Monday, April 27, 2015

गांधी मला नडला

वसंत दत्तात्रेय गुर्जर हे प्रसिद्धिपराङ्मुख कवी मागच्या आठवड्यात एकदम चर्चेत आले. गुर्जरांचं वयवर्ष ७१. या वयात मराठीतल्या हिकमती वा प्रसिद्धिलोलुप कवीला चांगले दिवस येतात. म्हणजे त्याला अधूनमधून जाहीर कार्यक्रमांची निमंत्रणं येतात, मधूनमधून त्याच्या वाट्याला एखादा पुरस्कारही येतो. यापैकी काहीच नाही झालं, तर शालेय कार्यक्रमातल्या बक्षीस वितरणाचा वा गॅदरिंगचा प्रमुख पाहुणा वगैरे होण्याचं भाग्य त्याला लाभतंच लाभतं. फेसबुकमुळे आणि वॉट्सअॅपमुळे हल्ली स्वत:च्या कविता स्वत:च प्रकाशित करण्याची सोय झाल्याने या वयातही अनेकांना आपलं मन हिरवंगार ठेवता येतंच. गुर्जरांना याही गोष्टी नडल्याच. कारण ते पडले लघुनियतकालिकांच्या चळवळीतले कवी. त्यात पुन्हा अबोल, प्रसिद्धिपराङ्मुख. लघुनियतकालिकांच्या चळवळीतले सगळेच लेखक-कवी असे नाहीत. त्यातल्या अनेकांना आपल्या ‘प्रतिमा उत्कट’ करण्याच्या खुब्या माहीत आहेत. गुर्जरांकडे तेही नाही. त्यावाचून त्यांचंही काही नडलेलं नाही म्हणा; पण त्यांच्यातल्या कवीचं नडलंच म्हणायचं.
पण गुर्जरांना सगळ्यात जास्त कुठली गोष्ट नडली असेल, तर ती म. गांधी. त्यांनी ‘गांधी मला भेटला’ ही दीर्घ कविता लिहिली. जानेवारी, १९८३मध्ये ती अशोक शहाणे यांनी ‘प्रास प्रकाशन’तर्फे पोस्टर स्वरूपात प्रकाशित केली. ऑक्टोबर, १९८६मध्ये ति्ाची दुसरी आवृत्तीही काढावी लागली. पुढे तिचा हिंदी अनुवादही झाला. ही कविता तेव्हा बरीच गाजली, काहींना आवडली. ज्या अर्थी ही गांधींवरची कविता काहींना आवडली, त्याच अर्थी ती अनेकांना आवडली नाही, हेही उघडच आहे.
गंमत पाहा. १९८३ मधली ही कविता ऑल इंडिया बँक असोसिएशनच्या जुलै-ऑगस्ट, १९९४च्या द्वैमासिकात पुनर्प्रकाशित झाली आणि एकदम, तिच्यामुळे गांधीजींची प्रतिमा डागाळली. पुण्याच्या पतित पावन संघटनेने गुर्जर, वरील द्वैमासिकाचे प्रकाशक देविदास तुळजापूरकर आणि मुद्रक धनंजय दादासाहेब कुलकर्णी यांच्याविरोधात खटला भरला. लातूर मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या खटल्यात तिघेही दोषी ठरले. त्याला मुद्रक-प्रकाशकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खडंपीठात आव्हान दिलं. २०१०मध्ये ‘अश्लील, बीभत्स आणि अनुचित’ असा निर्वाळा या खंडपीठाने देत, “या कवितेतील ओळींमुळे महात्मा गांधी यांची प्रतिष्ठा व प्रतिमा डागाळली,” असा निवाडा दिला. त्यालाही प्रकाशकाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्याची सुनावणी मागच्या पंधरवड्यात सुरू झाली. तेव्हा गुर्जरांच्या या कवितेविषयीच्या आधी इंग्रजी व मग मराठी वर्तमानपत्रात बातम्या झळकल्या.
समीक्षक प्रा. राजशेखर शिंदे गुर्जरांवरील लेखात म्हणतात, “गांधीजींवर टीका झाली म्हणून या कवितेवर कोणी प्रतिकूल लिहिले-बोलले असतील; पण प्रतिकूल मतं व्यक्त झाली, ती कारणं निराळी आहेत. त्यामध्ये गुर्जरांनी अनेक सांप्रदायिक विचारांचं-आचारांचं बिंग फोडलं म्हणून त्यांची ‘गांधी मला भेटला’ ही कविता स्फोटक ठरली. गांधीसारखा महात्मा देवासारखा मोठा असतो. एवढं महात्म्य गांधीजींना लाभलं, म्हणून ते प्रत्येकाचे वाटतात. गुर्जरांना गांधी भेटले, ते विवेकशून्य समाजमनात. गांधी स्वत: हतबल, निराश, न्यूनगंडबाधित अशा मनोवस्थेत.” अशा समाजात भेटलेले गांधी नडल्याशिवाय कसे राहतील?
हे जे नडणारे गांधी आहेत, ते खरं तर गांधींनंतरचे गांधी आहेत. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ आशिष नंदी यांनी या गांधींनंतरच्या गांधींची चार वर्गांत विभागणी केली आहे. पहिले- भारतीय राज्यसंस्था व भारतीय राज्यवादाचे गांधी, दुसरे- गांधीवाद्यांचे गांधी, तिसरे- हे लहरी, मनमानी आणि कलंदर व्यक्तींचे गांधी आणि ‘चौथे गांधी हे सहसा वाचले जात नाहीत, ते फक्त ऐकले जातात आणि तेही अप्रत्यक्षपणे. मार्टिन ल्युथर किंगसारखा एखादाच माणूस काळजीपूर्वक व साक्षेपाने वाचून त्यांच्या कामाचं मूल्यमापन करतो. बाकीच्यांना त्यांनी काय लिहिलं, हेदेखील ठाऊक नसतं.’ गांधी न वाचताच, गांधीवादी असणाऱ्यांची संख्या भारतात सर्वात जास्त आहे. त्यातल्या काहींची आकलनक्षमता इतकी तोकडी आहे की, त्यांनी गांधी वाचले, तरी त्यांना ते समजत नाहीत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अरुंधती रॉय. त्या नक्षलवाद्यांना ‘छोटे छोटे गांधी’ म्हणतात. 
या गांधींनंतरच्या गांधींचं भारतात मोठं पीक आहे. सध्या मोदी सरकारच्या कृपेने ‘कृतघ्न गांधीवाद्यां’मध्ये भरच पडत आहे. हे सर्वच ‘गांधींनंतरचे गांधी’ स्वत:ला सर्वोच्च न्यायालयातले न्यायाधीश समजतात. प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयातही मुख्य न्यायाधीश एकच असले, तरी यातले अनेक गांधी एकाच वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या थाटात वावरत असतात. त्यांचा तसा नुसता समजच नाही, तर खात्रीच आहे. आता जी गोष्ट सर्वोच्च आहे, तिच्याविरुद्ध ‘ब्र’ उच्चारायचा म्हणजे? गुर्जरांनी नेमका त्यांच्याच शेपटीवर पाय दिला. मग, ते नडणारच ना?
हे चारही गांधी गुर्जरांना भारतात कुठे-कुठे भेटले, त्याचं वर्णन त्यांनी ‘गांधी मला भेटला’ या कवितेत केलं आहे. हे गांधी त्यांना बनियाकडे पैसे मोजत एक नोट हळूच लंपास करताना, बौद्धमठात बीफचिली ओढताना, अस्पृश्य म्हणून पुनर्जन्म मिळावा म्हणताना, हेमामालिनीच्या नावानं हस्तमैथुन करताना, रजनीश आश्रमात संभोगाच्या समाधीतून शेळीकडे वळताना, कामगारांवरील पिक्चर बघताना, शेतकऱ्यांच्या वेशात शहरात स्थायिक होताना, दवाखान्यात सॅम्पलची बाटली सावरकरांना विकताना, छत्रपतीछाप बिडी ओढताना, हाजी मस्तानच्या साम्राज्यात पंचा सोडताना, न्यायालयात आरोपीच्या पिंजऱ्यात, अत्र्यांच्या शिवशक्तीत देशी घेताना, विनोबांच्या धारावीत अशा ३२-३३ ठिकाणी भेटतात. हे गांधी राजरोसपणे नंगानाच करताना गुर्जर यांनी त्यांना पकडलं आणि आपल्या कवितेत आहे तसं, एका रांगेत उभं केलं. कल्पना करा राव, कुणालाही असं भररस्त्यात विवस्त्र केल्यावर ते गप्प थोडेच बसणार? खरा प्रकार आहे तो इतकाच; पण त्याचा त्रास गुर्जरांना गेली २० वर्षं होतो आहे. या काळात या तथाकथित गांधींनंतरच्या गांधींमध्ये कितीतरी भर पडली आहे. 

प्लेटो यांनी आदर्श राज्याची मांडणी करणाऱ्या ‘रिपब्लिक’ या आपल्या ग्रंथात कवी लोकांना अजिबात स्थान दिलं नव्हतं. या लोकांचा काही उपयोग नसतो, असं त्यांचं म्हणणं होतं. आपला देश म्हणजे काही प्लेटोचं आदर्श राज्य नाही; पण तो ‘गांधींनंतरचा भारत’ मात्र नक्की आहे. या भारतात गांधीजींच्या विचाराला तिलांजली देणाऱ्या सगळ्या गोष्टी मौजूद आहेत. गांधींचं नशीबच म्हणायला हवं की, हे सर्व पाहायला ते नाहीत. आिण असते तर मंदिरं वगैरे बांधून त्यांचा ‘गणपती’ केला गेला असता.
गांधीजींनी ‘रामराज्या’ची संकल्पना मांडली होती खरी; पण ती त्यांच्या हयातीतही शक्य झाली नाही आणि भविष्यात कधी होईल, याची शक्यताही दुरापास्त आहे. त्यामुळे भारतासारख्या आदर्श नसलेल्या देशात आणि त्यातही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात गुर्जरांसारख्या कवीला धोकादायक मानलं जात असेल, तर तो
प्लेटोच्या सिद्धांताचा मूर्तिमंत व्यत्यास म्हणावा लागेल.
पण गुर्जर हे एकच कवी आहेत, तो काही कविसंप्रदाय नाही. अनेक कवी असते, तर आपण समजूही शकलो असतो. अनेकांच्या कविता, त्यातील शब्द एकत्र आल्याने त्यांचं ग्रेनेडसारख्या स्फोटकात रूपांतर होतही असेल (मराठीतल्या नसल्या, तरी इतर देशांतल्या कवींच्या शब्दांचा महिमा तसा आहेच ना!); पण इथे तर गुर्जर या एकाच कवीची मोजून एकच कविता आहे. गेली २० वर्षं सत्र व उच्च न्यायालयांना या एका कवितेचा निकाल लावता येऊ नये, यावरूनच तिच्या भयानकतेची कल्पना यावी. आता सर्वोच्च न्यायालयात तरी तो लागतो की, नाही ते कळेलच म्हणा. तोवर गुर्जरांनी ‘गांधी मला नडला’ असा या कवितेचा उत्तरार्ध लिहायला घ्यायला हरकत नाही. ‘गांधी मला नडला’ असं म्हणणाऱ्याला कुणी नडायला जाणार नाही. कारण गांधींच्या नादी लागून वाया गेलो म्हणणाऱ्याचं फारफार तर प्रबोधन केलं जाऊ शकतं, त्याला कोणी न्यायालयात खेचायला जाणार नाही.  

पादस्पर्शे क्षमस्व मे...

अर्कचित्र - सुरेश लोटलीकर
नेमाडेमास्तरांचे भाषण वाचोन वा लेखन वाचोन काहीएक तात्पर्यवजा निष्कर्ष काढण्याची फ्याशन पूर्वीपासोन मराठी भाषेंत पडली म्हणतात, ती चांगली गोष्ट म्हटली पाहिजे शेवटी. त्यांत काहीएक बरा वाटावा असा तथ्यांश दडून बसलेला असण्याची हमी देता येत नसली, तरी ती सपशेल करोन नाकारावी अशी सांप्रत परिस्थिती दुर्लभ म्हणावी इतकी दुर्घट नाही, हे आम्हांस कळून चुकले. आता रा. रा. नेमाडेमास्तर, जे की, देशीवादाचे जन्मदाते मानिले जातात, नव‘देशी’वादाचे शिल्पकार नमोजी यांच्या हस्ते ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारून वर हितोपदेश सांगते जाहले की, देशीवाद संकुचित नाही. ते म्हणतात म्हण्जे तो तसा नसणारच. देशीवादाला ताणले की मूलतत्त्ववाद जन्म घेऊ शकतो, हे आत्मज्ञान उशिरा का होईना नेमाडेमास्तरांस झाले, हे ऐकोन संतोष जाहला. प्रंतु नेमाडेमास्तर भारतीय लोक विवेकवादी असल्याचे सूचित करितात, तो मूलतत्त्ववादी होणार नाही, असा आशावाद व्यक्त करितात. तो खचितच समाधानास पात्र म्हणून वाटावा असा नाही. नेमाडेमास्तरांस जें जें म्हणून बरें वाटतें तें तें सर्व उत्तमच असें सर्वांनी मानिल्यास त्यांच्या भक्तांना परमसुख लाभेलही, न जाणो.
नेमाडेमास्तर आतां बरें बोलतील, मग बोलतील यांची आम्हांस आंस लागलेलीं, प्रंतु त्यांनी कशास कांहीं हातीं लागूं देऊ नये व एकंदरींत आम्ही जे दुर्भागीच कीं नुसती आशा करीत बसावें. त्यांतहि त्यांनी टाळ्याखाऊं मजकूर ओरडून बोलावा आणि वेळ मारून न्यावीं, असा एकंदरीने सारा भाषणप्रपंच म्हणावयाचा. अरुण शौरीनामक मजकूरमहाशय जीं जीं लबाडी करितात, इतरांच्या बुकांतून खचित अभ्यासाचा बहाणा करितात, कुणाची मुरवत न धरतां बेलाशक नापसंत असे दाखले जुळवितात आणि दांडगे शब्द वापरितात व अर्थांनी भेडसावितात. तशा तऱ्हेचें आपमतलबी वर्तन शौरीस शोभा देत नाही तद्वत आम्हांसही देत नाही. सबब आम्हीही तो मार्ग पत्करण्यास नाखूशच आहो. प्रंतु नेमाडेमास्तरांचे काही मासले मांडावयास अपरिहार्य करितात, सबब त्यांची अनिवार्यता नोंदविलेली बरीं. ‘...विकास हे काही संस्कृतीचे एकमेव व्यवच्छेदक लक्षण नाही’ ह्या नेमाडेमास्तरांच्या सिद्धांतात तदंतर्गत कस असा नाहीं कीं ज्यामुळें त्यास महत्त्व द्यावें अथवा त्याचा कांहीं कुणास उपयोग व्हावा. ‘...भारतीय नृत्य आणि भारतीय संगीत हे दोन कला प्रकार कोणत्याही परकीय प्रभावापासून दूर आहेत. म्हणून त्या महान आहेत.’ हाही नेमाडेमास्तरांचा सिद्धांत नव्या देशीचाच प्रकार म्हणावयाचा. त्यात नावीन्य म्हणून काडीचें नाही. इतरांच्या अनेक प्रकारच्या मजकुरांचा गडबुडगुंडा करोन व आपल्या तिरकस संमोहनविद्येचा प्रयोग करून पामर वाचकांस उगाचच चमकाविण्याची ही बहादुरी म्हटली पाहिजे. त्यांकरिता चिंतनाचा आव आणावयाची काहींएक गरज नव्हतीं.
‘आपले पूर्वज आपल्यापेक्षा अधिक बुद्धिवादी आणि हुशार होते, यात काही शंकाच नाही,’ आणि ‘...गुलामांची पुढील पिढीच अधिक बुद्धिमान असते,’ असे नेमाडेमास्तर बोलोन बैसले. व स्वत:बद्दलही मूळ मुद्दा भुलून होत्साते तारतम्य सोडून दिले, ह्यास काय म्हणावें? शब्दांच्या एकंदर कल्पनेमध्येंच कांहीं फेरफार करावयाचें तेवढें स्वातंत्र्य त्यांस घेण्यास कोणा गनिमाने आडकांठीं केलीं म्हणायची? स्वत:बद्दल कांहीं टीकाविवेचन न करणें हें शहाणपणाचेंच ठरेल असें कांहीं त्यांस वाटले नाहीं, हे नि:संशय कांहीं भलतेंच धारिष्ट्य म्हणावें लागेल.
असो. तर पुढील मुद्द्याकडे काळजीपूर्वक वळूं. ते म्हणतात कीं, ‘वैश्विकीकरण ही शुद्ध फसवणूक आहे.’ येथें आपल्या बेलाशक देशीवादाचे समर्थन करावयाचें असल्यानें त्यांनीं अर्धसत्याची भाषा सुरूं केली! वस्तुत:  अशा प्रकारचे सिद्धांत गेल्या २५ सालांत इतक्यांदा सिद्ध करून झाले आहेत म्हणतां, त्यांस पुन्हा सिद्ध करण्याजोगेंहि कांहीं उरलेलेंच नाहीं. ‘जागतिकीकरण ही शुद्ध भांडवलशाही आहे’ म्हणून ज्या कशास म्हणतात कीं जें ऐकतां ऐकतां आमचे कान दुखले आहेत असें अतिपरिचित कांहीं गृहीत धरणें हा एक धाडसी प्रकारच आहे असें म्हणावें लागतें.
‘माझ्यावरही परकीय प्रभाव आहे आणि मी तो नाकारत नाही,’ या नेमाडेमास्तरांच्या विधानाचें महत्त्व स्पष्टीकरण दीर्घ करण्याइतके आहे खास. केवळ हे शब्द वापरोन मोकळे झाले असें समजून न चालतां तें त्याविषयी लिहिते होतील याची आशा नजरअंदाज करूं नये.
नेमाडेमास्तरांस ‘हिंदू’चे पुढील भाग लिहायला सवड कशी म्हणतां ती गवसत नाही, मात्र भाषणे द्यायला, देशीवादाच्या टीकाकारांना बदडून काढायला, उपहासाचे डोस पाजायला, विरोधकांना अनुल्लेखाने जिवंतपणीच मारून टाकायला सवडच सवड काढिता येतें. त्यापरांस त्यांनीं देशीवादाची तरी अंमळ सवड काढून संगतवार तपशिलाबरहुकूम मांडणी करावी की नाही?
प्रंतु त्यांस देशीवादाची सविस्तर मांडणी करण्यास अंमळ खटाटोप करूनहि आजवर काही साधता आलें असें कांहीं वाटत नाहीं. प्रेमचन्द यांच्याबद्दल आम्हांस आदरच आहे, जसा नेमाडेमास्तरांबद्दलही आहे. पण नेमाडेमास्तरांसारिखे प्रेमचंद यांना मोठे करण्यासाठी आम्हांस शेक्सपीअरांस लहान करण्याची गरज वाटत नाही. नेमाडेमास्तरांस स्वत:कडे विधायकपणा घेण्याची खबरदारी घेतां आली नाही, आम्ही मात्र तो घेऊं इच्छितो. म्हणून होतकरू लेखकूंनी, कवीवंशूनी, कादंबरीगिरमटूंनी नेमाडेमास्तरांचे ठायीं स्वत:बद्दल अप्रीति मात्र उत्पन्न करून घेऊन त्यांच्या या भाषणाकडे दुर्लक्ष करून आपली नुकसानी करून घेऊं नये. एकंदरीने देशीवादाच्या टीकाकारांवर टीका टीका म्हणून म्हणतात ती त्यांस नाना खटाटोप करूनहि साधली आहे, असें कांहीं वाटत नाही. आता तर नेमाडेमास्तरांनी इंग्रजीच्या गुलामगिरीची जबाबदारी सपशेल पुढील पिढ्यांवर ढकलून दिली आहे. आपल्या दारातील घाण दुसऱ्याच्या दारात अशा प्रकारे परभारेच लोटून दिली म्हण्जे आपली जबाबदारी झटकता येते की काय? एकंदरीने हाच तो संकुचित नसलेला देशीवाद म्हणायचा, झाले!