Tuesday, June 24, 2014

हालहवाल एका धडपडय़ा प्रकाशकाची

प्रकाशनसंस्थांच्या संस्थापकांची आत्मचरित्रे आणि चरित्रे मराठीमध्ये फारच कमी आढळतात. मातब्बर म्हटल्या जाणाऱ्या रा. ज. देशमुख, श्री. पु. भागवत, रामदास भटकळ या प्रकाशकांनीही आत्मचरित्र लिहिण्याचे टाळले आहे. यातील काहींचे गौरवग्रंथ निघाले आहेत खरे, पण आत्मचरित्र ही फस्र्टहँड डॉक्युमेंटरी असते. संबंधित प्रकाशकाने स्वत: अनुभवलेला काळ त्यानेच सांगणे जास्त महत्त्वाचे असते. शिवाय मराठीमध्ये मोजके अपवाद वगळता गौरवग्रंथाची परंपरा ही फारशी नावाजण्याजोगी नाही. अलीकडच्या काळात तर ज्या प्रकारचे गौरवग्रंथ प्रकाशित होतात, त्यांच्याबद्दल न बोललेलेच बरे. असो. तर पहिल्या फळीतल्या प्रकाशकांनी आपली आत्मचरित्रे फारशी लिहिली नसली तरी दुसऱ्या फळीतल्या प्रकाशकांनीही फारशी लिहिलेली नाहीतच. पण त्यातील काही मात्र अलीकडे लिहू लागले आहेत. पुष्पक प्रकाशनाचे ह. ल. निपुणगे यांचे 'हलचल' हे त्यापैकीच एक. हे आत्मचरित्र खऱ्या अर्थाने प्रकाशकीय म्हणावे असे नाही. कारण निपुणगे यांनी केवळ प्रकाशन एके प्रकाशन असे काही केलेले नाही. खरं तर त्यांनी प्रकाशनाचा व्यवसाय करून पाहिला, मुद्रण व्यवसाय करून पाहिला, लायब्ररी चालवून पाहिली, दिवाळी अंक चालवला, कृषिवलसारख्या वार्षिक दैनंदिनी काढल्या, मासिक चालवले आणि उतारवयात मसापचे पदाधिकारी म्हणूनही काम केले. पण यापैकी कुठेच फार उल्लेखनीय म्हणावी अशी कामगिरी निपुणगे यांना करता आलेली नाही. पण हेही तितकेच खरे की, काय केले नाही यापेक्षा जे काही केले ते काय प्रतीचे आहे, असे पाहणे हे अधिक सयुक्तिक ठरते. निपुणगे यांच्या या आत्मचरित्राबाबतही तोच दृष्टिकोन ठेवला तर ते फारसे निराश करत नाही.
याची काही कारणे आहेत. एक म्हणजे अतिशय सामान्य परिस्थितीतून काबाडकष्टांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व पिढीतील निपुणगे आहेत. फारसे शिक्षण नसताना, जवळ कुठल्याही प्रकारचे भांडवल नसताना मंचरसारख्या ठिकाणाहून नेसत्या वस्त्रानिशी आईसह पुण्यात आले. भाडय़ाच्या खोलीत राहू लागले. आधी आलेपाक, मग उदबत्त्या, मग पेपर टाकणे, मग प्यून, नंतर कम्पाउंडर, लग्न व्यवस्थापक, बांधकाम मॅनेजर अशा मिळेल त्या नोकऱ्या करत निपुणगे यांनी आपली वाट शोधत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. नंतर ते व्हीनस प्रकाशनात कामाला लागले. त्यानंतर वोरा बुक कंपनीत. पडेल ते काम करण्याचा स्वभाव असल्याने आणि प्रामाणिकपणा अंगात मुरलेला असल्याने निपुणगे जातील तिथे लोकांचा विश्वास संपादन करत राहिले. वोरा कंपनीत काम करत असतानाच त्यांनी मित्राबरोबर नेपच्यून लायब्ररी सुरू केली. शाळा-कॉलेजमधील मुलांसाठी असलेल्या या लायब्ररीला चांगला प्रतिसादही मिळाला. लायब्ररी चालू असतानाच १ जून १९६३ रोजी निपुणगे यांनी पुष्पक प्रकाशन सुरू करून 'रेखन आणि लेखन' हे आपले पहिले पुस्तक प्रकाशित केले. या त्यांच्या पहिल्याच पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि पुण्यात एका होतकरू आणि धडपडय़ा प्रकाशकाची भर पडली.
निपुणगे यांनी प्रकाशनाला सुरुवात केली, त्याला आता जवळपास पन्नास र्वष होऊन गेली आहेत. या काळात त्यांनी   रा. चिं. ढेरे, उद्धव शेळके,   ह. मो. मराठे, बाळ गाडगीळ, ग. वि. अकोलकर अशा काही लेखकांची पुस्तके प्रकाशित केली. आचार्य अत्रे यांच्याविषयीची 'साहेब' ही कादंबरी उद्धव शेळके यांच्याकडून तर ग. दि. माडगूळकर यांच्याविषयीची 'निर्मोही' ही कादंबरी रवींद्र भट यांच्याकडून लिहून घेतली. या दोन्ही पुस्तकांकडून त्यांची फार अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. पण गप्प बसतील ते निपुणगे कसले. त्यांनी आपला धडपड करण्याचा उद्योग चालूच ठेवला. १९८१ सालापासून 'विशाखा' या दिवाळी अंकाचे पुनप्र्रकाशन करायला त्यांनी सुरुवात केली, मग बळीराजा, गृहिणी, कृषिवल या वार्षिक दैनंदिनींचे प्रयोग करून पाहिले. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही आले. थोडेफार आर्थिक स्थैर्य आले.
त्यांच्या पत्नी त्यांना 'मारा अंधारात उडय़ा आणि धडपडा' असे म्हणत. निपुणगे यांच्या प्रकाशन, मुद्रण, मासिक, दैनंदिनी, दिवाळी अंक या सर्व उद्योगांसाठी हेच वर्णन समर्पक ठरते. त्यांच्या या प्रयोगांना त्यांच्या पत्नीची खंबीर साथ होती हेही तितकेच खरे. शिवाय त्यांनी नोकरी करून घर सांभाळले. त्यामुळे निपुणगे यांना धाडसी प्रयोग करून पाहण्याचे आणि सतत धडपडण्याचे स्वातंत्र्य मिळत राहिले!
प्रकाशकाने प्रकाशित केलेल्या एखाद्या पुस्तकावरून काही वादविवाद झाले नाहीत, न्यायालयीन खटले लढावे लागले नाहीत, असे सहसा होत नाही. सध्याच्या काळात या सव्यापसव्याच्या भीतीने अनेक मराठी-इंग्रजी प्रकाशक आपली पुस्तके सपशेल मागे घेतात किंवा नष्ट करून टाकतात. तर ते असो. विनोदी लेखक बाळ गाडगीळ यांच्या 'वळचणीचे पाणी' या आत्मचरित्राविषयी वर्षभराने फग्र्युसनचे माजी प्राचार्य बोकील यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करून गाडगीळ आणि निपुणगे यांना न्यायालयात खेचले. त्याची छोटीशी हकिकतही रोचक म्हणावी अशी आहे.
असे संघर्षांचे छोटे-मोठे प्रसंग निपुणगे यांच्या आयुष्यात सतत आले आहेत. हे आत्मचरित्र अशा हकिकतींनीच भरले आहे. पण त्या सर्व आर्थिक संघर्षांच्या आणि व्यावहारिक हिकमतीच्या आहेत. निपुणगे यांनी त्यांना जमेल तेवढे आणि तसे प्रयोग करून स्थिर होण्याचा प्रयत्न केला. पण अशा गोष्टींना मूलभूत मर्यादा असते. त्यामुळे या चौकटीत जे आणि जेवढे शक्य होते, तेवढेच यश निपुणगे यांना मिळाले.
दिवाळी अंकासाठी, मासिकासाठी जाहिराती मिळवण्यासाठी काय काय करावे लागले, याविषयी निपुणगे यांनी सविस्तर लिहिले आहे, तसेच विशाखा या दिवाळी अंकात दरवर्षी काय काय साहित्य छापले याविषयी एक स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे. केशवराव कोठावळे, श्री. ग. माजगावकर, वोरा कंपनीचे अमरेंद्र गाडगीळ, बाळ गाडगीळ अशा प्रकाशनव्यवहाराशी संबंधित व्यक्तींच्या स्वभावाचे काही पैलू निपुणगे यांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून नोंदवले आहेत. शेवटचे प्रकरण हे त्यांच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतील कामाविषयीचे आहे. या प्रकरणातून मसापचे अंतरंग काही प्रमाणात जाणून घ्यायला मदत होते. या साहित्यिक संस्थेत कशा प्रकारचे राजकारण चालते, त्याची चांगल्या प्रकारे माहिती होते आणि राजकारणी काय किंवा साहित्य व्यवहारात लुडबुड करणाऱ्या व्यक्ती काय, यांच्यात कसा फारसा फरक नसतो, हे आपसूकच समजायला मदत होते.
प्रकाशनापासून सुरुवात करून पुस्तक विक्री, मुद्रण व्यवसाय, दिवाळी अंक इथपर्यंत प्रवास केलेल्या एका धडपडय़ा प्रकाशकाचे हे आत्मचरित्र आहे. साडेतीनशे पानांचे हे पुस्तक सर्वसामान्य वाचकाला आवडेलच
असे नाही, पण प्रकाशन व्यवहाराशी संबंधित असलेल्यांना यातून काही संदर्भ-माहिती मिळू शकते आणि ज्यांना या क्षेत्राकडे वळायचे आहे त्यांना काय करू नये आणि कशा प्रकारे करू नये, याचा धडा या आत्मचरित्रातून नक्की मिळू शकतो. त्यांनी या पुस्तकाच्या वाटेला जायला काहीच हरकत नाही. फार थोर असे काही हाती लागणार नाही हे खरे, पण फार अपेक्षाभंगही होणार नाही.  
'हलचल' - ह. ल. निपुणगे, पुष्पक प्रकाशन, पुणे,
पृष्ठे - ३५२, मूल्य - ३५० रुपये.

कर्तेपणाकडून शहाणपणाकडे?

भारतीय प्रशासन सेवेतील माजी ज्येष्ठ अधिकारी पवन के. वर्मा यांची वर्तमान भारतीय समाजाचे भाष्यकार म्हणून ओळख झाली ती, १९९८ साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या 'द ग्रेट इंडियन मिडल क्लास' या पुस्तकामुळे. जागतिकीकरणोत्तर भारतीय लोकव्यवहाराचे, विशेषत: मोठय़ा शहरांमधील नव्याने उदयाला येत असलेल्या मध्यमवर्गाचे वर्मा यांनी या पुस्तकात अतिशय यथार्थ विश्लेषण केले आहे. साहजिकच या पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि विदेशी भाषांमध्येही अनुवाद झाले. त्यानंतर २००० साली वर्मा यांनी पत्रकार रेणुका खांडेकर यांच्यासह 'मॅक्झिमाइज युवर लाइफ- अ‍ॅन अ‍ॅक्शन प्लॅन फॉर द इंडियन मिडल क्लास' या पुस्तकाचे लेखन केले. त्यानंतर 'बिइंग इंडियन- द ट्रथ अबाऊट व्हाय द २१ सेन्चुरी विल बी इंडियाज' (२००४), 'बिकमिंग इंडियन - द अनफिनिश्ड रिव्हॉल्युशन ऑफ कल्चर अँड आयडेंटिटी' (२०१०) ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यातील पहिल्या पुस्तकाची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली. म्हणजे गेली सोळा-सतरा वर्षे वर्मा सातत्याने भारतीय मध्यमवर्गाचे निरनिराळे प्रकारे विश्लेषण करत आहेत, त्याला त्याच्या कर्तव्याची, पूर्वाश्रमीच्या समृद्ध वारशाची, भारतीय संस्कृतीची, समाजाप्रतिच्या उत्तरदायित्वाची आणि भविष्यातील आव्हानांची जाणीव करून देत आहेत.
जागतिकीकरणोत्तर भारतीय मध्यमवर्ग हा महत्त्वाकांक्षी आणि सुख-समृद्धीला प्राध्यान्य देणारा आहे. सुशिक्षित, करिअरिस्ट असलेल्या या वर्गाला देशाचे राजकारण स्वच्छ, कार्यक्षम आणि विकासाभिमुख हवे आहे. साहजिकच या वर्गाच्या इच्छा-आकांक्षांचा प्रतिध्वनी उमटायला सुरुवात झाली. दुसरीकडे जागतिकीकरणामुळे शिक्षण, आरोग्य, राहणीमान, संधी यांचा लाभ मिळवून या वर्गाच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत गेली. त्यामुळे भारतीय राजकारणाचे कर्तेपणही याच वर्गाकडे आले. त्याचे ठसठशीत प्रतिबिंब २०१४च्या निवडणुकांत उमटलेले पाहायला मिळाले. त्यामुळे 'भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा बदलणारी निवडणूक,' असे भविष्यात या निवडणुकीचे वर्णन केले जाण्याची शक्यता आहे.
आजच्या भारतीय मध्यमवर्गाची भूमिका बदलण्याची सात कारणे वर्मा यांनी पहिल्या प्रकरणात दिली आहेत. या वर्गाची वाढती आणि मतपेटीवर परिणाम करू शकणारी संख्या, पॅन-इंडियनसारखा स्वत:चा विस्तारलेला समूह, आपल्या वर्गाबाबतची सजगता, हा वर्ग वयाने पंचविशीच्या आतबाहेर असणे, या वर्गाचे सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, मोबाइल या साधनांवरील आधिपत्य, सामाजिक प्रश्नांविषयीचे भान आणि सरकार-प्रशासन यांच्या अकार्यक्षमतेविषयीची चीड, ही ती सात कारणे. या सात कारणांमुळे या मध्यमवर्गाच्या व्यक्तिमत्त्वात, भूमिकेत, प्रभावात आणि गुणवत्तेत बदल झाला आहे. त्यामुळे सामाजिक प्रश्नांबाबत हा वर्ग रस्त्यावर उतरू लागला आहे, आपल्यापरीने त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करू लागला आहे, ही चांगली गोष्ट आहे, असे वर्मा म्हणतात. पण त्याच वेळी काही कळीचे प्रश्नही उपस्थित करतात. याची भविष्यातील दिशा काय असेल, मध्यमवर्गाच्या या संतापाला आणि सामाजिकतेला भविष्यात क्रांतिकारी, सकारात्मक बदलाचे कोंदण मिळू शकेल काय? की आहे ते बदला, पण नवे काहीच धोरण नाही, असा हा प्रकार आहे का? मध्यमवर्गाची ही ऊर्जा 'गेम चेंजर' ठरणार की हा 'सिनिकल गेम प्लॅन' ठरणार?
दुसऱ्या प्रकरणात मध्यमवर्गाच्या सामाजिक आणि राजकीय भूमिकेविषयी नेमके प्रश्न विचारले आहेत. त्यासाठी त्यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मध्यमवर्गाची भूमिका नेमकेपणाने विशद केली आहे. म. गांधी, पं. नेहरू, आणीबाणी, बाबरी मशीद, आरक्षण, आर्थिक सुधारणा याबाबतच्या तत्कालीन मध्यमवर्गाच्या भूमिकेचे दाखले दिले आहेत.
तिसऱ्या प्रकरणात मध्यमवर्गाला राजकारणात बदल हवाय, पण त्या बदलाची दिशा काय असायला हवी, याचा ऊहापोह केला आहे.
शेवटच्या समारोपाच्या प्रकरणात वर्मा  मध्यमवर्गाने राज्यकर्त्यांची मानसिकता त्यांना विविध प्रकारचे प्रश्न विचारून बदलायला हवी, असे सांगतात. कारण योग्य प्रश्न विचारण्यातून तुमचे शहाणपण सिद्ध होत असते. हे शहाणपण दाखवतानाच भारतात धार्मिक सौहार्द आणि सुप्रशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्या दोन्ही तितक्याच सामंजस्याने हाताळल्या जायला हव्यात, हेही वर्मा नमूद करतात.
थोडक्यात कर्त्यांच्या भूमिकेत गेलेल्या मध्यमवर्गाने शहाण्यासुरत्याचीही भूमिका निभवायला हवी आणि त्यासाठी कशाकशाचे भान ठेवायला हवे, हे सांगणारे हे पुस्तक आहे.
द न्यू इंडियन मिडल क्लास -
द चॅलेंज ऑफ २०१४ अँड बियाँड :
पवन के. वर्मा,
हार्पर कॉलिन्स, नोएडा,
पाने : १०१, किंमत : २९९ रुपये.

Wednesday, June 4, 2014

राम पटवर्धन - 'ओपन' दृष्टीचा संपादक

29 July 2010 रोजी ठाण्याच्या घरी काढलेले छायाचित्र   
राम पटवर्धन यांनी मला २०१० साली सविस्तर मुलाखत दिली. आपले पूर्वायुष्य, सत्यकथा, ग्रंथसंपादन अशा अनेक विषयांवर मन मोकळं केलं. दुर्दैवाने तीच त्यांची शेवटची मुलाखत ठरली. त्या मुलाखतीच्या अनुभवाविषयी...
,,,,,,,,,,,,,,,,
सत्यकथा बंद पडून आता जवळपास ३२ वर्षे झाली आहेत, पण अजूनही मराठीतल्या वाङ्मयीन मासिकांचा विषय निघाला की, त्याची सुरुवात ‘सत्यकथा’पासूनच होते. आणि ‘सत्यकथा’ म्हटलं की श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांचीच नावं आठवतात. विचक्षण दृष्टी आणि साहित्यावरचं अनिवार प्रेम यांच्या जोरावर या दोन संपादकांनी ‘सत्यकथा’ला श्रेष्ठ दर्जा मिळवून दिला. पटवर्धन तसे ‘सत्यकथा’चे संपादक सहा-सात वर्षंच होते. पण मौजेत त्यांनी जवळपास चाळीस वर्षे काम केले. ‘सत्यकथा’ बंद पडल्यावर पाचेक वर्षांनी म्हणजे १९८७मध्ये ते मौजेतून निवृत्त झाले होते. तेव्हापासून पटवर्धन हे जवळपास अज्ञातवासात असल्यासारखेच होते. या काळात त्यांनी मौजसाठी काही पुस्तकांचे संपादन केले, तेवढेच. त्यामुळे त्यांच्याशी बोलून त्यांचा काळ, संपादकीय दृष्टिकोन जाणून घ्यावा या हेतूने त्यांच्याशी चार-पाच तास निवांत गप्पा मारल्या. त्यातून पटवर्धन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही नवे कंगारे उलगडले.


पटवर्धन शिवाजी पार्कच्या शाळेत शिकले. तिथे त्यांना शिकवायला साक्षात पु. ल. देशपांडे होते. ते पटवर्धन यांना इंग्रजी शिकवत. या शाळेत पटवर्धन यांच्या दोन वर्ग पुढे बाळासाहेब ठाकरे होते. त्यावेळी पटवर्धन काहीबाही लिहीत होते. एकदा त्यांनी मॅझर्ड झिलावू या पोलिश लेखकाच्या एका लेखाचा अनुवाद केला आणि पु.लं.ना दाखवला. ते म्हणाले, ‘हे उद्याा मला एका स्वतंत्र कागदावर सुवाच्य अक्षरात लिहून दे.’ तो अनुवाद पु.लं.नी त्याकाळी प्रचंड दबदबा असलेल्या ‘अभिरुची’मध्ये छापून आणला. साल होतं १९४६. पण त्यानंतर काही पटवर्धन यांनी अनुवाद केले नाहीत. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर ‘नाना तºहा’ झाल्या. त्यात अनुवाद प्रकरण मागे पडत गेलं. हे आपलं काम नाही असं त्यांनी ठरवून टाकलं.

चित्रकार जतीन दास यांनी राम पटवर्धन यांचे काढलेले रेखाचित्र

शिक्षण पूर्ण करून कुठं तरी मामलेदार कचेरी वा आणखी कुठं नोकरी करायची एवढंच पटवर्धन यांनी ठरवलं होतं. तसे ते सचिवालयात नोकरीलाही लागले. पण साहित्याचं अनिवार प्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. मग त्यांनी ती नोकरी सोडून दिली. रुइयाच्या चौकात तेव्हा अनेक साहित्यिक जमत असत. त्यात पटवर्धनही सहभागी होत. त्याबाबत पटवर्धन यांनी एक रंजक किस्सा सांगितला तो असा- एकदा तिथे त्यांना पु. ल. भेटले. म्हणाले, ‘अरे, तू एसएससीला पहिला आला होतास. मग तू सायन्स घेतलं असशील?’ पटवर्धन म्हणाले, ‘नाही. मी साहित्य घेतलंय.’ पु.ल. म्हणाले, ‘हा कुठून दुर्विचार सुचला तुला? हे तुला जड नाही का जाणार?’ पटवर्धन म्हणाले, ‘माझं ठरलेलं आहे. मी साहित्याचाच व्यासंग करणार. त्याची मी पर्वा करत नाही.’ (शेवटचं वाक्य मी मनातल्या मनात म्हटलं, अशी पुस्ती त्यावर पटवर्धन यांनी हळूच केली.) असं दोन-तीनदा घडलं. पु.लं. एकदा त्यांना म्हणाले, ‘तू सचिवालय कशाला सोडलंस? तिथे तुला चांगली करिअर करता आली असती.’ पण सचिवालयात साहित्याला काही स्थान नव्हतं म्हणून ते पटवर्धन यांनी सोडून दिलं. कशाचीच पर्वा करायची नाही आणि आपण कशाची पर्वा करत नाही या शब्दांचाही उच्चार करायचा नाही, असा पटवर्धन यांचा बाणा होता.


‘योगायोग’ या शब्दाला पटवर्धन यांच्या आयुष्यात बरंच स्थान आहे. कारण ते ‘सत्यकथे’त आले तेही योगायोगानेच. श्रीपु तेव्हा रुइया कॉलेजमध्ये शिकवत होते. पटवर्धन त्यांचेच विद्याार्थी. ‘मौज’चे तत्कालीन संपादक ग. रा. कामत हे चित्रपटसृष्टीत नशीब आजमावयाला चालले होते. त्यामुळे श्रीपुंनी पटवर्धन यांना मौजमध्ये यायची ऑफर दिली. मौजसारख्या संस्थेत काम करण्याची संधी मिळतेय तर का सोडा, असा विचार करून पटवर्धन तयार झाले. आधी मौज साप्ताहिकात रुजू झाले. (तसे तर ते आधीपासूनच रुजू होते म्हणा!) सत्यकथा ही विशिष्ट लेखकांचीच मक्तेदारी होती आणि तिचं स्वरूप सदाशिवपेठी होतं, या आरोपात कितपत तथ्य आहे, असं विचारल्यावर पटवर्धन म्हणाले की, ‘फारसं नाही.’ पटवर्धन यांनी सुर्वे, ढसाळ, दि. के. बेडेकर अशा अनेक लेखकांना मौजेतून लिहितं केलं. तरीही काही लेखक आमच्याकडून सुटले हे त्यांना मान्य होतं. ‘कुठलंही मासिक हे सर्व साहित्याला सामावून घेऊच शकत नाही. त्यामुळे उगाच भलत्या गमजा मारू नयेत,’ असा पटवर्धनांचा स्वत:वर शेरा मारला!

व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांनी राम पटवर्धन यांचे काढलेले अर्कचित्र

भागवत-पटवर्धन यांच्या संपादनाविषयी बरंच उलटसुलट बोललं जातं. त्यावर ‘ते सगळे प्रवाद आहेत’, असा निर्वाळा पटवर्धन यांनी दिला. आणि तो खरा असावा. कारण पटवर्धन काय किंवा श्रीपु काय, त्यांच्या संपादनामुळे नाराज झालेल्या लेखकांची नावे ऐकायलाही मिळत नाहीत. किमान जाहीरपणे तरी तसं कुणी बोललेलं नाही. कारण संपादन म्हणजे फुलवणं, लेखनाच्या आत गुदमरलेली थीम फुलून कशी येईल या पद्धतीने पटवर्धन साहित्याकडे पाहत. त्यामुळे ते संपादनाला ‘संगोपन’ असा शब्द वापरत. पटवर्धन म्हणाले की, ‘कडक शिस्तीचे हेडमास्तर अशी आमची जी ओळख आहे, ती फक्त प्रतिमाच आहे. जी मंडळी लांबून बघत असतात त्यांनी ती करून घेतली आहे.’ पटवर्धन लेखकाशी रीतसर चर्चा करूनच पुनर्लेखन करून घेत. यातून सानिया, आशा बगे, दीपा गोवारीकर, आनंद विनायक जातेगावकर या साहित्यिकांना उत्तेजन देण्यात आणि त्यांचं सुरुवातीचं लेखन ‘सत्यकथा’त छापलं गेलं, ते पटवर्धन यांच्यामुळेच.


मौज हा तत्कालीन लेखक-चित्रकार-नाटककार अशा सांस्कृतिक क्षेत्रातल्या प्रस्थापित आणि नवोदितांचा गप्पांचा अड्डा होता. त्यांना सांभाळायचं काम सुरुवातीला श्रीपु करत, नंतर ते पटवर्धन यांच्याकडे आलं. पटवर्धन या सगळ्यात असून सर्वांपासून अलिप्त असत. ते कुठल्याही वादात पडत नसत. पण शिरा ताणून, घसा फोडून उच्चरवाने बोलणाºयांना ते युक्तीने लिहितं करत आणि ते लेखन ‘सत्यकथा’त छापत. त्यावर चर्चा व्हावी असं त्यांना वाटत असे. पण बºयाचदा त्यावर काहीच चर्चा होत नसे. असे एकदा पटवर्धन यांनी ‘चार डावे दृष्टिक्षेप’ या नावाने मराठी साहित्याची माक्र्सवादी समीक्षा करणारे चार लेख छापले. पण त्यावर कसलाही प्रतिसाद नाही की चर्चा नाही. एकदम नि:शब्द शांतता. असं झालं की पटवर्धन अस्वस्थ होत. म्हणून त्याचं वर्णन त्यांनी ‘कानठळ्या बसवणारा शुकशुकाट’ असं केलं. त्यांच्या पंच्याहत्तरी निमित्ताने ग्रंथालीने २००३ साली त्यांचा जो सत्कार समारंभ केला. तेव्हाही पटवर्धनांनी मराठी साहित्यातील या ‘कानठळ्या बसवणाºया शुकशुकाटाचा’ उल्लेख केला. पटवर्धन यांची मराठी साहित्याची समीक्षा म्हणून त्यांच्या या वाक्प्रचाराचं बरंच कौतुकही झालं. पण त्याविषयी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी ते ‘डेफनिंग सायलेन्स’चं ते भाषांतर आहे असं मोकळेपणानं सांगून टाकलं.


पटवर्धन यांनी फारसं स्वतंत्र लेखन केलेलं नाही. लेखनाची त्यांना हौस नव्हती असं म्हटलं तरी चालेल, किंवा मग तेही श्रीपुंचेच सहकारी असल्याने लेखनाबाबत काहीसे उदासीन होते असं म्हणावं लागले. तरीही प्रसंगपरत्वे त्यांनी काही मोजके लेख लिहिले आहेत. ‘सत्यकथे’त ते मराठी नाटकांच्या परीक्षणाचे सदर श्रीरंग या नावाने लिहित. सत्यकथेतच त्यांनी चेकॉव्हच्या काही कथांचे अनुवाद केले. विष्णुपंत भागवत आणि जयवंत दळवी यांच्या आग्रहावरून त्यांनी मार्जोरी किनन रॉलिंग्ज यांच्या ‘द यर्लिंग’ या पुस्तकाचा ‘पाडस’ या नावानं मराठी अनुवाद केला आहे. सर्वोत्कृष्ट अनुवाद म्हणून गेली अनेक वर्षं या पुस्तकाचा उल्लेख केला जातो आहे. पटवर्धन यांना दोन मुलं - श्रीरंग आणि अनिरुद्ध. पहिला वकील आहे तर दुसरा ऑडिटर. या दोघांनाही जवळपास ‘पाडस’ तोंडपाठ आहे. याशिवाय ‘नाइन फिफ्टीन टू फ्रिडम’चा ‘अखेरचा रामराम’ आणि बी. के. अय्यंगार यांच्या पुस्तकाचा ‘योगदीपिका’ असे दोन मराठी अनुवाद पटवर्धन यांच्या नावावर आहेत. पुष्कळ लोक अय्यंगार यांच्या अनुवादाला ‘तुमची योगायोगदीपिका’ असं म्हणतात.


पटवर्धन यांचा डावा डोळा बहुधा जन्मापासूनच दुबळा होता. त्यामुळे त्यांना कधी चष्माही लावता आला नाही. त्यावर पटवर्धन यांची टिप्पणी मोठी मासलेवाईक होती, ते म्हणाले, ‘ते एका अर्थानं बरंच झालं. त्यामुळे जगाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन ओपन राहिला.’ पटवर्धन यांच्या या ओपन दृष्टिकोनाचं एक उदाहरण सांगायला हरकत नाही. लघुअनियतकालिकांच्या चळवळीतल्या राजा ढाले, सतीश काळसेकर वगैरे मंडळींनी ५ मार्च १९७९ रोजी मौजच्या कार्यालयासमोर ‘सत्यकथा’ची जाहीर होळी केली. या घटनेचा उल्लेख सत्यकथाच्या प्रस्थापित कंपूशाहीचा केलेला निषेध म्हणून अनेक वेळा केला जातो. गंमत म्हणजे जाहीर निमंत्रणपत्रिका छापून हा ऐतिहासिक कार्यक्रम करणाºयांपैकी कुणीही याविषयीची सत्य गोष्ट आजवर कधी जाहीरपणे सांगितली नाही. राम पटवर्धन यांनी या मुलाखतीत याविषयीची सत्यकथा सांगितली, ती अशी की- त्या दिवशी राजा ढाले वगैरे मंडळी मौजच्या कार्यालयासमारे पोचली खरी, पण घाईगडबडीत त्यांच्याकडे असलेला एकुलता एक अंक ते घरीच विसरून आले होते. दरम्यान बाहेरची गडबड ऐकून पटवर्धन आणि त्यांचे सहकारी गुरुनाथ सामंत खिडकीत आले. सामंत पटवर्धन यांना म्हणाले की, ‘हे लोक सत्यकथेची होळी करायला आले आहेत.’ सामंत मौजेत काम करत असले तरी लघुअनियतकालिकांशी संबंधित होते. त्यामुळे पटवर्धन त्यांना म्हणाले की, ‘तुम्ही मौजेच्या स्टाफपैकी असलात तरी तुम्ही त्यांच्यातले आहात. तेव्हा तुम्ही त्यांच्यात जा. आणि जाताना सत्यकथाचे अंकही घेऊन जा.’ त्यानुसार सामंत अंक घेऊन खाली उतरले आणि जथ्यात सामील झाले. त्यांना जथ्यावाल्यांकडे अंक नाही याची कल्पना नव्हती. मग त्यांनी स्वत:कडचे अंक त्यांना दिले आणि त्याचीच होळी करण्यात आली. म्हणजे सत्यकथाची होळी करण्यात आली ती मौजेच्या जिवावर. आणि त्याविषयी पटवर्धन यांनी स्वत:हून कधीही ब्र उच्चारला नव्हता. त्यांना विचारल्यावरच त्यांनी ही गोष्ट सांगितली. पटवर्धन यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ओपन होता तो हा असा!


सध्या आपल्या आजूबाजूला जे काही चाललं आहे, त्याला सामावून घेईल असं मराठी साहित्यिकांच्या आणि वाङ्मयीन मासिकांच्या हातात काही राहिलेलं नाही. सगळाच काळ बदलला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पटवर्धन यांनी अनुवाद केलेल्या ‘पाडस’चा शेवट फार सुंदर आहे. त्याचं शेवटचं वाक्य आहे, ‘पोरा, जीवन फार सुंदर आहे, पण ते सोपं मात्र नाही.’ हे समजून घेऊन पटवर्धन जगले. त्यामुळे त्यांना कधी कुठल्याही लौकिकाचा, प्रलोभनाचा आणि प्रसिद्धीचा मोह झाला नाही. सत्त्वशीलतेनं त्यांनी आपलं साहित्याचं संपादन, नव्हे संगोपन करण्याचं काम केलं. श्रीपुंनी त्यांचा उल्लेख ‘अभिन्नजीव सहकारी’ असा करून म्हटलं आहे, ‘ते मला सहकारी म्हणून लाभले हे मी माझं भाग्यच समजतो.’ पटवर्धनही स्वत:चा उल्लेख ‘दत्तक घेतलेला भागवत’ असाच करत. मौजमधून निवृत्त झाल्यावरही त्यांना लेखकपणाच्या प्रलोभनाचा मोह झाला नाही. शांतपणे ते अज्ञातवासात निघून गेले. त्यानंतर २००३ साली ग्रंथालीनं त्यांची पंच्याहत्तरी साजरी केली तेवढंच काय ते त्यांचं जाहीर कार्यक्रमातलं दर्शन. त्यानंतर ते पुन्हा अज्ञातवासात गेले. आणि आता तितक्याच शांतपणे निघून गेले.