेव्हा पहिल्या गाडीची नोंदणी व्यारावाला यांनी केली. त्या वेळी त्यांचे वय होते 95 वर्षे. तसे पाहिले तर व्यारावालांना त्या गाडीचा किती उपयोग झाला असता माहीत नाही, पण नव्या बदलांना साद देण्याची त्यांची स्वागतशीलता यातून प्रत्ययाला येते. एरवीही व्यारावाला फार साधेपणाने राहत. स्वत:ची सर्व कामे स्वत: करत. स्वत:च स्वत:चे कपडेही शिवत.
ब्रिटिशांच्या जोखडातून स्वतंत्र झालेला भारत हा खरे तर व्यारावालाच काय पण त्यांच्या समकालीन असणा-या त्या वेळच्या सर्व छायाचित्रकारांसाठी इतिहासाच्या कॅनव्हाससारखा होता! त्यांनी टिपलेले प्रत्येक छायाचित्र लगोलग ऐतिहासिक दस्तावेज ठरत होते. वर्तमानाला इतक्या कमी वेळात इतिहासाचा साक्षीदार बनवण्याची संधी मिळालेल्या व्यारावाला सुदैवी म्हणायला हव्यात त्या या अर्थाने.

Sunday, January 15, 2012

आस्वाद्य ते सुंदर...

खरं तर या पुस्तकाची दखल घ्यायला अंमळ उशीरच झालेला आहे. पण अशी पुस्तकं, तीही अतिशय देखण्या स्वरूपात प्रकाशित करण्याची जिद्द, त्या विषयाची खुमखुमी असल्याशिवाय होत नाही. अन् आपल्या मनासारखं पुस्तक प्रकाशित करून घेणंही ब-याचदा व्यावसायिक प्रकाशकांकडून लेखकांनाही शक्य होत नाही. कारण पुस्तक कितीही देखणं असलं तरी तो विषय वाचकांच्या किती जिव्हाळ्याचा आहे, हेही पाहावं लागतं. कारण प्रकाशन व्यवसाय हा एकमेव व्यवसाय असा आहे की, ज्यात प्रत्येक नवं पुस्तक हे स्वतंत्र प्रॉडक्ट असतं. त्यामुळे त्याची उस्तवार सुरुवातीपासून करावी लागते.
 
त्यामुळेच चिदाकाश-घटाकाशहे नावावरून फारसा पटकन बोध न होणारं शिल्पकलेवरील निवडक लेखांचं पुस्तकपुण्यातील एका आर्किटेक्चर कॉलेजनं काढावं, ते अरुण ओगले या वास्तुशास्त्राच्या अभ्यासक-प्राध्यापकानं लिहावं आणि त्याची निर्मिती रम्य आणि देखणी व्हावी हे कौतुकास्पद नक्कीच आहे. हे पुस्तक वास्तुकलेवरील असूनही ते अतिशय साध्या सोप्या शैलीत लिहिलेलं आहे. त्यामुळे वास्तुसौंदर्याच्या दृष्टीनं साक्षर होऊ पाहणा-या वाचकांना ते बाजारात सहजासहजी उपलब्ध होत नाही, एवढाच काय तो तोटा आहे.
 
अरुण ओगले यांनी गेल्या चाळीसेक वर्षात वेळोवेळी वास्तुकलेवर लिहिलेले हे लेख आहेत आणि यातील जवळपास सर्वच लेख त्यांनी वर्तमानपत्रांतून लिहिलेले आहेत. 1967 पासून ओगले यांनी 150 पेक्षाही जास्त लेख लिहून वास्तुकलेविषयीची जाण आपल्यापरीनं वाढवण्याचा प्रयत्न केला ही स्वागतार्ह गोष्ट म्हटली पाहिजे. वास्तुकलेसारखा विषय मराठी भाषेतून फार चांगल्या प्रकारे मांडायला वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र यांच्याप्रमाणेच अनेक अडचणी येतात. त्यावर मात करत, मध्यममार्ग काढत ओगले यांनी हे लेखन केलं.
 
प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ बाळकृष्ण दोशी यांनी या पुस्तकाला छोटीशी प्रस्तावना लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘मानवी जीवन अधिकाधिक संपन्नतेनं व अर्थपूर्ण जगण्यासाठी वास्तुकलेचा सौंदर्यपूर्ण उपयुक्त आविष्कार म्हणजेच अवकाशाची समर्थ निर्मिती. अशा अत्यंत आशयपूर्ण जाणिवा प्रत्येक लेखात ओगले वाचकांना करून देतात. वास्तुकलेतील अवकाशासंदर्भातील महत्त्वाच्या सूत्राची उकल त्यांच्या लेखांतून कौशल्यानं केलेली दिसते. हे काम तसं सोपं नाही, परंतु योग्य अभ्यास व त्यासाठी लागणारी मेहनत या जोरावर ते तशी उकल करण्यात यशस्वी होतात. प्रत्येक लेखात एक आंतरिक प्रेरणा स्फूर्ती व वास्तुकलाविषयक संवेदनांचं योग्य शब्दांकन म्हणजेच शब्दात रूपांतर करण्याची हातोटी त्यांनी हासिल केली आहे.’’
 
या निवडक संकलनात काही वास्तुंची ओळख ओगले यांनी करून दिली आहे, तशीच काही वास्तुतज्ज्ञांचाही परिचय करून दिला आहे. पुस्तकाचे एकंदर पाच भाग असून आढावा’, ‘प्रासंगिक’, ‘वास्तुतज्ज्ञ’, ‘रसग्रहणआणि माझ्या लिखाणाचा प्रवासअशी त्यांची वर्गवारी केली आहे. वास्तुकलेचं नेमकं मर्म काय आहे आणि कसं समजावून घ्यावं याविषयीच्या लेखानं पहिल्या विभागाला सुरुवात होते. त्यानंतरच्या लेखात महाराष्ट्रातील वास्तुकलेचा आढावा घेतला आहे. हा लेख पंचवीस वर्षापूर्वी लिहिलेला असला तरी तो वाचनीय आणि परिप्रेक्ष्य समजावणारा आहे.
 
दुस-या विभागातल्या मुंबई शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी वातावरण-निर्मिती हवीया पहिल्याच लेखाचं शीर्षक पुरेसं बोलकं आहे. त्यात ओगले म्हणतात, ‘‘प्रत्यक्ष वातावरणनिर्मितीसाठी काय केले पाहिजे? सौंदर्य वाढविण्यापेक्षा शहर सुधारणे अशा व्यापक दृष्टिकोनातून विचार करावयाचा झाल्यास कोणत्याही शहरात सुधारणा करावयाची असल्यास त्याचा सर्व शहराच्या, त्यातील मानवी जीवनाचा योग्य विचार झाला पाहिजे. यामुळे सर्व शहरात एकजिनसीपणा, एकवाक्यता येऊन सर्व वातावरण शिस्तबद्ध होते व या पद्धतशीर वातावरणामुळे शहराचा वेगळाच ठसा मनावर निर्माण होतो.’’ हा लेख तब्बल 40 वर्षापूर्वी लिहिलेला आहे. मुंबईचं नियोजन ज्या पद्धतीनं या 40 वर्षात झालं आहे आणि ज्या गतीनं या शहरानं माणसांना सामावून घेतलं आहे, त्यात मुंबईत वास्तुरचनेच्या दृष्टीनं सुधारणा होण्यावर आता कमालीच्या मर्यादा आहेत.
 
रसग्रहणया विभागात षण्मुखानंद, विज्ञान भवन, मुंबईचे वास्तुतज्ज्ञ चार्ल्स कोरिया यांच्या कल्पकतेतून साकारलेलं साबरमतीचं महात्मा गांधी स्मारक संग्रहालय, दिल्लीतील राजघाटाशेजारचे गांधी : जीवन व तत्त्वज्ञान प्रदर्शन, अहमदाबादमधील पूर्णपणे विटांमध्ये बांधलेली आयआयएमची वास्तू, जुहूचं पृथ्वी थिएटर, फ्रान्सजवळील रोशां चर्च आणि पेन्सिल्व्हानियामधील फॉलिंग वॉटर या वास्तूंचं ओगले यांनी केलेलं वर्णन फार तपशीलवार नसलं तरी त्या त्या वास्तूंचं सौंदर्य, त्यांच्या निर्मितीमागील वास्तुतज्ज्ञांची दृष्टी त्यांनी चांगल्या प्रकारे उलगडून दाखवली आहे.
 
वास्तुतज्ज्ञया विभागात बाळकृष्ण जोशी, चार्ल्स कोरिया, जोसेफ अ‍ॅलन स्टाइन, ल कार्बुझिए, रिचर्ड बकमिन्स्टर फुलर, वॉल्टर ग्रोपियस आणि  डॉ. कॉन्स्टँटिनॉस डॉक्सीअ‍ॅडीस या वास्तुरचनाकारांची, त्यांनी निर्माण केलेल्या वैशिष्टय़पूर्ण वास्तूंची आणि त्यामागील त्यांच्या सौंदर्यवादी दृष्टिकोनाची ओघवत्या भाषेत ओळख करून दिली आहे.
 
शेवटच्या विभागात ओगले यांनी स्वत:च्याच लेखनाचा आढावा घेतला आहे.
 
या संकलनाचं आणखी एक वैशिष्टय़ नमूद करायला हवं. ते म्हणजे या पुस्तकाचे संपादक चेतन सहस्र्बुद्धे यांनी या पुस्तकाच्या निमित्तानं मराठीतील वास्तुकलाविषयक लेखनाचाही थोडक्यात आढावा घेतला आहे. हा आढावा फारच आटोपशीर असला तरी तो या विषयावरील मराठी पुस्तकांची सद्यस्थिती सांगणारा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मराठीतलं वास्तुकलेचं रसग्रहण करणा-या पहिल्या पुस्तकाचा मान माधव आचवल यांच्या किमयाया पुस्तकाकडे जातो. आचवलांचं हे पुस्तक 1961 साली प्रकाशित झालं. म्हणजे आचवलांच्या किमयाला आणि पर्यायानं मराठीतील वास्तुकलाविषयक लेखनाला पन्नास वर्ष झाली आहेत.

त्यानिमित्तानं प्रस्तुत संकलन प्रकाशित झालं हे उचितच म्हणावं लागेल. आचवलांनी ताजमहालाविषयी या पुस्तकात तीन लेख लिहिले आहेत. ते मराठीमध्ये ताजमहालाविषयी झालेलं सवरेत्कृष्ट लेखन मानायला कुणीही फारशी खळखळ करणार नाही. तर ते असो. पण किमयानंतर दुर्गाबाई भागवतांचं पैस’, विजय दीक्षितांचं वास्तुकला : काल, आज, उद्या’, नरेंद्र डेंगळे यांचं झरोका’, फिरोज रानडे यांचं इमारतएवढीच काय ती वास्तुकलेविषयीची पुस्तकं प्रकाशित झाली, असं सहस्र्बुद्धे यांचं प्रतिपादन आहे. या पार्श्वभूमीवर ओगले यांच्या प्रस्तुत पुस्तकाचं वेगळेपण ठसठशीतपणे अधोरेखित होतं, हे वेगळं सांगायला नको.
 
वास्तुकलेचा एक शास्त्र म्हणून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणून नक्कीच उपयोग होईल, पण त्यापेक्षाही जास्त उपयोग जिज्ञासू वाचकांना होईल. आचवलांचा लेख वाचल्यावर जसा ताजमहालाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो, अगदी तसंच हे पुस्तक वाचल्यानंतर प्रत्येक वास्तूचं सौंदर्य नेमकं कशात आहे आणि ते कशात शोधलं पाहिजे याची दृष्टी काही प्रमाणात तरी आत्मसात करता येईल, असं वाटतं.
चिदाकाश-घटाकाश : अरुण ओगले, डॉ. भानुबेन नानावटीकॉलेज ऑफ आर्किटेक्चर, फॉर विमेन, पुणे, 
पाने : 172, किंमत : 550 रुपये

चक्रव्यूह भेदायचा तर..!

चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं यात निराशावादी दृष्टिकोन असण्याचं काही कारण नाही. नुसता उद्देश चांगला असून भागत नाही. त्यासाठी सद्हेतूनं केलेल्या टीकेचा स्वीकार आणि पुन्हा पुन्हा आत्मपरीक्षणाला सिद्ध होण्याची तयारी दाखवण्याएवढा उमदेपणा आपल्याकडे असेल तर आपले प्रयोग हे केवळ ‘प्रायोगिक’ राहणार नाहीत. आणि आपल्या पुन्हा पुन्हा होणा-या चुकाही टाळल्या जातील. तसं झालं तरच हा चक्रव्यूह भेदला जाण्याची शक्यता आहे. 
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमच्या प्रचंड महत्त्वाकांक्षी आंदोलनाची माघार ही खरं तर अपेक्षेनुसार म्हणायला हवी. ठाम तत्त्वविचारांचा अभाव, नैतिकतेची धरसोड आणि लोकशाहीचं अपुरं आकलन असल्यावर यापेक्षा वेगळं काही घडण्याची शक्यता नव्हती, याचं सूतोवाच काही जाणकारांनीच सुरुवातीलाच वर्तवलं होतं. असो. मुद्दा टीम अण्णांच्या अपयशाचा नाही, मुद्दा आहे सामाजिक चळवळींची अलीकडच्या काळात-विशेषत: गेल्या वीस वर्षातल्या जागतिकीकरणाच्या काळात-सातत्यानं पिछेहाटच का होते आहे?
 
सात-आठ जानेवारीला जळगावमध्ये सांगडचं कार्यकर्ता संमेलन झालं. प्रा. पुष्पा भावे, नंदू माधव महाराष्ट्रातील वेगवेगळ्या चळवळींमधील कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत, हा उपक्रम स्तुत्यच आहे..तर परवाच पुण्यात महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीनं विविध क्षेत्रात तळमळीनं काम करणा-या सहा कार्यकर्त्यांना गौरवण्यात आलं. त्यातील समाजवादी कायर्ककर्ते जी. जी. पारीख, स्त्री चळवळीतल्या ज्योती म्हापसेकर, बचतगटाच्या कामाबद्दल नुकत्याच रॅमन मॅगसेसे पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या निलिमा मिश्रा, नर्मदा आंदोलनाच्या समर्थक आणि आंदोलनच्या एक सहकारी सुनीती सु. र. या सर्वच लोकांचं काम प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे यात वादच नाही. पण त्यांच्याप्रती पुरेसा आदर व्यक्त करूनही असं म्हणावंसं वाटतं की, या सर्वाच्या कामाचा परीघ बऱ्यापैकी मर्यादित आहे. प्रत्येकापुढचे प्रश्न वेगळे आहेत आणि ते सोडवण्याचे मार्गही वेगळे आहेत. त्यामुळे त्यांचा प्रभाव त्यांच्या त्यांच्या क्षेत्रापुरताच मर्यादित राहतो.  म्हणून अशा विखुरलेल्या कार्यकर्त्यांनी काही समान मुद्यांवर एकत्र यायला हवं हा सांगडच्या उद्देश आहे.
 
तसे प्रश्न तर खूपच आहेत. शेतीच्या दूरवस्थेचा प्रश्न आहे, शेतमालाच्या भावाचा प्रश्न आहे, औद्योगिक कामगारांचा प्रश्न आहे, पर्यावरणाचा प्रश्न आहे, कॅपिटेशन फीचा प्रश्न आहे. नुकतीच लाजीरवाणी बाबम्हणून पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी ज्याविषयी खेद व्यक्त केला तो कुपोषणाचा प्रश्न आहे. देशातील प्रत्येकी तीन मुलांमध्ये एक मूल कुपोषित आहे, असं पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या अहवालाचं सर्वेक्षण आहे. प्रश्नांची ही यादी लांबतच जाणारी आहे.
 
पण त्यांची तड आणि त्यावरील उपाय यांचा प्रवास मात्र कूर्मगतीपलीकडे जायला तयार नाही. असं का होतं?
 
सामाजिक अभिसरणाच्या दाखल्यासाठी एकोणिसाव्या शतकाकडेच जायला पाहिजे असं नाही. स्त्रीवादी, आदिवासी चळवळ, शेतकरी संघटना, नर्मदा बचाव आंदोलन, दलित साहित्याची चळवळ अशा चळवळींनी ऐंशीच्या दशकात महाराष्ट्र घुसळून काढला होता. आता जवळपास त्यातल्या सगळ्याच चळवळी थंडावल्या आहेत, तर काही संपल्यात जमा आहेत.
 
याचबरोबर गेल्या दहा वर्षात राज्याच्या पातळीवर किमान वैचारिक ठोस निकषांवर चर्चा विषय होईल अशी एकही चळवळ आकाराला आली नाही वा एकाही चळवळीनं तसा परीघ व्यापायचा प्रयत्न केलेला नाही. याचं खापर सर्वस्वी जागतिकीकरणावर फोडून चालणार नाही, तसंच सरकारच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या माघारीवरही सोडून चालणार नाही.
 
त्याचा बराचसा दोष या चळवळींना काळानुरूप योग्य वळण देऊ न शकलेल्या नेतृत्वाकडेच जातो. ही वस्तुस्थिती पचायला अवघड असली तरी सत्य आहे, हे समजून घेण्याची आणि स्वीकारण्याची गरज आहे. केवळ काळाच्या बदलानं निष्प्रभ होणारं नेतृत्वच घडवलं जात असेल आणि तेच सा-या सामाजिक चळवळींचं पुढारपण करत असेल तर त्या घडणीमध्येच काहीतरी गंभीर दोष असले पाहिजेत.
 
भारतीय लोकशाहीची सारी भिस्त अलीकडच्या काळात केवळ निवडणुकांवरच ठरू पाहत आहे, तशीच सामाजिक चळवळींचीही सारी भिस्त सरकार नावाच्या संस्थेला नामोहरम करण्यावरच उतरू पाहत आहे. साऱ्या दोषारोपांचे धनी सरकारनंच व्हायला पाहिजे आणि सा-या अपयशांची जबाबदारीही सरकारनंच उचलायला हवी हीच अपेक्षा सामाजिक चळवळींतील नेतृत्व करत असेल तर ते फारच घातक म्हणायला हवं. निदान लोकशाही असलेल्या देशात तरी!
 
भारतीय लोकशाही शासनप्रणालीकडे केवळ वेल्फेअर शासनप्रणाली म्हणूनच पाहिलं जात असल्यानं तिच्यापुढील आव्हानं दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. तशीच सामाजिक चळवळींची दिशाही भरकटत चालली आहे. जागतिकीकरणाच्या गेल्या वीस वर्षात सरकार आपली सामाजिक उत्तरदायित्वाची जबाबदारी निभावण्याऐवजी तिच्यातून दिवसेंदिवस अंग काढून घेत असल्याची बोंब काही लोक करू लागले आहेत. शिक्षण, रोजगार, पर्यावरण, रोजगार या क्षेत्रातील समस्यांकडे तर फारच एकारलेपणे पाहिलं जात आहे. सार्वजनिक सेवासुविधा अधिक गतिमान आणि कार्यक्षम व्हावयाच्या असतील तर त्यांचं खासगीकरण करणं अनिवार्यच आहे हेही कुणी समजून घ्यायला तयार नाही. परिणामी सा-याच चळवळी आणि सुशिक्षित व बुद्धिवादी समाज सरकार नावाच्या संस्थेला आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक प्रश्नांसाठी सातत्यानं आरोपीच्या पिंज-यात उभा करताना दिसतो आहे.
 
लोकशाही ही सर्वप्रथम जीवनप्रणाली आहे हे आपण गेल्या साठ वर्षातही गंभीरपणे समजून घ्यायलाच तयार नसू तर आपल्या सामाजिक सुधारणांचं गाडं कूर्मगतीच्या पलीकडे जाणार तरी कसं? व्यापक समाजहिताच्या प्रश्नांपेक्षा वैयक्तिक प्रश्नांनाच आपण मारून मुटकून सामाजिक ठरवण्याची चूक करत असू आणि वर त्यांच्या सोडवणुकीसाठी ऊठसूट रस्त्यावर उतरत असू तर सुशिक्षित आणि बुद्धिवादी समाजस्वत:ला म्हणवून घेणं हे डोक्यावर पातक थापवून घेण्यासारखंच आहे.
 म्हणूनच महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळींत काम करणा-या कार्यकर्त्यांची सांगडघालून त्यांची ताकद वाढवण्याचा, त्यांच्या समस्यांना राज्यव्यापी स्वरूप देण्याचा प्रयत्न स्तुत्यच आहे. पण ती केवळ संमेलनं भरवून होणार आहे का? त्यासाठी सा-याच सामाजिक कार्यकर्त्यांना कठोर आत्मपरीक्षण करावं लागेल. त्यासाठी त्यांची तयारी आहे का? शिवाय या कार्यकर्त्यांची सारी ताकद आपापल्या भागातील प्रश्नांची तड लावण्यापुरतीच मर्यादित आहे. हे जसं त्यांचं सामर्थ्य आहे तसंच हीच त्यांची मोठी मर्यादाही आहे. त्यामुळे राज्यव्यापी लढा उभारण्याएवढा आवाका त्यांच्याकडे आहे का, हाही प्रश्न आहे. शिवाय स्वत:चे इगो बाजूला ठेवणंही यातल्या कितीजणांना झेपेल? तसं  काहीच होणार नसेल तर मात्र हा प्रयोग केवळ प्रायोगिकच राहण्याची शक्यता आहे.

Saturday, January 7, 2012

प्रसारमाध्यमांची झाडाझडती

प्रसारमाध्यमांना समाजाचा जागल्या वा आरसा म्हटलं जातं. जे जे समाजात घडतं, त्याचं योग्य, नि:पक्ष पद्धतीनं वार्ताकन करणं आणि अग्रलेख, लेख यांच्या माध्यमातून काय हितावह आहे, काय नाही याविषयी मार्गदर्शन करणं ही प्रसारमाध्यमांची आणि त्यांच्या संपादकांची जबाबदारी असते. बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीतलं पहिलं वर्तमानपत्र सुरू केलं, त्याला त्यांनी दर्पणअसं तर नंतर सुरू केलेल्या साप्ताहिक वर्तमानपत्राला दिग्दर्शनअसं नाव दिलं होतं. या नावांतून प्रसारमाध्यमांच्या कामाचं सूतोवाच होतं. पण हेही खरं की, भारतीय आणि त्यातही विशेषत: महाराष्ट्रातील पत्रकारिता ही स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झाली. तेव्हा त्यांच्यापुढे स्वातंत्र्याविषयीची पेरणी करणं, अन्याय-शोषणाविषयी जनमानसात चीड निर्माण करणं ही प्रमुख उद्दिष्टं होती. त्यात मोठय़ा प्रमाणावर ध्येयवाद होता. 1980च्या दशकात मात्र हा ध्येयवाद मागे पडायला सुरुवात झाली. गेल्या वीस वर्षात तर प्रसारमाध्यमांमध्ये खूपच उलटापालट झाली आहे. जागतिकी- करणाच्या रेटय़ानं सेवा-उद्योग यांच्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये मोठा बदल केला आहे.
 
त्यामुळे प्रसारमाध्यमांचा -हास सुरू झाला आहे असं सूतोवाच काही माध्यमतज्ज्ञ करू लागले आहेत. पण असं असलं तरी माध्यमांची मूळ भूमिका काही बदललेली नाही. त्यामुळे समाजाच्या दोषदिग्दर्शनाचं काम ती आपापल्या मगदुरानुसार करतच आहेत, यापुढेही करत राहतील. ती सर्वच काळच्या समाजाची गरज असते आणि असणार आहे. पण म्हणून प्रसारमाध्यमंच सर्व वेळी बरोबर असतात असंही नाही. त्यांच्या कामाचंही ऑडिट वेळोवेळी झालंच पाहिजे. ते पुन्हा समाजातल्या जाणकार आणि अभ्यासू लोकांचंच काम. अचूकतेचा, सर्वसमावेशकतेचा आणि पारदर्शकपणाचा आग्रह धरणं हे समाजाच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यकच असतं.
 
प्रसारमाध्यमांचा समीक्षकअशी काही खरं तर आपल्याकडे संकल्पना नाही. हीसुद्धा एक शाखा असू शकते आणि त्याबाबत अ‍ॅकॅडेमिक अभ्यासाची पद्धतही आवश्यक आहे असाही विचार फारसा केला जात नाही. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया यासारख्या संस्था माध्यमांविषयीचं ध्येयधोरण ठरवण्याचं काम करतात, पण ती प्रातिनिधिक स्वरूपाचं काम करतात. याशिवाय काही माध्यमतज्ज्ञही सातत्यानं माध्यमांच्या वागण्याबोलण्याचं ऑडिट करतच असतात. प्रसारमाध्यमं हे सतत चर्चेतलं क्षेत्र आहे आणि समाजाच्या दैनंदिन जीवनाशी निगडितही. त्यामुळे त्यात उमटणाऱ्या चित्राविषयी चर्चा होणार.
 
महाराष्ट्रात माध्यमांची समीक्षा प्राध्यापक-पत्रकार जयदेव डोळे गेली काही वर्ष सातत्यानं करत आहेत. त्यांना खरं तर माध्यमांचा समीक्षकच म्हणायला हवं. त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचा पहिला लेखसंग्रह समाचारया नावानं प्रकाशित झाला. त्यानंतर बखरहा छोटेखानी लेखसंग्रह प्रकाशित झाला. या दोन्ही पुस्तकांचं चांगलं स्वागतही झालं. ही स्वागतशीलता रसिक वाचक आणि प्रसारमाध्यमं या दोन्ही घटकांनी निदान काही प्रमाणात तरी दाखवली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे डोळे यांचं अलीकडेच हालहे तिसरं पुस्तक प्रकाशित झालं आहे. समाचार’, ‘बखरआणि हालया तिन्ही नावांतून डोळे यांनी त्यांना जे काही माध्यमांबद्दल म्हणायचं आहे ते चांगल्याप्रकारे सूचित केलं आहे. त्यांच्याच रोखठोक भाषेत सांगायचं तर ही, प्रसारमाध्यमांची झाडाझडतीच आहे. 

डोळे यांच्यासारखा एक जबाबदार प्राध्यापक-पत्रकार सातत्यानं प्रसारमाध्यमांविषयी काहीएक सांगू पाहतो आहे. माझंच खरं असं मी मानत नाही. कोणीच मानू नये. जे छापून येतं, जे टीव्हीवर उमटतं, त्या मागं खूप मोठी गुंतागुंत असते हे मला माहीत आहे. कष्टाशिवाय काही उत्पन्न होत नसते याचं भान मला असतंच. ते कष्ट आणखी प्रभावी व्हावेत, त्यातून चांगलं घडत जावं आणि कष्ट प्रामाणिक हवेत एवढीच माझी भूमिका. मला माझ्या मनाप्रमाणे कष्टायला लावणारी माध्यमं म्हणूनच मला उद्युक्त करतात. मग मला त्यांची हालहवाल पुसावीच लागते.अशी भूमिका डोळे यांनी हालच्या निवेदनात नोंदवली आहे. ती यथायोग्य आहे. 

डोळे यांनी काही काळ पत्रकारिता केली असली तरी ते आता पूर्णवेळ पत्रकार नाहीत, तर प्रसारमाध्यमांसाठी योग्य पत्रकार घडवणा-या प्राध्यापक-पत्रकाराच्या पेशात आहेत. त्यामुळे त्यांना प्रसारमाध्यमांतली सर्व अंगांची चांगली जाणीव आहे, त्याबाबत ते सजग आहेत, पण तरीही थेट संबंधित नसल्यानं त्यांना प्रसारमाध्यमाकडे पुरेशा तटस्थपणेही पाहता येतं, हा त्यांचा विशेष आहे.   

या संग्रहातल्या लेखांचं दुसरं वैशिष्टय़ असं की, यातले काही लेख वर्तमानपत्रांतून, काही साप्ताहिकांतून तर काही दिवाळी अंकांतून पूर्वप्रकाशित झाले आहेत. याचाच अर्थ असा की, डोळे यांच्या आक्षेपांना प्रसारमाध्यमांनी काहीसा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. त्यांनी आपल्यावरील टीकाही छापलेली आहे. प्रसारमाध्यमं ही चालू घटनांना प्राध्यान्य देणारी असल्यानं घाईगडबडीत त्यांच्याकडून काही छोटेमोठे अपराध कळत-नकळतपणे घडतात. विशेषत: अलीकडच्या काळात वृत्तवाहिन्यांकडून प्रमाद म्हणाव्या अशा घटना जास्त प्रमाणात घडताना दिसतात. प्रचंड स्पर्धा, चढाओढ आणि अहमहमिका यामुळे त्यांच्याकडून घडणा-या प्रमादांची संख्या जास्त आहे. त्याबाबतही डोळे यांनी पुरेशा सडेतोडपणे लिहिलं आहे.
 
या सर्व लेखनाचा सूर कुठल्याही विशिष्ट माध्यमाबद्दल नसून एकंदर माध्यमातल्या अपप्रवृत्ती आणि मूल्यांबाबत आहे. त्यामुळे या संग्रहात डोळे यांनी केवळ प्रसारमाध्यमांचं उणंदुणंच काढलं आहे, असंही नाही. सामाजिक मूल्यांबाबत आणि पत्रकारितेच्या मूल्यांबाबत डोळे आग्रही आहेत आणि काटेकोरही. त्यामुळे ब-याचदा त्यांच्या लेखणीला चढा सूर लागतो, पण त्यामागे त्यांची आत्मीयताच आहे असंच गृहीत धरायला हवं. सामाजिक मूल्ये आणि माध्यमे’, ‘राजकीय मूल्ये आणि माध्यमेआणि माध्यमबाधाअसे त्यांनी या संग्रहाचे तीन विभाग केले आहेत.
 
मराठी साहित्य आणि प्रसारमाध्यमे : एक मरतुकडं, दुसरं खंगलेलंया लेखात त्यांनी प्रसारमाध्यमं आणि साहित्य यांच्यातील अनुबंधाचा चांगला ऊहापोह केला आहे. या दोघांमधील साहचर्य दोघांच्याही आणि पर्यायानं समाजाच्या कसं हिताचं आहे, याची त्यांनी साधार चर्चा केली आहे. अलीकडच्या काळात हे साहचर्य संपुष्टात येत चालल्यानं प्रसारमाध्यमं आणि साहित्य यावर काय परिणाम होत आहे, याचं दिग्दर्शन त्यांनी लेखाच्या शीर्षकातूनच सूचित केलं आहे.
 
असाच दुसरा वैशिष्टय़पूर्ण लेख आहे, ‘प्रतिपत्रांची परवड आणि परवचाहा. पर्यायी पत्रकारिता म्हणून मराठीमध्ये अलीकडच्या काळात सुरू झालेली दैनिकं, साप्ताहिकं आणि पाक्षिकांविषयी स्पष्टपणे बोलण्याचा परखडपणा या लेखात डोळे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, हा लेख एका पर्यायी माध्यम म्हणून पुढे आलेल्या पाक्षिकातच छापून आला होता. मराठीतल्या पर्यायी पत्रकारितेच्या मर्यादा या लेखात डोळे यांनी अतिशय रोखठोकपणे नोंदवल्या आहेत.
 
पण काही लेख मात्र विषयाचे सिंप्लीफिकेशन करणारे आहेत. या संग्रहातला पहिलाच लेख मावळत्या दशकाचा (म्हणजे 2000 ते 2010) ताळेबंद मांडणारा आहे. त्याचं शीर्षक आहे, ‘शक, दशक, विदूषक : मावळत्या दशकाचा ताळेबंद’. दशकाचा आढावा अवघ्या पाच-साडेपाच पानांत घेतला जात असेल तर त्यात काहीच मुद्दय़ांचं सूतोवाच होऊ शकतं, ही उघड गोष्ट आहे. त्यामुळे त्याविषयी एकच ठाम विधान करणंही तितकंसं बरोबर नाही. 
 
पण एकुणात हा लेखसंग्रह माध्यमांची चांगल्या प्रकारे समीक्षा करतो, हे मात्र नि:संशय. आपल्या कर्तव्याबाबत प्रसारमाध्यमांनी सजग असणं त्यांचं कर्तव्यच आहे आणि त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देत राहणं माध्यम समीक्षकांचं कामच आहे. 
 
हाल : जयदेव डोळे
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद
 पाने : 215, किंमत : 200 रुपये